कमळाची पानं/कमळाची पानं

विकिस्रोत कडून

कमळाची पानं


द्राक्षाच्या मळ्यातल्या मचाणावर हिराबाई उभी होती. उन्हानं रापलेला तिचा सावळा हात आकाशाच्या पार्श्वभूमीवर अलगद रेखाटला गेला होता. हातातली गोफण ताठ खेचली गेली होती. पक्ष्यांना घाबरवणारी तिची ती विशिष्ट गुंतागुंतीची साद तिनं पुन्हा एकदा घातली. तिच्या हाकेची सुरुवात पारव्याच्या गुंजनासारख्या अनुनय करणाऱ्या लयबद्ध आवाजानं व्हायची. मग ती दटावणीचा सूर काढायची. हळूहळू ही दटावणी मोठीमोठी आणि कर्कश्य होता होता तिचं शिखर एका प्रमत्त अर्धवेड्या किंकाळीत गाठले जाई. मग तिचा आवाज तार सप्तकातून एकदम खाली उतरायचा आणि या सादाची अखेर विनवणाऱ्या धूसर, ढाल्या गोड आवाजानं व्हायची.

विल्यम लेविन फोटो काढण्यात गढून गेला होता.

"सगळी फिल्म तिच्यावरच नासू नकोस." सरोजिनी म्हणाली, "इथं दुसरी मिळायची नाही."
 "अं! माझ्याजवळ भरपूर फिल्म आहे. ती बाई नक्कीच पाहात राहण्याजोगी आहे."
 "तरीपण तिच्याकडे टक लावून पाहाणं बरं नाही. ती संकोचलीय तुझ्यामुळे.
 तुम्ही अमेरिकन लोक म्हणजे अगदी विचित्र असता. कशात तुम्हाला इंटरेस्ट वाटेल, सांगता यायचं नाही."
 "तुला नाही वाटत ती विलक्षण आहे असं?"
 "रोजच्या सहवासात आलं की कशात काही 'विशेष' वाटत नाही माणसाला."
 "इथं राहणं तुला फारसं आवडत नाही, खरं ना?"
 त्याच्या आवाजातलं त्रयस्थ कुतूहल तिला खुपलं. हिराबाईबद्दल इंटरेस्ट दाखवण्यात काहीच धोका नाही-तिला वाटून गेलं. तो तिचं उघडपणे कौतुक करू शकतो. फोटो काढू शकतो. टक लावून पाहू शकतो. पण मी निराळी आहे. सभ्य माणसं एकमेकांविषयी इंटरेस्ट दाखवत नसतात. फक्त खालच्या वर्गाबद्दल रस दाखवू शकतात. काळ जरा वेगळा असता तर हिराबाईला रात्री त्यानं आपल्या खोलीवर बोलावून घेतलं असतं. जर त्याला ती रुचली-पटली असती तर सकाळी भरपूर बिदागी पण दिली असती. इंग्रज नाही का? जग जिंकणारे. ते गौरवर्ण विजयी वीर खुशाल अगदी हलक्या, गलिच्छ बायकांबरोबर झोपले आणि अक्करमाशा मुलांचं एक लेंढार इथं निर्माण झालं.
 कुणालाच त्या पोरांचं कौतुक नव्हतं. पण माझा हा विचार तितकासा अचूक नाही. त्या बायांची जात इतकी हलकी होती की त्यांच्या जातवाल्यांना ह्याचासुद्धा अभिमान वाटायचा. सरोजिनीला झाडूवाल्यांच्या कॉलनीतली ती गोरीगोरी, निळ्या डोळ्यांची, सोनेरी केसांची मुलगी आठवली. कुणास ठाऊक, एखाद्या कलेक्टरची मुलगी किंवा नातही असेल ती, साऱ्या गावचा मैला गोळा करीत हिंडणारी, 'लिटल साहेबाची लेक' म्हणायचे ते तिला.
 "इथं तुला काय आवडत नाही?" लेविननं पुन्हा विचारलं.
 "बरी आहे जागा. पण माझं सगळं पुढचं आयुष्य इथं घालवायचं आहे या कल्पनेत मला रुची नाही."
 "इथं वेळ कसा जातो तुझा?"
 "नाही जात."
 "प्रतापच्या कामात इंटरेस्ट नाही का तुला?"
