कमळाची पानं/आमचा मित्र

विकिस्रोत कडून

आमचा मित्र


आज दिवस कसा झरझर जातोय.
नाहीतर नेहमी तो सैल पडलेल्या दोरीसारखा वाटतो,
मग उगीचच नको असताना
कॉफी करून पी, ज्यांच्याशी बोलण्यासारखं
काही विशेष नाही त्यांना फोन करून गप्पा
मार, बाजारात चक्कर टाकून ये-असले
काहीतरी वेळ घालवण्याचे उद्योग मी करीत
बसते. तसं युनिव्हर्सिटीत जाऊन माझ्या
थीसिसवर काम करता येईल मला,
पण खरं म्हणजे त्या थिसीसमधे मला काही
रस वाटत नाही. माझा पिंड मूळचा
आळशीच. त्यातून माझ्या बुद्धीला डिवचून
जागं करील असं माझ्या आयुष्यात काही
घडत नाही. पी.ऄच्.डी साठी नाव
नोंदवायचं सोंग आणलं ते शेखरसाठी.
मग तो निघून गेला. तेव्हा माझा त्याबद्दलचा
उत्साह विरला. नरेंद्रला त्याचंही काही वैषम्य वाटलं नाही. तो फक्त ओठातल्या
ओठात हसला. आपण बांधलेल्या
आडाख्याबरहकूम कुणी वागलं म्हणजे
हसतो तसा.

पण आजचा दिवस वेगळा आहे. आज
संध्याकाळी शेखर येणार आहे.  नरेंद्रने सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला शेखरचं कार्ड वाचून दाखवलं- इतकी महत्त्वाची बातमी सांगायला चांगलं पत्र लिहायचं सोडून चार ओळी खरडून पोस्टकार्ड पाठवणं हे शेखरच करू जाणे-तेव्हा माझ्यात एकदम वीज सळसळली. माझा उतू जाणारा आनंद नरेंद्रला दिसू नये म्हणून मी काहीतरी सबब काढून उठून गेले त्याच्यासमोरून. त्याला त्याचा आनंद दाबून ठेवण्याचं काही कारण नव्हतं. ह्या बातमीवर विश्वास बसत नसल्यासारखं मान हलवीत तो म्हणाला होता, "गुड ओल्ड शेखर. बी जॉली गुड टु सी हिम अगेन. काय मजा येईल नाही त्याला पुन्हा भेटायला!"
 नरेंद्रचा इंग्रजी ॲक्सेंट अगदी ब्रिटिश धर्तीचा आहे, अन् त्याच्या बोलण्यात अस्सल ब्रिटिश म्हणून समजले जाणारे शब्दप्रयोगही भरपूर असतात. ह्या उलट शेखर त्याच्यापेक्षा किती तरी जास्त वर्षे इंग्लंडमध्ये राहिलेला असूनही त्याचा इंग्रजी ॲक्सेंट अगदी शुद्ध-आक्रमकच म्हटलं तरी चालेल-मराठी आहे. गोऱ्या साहेबाच्या बोलण्याची नक्कल करणं हे नरेंद्रातल्या न्यूनगंडाचं लक्षण आहे म्हणून शेखर नेहमी नरेंद्रची चेष्टा करीत असतो. पण नरेंद्र कधी चिडत नाही. नुसता हसतो आणि आपलं ते घट्ट धरून बसतो. हा नरेंद्रचा एक मला आवडणारा स्वभावविशेष.
 आज मला नरेंद्रचा हेवा वाटला, कारण त्याला होणाऱ्या आनंदाला तो मोकळेपणानं वाट करून देऊ शकत होता. पण मग असंही वाटलं की शेखर आम्हाला दोघांनाही आवडतो न् आमचं तिघांचं इतकं चांगलं जमतं हे बरंच आहे.
