Jump to content

एकनाथी भागवत/अध्याय आठवा

विकिस्रोत कडून

<poem> एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥ ॐ नमो सद्गुनरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचें घटित पाहसी । चिद्ब्रदह्मेंसी लग्न लाविशी । ॐ पुण्येंसी तत्त्वतां ॥१॥ वधूवरां लग्न लाविती । हें देखिलें असे बहुतीं । आपुली आपण लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥ लग्न लाविती हातवटी । पांचां पंचकांची आटाटी । चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका प्रतिष्ठी निजबोधें ॥३॥ चहूं पुरुषार्थांचें तेलवण । लाडू वळिले संपूर्ण । अहंभावाचें निंबलोण । केलें जाण सर्वस्वें ॥४॥ साधनचतुष्ट्याचा सम्यक । यथोक्त देऊन मधुपर्क । जीवभावाची मूद देख । एकाएक सांडविली ॥५॥ विषयसुख मागें सांडे । तेंचि पायातळीं पायमांडे । सावधान म्हणसी दोंहीकडे । वचन धडफुडें तें तुझें ॥६॥ व्यवधानाचें विधान तुटे । सहजभावें अंत्रपटु फिटे । शब्द उपरमोनि खुंटे । मुहूर्त गोमटे पैं तुझें ॥७॥ अर्धमात्रा समदृष्टी । निजबिंबीं पडे गांठी । ऐक्यभावाच्या मीनल्या मुष्टी । लग्नकसवटी अनुपम ॥८॥ तेथ काळा ना धवळा । गोरा नव्हे ना सांवळा । नोवरा लक्षेना डोळां । लग्नसोहळा ते ठायीं ॥९॥ परी नवल कैसें कवतिक । दुजेनवीण एकाएक । एकपणीं लग्न देख । लाविता तूं निःशेख गुरुराया ॥१०॥ तुज गुरुत्वें नमूं जातां । तंव आत्मा तूंचि आंतौता । आंतु कीं बाहेर पाहों जातां । सर्वीं सर्वथा तूंचि तुं ॥११॥ तुझें तूंपण पाहतां । माझें मीपण गेलें तत्त्वतां । ऐसें करूनियां गुरुनाथा । ग्रंथकथा करविसी ॥१२॥ मागील कथासंगती । सप्तमाध्यायाचे अंतीं । अवधूतें यदूप्रती । कथा कापोती सांगीतली ॥१३॥ पृथ्वी-आदिअंतीं चोखट । कपोतापर्यंत गुरु आठ । सांगीतले अतिश्रेष्ठ । गुरु वरिष्ठ निजबोधें ॥१४॥ उरल्या गुरूंची स्थिती । अवधूत सांगेल यदूप्रती । तेथें सावधान ठेवा चित्तवृत्ती । श्रवणें स्थिति तद्बो धें ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक १ ला

श्रीब्राह्मण उवाच । सुखमैन्द्रियकं राजन् स्वर्गे नरक एव च । देहिनां यद्यथा दुःखं तस्मान्नेच्छेत तद् बुधः ॥१॥

श्रवणीं सादरता यदूसी । देखोनि सुख जालें ब्राह्मणासी । तेणें सुखें निरूपणासी । उल्हासेंसी करीतसे ॥१६॥ तो म्हणे राया सावधान । विषयसुखाचें जें सेवन । तें स्वर्गनरकीं गा समान । नाहीं अनमान ये अर्थी ॥१७॥ भोगितां उर्वशीसी । जें सुख स्वर्गीं इंद्रासी । तेंचि विष्ठेमाजीं सूकरासी । सूकरीपासीं निश्चित ॥१८॥ हें जाणोनि साधुजन । उभय भोगीं न घालिती मन । नेदवे प्रेतासी आलिंगन । तेवीं साधुजन विषयांसी ॥१९॥ जीत सापु धरावा हातीं । हें प्राणियांसी नुपजे चित्तीं । तेवीं विषयांची आसक्ती । साधु न धरिती सर्वथा ॥२०॥ जैसें न प्रार्थितां दुःख । प्राणी पावताति देख । तैसें न इच्छितां इंद्रियसुख । भोगवी आवश्यक अदृष्ट ॥२१॥ मज दुःखभोगु व्हावा । हें नावडे कोणाच्या जीवा । तें दुःख आणी अदृष्ट तेव्हां । तेवीं सुखाचा यावा अदृष्टें ॥२२॥ ऐसें असोनि उद्योगु करितां । तेणें आयुष्य नाशिलें सर्वथा । यालागीं सांडूनि विषयआस्था । परमार्था भजावें ॥२३॥ केवळ झालिया परमार्थपर । म्हणसी आहारेंवीण न राहे शरीर । येच निर्धारीं साचार । गुरु 'अजगर' म्यां केला ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक २ रा

ग्रासं सुमृष्टं विरसं महान्तं स्तोकमेव वा । यदृच्छयैवापतितं ग्रसेदाजगरोऽक्रियः ॥२॥

उद्योगेंवीण आहारु । अयाचित सेवी अजगरु । डंडळोनि न सांडी धीरु । निधडा निर्धारु पैं त्याचा ॥२५॥ स्वभावें तो मुख पसरी । सहजें पडे जें भीतरीं । सरस नीरस विचारु न करी । आहार अंगीकारी संतोषें ॥२६॥ तैसीचि योगियांची गती । सदा भाविती आत्मस्थिती । यदृच्छा आलें तें सेवती । रसआसक्ती सांडूनि ॥२७॥ योगियांचा आहारु घेणें । काय सेविलें हें रसना नेणे । रसना-पंगिस्त नाहीं होणें । आहारु सेवणें निजबोधें ॥२८॥ आंबट तिखट तरी जाणे । परी एके स्वादें अवघें खाणें । सरस नीरस कांहीं न म्हणे । गोड करणें निजगोडियें ॥२९॥ मुख पसरिलिया निर्धारा । स्वभावें रिघालिया वारा । तोचि आहारु पैं अजगरा । तेणेंचि शरीरा पोषण ॥३०॥ तैशीच योगियांची स्थिति । वाताशनें सुखें वर्तती । आहारालागुनी पुढिलांप्रती । न ये काकुलती सर्वथा ॥३१॥ थोडें बहु सरसनिरसासी । हें कांहीं म्हणणें नाहीं त्यासी । स्वभावें जें आलें मुखासी । तें सावकाशीं सेवितु ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३ रा

शयीताहानि भूरीणि निराहारोऽनुपक्रमः । यदि नोपनमेद्ग्रासो महाहिरिव दिष्टभुक् ॥३॥

अजगरासी बहु काळें । यदृच्छा आहारु न मिळे । तरी धारणेसी न टळे । पडिला लोळे निजस्थानीं ॥३३॥ तैसें योगियासी अन्न । बहुकाळें न मिळे जाण । तरी करूनियां लंबासन । निद्रेंविण निजतु ॥३४॥ निद्रा नाहीं तयासी । परी निजे निजीं अहर्निशीं । बाह्य न करी उपायासी । भक्ष्य देहासी अदृष्टें ॥३५॥ अदृष्टीं असेल जें जें वेळें । तें तें मिळेल तेणें काळें । यालागीं त्याचें ज्ञान न मैळे । धारणा न ढळें निजबोधें ॥३६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४ था

ओजःसहोबलयुतं बिभ्रद् देहमकर्मकम् । शयानो वीतनिद्रश्च नेहेतेन्द्रियवानपि ॥४॥

अजगरासी बळ उदंड । देहो पराक्रमें प्रचंड । परी न करी उद्योगाचें बंड । पसरूनि तोंड पडिलासे ॥३७॥ तैसाचि योगिया केवळ । शरीरीं असे शारीर बळ । बुद्धिही असे अतिकुशळ । इंद्रियबळ पटुतर ॥३८॥ आहारालागीं सर्वथा । हेतु स्फुरों नेदी चित्ता । कायावाचा तत्वतां । नेदी स्वभावतां डंडळूं ॥३९॥ स्वप्नजागृती मुकला । सुषुप्ती सांडोनि निजेला । शून्याचा पासोडा झाडिला । निजीं पहुडला निजत्वें ॥४०॥


एकनाथी भागवत - श्लोक ५ वा

मुनिः प्रसन्नगम्भीरो दुर्विगाह्यो दुरत्ययः । अनन्तपारो ह्यक्षोभ्यस्तिमितोद इवार्णवः ॥५॥

