कमळाची पानं/देणेकरीण

विकिस्रोत कडून

देणेकरीण


पडदा उघडतो एका दिवाणखान्यावर, ही

खोली बरीच प्रशस्त. एकेवेळी तिची
अभिरुचीपूर्ण सजावट असावी. आता
कळाहीन. सोफासेटची कव्हरं जुनी,
विटलेली. सतरंजी मधूनमधून फाटलेली.
भिंतीचे पोपडे उडालेले. छताच्या कोपऱ्यात
कोळिष्टकं. खोलीला डावी-उजवीकडे दारं,
मागे एकच लांब खिडकी.

पडदा उघडताना दीनानाथ खोलीचं परीक्षण
केल्यासारखं इकडेतिकडे बघत हिंडतो आहे.
सोफ्यावर प्रेक्षकांकडे तोंड करून सीमा
बसलेली आहे. त्या दोघांच्या चेहऱ्यातलं
साम्य इतर तपशिलांतही दिसतं. कपडे
किमती, उत्तम अभिरुची दाखवणारे. तोंडावर
श्रीमंती राहाणीचं तेज. दोघंही मुळात देखणी
नसूनही दहाजणांत आकर्षक म्हणून उठून
दिसतील.

पद्माकर सोफ्याशी काटकोनात ठेवलेल्या,
उजवीकडील दारासमोर खुर्चीवर.
अंगानं किरकोळ. चुरगळलेला, पिवळट
झाक असलेला पायजमा व नेहरू सदरा
पेहेरलेला. सदा चिंताग्रस्त असल्यामुळंच

की काय, कपाळावर कायम कोरल्या गेलेल्या

आडव्या आठ्या. मी आयुष्यात हरलो आहे, फसलो आहे असा भाव तोंडावर. वय चाळिशीतलं पण पस्तिशीच्या आसपास असलेल्या सीमा व दीनानाथापेक्षा तो खूपच वयस्कर वाटतो.
 दीना : काय दशा झालीय नाही घराची? पूर्वी बाबांना मोठा अभिमान असायचा आपण घर किती उत्तम स्थितीत ठेवतो याचा. नेहमी म्हणायचे, आपले लोक वास्तू बांधण्यावर लाखावारी खर्च करतील, पण ती मेंटेन करण्यासाठी दमडी नाही सुटायची त्यांच्या हातून.
 पद्मा : गेली काही वर्षं त्राण होतं कुठं बाबांना घराकडे लक्ष द्यायला? मुक्ताचं सगळं पाहायची.
 सीमा : अन् मुक्ताचा कारभार सदाचाच गबाळग्रंथी!
 पद्मा : असं म्हणू नको. बाबांची उस्तवारी करण्यात वेळच झाला नसेल तिला दुसऱ्या कशाकडे बघायला.
 दीना : खरंच. कुणालाही हेवा वाटणार नाही असं हे गेल्या काही वर्षांचं आयुष्य गेलं बिचारीचं. तसे तुम्ही होतात म्हणा, पण मुख्य जबाबदारी तिच्यावरच होती. (येऊन सीमाशेजारी सोफ्यावर बसतो.)
 पद्मा : मुख्य नाही, सगळीच. कधीकधी एखाद्या कैद्यासारखं वाटत असलं पाहिजे. आजाऱ्याच्या तैनातीत रात्रंदिवस राहायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. (सुस्कारा टाकून) सुटली बिचारी! भेटायला येणारे म्हणतात, इतक्या थोर माणसाची शेवटची सेवा तुमच्या हातून घडली, सुदैवी आहात तुम्ही. कसली सुदैवी? लोक काही विचारच करीत नाहीत बोलताना. (थोडं थांबून) तिच्यावर एकटीवर सगळी जबाबदारी टाकली म्हणून कधीकधी फार अपराध्यासारखं वाटायचं मला.
 सीमा : मला नाही वाटायचं. मुक्ताला मदतीची गरज वाटली असती तर मागितली असती तिनं. ती अशा ताठ्यात वागायची की जणू बाबा म्हणजे तिच्या खास मालकीची एक वस्तू होती.
 पद्मा : तू तिच्या वागणुकीचा विपरीत अर्थ लावते आहेस. (खिन्नपणे) मला वाटतं, मदत मागितली तरी मिळणार नाही याची तिला कल्पना होती म्हणून तिनं मागितलीच नाही.