 नरेंद्र नेहमीप्रमाणे ऑफिसला गेलाय आणि मी आज काय नेसायचं, काय स्वैपाक करायचा हे ठरवण्यात सकाळ घालवली आहे. शेखरला मी इतक्या दिवसांनंतर कशी दिसेन? अजून त्याला माझा स्वैपाक आवडत असेल? खरं म्हणजे इतके काही फार दिवस झाले नाहीत. चारएक महिने असतील. तसा कशात आमूलाग्र बदल घडण्याइतके तर नाहीतच. तरीपण मी स्वत:ला हे प्रश्न विचारते आहे.
 आमच्या लग्नाच्या कंटाळवाण्या रिसेप्शनच्या वेळी शेखर मला प्रथम भेटला. "लिलू, हा माझा सगळ्यात जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र." नरेंद्र ओळख करून देताना म्हणाला. 'जुना' ह्या शब्दावर सवंग कोटी करण्याचा मोह त्यानं टाळला. ह्या एका गोष्टीखेरीज शेखरमध्ये तसं नाव घेण्याजोगं मला काही दिसलं नाही. मला त्या दिवशी भेटलेल्या शेकडो लोकांतला तो एक होता. त्या दिवशीच्या जुनाट कालबाह्य समारंभानं मी ज्या कुटुंबाचा घटक बनले होते, त्या कुटुंबाच्या संबंधितांतला एक. ह्यापेक्षा काही नाही.
 नंतर त्याच्याशी चांगली ओळख झाल्यावर त्याच्या बाह्य स्वरूपाइतकं त्याचं अंत:स्वरूप सामान्य नाही असं मला आढळलं. तो बहुतेक संध्याकाळी आमच्याकडे यायचा, फारसे आढेवेढे न घेता जेवायला थांबायचा आणि न चुकता स्वैपाकाची तारीफ करायचा. पहिल्यापहिल्यांदा आम्हा दोघांत सदैव येणाऱ्या ह्या आगंतुकाचं काय करायचं असा मला प्रश्न पडे. पण नरेंद्रला त्याचं काही विशेष वाटत नव्हतं, नि हळूहळू मलाही त्याची सवय झाली दुसऱ्यातलं चांगलं काय असेल त्याचा शोध घेण्याची कला काहींना असते. त्यांच्या सहवासात असलं म्हणजे आपल्यात काहीतरी विशेष चमक आहे असं आपल्याला वाटतं. शेखर अशा माणसांपैकी होता. एरवी आतल्या गाठीचा आणि अबोल वाटणारा नरेंद्र, शेखर आला की मोकळपणा, बोलायचा, हसायचा. त्यामुळेच की काय, शेखरचा राग न करायला शिकले.
 त्या दोघांच्या गप्पा बरेचदा त्यांच्या इंग्लंडमधल्या वास्तव्याबद्दल असत नरेंद्र नेहमी 'गेले ते दिवस' अशा हुरहुरीने बोले, शेखर उपहासाने बोले. मला दोघांच्या वेगवेगळ्या सुरांतून एकच हळुवार भावना ऐकू यायची. ते बहुतेक करून इंग्रजीतच बोलायचे. माझ्या मनात एकदा शेखरला विचारायचं होतं की गोऱ्या साहेबाच्या भाषेचा वापर करणं हेही एक न्यूनगंडाचंच लक्षण नाही का म्हणून. पण ते राहूनच गेलं.
 नरेंद्र आणि शेखरची घरं शेजारी-शेजारी होती. शेखर नरेंद्रपेक्षा बराच मोठा, तेव्हा ओघानंच तो नरेंद्रचा हीरो बनला असला पाहिजे. आपल्याबद्दल अशी भावना असणाऱ्या लहान मुलांविषयी मोठ्या मुलांना बहुधा तुच्छता वाटते. पण शेखरनं नरेंद्रची भक्ती कधी तुच्छ लेखली नाही, म्हणून त्यांची मैत्री होऊ शकली. ते लंडनमध्ये बरेच दिवस एकत्र होते. नरेंन्द्र स्कूल ऑफ इकनॉमिक्समधे जात होता. शेखरचं शिक्षण खरं म्हणजे झालं होतं, पण एकामागून एक सबबी काढून तो परत येणं लांबणीवर टाकत होता, आणि कुठंतरी शिकवायचं, वर्तमानपत्रांसाठी लेख लिहायचा, बी. बी. सी. च्या मराठी कार्यक्रमात भाग घ्यायचा, असले उद्योग करून पोट भरीत होता. ते दोघं एकाच फ्लॅटमध्ये राहात होते आणि नरेंद्रचं शिक्षण संपल्यावर एकत्रच परत आले. शेखर परत आल्याचं श्रेय त्याच्या आईवडिलांनी नरेंद्रला दिले. त्यांनी तो परत येण्याची आशा सोडूनच दिली होती.
