एकनाथी भागवत/अध्याय पंचविसावा
<poem>
एकनाथी भागवत - आरंभ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकृष्णाय नमः ॥
ॐ नमो देव निर्गुण । म्हणों पाहें तंव न देखें गुण । गुणेंवीण निर्गुणपण । सर्वथा जाण घडेना ॥१॥ सर्वथा न घडे निर्गुणपण । तरी घडों नेदिशी सगुणपण । नातळशी गुणागुण । अगुणाचा पूर्ण गुरुराया ॥२॥ अगुणाच्या विपरीत तूं गुणी । करिसी त्रिगुणगुणां झाडणी । पंचभूतांपासूनी । सोडविता जनीं जनार्दनू ॥३॥ ज्याचेनि जनांसी अर्दन । ज्याचेनि लिंगदेहा मर्दन । जो जीवासी जीवें मारी पूर्ण । तो कृपाळु जनार्दन घडे केवीं ॥४॥ जनार्दनाचें कृपाळूपण । सर्वथा नेणती जन । नेणावया हेंचि कारण । जे देहाभिमान न सांडिती ॥५॥ जननीजठरीं जन्म जाण । त्या जन्मास्तव म्हणती जन । त्या जनजन्मा करी मर्दन । यालागीं जनार्दन नाम त्यासी ॥६॥ मरण मारुनि वाढवी जिणें । जीव मारुनि जीववणें । देहीं नांदवी विदेहपणें । ऐशी जनार्दनें कृपा कीजे ॥७॥ निजभावार्थें परिपूर्ण । एकाकी देखूनियां दीन । कृपा करी जनार्दन । कृपाळु पूर्ण दीनांचा ॥८॥ जे जे भावना भावी जन । ते ते पुरवी जनार्दन । जो मागे परम समाधान । त्याचा देहाभिमान निर्दळी ॥९॥ हो कां जनार्दनासमोर । कैं आला होता अहंकार । मा तेणें घेऊनियां शस्त्र । करी शतचूर निजांगें ॥१०॥ जेवीं सूर्याचेनि उजियेडें । अंधारेंसीं रात्री उडे । तेवीं जनार्दननामापुढें । अहंकार बापुडें उरे केवीं ॥११॥ ऐकतां गुरुनामाचा गजरु । समूळ विरे अहंकारु । येथ दुःखदायक संसारु । कैसेनि धीरु धरील ॥१२॥ ज्याचें नाम स्मरतां आवडीं । संसारबांदवडी फोडी । जीवाचे जीवबंध सोडी । नामाची गोडी लाजवी मोक्षा ॥१३॥ निजमोक्षाहीवरतें । ज्याचें नाम करी सरतें । त्याच्या कृपाळूपणातें । केवीं म्यां येथें सांगावें ॥१४॥ नामप्रतापा न करवे सीमा । त्या सद्गुरुचा निजमहिमा । कैशापरी आकळे आम्हां । काय निरुपमा उपमावें ॥१५॥ अगाध कीर्ति गुरुची गहन । गुण गुणितां अनंतगुण । काय घ्यावें त्याचें आपण । नित्य निर्गुण निजांगें ॥१६॥ धांव घेऊनि त्यापें जावों । तंव त्या नाहीं गांवठावो । त्याचे प्राप्तीसी न चले उपावो । एक सद्भावोवांचूनी ॥१७॥ सद्भावें स्मरतां नामासी । गुरु प्रकटे स्मरणापाशीं । जेवीं सागरु सैंधवासी । ये भेटीसी निजांगें ॥१८॥ सागरा देतां आलिंगन । जेवीं सैंधव होय जीवन । तेवीं वंदितां सद्गुरुचरण । मीतूंपण हारपे ॥१९॥ सद्गरुकृपा झालिया पूर्ण । जनचि होय जनार्दन । तेव्हां जन वन विजन । भिन्नाभिन्न भासेना ॥२०॥ जन तेंचि जनार्दन । जनार्दनचि सकळ जन । हेंचि उपनिषत्सार पूर्ण । हे निजखूण जनार्दनीं ॥२१॥ येणेंचि अभिन्नार्थें येथ । सांख्य बोलिला भगवंत । उत्पत्ति-स्थिति-प्रळयांत । वस्तु सदोदित संपूर्ण ॥२२॥ सांख्य ऐकोनियां उद्धवो । विचारी आपुला अभिप्रावो । संसार वाढवी जो अहंभावो । तो अवश्य पहा हो सांडावा ॥२३॥ अहंकार जडला चित्ता । तो सांडितां न वचे सर्वथा । हें पुसों जरी श्रीकृष्णनाथा । तेणें सांख्य या अर्था निरुपिलें ॥२४॥ सकळ प्राप्तीचा अभिप्रावो । सांख्य अनुवादला देवो । अवश्य सांडावा अहंभावो । हेंचि पहा हो दृढ केलें ॥२५॥ माझेनि पराक्रमें तत्त्वतां । माझें मीपण न वचे सर्वथा । लाजिरवाणें कृष्णनाथा । किती आतां पुसावें ॥२६॥ ऐशी उद्धवाची चिंता । कळूं सरली श्रीकृष्णनाथा । बाप कृपाळु निजभक्तां । जेणें निवारे अहंता तें निजवर्म सांगे ॥२७॥ आजि उद्धवाचें भाग्य पूर्ण । जगीं उद्धवचि धन्य धन्य । ज्यासी संतुष्टला श्रीकृष्ण । न करितां प्रश्न निजगुह्य सांगे ॥२८॥ बाळक काय भूक सांगे । मग माता स्तन देऊं लागे । ते कळवळ्याचे पांगें । धांवोनि निजांगें स्तनपाना लावी ॥२९॥ त्याहूनि अतिआगळा । कृष्णीं उद्धवकळवळा । तो स्वभक्तांची भजनकळा । जाणोनि जिव्हाळा पोखित ॥३०॥ बाळक नेणे आपुली चिंता । परी माता प्रवर्ते त्याच्या हिता । तेवीं उद्धवाचे निजस्वार्था । श्रीकृष्णनाथा कळवळा ॥३१॥ त्या उद्धवाचें जें जें न्यून । तें तें करावया परिपूर्ण । प्रवर्तलासे श्रीकृष्ण । तो निजनिर्गुण उपदेशी ॥३२॥ पंचविसावे अध्यायीं जाण । सांगोनि गुणजयोलक्षण । लक्षवील निजनिर्गुण । हेंचि निरुपण निजनिष्ठा ॥३३॥ प्रकृतिपुरुषविवेक । झालियाही बुद्धिपूर्वक । जंव गुणजयो नाहीं निष्टंक । तंव वाढे सुखदुःख अहंभावो ॥३४॥ तिहीं गुणांस्तव देह झाला । देही गुणजयो न वचे केला । मूलउच्छेदू आपुला । न करवे वहिला कोणासी ॥३५॥ दांडा जन्मला वृक्षजातीसीं । तो मिळोनियां कुर्हावडीसीं । समूळ छेदवी वृक्षासी । तेवीं विवेकासीं सत्वगुण ॥३६॥ विवेका मीनल्या सत्वगुण । समूळ उच्छेदी तिनी गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । तेव्हां गुणच्छेदन तें मिथ्या ॥३७॥ समूळ मिथ्या तिनी गुण । नित्य सत्य निजनिर्गुण । येचि अर्थीचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण सांगत ॥३८॥
एकनाथी भागवत - श्लोक १ ला
श्रीभगवानुवाच - गुणानामसमिश्राणां पुमान्येन यथा भवेत् । तन्मे पुरुषवर्येदमुपधारय शंसतः ॥१॥