 "प्रथमप्रथम वाटायचा," ती थोडीशी हसली. "आमच्या ओळखीचे बाकीचे सर्व शेतकरी शहरात राहतात. पण आम्हाला ते पुरेसं वाटलं नाही. आम्हाला अगदी अस्सल खेडं पाहिजे होतं. प्रताप नुकताच अमेरिकेहून परत आला होता, आणि कल्पना भरपूर होत्या त्याच्या डोक्यात. प्रत्यक्ष शेतीवर जाऊन राह्यचं हे फार आकर्षक वाटलं त्यावेळी. मी पण त्याच्याइतकीच उत्सुक होते. स्वत:च्या करिअरचा विचार मी कधी केलाच नव्हता आणि त्याच्या कामात स्वत:ला झोकून देणं ही पुरेशी करिअर वाटली मला. पण पुढं मला तो उत्साह टिकवणं जमलं नाही. शेती करणं हे किती कंटाळवाणं काम आहे, खरं म्हटलं तर. वर्षामागून वर्षं जातात आणि तुमचं रुटीन तेच राहतं. मनात दिलासा द्यायला जर एखादं स्वप्न नसलं तर रुटीन जीव घेईल एखाद्याचा."
 "प्रतापचं काय?"
 "तो तरारतो आहे जोमानं. इथं फार सुखी आहे तो. पण तो स्वप्नावर तग धरून राहात नाही मात्र!"
 "मग कशामुळं?"
 "कदाचित एक प्रकारचा अभिमान आणि जितका जास्त तो इथं राहील तितकी खोल जातील त्याची पाळंमुळं इथं. दुसऱ्या कुठंही चुकल्याचुकल्यासारखं होईल त्याला. तो तसलाच मनस्वी माणूस आहे."
 "मग तुला हे कठीण जात असेल."
 ती मंदमंद हसली.
 "या बाहेरचं जग नाहीच आम्हांला. प्रताप सुस्वभावी आहे पण मित्रांची जरुरी भासत नाही त्याला. नुसतं गप्पा मारायलाही कुणी लागत नाही. जोपर्यंत कामात गढलेला असतो तोपर्यंत त्याला करमणुकीची देखील गरज वाटत नाही. कधी एखाद्या वेळी इथं एकटंएकटं वाटतं, असंही वाटून जातं की इथून कुठंतरी निघून जावं आणि परतच येऊ नये."
 "मग, का नाही तसं करत?"
 "त्याने काही होणार नाही. स्वत:चं असं एक वेगळं आयुष्य असावं या दृष्टीनं मी कधी विचारच केलेला नाही. कुणास ठाऊक, मला ते जमेल का नाही ते."
 "करून तर पाहा."
 "पण पायात शेपटी घालून परत यावं लागलं तर फार भयंकर, नाही का? शिवाय, प्रताप इथं आहे हाही एक मुद्दा आहे."
 लेविननं खांदे उडवले आणि हात खिशात घातले.
 "कधीकधी मला वाटतं की हे जग खूप काहीतरी देऊ शकेल माणसाला पण मी मुळी या जगात नाहीचाय!"
 "पण हा जगाचाच भाग आहे ना?"
 "फार लहानसा."
 "सबंध जग कुणालाच गवसत नाही." त्याच्या आवाजातील सूक्ष्म नाराजी तिला जाणवली- एखाद्या मुलाला अगदी साधी गोष्ट पटत नसली म्हणजे मोठ्या माणसांना वाटते तशी. थोडा वेळ ते दोघं स्तब्धपणे चालत राहिले. मग तिनंच पुन्हा बोलायला सुरुवात केली-
 "स्टेट्समध्ये प्रतापशी ओळख होती तुझी?"
 "अं हं! तो माझ्या भावाचा मित्र होता. भारतात मी या भागात येणार आहे असं बॉबला कळलं तेव्हा त्यानं मला तुमचा पत्ता दिला. खरोखरच मी इथं येईन असं मला वाटलं नव्हतं; पण मग मला घोड्यांच्या या उत्सवाबद्दल समजलं आणि माझ्या लक्षात आलं की उत्सवाच्या गावापासून तुम्ही जवळच राहता."
 "आमच्याकडे येणारे पाहुणे नेहमीच काहीतरी कारण घेऊन येतात. त्यातले बरेचसे आमचे शहरातले मित्र किंवा नातेवाईक असतात. त्यांना वाटतं की सुट्टीसाठी खऱ्याखुऱ्या शेतावर जाऊन राहणं ही एक 'खासियत'. ते आम्हाला भेटायला येतच नाहीत."
 "मग मी पण दोषी आहे त्याबाबतीत. पण इथं येण्याचं कारण कोणतंही असलं तरी तुझी भेट होण्याची संधी मिळाली याचा फार आनंद होतो मला."
