कमळाची पानं/आपलं माणूस

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

आपलं माणूस


पदराला हात पुसतपुसत ती बाहेरच्या खोलीत
आली. तो नेहमी चिडून म्हणायचा, "पदराला
कशाला हात पुसतेस? मग जवळ घेतलं की
तुझा ओला पदर हाताला लागतो. मला नाही
आवडत!" तिनं मोरीपाशी एक नॅपकीन ठेवला
होता. पण कितीही लक्षात ठेवायचं म्हटलं
तरी जुनी सवय जात नव्हती.

बिछान्यावर मुलं एकमेकांना बिलगून झोपली
होती. त्यांच्या शेजारी ती आडवी झाली. तो
खाटेवर मधोमध झोपला होता. झोपला
नव्हताच, लाकडासारखा पडला होता,
उताणा, डावा हात डोळ्यांवर घेऊन. त्याच्या
शरीराचा ताण तिला एवढ्या अंतरावरही
जाणवत होता. ती मुटकूळं करून गप्प
राहिली, न जाणो कदाचित आज काही
व्यत्यय न येता झोप मिळेल म्हणून.

तिचा डोळा अगदी लागत आला नि
त्यानं हाक मारली, "मनीषा".
तिची झोप उडलीच होती पण तिनं
ओ दिली नाही. तिला वाटलं, त्याच्या
मनात आपल्याबद्दल थोडी करुणा असली तर
तो म्हणेल, 'दमून झोपलीय,
झोपू दे बिचारीला.' पण थोडा वेळ
थांबून त्यानं पुन्हा हाक मारली, कुजबुजत्या आवाजात. शेवटी तो खाटेवरून उठून तिच्याजवळ आला.
 "सिद्धार्थ, झोपू दे ना मला..... मी दमलेय रे."
 "मला फक्त एवढंच सांग, किशोरचे आणि तुझे काय संबंध आहेत?"
 "काही नाहीत! तुला मी हे शंभरदा सांगितलंय. मी कितीही जीव तोडून सागितलं तरी तुझा जर विश्वासच बसत नसला, तर तू मला पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे?"
 "पण मग त्या दिवशी उशिरापर्यंत, मी नसताना तो इथं काय करीत होता?"
 लहान मुलं पाठ केलेला धडा जसा एकसुरी आवाजात म्हणतात तसं ती म्हणाली, "तो आला होता तुला भेटायला. मी सांगितलं, 'सिद्धार्थ नाहीये, तू जा आणि संध्याकाळी परत ये.' त्यानं मी काय म्हणते त्याच्याकडे दुर्लक्षच केलं. तो म्हणाला, 'मी सिद्धार्थ येईपर्यंत थांबतो.' हे सगळं मी तुला शंभरदा सांगितलंय."
 "तू त्याला पुरेसं ठासून सांगितलं नसशील!"
 "सिद्धार्थ, तू ज्याच्यावर संशय घेतोयस तो तुझा मित्र आहे, माझा नाही. मला तो वळीअवेळी आलेला आवडत नाही. तूच त्याला सवय लावून ठेवलीयस तू असलास किंवा नसलास तरी इथे येऊन बसायची, खायची-प्यायची, झोपायची. आता तुला तो यायला नको असला, तर तूच त्याला स्पष्ट सांग."
 "मी कसं सांगू! आज गेली कित्येक वर्षं तो माझा मित्र आहे, सहकारी आहे. माझ्या खांद्याला खांदा लावून काम केलंय त्यानं."
 "मग हा तिढा सुटायचा कसा? हवं तर मी सांगते त्याला. पण मला सांगावं लागेल तू त्याच्यावर संशय घेतोयस म्हणून, मग तो ऐकेल माझं."
 "नको. तसं सांग नको. तो फार दुखावेल."
 ह्यावर ती काहीच बोलली नाही. बोलण्यासारखं उरलंच नव्हतं काही. तिला त्याचा राग येत होता. पण कीवही येत होती. कारण तो करीत असलेले आरोप बिनबुडाचे होते तरी त्याच्या डोळ्यांत तिला दिसणारी वेदना खरी होती. तिनं त्याचे खांदे धरून त्याला आपल्याजवळ ओढलं. नुसत्या त्या स्पर्शानं तिचं अंग थरथरलं. किती दिवसांत ते असे एकमेकांजवळ आले नव्हते, त्यांनी प्रेमाचा उन्माद अनुभवला नव्हता. तिचे हात झटकून टाकून तो एकदम उठला.