ज्याचेनि चरणें पवित्र क्षिती । नामें उद्धरे त्रिजगती । ज्याची ऐकतां गुणकीर्ती । क्षयो पावती महापापें ॥३९॥ ज्याचें मृदु मधुर अविट नाम । उच्चारितां निववी परम । तो उद्धवासी पुरुषोत्तम । आवडीं परम बोलत ॥४०॥ सत्व रज तम तिनी गुण । न मिसळतां भिन्नभिन्न । पुरुषापासीं एकैक गुण । उपजवी चिन्ह तें ऐका ॥४१॥ निःसंदेह सावधान । निर्विकल्प करुनि मन । ऐकतां माझें वचन । पुरुषोत्तम पूर्ण होइजे स्वयें ॥४२॥ माझे स्वरुपीं सद्भावता । ते पुरुषाची उत्तमावस्था । माझे वचनीं विश्वासतां । पुरुषोत्तमता घर रिघे ॥४३॥ ऐशी उत्तमा अतिउत्तम । निर्गुण पदवी निरुपम । तुज मी अर्पितसें पुरुषोत्तम । माझें वचन परम विश्वासल्या ॥४४॥ भक्तिभावार्थें परम श्रेष्ठा । वचनविश्वासीं अतिवरिष्ठ । यालागीं उद्धवासी पुरुषश्रेष्ठ । स्वमुखें वैकुंठ संबोधी ॥४५॥ संसारीं योनि अनेग । त्यामाजीं मनुष्यत्व अतिचांग । तेंही अविकळ अव्यंग । संपूर्ण सांग निर्दुष्ट ॥४६॥ सकळ देहांमाजीं जाण । असे पुरुषदेहप्राधान्य । त्याहीमाजीं विवेकसंपन्न । वेदशास्त्रज्ञ मुमुक्षू ॥४७॥ वेदशास्त्रविवेकसंपन्न । त्याहीमाजीं ज्या माझें भजन । भजत्यांमाजीं अनन्य शरण । सर्वस्वें जाण मजलागीं ॥४८॥ सर्वस्वें जे अनन्य शरण । तेथ माझी कृपा परिपूर्ण । माझे कृपें माझें ज्ञान । पावोनि संपन्न मद्भजनीं ॥४९॥ येंहीं गुणीं विचारितां लोक । आथिला दिसे उद्धव एक । त्यालागीं यदुनायक । पुरुषवर्याभिषेक वचनें करी ॥५०॥ ऐसें संबोधूनि उद्धवासी । त्रिगुणगुणस्वभावांसी । सांगतां प्रथम सत्वासी । हृषीकेशी उपपादी ॥५१॥ उदंड सत्वाचीं लक्षणें । त्यांत पंधरा बोलिलीं श्रीकृष्णें । तेंचि ऐका कोणकोणें । निजनिरुपणें हरि सांगे ॥५२॥
एकनाथी भागवत - श्लोक २ रा
शमो दमस्तितिक्षेक्षा तपः सत्यं दया स्मृतिः । तुष्टिस्त्यागोऽस्पृहा श्रद्धा र्ही र्दयादिः स्वनिर्वृतिः ॥२॥
आपुली जे चित्तवृत्ती । सांडूनि बाह्यस्फूर्ती । अखंड राखणें आत्मस्थिती । शम निश्चितीं त्या नांव ॥५३॥ बाह्य इंद्रियांची चरफड । शमेंसीं करावा गलजोड । निग्रहणें विषयचाड । दमाचें कोड या नांव ॥५४॥ जेणें हरिखें साहणें सुख । त्याचि वृत्तीं साहणें दुःख । तितिक्षा या नांव देख । शुद्धसत्त्वात्मक उद्धवा ॥५५॥ मी कोण कैंचा किमात्मक । निष्कर्म कीं कर्मबद्धक । करणें निजात्मविवेक । ईक्षापरिपाक या नांव ॥५६॥ जागृतिस्वप्नसुषुप्तीआंत । भगवत्प्राप्तीलागीं चित्त । झुरणीमाजीं पडे नित्य । तप निश्चित या नांव ॥५७॥ आवडीं जेवीं नेघवे विख । तेवी प्राणांतें न बोले लटिक । साचचि बोलणें निष्टंक । हें सत्य देख सात्विका ॥