 दीना : म्हणजे, बाबांच्या आजारपणात तुम्ही काहीच हातभार लावला नाही?
 सीमा : तू सोयिस्करपणे अमेरिकेत जाऊन राहिलास, तेव्हा आमची

हजेरी घ्यायला तुला मोकळीक आहे, दीना! पण तू इथं असतास तर हेच केलं असतंस. आम्हाला आमचे संसार आहेत, मुलंबाळं आहेत, परगावाहून वरच्यावर इथं येणं शक्य नव्हतं. मुक्ताला दुसरं काहीच नव्हतं. आणि ती सगळं करायला खंबीर होती.
 पद्मा : हं. ती खंबीर होती म्हणून तर तिच्यावर सगळं टाकणं सोपं गेलं आम्हांला. कधीकधी वाटायचं, की इथं येऊन राहाणं शक्य नसलं तरी बाबांना थोडे दिवस आमच्याकडे घेऊन जावं. पण विमल ते कबूल करीना. ती म्हणे, सगळं बिनबोभाट होतंय तर तुम्ही का उगीच अंगावर ओढून घेता? मला माझा संसार पुरे झालाय, आणखी आजारी माणसाचं करायची शक्ती नाही मला. मग मी स्वत:ची समजूत करून घेई की विमलनं आदळाआपट करून अनिच्छेनं बाबांचं करण्यापेक्षा त्यांच्या स्वत:च्या मुलीनं प्रेमानं केलेलं बर! बाबांना भेटायला आलो न तिला पाहिलं की लाज वाटायची मला स्वत:ची. खरं म्हणजे मी थोरला भाऊ. बाबा तिच्या लग्नाच्या बाबतीत काही हालचाल करीत नाहीत असं पाहून मी पुढाकार घ्यायला पाहिजे होता; पण मी स्वार्थी होतो. मला स्वत:पलिकडचं बघता आलं नाही.
 दिना : आता काय करणार आहे ती?.
 पद्मा : (दचकून) मुक्ता? मला नाही माहीत. मी काही विचारलं नाही तिला त्याबद्दल. (ह्या प्रश्नानं त्याला अस्वस्थ केलं आहे हे उघड आहे.)
 सीमा : करील काहीही. आपल्याला काय करायचंय त्याच्याशी? तिची ती मुखत्यार आहे.
 (मुक्ता चहाचा ट्रे घेऊन डावीकडच्या दारातून येते. दीनानाथ तिला पाहून चटकन उठतो व तिच्या हातातला ट्रे घेऊन सोफ्यासमोरच्या टेबलावर ठेवतो.
 मुक्ता तिशीची. लठ्ठ माणसांत जमा होण्यासारखी. खूप तेल चोपडलेल्या केसांची घट्ट वेणी. तंग बसणारं पांढरं, पातळ कापडाचं पोलकं व त्याच्या दंडात रुतणाऱ्या बाह्या तिचा बेढबपणा आणखीच स्पष्ट करतात. साडी भडक प्रिंट असलेली, तिला अगदी विशोभित दिसणारी.
 ती आल्यावर अपराधी शांतता. मग सीमा एकदम 'ब्राअिट' आवाजात बोलते.)
 सीमा : तुझ्या रिझर्व्हेशनबद्दल काही कळलं का दीना?
  दीना : हो, सोमवार सकाळची फ्लाइट मिळाली आहे.
 पद्मा : म्हणजे परवाच की! इतक्यात निघालाससुद्धा तू?

 दीना : आणखी थांबून तरी काय करायचंय? शिवाय मला फार रजाही मिळाली नाहीये.
 सीमा : खरं म्हणजे मी पण जावं म्हणत होते उद्या-परवा.
 पद्मा : सगळ्यांनीच जाऊन कसं चालेल? अजून माणसं येताहेत दुखवट्याच्या भेटीला. अिथं कुणीच नसलं तर ते बरं दिसणार नाही.
 (सगळे एकदम मुक्ताकडे बघतात, मग स्तब्धता. वरील संभाषण चालू असता मुक्ता चहा कपात ओतून एकेकाला कप देते. पद्माकरचं बोलणं संपल्यावर ती शेवटचा कप घेऊन त्याच्या समोरच्या खुर्चीत बसते. तिच्या हालचाली झटपट पण यांत्रिक. खाली बसल्यावर इतर सगळे एकदम गप्प झाले आहेत याची जाणीवच नसल्यासारखी ती एकटक समोर बघत चहाचे घुटके घेते.)