 त्यानं किंचित् झुकून तिला पाश्चात्य पद्धतीनं अभिवादन केलं. "एक सांग," तो म्हणाला, "ती कुठं राहते? ती पाखरं हाकलणारी?"
 अचानक विषय बदलला गेल्यामुळे झालेली स्वत:ची निराशा लपवण्याचा सरोजिनी प्रयत्न करत होती.
 "इथून जवळच,' ती म्हणाली. "का बरं?"
 "मला मोठं कुतूहल वाटतं. ती कशी राहते? कसले विचार करते? तिच्या जीवनाचा गाभा कोणता असेल?"
 "तुला तिच्याविषयी कुतूहल वाटतं हे समजल्यावर ती खूष होऊन जाईल की नाही कुणास ठाऊक! बहुतेक नाहीच. या लोकांवर मी नेहमी स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आरोप करीत असे. मला भेटलेल्या इतर सर्वांपेक्षा ते वेगळे होते. खरे भूमातेचे पुत्र; पण प्रत्यक्ष त्या लोकांपेक्षा ही कल्पनाच जास्त रम्य आहे. एकदा तुमची त्यांची जानपेहचान झाली म्हणजे समजतं की दर्शनी मुखवट्यापलीकडे सखोल काही नाही त्यांच्याजवळ. मेंढरांसारखे आहेत ते. सगळे सारखे. मंद, अडाणी, गरीब. आणि जे लोक इतके काही अडाणी गरीब असतात ते इंटरेस्टिंग नसतातच."
 त्याच्याकडे पाहताच ती समजली की तिनं त्याला धक्का दिलाय. ती म्हणाली, "आत जायचं ना आपण? मला फार ऊन सहन होत नाही."
 "ठीक आहे."
 ऊन्हाने रापलेल्या त्याच्या चेहऱ्याकडे आणि मानेकडे तिनं कटाक्ष टाकला. आता त्याचा रंग अनाकर्षक, मधूनच गडद छप्पे पडलेला लालभडक दिसत होता. मानोळ्यांजवळची त्वचा मात्र पांढरी उठून दिसत होती.
 “दुपारचा काय कार्यक्रम आहे?" तिनं विचारलं.
 "तुझी हरकत नसली तर आपण जेवल्यावर लगेच निघू. मला मिरवणूक अगदी सुरू होताना पोचायचंय. नंतर आपण मिरवणुकीबरोबर जाऊ. लोकांशी बोलू, फोटो घेऊ. उत्सवाबद्दल मला थोडीशी पार्श्वभूमी माहीत आहे; पण लोकांजवळ बोललं म्हणजे त्यांच्या मनात त्याचं स्थान कोणतं आहे याचं मर्म समजतं. त्याच बाबतीत मला गरज आहे तुझी. तुला वाटलं तर तू मला दुसरा दुभाषी गाठून देऊ शकतेस."
 तो अशा काही सुरात बोलला की जणू काही तिचं येणं न येणं त्याला सारखंच वाटत होतं.
 "मला आवडेल मदत करायला. काहीतरी इंटरेस्टिंग करायला मिळेल. तेवढाच बदल."
 तो थोडा तिरकस हसला-
 "कधीकधी," तो म्हणाला, "आयुष्याला अळणी म्हणून नावं ठेवली की ते जास्तच तसं वाटायला लागतं."
 "ही दुधारी तलवार आहे. कधीकधी माणूस स्वत:ला फसवत असतो की जगणं फार अर्थपूर्ण आहे म्हणून. वास्तविक तसं नसतं."
 "तसं झालं तर फारसं काही बिघडणार नाही."
 "नाही बिघडत?"
 प्रतापनं लेविनला आपली मोटारसायकल दिली.
 "तू नक्की येत नाहीस ना?" लेविननं त्याला विचारलं.
 "मी फार कामात आहे, विल, ह्या द्राक्षांच्या पॅकिंग आणि डिस्पॅचवर देखरेख केली पाहिजे मला जातीनं."
 "जर स्वत: लक्ष दिलं नाही प्रत्येक क्षण, तर पृथ्वीसुद्धा स्वत:भोवती फिरायची थांबेल असं वाटतं त्याला." सरोजिनी म्हणाली.
 प्रताप खळखळून हसला. ऊन्हामुळं रापून त्याचा चेहरा झकास चॉकलेटी झाला होता. हसताना त्याचे पांढरेशुभ्र दात लख्-कन चमकले. क्षणभरच सरोजिनीला हुरहुर वाटली. लेविनच्या जागी कल्पनेनं त्याला पाहाण्याचा तिनं प्रयत्न केला, पण जमला नाही.