 "सिद्धार्थ, तुझं माझ्यावर प्रेम राहिलं नाही का रे?"
 "माझं तुझ्यावर किती प्रेम आहे ते मी शब्दांत सांगू शकत नाही, मनीषा. पण मनात असे विचार करताना तुझा स्पर्शही नकोसा वाटतो. वाटतं, ह्याच शरीरानं त्याचा स्पर्श अनुभवला असेल का?"
 अगतिकतेनं ती रडायला लागली. तो एकीकडे काहीबाही बोलत होता विचारीत होता, पण ती ऐकण्याच्या, उत्तर देण्याच्या पलिकडे गेली होती. रडतारडता तिला कधी झोप लागली, त्यानं लागू दिली हेही तिला का नाही. सकाळी ती नेहमीप्रमाणं लवकर उठली तर तो घोरत पडला होता. तिच्या मनात आलं, हा मला रोज अर्धी रात्र जागवतो आणि स्वत:ची झोप मात्र अशी भरून काढतो! प्रेम ज्याला म्हणतात ते असंच असतं?
 तिचं त्याच्यावर प्रेम बसावं ही गोष्ट त्याला अद्भ़ुत वाटायची. माझ्यात काय पाहिलंस तू, असं तो तिला वरच्यावर विचारायचा, आणि तिला तो आपल्या प्रेमाला पात्र आहे हे त्याला वारंवार पटवून द्यावं लागायच. कधी म्हणायचा, "आपण लोकांना किती विजोड दिसत असू, नाही?" तिला खूप हसू यायचं.
 ती शेलाट्या, लवलवत्या बांध्याची, सावळी, नाकीडोळी सुरेख. तिच्या काळ्याभोर डोळ्यांच्या आड नेहमी हसू असायचं, काहीतरी झालं की खुद्कन बाहेर पडायला टपलेलं. ती त्याची मस्करी करायची आणि तो गोंधळल्यासारखा झाला की खळखळून हसायची. तिच्या रूपानं, हसऱ्याखेळत्या वृत्तीनं त्याला मोहवलं होतं. आपलं इतके दिवस अतीच रुक्षपणे जगलेलं आयुष्य तिच्यामुळे उजळून गेलंय असं त्याला वाटायचं.
 तो ठेंगण्यातच जमा होणारा, तिच्यापेक्षा, अगदी काटेकोरपणाच करायचा तर, जेमतेम अर्धा इंच उंच. जरा रुंदच नाक. जाड ओठ, अरुंद कपाळावर गर्दी करणारे राठ कुरळे केस. तिच्याशेजारी आपल्या रूपाची त्याला लाज वाटायची. पण त्याची रुंद शरीरयष्टी, जमिनीवर भक्कम पाय रोवून उभं राहण्याची लकब तिला आश्वासक वाटायची. त्याचा आदर्शवाद, ज्यांना आयुष्यात काही संधी मिळाली नाही अशांसाठी काम करण्याची तळमळ हे तिला मनापासून आवडलं होतं. समाजातल्या आहेरे वर्गाला आणि समाजाच्या स्वास्थ्याला सुरुंग लावणाऱ्या मंडळींपेक्षा तिला सिद्धार्थाची परिवर्तनवादी आशावादी वृत्ती जास्त भावली. तिचे सहकारी तिला म्हणाले, "तू बाटलीस!"
 "असू दे. तुम्ही फक्त आहे ते उद्ध्वस्त करण्याच्या गोष्टी बोलता. पण त्याच्या जागी काय येणार, कसल्या तऱ्हेचं जग निर्माण होणार, त्यात माझ्या मुलांना सुखानं जगता येईल ह्याची हमी कोण घेणार..... ह्याची उतरं तुम्ही देऊ शकत नाही."
 ज्योतिर्मय तिला कडवटपणे म्हणाला, "सुखानं जगणं एवढंच ध्येय असतं आयुष्यात?"
 "हो." ती ठामपणे म्हणाली. "तुमच्या मार्गाचंसुद्धा अंतिम ध्येय तेच आहे ना?"
 "अंतिम सगळी उलथापालथ घडल्यानंतर. नवा समाज घडल्यानंतर."