 दीना : बाकी लोक मात्र खूप लोटताहेत हं. मला वाटलं नव्हतं.
 पद्मा : का वाटलं नव्हतं? (भाषण पाठ म्हटल्यासारखं) मराठी वृत्तपत्रांच्या जगात बाबांचं एक विशेष स्थान होतं. पक्षीय राजकारणापासून अलिप्त राहून समाजाला सत्प्रेरणा देण्यासाठी झटणारे गेल्या पिढीत जे काही चारजण होते, त्यांच्यात बाबांचा मान सर्वांत मोठा होता. (हे आपण पाठ केलेलं भाषण म्हणून दाखवल्यासारखं बोलतो आहोत याची जाणीव होऊन एकदम जरासं हसतो.) तू विसरलास.
 दीना : विसरेन कसा? पण तरी लोकांना इतकं वाटेल याची कल्पना नव्हती. आफ्टर ऑल गेली कित्येक वर्ष बाबांचा सार्वजनिक जीवनाशी काही संबंध नव्हता.
 सीमा : लोकांना खरं कितपत वाटतं कुणास ठाऊक! आपलं रीत आहे म्हणून भेटायला येतात. तेचतेच बोलतात, आणि आल्यापासून घड्याळाकडे नजर. किती वेळ बसलं म्हणजे जायला हरकत नाही याचा विचार करीत.
  मुक्ता : (कप टेबलावर ठेवून एकदम उठून उभी राहाते.) तुमच्यासारखाच.
 (यापुढील संपूर्ण संभाषणात स्टेजवर फक्त तिच्याच हालचालींची आपल्याला प्रामुख्यानं जाणीव होते. ती येरझारा घालते, एकदम थांबते. खिडकीशी उभी राहून बाहेर बघते. परत येऊन खुर्चीवर बसते. तिची नर्व्हस एनर्जी व तिच्या अंगावरचा भडक कपडा आपलं लक्ष तिच्यावरच केंद्रित करतात.)
 दीना : मुक्ता!
 मुक्ता : बाबा जिवंत असेपर्यंत नुसतं तोंडदेखलं भेटण्यापलिकडे त्यांच्यासाठी काही केलं नाहीत तुम्ही. ते मेल्यावर कशासाठी जमलात? स्वत:ची लाज राखायला? त्यांना मिळणाऱ्या मोठेपणात आपणही जरा न्हाऊन घ्यावं म्हणून? की त्यांच्या इस्टेटीसाठी?
 सीमा : (रागानं) तोंडाला येईल ते काय बरळत्येयस? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं?
 मुक्ता : (हसून) नसावंच बहुतेक. तुमच्यासारखं माझं डोकं ठिकाणावर असतं तर बाबांची जबाबदारी अंगावेगळी टाकून कधीच मोकळी झाले असते.
 सीमा : (जाणूनबुजून उपरोधानं) आणि मोकळी होऊन काय केलं असतंस?
 मुक्ता : तुम्ही सगळ्यांनी केलं तेच. स्वत:चा संसार थाटला असता. स्वत:साठी जगले असते.
 पद्मा : पण तुला- (एकदम थांबतो.)
 मुक्ता : का थांबलास? वाक्य पुरं कर ना. पण तुला कुणी पत्करली असती, असंच ना? काय कुरूप बायकांची लग्नं होत नाहीत पद्मा?
 पद्मा : (काकुळतीनं) तसं म्हणायचं नव्हतं ग मला
 सीमा : मग असलं कुणी तुला पत्करणारं तर आता कर ना लग्न. आता कोण आडवं येतंय तुला?
 मुक्ता : आता फार उशीर झाला. चान्स निघून गेला.
 दीना : (त्याच्या आवाजात एकदम हळूवारपणा आला आहे.) म्हणजे, असं कुणी होतं तुझ्या आयुष्यात?
 मुक्ता : होता एकजण.
 दीना : मग काय झालं?
