Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय सातवा

विकिस्रोत कडून

<poem> एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥

ॐ नमो सद्गुनरु चतूरक्षरा । चतूरचित्तप्रबोधचंद्रा । जनार्दना सुरेंद्रइंुद्रा । ज्ञाननरेंद्रा निजबोधा ॥१॥ तूझी करितांचि गोठी । प्रगटसी पाटीपोटीं । सन्मुख ठसावसी दृष्टी । हृदयगांठी छेदूनी ॥२॥ छेदूनि विषयवासना । स्वयें प्रगटसी जनार्दना । भवअूभवभावना । नेदिसी मना आतळों ॥३॥ आतळतां तूझे चरण । आकळलें राहे मन । सहज देसी समाधान । आनंदघन अच्युता ॥४॥ ऐशिया जी गुरुनाथा । समसाम्यें चरणीं माथा । पुढील परिसावी जी कथा । जेथ वक्ता श्रीकृष्णु ॥५॥ उद्धवें विनविलियावरी । कृपा कळवळला श्रीहरी । निजघान अतिविस्तारीं । बोध कुसरीं सांगतू ॥६॥ होतें कृष्णाचे मानसी । मज गेलिया निजधामासी । माझें निजज्ञान कोणापासीं । अतियत्नेंसीं ठेवावें॥७॥ तंव देखिली उद्धवाची अवस्था । सुख जाहलें श्रीकृष्णनाथा । वैराग्ययुक्त उपदेशिता । होय सर्वथा निजज्ञान ॥८॥ एवं वांचवावया उद्धवासी । कृष्ण ब्रह्मज्ञान उपदेशी । शाप न बाधी ब्रह्मवेत्यांसी । हें हृषीकेशी जाणतू ॥९॥ ब्रह्मउापदेशाची हातवटी । उपदेशूं जाणे जगजेठी । वैराग्य उपजवी उठाउठीं । जेणें पडे मिठी निजतत्वीं ॥१०॥ नव्हतां वैराग्य दारुण । उपदेशु केला तो वृथा जाण । हे श्रीकृष्णचि जाणे खूण । वैराग्यविंदान बोलतू ॥११॥ पहिलें उद्धवाच्या बोलासी । अनुमोदन दे हृषीकेशी । तेणें अन्वयें सावकशीं । ज्ञानवैराग्य त्यासी बोलतू ॥१२॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीभगवानुवाच । यदात्थ मां महाभाग तच्चिकीर्षितमेव मे । ब्रह्मा भवो लोकपालाः स्वर्वासं मेऽभिकाङ्‌क्षिणः ॥१॥

जो वेदांचा वेदवक्ता । जो ज्ञानियांचा ज्ञानदाता । तो श्रीकृष्णु म्हणे भाग्यवंता । ऐकें निजभक्ता उद्धवा ॥१३॥ जें तूं बोलिलासी भावयुक्त । तें वचन तूझें सत्य सत्य । तेचिं माझें मनोगत । जाण निश्चित निर्घारें ॥१४॥ माझी अवस्था जाश्वनीळा । ब्रह्मादिदेवां सकळां । येथ आले होते मिळोनि मेळा । लोकपाळांसमवेत ॥१५॥ येऊनि माझी घेतली भेटी । अपेक्षा जे होती पोटी । पुशिली माझ्या प्रयाणाची गोठी । जेणें तूज मोठी अवस्था ॥१६॥ म्यां वेगीं यावें वैकुंठा । हे समस्तांसी उत्कंठा । आदिकरून नीळकंठा । सुरवरिष्ठां जालीसे ॥१७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

कुलं वै शापनिर्दग्धं नङ्क्ष्यत्यन्योन्यविग्रहात् । समुद्रः सप्तमे ह्येतां पुरीं च प्लावयिष्यति ॥३॥ उरलें असे आमुचें कुळ । शापनिर्दग्ध केवळ । अन्योन्यविग्रहें सकळ । कलहमूळ नासेल ॥२०॥ भूमि मागोनि समुद्रापासीं । म्यां रचिलें द्वारकेसी । मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसीं बुडवील ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

मया निष्पादितं ह्यत्र देवकार्यमशेषतः । यदर्थमवतीर्णोऽहमंशेन ब्रह्मणार्थितः ॥२॥

ज्यालागीं ब्रह्मेनि प्रार्थिलें । तें देवकार्य म्यां संपादिलें । अवतार नटनाट्य धरिलें । ज्येष्ठत्व दिधलें बळिभद्रा ॥१८॥ ज्येष्ठकनिष्ठभावना । दोघांमाजीं नाहीं जाणा । कृष्णा आणि संकर्षणा । एकात्मता निजांशें ॥१९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

यर्ह्येवायं मया त्यक्तो लोकोऽयं नष्टमङ्गलः । भविष्यत्यचिरात्साधो कलिनापि निराकृतः ॥४॥

ऐकें उद्धवा हितगोष्टी । म्यां सांडलिया हे सृष्टी । थोडियाचि काळापाठीं । नष्टदृष्टी जन होती ॥२२॥ अधर्म वाढेल प्रबळ । लोक होतील नष्ट अमंगळ । ते अमंगळतेचें मूळ । ऐक समूळ सांगेन ॥२३॥ मज नांदतां ये सृष्टीं । कलि उघडूं न शके दृष्टी । मज गेलियापाठीं । तो उठाउठीं उठेल ॥२४॥ कलि वाढेल अतिविषम । ब्राह्मण सांडितील स्वधर्म । स्वभावें नावडे दानधर्म । क्रियाकर्म दंभार्थ ॥२५॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

न वस्तव्यं त्वयैवेह मया त्यक्ते महीतले । जनोऽधर्मरुचिर्भद्र भविष्यति कलौ युगे ॥५॥

म्यां सांडिलिया महीतळी । प्रबळ बळें वाढेल कळी । आजीच तूवां निघिजे तत्काळीं । जंव तो कळी नातळे ॥२६॥ कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्मु वाढेल तेव्हां । कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥ न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी । ऐसी कलियुगीं वस्ती कोडी । तूवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

त्वं तू सर्वं परित्यज्य स्नेहं स्वजनबन्धूषु । मय्यावेश्य मनः संयक् समदृग्विचरस्व गाम् ॥६॥

उद्धवा तूं यालागीं । येथोनि निघावें लागवेगीं । एकलाचि आंगोवांगीं । हितालागीं सर्वथा ॥२९॥ धनधान्यसमृद्धीसीं । सांडावें स्वजनगोत्रजांसी । भ्रातादूहितानिजभगिनींसी । स्त्रीपुत्रासी त्यजावें ॥३०॥ स्नेहो ठेवूनि घरदारीं । अंगें तूं जरी निघालासि बाहेरी । तरी तो त्याहूचि कठिण भारी । अनर्थकारी होईल ॥३१॥ आधीं समूळ स्नेहो सांडावा । पाठीं अभिमानुही दंडावा । वासनाजटाजूट मुंडावा । मग सांडावा आश्रमु ॥३२॥ स्नेहो कैसेनि सांडे । अभिमानु कैसेनि दंडे। हें तूज वाटेल सांकडें । तरी रोकडें परियेसीं ॥३३॥ माझें स्वरूप जें सर्वगत । तेथ ठेवोनियां चित्त । सावधानें सुनिश्चित । राहावें सतत निजरूपीं ॥३४॥ तये स्वरूपीं चित्ता । निर्धारेंसीं धारणा धरितां । निजभावें तन्मयता । तद्रूपता पावेल ॥३५॥ भृंगी जड कीटी मूढ । ध्यानें तद्रूप होय दृढ । अभ्यासीं कांहीं नाहीं अवघड । तो अभ्यास गूढ विशद केला ॥३६॥ माझें स्वरूप ज्ञानघन । ध्याता जीवु स्वयें सज्ञान । या स्थितीं करितां ध्यान । सहजें जाण तद्रूप ॥३७॥ तेथ समसाम्यें समस्त । समत्व पावेल चित्त । तेणें समभावें निश्चित । जेथींच्या तेथ रहावें ॥३८॥ आधीं गृहाश्रमातें त्यागावें । मग म्यां म्हणसी कोठें राहावें । ऐसें मानिसील स्वभावें । तेविखीं बरवें परियेसीं ॥३९॥ स्वरूपसाम्यें समदृष्टी । समभावें विचरें सृष्टीं । निवासस्थानांची आटाटी । सर्वथा पोटीं न धरावी ॥४०॥ जेथ अल्प काळ वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे । वसतिस्थान ऐसें कुडें । वस्तीचें सांकडें सर्वथा न धरीं ॥४१॥ तूं सर्वीं सर्वगत होसी । सर्वाधार सर्वदेशी । ऐसा मी होऊन मज पावसी । न हालतां येसी निजधामा ॥४२॥ मज निजधामा न्यावें। होतें पुशिलें उद्धवें । तें निजबोधस्वभावें । स्वयें केशवें सांगितलें ॥४३॥ न करितां हे उपायस्थिती । सर्वथा न घडे माझी प्राप्ती । मग तूं निजधामाप्रती । कैशा गती येशील ॥४४॥ गरुडीं वाऊनि वेगेंसीं । न्यावें निजधामा म्हणसी । गति तेथ नाहीं पाखांसी । गम्य गरुडासी तें नव्हे ॥४५॥ सांडूनि उभय पक्षांसी । साधक पावती मद्रूपासी । पक्षाभिमान असे गरुडासी । गमन त्यासी तेणें नव्हे ॥४६॥ म्हणसी न्यावें घेवोनि खांदीं । मज खांदूचि नाहीं त्रिशुद्धी । तूज न सांडितां अहंबुद्धी । गमनसिद्धी तेथ नाहीं ॥४७॥ न त्यागितां अहंभावस्थिती । केल्या नाना उपाययुक्ती । तेणें निजधामाप्रती । नव्हे गती सर्वथा ॥४८॥ जें जें देखसी साकार । तें तें जाण पां नश्वर । तेचि विखींचा निर्धार । करीं साचार निजबोधें ॥४९॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

यदिदं मनसा वाचा चक्षुर्भ्यां श्रवणादिभिः । नश्वरं गृह्यमाणं च विद्धि मायामनोमयम् ॥७॥

जें जें दृष्टीं देखिलें । तें तें दृष्यत्वें वाळिलें । जें जें श्रवणा गोचर झालें । तेंही वाळिलें शब्दत्वें ॥५०॥ जें जें वाचा वदे । तें तें वाळिजे जल्पवादें । वाचिक सांडविलें वेदें । नेति नेति शब्दें लाजिला ॥५१॥ जें जें संकल्पें आकळिलें । तें तें कल्पित पैं झालें । जें जें अहंकाराला आलें । तें तें वाळिलें विजातीय ॥५२॥ जें जें इंद्रियें गोचरें । तें तें जाण पां नश्वरें । हें नित्यानित्यविचारें । केलें खरें निश्चित ॥५३॥ तोही नित्यानित्यविवेक । जाण पां निश्चित मायिक । एवं मायामय हा लोक । करी संकल्पसृष्टीतें ॥५४॥ जेव्हडा देखती संसार । तेव्हडा मायिक व्यवहार । हा वोळख तूं साचार । धैर्यनिर्धार धरोनी ॥५५॥ जैशी स्वप्नींची राणीव । केवळ भ्रमचि जाणीव । तैसेंचि जाण हें सर्व । भववैभवविलास ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

पुंसो युक्तस्य नानार्थो भ्रमः स गुणदोषभाक् । कर्माकर्मविकर्मेति गुणदोषधियो भिदा ॥८॥

परमात्मेंसी जो विभक्त । तो पुरुष बोलिजे अयुक्त । त्यासी नानात्वें भेदू भासत । निजीं निजत्व विसरोनी ॥५७॥ त्या विसराचेनि उल्हासें । मिथ्या भेदू सत्यत्वें भासे । त्या भेदाचेनि आवेशें । अवश्य दिसे गुणदोषु ॥५८॥ जरी भेदूचि नाहीं । तरी गुणदोष नाहीं । दिसावया ठावो नाहीं । शुद्धाचे ठायीं सर्वथा ॥५९॥ यालागीं भेदाच्या उद्भशटीं । गुणदोषदृष्टी उठी । तेथें कर्माकर्मत्रिपुटी । भेददृष्टी ठसावे ॥६०॥ भेदें थोर केलें विषम । कर्म अकर्म विकर्म । जन्ममरणादि धर्म । निजकर्म प्रकाशी ॥६१॥ कर्में विकर्में नरकयातना । काम्यकर्में स्वर्गु जाणा । कर्मेंचि करूनि कर्ममोचना । समाधाना पाविजे ॥६२॥ येथ म्हणती कर्म कोण । अकर्माचें काय लक्षण । विकर्माचा कवण गुण । तेंही संपूर्ण परिस पां ॥६३॥ काया वाचा अथवा मन । करिजे तितूकें कर्म जाण । सूक्ष्म स्फूर्तीचें जें भान । तें मूळ जाण कर्माचें ॥६४॥ मनसा वाचा देहीं । सर्वथा कर्मबीज नाहीं । अकर्म म्हणिजे तें पाहीं । न पडे ठायीं देहवंता ॥६५॥ जें कर्मावेगळें सर्वांगें । जेथ कर्म लाबितांही न लगे । जें नव्हे कर्मठाजोगें । तें जाण सवेगें अकर्म ॥६६॥ विधिनिषेधजोडेपाडें । जेथ विशेष कर्म वाढे । विकर्म त्यातें म्हणणें घडें । थोर सांकडें पैं याचें ॥६७॥ कर्म सर्वसाधारण । तेंचि विकारातें पावलें जाण । उठिले विधिनिषेध दारुण । विकर्म जाण तें म्हणिजे पैं ॥६८॥ जें विधीसी नातूडे । तें निषेधाचे अंगा चढे । करितां चुके ठाके विकळ पडे । तेंही रोकडें निषिद्धचि ॥६९॥ ऐसें कर्म विकारलें । तें विकर्म पदें वाखाणिलें । एवं कर्माकर्म दाविलें । विभागनिमित्त तूज ॥७०॥ जीवासी आविद्यक उत्पत्ती । त्याचीं कर्में आविद्यकें होतीं । श्रीधरव्याख्यानाची युक्ती । तेही उपपत्ती परियेसीं ॥७१॥ अविद्यायुक्त जीव परम । त्यासी नित्यक्रिया तेंचि कर्म । नित्य न करणें तें अकर्म । विकर्म तें निषिद्ध ॥७२॥ ऐशी कर्माकर्मविकर्मत्रिपुटी । भेदानुरूपें वाढली सृष्टीं । तेथ गुणदोषबुद्धीच्या पोटीं । भेददृष्टी वाढती ॥७३॥ अभेदीं भेदू कैसा उठी । जेणें गुणदोषीं नांदे दृष्टी । विधिनिषेधीं पाडी गांठी । तेही गोठी परियेसीं ॥७४॥ पुरुष एकु एकला असे । तोचि मनोरथपूजे बैसे । ध्येयध्याताध्यानमिसें । वाढवी पिसें भेदाचें ॥७५॥ तेथे नाना परीचे उपचार । पूजासामग्रीसंभार । ऐसा एकपणीं अपार । भेदू साचार वाढवी ॥७६॥ तेथ ध्येय उत्तम म्हणे जाण । ध्याता नीच होये आपण । तदंगें ध्यान गौण । गुणदोष जाण वाढवी ॥७७॥ ध्यानीं गुणदोष विचित्र । ध्येय म्हणे परम पवित्र । ध्याता आपण होये अपवित्र । शौचाचारदोषत्वें ॥७८॥ एवं ध्यानाचिये दृष्टीं । आपणचि आपुल्या पोटीं । गुणदोषांची त्रिपुटी । भेददृष्टी वाढवी ॥७९॥ ध्येयध्याताध्यान । आघवाची आहे आपण । तें सांडोनियां जाण । गुणदोषलक्षण वाढवी ॥८०॥ उद्धवा हे अवघी सृष्टी । वाढली असे भेददृष्टीं । तेणें भेदें उठाउठी । कर्मत्रिपुटी वाढविली ॥८१॥ जंव जंव भेदाचा जिव्हाळा । जंव जंव विषयांचा सोहळा । पाळिजे इंद्रियांचा लळा । तंव तंव आगळा संसारु ॥८२॥ सापा पाजिजे पीयूख । तेंचि परतोनि होय विख । तैसें इंद्रियां दीजे जंव जंव संतोख । तंव तंव दूःख भोगिजे ॥८३॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