 आम्ही बरोबर घालवलेल्या सबंध काळाचा आढावा घेतला तर माझ्यातला बदल नेमका कधी झाला हे सांगता येणार नाही. एवढं मात्र खरं की असा बदल झालेला आहे, शेखर माझ्या लेखी नुसता एक मित्र, अनेक संध्याकाळांचा सोबती, आमच्या कंटाळवाण्या होऊ पाहणाऱ्या आयुष्यात जरा मजा आणणारा माणूस राहिलेला नाही. हे मी एका विशिष्ट क्षणी स्वत:शी कबूल केलं. ह्यापेक्षा वेगळं असं काय आणि किती मला त्याच्याबद्दल वाटत होतं हे ठरवण्याच्या भानगडीत मी कधी पडले नाही. तशी गरजच नव्हती. कारण त्यामुळे मी नरेंद्रशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतारणा करते आहे असं मला कधी वाटलं नाही. जरी कधीकधी नरेंद्र अतीच अबोल आहे, किंवा त्याच्या ऑईल कंपनीतल्या नोकरीच्या बाहेर फारसा कशातच त्याला रस नाही, किंवा तो दिसायला जरा जास्तच नाजूक आहे, अशी टीका मी मनातल्या मनात करीत असले, तरी त्याची उंच सरळ अंगकाठी, गोरा रंग, धरधरीत नाक, हिरवे डोळे, बंडखोरपणाने उडणारे दाट मऊ केस, आणि ओठांच्या मुरडीत दिसणारी विनोदी स्वभावाची झाक, ह्या सगळ्याचं मला अगदी सुरुवातीला वाटत असलेलं आकर्षण अजूनही कायम होतं. शेखर कधी नरेंद्रची जागा घेऊ शकेल असं माझ्या स्वप्नातही आलं नव्हतं.
 आणि गंमत अशी की शेखरच्या सहवासातच मला नरेंद्रच्या आकर्षणाची जास्त तीव्रतेने जाणीव व्हायची. जातायेता त्याचा गाल कुरवाळायचा किंवा त्याच्या डोक्याचा हलकेच मुका घ्यायचा, गप्पा मारतामारता त्याच्या अगदी जवळ सरकून त्याच्या खांद्यावर डोकं टेकायचं, असं काहीतरी केल्याशिवाय मला राहवत नसे. नरेंद्र कधी प्रतिसाद देत नसे, पण झिडकारीत नसे. त्याची मूक संमती मला पुरेशी होती. शेखरचं अस्तित्व हे जणू मला आव्हान होतं नि मी त्याला माझ्या वागणुकीतून सांगत होते, "बघ आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे. आम्ही किती सुखी आहोत."
 माझं नुकतंच लग्न झालं होतं तेव्हा एखाद्या मुलीवरून मी शेखरला खिजवत असे. तुला मस्तपैकी गटवील अशी एक हुशार मुलगी मी शोधून काढीन असं त्याला सांगत असे.
 एकदा मी त्याला गंभीरपणे विचारलं, "तू लग्न का केलं नाहीस?" तो म्हणाला, "लग्न करून पुरूष आपला आत्मा गमावतो." त्यानं असं म्हणावं हे मला फार लागलं.
 मी म्हणाले, "मग नरेंद्रनं आपला आत्मा गमावलाय असं तुला म्हणायचंय का?"
 आपण नुसती मस्करी करतोय असं दाखवायला तो हसला.
 "कदाचित गमावायला त्याच्याजवळ आत्माच नसेल," तो म्हणाला. "किंवा काही विशिष्ट परिस्थितीत आपला आत्मा गमावणं हे सुखद असेल."