 मुक्ता : होणार काय? बाबांना भीती वाटत होती, मुक्ताचं लग्न झालं तर आपल्याला कोण सांभाळणार म्हणून. त्यांनी फार हुशारीनं विल्हेवाट लावली त्याची. अगदी थोड्या वेळात त्याला घाबरवून पळवून लावलं. मग मला म्हणाले, असल्या बुळ्याशी लग्न करणार होतीस तू? माझ्यावर रागावण्याऐवजी माझे आभार मानले पाहिजेस तू, तुला त्याच्या तावडीतून सोडवलं म्हणून:
 दीना : पण असं केलं तरी काय बाबांनी त्याला घाबरवून सोडायला!
 मुक्ता : घाबरवलं म्हणजे काही खुनाची धमकीबिमकी नाही दिली. त्याला भेटायला बोलावलं. (ह्यापुढचं भाषण ती कुणाकडे न बघता, स्वप्नात असल्यासारखं बोलते. जे घडलं होतं ते ती पुन्हा जगते आहे असा तोंडावर भाव.) विचारलं, तुला मुक्तेशी लग्न का करायचंय? असा काही प्रश्न विचारला जाईल अशी अपेक्षा नव्हती म्हणून तो अडखळतच म्हणाला, मला ती आवडते. त्यावर बाबा मोठमोठ्यानं हसले. म्हणाले, तू स्वत:ची फसवणूक करतो आहेस. तुला तिच्याशी का लग्न करायचं आहे ह्याची फक्त दोन कारणं संभवतात. एक म्हणजे माझ्या इस्टेटीसाठी. त्यावर तो एकदम म्हणाला, छे: छे: तसं काही नाही. बाबा म्हणाले, तर मग उरलं एकच कारण जे लग्नाशिवाय मिळणार नाही अशी तुझी समजूत आहे त्यासाठी तू लग्न करू पाहतोयस. पुन्हा ते हसले नि म्हणाले, पण ते मिळविण्यासाठी तुला लग्न करण्याची जरूरच पडणार नाही. तू तिला विचारून पाहिलंस का? ह्यापुढे त्यानं काही ऐकूनच घेतलं नाही. माझ्याकडे मान वर करूनही न पाहता तो उठून गेला. सभ्यतेच्या त्याच्या मध्यमवर्गीय कल्पनांना इतका मोठा धक्का बसला होता की तो परत माझ्या वाटेला जाण्याची शक्यता उरली नव्हती.
 दीना : इतका क्रूरपणा!
 सीमा : (तिची जिज्ञासा आता जागृत झाली आहे.) पण होता तरी कोण हा?
 मुक्ता : होता असाच अेक कुणीतरी. अेक सामान्य माणूस. बुळा, सगळ्या जगाला भिऊन वागणारा! कशालाच खंबीरपणे तोंड देऊ न शकणारा! बाबांनी त्याला अचूक हेरलं होतं. पण जगातल्या सगळ्या पुरुषांतून माझ्या वाट्याला तोच आला होता न् मला तोच हवा होता. मला तरी तिसरा पर्याय कुठं होता? एक बाबा नाहीतर तो. तो निदान बाबांपेक्षा तरूण होता. जे बाबा नुसतं बोलत ते करायला तरी तो समर्थ होता.
 दीना : (अगदी खालच्या आवाजात) बोलत? काय बोलत?
 मुक्ता : त्यांना सेक्सनं पछाडलं होतं. (मंद हसत) बिचारा दीना! तुझ्या बाबांबद्दलच्या कल्पनेला फार मोठा धक्का देतेय मी, नाही? तुला बाबा आठवतात ते दहा वर्षांपूर्वीचे. ते आता फार बदलले होते. ज्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते आपलं आयुष्य जगले ती आता शिथिल झाली होती. मेंदूचा शरीरावरचा ताबा सुटला होता. शरीराच्या मागण्या पुरवणं हे एकच इंटरेस्ट राहिलं होतं त्यांच्या आयुष्यात. तुला आठवतं ते किती कमी खायचे ते? कशाचा आग्रह केला की फट्दिशी म्हणायचे, मी खाण्याकरता जगत नाही. बरं, थोडं तर थोडं खावं, पण निदान चांगलं झालं असलं तर नावाजून तरी खावं. तेही नाही. खाणं ह्या क्रियेला त्यांच्या लेखी तितकं महत्त्वच नव्हतं. तसंच इतर बाबतीत. एखादवेळी दमून उशिरानं घरी आले न् आईनं पाय चेपू का म्हणून विचारलं तर कधी हो म्हणायचे नाहीत. म्हणायचे, शरीराचे चोचले करू नयेत. मग शरीर असल्या सवयींचा गुलाम बनतं. पण अलीकडे सगळंच बदललं होतं. जिभेचे लाड करावेसे वाटायचे. आज हे कर, उद्या ते कर म्हणून सांगायचे. केलेला पदार्थ अधाशासारखा खायचे. तसंच अंग चेपून द्यायला सांगायचे. चेपता चेपता दमून थांबले की कां थांबलीस म्हणून विचारायचे.