५८॥ भूतांवरी कठिणपण । जो स्वप्नीं न देखे आपण । भूतदया ते संपूर्ण । उद्धवा जाण निश्चित ॥५९॥ माझा मुख्य निजस्वार्थ कोण । मी काय करितों कर्माचरण । ऐसें जें पूर्वानुस्मरण । स्मृति जाण या नांव ॥६०॥ न करितां अतिआटाटी । यथालाभें सुखी पोटीं । या नांव गा निजसंतुष्टी । जाण जगजेठी उद्धवा ॥६१॥ जे मिळाले जीविकाभाग । त्यांतही सत्पात्रीं दानयोग । विषयममता सांडणें सांग । त्या नांव त्याग उद्धवा ॥६२॥ अर्थस्वार्थीं इच्छा चढे । अर्थ जोडतां अधिक वाढे । ते इच्छा सांडणें निजनिवाडें । निस्पृहता घडे ते ठायीं ॥६३॥ जेथ निस्पृहता समूळ सांग । त्याचि नांव दृढ वैराग्य । हें परमार्थाचें निजभाग्य । येणें श्रीरंग सांपडे ॥६४॥ जो गुरुवाक्यविश्वासी । सबाह्य विकला सर्वस्वेंसीं । तोचि भावार्थ द्विजदेवांसी । श्रद्धा त्यापाशीं समूळ नांदे ॥६५॥ नरदेहीं लाभे परब्रह्म । तदर्थ न करुनि सत्कर्म । विषयार्थ करी धर्माधर्म । ते लज्जा परम अतिनिंद्य ॥६६॥ जेणें दुःखी होईजे आपणें । तें पुढिलासी नाहीं करणें । दुःख नेदूनि सुख देणें । हे दया म्यां श्रीकृष्णें वंदिजे ॥६७॥ पुढिलासी नेदूनि दुःख । स्वयें भूतमात्रीं देणें सुख । हेचि दया पारमार्थिक । दुसरेनि देख यालागीं सांगे ॥६८॥ खातां नाबदेपुढें पेंड जैसी । तैसें गौण देखोनि विषयांसी । जो विनटला ब्रह्मसुखासी । स्वनिवृत्ति त्यासी बोलिजे ॥६९॥ रंक बैसल्या पालखीसी । उपेक्षी पूर्वील सुडक्यासी । तेवीं उपेक्षूनि विषयांसी । जो ब्रह्मसुखासी पकडला ॥७०॥ कणाची वाढी भुसापाशीं । कण निडारे भुसेंसीं । तो कण यावया हातासी । सांडिती भुसासी पाखडूनी ॥७१॥ तेवीं ब्रह्मसुखाचिये पाडें । नरदेहाचा पांगडा पडे । तें ब्रह्मसुख जैं हाता चढे । तैं देहींचें नावडे विषयभूस ॥७२॥ तेवीं सांडूनि विषयप्रीती । ज्यासी ब्रह्मसुखीं सुखप्राप्ती । याचि नांव स्वनिवृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥७३॥ या पंधरा लक्षणांची स्थिती । वर्ते तो शुद्ध सत्वमूर्ती । शोधितसत्वाची सत्ववृत्ती । ’आदि’ शब्दें श्रीपती सांगत ॥७४॥ सर्व भूतीं अकृत्रिमता । देखे भगवद्भावें तत्त्वतां । या नांव शोधितसत्त्वता । गुणावस्थाछेदक ॥७५॥ ऐशियापरी सत्वगुण । सात्विकापासीं वर्ते पूर्ण । आतां रजाचें लक्षण । स्वयें श्रीकृष्ण सांगत ॥७६॥
एकनाथी भागवत - श्लोक ३ रा
काम ईहा मदस्तृष्णा सतम्भ आशीर्भिदा सुखम् । महोत्साहो यशः प्रीतिर्हास्यं वीर्यं बलोद्यमः ॥३॥