 "खूप मजा कर, डार्लिंग," प्रताप म्हणाला. "इथं तुझं मन रमण्यासारखं फारसं काहीच नसतं."
 लेविननं 'किक' मारून गाडीला जीव आणला. थोडा वेळ पुढे गेल्यावर, मान न वळवता लेविन ओरडून म्हणाला, “एकंदरीत तुला इथं फारशी करमणूक नाही हे कबूल करतो तो."
 "हो ना. अगदी सहज. फक्त त्याचं म्हणणं आहे की ह्या गोष्टीचा मी माझ्या इथल्या जीवनाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकार करावा. काही गोष्टी माणसाला मिळतात. काही मिळत नाहीत. अगदी साधी गोष्ट आहे ही."
 "रास्त दृष्टिकोन आहे."
 "आता तू मला हसतो आहेस."
 "मुळीच नाही. मला अगदी मनापासून वाटतं की हा दृष्टिकोन रास्त आहे. मात्र जमलं पाहिजे ते आपल्याला."
 "मला वाटतं तुलाही ते जमतं... प्रतापसारखं."
 "मला ते जमतं असा मला अभिमान आहे."
 सकाळी तो आला तेव्हा एक सुरेख वास येत होता. टाल्कम पावडर आफ्टर शेव्ह लोशनचा उत्तेजक, मधुर गंध. आता मात्र त्याला कसातरीच वास येत होता. त्याच्या शर्टच्या कॉलरला काळसर चप्पा पडला होता बहुतेक तो स्वत:च शर्ट रात्री धुवून टाकत असेल असं तिला वाटलं. सहज वाळणारा, सुरकुत्या न पडणारा. त्याच्या मनोवृत्तीला शोभेसा शर्ट!
 "लग्न झालंय तुझं?" तिनं विचारलं.
 तो हसला. "छे."
 "का हसलास?"  "तू या प्रश्नाकडे कधी वळणार याचा मी विचारच करीत होतो. लग्नासंबंधी माहिती मिळाल्याखेरीज एखाद्या माणसाशी आपली पुरेशी ओळख झालीय असं स्त्रीला वाटतच नाही मुळी."
 "नसत्या चौकशा करण्याचा माझा हेतू नव्हता, सॉरी!"
 "वाईट वाटून घेऊ नको."
 जिला तो प्रेमपत्रं लिहितो अशी एखादी मुलगी दूर त्याच्या मुलुखात आहे का असं तिला विचारावंसं वाटत होतं. पण तो हसल्यानंतर तिनं काही विचारलं नाही.
 शहरात पोचल्यावर त्यानं गाडी उभी केली, आणि ते दोघं कृष्णाच्या देवळापर्यंत पोचले. कृष्णसंप्रदायाचं ते प्रमुख मंदिर होतं. मिरवणुकीला नुकतीच सुरुवात झाली होती. देवळातून पितळी घोडे घेऊन बाहेर येणाऱ्या माणसांचा एक चांगला शॉट लेविनला घेता आला. ह्या भागातल्याच एका माणसानं स्थापन केलेला हा कृष्णभक्त संप्रदाय इथं काही शतकांपासून जोमानं वाढला होता. या संप्रदायाचे अनुयायी हिंदुस्थानभर विखुरलेले होते. पण त्या गावातलं कृष्णाचं देऊळ, संप्रदायाच्या मूळ पुरुषाला जिथं कृष्णाचा साक्षात्कार झाला त्याच जागेवर बांधलं होतं आणि इथला मठ-आता तिथं संप्रदायाचे सध्याचे स्वामी राहात होते, या सगळ्या अनुयायांचं मुख्य तीर्थस्थान होतं. उत्सवासाठी शेकडो लोक जमा व्हायचे.
 केशरी आणि पांढरा पोषाख चढवलेले ढोलकेवाले मिरवणुकीच्या अग्रभागी होते. लेविन आणि सरोजिनी मिरवणुकीत मिसळले. त्यांच्या बाजूनं चालणाऱ्या एका माणसाबरोबर सरोजिनी थोडा वेळ बोलत होती. नंतर ती लेविनकडे वळली- "या उत्सवाला सुरुवात कशी झाली याचं फार कल्पनारम्य स्पष्टीकरण देतो आहे तो," ती म्हणाली. "तुला ऐकायचंय?"