 "परिवर्तनानेच नवा समाज घडेल."
 "हा:! परिवर्तन! फार बदललीस तू मनीषा. तुला आहे त्या चौकटीत असणाऱ्या मध्यमवर्गीय सुखासमाधानाच्या संसाराची हाव सुटलीय, म्हणून तू डोळ्यांवर झापडं ओढून घेतलीयस. हा निर्लज्ज समाज परिवर्तनानं बदलायला हजार वर्ष लागतील."
 ज्योती तिचा गुरू, मित्र, सहकारी. एक बिनधास्त माणूस. कॉलेजात त्याचा एक ग्रुप होता. एक अनामिक अस्वस्थता, आपल्याला आयुष्यात वेगळं काही तरी मिळवायचं आहे अशी भावना, ह्यांतून ती अटळपणे ज्योतीच्या ग्रुपकडे खेचली गेली होती. तिथे झडणाऱ्या चर्चा, प्रचलित व्यवस्थेवर प्रहार करणारी भाषणं, मध्यमवर्गीय नैतिकतेच्या कल्पनांची हेटाळणी ह्या सगळ्यांमुळे तिच्या मन:स्थितीला प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर तितक्याच अटळपणे ती ज्योतीतही गुंतत गेली. त्याला तिच्याबद्दल ओढ वाटत होती हे तिला कळत होतं. पण त्यांच्या परस्पर आकर्षणाची निष्पत्ती लग्नात व्हावी असं ती सुचवू शकत नव्हती. तो नेहमी म्हणायचा, "कुठल्याही दोन माणसांनी एकमेकांवर मालकीहक्क प्रस्थापित करणं म्हणजे त्यांच्या नात्याचा शेवट असतो."
 आणि मग तिला सिद्धार्थ भेटला होता. सिद्धार्थ त्यांच्याच कॉलेजात शिकलेला होता. पण आता परत आपल्या घरी जाऊन राहात होता. काही कामासाठी आलेला असताना त्यांच्या चर्चागटातल्या एकानं त्याला आणलं होतं. "हा सिद्धार्थ. खेडवळ दिसतो. पण बोलण्यात तुम्हाला कुणाला हार जायचा नाही." सिद्धार्थ नुसताच शांतपणे हसला होता. त्याचा न इस्तरलेला सदरा, पायजमा, हवाई चपला ह्यांमुळे तो त्या सगळ्यांच्यात वेगळा दिसतच होता, पण त्याही पेक्षा नंतरच्या चर्चेत त्याचं वेगळेपण दिसून आलं. चर्चासत्रानंतर मनीषा त्याच्याशी बोलली होती आणि तिला त्याचं म्हणण पटत गेलं होतं.
 ज्योती म्हणाला त्याप्रमाणं ती बदलली होतीच, पण हा बदल नुसता एकदा सिद्धार्थाला भेटून झालेला नव्हता. आधीपासून होतच होता, फक्त सिद्धार्थाच्या भेटीनं त्याला नेमकी दिशा दिली. कदाचित 'मी लग्नच करणार नाही' ह्या अवस्थेसारखी क्रांतीची, विद्रोहाची हाक हीही एक प्रगल्भतेकडे पोचण्याची आधीची अवस्था असेल किंवा ज्योतिर्मय म्हणाला त्याप्रमाणं, प्रस्थापित समाजाची लग्न, घर-संसार, मुलं-बाळं ही मूल्यं स्वीकारली की विद्रोहाची भाषा सोडून द्यावी लागते.
 त्यांचा संसार सिद्धार्थाच्या छोट्याशा भाड्याच्या खोलीत सुरू झाला. त्याची आई एकटीच वेगळी राहायची. ती फार तऱ्हेवाईक होती आणि तिचं कुणाशीच पटत नसे. कुणी म्हणे तिचा दुसऱ्या कुणाशी संबंध होता म्हणून तिला एकटं राहायचं होतं. सिद्धार्थाचा बाप तो जन्मायच्या आधीच घर सोडून गेला होता. तो कुठं आहे ते त्याला माहीत नव्हतं. त्यानं बापाला कधी पाहिलं नव्हतं, आणि त्याच्याबद्दल त्याला फारसं कुतूहलसुद्धा वाटत नसे. त्याला एक थोरला भाऊ होता, पण त्याच्याशीही त्याचा फारसा संबंध नव्हता, आणि त्या दोघांचा बाप एकच होता की काय हेही त्याला नक्की माहीत नव्हतं.