काम म्हणिजे विषयसोसू । जेवीं इंधनीं वाढे हुताशू । तेवीं पुरवितां कामाभिलाषू । कामअसोसू पैं वाढे ॥७७॥ या नांव काम जाण । कामक्रिया ते ईहा पूर्ण । झाले विद्येचा दर्प गहन । मदाचें लक्षण या नांव ॥७८॥ झालिया अर्थप्राप्ती । वासनेसी नव्हे तृप्ती । चढतीवाढती आसक्ती । तृष्णा निश्चितीं या नांव ॥७९॥ अतिगर्वें जे स्तब्धता । कोणा दृष्टीं नाणी सर्वथा । या नांव स्तंभावस्था । जाण तत्त्वतां उद्धवा ॥८०॥ अर्थप्राप्तीकारणें । इष्टदेवता प्रार्थणें । प्रापंचिक सुख मागणें । आशा म्हणणें या नांव ॥८१॥ भिदा म्हणिजे भेद जाण । स्फुरद्रूप प्रपंचभान । माझें तुझें प्रपंचवचन । भिदालक्षण या नांव ॥८२॥ राजसुखाचा नवलभाग । विषयसुखभोग जो साङग । तेंचि सुख मानिती चांग । सुखप्रयोग या नांव ॥८३॥ रणीं उत्साह शूरासी । कां पुत्रोत्साह नरासी । विवाहोत्साह सुहृदांसी । महोत्साह त्यासी बोलिजे ॥८४॥ शास्त्रविवादीं जयो घेणें । कां युद्धीं शूर पराभवणें । तेणें ख्याति वाढविणें । यश मिरवणें या नांव ॥८५॥ बंदिजनांहातीं कीर्ती । स्वयें वाखाणवी दिगंतीं । या नांव यशःप्रीती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८६॥ ऐकोनि वचनोक्ति छंदोबद्ध । उपहासीं अतिविनोद । तेथ राजसा हास्य विशद । जाण प्रसिद्ध उद्धवा ॥८७॥ वीर्य म्हणिजे केवळ । बलाढयता अतिप्रबळ । दाखवणें शारीरबळ । या नांव शीळ वीर्याचें ॥८८॥ राजबळें उद्यमव्यवहार । आंगदट जो व्यापार । न्याय सांडूनि स्वार्थ फार । बलोद्यमप्रकार या नांव ॥८९॥ हीं पंधराही लक्षणें । ज्यापें नांदती संपूर्णें । तो राजस वोळखणें । जीवेंप्राणें निश्चित ॥९०॥ केवळ अविवेकसंपत्ती । तामसाची तमोवृत्ती । सोळा लक्षणें त्याची स्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥९१॥
एकनाथी भागवत - श्लोक ४ था
क्रोधो लोभोऽनृतं हिंसा याञ्चा दम्भः क्लमः कलिः । शोकमोहौ विषादार्ती निद्राशाभीरनुद्यमः ॥४॥
क्रोध कामाची पूर्वावस्था । लोभ म्हणिजे अतिकृपणता । अनृत म्हणिजे असत्यता । हिंसा ते तत्त्वतां परपीडा ॥९२॥ याञ्चा म्हणिजे लोलंगता । दंभ म्हणिजे अतिमान्यता । क्लमनामें अतिआयासता । व्यर्थ कलहता कलि जाण ॥९३॥ शोक म्हणिजे हाहाकारु । मोह म्हणिजे भ्रमाचा पूरु । विषाद म्हणिजे दुःखसंचारु । अभ्यंतरु जेणें पोळे ॥९४॥ आर्ति म्हणिजे अतिसंताप । निंदा म्हणिजे असदारोप । आशा म्हणिजे अतिलोलुप्य । महाभयकंप भीशब्दीं ॥९५॥ ऐक निद्रेचें निजवर्म । जें आळसाचें निजधाम । जाडयता सोलींव परम । ते निद्रा निःसीम तामसी ॥९६॥ सांडूनियां सर्व कर्म । स्तब्धता राहे परम । या नांव अनुद्यम । सुखावलें तम ते ठायीं वसे ॥९७॥ या तमोगुणाच्या सोळा कळा । ज्याचे अंगीं बाणती सकळा । तो तमोरात्रींची चंद्रकळा । अविवेक आंधळा तामसू ॥९८॥ सत्वरजतमोगुण । यांचे ओळखीलागीं जाण । केलें भिन्नभिन्न निरुपण । अतां मिश्रलक्षण तें ऐक ॥९९॥