तस्माद्युक्तेन्द्रियग्रामो युक्तचित्त इदं जगत् । आत्मनीक्षस्व विततमात्मानं मय्यधीश्वरे ॥९॥

यालागी इंद्रियांच्या द्वारीं । विषयो नेदावा चतूरीं । जेवीं विषें रांधिली क्षीरधारी । सांडिजे दूरी न चाखतां ॥८४॥ घमघमित अमृतफळें । वरी सर्पें घातलिया गरळें । तें न सेविती काउळे । सेवनीं कळे निजघातू ॥८५॥ तैसें सेवितां विषयांसी । कोण गोडी मुमुक्षासी । प्रतिपदीं । आत्मघातासी । अहर्निशीं देखती ॥८६॥ आत्मघातू न देखती । ते विषयी विषयो सेविती । जैशी दिवाभीता मध्यराती । असतां गभस्ति मध्यान्हीं ॥८७॥ तैसेंचि विषयसेवन । मुमुक्षांसी घडे जाण । तेणें न चुके जन्ममरण । आत्मपतन तयांचें ॥८८॥ म्हणसी प्राणियांची स्थिती । विषयावरी निश्चितीं । विषयत्यागें केवीं राहती । ते सुगम स्थिती अवधारीं ॥८९॥ असतां इंद्रियांचा नेमु । करी चित्ताचा उपरमु । ऐसा दोंहीपरी सुगमु । उत्तमोत्तमु हा त्यागु ॥९०॥ इंद्रियें असोतू विषयांवरी । मन रिघों नेदी त्यांभीतरी । हाही त्यागु सर्वांपरी । योगेश्वरीं बोलिजे ॥९१॥ मनासी विषयांचें बळ । विषयध्यासें तें चपळ । नव्हे म्हणती तें निश्चळ । ऐक समूळ तो उपावो ॥९२॥ माझें स्वरूप सर्वगत । मना बाहेरी आणि आंत । जेथ जेथ जाईल चित्त । तेथ तेथ तें असे ॥९३॥ मजवेगळें जावयासी । ठावो नाहीं पैं चित्तासी । स्वदेशीं हो परदेशीं । अहर्निशीं मजआंतू ॥९४॥ ऐसें निजरूप सतत । पाहतां थोरावेल चित्त । त्या चित्तामाजीं आद्यंत । पाहें समस्त हें जग ॥९५॥ अथवा जीवस्वरूप तूझें चांग । त्यामाजीं पाहतां हें जग । जगचि होईल तूझें अंग । अतिनिर्व्यंग निश्चित ॥९६॥ चरें आणि अचरें । लहानें आणि कां थोरें । जीवरूपीं सविस्तरें । पाहें निर्धारे तूं हें जग ॥९७॥ म्हणसी जीवु तो एकदेशी । त्यामाजीं केवीं पहावें जगासी । त्यासी ऐक्यता करीं मजसीं । जेवीं कनकेंसीं अळंकार ॥९८॥ चिंतितां कीटकी भिंगुरटी । तेचि ते होऊन उठी । तैसा तूं उठाउठीं । होईं निजदृष्टीं निजतत्व ॥९९॥ हो कां सैंधवाचा खडा । पडल्या सिंधूमाजिवडा । तो होवोनि ठाके त्याएवढा । तैसा तूं रोकडा मी होसी ॥१००॥ जेथ मीतूंपणाचा भेद । फिटोनि जाईल विशद । परमानंदें शुद्धबुद्ध । मुक्त सिद्ध तूं होसी ॥१॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

ज्ञानविज्ञानसंयुक्त आत्मभूतः शरीरिणाम् । अत्मानुभवतूष्टात्मा नान्तरायैर्विहन्यसे ॥१०॥

शास्त्रश्रवणें दृढ ज्ञान । मननाभ्यासें होय विज्ञान । या दोंहींची जाणोनि खूण । ब्रह्मसंपन्न तूं होईं ॥२॥ ऐसिया स्वार्थाचेनि लवलाहें । अविश्रम भजावे तूझे पाये । म्हणसी वोढवतील अंतराये । त्यासी काये करावें ॥३॥ सांडोनि दांभिक लौकिक । त्यजोनियां फळाभिलाख । जो मज भजे भाविक । विघ्न देख त्या कैंचें ॥४॥ त्याच्या विघ्ननाशासी देख । करीं चक्राची लखलख । घेऊनि पाठिसी अचुक । उभा सन्मुख मी असें ॥५॥ यापरी गा उद्धवा । जो मज भजे निजभावा । त्यासी विघ्न करावया देवां । नव्हे उठावा मज असतां ॥६॥ एवं ब्रह्मसंपन्न जाहलियावरी । आत्मा तूंचि चराचरीं । जंगमीं आणि स्थावरीं । सुरासुरीं तूंचि तूं ॥७॥ तूजहूनि कांहीं । अणुभरी वेगळें नाहीं । तेथ विघ्न कैंचें कायी । तूझ्या ठायीं बाधील ॥८॥ ब्रह्मादिकांसी जो ग्रासी । त्या काळाचा तूं आत्मा होसी । पाठी थापटून हृषीकेशी । उद्धवासी सांगतू ॥९॥ ऐशी बाध्यबाधकता फिटली । संकल्पकल्पना तूटली । ब्रह्मानंदें पाहांट फुटली । वाट मोडली कर्माची ॥११०॥ ऐसा ब्रह्मानुभवी जो देख । कर्म तेथ होय रंक । वेद तयाचे सेवक । विधिविवेक कामारे ॥११॥ हेंचि किती सांगो कायी । मी त्याचा आज्ञाधारक पाहीं । प्रतिष्ठिती जे जे ठायीं । तेथ पाहीं प्रगटतू ॥१२॥ वचनमात्रासाठीं । प्रगटलों कोरडे काष्ठीं । दूर्वासा वाइला पाठीं । त्वांही दिठीं देखिलें ॥१३॥ म्हणसी देव ज्याचा आज्ञाधारु । कर्म त्याचें होय किंकरु । तरी ज्ञाते यथेष्टाचारु । विषयीं साचारु विचरती ॥१४॥ ज्ञात्यासी स्वेच्छा विषयाचरण । सर्वथा न घडे गा जाण । तेही विषयींचें लक्षण । सावधान परियेसीं ॥१५॥ ज्यासी दग्धपटअ भिमान । मिथ्या प्रपंचाचें भान । मृषा विषयांचें दर्शन । विषयाचरण त्या नाहीं ॥१६॥ जयासी प्रपंचाची आवडी । विषयाची अतिगोडी । यथेष्टाचरणाची वोढी । पडे संसारसांकडी तयासी पैं ॥१७॥ ज्ञातयाच्या ठायीं । सत्यत्वें विषयो नाहीं । मा भोगावया कायी । अभिलाषी पाहीं तो होईल ॥१८॥ आतां ज्ञातयाचें कर्म । ऐक सांगों त्याचें वर्म । नाशतां मनोधर्म । क्रियाकर्म आचरती ॥१९॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

दोषबुद्ध्योभयातीतो निषेधान्न निवर्तते । गुणबुद्ध्या च विहितं न करोति यथार्भकः ॥११॥

गुणदोषातीत ज्ञाता । तो निषेधीं न वर्ते सर्वथा । परी भ्यालेपण चित्ता । नाहीं तत्वतां तयासी ॥१२०॥ तो विहितही कर्म करी । तेथ गुणत्वें बुद्धि न धरीं । कुलालचक्राचियेपरी । पूर्वसंस्कारीं वर्तत ॥२१॥ संकल्पु नाहीं वृत्तीं । हेतू स्फुरेना चित्तीं । ऐसीं कर्में ज्ञाते करिती । शरीरस्थितीं केवळ ॥२२॥ तेथ सत्कर्म सिद्धी गेलें । तेणें फुगेना म्यां हें केलें । अथवा माझारीं विकळ पडिलें । तेणें तगमगिलेंपण नाहीं ॥२३॥ निद्रितामागें बैसला वाघु । अथवा पुढें आला स्वर्गभोगु । त्यासी नाहीं रागविरागु । तैसा लागु ज्ञात्याचा ॥२४॥ गुणदोषीं चित्तवृत्ती । सांडोनिया सहजस्थिती । बाळकें जेवीं क्रीडती । तैशी स्थिति ज्ञात्याची ॥२५॥ अभिमानें कर्मप्राप्ती । त्या अभिमानातें त्यागिती । मग निरभिमानें केवीं वर्तती । कर्मस्थिती त्यां न घडे ॥२६॥ ऐसा विकल्पु जरी करिसी । ते स्थिति न कळे इतरांसी । निरभिमानता स्वानुभवेंसी । केवीं येरासी कळेल ॥२७॥ देह प्रारब्धाचेनि मेळें । स्वभावें सर्व कर्मीं चळे । तेथ अज्ञानाचेनि बळें । अभिमानु खवळे मी कर्ता ॥२८॥ तेथ गुरुवाक्यानुवृत्ती । अभ्यासूनि यथानिगुतीं । अज्ञानेंसहित निरसिती । अभिमानस्थिति निजबोधें ॥२९॥ शेष- प्रारब्धाचेनि मेळें । निरभिमानें देह चळे । ज्ञाते कर्में करिती सकळें । जाण केवळें शारीरें ॥१३०॥ केवळ शारीरें कर्में होतीं । तींच अहेतूक बोलिजेती । अर्भकदृष्टांतें उपपत्ती । हेचि स्थिति सांगितली ॥३१॥ निरभिमानाचीं लक्षणें । कृष्ण उद्धवातें ऐक म्हणे । येरु आनंदला अंतःकरणें । सादरपणें परिसतू ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

सर्वभूतसुहृच्छान्तो ज्ञानविज्ञाननिश्चयः । पश्यन्मदात्मकं विश्वं न विपद्येत वै पुनः ॥१२॥

पहिलें शास्त्रश्रवणें ज्ञान । तदनुभवें होय विज्ञान । ऐसा ज्ञानविज्ञानसंपन्न । निरभिमान तो होय ॥३३॥ साचचि निरभिमानता । जरी आली होय हाता । तरी शांति तेथ सर्वथा । उल्हासता पैं पावे ॥३४॥ दाटूनि निश्चळ होणें । कां दांत चावूनि साहणें । ते शांति ऐसें कोण म्हणे । आक्रोशपणें साहतू ॥३५॥ शांति म्हणिजे ते ऐशी । सागरीं अक्षोभ्यता जैसी । चढ वोहट नाहीं तिसी । सर्वदेशी सर्वदा ॥३६॥ नाना सरितांचे खळाळ । आणूनि घालिती समळ जळ । तो तिळभरी नव्हे डहुळ । अतिनिर्मळ निजांगें ॥३७॥ तैशी नानाभूतविषमता । स्वार्थविरोधें अंगीं आदळतां । पालटू नव्हे ज्याच्या चित्ता । ते जाण सर्वथा निजशांति ॥३८॥ ऐसी शांति ज्यासी देखा । तोचि सर्वभूतांचा सखा । आवडता सर्व लोकां । सुहृद तो कां सर्वांचा ॥३९॥ नवल सख्यत्वाची परी । सर्वस्व दे निजमैत्रीं । स्वार्थीं वंचनार्थ न करी । कृपापात्रीं उपदेशु ॥१४०॥ अतर्क्य त्याची पाहती दिठी । मद्रूपें देखे सकळ सृष्टी । जगासी मज अभिन्न गांठी । निजदृष्टीं बांधली ॥४१॥ मग तो जेउतें पाहे । तेउता मीचि तया आहें । तो जरी मातें न पाहे । तें न पाहणेंही होये मीचि त्याचें ॥४२॥ त्याची पाहती जे दिठी । ते मीचि होये जगजेठी । ऐशी तया मज एक गांठी । सकळ सृष्टीसमवेत ॥४३॥ अवघें जगचि मी होये । तेव्हां तो मी हे भाष जाये । ऐसा तो मजमाजीं समाये । समसाम्यसमत्वें ॥४४॥ सांडोनियां मनोधर्म । ऐसा ज्यासी मी झालों सुगम । त्यासी पुढती कैंचें जन्म । दूःख दूर्गम ज्याचेनीं ॥४५॥ मातेच्या उदरकुहरीं । रजस्वलेच्या रुधिरामाझारीं । पित्याचेनि रेतद्वारीं । गर्भसंचारी संसरण ॥४६॥ जे मातेच्या उदरीं । जंतू नाकीं तोंडीं उरीं शिरीं । विष्ठामूत्राचे दाथरीं । नव मासवरी उकडिजे ॥४७॥ जठराग्नीच्या तोंडीं । घालूनि गर्भाची उंडी । उकडउगकडूनि पिंडीं । गर्भकांडीं घडिजेति ॥४८॥ ते गर्भींचे वेदना । नानापरींची यातना । नको नको रघुनंदना । चिळसी मना येतसे ॥४९॥ अवघ्यांच्या शेवटीं । प्रसूतिवातू जो आटी । सर्वांगीं वेदना उठी । योनिसंकटीं देहजन्म ॥५०॥ ऐसें अपवित्र जें जन्म । तें न पावतीच ते नरोत्तम । जींहीं ठाकिलें निजधाम । ते पुरुषोत्तम समसाम्यें ॥५१॥ मी असतां पाठीपोटीं । त्यांसी काइशा जन्मगोठी । कळिकाळातें नाणिती दिठी । आले उठाउठी मद्रूपा ॥५२॥ जेथ जन्म नाहीं जाहलें । तेथ मरण न लगतांचि गेलें । ऐसे भजोनि मातें पावले । भजनबळें मद्भतक्त ॥५३॥ कृष्ण उद्धवातें थापटी । म्हणे वेगें उठीं उठीं । हेचि हातवशी हातवटी । जन्मतूटी तेणें होय ॥५४॥ जैसें मेघमुखींचें उदक । वरिच्यावरी झेलिती चातक । तैसें कृष्णवचनांसी देख । उद्धवें मुख पसरिलें ॥५५॥ कां चंद्राकिरणीं चकोर । जेवीं अत्यंत सादर । तेवीं उद्धवाचा आदर । दिसे थोर हरिवचनीं ॥५६॥ हो कां पक्षिणी देखोनि पिलें । जाणोनि चारयाचे वेळे । सांडोनियां आविसाळें । मुख कोंवळें जेवीं पसरी ॥५७॥ तेवीं देखोनि कृष्णमुख । उद्धवासी अत्यंत हरिख । श्रवणाचे मुखें देख । कृष्णपीयूष सेवित ॥५८॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

श्रीशुक उवाच । इत्यादिष्टो भगवता महाभागवतो नृप । उद्धवः प्रणिपत्याह तत्त्वंजिज्ञासुरच्युतम् ॥१३॥

शुक म्हणे कौरवनाथा । कृपा उपजली भगवंता । उपदेशिलें महाभागवता । ज्ञानकथा निजबोधू ॥५९॥ तें ऐकोनि उद्धव । श्रवणीं थोर उठी हांव । कैसें बोलिला ज्ञानगौरव । अतिअपूर्व श्रीकृष्ण ॥६०॥ श्रीकृष्ण श्रीमुखें सांगे कोड । तें निरूपण अतिगोड । जीवीं उठली श्रवणचाड । नुल्लंघी भीड देवाची ॥६१॥ आवडीं कळवळे चित्त । घाली साष्टांग दंडवत । हात जोडोनि पुसत । प्रेमळ भक्त उद्धव ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

श्रीउद्धव उवाच । योगेश योगविन्यास योगात्मन्योगसम्भव । निःश्रेयसाय मे प्रोक्तस्त्यागः संन्यासलक्षणः ॥१४॥

ऐकें योगियांच्या योगपती । योग्यांचा ठेवा तूं श्रीपती । योगीं प्रगट तूं योगमूर्ती । योगउत्पत्ती तूजपासीं ॥६३॥ मज मोक्षासी कारण । त्यागु संन्यासलक्षण । बोलिलासी तो अति कठिण । परम दारुण हा त्यागू ॥६४॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

त्यागोऽयं दूष्करो भूमन् कामानां विषयात्मभिः । सुतरां त्वयि सर्वात्मन्नभक्तैरिति मे मतिः ॥१५॥