 दीना : बिचारी!
 मुक्ता : आणि लैंगिक वाङ्म़य वाचायचा छंद लागला होता त्यांना. पहिल्यापासूनच असला पाहिजे, पण ते चोरून वाचत असावेत. आता अगदी उघडपणे चालायचं. बाकी अंथरूणाला खिळलेला माणूस चोरून काय करू शकणार? - अश्लील वाङ्म़याचा मोठा संग्रह होता त्यांच्याकडे.
 सीमा : मग त्यात काय झालं? सगळ्याच पुरुषांना वाचायला आवडतं ते.
 मुक्ता : (तिच्या बोलण्याची दखल न घेता) ते वाचायचं नि त्याबद्दल चर्चा करायची ही त्यांची सगळ्यात आवडती करमणूक. मला म्हणायचे, मुक्ते! तुझी आई फार चांगली बाई होती. फार चांगली. फक्त ह्या एका बाबतीत ती मला सुख देऊ शकली नाही. मी सदा अतृप्तच राहिलो.
 सीमा : (हलक्या आवाजात) खोटं आहे हे सगळं!
 मुक्ता : (पुन्हा तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून) पुढंपुढं डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांना वाचायला दिसेना तेव्हा माझ्याकडून वाचून घ्यायचे. तांबड्या पेन्सिलीनं खुणा केलेले पॅसेजेस होते तेवढेच वाचायला सांगायचे न् मग त्याबद्दल बोलत सुटायचे.
 दीना : माय गॉड, माय गॉड!
 मुक्ता : जागेपणी थोडातरी तोल राखून बोलायचे. झोपेच्या औषधांच्या अमलाखाली असले की असं काही विचकट बरळायचे की अंगावर काटा उभा राह्यचा.
 सीमा : (त्वेषानं) साफसाफ खोटं आहे सगळं. मी बाबांच्या जवळ राहात नसेन पण अधूनमधून भेटत तर होते. मला कसं हे कळलं नाही?
 पद्मा : मीसुद्धा महिन्यातनं एकदा तरी चक्कर टाकून जात होतो. मला नाही त्यांचा तोल सुटलेला दिसला कधी.
 मुक्ता : मी सोडून इतरांसमोर ते फार जपून बोलायचे. दुसरं कुणी आलं की पुस्तकं लपवून ठेवायला सांगायचे. बाकी सगळं गेलं तरी तेवढा कावेबाजपणा उरला होता त्यांच्यात.
 सीमा : आता बाबांची साक्ष काढणं शक्य नाही, तेव्हा तू काय वाटेल ते सांगशील. हा सगळा तुझ्याच मनोविकृतीचा खेळ आहे झालं!
 मुक्ता : तू माझ्यावर विश्वास ठेवतेस की नाहीस याच्याशी मला काही कर्तव्य नाही. पण तुला पुरावाच हवा असेल तर ह्या किल्ल्या घे. बाबांच्या खोलीतलं गोदरेजचं कपाट उघड. त्यात त्यांची पुस्तकं आहेत. ती माझीच कशावरून नाहीत अशी शंका तू काढशील. पण त्यांच्यावर विकत घेतल्याच्या तारखा आहेत. बाबांच्या अक्षरात टीपासुद्धा आहेत. काही काही अगदी मासलेवाईक आहेत. तुला वाचायला गंमत वाटेल.
 (बोलताबोलता ती किल्ल्या टेबलावर टाकते. सीमा त्यांच्याकडे बघते पण त्या उचलत नाही. तिचे डोळे विस्फारलेले. चेहरा ताठ. मुक्ता काय सांगते त्यावर अनिच्छेनं तिला विश्वास ठेवावा लागतो आहे आणि त्यामुळं ती हादरली आहे.)