 "हो तर. जेवढी माहिती मिळेल ती सगळी मला पाहिजेच आहे. नंतर मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करीन. कदाचित आम्ही काही काटछाट करू त्यात. पण माझ्याजवळ सगळी माहिती असणं हे महत्त्वाचं आहे. पुष्कळदा मी ज्या ग्रंथांतून या उत्सवांची पार्श्वभूमी गोळा करतो ते या सगळ्या दंतकथांचा उल्लेख करीत नाहीत. बहुधा उत्सव चांगला रूढ झाल्यावरच या दंतकथा निर्माण होऊ लागतात, हे त्याचं कारण असावं."
 "हा माणूस म्हणतो की याची सुरुवात सातशे वर्षांपूर्वी झाली. यात्रेहून परत येणारा एक गुराखी नदी ओलांडत होता. अचानक त्याचा घोडा पात्राच्या मध्यभागी अडला. त्यानं काही केलं तरी पुढं जाईना. शेवटी त्यानं भगवान कृष्णाचा धावा केला, आणि जसा अचानक घोडा थबकला होता तसाच तो एकदम पुढं चालायला लागला. घोडा जिथं अडला होता तिथं घोड्याचं देऊळ बांधण्यात आलं. या गोष्टीमुळं आणखी एका चालीचा खुलासा मिळतो. या पंथाचे अनुयायी आपली मनोकामना पुरी करण्यासाठी देवाला पितळेचे घोडे वाहतात. उत्सवाच्या दिवशी सकाळी या घोड्यांची पूजा होते. घोड्याच्या देवळापर्यंत ते मिरवत नेले जातात आणि परत आणण्यात येतात."
 लेविन एका लहानशा वहीत झपाझप टाचणं करीत होता. "झकास," तो म्हणाला. "आता पुढं जाऊया आणि आणखी एक दोघांकडून या गोष्टीची शहानिशा करूया."
 त्याची वृत्ती थंड आणि चिकित्सकाची आहे. तिला वाटलं, सध्यापुरतं तुझ्या सर्व क्रियांचं ध्येय म्हणजे तुझं पुस्तक. विल्यम लेविन आणि कुणीतरी यांनी लिहिलेलं. माझ्या लोकांची अंधश्रध्दा, मूर्खपणा, अज्ञान आणि हा पाखंडी उत्सव यांचं तपशीलवार वर्णन असणारं. तू दुसऱ्या कुठं का जात नाहीस? मूर्तिभंजकाचं काम दुसऱ्या कुठंही जाऊन करता येईल. आमचा पिच्छा सोड. या परकी माणसाला खुषीनं सगळी माहिती देणाऱ्या लोकांकडं पाहून तिची कानशिलं रागानं तप्त झाली. किती अडाणी आहेत हे, किती स्वाभिमानशून्य! नसत्या उठाठेवी करू नकोस असं का सांगत नाहीत लोक त्याला?
 मिरवणुकीत आता आणखी लोक सामील झाले होते. गर्दीच्या लोंढ्यात चालताना ती वरच्यावर लेविनच्या अंगावर आदळत होती. एकदा-दोनदा तिनं त्याच्याकडे ओझरतं पाहिलं. पण तो दंग होता- पाहण्यात, नोट्स घेण्यात, कॅमेरा रोखण्यात. एकदा ती अडखळली तेव्हा निर्विकारपणे त्यानं तिचा हात धरला आणि तिला सावरलं.
 'कदाचित बायकांना जीवनाच्या काठावरच राहू देण्याचा पुरुषांचा कट असावा.' तिला रागाच्या भरात वाटलं.
 थोड्याथोड्या अंतरावर मिरवणूक थांबायची. प्रत्येक ठिकाणी लोक घोड्यावर कुंकू आणि फुलं उधळायचे. कुणीतरी अधून-मधून ढोलके-वाल्यांच्यावर मुठीमुठीनं गुलाल फेकायचे. त्यांचे काळसर चेहरे त्या भडक गुलाली रंगानं माखले गेले होते. नाचण्याची आणि ढोलक्यांची लय जसजशी वाढत जात होती तसतसे त्यांचे तारवटलेले डोळे त्या गुलाबी रंगामधून एका वेडसर उन्मादानं चमकत होते.