एकनाथी भागवत - श्लोक ५ वा
सत्त्वस्य रजसश्चैतास्तमसश्चानुपूर्वशः । वृत्तयो वर्णितप्रायाः सन्निपातमथो शृणु ॥५॥
सांगीतली त्रिगुणस्थिती । त्या एकएकाच्या अनंत वृत्ती । त्याही अनंतप्राय होती । जीवासी गुणगुंती येथेंचि पडे ॥१००॥ मस्तकीं केश चिकटले होती । ते ज्याचे त्या नुगवती । तेवीं त्रिगुणांची गुणगुंती । जीवाहातीं उगवेना ॥१॥ मिळोनि सख्या मायाबहिणी । हातीं घेऊनि तेल फणी । उगविती चिकटल्या केशश्रेणी । तेवीं त्रिगुणांची वेणी जीवासी ॥२॥ त्रिगुणांची विभागवृत्ती । जीवसामर्थ्यें जरी होती । तरी शुद्धसत्वीं करुनि वस्ती । गुणातीतीं प्रवेशता ॥३॥ ऐसा निजागुणांचा उगवो । जीवाचेनि नोहे निर्वाहो । यालागीं गुरुचरणीं सद्भावो । सभाग्य पहा वो राखिती ॥४॥ जे सभाग्य भाग्यवंत जनीं । ज्यांसी सद्गुरु सखी जननी । विवेक-वैराग्य घेऊनि फणी । जो त्रिगुणांची वेणी उगवितू ॥५॥ ज्यांची उगविली गुणगुंती । पुढती गुंती पडे मागुती । यालागीं ते महामती । मुंडूनि सांडिती संन्यासी ॥६॥ एकाची नवलगती । उद्धट वैराग्याची स्थिती । गुंती उगवाया न रिघती । मुळींचि मुंडिती समूळ ॥७॥ विवेकफणीचेनि मेळें । ओढितां वैराग्य बळें । जो अशक्त भावबळें । तो मध्येंचि पळे उठूनी ॥८॥ अशक्तें पळतां देखोनि दूरी । एकें पळालीं मोहअंधारीं । एकें गुंती राखोनि शिरीं । गुंतीमाझारी रिघालीं ॥९॥ एकें अत्यत करंटीं । नव्हेचि गुरुमाउलीसी भेटी । ऐशीं संसारीं पोरें पोरटीं । गुणदुःखकोटी भोगिती ॥११०॥ द्विपरार्धायु विधाता । त्याचेनि नोहे गुणभागता । मग इतरांची कोण कथा । गुण तत्त्वतां निवडावया ॥११॥ ऐशिया ज्या त्रिगुणवृत्ती । मजही निःशेष न निवडती । यालागीं ध्वनितप्राय पदोक्ती । देव श्र्लोकार्थीं बोलिला ॥१२॥ मागिल्या तीं श्र्लोकार्थीं । सांगीतल्या त्रिगुणस्थिती । त्रिगुणांची मिश्रित गती । सन्निपातवृत्ती ते ऐका ॥१३॥
एकनाथी भागवत - श्लोक ६ वा
सन्निपातस्त्वहमिति ममेत्युद्धव या मतिः । व्यवहारः संनिपातो मनोमात्रेन्द्रियासुभिः ॥६॥