 पद्मा : तुला केवढं सहन करावं लागलं याची आम्हाला कल्पनाही नव्हती. तू कधी काही बोलली कसं नाहीस?
 मुक्ता : बोलून काय उपयोग होता? शिवाय बाबांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं ह्या प्रकाराची कुठं वाच्यता करणार नाही म्हणून.
 सीमा : (धक्क्यातून ती थोडीफार सावरली आहे. मुक्ताशी बोलण्याचा तिचा सूर प्रथमच थोडा आदरयुक्त आहे.) पण हे तू तोंड दाबून सोसलंस कसं? माझ्याच्यानं असं करवलंच नसतं. (थोडा वेळ ती गप्प राहाते. तिच्या मनात येणारे विचार अस्वीकार्य आहेत. ते झटकून टाकण्याच्या आविर्भावात ती मान हलवते.) शी:! तुला सगळ्या प्रकाराची किळस नाही यायची?
 मुक्ता : (आश्चर्यानं) किळस? खरं म्हणजे नाही यायची. मी त्यांच्याकडे हा एक परिपूर्ण माणूस आहे, माझा बाप आहे, अशा नजरेनं बघतच नव्हते. माझ्या लेखी ते मेलेलेच होते. फक्त काही शरीरव्यापार चालू होते एवढंच!
 दीना : असं होतं तर मग तू एखादी नर्स का नाही ठेवलीस त्यांचं सगळं करायला?
 मुक्ता : नर्सची तशी काही गरज नव्हती. एक गडी यायचा दिवसातून दोनदा. तो त्यांना स्पंज करायला, त्यांचा बिछाना करायला मदत करायचा. बाकी सगळं माझ्यानं सहज उरकायचं. उगीच नर्सवर पैसे कशाला खर्च करायचे?
 दीना : पैशाची अडचण असती तर मी पाठवले असते. मला का नाही कळवलंस?
 पद्मा : पैशाची अडचण असायचं काही कारण नव्हतं. शेअर्स वगैरेंपासून बाबांना बरंच उत्पन्न होतं. शिवाय हे एवढं मोठं घर होतं, त्यातलं भाड्यानं देता आलं असतं.
 मुक्ता : पैशाची अडचण नव्हतीच. (मुद्दाम सावकाश नि प्रत्येक शब्दावर जोर देत) फक्त जे पैसे होते ते विनाकारण खर्च करून टाकायचे नव्हते. बाबा गेल्यावर माझ्या पुढल्या आयुष्याची बेगमी करायला साठवून ठेवायचे होते. (पद्माकर तिच्याकडे चमकून बघतो. ती त्याच्याकडे पाहून जराशी हसते.) मला माहीत आहे पद्मा, बाबांच्या इस्टेटीवर तुझी आशा होती ते.
 पद्मा : मुळीच नव्हती.
 मुक्ता : मग उत्तमच. कारण बाबांनी जे काही मागं ठेवलंय त्यातला दमडीही तुम्हा कुणाला मिळणार नाही. ते सगळं आता माझं आहे.
 (पद्माकर एकदम उठून खिडकीशी जातो व बाहेर बघत पाठमोरा उभा राहतो)
 सीमा : (रागानं) बाबांच्या इस्टेटीवर आपला सगळ्यांचा सारखाच हक्क आहे.
 मुक्ता : कोणाचाही कुणावर हक्क असणं हा परस्परसंबंध आहे, सीमा. ज्याला तुझ्यावर हक्क सांगण्याची मुभा आहे, त्याच्यावरच तू हक्क सांगू शकशील
 सीमा : बाबा माझ्यावर कसा हक्क सांगू शकले असते? माझं लग्न त्यांना पसंत नव्हतं. श्री डोळ्यांसमोर आलेलासुद्धा त्यांना खपत नव्हता. मग मला त्यांना आपल्या घरी कसं नेता आलं असतं?
 मुक्ता : मी कारणाबद्दल बोलतच नाहीये, फक्त परिणामांबद्दल बोलत्येय तुमचं वागणं सर्वस्वी समर्थनीय होतं असं आपण एकवेळ धरून चालू पण म्हणून जबाबदारीतला वाटा तुम्ही टाळलात हे तर तुम्हाला नाकारता येणार नाही? मग आता इस्टेटीतला वाटा कोणत्या तोंडानं मागता?