 आता ते नदीच्या कोरड्या पडलेल्या पात्रात आले. उन्हाळ्यातल्या तप्त सूर्याचं तेज वाळूतून परावर्तित होत होतं. घोड्यांमागून बायकांचा एक घोळका चालत येत होता. आता सर्वांचं लक्ष त्यांच्यावर केंद्रित झालं. सुमारे डझनभर असतील त्या. ढोलक्यांच्या तालावर त्या लयबद्ध घुमू लागल्या. हेलकावे खाऊ लागल्या. मधूनमधून त्या खाली बसकण मारायच्या किंवा निस्तब्ध तंद्रीत उभ्या राहायच्या किंवा उन्मळून हमसाहमशी रडायच्या. तेवढ्यापुरतं घुमणं बंद राह्यचं. वाळूच्या मध्यावर पाण्याचा एक खोल डोह होता. मिरवणूक तिथपर्यंत पोचल्यावर बायका जोरात किंचाळल्या आणि त्यांनी डोहात स्वत:ला झोकून दिलं. नंतर बाहेर येऊन नदीच्या पात्रात त्या गडबडा लोळल्या. इतक्या की त्यांचे कपडे आणि तोंडं ओलसर मऊ धुळीनं माखून गेली.
 "या बायकांबद्दल लोकांना निश्चित काही सांगता येत नाहीये," सरोजिनी म्हणाली. "कोणी म्हणतात, त्यांच्या अंगात देव आलाय. एकजण म्हणाला की या संप्रदायातले वेडसर लोक सगळ्या हिंदुस्थानातून इथं गोळा होतात. आज जर त्यांना संप्रदायाच्या स्वामींचा आशीर्वाद मिळाला तर ते बरे होतात अशी त्यांची श्रद्धा आहे. पण ज्या माणसानं मला हे सांगितलं तो अनुयायांपैकी नाही. इतर लोक त्याच्याशी सहमत नाहीत. त्यांची खात्री आहे की हा दैवी चमत्कार आहे. मला काही हे फारसं 'दैवी' वाटत नाही."
 "त्याचं कारण 'दैवी' म्हणजे काय याविषयी तू आधीच ठाम कल्पना बनवून ठेवल्या आहेस."
 "इतरांपेक्षा जरा शहाणासुर्ता वाटणाऱ्या एका माणसाचं असं म्हणणं आहे की, जवळ जाऊन आपण त्या काय म्हणतात ते लक्षपूर्वक ऐकलं तर त्या अर्वाच्य शिवीगाळ करताहेत असं आपल्याला कळून येईल. त्या संप्रदायाच्या मूळ पुरुषाला शिव्या घालताहेत. हा माणूस म्हणतो की त्यांच्या धर्मसाधनेमागची उत्कट तळमळ आणि वेदना त्यातून प्रगट होते."
 "हे स्पष्टीकरण इंटरेस्टिंग आहे."
  "जे नुसते बघे आहेत ते या पंथापैकी नाहीत. आजूबाजूच्या गावांतून ते मिरवणूक बघायला येतात. त्यांना वाटतं की या बायकांमध्ये एक प्रकारची अघोरी शक्ती आहे. लोकांवर त्या चेटूक करू शकतात अशी समजूत आहे. त्या वेड्या आहेत असं वाटतं तुला?
 "कठीण आहे सांगणं. कदाचित हा उन्माद स्वत: निर्माण केलेला असला तरी आपल्याआपणच त्याचं पोषण होत असेल. मी जर तसल्या सगळ्या हालचाली केल्या तर मलासुद्धा उन्माद चढेल बहुधा."
 तो हसला आणि त्या हसण्यामुळे त्याच्या कटात तीही ओढली गेली. त्याचं म्हणणं बरोबर होतं म्हणूनच ती नाराज झाली. धार्मिक झंझावाताच्या या जगात ती त्याच्याइतकीच परकी होती. पण ती उलट हसली नाही.
 "फार भीतिदायक आहे हे सगळं, नाही?" ती म्हणाली. "अशा विमुक्तपणामुळे आपल्याला आपल्या कातडीआड दडलेल्या मानवाची आठवण होते. अमंगळ आहे हे!"
 "पुष्कळ धार्मिक घटना अमंगळ वाटतात."
 "तू पाहिलेल्या इतर उत्सवांत तुला असलं काही दिसलं होतं का?"
 "मी इतक्याच चमत्कारिक गोष्टी दुसरीकडे पाहिल्या आहेत."
 नदीच्या पात्रातून मिरवणूक बाहेर पडली, आणि परत मागे वळली. जवळजवळ तीन तास चालत होते ते.
 सरोजिनीनं त्या केशरी, गुलाबी, लाल ढोलकेवाल्यांकडे बघितले. त्याच्या पोषाखातला पांढरा रंग लुप्तप्राय झाला होता. अजूनही ते तितक्याच आवेशाने ढोलकी बडवीत होते. तिनं त्या वेड्या बायकांकडे पाहिलं; त्यांचे केस चेहऱ्यावर मुक्त रुळत होते. त्यांची नजर गर्दीमधेही शून्यात लागली होती. आता रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. चकाकणाऱ्या पितळी घोड्यांवर लाल फराटे उठले होते. उष्णता, प्रकाश आणि रंग यांनी एक लय साधली आणि तिच्या डोळ्यांच्या मागे, आतमधे कुठंतरी ठिणगी पडली. उन्हातसुद्धा तिच्या अंगावर जरासे शहारे आले.