पाहतां या त्यागाची रीती । मज तंव दूर्धरु गा श्रीपती । मग इतरांची येथ मती । कवण्या स्थितीं होईल ॥६५॥ कामु जयाच्या चित्तीं । विषयीं आसक्त मती । त्यासी या त्यागाची गती । नव्हें श्रीपति सर्वथा ॥६६॥ तूझी कृपा जंव नव्हे । तंव ते अभक्तां केवीं करवे । त्यागु बोलिला जो देवें । तो सर्वांसी नव्हे सर्वथा ॥६७॥ तूं सर्वात्मा असतां हृदयीं । चित्त प्रवेशेना तूझे ठायीं । तें आवरिलें असे विषयीं । नवल कायी सांगावें ॥६८॥ ऐसे प्रपंची आसक्त । यालागीं विमुख झाले अभक्त । त्यांसी त्यागु नव्हे हा निश्चित । चित्त दूश्चित सर्वदा ॥६९॥ त्यागु कां नव्हे म्हणसी । तें परिस गा हृषीकेशी । कठिणत्व जें त्यागासी । तें तूजपाशीं सांगेन ॥१७०॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

सोऽहं ममाहमिति मूढमतिर्विगाढ्स्त्वन्मायया विरचितात्मनि सानुबन्धे । तत्त्वञ्जसा निगदितं भवता यथाहं संसाधयामि भगवन्ननुशाधि भृत्यम् ॥१६॥

तूझी माया विचित्र उपाधी । शरीरीं केली आत्मबुद्धी । आत्मीयें शरीरसंबंधीं । विपरीत सिद्धी वाढली ॥७१॥ मी माझें वाढलें गाढ । तेणें मति झाली मूढ । गृहासक्ति लागली दृढ । त्यागु अवघड यालागीं ॥७२॥ ऐशी ही बुद्धि विवळे । अप्रयासें तत्व आकळे । तैशी कृपा कीजे राऊळें । दासगोपाळें तारावया ॥७३॥ ऐकें गा पुरुषोत्तमा । निजदासां आपुल्या आम्हां । सोडवी गा संसारश्रमा । आत्मयारामा श्रीकृष्णा ॥७४॥ तूज सांडोनि हृषीकेशी । पुसों जावें आणिकांपासीं । तें नये माझिया मनासी । विषयीं सर्वांसी व्यापिलें ॥७५॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

सत्यस्य ते स्वदृश आत्मन आत्मनोऽन्यं वक्तारमीश विबुधेष्वपि नानुचक्षे । सर्वे विमोहितधियस्तव माययेमे ब्रह्मादयस्तनुभृतो बहिरर्थभावाः ॥१७॥

पुसों जावें ब्रह्मयासी । तो गुंतला सृष्टिकर्मासी । प्रजाउत्पत्ति मानसी । अहर्निशीं चिंतितू ॥७६॥ जो आपुल्या निजस्वभावीं । सदा संसारु वाढवी । तो केवीं संसारु तोडवी । केलें न बुडवी सर्वथा ॥७७॥ वाढों नेदी संसारासी । कोपु आला प्रजापतीसी । शापु दिधला नारदासी । ब्रह्म उपदेशी म्हणौनी ॥७८॥ ऐसे संसारी आसक्त । नित्य संसारयुक्त । त्यांसी पुसों न मनी चित्त । जाण निश्चित श्रीकृष्णा ॥७९॥ पुसों जावें ऋषींप्रती । तंव ते सदा आपमती । आपुलें मत प्रतिष्ठिती । अन्यथा देती शापातें ॥१८०॥ जीवीं धरोनि अर्थासक्ती । शिष्यांतें उपदेशिती । विषयो धरोनियां चित्तीं । जीविकावृतीं उपदेशु ॥८१॥ गुरूसीच विषयासक्ती । तेथ शिष्यासी कैंची विरक्ती । ऐशियासी जे पुसती । ते भ्रंशती स्वार्थातें ॥८२॥ सत्यस्वरूप स्वप्रकाश । आत्मा तूं अविनाश । युक्तिप्रयुक्तीं उपदेश । विकल्पनिरास जाणसी ॥८३॥ ब्रह्मज्ञानाचा वक्ता । तूजवेगळा श्रीकृष्णनाथा । न दिसे गा सर्वथा । मज पाहतां त्रिलोकीं ॥८४॥ एवं आत्मा तूं तत्वतां । तूंचि आत्मज्ञानदाता । आत्मबोधीं संस्थापिता । कृष्णनाथा तूं एकु ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

तस्माद्भावन्तमनवद्यमनन्तपारं सर्वज्ञमीश्वरमकुण्ठविकुण्ठधिष्ण्यम् । निर्विण्णधीरहमु हे वृजिनाभितप्तो नारायणं नरसखं शरणं प्रपद्ये ॥१८॥

यालागीं जी यादवपती । नित्य शुद्ध पवित्रमूर्ती । तूज मायामोहो नातळती । पवित्र ख्याती यालागीं ॥८६॥ गोंवळांचेनि उच्छिष्टकवळें । ज्याची पवित्रता न मैळे । तेणेंचि उच्छिष्टबळें । गोंवळें सकळें तारिलीं ॥८७॥ प्राणें शोषिलें पूतनेसी । तरी पवित्रता अधिक कैसी । तेणेंचि उद्धरिलें तिसी । दोषें दोषांसी तारकु ॥८८॥ करूनि कालीयमर्दन । मर्दिला त्याचा अभिमान । तरी मैळेना पवित्रपण । निर्विषें जाण तारिला ॥८९॥ रजक अंत्यज अत्यंत । आतळे तया अधःपात । त्यासी मारूनियां निश्चित । केला पुनीत सायुज्या ॥१९०॥ करूनि गोपिकांसी निंद्य काम । तेणें त्या केल्या निष्काम । तेचि पवित्रता अनुत्तम । सायुज्यधाम पावल्या ॥९१॥ करितां सुकर्म कुकर्म । ज्याची पवित्रता अनुत्तम । यालागीं नामें पुरुषोत्तम । अकर्तात्म निजबोधें ॥९२॥ जो आकळे गुणांआंतू । त्यासी ते गुण करिती प्रांतू । त्या गुणांसी तूजमाजीं अंतू । यालागीं तूं अनंतू सर्वथा ॥९३॥ देशतः कालतः पार । तूज न करवेचि साचार । यालागीं अनंत तूं अपार । श्रुतींसी पार न कळेचि ॥९४॥ तूज म्यां करावी विनंती । किती यावें काकुळती । तूं हृदयस्थ ज्ञानमूर्ती । जाणता त्रिजगतीं तूं एकु ॥९५॥ ज्ञान अज्ञान मायाशक्ती । ईश्वराआधीन गा असती । त्या ईश्वराची तूं ईश्वरमूर्ती । सत्यकीर्ति तूं श्रीकृष्णा ॥९६॥ तूं सर्वांचा नियंता । सर्व करूनि अकर्ता । ऐसा ईश्वरु तूं कृष्णनाथा । भोगूनि अभोक्ता तूं एकु ॥९७॥ देशतः कालतः स्वभावेंसीं । नाशु न पावे ज्या स्थानासी । तेथींचा तूं निवासवासी । पूर्ण पूर्णांशी अवतारु ॥९८॥ नराचें अविनाशस्थान । यालागी तूं नारायण । तूझेनि जीवासी चळणवळण । चाळकपण तूजपाशीं ॥९९॥ ऐसा ईश्वर तूं आपण । नरसखा नारायण । युद्धसमयीं अर्जुनासी जाण । ब्रह्मज्ञान त्वां दिधलें ॥२००॥ दारुण होतां संग्रामासी । पावडा पावो युद्धासी । तेव्हां ब्रह्मज्ञान सांगसी । निज सख्यासी अर्जुना ॥१॥ ऐसा कृपाळू तूं नारायण । यालागीं तूज आलों शरण । त्रिविधतापें तापलों जाण । दूःख दारुण संसारु ॥२॥ संसार म्हणजे अंधकूप । माजीं कामक्रोधादि दूष्ट सर्प । निंदा स्पर्धा कांटे अमूप । दूःखरूप मी पडिलों ॥३॥ तेथ पडीलियापाठीं । ब्रह्मद्वेषाचा शूळ पोटीं । भरला जी उठाउठी । तेणें हिंपुटी होतूसें ॥४॥ तेथून निघावया त्रिशुद्धी । उपावो न दिसे गा निजबुद्धी । कृपाळूवा कृपानिधी । आत्मबोधीं मज काढीं ॥५॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

श्रीभगवानुवाच । प्रायेण मनुजा लोके लोकतत्त्वविचक्षणाः । समुद्धरन्ति ह्यात्मानमात्मनैवाशुभाशयात् ॥१९॥

भूत संचरलियापाठीं । सुटती जल्पवादगोठी । त्यातें गुणिया पाहोनि दिठीं । अक्षता त्राहाटी मंत्रोनी ॥६॥ पाहतां पांचभौतिक संसारु । सहजें झाला असे थोरु । माजीं झोंबलासे कृष्णवियोगखेचरु । उद्धव लेंकरूं झडपिलें ॥७॥ मिसें उद्धवाची झडपणी । अहंम्हैसासुर लागला झणीं । त्यासी करावया झाडणी । कृष्ण गुणी चालिला ॥८॥ तेथ झाडणीलागीं आतां । यदूअवधूतसंवादकथा । त्याचि मंत्रूनि मंत्राक्षता । होय झाडिता श्रीकृष्णु ॥९॥ श्रीकृष्ण म्हणे उद्धवासी । सावध होईं निजमानसीं । येऊनियां मनुष्यलोकासी । आपआसपणांसी उद्धरिती ॥२१०॥ पाहतां यया परमार्था । साह्य नव्हे माता पिता । पुत्र भ्राता दूहिता कांता । साह्य सर्वथा हे नव्हती ॥११॥ साह्य परमार्था नव्हे व्याही । शेखीं साह्य नव्हे जांवयी । आपणिया आपण साह्य पाहीं । जो निजदेहीं विवेकी ॥१२॥ मुमुक्षुमार्गींचे सज्ञान । लोकतत्वविचक्षण । विचारूनि कार्यकारण । स्वबुद्धीं जाण उद्धरले ॥१३॥ नित्यानित्यविवेकें । अनित्य सांडिती त्यागमुखें । नित्य तें यथासुखें । हित संतोखें अंगीकारिती ॥१४॥ नित्यत्वें जें उरलें जाण । तें स्वरूप माझें चिद्धन । तेंचि साधकांचे साधन जाण । अनन्यपणें चिंतिती ॥१५॥ भावितां माझी दृढ भावना । मीचि ते होती जाणा । कीटकीभृंगीचिया खुणा । आप आपणियां उद्धरिती ॥१६॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः । यत्प्रत्यक्षानुमानाभ्यां श्रेयोऽसावनुविन्दते ॥२०॥

पश्वादि योनींच्या ठायीं । हिताहितज्ञान असे पाहीं । मा पुरुषाच्या पुरुषदेहीं । ज्ञान पाहीं स्फुरद्‌रूप ॥१७॥ जें कर्म करितों मी देहीं । तेणें तरेन कीं नाहीं । हें ज्याचे त्याचे ठायीं । स्फुरद्‌रूप पाहीं कळतसे ॥१८॥ सांडूनि अशुभ वासना । जो न करी विषयकल्पना । तो आपुला गुरु आपण जाणा । नरकयातना चुकविली ॥१९॥ जो कंटाळला जन्मगर्भासी । मरमरों उबगला मरणासी । आधी लागली मानसीं । जन्ममरणासी नासावया ॥२२०॥ आवडी नुपजे स्त्रीपुत्रांसी । निद्रा न लागे अहर्निशीं । काळें ग्रासिलें आयुष्यासी । निजहितासी न देखिजे ॥२१॥ तूझीच तूजदेखतां । काळें गिळिली बाल्यावस्था । तारुण्याचा ग्रासिला माथा । वार्धक्याभंवता लागला असे ॥२२॥ केवळ वार्धक्याचा जरंगा । त्यासीही काळू लागला पैं गा । आयुष्य व्यर्थ जातसे वेगा । हा निजनाडु जगा कळेना ॥२३॥ क्षणक्षणा काळू जातसे व्यर्थ । कांही न साधे जी परमार्थ । जन्ममरणांचा आवर्त । पुढें अनर्थ रोकडा ॥२४॥ स्वर्ग नरक कर्म ब्रह्म । चहूं प्राप्तींसी मनुष्यधर्म । यालागीं त्यजूनि पापकर्म । मोक्षधर्म धरावा ॥२५॥ नरदेह मोक्षाचा वांटा । वृथा जातसे कटकटा । हृदयीं आधी लागला मोटा । विषयचेष्टा विसरला ॥२६॥ प्रत्यक्ष लक्षणें अनित्य । संसारु दिसे नाशवंत । यालागीं तो नव्हे आसक्त । होय विरक्त इहभोगीं ॥२७॥ याचिपरी अनुमाना । परलोकभोगभावना । आतळों नेदी मना । नश्वर पतना जाणोनि ॥२८॥ कैं कृपा करील गोविंद । कैं तूटेल भवबंध । कैं देखेन तो निजबोध । परमानंद जेणें होय ॥२९॥ धांव पाव गा श्रीहरी । कृपा करीं दीनावरी । मज उद्धरीं भवसागरीं । भक्तकैवारी श्रीकृष्णा ॥२३०॥ जैसी जीवनावेगळी मासोळी । तैसा बोधालागीं तळमळी । प्रेमपडिभराच्या मेळीं । देह न सांभाळी सर्वथा ॥३१॥ एक नेणोनि नरदेहा मुकले । एकीं नव्हे म्हणोनि उपेक्षिले । एक ज्ञानगर्वे गिळिले । एक भुलले विषयार्थी ॥३२॥ एक साधनाभिमानें ठकिले । एक करूं करूं म्हणता गेले । एक करितां अव्हाटां भरले । करणें ठेलें तैसेंचि ॥३३॥ जरी विवेक कळला मना । तरी न तूटती विषयवासना । तेणें संतप्त होऊनि जाणा । नारायणा चिंतितू ॥३४॥ कृष्ण म्हणे उद्धवासी । सविवेक वैराग्य असे ज्यासी । तोचि आपुला गुरु आपणासी । विशेषेंसी जाणावा ॥३५॥ त्याचिये निजबुद्धीसी । मीचि विवेकु प्रकाशीं । तो स्वयें जाणे निजबोधासी । निजमानसीं विवेकें ॥३६॥ ज्यासी जैसा भावो । त्यासी मी तैसा देवो । ये अर्थी संदेहो । उद्धवा पहा हो न धरावा ॥३७॥ उद्धवा येथ केवळ । पाहिजे निजबुद्धि निर्मळ । तरी आत्मबोध तत्काळ । होय सफळ सर्वथा । ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

पुरुषत्वे च मां धीराः साङ्ख्ययोगविशारदाः । आविस्तरां प्रपश्यन्ति सर्वशक्त्युपबृंहितम् ॥२१॥

एवं वैराग्यें पूर्ण भरित । धीर पुरुष विवेकयुक्त । सांख्ययोग विवंचित । निजीं निज प्राप्त तत्काळ ॥३९॥ नरदेहीं विवेक वसे । निजरूप पावले कैसे । जें सर्वशक्तियुक्त असे । तें सावकाशें देखती ॥२४०॥ जें प्रसवे सर्वशक्तींतें । तें सर्वशक्ति शक्तिदातें । जें नातळे सर्वशक्तीतें । त्या स्वरूपातें पाहताती ॥४१॥ उद्धवा काय सांगों गोष्टी । बहुत शरीरें सृजिलीं सृष्टीं । मज नरदेहीं आवडी मोटी । उठाउठीं मी होतों ॥४२॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

एकद्वित्रिचतूस्पादो बहुपादस्तथापदः । बह्व्यः सन्ति पुरः सृष्टास्तासां मे पौरुषी प्रिया ॥२२॥

केलीं एकचरणी शरीरें । दोंपायांची अपारें । तींपायांचीं मनोहरें । अतिसुंदरें चतूष्पदें ॥४३॥ सर्पादि योनींच्या ठायीं । म्यां चरणचि केले नाहीं । एकें चालती बहुपायीं । केलीं पाहीं शरीरें ॥४४॥ ऐशीं शरीरें नेणो किती । म्यां निर्माण केलीं ये क्षितीं । मज कर्त्यातें नेणती । मूढमति यालागीं ॥४५॥ मज कर्त्याची प्राप्ती । होआवयालागीं निश्चितीं । स्वांशें प्रकाशोनि ज्ञानशक्ती । पौरुषी प्रकृति म्यां केली ॥४६॥ जेणें देहें मज पावती । त्या देहाची मज अतिप्रीति । यालागीं श्रुति नरदेह वर्णिती । देव वांछिती नरदेहा ॥४७॥ ऐशी नरदेहाची प्रीती । कृष्ण सांगे उद्धवाप्रती । येणें शरीरें मज पावती । नाना युक्तिविचारें ॥४८॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