'समुद्र' जो गुरु करणें । त्याचीं परिस पां लक्षणें । गंभीरत्व पूर्णपणें । निर्मळ असणें इत्यादि ॥४१॥ समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा पसन्नवदन । केव्हाही धुसमुशिलेपण । नव्हेजाण निजबोंधें ॥४२॥ मीनल्या सरितांचें समळ जळ । समुद्र डहुळेनी अतिनिर्मळ । तैसीं नाना कर्में करितां सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥ जळें गंभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर । वेळा नुल्लंघी सागर । नुल्लंघी योगीश्वर गुरुआज्ञा ॥४४॥ समुद्रीं न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळकल्लोळेंसी । योगिया बुडवी संसारासी । भावें त्यापासीं गेलिया ॥४५॥ रिगतीमागी जाणें जळीं । तो समुद्रीं करी आंघोळी । येरांसी लाटांच्या कल्लोळीं । कासाकुळी करीतसे ॥४६॥ तैसीचि योगियासी । सलगी न करवे भलतियासी । आपभयें भीती आपैसी । तो भाविकांसी सुसेव्य ॥४७॥ जाहल्या धनवंतु वेव्हारा । उपायीं नुल्लंघे सागरा । तैसें नुल्लंघवे योगीश्वरा । नृपां सुरनरां किन्नरां ॥४८॥ मळु न राहे सागरीं । लाटांसरिसा टाकी दुरी । तैसाचि मळु योगियाभीतरीं । ध्यानें निर्धारीं न राहे ॥४९॥ समुद्रीं मीनली ताम्रपर्णी । तेथ जाहली मुक्ताफळांची खाणी । योगिया मिनली श्रद्धा येऊनि । तेथ मुक्तखाणी मुमुक्षां ॥५०॥ जो समुद्रामाजीं रिघोनि राहे । तो नानापरीचीं रत्ने लाहे । योगियांमाजीं जो सामाये । त्याचे वंदिती पाये चिद्र त्नें ॥५१॥ जैशी समुद्राची मर्यादा । कोणासी न करवे कदा । तैशी योगियांची मर्यादा । शास्त्रां वेदां न करवे ॥५२॥ प्रवाहेंवीण जळ । समुद्रीं जेवीं निश्चळ । मृत्युभयेंवीण अचंचळ । असे केवळ योगिया ॥५३॥ समुद्रीं प्रवाहो नव्हे कहीं । सदा पूर्ण ठायींच्या ठायीं । तैसे योगिया जन्ममरण नाहीं । परिपूर्ण पाहीं सर्वदा ॥५४॥ समुद्रलक्षणें साधितां । अधिक दशा आली हातां । ते योगियाची योग्यता । परिस तत्त्वतां सांगेन ॥५५॥ समुद्रामाजीं जळ । लाटांखालीं अतिचंचळ । योगिया अंतरी अतिनिश्चळ । नाहीं तळमळ कल्पना ॥५६॥ समुद्र क्षोभे वेळोवेळे । योगिया क्षोभेना कवणें काळें । सर्वथा योगी नुचंबळें । योगबळें सावधु ॥५७॥ समुद्रीं भरतें पर्वसंबंधें । योगिया परिपूर्ण सदानंदें । समुद्रीं चढूवोहटू चांदें । योगिया निजबोधें सदा सम ॥५८॥ समुद्र सर्वांप्रति क्षार । तैसा नव्हे योगीश्वर । तो सर्वां जीवांसी मधुर । बोधु साचार पैं त्याचा ॥५९॥ जयासी बोधु नाहीं पुरता । अनुभव नेणे निजात्मता । त्यासी कैंची मधुरता । जेवीं अपक्वता सेंदेची ॥६०॥ सागरीं वरुषल्या घन । वृथा जायें तें जीवन । तैसा योगिया नव्हे जाण । सेविल्या व्यर्थपण येवों नेदी ॥६१॥ अल्पही योगिया होये घेता । तेणें निवारी भवव्यथा । यालागीं मुमुक्षीं सर्वथा । भगवद्भिक्तां भजावें ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक ६ वा

समृद्धकामो हीनो वा नारायणपरो मुनिः । नोत्सर्पेत न शुष्येत सरिद्‌भिरिव सागरः ॥६॥ वर्षाकाळीं सरिता सकळ । घेऊनि आल्या अमूप जळ । तेणें हरुषेजेना प्रबळ । न चढे जळ जळाब्धीं ॥६३॥ ग्रीष्मकाळाचिये प्राप्ती । सरितांचे यावे राहती । ते मानूनियां खंती । अपांपती वोहटेना ॥६४॥ तैसेंचि योगियांच्या ठायीं । नाना समृध्दि आलिया पाहीं । अहंता न धरी देहीं । गर्वु कांहीं चढेना ॥६५॥ समृध्दि वेंचिलिया पाठीं । खंती नाहीं योगिया पोटीं । तो नारायणपरदृष्टीं । सुखसंतुष्टी वर्ततू ॥६६॥ संपत्तीमाजीं असतां । मी संपन्नु हें नाठवे चित्ता । दरिद्र आलिया दरिद्रता । नेणे सर्वथा योगिया ॥६७॥ दरिद्र आणि संपन्नता । दोन्ही समान त्याचिया चित्ता । नाहीं प्रपंचाची आसक्तता । नारायणपर तत्त्वतां निजबोधें ॥६८॥ या प्रपंचाचा कठिण लागु । नाशासी मूळ स्त्रीसंगु । येचिविषी गुरु पतंगू । केला चांगु परियेसीं ॥६९॥


एकनाथी भागवत - श्लोक ७ वा

दृष्ट्वा स्त्रियं देवमायां तद्भा-वैरजितेन्द्रियः । प्रलोभितः पतत्यन्धे तमस्यग्नौ पतङ्गवत् ॥७॥

दैवी गुणमयी जे माया । तिचें सगुणस्वरूप त्या स्त्रिया । तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥७०॥ हावभावविलासगुणीं । व्यंकट कटाक्षांच्या बाणीं । पुरुषधैर्य कवच भेदोनि । हृदयभवनीं संचरती ॥७१॥ दारुण कटाक्षांच्या घायीं । पुरुषधैर्य पाडिलें ठायीं । योषिताबंदीं पाडिले नाहीं । भोगकारागृहीं घातले ॥७२॥ स्त्रीभोगाचें जें सुख । तें जाण पां केवळ दुःख । तोंडीं घालितां मधुर विख । परिपाकीं देख प्राणांतू ॥७३॥ दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा । बळें आलिगूं जातां पैं गा । मरणमार्गा लागले ॥७४॥ पुढिला पतंग निमाला देखती । तरी मागिल्या दीपीं अतिआसक्ती । तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एकां अतिप्रीती पंतगन्यायें ॥७५॥ तेवीं विवेकहीन मूर्खा । लोलुप्य उपजे स्त्रीसुखा । तत्संसर्गें मरण लोकां । न चुके देखा सर्वथा ॥७६॥ दीप-रूपाचेनि कोडें । पतंग जळोनि स्नेहीं बुडे । तेवीं स्त्रीसंगे अवश्य घडे । पतन रोकडें अंधतमीं ॥७७॥


एकनाथी भागवत - श्लोक ८ वा

योषिद्धिरण्याभरणाम्बरादि द्रव्येषु मायारचितेषु मूढः । प्रलोभितात्मा ह्युपभोगबुद्ध्या पतङ्गवन्नश्यति नष्टदृष्टिः ॥८॥

पहा पां कांता आणि सोनें । वस्त्रें आभरणें रत्नेष । मायेनें रचिलीं पडणें । पतनाकारणें जनांच्या ॥७८॥ एकली योषिता नरकीं घाली । सुवर्णलोभे नरकु बळी । रत्नेंो भूषणें तत्काळीं । नरकमेळीं घालिती ॥७९॥ ते अवघेचि अनर्थकारी । मीनले योषिताशरीरीं । ते देखतांचि पुरंध्री । जनांसी उरी मग कैंचेनि ॥८०॥ अंगीं वेताळसंचारा । त्यावरी पाजिलिया मदिरा । मग डुल्लत नाचतां त्या नरा । वोढावारा पैं नाहीं ॥८१॥ कां भांडाचे तोंडीं भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण । मग करितां वाग्विटंबन । आवरी कोण तयासी ॥८२॥ हो कां मोहक मदिरा सर्वांसी । त्यांतु घातलें उन्मादद्रव्यासी । सेवन करितां त्या रसासी । पारु भ्रमासी पैं नाहीं ॥८३॥ तैसें सोलीव मोहाचें रूप । तें जाण योषितास्वरूप । त्याहीवरी खटाटोप । वस्त्रें पडप भूषणें ॥८४॥ काजळ कुंकूं अलंकार । लेऊनि विचित्र पाटांबर । वनिता शोभित सुंदर । मायेचे विकार विकारले ॥८५॥ माया अजितेंद्रिया बाधी । दासांसंमुख नव्हे त्रिशुद्धी । ज्याची अतिप्रीति गोविंदीं । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥ कैसा रीतीं रक्षी भक्त । मूळीं आत्मा आत्मी नाहीं तेथ । स्त्रीरूपें भासे भगवंत । भक्त रक्षित निजबोधें ॥८७॥ वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी । प्रलोभें उपभोगा देती मिठी । ते दुःखकोटी भोगिती ॥८८॥ देखोनि दीपरूपीं झगमगी । उपभोगबुद्धि पतंगी । उडी घालितां वेगीं । जळोनि आगीं नासती ॥८९॥ एवं योषितारूपें माया । उपभोग भुलवी प्राणियां । जे विमुख हरीच्या पायां । त्यांसीच माया भुलवितु ॥९०॥ मधुकरीचेनि विंदाणें । मधुकर म्यां गुरु करणें । दुःख नेदितां कार्य साधणें । तींहि लक्षणें परिस पां ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक ९ वा