 त्याने माझ्याकडे विचित्रपणे पाहिलं. माझ्या नजरेचा ठाव घेत, जराशा आवेगानं. आणि एकदम माझ्या मनात विचार चमकून गेला, हा माझ्यासाठी एकटा रहातोय. ह्या विचाराने मग मला जरा बरं वाटलं. कदाचित ही संक्रमणाची पहिली पायरी असू शकेल.
 ह्यानंतर माझं मन द्विधा झालं. एकीकडून मला वाटे, त्यानं लग्न करावं कारण तो स्त्रीजातीचा विजय ठरला असता. दुसरीकडून त्याने अविवाहित राहण्यात माझा व्यक्तिश: गौरव आहे असं वाटे. शिवाय जोपर्यंत माझं लग्न झालेलं होतं न् त्याचं नव्हतं, तोपर्यंत ह्याबाबतीत माझा वरचष्मा आहे असं दाखवून मला त्याच्यावर मात करता येत होती.
 शेखरबद्दल मी जेव्हा अलिप्तपणे विचार करीत असे-तो समोर नसताना तसं करणं मला नेहमीच जमत असे-तेव्हा मला वाटायचं की स्त्रीला आकर्षित करील असं त्याच्यात काही नाही. नरेंद्रपेक्षा ठेंगणी, ह्या वयातच स्थूलपणाकडे झुकणारी अंगकाठी, चौकोनी चेहरा, केसाळ भुवया, अति धूम्रपानामुळे काळे झालेले जाडजाड ओठ, कानात केस. पण मग त्याचा फोन आला की तो कुरूप आहे हे स्वत:ला पटवणं निरर्थक वाटायला लागायचं. फोनवर तो म्हणायचा, तुम्हाला वेळ असला तर मी संध्याकाळी येतो म्हणून. नेहमीच वेळ असे. नरेंद्रला मित्र नाहीत, मित्रांची जरूर भासत नाही. तसा शेखर आहे, पण त्यांच्या मैत्रीत मला वाटतं, सहेतुकतेपेक्षा सवयीचा भाग जास्त. माझ्या बाबतीत म्हटलं तर लग्नाने माझे पहिले लागेबांधे तुटले, नवे मी अजून जोडले नाहीत. आमचे शेजारी कुचकामाचे आहेत. नरेंद्रचे सहकारी व त्यांच्या बायका ह्यांच्याशी आमचे संबंध फक्त अधूनमधून एकमेकांना जेवायला बोलावण्यापुरते औपचारिक आहेत.
 तेव्हा शेखरचा फोन येणं ही आमच्या दृष्टीने अर्थपूर्ण घटना होती. फोन आला की मी प्रथम स्वैपाकघरात जाऊन शेखरला आवडेल असं काय शिजवता येईल ते पाहात असे. तो आमच्याकडे इतक्यांदा जेवला होता की नरेंद्र इतक्याच त्याच्याही आवडीनिवडी मला पाठ झाल्या होत्या. मग जेवणाची वेळ झाली म्हणजे अगदी सहजगत्या विचारल्यासारखं मी म्हणायची, " "जेवायला थांबतोस ना? तसं काही विशेष केलं नाही आज, पण जे आहे तीच मीठभाकरी." ही मीठभाकरी म्हणजे मोठ्या परिश्रमाने रांधलेले याच्या आवडीचे निवडक पदार्थ असत.
 शेखर यायचा असेल त्या दिवशी मी पोषाखही अगदी काळजीपूर्वक करीत असे. म्हणजे अगदी ठेवणीतले किंवा भडक कपडे करीत असे असं नाही. फक्त मला विशेष शोभणारा रंग, किंवा मंद सुगंध येईल इतपत अत्तर, किंवा एखादाच फारसा ठळक नसलेला दागिना. मी काय घातलंय ह्याच्याकडे शेखरचं कधीच लक्ष नसे, पण असं काही केलं की मी विशेष सुंदर दिसत्येय असं माझं मलाच वाटायचं. त्याच्यासमोर तसं वाटायची जरूर भासायची.