 हे सगळं त्यानं मनीषाला सांगितलं होतं, म्हटलं होतं, "माझ्यासारख्या आगापिछा नसलेल्या माणसाशी लग्न करायचं की नाही ते नीट विचार करून ठरव."
 आपल्या आयुष्यात ध्यानीमनी नसलेलं घडतंय ह्याच्यावर सिद्धार्थाचा विश्वास बसत नव्हता. मध्येच तो विचारायचा, "मनीषा, मी स्वप्नात आहे का?"
 ती त्याला चिमटा काढायची आणि त्यानं स् केलं की म्हणायची, "आहे ना खरं?"
 तो म्हणायचा,"मला फार भीती वाटते की मी डोळे उघडीन आणि तू माझ्या आयुष्यातून नाहीशी झालेली असशील"
 "आता मी तुला जन्मभर चिकटलेय. तू हाकललंस तरी मी तुला सोडून जाणार नाही."
 त्याच्या कामातही ती त्याला मदत करायची. त्यांच्या वस्तीत शाळेत न जाणारी पुष्कळ मुलं होती. त्यांना जमवून अक्षरओळख करून द्यायची, स्वच्छता शिकवायची, गाणी म्हणून घ्यायची अशी अनौपचारिक शाळा सिद्धार्थ एका ट्रस्टतर्फे चालवायचा. शाळेच्याच जागेत संध्याकाळी तो एक वाचनालय चालवायचा. रोजची वर्तमानपत्रं, काही मासिकं, थोडीफार पुस्तकं एवढंच ठवलेलं असे. वस्तीतील तरुण मुलं जमायची, कधी वाचन, कधी चर्चा व्हायच्या. कुणी आपले व्यक्तिगत प्रश्न घेऊनही यायचं.
 मनीषाला ह्या कामात मदत करायला मनापासून आवडलं. काहीतरी उपयोगी, चांगलं काम केल्याचं समाधान तिला मिळत होतं. तिला वाटलं इतके दिवस आपण कसल्या लुटुपुटीच्या जगात राहात होतो.
 ट्रस्टकडून सिद्धार्थाला पगार मिळायचा. पगार जेमतेमच होता, पण त्याच्या किंवा मनीषाच्या सवयी खर्चिक नव्हत्या. त्यांना चैनीच्या आयुष्याची अपेक्षा नव्हती. तरी पण हळूहळू मनीषाला वाटायला लागलं की थोडे जास्त पैसे मिळवायला हवेत. कमीत कमी म्हटलं तरी आणखी थोड्या वस्तू, भांडी-कुंडी घ्यायला हवीत. मुलं झाली म्हणजे थोडी मोठी जागा घ्यावी लागेल. शिवाय त्यांचं खाणंपिणं, कपडे, शिक्षण. आधी सिद्धार्थाचा पगार अपुरा,त्यातनं कुणाची नड असली की तो चटकन पैसे काढून देणार. मग भागायचं कसं? तिनं सिद्धार्थाबरोबर विचारविनिमय करून नोकरी करायचं ठरवलं. आता मागं वळून बघताना त्यांच्यातल्या बेबनावाची सुरुवात तिथपासूनच झाली असं तिला वाटलं. तसं तिनं नोकरी करू नये असं त्यानं कधी दर्शवलं नाही, पण त्याला काहीतरी खुपतंय असं तिला जाणवत राहिलं. तिची नोकरी होती एका मोठ्या दुकानात कॅशिअर म्हणून. लोक ज्या वस्तू घेऊन येतील त्यांचं कॅश रजिस्टरवर बिल करायचं. पैसे घ्यायचे, मोड द्यायची एवढं काय. ती कामावर निघाली की तिचे जरा चांगलेचुंगले कपडे, नीटनेटके केस ह्यांची सिद्धार्थ सुरुवातीला चेष्टा करायचा. "हो, घरी काय कसंही केस पिंजारून पारोशा साडीत सकाळभर बसलं तरी आम्हाला चालतं. आम्ही काय डिपार्टमेंट स्टोअरमधलं गिऱ्हाईक थोडंच आहोत?"
 चेष्टेचं गंभीर आरोपात, दुखावणाऱ्या टोमण्यांत नक्की कधी रूपांतर झालं मनीषाला कळलंच नाही.