स्तोकं स्तोकं ग्रसेद् ग्रासं देहो वर्तेत यावता । गृहानहिंसन्नातिष्ठेद् वृत्तिं माधुकरीं मुनिः ॥९॥

भ्रमरु रिघोनि पुष्पामधीं । फुल तरी कुचुंबों नेदी । आपुली करी अर्थसिद्धी । चोखट बुद्धि भ्रमराची ॥९२॥ तैसेच योगियाची परी । ग्रासमात्र घरोघरीं । भिक्षा करूनि उदर भरी । पीडा न करी गृहस्थां ॥९३॥ प्राणधारणेपुरतें । योगी मागे भिक्षेतें । समर्थ दुर्बळ विभागातें । न मनूनि चित्तें सर्वथा ॥९४॥ रिघोनि कमळिणीपाशीं । भ्रमरु लोभला आमोदासी । पद्म संकोचे अस्तासी । तेंचि भ्रमरासी बंधन ॥९५॥ जो कोरडें काष्ठ भेदोनि जाये । तो कमळदळीं गुंतला ठाये । प्रिया दुखवेल म्हणौनि राहे । निर्गमु न पाहे आपुला ॥९६॥ तैसाचि जाण संन्यासी । एके ठायीं राहिल्या लोलुप्येंसीं । तेंचि बंधन होये त्यासी । विषयलोभासी गुंतला ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक १० वा

अणुभ्यश्च महद्भ्य-श्च शास्त्रेभ्यः कुशलो नरः । सर्वतः सारमादद्यात् पुष्पेभ्य इव षट्पदः ॥१०॥

अतिलहान सुमन जें कांहीं । भ्रमरा तेथ उपेक्षा नाहीं । रिघोनि त्याच्याही ठायीं । आमोद पाहीं सेवितु ॥९८॥ थोराथोरा ज्या कमळिणी । विकासल्या समर्थपणीं । त्यांच्याही ठायीं रिघोनी । सारांश सेवुनी जातसे ॥९९॥ तैसाचि योगिया नेटकु । शास्त्रदृष्टी अतिविवेकु । न करी लहान थोर तर्कु । सारग्राहकू होतसे ॥१००॥ वेदांतीं ब्रह्मस्थिती । बोलिली मानी यथानिगुतीं । इतर स्तोत्रीं ब्रह्मव्युत्पत्ती । तेही अतिप्रीतीं मानितू ॥१॥ पंडितांचें वचन मानी । साधारणु बोलिला हितवचनीं । तेहीं अतिआदरें मानुनी । सार निवडूनि घेतसे ॥२॥ प्रीती होआवी पतीच्या मानसीं । कुळवधू मानी सासुसासर्यांंसी । मान देतसे त्यांच्या दासासी । तेचि प्रीतीसी लक्षूनि ॥३॥ भेसळल्या क्षीरनीरासी । निवडुनि घेईजे राजहंसीं । तैसा विवेकयुक्त मानसीं । सारभागासी घेतसे ॥४॥ सर्वभूतीं भगवद्भाावो । हा सारभागु मुख्य पहा हो । हे निष्ठा ज्यासि महाबाहो । त्यासी अपावो स्वप्नीं नाहीं ॥५॥ भरलेया जगाआंतु । सारभागी तो योगयुक्तु । यदूसि अवधूत सांगतु । गुरुवृत्तांसु लक्षणें ॥६॥ गुरुत्वें म्यां मानिली माशी । ऐके राया दो प्रकारेंसी । एक ते मोहळमासी । ग्रामवासी दूसरी ॥७॥


एकनाथी भागवत - श्लोक ११ वा

सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षितम् । पाणिपात्रोदरामत्रो मक्षिकेव न सङ्ग्रही ॥११॥

पहा पां घरींची माशी । बैसल्या साखरेचे राशीं । हातीं धरोनि घाली मुखाशी । संग्रहो तिसी पैं नाहीं ॥८॥ हे होईल सायंकाळा । हे भक्षीन प्रातःकाळां । ऐसा संग्रहो वेगळा । नाहीं केला मक्षिका ॥९॥ तैशी योगसंन्यासगती । प्राप्तभिक्षा घेऊनि हातीं । तिसी निक्षेपु मुखाप्रती । संग्रहस्थिति त्या नाहीं ॥११०॥ भिक्षेलागीं पाणिपात्र । सांठवण उदरमात्र । या वेगळें स्वतंत्र । नाहीं घरपात्र सांठवणें ॥११॥


एकनाथी भागवत - श्लोक १२ वा

सायन्तनं श्वस्तनं वा न सङ्गृह्णीत भिक्षुकः । मक्षिका इव सङ्गृह्णन् सह तेन विनश्यति ॥१२॥

सायंकाळ-प्रातःकाळासी । भक्ष्यसंग्रहो नसावा भिक्षूसी । संग्रहें पावती नाशासी । येविषीं मधुमाशी गुरु केली ॥१२॥ रिघोनि नाना संकटस्थानांसी । मधुसंग्रहो करी मधुमाशी । तो संग्रहोचि करी धातासी । मधु न्यावयासी जैं येती ॥१३॥ संग्रहो यत्नाचिया चाडा । मोहळ बांधिती अवघडां कडां । ते दुर्गमीं रिगु करिती गाढा । अर्थचाडा मधुहर्ते ॥१४॥ कां झाडितां मोहळासी । नाशु होतसे मसियांसी । संग्रहाची जाती ऐशी । जीवाघातासी करवितु ॥१५॥ ऐसें देखोनिया जनीं । भक्तभिक्षुकयोगीसज्जनीं । संग्रहो न करावा भरंवसेनी । नाशु निदानीं दिसतसे ॥१६॥ आचारावें सत्कर्म । संग्रहावा शुद्ध धर्म । हेंचि नेणोनियां वर्म । धनकामें अधम नाशती ॥१७॥ अर्थ विनाशाचें फळ । दुसरें एक नाशाचें मूळ । विशेष नाशाचें आहळबाहळ । स्त्री केवळ वोळख पां ॥१८॥ मूळ नाशासि जीविता । कनक आणि योषिता । जंव जंव यांची आसक्तता । तंव तंव चढता भवरोगु ॥१९॥ कनक आणि कामिनी । ज्यासी नावडे मनींहुनी । तोचि जनार्दनू जनीं । भरंवसेंनी ओळख पां ॥१२०॥ जो सुख इच्छील आपणासी । तेणें नातळावें स्त्रियेसी । येचिविषयीं मदगजासी । गुरु विशेषीं म्यां केला ॥२१॥


एकनाथी भागवत - श्लोक १३ वा

पदापि युवतीं भिक्षुर्न स्पृशेद् दारवीमपि । स्पृशन् करीव बध्येत करिण्या अङ्गसङ्गतः ॥१३॥

पहा पां षष्टिहायन भद्रजाती । त्यांपुढें मनुष्य तें किंती । ते हस्तिणीचे अंगसंगतीं । बंधन पावती मनुजांचें ॥२२॥ जो दृष्टीं नाणी मनुष्यांसी । तो स्त्रियां वश केला मानवांसी । त्यांचेनि बोलें उठी बैसी । माथां अंकुशीं मारिजे ॥२३॥ एवं जिणावया संसारासी । जे स्वधर्मनिष्ठ संन्यासी । तिंही देखोनि योषितांसी । लागवेगेंसी पळावें ॥२४॥ नको स्त्रियांची भेटी । नको स्त्रियांसी गोष्टी । स्त्री देखतांचि दिठीं । उठाउठीं पळावें ॥२५॥ पळतां पळतां पायांतळी । आल्या काष्ठाची पुतळी । तेही नातळावी कुशळीं । निर्जीव स्त्री छळी पुरुषातें ॥२६॥ अनिरुद्धें स्वप्नीं देखिली उखा । तों धरूनि नेला चित्ररेखा । बाणासुरें बांधिला देखा । कृष्णा सखा जयाचा ॥२७॥ त्यासी सोडवणेलागीं हरी । धांवतां आडवा आला कामारी । युद्ध जालें परस्परीं । शस्त्रास्त्री दारुण ॥२८॥ एवं हरिहरां भिडतां । जो बांधला स्वप्नींचिया कांता । तो सहसा न सुटेची शोचितां । इतरांची कथा कायसी ॥२९॥ पहा पां स्वप्नींचिया कांता । अनिरुद्धासी केली निरुद्धता । मा साचचि स्त्री हाती धरितां । निर्गमता त्या कैचा ॥१३०॥ 'पुरुष' आपणया म्हणविती । सेखीं स्त्रियांचे पाय धरिती । त्यांसी कैसेनि होईल मुक्ती । स्त्रीसंगतीं अधःपात ॥३१॥