 माझ्यात बदल झाला तसा शेखरच्यात झाला की नाही हे मला कळलं नाही. जाण्यापूर्वी तो माझ्याशी जास्त मोकळेपणाने वागायला लागला होता एवढं मात्र खरं. त्यानं माझा 'स्वीकार' केला होता असं म्हणायला हरकत नाही. प्रथमप्रथम आमच्यात एक प्रकारचा ताण असायचा, एकमेकांवर मात करण्याची चढाओढ असायची. आता त्यानं माझं अस्तित्व स्वीकारलं होतं. तो आपणहून मला त्यांच्या गप्पात ओढायचा, कशाबद्दल तरी माझं मुद्दाम मत विचारायचा. एकंदरीतच तो स्त्रीद्वेष्टा असला तरी (आणि त्याचं स्त्रियांबद्दलचं वाईट मत वेळी-अवेळी ठामपणे मांडायला तो मागंपुढं पाहात नसे.) त्याच्या रोषाच्या कक्षेत मी येत नाही, इतर बायकांहून वेगळं असं माझ्यात काही आहे, असं त्याच्या वागण्यातून ध्वनित होत असे. ह्या अप्रत्यक्ष प्रशस्तीवरसुद्धा मी खूष होते.
 मला शेखरबद्दल जे वाटत होतं ते कधी व्यक्त झालं नाही. व्यक्त करावंसं विशेष उमाळ्याने मला कधी वाटलं नाही, कारण मग काय वाटत हात त्याचं नेमकं स्वरूप ठरवावं लागलं असतं. आणि तशी कधी संधीही आली नाही. आम्ही दोघे एकत्र कधी येत नसू. एखाद्या वेळी आलोच तरी नरेंद्र थोड्याच वेळात येणार असे म्हणजे ते काही क्षण धरण्यासारखे नसतच. कधीकधी नरेंद्र नसताना शेखर आलाय अशी कल्पना मी रंगवीत असे पण मी दार उघडलंय आणि तो समोर उभा आहे, इथंच माझी प्रतिभा लुळी पडत असे, म्हणजे 'कसं काय-ठीक आहे'च्या गद्य पातळीवरच अडकून बसत असे.
 पण खऱ्या आयुष्यात नरेंद्र नसताना शेखर कधीच येत नसे. गावाला जायचं असलं म्हणजे नरेंद्र तसं आधी सांगायचा, आणि शेखरची पुढची भेट नरेंद्र परत आलेला असेल अशा बेताने व्हायची. कधीकधी असं कां असा प्रश्न मला पडायचा. कदाचित् शेखरचं वागणं-बोलणं नुसतं वरवरचं असेल, आणि . नरेंद्र नसताना माझ्या सहवासात वेळ घालवण्यानं नरेंद्रबद्दल आपल्या निष्ठेला धक्का लागतो असं त्याला वाटत असेल.
 कधीकधी विचार करायला लागले की मला शेखर आणि नरेंद्रची इतकी दाट मैत्री झालीच कशी ह्याचं आश्चर्य वाटायचं. नरेंद्र निर्बुद्ध खास नाही, तरी पण त्याच्या बुद्धीला निश्चित मर्यादा आहेत नि त्याचा सहवास शेखरच्या प्रगल्भ बुद्धीला उत्तेजक वाटण्याची शक्यता फारच कमी. उलट आपण नरेंद्रपेक्षा वरचढ आहोत असं दाखवण्यात शेखरला काही आनंद वाटत होता असंही मला कधी दिसलं नाही. म्हणजे त्यांच्या मैत्रीचं सवय हेच एक कारण राहिलं शिवाय एखाद्या कलंदरालासुद्धा आयुष्यात काहीतरी धर हवा असतो. ही गरज शेखरच्या बाबतीत नरेंद्रानं पुरी केली असेल.
 एक दिवस अचानक शेखरनं आम्हाला तो मुंबई सोडून कलकत्त्याला जाणार अशी बातमी देऊन हादरवलं.