 सीमा : कायद्यानं द्यावाच लागेल.
 मुक्ता : त्याची तुला काळजी नको. बाबांनी रीतसर मृत्युपत्र करून सगळं माझ्या नावानं ठेवलं आहे. आणि त्यांची सगळी इस्टेट त्यांनी स्वतःच मिळवलेली असल्यामुळं ती कुणालाही ठेवण्याचा त्यांना पूर्ण अधिकार होता.
 सीमा : अस्सं! आता कळलं तुझी सहनशीलता कशापोटी होती ते. तुझा डाव होता तर पहिल्यापासून. बाबांचं मन आमच्या विरूद्ध भरवून.....
 मुक्ता : तसं करण्याची काही जरूर पडली नाही मला. (एकदम अवखळपणे हसून) कदाचित मरेपर्यंत मी त्यांना सांभाळीन याची खात्री करून घेण्याचा हा एकच मार्ग आहे असं वाटलं असेल त्यांना.
 सीमा : म्हणजे तू ब्लॅकमेल केलंस त्यांना.
 मुक्ता : (शांतपणे) तसं म्हण हवं तर.
 सीमा : (चिडून) मी हे गप्प बसून ऐकून घेणार नाही. कोर्टात दावा लावीन, बाबांनी मृत्यूपत्र केलं तेव्हा त्यांना बुद्धीभ्रंश झाला होता म्हणून.
 दीना : बस कर, सीमा! तोंडाला येईल ते बरळू नको. तू चार प्रतिष्ठित लोकांच्या साक्षीनं भर कोर्टात बाबांना वेडं ठरवणार? कशासाठी? पैशासाठी? तुला काय कमी आहे?
 सीमा : माझ्यासाठी नकोच आहे मला काही. पण पद्माला मिळायला पाहिजे. त्याची किती ओढाताण आहे हे मुक्ताला दिसत नाही?
 दीना : हे बघ, तू अशी हमरीतुमरीवर येऊ नको. मुक्ता पद्माचा विचार करीलच.
 मुक्ता : ते का म्हणून? पद्मानं कधी माझा विचार केला होता? एकदा तरी म्हणाला होता, की मी बाबांजवळ चार-आठ दिवस राहतो, तू सुट्टी घे म्हणून? आणि बाबांनी मला काही ठेवलं नसतं तर त्यांच्यामागे मला कोण सांभाळणार होतं? पद्मा तयार झाला असता? की सीमा? की दीना तू? (हसून) बाकी अमेरिकेत जाऊन राहायला मजा येईल. तुझ्या गोऱ्या बायकोला आवडेल का रे ते? (पुन्हा कठोर आवाजात) ते काही नाही. मी तुम्हा कोणाचं काही लागत नाही. त्यातून मला फक्त माझ्याबद्दल विचार करायचा असता तर गोष्ट वेगळी होती. पण मला आणखीही एकाची तरतूद करायची आहे. किंवा एकीची.....
 पद्मा : (एकदम वळून)म्हणजे?
 मुक्ता : म्हणजे मला मूल होणार आहे. (अनपेक्षितपणे मुरकून) तुम्हाला माझ्यात काही फरक दिसला नाही? बाकी तुम्ही माझ्याकडे तितक्या बारकाईनं कशाला पाहाताय म्हणा!
 सीमा : तुला लाज वाटत नाही काहीही बरळायला?
 मुक्ता : यात लाज कसली? तुला दिवस गेले होते तेव्हा त्याबद्दल बोलायला लाज वाटायची? (मोकळं हसून) बाबांचं अगदी बरोबर होतं. मला जे मिळवायचं होतं त्यासाठी लग्नाची गरज नव्हतीच.
 सीमा : कोण होता तो?
 मुक्ता : दुसरा कोण? तोच. तेवढा एकच पुरूष माझ्या आयुष्यात आला.
 दीना : मग आता तो तुझ्याशी लग्न करणार नाही?
 मुक्ता : त्याचं लग्न कधीच झालं. एक मूलही आहे त्याला.
 पद्मा : आणि हे माहीत असूनही तू त्याच्याशी संबंध ठेवलास?