अत्र मां मृगयन्त्यद्धा युक्ता हेतूभिरीश्वरम् । गृह्यमाणैर्गुणैर्लिङ्गैरग्राह्यमनुमानतः ॥२३॥

येऊनि नरदेहाप्रती । कर्त्याची गवेषणा जे करिती । जो मी ईश्वर त्रिजगतीं । उत्पत्तिस्थिति संहर्ता ॥४९॥ बुद्धियुक्तीं विवेक करणें । ते जडें जे प्रकाशपणें । त्याचाही मी प्रकाशकु म्हणे । येणें लक्षणें लक्षिती ॥२५०॥ ऐशा नानापरींच्या अनुमानां । मी तंव वश नव्हें जाणा । जे लक्षिती सांडोनि अभिमाना । साक्षात्पणा ते येती ॥५१॥ ज्याची आशा होय निराश । तोचि ब्रह्म पावे सावकाश । तेणें कळीकाळावरी कांस । जाण अवश्य घालती ॥५२॥ मुख तंव स्वतःसिद्ध असे । तें निर्मळ आरिसां दिसे । तेवीं बुद्धीचेनि विवेकवशें । आत्मा भासे नरदेहीं ॥५३॥ येचिविखींचा इतिहास जाण । तूज मी सांगेन पुरातन । यदूअवधूतसंवादलक्षण । ज्ञानसाधन साधकां ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

अत्राप्युदाहरन्तीममितिहासं पुरातनम् । अवधूतस्य संवादं यदोरमिततेजसः ॥२४॥

हरिखें म्हणतसे गोविंदू । उद्धवा आमुचा पूर्वज यदू । तेणें ब्रह्मज्ञानासी संवादू । केला विशदू अवधूतासीं ॥५५॥ राजा यदू म्हणसी कैसा । क्षात्रसृष्टीचा सूर्यो जैसा । राज चंद्राच्या प्रकाशा । निजतेजवशा लोपितू ॥५६॥ तेणें गुरूचीं लक्षणें ऐकतां । सायुज्यमुक्ति आली हाता । ते हे पुरातन कथा । तूज मी आतां सांगेन ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

अवधूतं द्विजं कञ्चिच्चरन्तमकुतोभयम् । कविं निरीक्ष्य तरुणं यदूः पप्रच्छ धर्मवित् ॥२५॥

कोणी एक अवधूतू । निजतेजें प्रकाशवंतू । ब्रह्मानंदें डुल्लतू । यदूनें येतू देखिला ॥५८॥ त्या अवधूताचें लक्षण । यदू निरीक्षी आपण । देखिलें ब्रह्मसूत्रधारण । होय ब्राह्मण ब्रह्मवेत्ता ॥५९॥ ऐसा तो अवधूतू । निर्भय निःशंक वर्ततू । यदू व्याहाळिये होता जातू । देखिला वनांतू सन्मुख ॥२६०॥ आंतूला प्राण तत्त्वतां । बाहेर रिघों नेदी सर्वथा । स्वभावें प्राणापानसमता । जाली न धरितां धारणा ॥६१॥ नवल तयाचें पाहणें । दृश्य दृश्यत्वें देखों नेणे । झाला सर्वांगें देखणें । देखणेंपणें पाहातसे ॥६२॥ मी एकु वनीं वसता । हेंही नाठवे त्याचिया चित्ता । झाली सर्वत्र सर्वगतता । समसाम्यता समत्वें ॥६३॥ कर्म कार्य कर्ता जाण । अवघा जाहला तो आपण । क्रियेनें वाहूनियां आण । निंबलोण जीवें केलें ॥६४॥ देहाचिया माथां । ठेविली होती अहंता । तें देहमिथ्यात्व पावतां । समूळ अहंता पळाली ॥६५॥ नित्यानित्य होमद्वारें । ब्रह्माग्नि प्रज्वळला एकसरें । जाळूनि आश्रमांची चारी घरें । केलें खरें निराश्रमी ॥६६॥ त्या आश्रमामाजीं होती । शास्त्रश्रवणविधिवादपोथी । ते जळाली जी निश्चितीं । भस्म हातीं न लगेचि ॥६७॥ विधिनिषेधपैजा । जळाली पंचायतनदेवपूजा । होता संचितक्रियमाणपुंजा । तोही वोजा जळाला ॥६८॥ यापरी तो अवधूतू । ब्रह्मानंदें जी डुल्लतू । निजसुखें वेल्हावतू । देखिला येतू यदूरायें ॥६९॥ संकल्पविकल्परहित । शुद्ध सर्वांगी विभूत । यालागीं बोलिजे अवधूत । येर्हववीं विख्यात ब्राह्मणू ॥२७०॥ सभोंवता समस्तू । प्रपंच निजबोधें असे धूतू । यालागीं बोलिजे अवधूतू । येर्हधवीं विख्यातू ब्राह्मणू ॥७१॥ अहं धूईव तो अवधूतू । तोचि योगी तोचि पुनीतू । जो का अहंकारग्रस्तू । तोचि पतितू जन्मकर्मी ॥७२॥ वार्धक्य यावें देहासी । तंव देहपण नाहीं देहापासीं । रिगमु नव्हेच जरेसी । तारुण्यासी तें मूळ ॥७३॥ आणिकही त्याचीं लक्षणें । नीच नवा बोधू मैळों नेणें । भोगिजे नित्य नूतनपणें । परम तारुण्यें टवटवला ॥७४॥ निजबोधाचिया सत्ता । द्वैत जिंतिलें तत्त्वतां । ऐसा निःशंकु विचरतां । भय सर्वथा त्या नाहीं ॥७५॥ ऐशीं लक्षणें निर्धारितां । अवधूत निजबोधें पुरता । यदूसी उपजली विनीतता । श्रद्धा सर्वथा अनिवार ॥७६॥ करूनि साष्टांग दंडवत । अति नम्र श्रद्धायुक्त । हात जोडूनि पुसत । प्रसन्न चित्त रायाचें ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

श्रीयदूरुवाच । कुतो बुद्धिरियं ब्रह्मन्नकर्तूः सुविशारदा । यामासाद्य भवाल्लोकं विद्वांश्चरति बालवत् ॥२६॥

अपूर्व बुद्धि हे स्वामी । तूमचे ठायीं देखों आम्ही । जे न लभे यमनियमीं । कर्मधर्मीं आचरतां ॥७८॥ दिसतोसी सर्वार्थी कुशळ । परी कांही न करूनि निश्चळ । अकर्तात्मबोधें तूं केवळ । जैसें बाळ अहेतूक ॥७९॥ तूं बालाऐसा वर्तसी । परी बालबुद्धि नाहीं तूजपासीं । सर्वज्ञ सर्वथा होसी । ऐसें आम्हांसी दिसतसे ॥२८०॥ येवोनियां या लोकासी । पावोनियां नरदेहासी । सार्थकता तूझ्याऐसी । आणिकापाशीं न देखों ॥८१॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

प्रायो धर्मार्थकामेषु विवित्सायां च मानवाः । हेतूनैव समीहन्ते आयुषो यशसः श्रियः ॥२७॥

प्रायशा ये लोकीं लोक । धर्मअशर्थकामकामुक । येचिविखीं ज्ञान देख । आवश्यक करिताति ॥८२॥ आम्ही स्वधर्म करितों म्हणती । स्नानसंध्येची कीर्ति मिरविती । शेवटीं गायत्रीचें फळ देती । अर्थप्राप्तीलागोनी ॥८३॥ वेदोक्त आम्ही करितों याग । संस्थापितों वेदमार्ग । शेखीं तो करिती जीविकायोग । स्वर्गभोग वांछिती ॥८४॥ एक म्हणती आम्ही स्वकर्मक । कुश मृत्तिका नाशिती उदक । समयीं आलिया याचक । इवलीसी भीक न घालिती ॥८५॥ दांभिक वाढवावया स्फीती । वैष्णवदीक्षा अवलंबिती । देवपूजा इळफळीत दाविती । शंख लाविती दों हातीं ॥८६॥ आयुष्यदानी पुण्यपुरुष । आम्ही चिकित्सक अहिंस । स्थावर जंगम जीव अशेष । मारूनियां यश मिरविती ॥८७॥ यश वाढवावयाचें कारण । तूळापुरुष करिती दान । देहो मूत्रविष्ठें परिपूर्ण । धन त्यासमान जोखिती ॥८८॥ परी परमार्थाचिया चाडा । कोणी वेंचीना कवडा । भूल कैशी पडली मूढां । स्वार्थ रोकडा विसरले ॥८९॥ पूर्वीं अदृष्टीं नाहीं प्राप्ती । ते श्रीकामा उपास्ती करिती । श्रियेचा स्वामी श्रीपती । त्यातें भजती अभाग्य ॥२९०॥ लक्ष्मी विश्वगुरु हरीची पत्नीा । तीतें जो तो राखे अभिलाषुनी । नेदिती हरीची हरिलागोनी । त्यातें पचनीं हरि पचवी ॥९१॥ रोगत्यागें आयुष्य मागती । यालागीं सविता उपासिती । देहो नश्वर हें नाठवे चित्तीं । पडली भ्रांती निजपदा ॥९२॥ एवं आयुष्य-यश-श्रीकामीं । समस्त भजतां देखों आम्ही । परी नवल केलें तूवां स्वामी । परब्रह्मीं निजबोधू ॥९३॥ विषयबळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक । ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वांछिती ॥९४॥ वेदांतवार्तिकवाक्स्फू र्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती । शेखीं पोटासाठीं विकिती । नवल किती सांगावें ॥९५॥ एक म्हणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनीं । टाळी लावूनि बैसती ध्यानीं । जीविका मनीं विषयांची ॥९६॥ ऐसे विविदिष लोक । साधनें साधूनि झाले मूर्ख । तूवां केलें जी अलोलिक । आत्मसुख साधिलें ॥९७॥ ऐसें स्वामी अवघूता । तूवां तृणप्राय केलें जीविता । तूच्छ करोनि लोकां समस्तां । निजात्महिता मीनलासी ॥९८॥ निजानंदें निवालासी । अंतरी शीतलु झालासी । ऐसें दिसताहे आम्हांसी । उपलक्षणेंसी परियेसीं ॥९९॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

त्वं तू कल्पः कविर्दक्षः सुभगोऽमृतभाषणः । न कर्ता नेहसे किञ्चिज्जडोन्मत्तपिशाचवत् ॥२८॥

सर्वज्ञज्ञाता तूं होसी । तें ज्ञातपण दिसों न देसी । कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वें दाविसी निजशांती ॥३००॥ सर्वथा उगा अससी । परी तूं अंगें विकळ नव्हसी । अंगीं अव्यंगु दिसतोसी । स्वरूपरूपेंसीं शोभितू ॥१॥ ज्ञान एकलेपणें ठेलें । दूजेनिवीण परदेशी झालें । तें तूजमाजीं सामावलें । यालागीं आलें कविपद ॥२॥ करूनि झालासी अकर्ता । हेचि तूझी थिर दक्षता । ब्रह्मरसें रसाळ बोलतां । चवी अमृता ते कैंची ॥३॥ ब्रह्मरस तू प्यालासी । ब्रह्मानंदें मातलासी । जगीं उन्मत्त झालासी । दृष्टीं नाणिसी कोणातें ॥४॥ सदा सावध निजरूपेंसी । यालागीं माझें तूझें न म्हणसी । तेंचि पिसेंपण तूजपाशीं । दिसे जगासी सर्वथा ॥५॥ निजबोधें तृप्त झालासी । परमानंदें निवालासी । तीं हीं लक्षणें तूजपासीं । निर्धारेंसीं दिसताती ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

जनेषु दह्यमानेषु कामलोभदवाग्निना । न तप्यसेऽग्निना मुक्तो गङ्गाम्भःस्थ इव द्विपः ॥२९॥

कामलोभदावाग्नी । माजीं जळतां लोक तीन्ही । देखत असों जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥७॥ ते दावाग्नीमाजीं असतां । तूं न पोळसी गा अवधूता । नवल तूझी अक्षोभ्यता । नकळे सर्वथा आम्हांसी ॥८॥ वणवा जळे दोंही थडीं । गजें गंगाजळीं दिधली बुडी । त्यासी न लागती तापाच्या वोढी । तैसें निरवडीं तूज देखों ॥९॥ ऐशीं द्वंद्वें तूज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थितीं । कांही एक करीन विनंती । कृपामूर्ति दयाळूवा ॥३१०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

त्वं हि नः पृच्छतां ब्रह्मन्नात्मन्यानन्दकारणम् । ब्रूहि स्पर्शविहीनस्य भवतः केवलात्मनः ॥३०॥

तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण । त्या आनंदाचें कारण । विशद करून सांगावें ॥११॥ तूं देहीं वर्तसी विदेहस्थिती । तूज विषय आतळूं न शकती । हे अलिप्तपणाची प्राप्ती । कवण्या रीतीं तूज झाली ॥१२॥ तूज नाहीं रायाची भीड । न करिसी धनवंताची चाड । दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधें ॥१३॥ ऐसा केवळ तूं कृपाळू । आर्तबंधू दीनदयाळू । निजात्मभावें तूं केवळू । भक्तवत्सलू भावार्थे ॥१४॥ ऐसा यदूचा संवादू । आवडीं सांगे गोविंदू । उद्धवासी म्हणे सावधू । हृदयीं बोधू धरावा ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

श्रीभगवानुवाच । यदूनैवं महाभागो ब्रह्मण्येन सुमेधसा । पृष्टः सभाजितः प्राह प्रश्रयावनतं द्विजः ॥३१॥

श्रीमुखें श्रीकांत । यदूचें भाग्य वर्णित । ब्राह्मणभक्त सत्त्वयुक्त । बुद्धिमंत श्रद्धाळू ॥१६॥ भगवद्भाणग्यें भाग्यवंतू । यदूसी भेटला तो अवधूतू । त्यासी होऊनि अतिविनीतू । असे विनवितू निजहिता ॥१७॥ मृदू मंजुळ वचनीं प्रार्थिला । मघुपर्कविधानें पूजिला । अवधूत अतिसंतोषला । बोलता झाला निजमुखें ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

श्रीब्राह्मण उवाच । सन्ति मे गुरवो राजन् बहवो बुद्ध्युपाश्रिताः । यतो बुद्धिमुपादाय मुक्तोऽटामीह तान्‌ श्रृणु ॥३२॥