 मी म्हटलं, "कलकत्ता? त्या घाणेरड्या शहरात एखादा आपणहून जातो?"
 "एखाद्याला नोकरी मिळाली म्हणजे जातो," तो म्हणाला.
 बापानं ठेवलेल्या इस्टेटीतून शेखरला काही थोडं उत्पन्न मिळत होतं. फावल्या वेळात वर्तमानपत्रं, मासिकं यासाठी नैमित्तिक लिखाण करीत असे. नोकरी करण्याची त्याला गरज नव्हती आणि करावी असं त्याला कधी वाटलं नव्हतं. आता एकाएकी त्यानं ठरवलं की लहर लागेल तेव्हा काम करण पुरेसं नाही.
 तो म्हणाला, "का कुणास ठाऊक, पण कुणीतरी डोक्यावर बसल्याखेरीज स्वत:च्या कार्यशक्तीचा पुरेपूर उपयोग करून घेत नाही आपण."
 नरेंद्र म्हणाला, "ते सगळं ठीक आहे रे. पण स्वतंत्र आयुष्य जगायची सवय झाल्यावर नोकरीचं बंधन तुला आवडणार नाही."
 "कदाचित् नाहीही आवडायचं, पण ते कसं वाटतं ते पाहायचंय मला"
 "पण त्यासाठी कलकत्त्याला कशाला जायला पाहिजे? मुंबईत काय नोकऱ्या नाहीत?"
 "असतील, पण मला जरा हवापालट पाहिजे आहे. ह्या शहराचा अगदी वीट आलाय मला. हे आहे पक्कं व्यापारी शहर, आणि खऱ्या संस्कृतीचा लवलेशही नसताना जणू आपणच संस्कृतीचे रक्षक आहोत असा आव आणतात इथले लोक!"
 "कलकत्ता काही वेगळं आहे वाटतं?" मी विचारलं.
 "आहे असं ऐकलंय मी. खरंच डोळ्यांनीच पाहीन आता."
 त्याच्या मुंबईबद्दलच्या उद्गारांतून वाजवीपेक्षा जरा जास्तच राग व्यक्त झाला होता. तो राग जणू काय खरा आमच्यावरच होता, अशा आवेशात तो बोलला. सबंध संध्याकाळभरच मग तो काहीसा त्रासल्यासारखा, रुष्ट झाल्यासारखा वागला. नेहमीसारखा आत्मविश्वासानं, आक्रमकपणे बोलत वागत नव्हता. अस्वस्थ, चित्त थाऱ्यावर नसल्यासारखा, काहीतरी हरवल्यासारखा वाटत होता. असं मी त्याला कधीच पाहिलं नव्हतं. त्यादिवशी तो फार वेळ थांबलाच नाही, आणि निरोप घेताना त्याला फार वाईट वाटत होतंसं दिसलं.
 "बरंय, पुन्हा भेटू लवकरच-" तो म्हणाला. "तुम्ही पोरांनी माझ्यासाठी खूप काही केलंत. पण मी तुमच्या आयुष्यात बांडगूळ होऊन राहणं बरं नव्हे, नाही का?"
 "असं का म्हणतोस? तुझ्याशिवाय करमणार नाही आम्हाला." नरेंद्र म्हणाला.
 शेखर अस्पष्टसा हसला. "मला पण तुमची खूप आठवण होईल. आणि लिलूच्या हातच्या जेवणाचीही. बरं पत्र लिहायला विसरू नका. हा पत्र लिहिण्याच्या बाबतीत महाआळशी आहे लिलू, पण तू लिहिशील ना?"
 "हो तर-" मी म्हटलं.
 मला वाटलं तेवढी शेखरची आठवण झाली नाही. फक्त अधूनमधून मनात येतं, शेखर माझ्यामुळे दूर झाला का? कदाचित् माझ्याबद्दल वाटणाऱ्या ओढीचं खरं स्वरूप त्याला एकदम कळलं असेल, आणि त्याच्या परिणामापासून स्वत:ला वाचवण्यासाठी त्यानं माझ्यापासून लांब जायचं ठरवलं असेल. त्याखेरीज त्याचं त्या दिवशीचं विचित्र वागणं, निरोप घेतेवेळचं त्याचं करूण स्मित, ह्याची संगती कशी लावायची?