 "अलिकडे फारच नखरा चाललेला असतो! कुणावर एवढी छाप पाडायची असते तिथे?"
 "कुणावर छाप पाडायला वेळ कुठे असतो गिऱ्हाईकांची गर्दी सुरू झाली म्हणजे?"
 "गर्दी काही सगळाच वेळ नसते. कधीतरी मोकळा वेळ मिळत असेलच की! तेव्हा काय करतेस?"
 "गप्पा मारते."
 "कुणाशी?"
 "इतर तिथं काम करतात ना, त्यांच्याशी. बहुतेक सगळ्या बायकाच आहेत, पण पाच-सहा पुरुषसुद्धा आहेत. सिद्धार्थ, तू असं का नाही करीत? एक दिवस तू तिथं येऊन बस. म्हणजे दिवसभर मी नेमकं काय काय करते, कुणाशी बोलते, कुणावर छाप पाडते ते तुला कळेल!"
 "रागावू नकोस, मनीषा. कधी कधी मला काय होतं तेच कळत नाही. मला भीती वाटते. तू बाहेरच्या जगात जातेस, तुला माझ्यापेक्षा देखणे, सरस असे कितीतरी पुरुष भेटत असतील."
 "असतील! पण म्हणून मी लगेच त्यांच्या प्रेमात पडणार असं तुला कसं वाटतं? एवढा विश्वास नाही तुझा माझ्यावर?"
 "क्षमा कर मला."
 पण पुन्हा तो मूळपदावर यायचा. एखाद्या दिवशी तिला घरी यायला उशीर झाला की तो लगेच विचारायचा, "कुठं गेली होतीस का वाटेत? इतका उशीर?" मग जरासं दरडावून विचारायला लागला, "कुठं गेली होतीस?"
 ती शक्यतोवर गप्प बसत असे. पण एक दिवस चिडून म्हणाली, "कुठं जाणार? तेवढं त्राण तरी असायला हवं ना अंगात? माझ्या पोटात आपलं मूल आहे, सिद्धार्थ. त्याचा तरी विचार कर तू मला वाटेल तसं बोलतोस तेव्हा. दिवसभर काम करून माझी पाठ दुखते, अंग दुखतं, जीव उबून जातो नुसता. कधी एकदा घरी येते असं होतं मला आणि घरी आलं की तुझ्याकडून हे असं ऐकून घ्यायचं."
 बाळंतपण दोनेक आठवड्यांवर आल्यावर तिनं नोकरी सोडली. बाळंतपणाला माहेरी जाण्याचा प्रश्न नव्हता. तिनं आईबापांच्या इच्छेविरूद्ध लग्न केलं होतं. म्हणजे तसं तू आम्हाला मेलीस आम्ही तुला मेलो असा प्रकार नव्हता. पण जातीबाहेर, ते सुद्धा असल्या नगण्य माणसाशी, लग्न केल्याबद्दल ते नाराज होते. त्यांना सिद्धार्थाबद्दल एकूण तुच्छताच वाटते आणि ते त्याला कधीच स्वीकारणार नाहीत हे माहीत असल्यामळे लग्न झाल्यापासून मनीषानं त्यांच्याशी संबंध जवळजवळ तोडलेच होते.
 तिला मुलगा झाला, आणि लगेच दोन वर्षांत दुसरा मुलगा झाला. पहिल्या बाळंतपणाच्या वेळी तिनं नोकरी सोडली ती सोडलीच. आता दोन मुलं संभाळून नोकरी करणं शक्य नव्हतं. एका तऱ्हेनं तिला बरं वाटलं, कारण ती कुठे जाईनाशी झाल्यावर सिद्धार्थाचा तिच्या मागचा ससेमिरा थांबला होता. तिची मिळकत थांबली म्हणून त्यानं एका शाळेत नोकरी धरली. नोकरी आणि बाकीचे व्याप ह्यात तो फारसा घरी नसे, पण जेव्हा असे तेव्हा पहिल्यासारखा आनंदी, समाधानी असे. परिस्थिती बदलली तर काय होईल असा विचार तिला कधी कधी सतावायचा, पण तो ती निग्रहाने दूर सारायची. पुढचं पुढं बघू.