क्षीरसागर उचंबळला । कीं कृपेचा मेघ गर्जिन्नला । निजसुखाचा वाधावा आला । तैसें बोलिला ब्राह्मणु ॥१९॥ ऐकें राजया चूडामणी । यदुकुळदीप दिनमणी । धन्य धन्य तूझी वाणी । निजगुणीं निवविलें ॥३२०॥ राजा आणि सात्त्विकु । सिद्धलक्षणें लक्षकु । पृथ्वीमाजीं तूचि एकु । न दिसे आणिकु सर्वथा ॥२१॥ सुंदर आणि सगुण । उत्तमोत्तम केला प्रश्न । पुसिलें निजानंदकारण । तें यथार्थ जाण सांगेन ॥२२॥ गुरूविण आत्मप्राप्ती । सर्वथा न घडे गा नृपती । ते गुरूही मी तूजप्रती । यथानिगुतीं सांगेन ॥२३॥ निजबुद्धीच्या विवेकस्थितीं । बहुत गुरु म्यां केले असती । जे जे सद्गुयण म्यां देखिले भूतीं । ते ते स्थितीं तो गुरु ॥२४॥ बुद्धीनें अंगिकारिलें गुणा । निजधैर्यें धरिली धारणा । तेणें मी मुक्त जालों जाणा । स्वेच्छा अटणा करीतसें ॥२५॥ संसारु तरावया । मुख्य सद्बु द्धि गा राया । रिगमू नाहीं आणिका उपाया । व्यर्थ कासया शिणावें ॥२६॥ सद्बु द्धि नाहीं ज्यापासीं । तो संसाराची आंदणी दासी । उसंत नाहीं अहर्निशीं । दूःखभोगासी अनंत ॥२७॥ सद्बुनद्धि नाहीं हृदयभुवनीं । तेथ वैराग्य नुपजे मनीं । मा तो तरेल कैसेनीं । विवेक स्वप्नीं न देखे ॥२८॥ वैराग्याचेनि पडिपाडें । ज्यासी सद्बु द्धि सांपडे । तेथ संसार कोण बापुडें । घायें रोकडें विभांडी ॥२९॥ आधीं संसारु एकु असावा । मग तो खटाटोपें नासावा । जो रिघाला विवेकगांवा । त्यासी तेव्हां तो नाहीं ॥३३०॥ संसारनाशासी मूळ । शिष्य प्रज्ञाचि केवळ । तिचें झाल्या अढळ बळ । होये मृगजळ संसारु ॥३१॥ जे मी गुरु सांगेन म्हणे । तें निजप्रज्ञेचेनि लक्षणें । हेयोपादेयउ पायपणें । घेणें त्यजणें सविवेकें ॥३२॥ हेचि मर्हा ठिया भाखा । सांगेन तें सावध ऐका । जेणें शिष्याचा आवांका । पडे ठाउका प्रत्यक्ष ॥३३॥ ऐक प्रज्ञेचीं लक्षणें । सांगेन दृष्टांतपणें । सूप चाळणी रांधणें । घेणें त्यजणें विवेकें ॥३४॥ चाळणीमाजीं जें जें पडे । सूक्ष्म निजतत्त्व तळीं सांडे । उरती गुणदोषांचे खडे । करिती बडबडे खडबडित ॥३५॥ ऐसी जे अवस्था । ते त्यागावी सर्वथा । भ्रंशु होईल स्वार्था । हे राखतां त्रिशुद्धी ॥३६॥ सुपाची दशा ते ऐसी । त्यजी रजःकण भुसासी । निडारल्या निजबीजासी । निजहृदयेंसीं राखत ॥३७॥ स्वयें वैराग्यें तापणें । ते दशा रांधणें म्हणें । अपक्का परिपक्क करणें । निजगुणें निजांगें ॥३८॥ एवं या दोनी दशा । दृढ धराव्या वीरेशा । तेणें परमार्थु होये आपैसा । जेवी आरिसा यातींचा ॥३९॥ यदूसी म्हणे ब्राह्मण । जें म्यां सांगितलें लक्षण । तेथें ठेवूनियां मन । सावधान परियेसीं ॥३४०॥ जो जो जयाचा घेतला गुण । तो तो गुरु म्यां केला जाण । गुरूसी आलें अपारपण । जग संपूर्ण गुरु दिसे ॥४१॥ ज्याचा गुण घेतला । तो सहजें गुरुत्वा आला । ज्याचा गुण त्यागरूपें घेतला । तोही गुरु झाला अहितत्यागें ॥४२॥ एवं त्यागात्यागसमतुकें । दोहींसी गुरुत्व आलें निकें । राया तूं पाहें पां विवेकें । जगचि असकें गुरु दिसे ॥४३॥ ऐसें पाहतां सावकाशीं । गुरुत्व आलें जगासी । हेंचि साधन जयापासीं । तोचि परमार्थासी साधकु ॥४४॥ ऐसें सांगतां अचाट । तूज वाटेल हें कचाट । तरी गुरु सांगो श्रेष्ठश्रेष्ठ । मानिले वरिष्ठ निजबुद्धीं ॥४५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ व ३४ वा

पृथिवी वायुराकाशमापोऽग्निश्चन्द्रमा रविः । कपोतोऽजगरः सिन्धुः पतङ्गो मधूकृद्गजः ॥३३॥

मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकः । कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत् ॥३४॥ गुरु सांगेन अशेष । संख्याप्रमाण चोवीस । त्यांचीं नांवें तूं परिस । सावकाश सांगेन ॥४६॥ पृथ्वी वायु आकाश । अग्नि आप सितांश । सातवा तो चंडांश । कपोता परिस आठवा ॥४७॥ अजगर सिंधु पतंग । मधुमक्षिका गज भृंग । हरिण मीन वेश्या साङ्ग । नांवें सुभग पिंगला ॥४८॥ टिटवी आणि लेंकरूं । कुमारी आणि शरकारु । सर्प कातणी पेशस्करु । इतुकेन गुरु चोवीस ॥४९॥ पावावया तत्त्व पंचविसावें । चोविसां गुरूंसी उपासावें । विवेकयुक्तिस्वभावें । गुरु भजावे निजबुद्धीं ॥३५०॥ ठाकावया निजबोधासी । निजविवेकें अहर्निशीं । गुरुत्व देऊनि अनेकांसी । निजहितासी गुरु केले ॥५१॥ कोण युक्ति कोण विचारु । कोणें लक्षणें कोण गुरु । केला तोही निजनिर्धारु । सविस्तारु परियेसीं ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

एते मे गुरवो राजन् चतूर्विंशतिराश्रिताः । शिक्षावृत्तिभिरेतेषामन्वशिक्षमिहात्मनः ॥३५॥

ऐकें राजवर्य नृपती । विवेकधवलचक्रवर्ती । गुरुसंख्या तूजप्रती । यथानिगुतीं सांगितली ॥५३॥ यांचिया शिक्षिता वृत्ती । शिकलों आपुलिया युक्तीं । मग पावलों आत्मस्थिती । विकल्पभ्रांती सांडूनी ॥५४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

यतो यदनुशिक्षामि यथा वा नाहुषात्मज । तं त्तथा पुरुषव्याघ्र निबोध कथयामि ते ॥३६॥ नहुषाचा पुत्र ययाती । ययातीचा यदू निश्चितीं । नहुषनंदन यदूसी म्हणती । मूळ व्युत्पत्ती तेणें योगें ॥५५॥ यालागीं म्हणे नाहुषनंदना । पुरुषांमाजीं पंचानना । सांगेन गुरूंच्या लक्षणा । विचक्षणा परियेसीं ॥५६॥ ज्या गुरूचें जें शिक्षित । मी शिकलों सुनिश्चित । तें ते सांगेन समस्त । सावध चित्त करीं राया ॥५७॥ ऐकावया गुरुलक्षण । यदूनें सर्वांग केलें श्रवण । अर्थीं बुडवूनियां मन । सावधान परिसतु ॥५८॥ शब्द सांडोनियां मागें । शब्दार्थामाजीं रिगे । जें जें परिसतू तें तें होय अंगें । विकल्पत्यागें विनीतु ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

भूतैराक्रम्यमाणोऽपि धीरो दैववशानुगैः । तद्विद्वान्न चलेन्मार्गादन्वशिक्षं क्षितेर्व्रतम् ॥३७॥

परमार्थी मुख्य शांती । साधकांसी पाहिजे निश्चितीं । यालागीं प्रथम गुरु क्षिती । निजशांतीलागूनी ॥३६०॥ पृथ्वी गुरु त्रिविध पाहीं । पर्वत वृक्ष आणि मही । यांचीं लक्षणें धरितां देहीं । गुरुत्व पाहीं पृथ्वीसी ॥६१॥ अंतरनिग्रहो ते शांती । बाह्येंद्रियनिग्रहो ते दांती । उभयसहिष्णुता ते क्षांती । क्षांतीसी क्षिति गुरु केली ॥६२॥ पृथ्वीते नानाभूतीं । माझी माझी म्हणौनि झोंबती । नाना भेदीं भिन्न करिती । निजवृत्तिव्यवहारें ॥६३॥ त्या भूतांचे भिन्न वर्तन । पृथ्वी संपादी आपण । मोडों नेदी अभिन्नपण । अखंड जाण सर्वदा ॥६४॥ तैसें योगियांचे लक्षण । करितां कर्म भिन्नभिन्न । वृत्ति अखंडदंडायमान । सर्वदा जाण असावी ॥६५॥ देहासी अदृष्टयोगें गती । भूतें अदृष्टयोगें आक्रमिती । भूतीं निजात्मता भाविती । द्वंद्वें न बाधिती साधकां ॥६६॥ येथ भूतीं पृथ्वी पूजिली । नातरी विष्ठामूत्रीं गांजिली । हर्षविषादा नाहीं आली । निश्चळ ठेली निजक्षांती ॥६७॥ भूतें पार्थिवेंचि तंव झालीं । तिंहीं पृथ्वी पूजिली ना गांजिली । ऐक्यें द्वंद्वभावा मुकलीं । निश्चळ झाली निजरूपें ॥६८॥ तैसाचि योगियाही जाणा । भूतवैषम्यें डंडळेना । सर्वभूती निजात्मभावना । विषमीं समाना भावितां ॥६९॥ आतां पृथ्वीची अभिनव शांति । ते सांगेन राया तूजप्रती । जे शांति धरोनि संती । भगवद्भतक्ती पावले ॥३७०॥ पृथ्वी दाहेंकरूनि जाळिली । नांगर घालूनि फाळिली । लातवरीं तूडविली । तोडिली झाडिली पैं भूतीं ॥७१॥ तो अपराधू न मनूनि क्षिती । सवेंचि भूतांतें प्रसन्न होती । तेथेंचि पिकवूनि नाना संपत्ती । तृप्ति देती भूतांतें ॥७२॥ ऐसऐेशिया निजशांती । लागीं गुरु म्यां केली क्षिती । ऐक सभाग्या भूपती । शांतीची स्थिति अभिनव ॥७३॥ एकें अपराधु केला । दूजेनि उगाचि साहिला । इतूकेनि शांतु केवीं झाला । उपेक्षिला अपराधी ॥७४॥ ऊंसु मोडी त्या गोड भारी । छेदितें शस्त्र गोड करी । पिळिलियाआळिलियावरी । स्वादाचिया थोरी अपकार्यांर देतू ॥७५॥ अपराध साहोनि अंगी । त्याच्या प्रवर्ते हितालागीं । तेचि शांति पैं जगीं । होय दाटुगी निर्द्वंद्व ॥७६॥ अपराध साहोनि अंगावरी । अपराध्या होईजे उपकारी । हें शिकलों पृथ्वियेवरी । परोपकारीं पर्वत ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

शश्वत्परार्थसर्वेहः परार्थैकान्तसम्भवः । साधूः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥३८॥

पृथ्वीपासोनि जाले । ते पर्वतही म्यां गुरु केले । त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिलें परियेसीं ॥७८॥ रत्नादि निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत । तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥७९॥ कोणासी नेमी ना निवारी । उबगोनि न घाली बाहेरी । याचकाचे इच्छेवरी । परोपकारीं देतसे ॥३८०॥ ग्रीष्माअंतीं सर्व सरे । परी तो देतां मागें न सरे । सवेंचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥८१॥ जंव जंव उल्हासें दाता देतु । तंव तंव पुरवी जगन्नाथु । विकल्प न धरितां मनाआंतू । देता अच्युतु अनिवार ॥८२॥ सत्य अच्युत दाता । हें न मनेचि तत्त्वतां । यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥८३॥ एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोपकारार्थ एकांतीं । उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४॥ त्या पर्वताऐसी तत्त्वतां । असावी साधकासी उदारता । काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥८५॥ चेष्टामात्रें परोपकारता । सर्वदा करावी समस्तां । कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारीं तत्त्वतां उद्यतु ॥८६॥ परमार्थाचिया चाडा । स्वार्थ सांडोनि रोकडा । परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थें ॥८७॥ उपकारुचि साकारला । कीं परोपकारू रूपा आला । तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥८८॥ ऊंसु जैसा अवधारीं । सर्वासी गोडपणें उपकारी । तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥८९॥ जैसे पर्वतीं निर्झर । तैसे उपकाराचे पाझर । सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥ सांडोनि कृपणवृत्तीची संगती । उपकारी पर्वत एकांतीं । राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥९१॥ परोपकारालागीं निश्चित । गुरु केला म्यां पर्वत । आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥९२॥ सर्वांगें सर्वभावेंसी । सर्वकाळ सर्वदेशीं । पराधीन होआवें सर्वांसी । हें वृक्षापाशीं शिकलों ॥९३॥ वृक्ष जेणें प्रतिपाळिला । तो त्या आधीन झाला । कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥९४॥ योगिया पालखीसी घातला । तेव्हां त्याचिया आधीन झाला । एकीं शूळीं द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥९५॥ सांडूनि देहींची अहंता । योगियासी झाली पराधीनता । विश्वमाझारी आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्ततो बोलात ॥९६॥ सर्वं तें मीचि आहें । यालागीं साधक बाधक न पाहे । त्याच्या बोलामाजीं राहे । वर्तता होये संतोषें ॥९७॥ प्राप्त जें जें सुखदूःख । तें तें अदृष्टाआधीन देख । आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥९८॥ सकळ लोकीं निजात्मता । देखता जाली पराधीनता । हें वृक्षापासोनि तत्त्वतां । परार्थता शिकलों ॥९९॥ आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण । अतिथीचें पूजाविधान । तें सावधन परियेसीं ॥४००॥ अतिथि आल्या वृक्षापासीं । वंचनार्थू न करीच त्यासी । पत्रपुष्पफळमूळच्छायेसीं । त्वचाकाष्ठांसी देतसे ॥१॥ जो वृक्षासी प्रतिपाळी । कां जो घावो घालूनि मुळीं । दोंहीसीही सममेळीं । पुष्पीं फळीं संतूष्टी ॥२॥ जैसा वृक्ष समूळ सगळा । अर्थियांलागीं सार्थक जाहला । तैसा चित्तें वित्तें देहें बोला । साधू संतुष्टला अर्थ्यांसी ॥३॥ अतिथीसी नव्हे पराङ्मुदख । हा साधूसी गुण अलोलिक । अन्न धन उदक । यथासुखें देतसे ॥४॥ अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावें सर्वस्वेंसी । हें शिकलों वृक्षापासीं । विवेकेंसीं निजबुद्धीं ॥५॥ एवं पृथ्वी गुरु जाली ऐसी । दूजें गुरुत्व तें वायूसी । आलें जें जें युक्तीसी । तें तें परियेसीं नरदेवा ॥६॥ गुरुत्व जें वायूसी । तें दों प्रकारीं परियेसीं । एक तें प्राण वृत्तीसीं । बाह्यवायूसी दुसरें ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

प्राणवृत्त्यैव सन्तूष्येन्मुनिर्नैवेन्द्रियप्रियैः । ज्ञानं यथा न नश्येत नावकीर्येत वाङ्मनः ॥३९॥

प्राणाचियेपरी । जो विषयीं आसक्ती न धरी । विषय सेविलियाही वरी । नव्हे अहंकारी प्राणु जैसा ॥८॥ प्राणाभ्यासें क्षुधा अद्भुेत । तेव्हां प्राणासीच क्षोभ येत । तेणें काया वाचा चित्त । विकळ पडत इंद्रियें ॥९॥ तया प्राणासी आधारू । भलतैसा मिळो आहारु । परी धडगोडांचा विचारु । न करी साचारू पैं प्राणु ॥४१०॥ तैसाचि योगिया पाहीं । तो अभिमान न धरी देहीं । विषयो सेवी परी कांही । आसक्ति नाहीं तयासी ॥११॥ क्षुधेचिया तोंडा । मिळे कोंडा अथवा मांडा । परी रसनेचा पांगडा । न करी धडफुडा तयासी ॥१२॥ ज्ञानधारणा न ढळे । इंद्रियें नव्हती विकळें । तैसा आहार युक्तिबळें । सेविजे केवळें निजधैर्यें ॥१३॥ प्राणास्तव इंद्रियें सबळें । प्राणायोंगें देह चळे । त्या देहकर्मा प्राणु नातळे । अलिप्त मेळें वर्ततू ॥१४॥ त्या प्राणाची ऐसी स्थिती । योगियाची वर्तती वृत्ती । सर्व करूनि न करी आसक्ती । देहस्थिति नातळे ॥१५॥ ब्रह्मादिकांचा देह पाळूं । कां सूकरादिकांचा देह टाळूं । ऐसा न मानीच विटाळू । प्राणु कृपाळू समभावें ॥१६॥ तैसेंचि योगियाचें कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म । कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावें ॥१७॥ आवडीं प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो । ऐसा प्राणासी नाहीं भावो । शुद्ध समभावो सर्वत्र ॥१८॥ प्राण अपान समान उदान । सर्व संधी वसे व्यान । इतूकीं नामें स्थानें पावोनि जाण । न सांडी प्राण एकपणा ॥१९॥ तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण । देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडी ॥४२०॥ प्राणु असोनि देहाभीतरीं । बाह्य वायूसी भेद न धरी । तैशी योगिया भावना करी । बाह्यभ्यंतरीं ऐक्यता ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० व ४१ वा

विषयेष्वाविशन्योगी नानाधर्मेषु सर्वतः । गुणदोषव्यपेतात्मा न विषज्जेत वायुवत् ॥४०॥

पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद्गुणाश्रयः । गुणैर्न युज्यते योगी गन्धैर्वायुरिवात्मदृक् ॥४१॥ ऐक्यता साधावी चतुरीं । ते वायूच्या ऐसी दोंहीपरी । बाह्य आणि अंतरीं । ऐक्यकरीं वर्तावें ॥२२॥ प्राणवृत्तीचीं लक्षणे । तूज सांगितलीं संपूर्णें । आतां बाह्य वायूचीं चिन्हें । सावधानें परियेसीं ॥२३॥ वायु सर्वांतें स्पर्शोनि जाये । परी अडकला कोठें न राहे । तैसें विषय सेवितां पाहे । आसक्तु नव्हे योगिया ॥२४॥ असोनि इंद्रियांचेनि मेळें । तो विषयांमाजी जरी खेळे । तरी गुणदोषआसक्तिमेळें । बोधू न मळे तयाचा ॥२५॥ वस्त्र चंदन वनिता माळा । सदा भोगितां विषयसोहळा । वायु नातळे जेवीं जाळा । तेवीं योगी वेगळा विषयांसी ॥२६॥ जैसें वारेनीं जाळ उडे । परी जाळीं वारा नातुडे । तेवीं भोग भोगितां गाढे । भोगीं नातुडे योगिया ॥२७॥ जातया वायूचे भेटी । सुगंध कोटी घालिती मिठी । त्यांची आसक्ती नाहीं पोटीं । उठाउठीं सांडितू ॥२८॥ तैसा आत्मत्वें योगिया पाहीं । प्रवेशलासे सर्वां देहीं । देह गुणाश्रयो पाहीं । ठायींच्या ठायीं तोचि तो ॥२९॥ निजात्मदृष्टीचेनि बळें । तो देहगुणांसी नातळे । जैसा गंधावरी वारा लोळे । परी नाकळे गंधासी ॥४३०॥ तेचि परिपूर्ण आत्मस्थिती । राया मी सांगेन तुजप्रती । जैसी आकाशाची प्रतीती । सर्व पदार्थीं अलिप्त ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

अन्तर्हितश्च स्थिरजङ्गमेषु ब्रह्मात्मभावेन समन्वयेन । व्याप्त्याऽव्यवच्छेदमसङ्गमात्मनो मुनिर्नभस्त्वं विततस्य भावयेत् ॥४२॥

सर्व पदार्थी समत्व । यालागीं आकाशासी गुरुत्व । असंगत्व अभेदत्व । निर्मळत्व जाणोनी ॥३२॥ विषमीं असोनि समत्व । संगीं असोनि असंगत्व । भेदु करितां अभेदत्व । यालागीं गुरुत्व आकाशा ॥३३॥ वैर सर्पामुंगुसांसी । आकाश दोंहीचे हृदयवासी । वैर निर्वैरता आकाशासी । ते स्थिती योगियासी पाहिजे ॥३४॥ तेणें आकाशदृष्टांतें । ब्रह्मभावें आपणियातें । योगी देखिजे पुरतें । व्यापकत्वें आपुल्या ॥३५॥ ब्रह्मसमन्वयें पाहतां पाहीं । स्थावरजंगमांच्या ठायीं । तिळभरी वाढी रिती नाहीं । आपण पैं पाहीं कोंदला ॥३६॥ आकाश सर्व पदार्थीं असे । परी असे हें सर्वासी न दिसे । तेवीं दृश्य द्रष्टा अतीतदशें । सर्वत्र असे योगिया ॥३७॥ नभ न खोंचे सांबळें । जळेना वणव्याचेनि जाळें । नव्हतां ज्वाळांवेगळें । असे सगळें टवटवित ॥३८॥ तैसीं योगियासी द्वंद्वे सकळें । बाधूं न शकतीं कवणे काळें । नव्हतां द्वंद्वावेगळें । स्वरूप सगळें शोभत ॥३९॥ योगिया छेदावया लवलाहें । सोडिले शस्त्रांचे समुदाये । तो शस्त्रांमाजीं आपणियातें पाहे । न रुपती घाये जेवीं गगना ॥४४०॥ जें जें द्वंद्व बाधूं आलें । तें तें स्वरूप देखे आपुलें । सहजें द्वंद्वभावा मुकलें । अबाधित उरलें निजरूप ॥४१॥ गगन बुडालें दिसे डोहीं । परी तें उदकें भिजलेंचि नाहीं । तैसा असोनियां सर्व देहीं । अलिप्त पाहीं योगिया ॥४२॥ आकाशा चिखल माखूं जातां । तें न माखे माखे लाविता । तैसा योगिया दोषी म्हणतां । दोषु सर्वथा म्हणत्यासी ॥४३॥ गगन असोनियां जनीं । मैळेना जनघसणीं । तैसा योगिया सकळ कर्में करूनी । कर्मठपणीं न मैळे ॥४४॥ मोटे बांधितां आकाशातें । चारी पालव पडती रिते । तेवीं कर्मी बांधितां योगियातें । कर्म तेथें निष्कर्म ॥४५॥ घटामाजीं आकाश असे । तें वाच्य कीजे घटाकाशें । पाहतां घटा सबाह्य समरसें । आकाश असे परिपूर्ण ॥४६॥ तैसा आत्मा म्हणती देहीं । तंव तो देहा सबाह्य पाहीं । देह मिथ्यात्वें ठायींचे ठायीं । चिन्मात्र पाहीं परिपूर्ण ॥४७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

तेजोऽबन्नमयैर्भावैर्मेघाद्यैर्वायुनेरितैः । न स्पृश्यते नभस्तद्वत्कालसृष्टैर्गुणैः पुमान् ॥४३॥

नभ पृथ्वीरजें न गदळे । उदकेंकरीं न पघळे । अग्नीचेनि ज्वाळें न जळे । वायुबळें उडेना ॥४८॥ कडकडीत आभाळें । येऊनि आकाश झांकोळे । त्या समस्तां नभ नातळे । अलिप्त बळें संस्थित ॥४९॥ तैसेंचि योगियासी । असतां निजात्मसमरसीं । काळें सृजिलिया गुणांसी । वश्य त्यांसी तो नव्हे ॥४५०॥ काळाचें थोर सामर्थ्य जाण । देहासी आणी जरामरण । योगी देहातीत आपण । जन्ममरण न देखे ॥५१॥ स्वप्नीं चिंतामणी जोडला । सवेंचि अंधकूपीं पडला । जागा जाहल्या न म्हणे नाडला । तैसा घडला देहसंगु ॥५२॥ जो ब्रह्मादि देहांसी खाये । तो काळू वंदी योगियाचे पाये । जो काळाचाही आत्मा होये । निधडा पाहें महाकाळू ॥५३॥ विजू कडकडूनि आकाशीं । तेजें प्रकाशी गगनासी । गगन नातळे ते विजूसी । असोनि तिशीं सबाह्य ॥५४॥ तैसा सत्त्वगुण प्रकाशी ज्ञान । त्यासी योगिया नातळे जाण । ज्ञानस्वरूप निखळ आपण । वृत्तिज्ञान मग नेघे ॥५५॥ जालिया सूर्यउदयासी । दीपप्रभा नये उपेगासी । तेवीं सहज आलिया हातासी । वृत्तिज्ञानासी कोण पुसे ॥५६॥ सत्त्वें प्रकाशिलें ज्ञान । तें आवडोनि नेघे जाण । अथवा खवळल्या रजोगुण । कर्मठपण त्या न ये ॥५७॥ हो कां तमोगुणाचेनि मेळें । क्रोधमोहांसी नातळे । गुणातीत जाला बळें । बोधकल्लोळें स्वानंदें ॥५८॥ उदकासी गुरुपण । आलें तें ऐक लक्षण । अवधूत म्हणे सावधान । नृपंनदना यदुवीरा ॥५९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४४ वा

स्वच्छः प्रकृतितः स्निग्धो माधूर्यस्तीर्थभूर्नृणाम् । मुनिः पुनात्यपां मित्रमीक्षोपस्पर्शकीर्तनैः ॥४४॥

लक्षणें पाहतां जळ । स्वभावें अतिनिर्मळ । प्रकृतीस्तव कोमळ । मधूर केवळ सर्वांसी ॥४६०॥ पवित्र व्हावया प्राणियांसी । तीर्थीं तीर्थत्व उदकासी । इतुकीं लक्षणें योगीयासी । अहर्निशीं असावीं ॥६१॥ उदकीं रिघाले जे समैळ । ते स्वभावें करी निर्मळ । परी न धरी अहंबळ । जे म्यां हे मळ क्षाळिले ॥६२॥ तैसें योगियासी भजनशीळ । भावें भाविक जे केवळ । त्यांचे निरसूनि कळिमळ । न धरी बळ गुरुत्वें ॥६३॥ प्राणु गेला तरी प्राणियांसी । कठिणत्व उपजेना मानसीं । जें जें भेटे तयासी । मृदुता कैसी वर्तत ॥६४॥ जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी । जीवन जैसें कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ॥६५॥ जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ । उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ॥६६॥ उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती । योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाहीं ॥६७॥ उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां । योगियांचें गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ॥६८॥ लागल्या योगियांची गोडी । अमृताची चवी थोडी । ब्रह्मेंद्रादि पदें बापुडीं । अर्धघडीमाजीं करीत ॥६९॥ तापले आले उदकापासी । अंगस्पर्शे निववी त्यांसी । तैसीचि दशा योगियासी । स्पर्शें तापासी निवारी ॥४७०॥ उदकें निवविलें ज्यासी । परतोनि ताप होय त्यासी । योगी कृपेनें स्पर्शें ज्यासी । त्रिविध तापांसीं निर्मुक्त ॥७१॥ योगी ज्यासी निववी जीवेंभावें । त्यासी जीवु गेलियाही तापू नव्हे । निवालेपणें तो वोल्हावे । स्वानुभवें डुल्लत ॥७२॥ मेघमुखें अधःपतन । उदकाचें देखोनि जाण । अधःपाते निवती जन । अन्नदान सकळांसी ॥७३॥ तैसें योगियासी खालतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें । जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्धरी ॥७४॥ पर्जन्योदक देखतां जाण । जेवीं निवती सकळही जन । कां गंगादिकांचें दर्शन । करी मोचन पापाचें ॥७५॥ तैसें योगियाचें दर्शन । भाग्येंवीण नव्हे जाण । ज्याने देखिले त्याचे चरण । करी मोचन भवरोगा ॥७६॥ न घडे दर्शन स्पर्शन । तरी करावें त्याचें नामस्मरण । इतूकेनि भवमूळ जाण । करी छेदन तें नाम ॥७७॥ सांडूनि भगवंताचें कीर्तन । केल्या भक्ताचें नामस्मरण । केवीं तूटेल भवबंधन । ऐसें न म्हणा सर्वथा ॥७८॥ देवासी पूर्वी नामचि नाहीं । त्यासी भक्तीं प्रतिष्ठूनि पाहीं । नामरूपादि सर्वही । नानाविलास अर्पिले ॥७९॥ ऐसा भक्तीं देव थोर केला । आणूनि वैकंठीं बैसविला । भक्तउकपकारें दाटला । मग त्याच्या बोलामाजीं वर्ते ॥४८०॥ देवो भक्तवचनेंकरी । झाला नर ना केसरी । प्रगटला खांबामाझारीं । शब्द करी भक्ताचा ॥८१॥ आतांही प्रत्यक्ष प्रमाण । दासांचेनि वचनें जाण । पाषाणप्रतिमे देवो आपण । आनंदघन प्रगटे पैं ॥८२॥ भक्तभावें आभारला । देवो उपकारें दाटला । यालागीं नुलंघवे बोला । पांगें पांगला भक्तांच्या ॥८३॥ एवं जेथ भक्तांचें नाम घेणें । तेथ अवश्य देवें धांवणें । भक्तउेपकारा उत्तीर्ण होणें । वेगें पावणें यालागीं ॥८४॥ यालागीं भक्ताचें नाम घेतां । तूटती भवबंधनव्यथा । ऐसें सांगतां अवधूता । प्रेम सर्वथा न संडे ॥८५॥ आतां अग्नि गुरु जो करणें । त्याचीं सांगेन लक्षणें । काना मना एक करणें । सावधपणें परियेसीं ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४५ वा

तेजस्वी तपसा दीप्तो दूर्धर्षोदरभाजनः । सर्वभक्षोऽपि युक्तात्मा नादत्ते मलमग्निवत् ॥४५॥

अग्नि निजतेजें देदीप्यमान । साक्षात हातीं न धरवे जाण । उदरमात्रीं सांठवण । सर्व भक्षण निजतेजें ॥८७॥ तैसाचि योगियाही जाण । भगवद्भाणवें देदीप्यमान । त्यासी धरावया आंगवण । नव्हे जाण सुरनरां ॥८८॥ हातीं न धरवे खदिरांगारू । तैसा योगिया अतिदूर्धरू । तयासी न शके आवरूं । मायाव्यवहारु गुणेंसीं ॥८९॥ अग्नीसी जेवीं मुखचि पात्र । तैसें योगियासी उदर मात्र । ठेवा ठेवणें विचित्र । नाहीं पात्र गांठीसी ॥४९०॥ अग्नीनें जें जें सेवणें । तें जाळूनि आपुल्या ऐसें करणें । यापरी सर्वभक्षणें । नाहीं स्पर्शणें मळासी ॥९१॥ चंदन सुवासे दूर्गंधधुरे । निंब कडू ऊंस गोडिरे । तें जाळूनि आकारविकारें । कीजे वैश्वानरें आपणाऐसीं ॥९२॥ तैसा योगी जें अंगीकारी । तें आत्मदृष्टीं निर्धारी । दोष दवडूनियां दूरी । मग स्वीकारी निजबोधें ॥९३॥ भाग्य जें भोगूं जाये । तेथ आत्मप्रतीति पाहे । भोक्ता तद्रूपचि होये । हा भोगु पाहे योगिया ॥९४॥ अग्नींत पडिलें जें समळ । तें अग्निमुखें होय निर्मळ । योगिया जें सेवी अळूमाळ । परम मंगळ तें होय ॥९५॥ अग्निमुखीं यागू घडे । तेणें अदृष्टें स्वर्गभोगु जोडे । योगियाचे मुखीं जें पडे । तेणें जोडे निजपद ॥९६॥ आणिक अग्नीचें चिन्ह । ऐक राया सावधान । तेंचि साधकासी साधन । सिद्ध लक्षण सिद्धाचें ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक ४६ वा

क्वचिच्छन्नः क्वचित्स्पष्ट उपास्यः श्रेय इच्छताम् । भुङ्क्ते सर्वत्र दातृणां दहन्‌ प्रागुत्तराशुभम् ॥४६॥

भीतरीं तेजस्वी वरी झांकिला । होमकुंडीं अग्नि पुरिला । कां यज्ञशाळे प्रज्वळला । याज्ञिकीं केला महायागू ॥९८॥ जो जो उपासका भावो जीवीं । त्या त्या श्रेयातें उपजवीं । पूर्वोत्तर अशुचित्वें आघवीं । जाळूनि हवी सेवितु ॥९९॥ तैशीचि योगियाची लीळा । भाविकां प्रकट दिसे डोळां । एकां गुप्तचि होऊनि ठेला । न दिसे पाहिला सर्वथा ॥५००॥ ऐसियाच्याही ठायीं । भावबळे भाविक पाहीं । अर्चिती जें जें कांहीं । तेणें मोक्ष पाहीं मुमुक्षां ॥१॥ तें पडतांचि योगियांच्या मुखीं । संचित क्रियमाणें असकीं । क्षाळोनियां एकाएकीं । करी सुखी निजपदीं ॥२॥ आणीकही अग्नीचें लक्षण । राया तूज मी सांगेन जाण । जेणें सगुण आणि निर्गुण । दिसे समान समसाम्यें ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ४७ वा

स्वमायया सृष्टमिदं सदसल्लक्षणं विभुः । प्रविष्ट ईयते तत्तत्सरूपोऽग्निरिवैधसि ॥४७॥