 "मी थोडा वेळ तुला एकट्याला सोडू का?" तिनं लेविनला विचारल, "हे ऊन असह्य झालंय मला."
 तो एकदम सौजन्यशील झाला...
 "कमाल आहे माझी! सॉरी. मला आठवण राहायला पाहिजे होती. इथं जवळ कुठं जाऊन तुला आराम करता येईल का? मी घेऊन जातो तुला."
 "नको, नको. माझ्यामुळं तुझं काही बुडायला नको यातलं. मी फक्त त्या झाडाखाली जाऊन बसते. माझ्यावाचून गैरसोय होणार नाही ना तुझी?"
 मुळीच नाही. हवं ते सगळं मिळालंय मला. प्रकाश पुरेसा आहे तोपर्यंत मला अजून थोडे फोटो घ्यायचेत. मग मी तुझ्याकडे येईन."
 "सावकाश ये. मला काही घाई नाही."
 तिचं डोकं दुखत होतं आणि डोळे जळजळत होते. झाडाच्या थंड सावलीत तिला झोप लागली.
 तिला जाग आली तेव्हा लेविन तिच्याजवळ बसला होता.
 "किती वेळ झाला तुला येऊन? मला उठवलं का नाहीस?" ती म्हणाली. आपण झोपल्यावर त्यानं पाहात राहावं हे तिला आवडलं नाही.
 "इतक्या बेजबाबदारपणे वागल्यावर मी निदान थोडीबहुत विश्रांती तरी तुझं देणं लागतो, असं वाटलं मला. आता बरं वाटतं का?"
 "हो. आता छान आहे मी. उकाडा आणि ऊन यांचा तुला नाही त्रास होत?"
 "विशेष नाही." आता तो जवळजवळ जांभळट तांबडा दिसत होता.
 "मिरवणूक संपली?"
 "हो. मी पाहिलं तुला झोप लागलीय म्हणून मी परत गेलो आणि शेवटपर्यंत सगळं पाहात राहिलो." तो हसला. एखादं काम मनासारखं केल्यावरचं समाधान त्याच्या तोंडावर होतं.
 बराच वेळ झोपल्यावर ती सुस्तावली होती. आपला दिवस वाया गेला, निदान कसातरीच ताणला गेला याची पण सुस्ती होती ती.
 "घरी जायचं ना आपण?" तिनं विचारलं.
 "मी थोडी केळी आणि चहा आणलाय."
 "झक्क! ग्लास कसे आणता आले तुला?"
 "मी विकत घेतले ते."
 तिला हसू आवरलं नाही. "बहुतेक त्यांनी ग्लासांची चौपटीनं किंमत वसूल केली असेल."
 "काही हरकत नाही."
 त्यांनी त्या कोमट झालेल्या चहाचे घुटके घ्यायला सुरुवात केली, आणि पाचसहा केळी फस्त केली.
 "उद्या जाणार तू?"तिनं विचारलं.
 "हो."
 "मला वाटतं, पुन्हा आपली गाठ पडणार नाही. तुला दाखविण्यासारखा अजून एखादा विशेष उत्सव नाही आमच्याकडं ."
 "मला तुझे आभार मानायचेत," तिच्या बोलण्यातल्या गर्भित प्रश्नाला उत्तर न देताच तो म्हणाला, "तुझी मदत आणि तुमचं आतिथ्य यांबद्दल."
 "हे इतकं निरवानिरवीचं वाटतं. मला सांग, कशामुळे तू इतका अलिप्त झालायस?"
 तो क्षितिजाकडे शांतपणे बघत राहिला. सूर्य मावळतीला लागला होता, आणि त्याचा प्रकाश हवेतल्या धुळीमुळे सांद्र झाला होता.
 "मी काही अलिप्त नाही," तो म्हणाला, "खरंच नाही."
 आणखी काही तिनं बोलायच्या आत तो उठला.
 "अंधार पडत चाललाय. आपली घरी जायची वेळ झाली."