एकनाथी भागवत - श्लोक १४ वा

नाधिगच्छेत् स्त्रियं प्राज्ञः कर्हिचिन्मृत्युमात्मनः । बलाधिकैः स हन्येत गजैरन्यैर्गजो यथा ॥१४॥

क्रीडतां गजींमाजीं गजपती । त्यावरी सबळ भद्रजाती । येऊनियां युद्ध करिती । निजबळें मारिती तयातें ॥३२॥ तो मारोनियां हस्ती । त्या हस्तिणी समस्ती । सबळ भोगी भद्रजाती । नाशाप्रती स्त्री मूळ ॥३३॥ अहल्येचिया संगतीं । गौतमें विटंबिला अमरपती । भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसंगतीस्तव जाली ॥३४॥ देखोनि तिलोत्तमा उत्तम वधू । सुंद उपसुंद सखे बंधु । स्त्रीअभिलाषें चालिला क्रोधु । सुहृदसंबंधू विसरले ॥३५॥ मग स्त्रीविरहें युद्धाचे ठायीं । दोघे निमाले येरयेरांचे घायीं । शेखीं स्त्रीभोगुही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥३६॥ ऐसीच पूर्वकल्पींची कथा । अवतारी श्रीकृष्ण नांदतां । तेणें शिशुपाळ गांजोनि सर्वथा । हिरोनि कांता पैं नेली ॥३७॥ एवं सुरनरपशूंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसंगती । तिचेनि संगें गृहासक्ती । कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥३८॥ ग्राम्य स्त्रियांचे संगतीं जाणें । तो बैसला मरणा धरणें । मरण आल्याही न करणें । जीवेंप्राणें स्त्रीसंगु ॥३९॥ वेश्येचे संगती जातां । बळाधिक्य करी घाता । निरंतर स्वपत्नी भोगितां । नाहीं बाधकता हें न म्हणे ॥१४०॥ अविश्रम स्त्री सेवितां । कामु पावे उन्मत्तता । उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥४१॥ एवं हा ठावोवरी । स्त्रीसंग कठिण भारी । क्वचित्संगु जाल्यावरी । नरकद्वारीं घालील ॥४२॥ नरकीं घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा । नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥४३॥ स्त्री आणि दुसरा अर्थु । हाचि ये लोकीं घोर अनर्थु । येणें अंतरला निजस्वार्थु । शेखीं करी घातु प्राणाचा ॥४४॥


एकनाथी भागवत - श्लोक १५ वा

न देयं नोपभोग्यं च लुब्धैर्यद् दुःखसञ्चितम् । भुङ्क्ते तदपि तच्चान्यो मधुहेवार्थविन्मधु ॥१५॥

स्वयें खाये ना धर्मु न करी । घरच्यांसी खाऊं नेदी दरिद्री । मधुमक्षिकेच्या परी । संग्रहो करी कष्टोनि ॥४५॥ माशा मोहळ बांधिती बळें । माजीं सांचले मधाचे गोळे । तें देखोनि जगाचे डोळे । उपायबळें घेवों पाहाती ॥४६॥ मग झाडींखोडीं अरडींदरडीं । जेथिंच्या तेथ जगु झोडी । भरती मधाचिया कावडी । ते सेविती गोडी श्रीमंत ॥४७॥ माशा मधु न खाती काकुळतीं । झाडित्याचे हात माखती । स्वादु श्रीमंत सेविती । ज्यांसी लक्ष्मीपती प्रसन्न ॥४८॥ तैसेंचि कृपणाचें यक्षधन । नाहीं दान धर्मसंरक्षण । त्यातें तस्कर नेती मारून । त्यांसही दंडून राजा ने ॥४९॥ जे शिणोनि संग्रह करिती । त्यांसी नव्हे भोगप्राप्ती । ते द्रव्यें अपरिग्रही सेविती । दैवगती विचित्र ॥१५०॥ प्रयासें गृहस्थ करवी अन्न । तें संन्यासी न शिणतां जाण । करूनि जाय भोजन । अदृष्ट प्रमाण ये अर्थीं ॥५१॥ यालागीं दैवाधीन जो राहे । तो संग्रहाची चाड न वाहे । तें अदृष्टचि साह्य आहे । कृपणता वायें करिताति ॥५२॥


एकनाथी भागवत - श्लोक १६ वा

सुदुःखोपार्जितैर्वित्तैराशासानां गृहाशिषः । मधुहेवाग्रतो भुङ्क्ते यतिर्वै गृहमेधिनाम् ॥१६॥

दुःखें उपार्जूनि वित्त । गृहसामग्री नाना पदार्थ । त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडीं ॥५३॥ तेथ समयीं आला अतिथ । संन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ । गृहस्थाआधीं तो सेवित । तोंड पाहत गृहमेधी ॥५४॥ जैसें दवडून मोहळमाशियांसी । मधुहर्ता मधु प्राशी । तैसें होय गृहस्थासी । नेती संन्यासी सिद्धपाकु ॥५५॥ समयीं पराङ्मुसख झालिया यती । सकळ पुण्यें क्षया जाती । यथाकाळीं आलिया अतिथी । स्वधर्मु रक्षिती सर्वथा ॥५६॥ अर्थसंग्रहाची बाधकता । तुज म्यां सांगितली तत्त्वतां । मृग गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसी ॥५७॥


एकनाथी भागवत - श्लोक १७ वा

ग्राम्यगीतं न शृणुयाद् यतिर्वनचरः क्वचित् । शिक्षेत हरिणाद् बधान् मृगयोर्गीतमोहितात् ॥१७॥

ग्राम्यजनवार्ता । कां ग्राम्य स्त्रियांच्या गीता । ऐके जो कां तत्त्वतां । बंधन सर्वथा तो पावे ॥५८॥ अखंड पाहतां दीपाकडे । घंटानादें झालें वेंडें । मृग पाहों विसरला पुढें । फांसीं पडे सर्वथा ॥५९॥ ग्राम्य योषितांचे गीत । ऐकतां कोणाचें भुलेना चित्त । मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ॥१६०॥ जो बोलिजे तापसांचा मुकुटी । ज्यासी स्त्रियांसी नाहीं भेटगोष्टी । तो ऋष्यश्रृंग उठाउठी । स्त्रीगीतासाठीं भुलला ॥६१॥


एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

नृत्यवादित्रगीतानि जुषन् ग्राम्याणि योषिताम् । आसां क्रीडनको वश्य ऋष्यशृङ्गो मृगीसुतः ॥१८॥

मधुर वीणागुणाक्वणित । ग्राम्य स्त्रियांचें गीत नृत्य । देखतां पुरुष वश्य होत । जैसें गळबंधस्थ वानर ॥६२॥ जो तपसांमाजीं जगजेठी । जो जन्मला मृगीच्या पोटीं । जो नेणे स्त्रियांची भेटीगोठी । न पाहे दृष्टीं योषिता ॥६३॥ तो ऋष्यश्रृंग स्त्रीदृष्टीं । वश्य जाहला उठाउठी । धांवे योषितांचे पाठोवाठीं । त्यांचे गोष्टीमाजी वर्ते ॥६४॥ गारुड्याचें वानर जैसें । स्त्रियांसंगें नाचे तैसें । प्रमदादृष्टीं जाहला पिसें । विवेकु मानसें विसरला ॥६५॥ विसरला तपाचा खटाटोपु । विसरला विभांडक बापु । विसरला ब्रह्मचर्यकृत संकल्पु । स्त्रियानुरूपु नाचतु ॥६६॥ स्त्रीबाधे एवढा बाधु । संसारी आणिक नाहीं गा सुबुद्धु । नको नको स्त्रियांचा विनोदु । दुःखसंबंधु सर्वांसी ॥६७॥ वारिलें नाइकावें ग्राम्य गीता । हे सत्य सत्य गा सर्वथा । तेथ हरिकीर्तन कथा । जाहल्या परमार्थतां ऐकावें ॥६८॥ रामनामें विवर्जित । ग्रामणीं बोलिजे तें ग्राम्य गीत । तें नाइकावें निश्चित । कवतुकें तेथ न वचावें ॥६९॥ मीन गुरु करणें । तेंही अवधारा लक्षणें । रसनेचेनि लोलुप्यपणें । जीवेंप्राणे जातसे ॥१७०॥