गुणसन्निपातप्रकारु । एकचि जो कां अहंकारु । तो गुणसंगें त्रिप्रकारु । ऐक विचारु तयाचा ॥१४॥ वर्णाश्रमविहित विलास । वेदाज्ञा पाळणें अवश्य । मी आत्मा जाण चिदंश । हा अहंविलास सात्विक ॥१५॥ मी स्वधर्मकर्मकर्ता । मी स्वर्गादि सुखभोक्ता । मज पावती नानावस्था । या नांव अहंता राजस ॥१६॥ मी देहधारि सुभट नर । मीचि कर्ता शत्रुसंहार । मी सर्वार्थी अतिदुर्धर । हा अहंकार तामस ॥१७॥ गुणानुसारें ममता जाण । त्रिविधरुपें स्फुरण । तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥१८॥ माझे हृदयींचा भगवंत । तोचि सर्व भूतीं हृदयस्थ । भूतें माझींच समस्त । हे ममता शोधित सत्वाची ॥१९॥ भक्त संत साधु सज्जन । तेचि माझे सुहृज्जन । ऐशी जे ममता पूर्ण । उद्धवा जाण सत्त्वस्थ ॥१२०॥ जीवाहून परती । सद्गुरुचरणीं अतिप्रीती । ऐशी ममतेची जे जाती । ते जाण निश्चितीं सात्विक ॥२१॥ ज्या देवाची उपासकता । शैवी वैष्णवी दीक्षितता । देवीं धर्मी पूर्ण ममता । ते जाण सात्विकता सत्वस्थ ॥२२॥ शैवी वैष्णवी धर्मममता । दंभरहित निष्कामता । ते ते सात्विकी ममता । ऐक अवस्था राजसाची ॥२३॥ निवृत्तिमार्ग मानी लटिक । सत्य साचार लौकिक । लोकैषणेची ममता देख । ते आवश्यक राजसी ॥२४॥ प्रवृत्तिशास्त्रीं आवडी । लौकिकाची अतिगोडी । नामरुपांची उभवी गुढी । हे ममता रोकडी राजस ॥२५॥ स्त्रीपुत्रें माझीं आवश्यक । शरीरसंबंधी आप्त लोक । द्रव्याची ममता निष्टंक । हे बुद्धि वोळख राजस ॥२६॥ ज्या देवाची करितां भक्ती । नाम रुप जोडे संपत्ती । तीं तीं दैवतें आवडती । हे ममता निश्चितीं राजस ॥२७॥ काम्य कर्मीं आवडी देख । आप्त मानी सकामकर्मक । सत्य स्वर्गादि विषयसुख । हे ममता निष्टंक राजस ॥२८॥ हे रजोगुणाची ममता । तुज म्यां सांगीतली तत्वतां । तमोगुणाची जे अवस्था । ऐक व्यवस्था सांगेन ॥२९॥ आपुल्या देहासी जो हूंतूं करी । कां पूर्वपूर्वजांचा वैरी । त्यांच्या लेंकरांसीं वैर धरी । हे बुद्धि निष्ठुरी तामस ॥१३०॥ पुढें लेंकुरांचे लेंकुरीं । वृत्तिभूमि जीविकेवरी । आडवा येईल स्वगोत्री । त्यासी वैर धरी तामस ॥३१॥ ऐसे पूर्वापर माझे वैरी । मी निर्दाळीन संसारीं । यालागीं रिघे अभिचारीं । ते ममता खरी तामस ॥३२॥ अभिचारिकी जे मंत्रज्ञ । ते मानी माझे आप्त स्वजन । शाकिनीडाकिनीउपासन । हे ममता संपूर्ण तामसी ॥३३॥ असो बहुसाल व्युत्पत्ती । एकेक गुणीं अनंत शक्ती । हे तिन्ही जेथ मिश्र होती । सन्निपातवृत्ती या नांव ॥३४॥ कफ वात आणि पित्त । तिन्ही एकत्र जेथ होत । तेथ उपजे सन्निपात । तेवीं सन्निपात येथ त्रिगुणांचा ॥३५॥ संकल्पविकल्पात्मक मन । पंच विषय पंच प्राण । दशेंद्रियीं व्यवहार संपूर्ण । तेथ उपजे त्रिगुणसन्निपात ॥३६॥ तेंचि सन्निपातनिरुपण । त्रिगुणांचें मिश्रलक्षण । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । मिश्रगुणसन्निपातू ॥३७॥