 त्या दिवशी रात्री जेवल्यावर प्रताप आणि लेविन जाळीच्या व्हरांड्यात बराच वेळ बोलत बसले होते. उन्हाळ्यामध्ये काही निस्तब्ध रात्री अशा असतात की दिवसभराचा उकाडा घालवून द्यायचं त्यांच्या जिवावर येत. ही रात्र अशीच होती. द्राक्षांचा आंबुसगोड वास वातावरणात भरून राहिला होता. कपडे न उतरताच सरोजिनी बिछान्यावर पडली होती. तिला वाटल, या वासाचा किती तिटकारा वाटतो आपल्याला. तिच्या चोहोबाजूला तो दरवळत होता, एखाद्या तटबंदीसारखा.
 थोड्या वेळानं ते दोघं एकमेकांचा निरोप घेताना तिनं ऐकलं. लेविन स्वत:च्या खोलीकडे गेला आणि प्रताप बाहेर गेला हे तिनं पाहिलं. आता तो दिवसाकाठचा शेवटचा फेरफटका मारील; सगळं काही ठीकठाक आहे हे जातीनं पाहण्यासाठी. ती उठली. तिनं साडी नीटनेटकी केली. आरशासमोर उभं राहून तिनं केसावर हात फिरवला.
 उकाड्यानं तिचं शरीर तापलं होतं. श्वास घेण्याच्या श्रमानं तिच हृदय धडधडत होतं. लेविनच्या दारावर तिनं टकटक केलं.
 "ये," तो म्हणाला.
 "मला वाटलं, तुला कदाचित पाणी लागेल. रात्र गरम आहे आज."
 "थंँक्स!"
 पलंगाजवळ टेबलावर तिनं तांब्याभांडं ठेवलं.
 "एकमेकांजवळ बोलण्यासारखं पुष्कळच सापडलं तुम्हा दोघांना. तुला आणि प्रतापला."
 "हो ना. खरोखरच. तू का नाही आलीस आमच्यात?"
 तिनं खांदे उडवले. बोलण्यासारखं काही दुसरं नव्हतंच. ती तशीच उभी राहिली, त्याची नजर आपल्या नजरेनं खेचून घेत. तिच्याकडे जेव्हा त्यानं पाहिलं तेव्हा त्याच्या डोळ्यांत जे दिसलं त्यामुळे भयाची एक लाट तिच्या सर्वांगातून शिरशिरून गेली. तिच्यासाठी त्यानं पसरलेल्या हातांमध्ये ती सहज शिरली.
 आणि मग अचानक त्याच्या अस्नात शरीराचा वेढून टाकणारा उग्र दर्प, त्याच्या हातांच्या दृढ मिठीतून जाणवणारा अधिकार यांच्याविरुद्ध झुंजावंसं वाटलं तिला. गुदमरवून टाकणाऱ्या त्याच्या त्या जवळपणाला तिनं दूर ढकललं. त्याच्या हातांनी तिला इतक्या सहजपणे मुक्त केलं की तिला आश्चर्य वाटलं.
 स्वत:च्या आवाजावर काबू मिळवण्यासाठी तिनं एक दीर्घ श्वास घेतला. ती कोरडी, उष्ण हवा तिच्या नाकपुड्यांना दुखावून गेली.
 "गुड नाईट, विल!" ती म्हणाली.
 "गुड नाईट!"
 तो तिच्यावर रागावलाय की तिला हसतोय हे पाहायला ती थांबलीच नाही. तिला पर्वा नव्हती कशाचीच.
 'लिटल साहेबाची लेक' कशी उपजते हे तिला एकदम उमगलं होतं. ती झोपायच्या खोलीत परत आली तेव्हा प्रताप निजायच्या तयारीत होता.
 "विलच्या खोलीत पाण्याचा तांब्या ठेवला का कुणी?' तो म्हणाला.
 "तेच करत होते मी आत्ता."
  "छान. मला वाटलं, तू झोपली असशील एव्हाना. मजेत गेला ना दिवस तुझा?"
 "बरा गेला. तुला माहीत आहे का, विलला हिराबाईनं झपाटून टाकलंय."
 प्रताप हसला. "ज्याची त्याची आवड असते," तो म्हणाला.
 त्याच्या परिचित, सरळसाध्या बाहूंमध्ये तिनं स्वत:ला निमूटपणे सामावलं.
 "आ:! आज थकून गेलोय मी," तो म्हणाला. "दोनशे पेट्या द्राक्षं रवाना केली आज आपण. आणि अजून तितकीच तरी शिल्लक आहेत उद्याच्या तोडणीसाठी."
 "वा:!" अंधारात थोडीशी हसून ती म्हणाली.

पूर्व प्रसिध्दि : स्त्री नोव्हेंबर १९७४
अनुवाद : आशा मुंडले