एकनाथी भागवत - श्लोक १९ वा

जिह्वयातिप्रमाथिन्या जनो रसविमोहितः । मृत्युमृच्छत्यसद्बुाधिर्मीनस्तु बडिशैर्यथा ॥१९॥

अर्थ संग्रहें जीवघातु । स्त्रिया-आसक्तीं अधःपातु । रसनालोलुप्यें पावे मृत्यु । त्रिविध घातु जीवासी ॥७१॥ ज्यासी रसनालोलुप्यता गाढी । त्यासी अनर्थुचि जोडे जोडी । दुःखाच्या भोगवी कोडी । रसनागोडी बाधक ॥७२॥ रसना आमिषाची गोडी । लोलुप्यें मीनु गिळी उंडी । सवेंचि गळु टाळू फोडी । मग चरफडी अडकलिया ॥७३॥ पाहतां रस उत्तम दिसत । भीतरीं रोगांचे गळ गुप्त । रस आसक्तीं जे सेवित । ते चडफडित भवरोगी ॥७४॥ गळीं अडकला जो मासा । तो जिता ना मरे चरफडी तैसा । तेवीं रोगु लागल्या माणसा । दुर्दशा भोगित ॥७५॥ जो रसनालोलुप्यप्रमादी । त्यासी कैंची सुबुद्धी । जन्ममरणें निरवधी । भोगी त्रिशुद्धी रसदोषें ॥७६॥ रस सेविलियासाठीं । भोगवी जन्मांचिया कोटी । हें न घडे म्हणसी पोटीं । राया ते गोठी परियेसीं ॥७७॥ इंद्रियांची सजीवता । ते रसनेआधीन सर्वथा । रसनाद्वारें रस घेतां । उन्मत्तता इंद्रियां ॥७८॥ मातली जे इंद्रियसत्ता । ते नेऊन घाली अधःपाता । रसना न जिणतां सर्वथा । भवव्यथा चुकेना ॥७९॥ आहारेंवीण देह न चले । सेविल्या इंद्रियवर्गु खवळे । रसनाजयाचें मूळ कळे । तैं दुःखें सकळें मावळतीं ॥१८०॥


एकनाथी भागवत - श्लोक २० वा

इन्द्रियाणि जयन्त्याशु निराहारा मनीषिणः । वर्जयित्वा तु रसनं तन्निरन्नस्य वर्धते ॥२०॥

आहार वर्जूनि साधक । इतर इंद्रियें जिंतिलीं देख । तंव तंव रसना वाढे अधिक । ते अजिंक न जिंकवे ॥८१॥ इंद्रियांसी आहाराचें बळ । तीं निरहारें झालीं विकळ । तंव तंव रसना वाढे प्रबळ । रसनेचें बळ निरन्नें ॥८२॥


एकनाथी भागवत - श्लोक २१ वा

तावत् जितेन्द्रियो न स्याद् विजितान्येन्द्रियः पुमान् । न जयेद्रसनं यावज्जितं सर्वं जिते रसे ॥२१॥

निरन्नें इंद्रियें जिंतली । तीं जिंतलीं हे मिथ्या बोली । अन्न घेतांचि सरसावलीं । सावध जाहलीं निजकर्मी ॥८३॥ जंव रसना नाहीं जिंकिली । तंव जितेंद्रिय मिथ्या बोली । जैं साचार रसना जिंकली । तैं वाट मोडिली विषयांची ॥८४॥ विषयाआंतील गोडपण । रसनेआंतील जाणपण । दोहींसी ऐक्य केल्या जाण । रसना संपूर्ण जिंतिली ॥८५॥ सर्वां गोडियांचें गोड आहे । ते गोडीस जो लागला राहे । त्यासीचि रसना वश्य होये । रसअपाये न बाधिती ॥८६॥ रसनाजितांचें वाधावणें । तेणें ब्रह्मसायुज्यीं पडे ठाणें । सोहळा परमानंदे भोगणें । रसना जेणें जिंतिली ॥८७॥


एकनाथी भागवत - श्लोक २२ वा

पिङ्गला नाम वेश्यासीद् विदेहनगरे पुरा । तस्या मे शिक्षितं किञ्चिन्निबोध नृपनन्दन ॥२२॥

अवधूत म्हणे नृपनंदना । वेश्या गुरु म्यां केली जाणा । तिच्या शिकलों ज्या लक्षणां । विचक्षणा अवधारीं ॥८८॥ पूर्वी विदेहाचे नगरीं । पिंगला नामें वेश्या वास करी । तिसी आस निरासेंवरी । वैराग्य भारी उपजलें ॥८९॥


एकनाथी भागवत - श्लोक २३ वा

सा स्वैरिण्येकदा कान्तं सङ्केत उपनेष्यती । अभूत् काले बहिर्द्वारि बिभ्रती रूपमुत्तमम् ॥२३॥

ते स्वैरिणी स्वेच्छाचारी । सायंकाळीं उभी द्वारीं । नाना अळंकारअंबरीं । श्रृंगारकुसरी शोभत ॥१९०॥ आधींच रूप उत्तम । वरी श्रृंगारिली मनोरम । करावया ग्राम्यधर्म । पुरुष उत्तम पहातसे ॥९१॥


एकनाथी भागवत - श्लोक २४ वा

मार्ग आगच्छतो वीक्ष्य पुरुषान् पुरुषर्षभ । तान् शुल्कदान्वित्तवतः कान्तान् मेनेऽर्थकामुका ॥२४॥

सगुण सुरूप धनवंत । कामकौशल्यें पुरवी आर्त । अर्थ देऊनि करी समर्थ । ऐसा कांत पहातसे ॥९२॥ ऐक गा पुरुषश्रेष्ठा । पुरुष येतां देखे वाटा । त्यासी खुणावी नेत्रवेंकटा । कामचेष्टा दावूनि ॥९३॥


एकनाथी भागवत - श्लोक २५ वा

आगतेष्वपयातेषु सा सङ्केतोपजीविनी । अप्यन्यो वित्तवान् कोऽपि मामुपैष्यति भूरिदः ॥२५॥

येत्या पुरुषास हाणी खडा । एकासी म्हणे घ्या जी विडा । डोळा घाली जात्याकडा । एकापुढां भंवरी दे ॥९४॥ ठेवूनि संकेतीं जीवित । ऐसे नाना संकेत दावित । पुरुष तिकडे न पाहात । येत जात कार्यार्थी ॥९५॥ गेल्या पुरुषातें निंदित । द्रव्यहीन हे अशक्त । रूपें विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारें ॥९६॥ आतां येईल वित्तवंत । अर्थदानीं अतिसमर्थ । माझा धरोनियां हात । कामआथर्त पुरवील ॥९७॥


एकनाथी भागवत - श्लोक २६ वा

एवं दुराशया ध्वस्त निद्रा द्वार्यवलम्बती । निर्गच्छन्ती प्रविशती निशीथं समपद्यत ॥२६॥

ऐसें दुराशा भरलें चित्त । निद्रा न लगे उद्वेगित । द्वार धरोनि तिष्ठत । काम वांछित पुरुषांसीं ॥९८॥ रिघों जाय घराभीतरीं । सांचल ऐकोनि रिघे बाहेरी । रिघतां निघतां येरझारी । मध्यरात्री पै झाली ॥९९॥ सरली पुरुषाची वेळ । रात्र झाली जी प्रबळ । निद्रा व्यापिले लोक सकळ । पिंगला विव्हळ ते काळीं ॥२००॥


एकनाथी भागवत - श्लोक २७ वा

तस्या वित्ताशया शुष्यद्वक्त्राया दीनचेतसः । निर्वेदः परमो जज्ञे चिन्ताहेतुः सुखावहः ॥२७॥

तुटला आशेचा जिव्हाळा । सुकले वोंठ वाळला गळा । कळा उतरली मुखकमळा । खेदु आगळा चिंतेचा ॥१॥ वित्त न येचि हाता । तेणें ते झाली दीनचित्ता । वैराग्यें परम वाटली चिंता । सुखस्वार्था ते हेतु ॥२॥