अग्नि सहजें निराकार । त्यासी काष्ठानुरूपें आकार । दीर्घ चक्र वर्तुल थोर । नानाकार भासतु ॥४॥ तैसीचि भगवंताची भक्ती । स्वमायाकल्पित कल्पनाकृती । तेथ प्रवेशला सहजस्थितीं । बहुधा व्यक्ती तो भासे ॥५॥ जैसें गंगेचें एक जळ । भासे भंवरे लहरी कल्लोळ । तैसा जगदाकारें अखिळ । भासे सकळ जगदात्मा ॥६॥ कां छायामंडपींच्या चित्रासी । दीपप्रभा भासे जैसी । राम रावण या नांवेंसी । दावी जगासी नटनाट्य ॥७॥ तैशा नानाविधा व्यक्ती । नाना मतें नाना कृती । तेथ प्रवेशोनि श्रीपती । सहजस्थितीं नाचवी ॥८॥ तैशा योगियाची स्थिती । पाहता नानाकार व्यक्ती । आपणियातें देखे समवृत्ती । भेदभ्रांति त्या नाहीं ॥९॥ तेथ जें जें कांहीं पाहे । तें तें आपणचि आहे । या उपपत्ती उभवूनि बाहे । सांगताहे अवधूतु ॥५१०॥ या देहासी जन्म नाशु । आत्मा नित्य अविनाशू । हा दृढ केला विश्वासू । गुरु हिमांशू करूनि ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक ४८ वा

विसर्गाद्याः श्मशानान्ता भावा देहस्य नात्मनः । कलानामिव चन्द्रस्य कालेनाव्यक्तवर्त्मना ॥४८॥

शुक्लकृष्णपक्षपाडी । चंद्रकळांची वाढी मोडी । ते निजचंद्रीं नाहीं वोढी । तैसी रोकडी योगियां ॥१२॥ जन्मनाशादि षड्‌विकार । हे देहासीच साचार । आत्मा अविनाशी निर्विकार । अनंत अपार स्वरूपत्वें ॥१३॥ घटु स्वभावें नाशवंतू असे । त्यामाजीं चंद्रमा बिंबलासे । नश्वरीं अनश्वर दिसे । विकारदोषें लिंपेना ॥१॥ घटासवें चंद्रासी उत्पत्ती । नाहीं नाशासवें नाशप्राप्ती । चंद्रमा आपुले सहजस्थितीं । नाशउीत्पत्तिरहितू ॥१५॥ तैसा योगिया निजरूपपणें । देहासवें नाहीं होणें । देह निमाल्या नाहीं निमणें । अखंडपणें परिपूर्ण ॥१६॥ काळाची अलक्ष्य गती । दाखवी नाश आणि उत्पत्ति । ते काळसत्ता देहाप्रती । आत्मस्थिती नातळे ॥१७॥ एवं काळाचें बळ गाढें । म्हणती ते देहाचिपुढें । पाहतां आत्मस्थितीकडे । काळ बापुडें तेथ नाहीं ॥१८॥ सूक्ष्म काळगती सांगतां । वेगें आठवलें अवधूता । सिंहावलोकनें मागुता । अग्निदृष्टांता सांगतू ॥१९॥


एकनाथी भागवत - श्लोक ४९ वा

कालेन ह्योघवेगेन भूतानां प्रभवाप्ययौ । नित्यावपि न दृश्येते आत्मनोऽग्नेर्यथार्चिषाम् ॥४९॥

काळनदीचा महावेगु । सूक्ष्मगती वाहतां वोघू । तेथ भूततरंगा जन्मभंगु । देखतांचि जगु नेदेखे ॥५२०॥ जराजर्जरित जाण । वाहतां नदीमाजीं वोसण । षड्‌विकार तेचि परिपूर्ण । भंवरे दारुण भंवताति ॥२१॥ बाल्यतारुण्यांचें खळाळ । वार्धक्याचें मंद जळ । जन्ममरणांचे उसाळ । अतिकल्लोळ उठती ॥२२॥ वोघवेगाच्या कडाडी । पडत आयुष्याची दरडी । स्वर्गादि देउळें मोडी । शिखरींचे पाडी सुरेंद्र ॥२३॥ तळीं रिचावितां घोगें । पाताळादि विवरें वेगें । नाशूनियां पन्नगें । अंगभंगें आडिमोडी करी ॥२४॥ ऐशिया जी काळवोघासीं । घडामोडी भूततरंगांसी । होतसे अहर्निशीं । तें कोणासी लक्षेना ॥२५॥ जैं महाप्रळयीं मेघु गडाडी । तैं पूर चढे कडाडी । ब्रह्मादिक तरुवर उपडी । समूळ सशेंडी वाहविले ॥२६॥ जैं आत्यंतिक पूरु चढे । तैं वैकुंठ कैलासही बुडे । तेथ काळा रिगू न घडे । हें अवचट घडे एकदां ॥२७॥ अनिवार काळनदीची गती । सूक्ष्म लक्षेना निश्चितीं । ते सूक्ष्मगतीची स्थिती । अतिनिगुतीं परियेसीं ॥२८॥ दीपु तोचि तो हा म्हणती । परी शिखा क्षणक्षणा जाती । ते लक्षेना सूक्ष्मगती । अंतीं म्हणती विझाला ॥२९॥ प्रत्यक्ष प्रवाहे गंगाजळ । ते काळींचे म्हणती बरळ । तैशी काळगती अकळ । लोक सकळ नेणती ॥५३०॥ प्रत्यक्ष पाहतां देहासी । काळ वयसेतें ग्रासी । बाल्य-कौमारतारुण्यांसी । निकट काळासी न देखती ॥३१॥ अलक्ष्य काळाची काळगती । यालागीं गुरु केला गभस्ती । त्यापासोनि शिकलों स्थिति । तेही नृपति परियेसीं ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक ५० वा

गुणैर्गुणानुपादत्ते यथाकालं विमुञ्चति । न तेषु युज्यते योगी गोभिर्गा इव गोपतिः ॥५०॥

सूर्य काळें निजकिरणीं । रसेंसहित शोषी पाणी । तोचि वर्षाकाळीं वर्षोनी । निववी जनीं सहस्त्रधा ॥३३॥ सर्व शोषूनि घे किरणीं । तें शोषितें लक्षण नेणे कोणी । देतां मेघमुखें वर्षोनी । निववी अवनी जनेंसीं ॥३४॥ तैसीचि योगियाची परीं । अल्प ज्याचें अंगीकारी । त्याचे मनोरथ पूर्ण करी । सहस्त्र प्रकारी हितत्वें ॥३५॥ ज्यासी सेविती योगी आत्माराम । त्यांचे पुरती सकळ काम । अंतीं करोनियां निष्काम । विश्रामधाम आणिती ॥३६॥ एवं योगी आपुले योगबळें । विषयो सेविती इंद्रियमेळें । जे देती त्यांसी यथाकाळें । कृपाबळें निवविती ॥३७॥ त्यांसी विषयो देतां कां घेतां । आसक्ति नाहीं सर्वथा । रसु शोखूनि घेतां देतां । अलिप्त सविता तैसे ते ॥३८॥


एकनाथी भागवत - श्लोक ५१ वा

बुध्यते स्वेन भेदेन व्यक्तिस्थ इव तद्गतः । लक्ष्यते स्थूलमतिभिरात्मा चावस्थितोऽर्कवत् ॥५१॥

सूर्यो थिल्लरामाजीं बिंबला । मूढ म्हणती थिल्लरीं बुडाला । त्याचेनि कंपें कंपु मानिला । डहुळें डहुळला म्हणती तो ॥३९॥ त्या थिल्लरातें नातळतां । गगनीं अलिप्त जेवीं सविता । तैसीच योगियांची योग्यता । देहातीतता देहकर्मीं ॥५४०॥ त्यासी देहबुद्धीचेनि छंदें । म्हणती योगिया देहीं नांदे । त्या देहाचेनि नाना बाधें । स्वबुद्धिभेदें बांधिला म्हणती ॥४१॥ त्यासी देहाचें बाधित भान । हें न कळें त्याचें गुह्यज्ञान । दोराचेनि सापें जाण । डसोनि कोण मारिला ॥४२॥ एवं आत्मा तो चिदाकाशीं । मिथ्या देहीं मिथ्यात्वेंसीं । बिंबोनि दावी देहकर्मासी । नव्हे तें त्यासी बाधक ॥४३॥ देखे आपणातें जळीं बिंबला । परी न म्हणे मी जळीं बुडाला । तैसा देहातीतु बोधू झाला । नाहीं भ्याला देहकर्मा ॥४४॥ देखोनि मृगजळाचा पूरु । मूर्ख करूं धांवती तारूं । तैसा मिथ्या हा संसारू । भयंकरू मूर्खासी ॥४५॥ यालागीं दारागृहपुत्रप्राप्ती । तेथ न करावी अतिप्रीती । येचिविषयीं रायाप्रती । कथा कापोती सांगतु ॥४६॥


एकनाथी भागवत - श्लोक ५२ वा

नातिस्नेहः प्रसङ्गो वा कर्तव्यः क्वापि केनचित् । कुर्वन्विन्देत सन्तापं कपोत इव दीनधीः ॥५२॥

संसारदुःखाचें मूळ । स्त्रीआसक्तीच जाण केवळ । स्त्रीलोभाचें जेथ प्रबळ बळ । दुःख सकळ त्यापासीं ॥४७॥ स्त्रीपासाव झाले पुत्र । त्याचे ठायीं स्नेह विचित्र । करितां दुःखासी पात्र । संसारी नर होताती ॥४८॥ आसक्ति आणि स्नेहसूत्र । या दोन्हीपासाव दुःख विचित्र । पदोपदीं भोगिती नर । अस्वतंत्र होऊनि ॥४९॥ यालागीं भलतेनि भलते ठायीं । आसक्ति स्नेहो न करावा पाहीं । अतिस्नेहो मांडिजे जिंहीं । दुःख तिंही भोगिजे ॥५५०॥ स्नेहदुःखाची वार्ता । कपोताकपोतीची कथा । तूज सांगेन नृपनाथा । स्वस्थचित्ता परियेसीं ॥५१॥


एकनाथी भागवत - श्लोक ५३ वा

कपोतः कश्चनारण्ये कृतनीडो वनस्पतौ । कपोत्या भार्यया सार्धमुवास कतिचित्समाः ॥५३॥

कपोतीचें स्नेह गोड । धरोनी स्त्रीसुखाची चाड । वनीं वृक्ष पाहोनियां गूढ । करी नीड कपोता ॥५२॥ तेणें वनचरें वनस्थळीं । नीडामाजीं स्त्रीमेळीं । वासु केला बहुकाळीं । भार्ये जवळी भूलला ॥५३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५४ वा

कपोतौ स्नेहगुणित हृदयौ गृहधर्मिणौ । दृष्टिं दृष्ट्याङ्गमङ्गेन बुद्धिं बुद्ध्या बबन्धतुः ॥५४॥

कपोता आणि कपोती । परस्परें दोघां अतिप्रीती । स्नेहो वाढलासे चित्तीं । हृदयीं आसक्ती नीच नवी ॥५४॥ हावभाव विलासस्थिती । येरेयेरांकडे पाहती । परस्परें कुरवाळिती । वोढंगिती येरयेरां ॥५५॥ येरयेरां वेगळें होणें । नाहीं जीवें अथवा मनें । दोघें वर्तती एकें प्राणें । खाणें जेवणें एकत्र ॥५६॥


एकनाथी भागवत - श्लोक ५५ वा

शय्यासनाटनस्थानवार्ताक्रीडाशनादिकम् । मिथुनीभूय विस्त्रब्धौ चेरतूर्वनराजिषु ॥५५॥

सेवितां ज्याची अतिगोडी । तें घालिती येरयेरांच्या तोंडीं । जीवेंप्राणें शिणोनी जोडी । तें दे आवडीं स्त्रियेसी ॥५७॥ स्त्रियेसी सांडूनि दूरी । पाऊल न घाली बाहेरी । हात धरोनि परस्परीं । आंतबाहेरी हिंडती ॥५८॥ सदा एकांतां बसती । एके स्थानीं दोघें असती । दोघें क्रीडाविहार करिती । खेळ खेळती विनोदें ॥५९॥ एकांतीं गोड बोली । सासुसासर्यांेचा विकल्पु घाली । दिराभाव्यांच्या मोडी चाली । बोलाच्या भुलीं भुलवित ॥५६०॥ एके आसनीं बैसती । येरयेरांतें टेंकती । एके शय्ये निद्रा करिती । अहोरातीं एकत्र ॥६१॥ मैथुनसुखाचेनि वैभवें । विश्वासोनि जीवेंभावें । हिताहित कांही नाठवे । गृहिणीगौरवें नाचतू ॥६२॥ खेंडकुलिया आराम । त्यामाजीं दोघां समागम । नाममात्रें गृहाश्रम । विषयसंभ्रम वनराजीं ॥६३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५६ वा

यं यं वाञ्छति सा राजंस्तर्पयन्त्यनुकम्पिता । तं तं समानयत्कामं कृच्छ्रेणाप्यजितेन्द्रियः ॥५६॥

जीवितापरीस समर्थ । जे जे मागे ते ते अर्थ । जीवेंप्राणें शिणोनि देत । काममोहित होऊनि ॥६४॥ जाणोनि जीवींचे खुणे । न मागतां अर्थ देणें । त्याहीवरी जरी त्या मागणें । तरी विकूनि देणें आपणियातें ॥६५॥ धर्माची वेळ नाठवणें । दीनावरी दया नेणे । कृपा स्त्रियेवरी करणें । जीवेंप्राणें सर्वस्वें ॥६६॥ बैसली साकरेवरी माशी । मारितांही नुडे जैशी । तैसा भोगितां विषयांसी । जरामरणासी नाठवी ॥६७॥ जैशी पूर्वजांची भाक । पाळिती सत्यवादी लोक । तैसा स्त्रियेचेंचि सुख । पाळी देख सर्वस्वें ॥६८॥ जैसी आत्मउिपासकासी । एकात्मता होये त्यासी । तैसें स्त्रीवांचोनि दृष्टींसी । जगीं आणिकासी न देखे ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ५७ वा

कपोती प्रथमं गर्भं गृह्णन्ती काल आगते । अण्डानि सुषुवे नीडे स्तपत्युः सन्निधौ सती ॥५७॥

आधींचि प्रिया पढियंती । तेही झाली गर्भवती । जैशी लोभ्याचिये हातीं । सांपडे अवचितीं धनलोहे ॥५७०॥ तैसें तिच्या गर्भाचें कोड । अधिकाधिक वाढवी गोड । जैसें मदिरा पिऊनि माकड । नाचे तडतड डुल्लतू ॥७१॥ तैसे गर्भाचे सोहळे । सर्वस्वें पुरवी डोहाळे । तिचे लीळेमाजी खेळे । प्राप्तकाळें प्रसूती ॥७२॥ स्वनीडाआंतौती । जाहली अंडांतें प्रसवती । प्रसूतिवाधावा सांगति । ऐकोनि पति उल्हासे ॥७३॥


एकनाथी भागवत - श्लोक ५८ वा

तेषु काले व्यजायन्त रचितावयवा हरेः । शक्तिभिर्दूर्विभाव्याभिः कोमलाङ्गतनूरुहाः ॥५८॥

अघटित घटी हरीची माया । अलक्ष लक्षेना ब्रह्यया । अवेव अंडामाजीं तया । देवमाया रचियेले ॥७४॥ रसें भरलीं होतीं अंडें । त्यांमाजीं नख पक्ष चांचुवडें । उघडिलीं डोळ्यांचीं कवाडें । करी कोडें हरिमाया ॥७५॥ अंडे उलोनि आपण । कोंवळी पिलीं निघालीं जाण । पितरें दृष्टीं देखोन । जीवेंप्राणें भुललीं ॥७६॥


एकनाथी भागवत - श्लोक ५९ वा

प्रजाः पुपुषतूः प्रीतौ दम्पती पुत्रवत्सलौ । श्रृण्वन्तौ कूजितं तासां निर्वृतौ कलभाषितैः ॥५९॥

अत्यंत कोंवळीं बाळें । दोघें जणें पुत्रवत्सलें । शांतविती मंजुळें । अतिस्नेहाळें प्रजांसी ॥७७॥ जे समयीं जैसें लक्षण । तैसें प्रजांचें पोषण । अंगें करिताति आपण । दोघें जण मिळोनि ॥७८॥ गोड गोजिरे बोल । ऐकोनि दोघां येती डोल । धांवोनियां वेळोवेळ । निंबलोण उतरिती ॥७९॥


एकनाथी भागवत - श्लोक ६० वा

तासां पतत्रैः सुस्पर्शैः कूजितैर्मुग्धचेष्टितैः । प्रत्युद्गरमैरदीनानां पितरौ मुदमापतूः ॥६०॥