 आज सकाळी नरेंद्र गेल्यापासून मी स्वत:ला प्रश्नावर प्रश्न विचारत्येय. शेखरला माझ्या हृदयात काय स्थान आहे? मला स्वत:शीसुद्धा कबुली द्यायला अवघड वाटावं इतकं काही मला त्याच्याबद्दल वाटतं का? समजा, त्यालाही तसंच काही वाटत असलं तर? तर आमचं दोघांचं एकमेकांशी काय नातं होईल? ह्या प्रश्नाचं उत्तर देणं मला हवं आहे नि नकोही आहे, कारण ते उत्तर माझ्या आयुष्यात उत्पात घडवून आणील असं वाटतं आहे. आज प्रथमच शेखरबद्दल विचार करताना नरेंद्र आम्हा दोघात आगंतुकासारखा वाटतो आहे.
 मला सगळ्यात अस्वस्थ करून सोडणारं प्रश्नचिन्ह म्हणजे शेखर स्वतः. तो बदलला असेल? त्याचा चेहरा पूर्वीसारखाच मख्ख असेल की त्यावरून मला काही अर्थबोध होईल? बिनबोलता आमच्यात एक अदृश्य प्रवाह वाहायला लागेल?
 शेवटी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळण्याचा क्षण येऊन ठेपला आहे. जेवण - त्याच्या कवचाखाली शिरकाव करून घेण्यासाठी मी नेहमी वापरत आलेलं शस्त्र तयार आहे. नरेंद्र ऑफिसातून येऊन आंघोळीला गेला आहे. आणि मी शेखरची वाट बघत आहे. माझ्या हातात वर्तमानपत्र आहे. पण ते वाचण्याचा मी प्रयत्नही करीत नाही.
 एक टॅक्सी आमच्या घरासमोर थांबते आहे. तिचं दार उघडतं, मिटतं आणि ती निघून जाण्याच्या आवाजात पुढच्या दाराच्या दिशेनं येणाऱ्या ओळखीच्या पावलांचा आवाज लुप्त झाला आहे.
 मी जागची उठण्यापूर्वीच नरेंद्र धावत खाली आलाय दार उघडायला. "शेवटी आलात म्हणायचे तुम्ही महाशय,-" तो म्हणतो आहे.
 शेखर जरा बारीक झालाय, काळवंडलेला दिसतोय, पण मला पूर्वी कधी वाटला नव्हता इतका देखणा. त्यानं नरेंद्रचा हात हातात घेतला आहे. तो म्हणतोय, "तुला पाहून फार बरं वाटलं बेट्या. बघू तरी नीट तुझ्याकडे. अगदी बदलला नाहीस बघ."
 माझ्या डोक्यावर मोठा दिवा लागलेला आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे शेखरला मी अजून दिसतच नाहीये. मी स्तब्ध उभी आहे. त्याच्याकडे पाहातापाहाता माझ्या छातीत काहीतरी आवळल्यासारखं होतंय.या सुखद संवेदनेचा आस्वाद घेत मी प्रत्यक्ष भेट काही क्षण लांबणीवर टाकते आहे.
 युगानुयुगं लोटल्यासारखी वाटताहेत. शेखर न् नरेंद्र अजून समोरासमोर उभे आहेत. शेखरचा हात नरेंद्रच्या खांद्यावर आवळलेला आहे. तो नरेंद्रकडे एकटक पाहताना त्याच्या डोळ्यांत एक विशेष चमक आहे आणि ह्या माझ्या समोरच्या मूकचित्राचा रंग एकदम बदलतोय. काहीतरी उलटपालटं होतंय. शेखरच्या डोळ्यांत मला जे दिसतं आहे त्याचा अर्थ सरळ आहे.
 इतकी कशी मी आंधळी होते?


पूर्व प्रसिध्दि : किर्लोस्कर
जानेवारी १९७६