एकनाथी भागवत - श्लोक २८ वा

तस्या निर्विण्णचित्ताया गीतं श्रृणु यथा मम । निर्वेद आशापाशानां पुरुषस्य यथा ह्यसिः न ह्यङ्गाजातनिर्वेदो देहबन्धं जिहासति । यथा विज्ञानरहितो मनुजो ममतां नृप ॥२८॥ कैसें वैराग्य उपजलें तिसी । जे चिंतीत होती विषयासी । त्या विटली विषयसुखासी । छेदक आशेसी वैराग्य ॥३॥ तेणें वैराग्यें विवेकयुक्त । पिगलेनें गाइलें गीत । तें आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त होऊनि ॥४॥ ऐक राया विवेकनिधी । वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धीं । त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी । प्रतिपदीं बाधकु ॥५॥ अनुतापु नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं । तो संसाराची आंदणी दासी । आशापाशीं बांधिजे ॥६॥ त्यासी मोहममतेची गाढी । घालिजे देहबुद्धीची बेडी । अहोरात्र विषय भरडी । अर्ध घडी न राहे ॥७॥ जराजर्जरित वाकळे । माजीं पडले अखंड लोळे । फुटले विवेकाचे डोळे । मार्गु न कळे विध्युक्त ॥८॥ त्यासी अव्हासव्हा जातां । अंधकूपीं पडे दुश्चिता । तेथूनि निघावया मागुता । उपावो सर्वथा नेणती ॥९॥ तेथ काया-मनें-वाचें । निघणें नाहीं जी साचें । तंव फणकाविला लोभविंचें । चढणें त्याचें अनिवार ॥२१०॥ तेथ निंदेचिया तिडका । आंत बाहेर निघती देखा । वित्तहानीचा थोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ॥११॥ अभिमानाचे आळेपिळे । मोहउळमासे येती बळें । तरी विषयदळणें आगळें । दुःखें लोळे गेहसेजे ॥१२॥ ऐशीं अवैराग्यें बापुडीं । पडलीं देहाचे बांदवडीं । भोगितां दुःखकोडी । सबुड बुडीं बुडालीं ॥१३॥ पहा पां नीच सर्व वर्णांसी । निंद्य कर्में निंदिती कैशीं । वैराग्य उपजलें वेश्येसी । देहबंधासी छेदिलें ॥१४॥ देहबंध छेदी त्या उक्ती । वेश्या बोलिली नाना युक्ती । झाली पिंगलेसी विरक्ती । चक्रवर्ती परीस पां ॥१५॥


एकनाथी भागवत - श्लोक २९ वा

पिङ्गलोवाच । अहो मे मोहविततिं पश्यताविजितात्मनः । या कान्तादसतः कामं कामये येन बालिशा ॥२९॥

मिथ्या मोहाचा विस्तार । म्यां वाढविला साचार । माझ्या मूर्खपणाचा पार । पाहतां विचार पांगुळे ॥१६॥ नाहीं अंतःकरणासी नेम । अपार वाढविला भ्रम । असंतपुरुषांचा काम । मनोरम मानितां ॥१७॥ जरी स्त्रीसी पुरुष पाहिजे । तरी जवळील पुरुष न लाहिजे । हेंचि मूर्खपण माझें । सदा भुंजे असंतां ॥१८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३० वा

सन्तं समीपे रमणं रतिप्रदं वित्तप्रदं नित्यमिमं विहाय । अकामदं दुःखभयादिशोक मोहप्रदं तुच्छमहं भजेऽज्ञा ॥३०॥

संतपुरुषाची प्राप्ती । जवळी असतां नेणें आसक्ती । ज्यासी केलिया रती । कामनिवृत्ती तत्काळ ॥१९॥ काम निवर्तवूनि देख । अनिवार पुरवी नित्य सुख । चित्तदाता तोचि एक । अलोलिक पैं देणें ॥२२०॥ सकळ ऐश्वर्य निजपदेंसीं । संतोषोनि दे रतीसी । रमवूं जाणे नरनारींसीं । रमणु सर्वांसी तो एकु ॥२१॥ सांडोनि ऐसिया कांतासी । माझी मूढता पहा कैसी । नित्य अकामदा पुरुषासी । कामप्राप्तीसी भजिन्नलें ॥२२॥ आपुला पूर्ण न करवे काम । ते मज केवीं करिती निष्काम । त्यांचेनि संगें मोहभ्रम । दुःख परम पावलें ॥२३॥ त्यांचेनि सुख नेदवेच मातें । परी झाले दुःखाचेचि दाते । भयशोकआधिव्याधींतें । त्यांचेनि सांगातें पावलें ॥२४॥


एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा

अहो मयाऽऽत्मा परितापितो वृथा साङ्केत्यवृत्त्यातिविगर्ह्यवार्तया । स्त्रैणान्नरादर्थतृषोनुशोच्यान्‍ क्रीतेन वित्तं रतिमात्मनेच्छती ॥३१॥

जारपुरुषापासोनि सुख । इच्छितें ते मी केवळ मूर्ख । वृथा परितापू केला देख । मज असुख म्यां दीधलें ॥२५॥ स्त्रैण पुरुष ते नराधम । वेश्यागामी त्याहूनि अधम । त्यांत कृपणु तो अधमाधम । तयांचा संगम मी वांच्छीती ॥२६॥ जितुक्या अतिनिंदका वृत्ती । मज आतळतां त्या भीती । योनिद्वारें जीविकास्थिती । नीच याती व्यभिचारु ॥२७॥ अल्प द्रव्य जेणें देणें । त्याची जाती कोण हें नाहीं पाहणें । याहोनि काय लाजिरवाणें । निंदित जिणें पैं माझें ॥२८॥ जया पुरुषासी देह विकणें । तें अत्यंत हीनदीनपणें । काय सांगों त्याची लक्षणें । सर्वगुणें अपूर्ण ॥२९॥ वित्त नेदवे कृपणता । काम न पुरवे पुरता । प्रीति न करवे तत्त्वतां । भेटी मागुती तो नेदी ॥२३०॥ ऐशियापासाव सुख । वांछितां वाढे परम दुःख । जळो त्याचें न पाहें मुख । वोकारी देख येतसे ॥३१॥ एवं जारपुरुषाची स्थिती । आठवितां चिळसी येती । पुरे पुरे ते संगती । चित्तवृत्ति विटली ॥३२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा

यदस्थिभिर्निर्मितवंशवश्य स्थूणं त्वचा रोमनखैः पिनद्धम् । क्षरन्नवद्वारमगारमेतद् विण्मूत्रपूर्णं मदुपैति कान्या ॥३२॥

नरशरीर गृह सांकडें । आढीं पाखाड्या नुसधीं हाडें । अस्थींच्या मेढी दोंहीकडे । वोलेनि कातडें मढियेलें ॥३३॥ त्यासी सर्वांगीं सगळे । दिधले रोमावळिचे खिळे । घालूनि नखाचे खोबळे । अग्रीं आंगवळे बूजिले ॥३४॥ अस्थि मांस चर्मबांधा । सर्वांगीं आवळूनि दिधला सांधा । रंगीत चर्मरसना स्वादा । पुढिले बांधा बांधिली ॥३५॥ वायुप्रसरणपरिचारें । केलीं प्राणापानरंध्रें । वरिले डळमळीत शिखरें । बालांकुरें लाविलीं ॥३६॥ बुजूनि भीतरील सवडी । बांधाटिलें नवनाडीं । विष्ठामूत्रांची गाढी । नित्य परवडी सांठवण ॥३७॥ भीतरिले अवकाशीं । दुर्गंधि ऊठली कैसी । तेचि प्रवाह अहर्निशीं । नवद्वारांसी वाहताति ॥३८॥ अखंड पर्हावे वाहती मळें । देखोनि ज्याचें तो कांटाळे । अहर्निशीं धुतां जळें । कदा निर्मळे ते नव्हती ॥३९॥ सांगतांचि हे गोष्टी । ओकारी येतसे पोटीं । ऐशियास मी भुलल्यें करंटी । विवेक दृष्टीं न पाहें ॥२४०॥ अस्थिमांसाचा कोथळा । विष्ठामूत्राचा गोळा । म्यां आलिंगिला वेळोवेळां । जळो कंटाळा न येचि ॥४१॥


एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा

विदेहानां पुरे ह्यस्मिन्नहमेकैव मूढधीः । यान्यमिच्छन्त्यसत्यस्माद् आत्मदात् काममच्युतात् ॥३३॥

ये विदेहाचे नगरीं । मूर्ख मीचि एक देहधारी । हृदयस्थ सांडूनि श्रीहरी । असंतां नरीं व्यभिचारु ॥४२॥ असंत पुरुष नेणों किती । म्यां भोगिले अहोरातीं । सुख न पवेंची निश्चितीं । रति भगवंतीं जंव नाहीं ॥४३॥ जो निकटवर्ती हृदयस्थु । पुरुषीं पुरुषोत्तम अच्युतु । वीर्यच्युतीवीण रमवितु । संतोंषें देतु निजात्मना ॥४४॥ अच्युतें ज्यासि निजसुख दिधलें । ते सुख च्यवेना कांहीं केलें । ऐशिया हृदयस्था विसरलें । आणिक भुललें अकामदा ॥४५॥ अकामद ते नाशवंत । त्यांसी संग केलिया दुःखचि देत । कैसें माझें मूर्ख चित्त । त्यासी आसक्त पैं होतें ॥४६॥ त्या आसक्तीची झाली तडातोडी । लागली अच्युतसुखाची गोडी । ज्याचें सुख भोगितां चढोवढी । घडियाघडी वाढतें ॥४७॥