 आणि एकदम अनपेक्षित दिशेनंच हल्ला झाला. एक दिवस सिद्धार्थाचा एक मित्र आला होता. नेहमी घरी येणारा. पुष्कळदा तो सिद्धार्थ घरी नसला तरी यायचा, तसाच त्या दिवशी थांबला. खरं म्हणजे मनीषाला सिद्धार्थ नसताना त्याचे मित्र येऊन बसलेले आवडायचे नाहीत. एक तर जागा फार लहान होती. कुणीतरी परका माणूस समोर आहे, कदाचित आपल्या सगळ्या हालचाली त्याच्या नजरेनं टिपीत असेल ह्या कल्पनेनं तिला कुचंबल्यासारखं व्हायचं. एकदा तिनं सिद्धार्थाला सांगून बघितलं पण त्यानं मनावर घेतलं नाही. "लग्न व्हायच्या आधीपास्नं ते माझं घर आपलंच समजून वागत आलेत. आता एकदम मी त्यांना नाही म्हणून कसं सांगू?"
 त्या दिवशी सिद्धार्थाला यायला फारच उशीर झाला. रात्र गडद झाली. मुलांना जेवू घालून तिनं झोपवलं. किशोर वाचत बसला होता. शेवटी ती म्हणाली, "तू किती वेळ थांबणार आता? उद्या का नाही येत?" तो म्हणाला, "आता इतका वेळ थांबलोय आणखी थोड्या वेळानं काय होणार आहे?"
 सिद्धार्थ आला आणि नेहमीप्रमाणे किशोरला जेवून जा वगैरे न म्हणता त्याची केली दहा मिनिटांत बोळवण. मग जेवण होईपर्यंतसुद्धा न थांबता तो "म्हणाला, "किशोर काय करीत होता इतक्या उशीरापर्यंत?"
 "नेहमीसारखा तू यायची वाट बघत थांबला होता."
 "इतकी रात्र होईपर्यंत त्याला कशाला बसवून घेतलंस?"
 "मी बसवून घेतलं नाही, तो आपणहून बसला."
 "चांगल्या गप्पा तर मारत होतीस त्याच्याशी."
 "मग काय हरकत आहे? इतके दिवस तो इथं येतोय, आता तो माझाही मित्र नाही का? तुला उशीर झाला होता, मलाही एकटीला कंटाळा आला होता. त्याच्यासमोर झोपता तर येत नाही ना? मग गप्पा मारल्या म्हणून काय झालं? काही तरी काढून का चिडतोयस? चल, उशीर झालाय, तू दमला असशील. जेवून घेऊ या."
 "मला भूक नाही."
 काही दिवस तिनं त्याची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. एकदा कळवळून ती त्याला म्हणाली, "का तू असा मला छळतोयस? मला नाही ते सहन होत. मारून तरी टाक मला. मग तूही सुटशील नि मीही सुटेन."
 "माझं दुसरं काही म्हणणं नाही. फक्त तू मला खरं सांग."
 "खरंच सांगतेय रे. हे कसलं भूत तुझ्या डोक्यात बसलंय!"
 एक दिवस तो तिला म्हणाला, "माझ्या मित्रानं मला एकाकडे नेलं होतं त्याला संमोहनविद्या माहीत आहे. तू त्याच्याकडे येशील?"
 "कशाला?"
 "संमोहनाच्या अमलाखाली लोक खरं बोलतात म्हणे!"
 ती रडायला लागली.
 "रडायला काय झालं?"
 "मी इतकं जीव तोडून सांगते त्याच्यावर तुझा विश्वास बसत नाही. काहीतरी मंत्रतंत्र करण्यात काय अर्थ आहे? नाही तरी आता तुझ्या-माझ्या एकत्र राहण्याला काही अर्थच उरला नाही! मी इथून जाते, त्याशिवाय ह्या सगळ्याला अंत नाही."
 "असं म्हणू नकोस. माझं तुझ्यावर फार प्रेम आहे ग. माझ्या वागण्याचा तुला त्रास होतो हे मला दिसतंय. पण मी तरी काय करू! माझ्या मनात येणारे विचार मी थांबवू शकत नाही."
 "मी तुझ्या आयुष्यातनं निघूनच गेले म्हणजे ते विचार आपोआपच थांबतील. मग मी काय करतेय, कुठे जातेय, कुणाला भेटतेय ह्याला महत्त्वच राहणार नाही."