त्यांचेनि आलिंगनचुंबनें । मृदू मंजुळ कलभाषणें । दों पक्षांचेनि स्पर्शनें । दोघे जणें निवताति ॥५८०॥ माता पिता दोघें बैसती । सन्मुख अपत्यें धांवती । लोल वक्र वोवंगती । वेगें दाविती येरयेरां ॥८१॥ मग देवोनियां खेवे । दूरी जाती मुग्धभावें । तेथूनि घेऊनियां धांवे । वेगें यावें तयांपासीं ॥८२॥ मायबापांच्या पाखोव्यापासीं । हीनदीनता नाहीं बाळांसी । जे जन्मोनि त्यांचे कुशीं । त्या दोघांसी सभाग्यता ॥८३॥ लाडिकीं लडिवाळ बाळें । लाडेंकोडें पुरविती लळे । देखोनि निवती दिठी डोळे । स्नेह आगळें येरयेरां ॥८४॥ ऐसी खेळतां देखोनि बाळें । दोघें धांवती एक वेळे । उचलूनियां स्नेहबळें । मुख कोवळें चुंबिती ॥८५॥


एकनाथी भागवत - श्लोक ६१ वा

स्नेहानुबद्धहृदयावन्योन्यं विष्णुमायया । विमोहितौ दीनधियौ शिशून् पुपुषतूः प्रजाः ॥६१॥

अजाची जे अजा माया । त्या कैसी भुलवी राया । अन्योन्यस्नेह बांधोनि हृदया । पिलीं पोसावया उद्यत ॥८६॥ स्त्रीपुत्रांचा मोह गहन । त्यांचें करावया पोषण । चिंतातूर अतिदीन । करी भ्रमण अन्नार्थ ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक ६२ वा

एकदा जग्मतूस्तासामन्नार्थं तौ कुटुम्बिनौ । परितः कानने तस्मिन्नर्थिनौ चेरतूश्चिरम् ॥६२॥

एवं टणकीं जालीं बाळें । कुटुंब थोर थोरावलें । अन्न बहुसाल पाहिजे झालें । दोघे विव्हळें गृहधर्मे ॥८८॥ यापरी कुटुंबवत्सलें । पुत्रस्नेहें स्नेहाळें । दोघें जणें एके वेळे । अन्न बहुकाळें अर्थिती ॥८९॥ सहसा मिळेना अन्न । यालागीं हिंडती वनोपवन । बहुसाल श्रमतांही जाण । पूर्ण पोषण मिळेना ॥५९०॥ बहुसाल मेळवूनि चारा । दोघे जणें जाऊं घरा । मग आपुल्या लेंकुरां । नाना उपचारां प्रतिपाळूं ॥९१॥ ऐसऐआसिया वासना । मेळवावया अन्ना । दोघेंजणें नाना स्थानां । वना उपवना हिंडती ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ६३ वा

दृष्ट्वा तान्लुब्धकः कश्चिद्यदृच्छातो वनेचरः । जगृहे जालमातत्य चरतः स्वालयान्तिके ॥६३॥

माता पिता गेलीं दूरी । उडतीं पिलें नीडाभीतरीं । क्षुधेनें पीडिलीं भारी । निघालीं बाहेरी अदृष्टें ॥९३॥ ते वनीं कोणी एक लुब्धक । पक्षिबंधनीं अतिसाधक । तेणें ते कपोतबाळक । अदृष्टें देख देखिले ॥९४॥ तेणें पसरोनियां काळजाळें । पाशीं बांधिलीं तीं बाळें । कपोत-कपोतींचे वेळे । राखत केवळ राहिला ॥९५॥


एकनाथी भागवत - श्लोक ६४ वा

कपोतश्च कपोती च प्रजापोषे सदोत्सुकौ । गतौ पोषणमादाय स्वनीडमुपजग्मतूः ॥६४॥

बाळकांच्या अतिप्रीतीं । कपोता आणि कपोती । चारा घेऊनि येती । नीडाप्रति लवलाहें ॥९६॥ स्त्रीसुखाची आसक्ती । तेचि वाढत्या दुःखाची सूती । स्त्रीसंगें दुःखप्राप्ती । सांगों किती अनिवार ॥९७॥ पुरुषासी द्यावया दुःख । स्त्रीसंगूचि आवश्यक । पुत्रपौत्रद्वारा देख । नानादुःख भोगवी ॥९८॥


एकनाथी भागवत - श्लोक ६५ वा

कपोती स्वात्मजान्वीक्ष्य बालकान् जालसंवृतान् । तानभ्यधावत्क्रोशन्ती क्रोशतो भृशदूःखिता ॥६५॥

तंव काळजाळीं एके वेळें । कपोती बांधली देखे बाळें । तोंड घेऊनि पिटी कपाळें । आक्रोशें लोळें दुःखित ॥९९॥ बाळें चरफडितां देखे जाळीं । आक्रंदोनि दे आरोळी । बाळांसन्मुख धावें वेळोवेळीं । दुःखें तळमळी दुःखित ॥६००॥


एकनाथी भागवत - श्लोक ६६ वा

सासकृत्स्नेहगुणिता दीनचित्ताजमायया । स्वयं चाबध्यत शिचा बद्धान्पश्यन्त्यपस्मृतिः ॥६६॥

दुःख द्यावया भ्रतारासी । आक्रंदें कपोती चालिली कैसी । शतगुणें स्नेहो वाढला तिसी । मृतपुत्रांसी देखोनि ॥१॥ पुत्रस्नेहें केलें वेडें । गुण आठआ्ठवूनि रडे । हिताहित न देखे पुढें । बळेंचि पडे जाळांतु ॥२॥ मायामोहें भुलली कैसी । जेथ बांधलें देखे पुत्रासी । ते जाळीं घाली आपणासी । मोहें पिशी ते केली ॥३॥


एकनाथी भागवत - श्लोक ६७ वा

कपोतः स्वात्मजान्बद्धानात्मनोऽप्यधिकान्प्रियान् । भार्यां चात्मसमां दीनो विललापातिदूःखितः ॥६७॥

अंतरला स्त्रीबाळकीं । कपोता तो एकाएकीं । रुदन करी अधोमुखीं । अतिदुःखीं विलपतु ॥४॥ जीवाहोनि प्रिय अधिके । ती निर्जीव देखिली बाळके । अनुकूल अनुरूपक । भार्या देखे अंतरली ॥५॥


एकनाथी भागवत - श्लोक ६८ वा

अहो मे पश्यतापायमल्पपुण्यस्य दूर्मतेः । अतृप्तस्याकृतार्थस्य गृहस्त्रैवर्गिको हतः ॥६८॥

धर्म अर्थ आणि काम । या तिहींचा आश्रयो गृहाश्रम । तो भंगला मी अनाश्रम । अतृप्त काम सांडूनि ॥६॥ पूर्वपापाचा आवर्तु । मज सांडूनि अकृतार्थु । माझा कामु नव्हतां तृप्तु । धर्मकामार्थु भंगला ॥७॥ गृहीं त्रैवर्गुचि भंगला । चौथा पुरुषार्थ असे उरला । तो साधूनि घेवो वहिला । आश्रमू भंगल्या क्षिती काय ॥८॥ ऐसें म्हणसी जरी निगुतीं । ये अर्थीं मी दुर्मती । विषयवासना नोसंडिती । कैसेनि मुक्ति लाधेल ॥९॥ म्यां पूर्वी अल्प पुण्य होतें केलें । यालागीं अंतरायीं घर घेतलें । माझें परलोकसाधन ठेलें । विधुर केलें मजलागीं ॥६१०॥ हो कां गृहीं असतां गृहस्थां । काय परलोक साधे समस्तां । इतरांची असो कथा । मज साधनता तंव होती ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक ६९ वा

अनुरूपानुकूला च यस्य मे पतिदेवता । शून्ये गृहे मां सन्त्यज्य पुत्रैः स्वर्याति साधूभिः ॥६९॥

स्त्रीपुरुषांची चित्तवृत्ती । अनुकूल वर्ते धर्मप्रवृत्तीं । तरीच परलोक साधिती । इतरां प्राप्ती ते नाहीं ॥१२॥ एकांच्या भार्या त्या तोंडाळा । एकांच्या त्या बहु वोढाळा । एकांच्या त्या अतिचांडाळा । एकी दुःशीला दुर्भगा ॥१३॥ एकीचा तो क्रोध गाढा । एकी अत्यंत खादाडा । एकी सोलिती दांत दाढा । आरिसा पुढां मांडूनि ॥१४॥ एकीं वोंगळा आळसिणी । एकी त्या महाडाकिनी । एकी सुकुमारा विलासिनी । बरवेपणीं गर्वित ॥१५॥ तैसी नव्हे माझी पत्नी । सदा अनुकूळ मजलागुनी । मजसी वर्ते अनुरूपपणीं । धर्मपत्नी धार्मिक ॥१६॥ मी जेव्हां धर्मीं तत्पर । तेव्हां धर्मासी ते अतिसादर । मज कामीं जेव्हां आदर । तेव्हां कामचतुर कामिनी ॥१७॥ मजवांचोनि तत्त्वतां । न भजे आणिकां देवतां । मज सांडूनि न वचे तीर्था । माझें वचन सर्वथा नुल्लंघी ॥१८॥ एवं रूपगुणकुलशील । मजसी सदा अनुकूल । पतिव्रता जे केवळ । पत्नी निर्मळ पैं माझी ॥१९॥ मज सांडूनि शून्यगृहीं । पुत्रेंसहित साध्वी पाहीं । जातसे स्वर्गाच्या ठायीं । मज अपायीं घालूनि ॥६२०॥


एकनाथी भागवत - श्लोक ७० वा

सोऽहं शून्ये गृहे दीनो मृतदारो मृतप्रजः । जिजीविषे किमर्थं वा विधूरो दूःखजीवितः ॥७०॥

नासिली स्त्री नासिल्या प्रजा । येथ म्यां रहावें कवण्या काजा । दुःखें प्राण जाईल माझा । लोकलाजा निंदित ॥२१॥ एवढें अंगीं वाजलें दुःख । काय लौकिकीं दाखवूं मुख । भंगलें संसाराचें सुख । जितां मूर्ख म्हणतील ॥२२॥ जळो विधूराचें जिणें । सदा निंद्य लाजिरवाणें । न ये श्राद्धींचें अवतणें । सदा बसणें एकाएकी ॥२३॥ ऐसेनीं वसतां ये लोकीं । शून्य गृहीं एकाकी । धडगोड न मिळे मुखीं । परम दुःखी मी होईन ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक ७१ वा

तांस्तथैवावृतान्शिग्भिर्मृत्युग्रस्तान्विचेष्टतः । स्वयं च कृपणः शिक्षु पश्यन्नप्यबुधोऽपतत् ॥७१॥

ऐसें बोलोनि केलें काये । मृतस्त्रीपुत्रांकडे पाहे । काळपाशीं बांधिली आहे । चेष्टा राहे निःशेष ॥२५॥ ऐसें देखतांही अबुद्धी । विवेकें न धरीचि बुद्धी । आपण जाऊनि त्रिशुद्धी । जाळामधीं पडियेला ॥२६॥ मेल्या मागें मरणें । देखों हेंचि सर्वांसी करणें । परी जन्ममृत्यु निवारणें । हा स्वार्थु कवणें न धरिजे ॥२७॥ पहा पां स्त्रीपुत्राकारणें । आपुलाही जीवू देणें । परी भगवत्पदवी साधणें । हें न मने मनें सर्वथा ॥२८॥


एकनाथी भागवत - श्लोक ७२ वा

तं लब्ध्वा लुब्धकः क्रूरः कपोतं गृहमेधिनम् । कपोतकान्कपोतीं च सिद्धार्थः प्रययौ गृहम् ॥७२॥

जाळीं पडला कपोता दुर्बुद्धी । झाली लुब्धकाची कार्यसिद्धी । सहकुटुंब घेऊनि खांदीं । निघे पारधी निजस्थाना ॥२९॥ ऐसा जो कोणी गृहमेधी । त्यासी सर्वथा काळ साधी । जैशी कपोत्याची बुद्धी । तैसी सिद्धी गृहमेध्या ॥६३०॥ बाळकांच्या काकुळतीं । मरण पावली कपोती । ऐसें देखत देखतां दुर्मती । तेथ निश्चितीं उडी घाली ॥३१॥ यापरी तो कपोता । कुटुंबाची मेधा वाहतां । मरण पावला सर्वथा । विवेकु चित्ता न धरीचि ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक ७३ वा

एवं कुटुम्ब्यशान्तात्मा द्वन्द्वारामः पतत्रिवत् । पुष्णन्कुटुम्बं कृपणः सानुबन्धोऽवसीदति ॥७३॥

ऐसा कुटुंबी गृहस्थु । कुटुंबपोषणीं आसक्तु । विषयवासना अशांतु । पावे घातु सकुटुंब ॥३३॥ गृहासक्ती गृहाश्रमु । तो केवळ द्वंद्वाचा आरामु । कपोत्या ऐसा पडे भ्रमु । वृथा जन्मु दवडावा ॥३४॥


एकनाथी भागवत - श्लोक ७४ वा

यः प्राप्य मानुषं लोकं मुक्तिद्वारमपावृतम् । गृहेषु खगवत्सक्तस्तमारूढच्युतं विदूः ॥ ७४ ॥

इति श्रीमद्भामगवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे सप्तमोऽध्यायः ॥७॥

येवोनियां कर्मभूमीसी । जो पावला उत्तम देहासी । त्याहीमाजीं उत्तमता कैशी । अग्रवर्णासी पैं जन्म ॥३५॥ आलिया मनुष्यदेहासी । मुक्तीचा दारवंटा मुक्त त्यासी । लव निमिष सर्व दिशीं । यावज्जन्मेंसीं मोकळा ॥३६॥ इतरां वर्णांची हे गती । मा ब्राह्मण तरी पुण्यमूर्ती । ते सदा मुक्तचि असती । वृथा आसक्तीं गुंतले ॥३७॥ विद्वांस आणि वैराग्य । तें ब्रह्मादिकां न लभे भाग्य । वृथा आसक्तीं केले अभाग्य । शिश्नोदरा सांग वेंचले ॥३८॥ मनुष्यदेहीं गृहासक्तू । तो बोलिजे आरूढच्युतु । कपोत्याचे परी दुःखितु । सिद्ध स्वार्थु नासिला ॥३९॥ विषयीं सर्वथा नाहीं तृप्ति । ऐसें श्रुतिपुराणें बोलती । करितां विषयाची आसक्ती । थित्या मुकती नरदेहा ॥६४०॥ नवल नरदेहाची ख्याती । रामनामाच्या आवृत्तीं । चारी मुक्ती दासी होती । तो देहो वेंचिती विषयासी ॥४१॥ विषयसुखाचिये आसक्ती । कोणा नाहीं झाली तृप्ती । मृगजळाचिये प्राप्ती । केवीं निवती तृषार्त ॥४२॥ यालागीं जाणतेनि मनुष्यें । नरदेहींचेनि आयुष्यें । विषयांचेनि सायासें । व्यर्थ कां पिसे कष्टती ॥४३॥ नरदेहाऐसें निधान । अनायासें लाधलें जाण । सांडीं सांडीं अभिमान । तेणें समाधान पावसी ॥४४॥ पुढती नरदेहाची प्राप्ती । होईल येथ नाहीं युक्ति । यालागीं सांडूनि विषयासक्ती । भावें श्रीपति भजावा ॥४५॥ कलियुगीं सुगम साधन । न लगे योग याग त्याग दान । करितां निर्लज्ज हरिकीर्तन । चारी मुक्ति चरण वंदिती ॥४६॥ इटेसाठीं परीस पालटे । येतां कां मानिती वोखटें । तैसा कीर्तनाचेनि नेटेंपाटें । देवो भेटे प्रत्यक्ष ॥४७॥ एका जनार्दनु म्हणे । नश्वर देहाचेनि साधनें । जनीं जनार्दनु होणें । हे मुद्रा तेणें लाविली ॥४८॥ एका जनार्दना शरण । तंव जनार्दनु जाला एक एकपण । जैसें सुवर्ण आणि कंकण । दों नांवीं जाण एक तें ॥४९॥ तोचि एका एकादशीं । श्रीकृष्ण सांगे उद्धवासी । अवधूत सांगे यदूसी । गुरूपदेशीं उपदेशु ॥६५०॥

इति श्रीमद्भादगवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे यद्ववधूतेतिहासे एकाकारटीकायां सप्तमोऽध्यायः ॥७॥ श्रीकृष्णार्पणमस्तू ॥ मूळश्लोक ॥७४॥ ओव्या ॥६५०॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]