एकनाथी भागवत - श्लोक ३४ वा

सुहृत् प्रेष्ठतमो नाथ आत्मा चायं शरीरिणाम् । तं विक्रीयात्मनैवाहं रमेऽनेन यथा रमा ॥३४॥

जो सोयरा माझा हृदयस्थु । सुख प्रीति प्रिय अच्युतु । तोचि अंतरात्मा सर्वगतु । नाथ कांतु तो माझा ॥४८॥ त्यासीच आपुले संवसाटी । विकत घेईन उठाउठी । परमानंदें देईन मिठी । गोठी चावटी सांडोनी ॥४९॥ रमा झाली पायांची दासी । मी भोगीन अनारिसी । सर्वकाळ सर्वदेशीं । सर्वरूपेसीं सर्वस्वें ॥२५०॥


एकनाथी भागवत - श्लोक ३५ वा

कियत् प्रियं ते व्यभजन् कामा ये कामदा नराः । आद्यन्तवन्तो भार्याया देवा वा कालविद्रुताः ॥३५॥

सांडूनि हृदयस्था अच्युतातें । वरावें वरां निर्दैवांतें । तंव तो द्वैतभये भयचकिते । काळग्रस्ते सर्वदा ॥५१॥ जे निजभयें सर्वदा दुःखी । ते भार्येसी काय करिती सुखी । अवघीं पडलीं काळमुखीं । न दिसे ये लोकीं सुखदाता ॥५२॥ असो नराची ऐशी गती । करूं अमरांमाजीं अमरपती । विळांत ते चौदा निमती । पदच्युति अमरेंद्रा ॥५३॥ एवं सुर नरलोक लोकीं । आत्ममरणें सदा दुःखी । ते केवीं भार्येसी करिती सुखी । भजावें मूर्खीं ते ठायीं ॥५४॥ धन्य माझी भाग्यप्राप्ती । येचि क्षणीं येचि रातीं । झाली विवेकवैराग्यप्राप्ती । रमापति तुष्टला ॥५५॥


एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा

नूनं मे भगवान् प्रीतो विष्णुः केनापि कर्मणा । निर्वेदोऽयं दुराशाया यन्मे जातः सुखावहः ॥३६॥

ये जन्मींचें माझें कर्म । पाहतां केवळ निंद्य धर्म । मज तुष्टला पुरुषोत्तम । पूर्वजन्मसामग्रीं ॥५६॥ मज कैंचे पूर्वजन्मीं साधन । ज्याचें नाम पतितपावन । कृपाळु जो जनार्दन । त्याचे कृपेन हें घडलें ॥५७॥ दुष्ट दुराशा व्यभिचारु । भगद्वारा चालवीं संसारु । तिसी मज वैराग्ययुक्त विचारु । विष्णु साचारु तुष्टला ॥५८॥ जरी असतें पूर्वसाधन । तरी निंद्य नव्हतें मी आपण । योनिद्वारा कर्माचरण । पतित पूर्ण मी एक ॥५९॥ यापरी मी पूर्ण पतित । पतितपावन जगन्नाथ । तेणें कृपा करून येथ । केलें विवेकयुक्त वैरागी ॥२६०॥ तेणें वैराग्यविचारें देख । दुष्ट दुराशेचें फिटलें दुःख । मज झालें परम सुख । निजसंतोख पावलें ॥६१॥ हे दुःख आदळतां अंगासी । वैराग्य नुपजे अभाग्यासी । भगवंतें कृपा केली कैसी । दुःखें निजसुखासी दीधलें ॥६२॥


एकनाथी भागवत - श्लोक ३७ वा

मैवं स्युर्मन्दभाग्यायाः क्लेशा निर्वेदहेतवः । येनानुबन्धं निर्हृत्य पुरुषः शममृच्छति ॥३७॥

अंगीं आदळतां दुःखद्वंद्व । अभाग्यासी ये सबळ क्रोध । थिता विवेक होय अंध । भाग्यमंद ते जाणा ॥६३॥ दुःख देखतांचि दृष्टी । ज्यासी वैराग्य विवेकेंसी उठी । तेणें छेदूनि स्नेहहृदयगांठी । पावे उठाउठी निजसुख ॥६४॥ पुरुषांसी परमनिधान । विवेकयुक्त वैराग्य जाण । तेणें होऊनियां प्रसन्न । समाधान पावती ॥६५॥ मी पूर्वी परम अभाग्य । महापुरुषांचे जें निजभाग्य । तें भगवंतें दिधलें वैराग्य । झालें श्लाघ्य मी तिहीं लोकीं ॥६६॥


एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

तेनोपकृतमादाय शिरसा ग्राम्यसङ्गताः । त्यक्त्वा दुराशाः शरणं व्रजामि तमधीश्वरम् ॥३८॥

कृपा करोनि भगवंते । निजवैराग्य दिधलें मातें । तेणें सांडविलें दुराशेतें । ग्राम्य विषयातें छेदिलें ॥६७॥ तो उपकार मानूनियां माथां । त्यासी मी शरण जाईन आतां । जो सर्वाधीश नियंता । त्या कृष्णनाथा मी शरण ॥६८॥


एकनाथी भागवत - श्लोक ३९ वा

सन्तुष्टा श्रद्दधत्येतद्यथालाभेन जीवती । विहराम्यमुनैवाहमात्मना रमणेन वै ॥३९॥

शरण गेलियापाठीं । सहज संतुष्ट मी ये सृष्टीं । स्वभावें सत्‌श्रध्दा पोटीं । जीविका गांठी अदृष्ट ॥६९॥ मुनीश्वर भोगिती निजात्मा । त्या मी भोगीन आत्मयारामा । जो का पुरवी निष्कामकामा । तो परमात्मा वल्लभू ॥२७०॥ ब्रह्मादिक समर्थ असती । ते सांडूनियां निश्चितीं । भगवद्भाजनाची स्थिती । अतिप्रीती कां म्हणसी ॥७१॥ मजसारिखिया दुराचारी । जड जीवांतें उद्धरी । तारकु तोचि भवसागरीं । स्वामी श्रीहरि कृपाळु ॥७२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४० वा

संसारकूपे पतितं विषयैर्मुषितेक्षणम् । ग्रस्तं कालाहिनाऽऽत्मानं कोऽन्यस्त्रातुमधीश्वरः ॥४०॥

संसारलक्षण कूप अंध । तेथ विषयदृष्टीं विषयांध । पडोनि गेले अधाध । बुद्धिमंद उपायीं ॥७३॥ ते कल्पनाजळीं बुडाले । वासनाकल्लोळीं कवळले । दंभमदादि जळचरीं तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमीं ॥७४॥ दुःखाच्या खडकीं आदळले । स्वर्गपायरीसी अडकले । तेथूनिही एक पडले । निर्बुजले भवदळें ॥७५॥ नास्तिकें गेलीं सबुडबुडीं । कर्मठीं धरिल्या कर्मदरडी । वेदबाह्य तीं बापुडीं । पडलीं देव्हडीतळवटीं ॥७६॥ निंदेचे शूळ कांटे । फुटोनि निघाले उफराटे । द्वेषाचे पाथर मोटे । हृदय फुटे लागतां ॥७७॥ कामाची उकळी प्रबळ । भीतरूनि बाहेरी ये सबळ । तेणें डहळलें तें जळ । होय खळबळ जीवासी ॥७८॥ सुटले क्रोधाचे चिरे । वरी पडिल्या उरी नुरे । वनितामगरीं नेलें पुरें । विवरद्वारें आंतौतें ॥७९॥ तेथ अवघियांसी एकसरें । गिळिलें काळें काळअतजगरें । विखें घेरिलें थोरें घोरें । ज्ञान पाठिमोरें सर्वांसी ॥२८०॥ सर्प चढलिया माणुसा । गूळ कडू लागे कैसा । निंब खाये घसघसां । गोड गूळसा म्हणौनि ॥८१॥ केवळ विषप्राय विषयो कडू । तो प्रपंचिया जाला गोडू । अमृतप्राय परमार्थ गोडू । तो जाला कडू विषयिकां ॥८२॥ कूपाबाहेर वासु ज्यांसी । ते न देखती कूपाआंतुलांसी । कूपांतले बाहेरिलांसी । कदाकाळेंसी न देखती ॥८३॥ ऐसिया पीडतयां जीवांसी । काढावया धिंवसा नव्हे कोणासी । तुजवांचोनि हृषीकेशी । पाव वेगेंसीं कृपाळुवा ॥८४॥ एवं दुःखकूपपतितां । हृदयस्थु भगवंतुचि त्राता । धांव पाव कृष्णनाथा । भवव्यथा निवारीं ॥८५॥ ऐसें जाणोनि तत्त्वतां । त्याच्या चरणा शरण आतां । शरण गेलिया सर्वथा । सहज भवव्यथा निवारे ॥८६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४१ वा