 तो एकदम रडायला लागला. गदगदून, हुंदके देऊन रडायला लागला."असं करू नकोस. एवढा एक चान्स दे मला."
 तिनं त्याला कधीच रडताना पहिलं नव्हतं. नुसते डोळ्यांतून झरझर अश्रू वाहण्यापेक्षा त्याचं रडणं भयानक होतं. ते आतून पिळवटून निघत होतं. तिला ते बघवेना. शेवटी ती म्हणाली. "हा कोण माणूस आहे, त्याच्यासमोर मी जे सांगेन ते खरं आहे असं मानशील तू? मानशील असं वचन दे मला. तरच मी त्याच्याकडे येईन."
 "दिलं."
 एका बाजूनं तिला आपला अपमान होतोय असं वाटत होतं. जरी आता सिद्धार्थानं विश्वास ठेवला तरी इतक्या दिवसांचा गैरविश्वास ती विसरू शकणार होती? त्यांच्या नात्यात जो उणेपणा आला होता तो कायमचाच होता. तरी पण दुसरा मार्ग काय होता? त्याला सोडून जाणं एवढाच. पण त्यात तरी तिला सुख लाभणार होतं? आणि मुलांचं काय? त्यापेक्षा तडजोड करून का होइना, संसाराची गाडी रुळावर आली तर बरं.
 सिद्धार्थ तिला ज्या माणसाकडे घेऊन गेला त्याच्याकडे बघून तिच्या अंगावर शहारा उठला. त्याचा तलम रेशमी सदरा, लांब केस, वरच्या ओठाला महिरप असलेली पातळ जिवणी आणि मधाळ आवाज, हे सगळं तिला किळसवाणं वाटलं. तिनं स्वत:ला सांगून पाहिलं की नुसतं बाह्यरूपावरून एखाद्याची किंमत करणं बरोबर नाही. पण तिचा मानसिक विरोध इतका प्रचंड होता की ती संमोहनावस्थेत गेलीच नाही. त्यानं तिला जे प्रश्न विचारले, ते सिद्धार्थानं आधी पढवून ठेवलेले, त्यांची तिनं सरळ उत्तरं दिली. ती तिथून बाहेर पडल्यावर सिद्धार्थाचं आणि त्या माणसाचं काही बोलणं झालं नि मग सिद्धार्थ बाहेर आला.
 तो म्हणाला, "पेशंटचं पूर्ण सहकार्य मिळालं नाही तर संमोहनविद्येचा काही उपयोग होत नाही."
 "मग आता पुढं काय?' तो काही बोलला नाही. दिवसभर त्यांचं काही बोलणं झालं नाही. रात्री सगळं आवरून झोपायला गेली ती अतिशय ताणलेल्या मनस्थितीत. कशाचा तरी स्फोट व्हावा आणि सगळं वातावरण मोकळं, निर्मळ होऊन जावं असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही. रोजचाच परिपाठ सुरू झाला. त्यानं तिला छेडायला सुरुवात केली. बराच वेळ ती काही बोलली नाही. शून्यात नजर लावून ऐकत होती. तिच्या शरीरातली नस न् नस तुटेल की काय इतकी ताणलेली होती.
 तो म्हणाला, "मी एवढा परोपरीनं तुला विचारतोय, तू काही बोलत का नाहीस?"
 "सिद्धार्थ, आता पुरे. हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलिकडे चाललंय."
 "माझ्याही सहनशक्तीचा विचार कर की! मला काय यातना होतात ते तुला दिसत नाही? मी काही करू शकत नाही. किती दिवस झाले मी शाळेत गेलो नाही. आमच्या ग्रुपच्या मीटिंग, चर्चा कशाकशात रस वाटत नाही मला. आयुष्यातनं उठल्यासारखा झालोय मी."
 "त्याला मी काय करू? हे सगळं तु स्वत:वर ओढवून घेतलंयस."
 "बरोबर आहे. अगदी बरोबर. तरी आनंदा मला सांगत होता तू मनीषाशी लग्न करू नको. ती कसल्या प्रकारची बाई आहे तुला माहीत नाही. त्या चळवळीतल्या कुणाशी तरी तिचं लफडं आहे. पण मी त्यावेळी कुणावरच विश्वास ठेवला नाही."