 मुक्ता : मुद्दाम संबंध निर्माण करायला गेले नव्हते मी. एकदा भेटला तो सहज बाजारात. इतक्या दिवसानंतर, कदाचित गरजेच्या पोटी असेल, त्याचा भीड चेपली होती. बुजरेपणा गेला होता. तो बोलत होता दुसरं काही. पण त्याला काय हवं होतं ते मला कळलं. मी विचार केला, काय हरकत आह? मला तरी पुन्हा आयुष्यात अतृप्त राहून बाबांसारखं मरण्यापेक्षा हे बरं!
 दीना : पण मूल होऊ नये एवढीही खबरदारी घेता आली नाही तुम्हाला?
 मुक्ता : खबरदारीचं कारणच नव्हतं. मला मूल हवं होतं.
 दीना : इल्लेजिटिमेट मूल?
 मुक्ता : अशी मुलं जगात सगळीकडे जन्माला येत असतात. त्यासाठी कायदेशीर लग्नाची गरज नसते हा शोध काही मी लावला नाही.
 दीना : पण का?
 मुक्ता : कारण नवरा, मूल, संसार ह्या गोष्टी इतर बायकांप्रमाणे मलाही हव्याशा वाटल्या. त्यासाठी काही तडजोडी करायला माझी तयारी होती.
 पद्मा : बाबांना माहीत होतं हे?
 मुक्ता : नव्हतं, पण काही दिवसांनी सांगणार होते मी.
 पद्मा : त्यांच्या मनावर केवढा आघात झाला असता.
 मुक्ता : तो त्यांना नाईलाजानं सोसावा लागला असता.
 पद्मा : (तिरस्कारानं) बाबांचं नाव असं खराब करताना तुला काहा खंत वाटली नाही?
 सीमा : (आवाज चढवून) बाबांचं जाऊ दे. आपल्या लाडक्या लेकीनं काय शेण खाल्लंय ते बघायला ते नाहीतच सुदैवानं. पण आमचं काय? आम्हाला चार लोकांत तोंड दाखवायची सोय राहायची नाही.
 मुक्ता : तो प्रश्न तुमचा आहे. माझा नाही. केवळ ज्याच्या नावानं मंगळसूत्र बांधायचं असा एक पुरुष माझ्या आयुष्यात नाही म्हणून मी माझ्या सगळ्याच इच्छा तुमच्या अब्रूखातर माराव्या असं मला नाही वाटलं.
 सीमा : (उठून वेगानं मुक्ताजवळ जाते. तिचा चेहरा विकृत झाला ती जवळजवळ किंचाळत बोलते.) खोटं बोलत्येयस तू. आमच्यावर सूड उगवायचाय तुला म्हणून हे विष ओकत्येयस. कोणता पुरुष तुझ्याकडे बघणार आहे? अं? कोणापासून मूल होणाराय तुला? डोकं फिरलंय तुझं!
 दीना : सीमा शांत हो. कुणी ऐकलं तर काय वाटेल त्याला?
 सीमा : हं! मी गप्प बसले म्हणून तिनं केलेलं पाप काही दडून बसणार नाही. ते उजेडात यायचं तेव्हा येणारच. जाते मी. इथं राहण्यात काही अर्थ नाही आता आणि तुला सांगून ठेवते, मुक्ता! माझ्यापासून दूर राहा. माझ्याशी नातं सांगायला येऊ नको. चल पद्मा! आपण आत्ताच्या आत्ता हे घर सोडलं पाहिजे. इथं क्षणभरही राहाता कामा नये. तिनं बनवलेल्या नरकात कुजत बसू दे तिला स्वत:लाच.
 (मुक्ताकडे एकदा घृणायुक्त नजरेनं बघून ती तिरीमिरीनं उजवीकडच्या दारानं बाहेर जाते. पद्माकर खालच्या मानेनं हळूहळू तिच्या मागोमाग जातो. दीनानाथ तिच्याकडे बघतो आहे. त्याच्या नजरेत अनेक छटांचे मिश्रण आहे. आश्चर्य, कुतूहल, कौतुक आणि थोडीशी भीतीसुद्धा. तो काहीतरी म्हणण्यासाठी तोंड उघडतो. मग पुन्हा मिटतो. जरासा घोटाळतो. मग हळूहळू उजव्या दारानं बाहेर निघून जातो. मुक्ताची नजर लांब कुठंतरी लागली आहे. तोंडावर प्रसन्न स्मित आहे.) पडदा.

पूर्व प्रसिध्दि : स्त्री नोव्हेंबर १९७५