आत्मैव ह्यात्मनो गोप्ता निर्विद्येत यदाखिलात् । अप्रमत्त इदं पश्येद्ग्रस्तं कालाहिना जगत् ॥४१॥

ऐसें कळलें जी तत्त्वतां । येथ आपणचि आपणिया त्राता । सर्व पदार्थीं सर्वथा । निर्वेदता दृढ जाहल्या ॥८७॥ दृढ वैराग्यता ते ऐसी । विषयो टेंकल्या अंगासी । चेतना नव्हे इंद्रियांसी । निद्रितापासीं जेवीं रंभा ॥८८॥ अथवा वमिलिया अन्ना । जेवीं वांछीना रसना । तेवीं विषय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ॥८९॥ तें वैराग्य कैसेनि जोडे । तरी सावधान पाहतां रोकडें । जग काळें गिळिलें चहूंकडे । वेगळें पडे तें नाहीं ॥२९०॥ पिता पितासह काळें नेले । पुत्रपौत्रां काळें गिळिलें । वैराग्य नुपजे येणें बोलें । तरी नागवले नरदेहा ॥९१॥ मृत्युलोक याचें नांव । अनित्य स्वर्गाची काइसी हांव । वैराग्येंवीण निर्दैव । झाले सर्व सर्वथा ॥९२॥


एकनाथी भागवत - श्लोक ४२ वा

श्रीब्राह्मण उवाच । एवं व्यवसितमतिर्दुराशां कान्ततर्षजाम् । छित्त्वोपशममास्थाय शय्यामुपविवेश सा ॥४२॥

अवधूत म्हणे यदूसी । धन्य भाग्य तये वेश्येसी । वैराग्य उपजलें तिसी । विवेकेंसी निजोत्तम ॥९३॥ एवं विवंचूनि निजबुद्धी । परपुरुषदुराशा छेदी । ज्याचेनि संगें आधिव्याधी । बहु उपाधी बाधक ॥९४॥ जे उपाधिचेनि कोडें । जन्ममृत्यूचा पुरु चढे । दुःखभोगाचें सांकडें । पाडी रोकडें जीवासी ॥९५॥ येणें वैराग्यविवेकबळें । छेदूनि दुराशेचीं मूळें । उपरमु पावली एके वेळे । निजात्मसोहळे ते भोगी ॥९६॥ नित्य सिद्धु सुखदाता । तो हृदयस्थु कांत आश्रितां । विकल्प सांडूनि चित्ता । वेगीं हृदयस्था मानली ॥९७॥ त्यासी देखतां अनुभवाचे दिठीं । ऐक्यभावें घातली मिठी । निजसुख पावली गोरटी । उठाउठीं तत्काळ ॥९८॥ बोलु घेऊनि गेला बोली । लाज लाजोनियां गेली । दृष्य द्रष्टा दशा ठेली । वाट मोडिली विषयांची ॥९९॥ सुखें सुखावलें मानस । तें सुखरूप जालें निःशेष । संकल्प विकल्प पडिले वोस । दोघां सावकाश निजप्रीती ॥३००॥ नाबद पडलिया उदकांत । विरोनि तया गोड करीत । तेवीं निराशीं पावोनि भगवंत । समरसत स्वानंदे ॥१॥ तेथ हेतूसी नाहीं ठावो । निमाला भावाभावो । वेडावला अनुभवो । दोघां प्रीती पाहाहो अनिवार ॥२॥ सांडूनि मीतूंपणासी । खेंव दिधलें समरसीं । मग समाधीचिये सेजेशी । निजकांतेंसी पहुडली ॥३॥ झणें मायेची लागे दिठी । यालागीं स्फूर्तीचिया कोटी । निंबलोण गोरटी । उठाउठी वोवाळी ॥४॥ ऐसी समाधिशेजेशीं । पिंगला रिघे निजसुखेंसीं । अवधूत म्हणे यदूसी । वैराग्यें वेश्येसी उपरमु ॥५॥ वैराग्ये छेदिले आशापाश । पिंगला जाहली गा निराश । निराशेसी असमसाहस । सुखसंतोष सर्वदा ॥६॥


एकनाथी भागवत - श्लोक ४३ वा

आशा हि परमं दुःखं नैराश्यं परमं सुखम् । यथा सञ्छिद्य कान्ताशां सुखं सुष्वाप पिङ्गला ॥४३॥

इति श्रीमद्भाकगवते महापुराणे पारमहंस्यां एकादशस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥८॥

आशा तेथ लोलुप्यता । आशेपाशीं असे दीनता । आशा तेथ ममता । असे सर्वथा नाचती ॥७॥ आशेपाशीं महाशोक । आशा करवी महादोख । आशेपाशीं पाप अशेख । असे देख तिष्ठत ॥८॥ आशेपाशीं अधर्म सकळ । आशा मानीना विटाळ । आशा नेणे काळवेळ । कर्म सकळ उच्छेदी ॥९॥ आशा अंत्यजातें उपासी । नीचसेवन आशेपाशीं । आशा न सांडी मेल्यासी । प्रेतापाशीं नेतसे ॥३१०॥ आशा उपजली अनंतासी । नीच वामनत्व आलें त्यासी । आशें दीन केलें देवांसी । कथा कायसी इतरांची ॥११॥ जगाचा जो नित्य दाता । तो आशेनें केला भिकेसवता । वैर्याजचे द्वारीं झाला मागता । द्वारपाळता तेणें त्यासी ॥१२॥ आशा तेथ नाहीं सुख । आशेपाशीं परम दुःख । आशा सर्वांसी बाधक । मुख्य दोष ते आशा ॥१३॥ ज्याची आशा निःशेष जाये । तोचि परम सुख लाहे । ब्रह्मादिक वंदिती पाये । अष्टमा सिद्धि राहे दासीत्वें ॥१४॥ निराशांचा शुद्ध भावो । निराशांपाशीं तिष्ठे देवो । निराशांचें वचन पाहाहो । रावो देवो नुल्लंघी ॥१५॥ निराश तोचि सद्बुाद्धि । निराश तोचि विवेकनिधी । चारी मुक्ती पदोपदीं । नैराश्य आधीं वंदिती ॥१६॥ निराशा तीर्थांचें तीर्थ । निराशा मुमुक्षूचा अर्थ । निराशेपाशीं परमार्थ । असे तिष्ठत निरंतर ॥१७॥ जाण नैराश्यतेपाशीं । वैराग्य होऊन असे दासी । निराश पहावया अहर्निशीं । हृषीकेशी चिंतितु ॥१८॥ निराश देखोनि पळे दुःख । निराशेमाजीं नित्यसुख । निराशेपाशीं संतोख । यथासुखें क्रीडतु ॥१९॥ नैराश्याचे भेटीसी पाहाहो । धांवे वैकुंठीचा रावो । नैराश्याचा सहज स्वभावो । महादेवो उपासी ॥३२०॥ निराशेपाशीं न ये आधी । निराशेपाशीं सकळ विधी । सच्चिदानंदपदीं । मिरवे त्रिशुद्धी निराशु ॥२१॥ ऐकोनि निराशेच्या नावां । थोरला देवो घेतसे धांवा । त्या देवोनियां खेंवा । रूपनांवा विसरला ॥२२॥ ते निराशेचा जिव्हाळा । पावोनि वेश्या पिंगला । जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥२३॥ जें आशापाशांचें छेदन । तेंचि समाधीचें निजस्थान । ते निज समाधी पावोन । पिंगला जाण पहुडली ॥२४॥ सर्व वर्णामाजीं वोखाटी । कर्म पाहतां निंद्य दृष्टीं । ते वेश्या पावन झाली सृष्टीं । माझे वाक्पुटीं कथा तिची ॥२५॥ यालागीं वैराग्यापरतें । आन साधन नाहीं येथें । कृष्ण थापटी उद्धवातें । आल्हादचित्तें प्रबोधी ॥२६॥ अवधूत सांगे यदूसी । प्रत्यक्ष वेदबाह्यता वेश्येसी । ते निराशा होतां मानसीं । निजसुखासी पावली ॥२७॥ यालागीं कायावाचाचित्तें । उपासावें निराशेतें । यापरतें परमार्थातें । साधन येथें दिसेना ॥२८॥ इतर जितुकीं साधनें । तितुकीं निराशेकारणें । ते निराशा साधिली जेणें । परमार्थ तेणें लुटिला ॥२९॥ कृपा जाकळिलें अवधूतासी । यदूसी धरोनियां पोटासी । निराशता हे जे ऐसी । अवश्यतेसीं साधावी ॥३३०॥ एका जनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । तोचि आशापाश छेदून । समाधान पाववी ॥३३१॥

इति श्रीमद्भाेगवते महापुराणे एकादशस्कंधे यदु-अवधूतसंवादे एकाकारटीकायां अष्टमोऽध्यायः ॥८॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ मूळश्लोक ॥४४॥ ओव्या ॥३३१॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.

[[‎]]