 "आणि आता तुला त्याचा पश्चाताप होतोय ना? मग मी कायमची तुला सोडून जाते म्हटलं तर तू का ऐकत नाहीस?"
 "कारण मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही."
 "मग मी काय करावं तूच सांग. कारण तुझे आरोप मला असह्य झाले आहेत मी हे असं जगू शकत नाही, आणखी एक दिवससुद्धा."
 "तू फक्त कबूल कर. जे काही खरं असेल ते कबूल कर. मग पुन्हा तुला त्रास देणार नाही. त्याचा उल्लेखही करणार नाही."
 "ठीक आहे," ती संथ, पराभूत स्वरात म्हणाली, "तुला वाटतंय ते खरं आहे, मी आपल्याकडून किशोरनं तू नसताना इथं येऊ नये असा खूप प्रयत्न केला. पण तो येतच राहिला. तू सबंध दिवस बाहेरच असायचास सोबत फक्त दोन लहान मुलं. मला अगदी तुरुंगात टाकल्यासारखं वाटायचं, किशोर आला की तेवढंच बरं वाटायचं गप्पा मारायला, बोलायला कुणीतरी मिळालं म्हणून. पण त्यातनं आमची जवळीक वाढत गेली आणि एक दिवस आमच्याकडून नको ते घडलं."
 ती गुडघे जवळ घेऊन त्यांना हातांची मिठी मारून बसली होती, हनुवटी टेकून जमिनीकडे नजर लावून. आता पुढे काय होणार त्याच्या हातात होतं. तिला इच्छाशक्ती उरलीच नव्हती.
 तो म्हणाला, "हे पहिल्यांदा कधी घडलं?"
 "मला नक्की आठवत नाही."
 "पण बऱ्याच दिवसांपूर्वी?"
 "हो."
 "मग पुन्हा पुन्हा घडत गेलं?"
 त्याचे प्रश्न तिच्या कानांवर आदळत राहिले आणि त्याच्या स्वरावरून तिला उत्तरं सुचत गेली. जणू तो प्रॉम्प्टर म्हणून विंगेत उभा होता."
 "तीच गोष्ट पुन्हा पुन्हा घडली की ते पाप वाटेनासं होतं."
 "मुलांच्या समोरच तुम्ही हे चाळे करीत असा?"
 "ती झोपलेली असत किंवा त्यांना काहीतरी निमित्तानं बाहेर पाठवीत असे."
 अडीच आणि साडेचार वर्षांच्या मुलांना बाहेर पाठवीत असे ह्यात सिद्धार्थाला काही खटकलं नाही.
 "दाराला कडी लावून घेत होतात?"
 "हो."
 "किशोर मी नसल्यावेळी इथं यायचा, तुझ्याबरोबर प्रेमाचे चाळे करायचा आणि पुन्हा मी येईपर्यंत थांबून मला भेटून जायचा?"
 हा प्रश्न उत्तराची अपेक्षा करणारा नसल्यामुळे ती गप्प राहिली. तिला अगदी गळल्यासारखं झालं होतं. आपल्या शरीरात काही हाडं उरली नाहीत, विसविशीत झालंय असं वाटत होतं. आपण हे काय करतोय, कशासाठी करतोय हे समजेनासं झालं होतं. ती तशीच मुडपलेली बसून राहिली, काय होणार आहे, तो काय करणार आहे ह्याचा अंदाज घेत. अनपेक्षितपणे तिला त्याचा स्पर्श जाणवला. त्याचा हात तिच्या खांद्याला. मानेला कुरवाळीत होता. एरवी त्याच्या निसटत्यासद्धा स्पर्शानं फुलून उठणारं तिचं शरीर गोठलं होतं. तिनं एखाद्या आजाऱ्यासारखं मोठ्या कष्टाने मान उचलून त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा उत्तेजित होता. तिच्या तोंडून एक अस्फुट हुंदका बाहेर आला आणि तिनं पुन्हा खाली मान घालून गुडघ्यांत तोंड लपवलं. एखाद्या गोगलगायीसारखं आपलं अंग शंखात ओढून घेतलं.
 त्यानं विजेचा झटका बसल्यासारखा आपला हात मागं घेतला. रुद्ध आवाजात तो म्हणाला, "का असं? किशोरच्या पुढं मी धसमुसळा वाटतो तुला?"

साहित्य सावाना
दिवाळी १९९७