एकनाथी भागवत - श्लोक ७ वा
धम चार्थे च कामे च यदाऽसौ परिनिष्ठितः । गुणानां सन्निकर्षोऽयं श्रद्धारतिधनावहः ॥७॥
पुरुषाच्या ठायीं क्रियाकर्म । क्षणें स्वधर्म क्षणें काम । क्षणें वाढवी अर्थोद्यम । हा संक्रम त्रिगुणांचा ॥३८॥ गुणसंक्रमण करी काय । त्रिगुणीं धर्म त्रिविध होय । कामही त्रिविध होऊनि ठाय । अर्थस्वार्थनिर्वाह त्रिगुणात्मक ॥३९॥ येथ कर्मासी दोष नाहीं । दोष कर्त्याचे बुद्धीच्या ठायीं । तो जे कल्पना करील कांहीं । तें फळ पाहीं स्वयें भोगी ॥१४०॥ सोनें वंद्य सोनेपणें । त्याचें स्वयें घडविल्या सुणें । वंद्य तेंचि निंद्य करणें । तेवीं स्वकर्म दूषणें गुणबुद्धी ॥४१॥ भूमि सहजें शुद्ध आहे । जें पेरिजे तें पीक होये । तेवीं स्वकर्म शुद्ध स्वयें । फलभोगू लाहे गुणवृत्ती ॥४२॥ वाचा सहज सरळ गोमटी । रामनामें जोडे ब्रह्मपुष्टी । वृथा जाय करितां चावटी । भोगी निंदेपाठीं महापाप ॥४३॥ तेवीं स्वधर्म श्रद्धायुक्त । पुरुषास करी विरक्त । तेथ त्रिगुणांचा सन्निपात । श्रद्धा छळित तें ऐक ॥४४॥ स्वधर्मकर्मी श्रद्धा जोडे । क्षणैकें लागे विरक्तीकडे । क्षणें भोगफळाशा वाढे । क्षणैक पडे ममतासंधीं ॥४५॥ तैशी्च कामाचीही रती । क्षणैक निष्कामीं अतिप्रीती । क्षणें स्त्रीभोगआसक्ती । क्षणें कामरती परद्वारीं ॥४६॥ याचिपरी धनाची जोडी । क्षणैक द्रव्याशा सोडी । क्षणैक अर्थाची अतिगोडी । क्षणैक आसुडी परद्रव्य ॥४७॥ त्रिविध धर्म त्रिविध कर्म। त्रिविध रुपें धनागम । या गुणवृत्तीस्तव स्वधर्म । सांडूनि अकर्म करी प्राणी ॥४८॥ एवं धर्मअर्थकामांआंत । गुणसन्निपात अनंत । फोडूनि सांगतां येथ । वाढेल ग्रंथ अनिवार ॥४९॥ यालागीं गुणसन्निपात । सांगीतला संकलित । तेचि अर्थीं श्रीकृष्णनाथ । असे सांगत संक्षेपें ॥१५०॥
एकनाथी भागवत - श्लोक ८ वा
प्रवृत्तिलक्षणे निष्ठा पुमान्यर्हि गृहश्रमे । स्वधर्मे चानुतिष्ठेत गुणानां समितिर्हि सा ॥८॥
पुरुषासी जो गृहाश्रम । तो जाणावा केवळ काम । तेथ नित्यनैंमित्तिक कर्म । हा स्वधर्म चित्तशुद्धी ॥५१॥ गृहाश्रमीं हिंसा पंचसून । यालागीं तमोगुण प्रधान । गृहीं स्त्रीभोग पावे जाण । रजोगुण या हेतू ॥५२॥ नित्यनैमित्तिक स्वधर्म । हें गृहस्थाचें निजकर्म । हें चित्तशुद्धीचें निजवर्म । सत्व सुगम या हेतू ॥५३॥ गृहाश्रमप्रवृत्ति जाण । सदा मिश्रित तिनी गुण । गुणीं गुणवंत करुन । कर्माचरण करविती ॥५४॥ न रंगतां तेणें रंगें । स्फटिक तद्रूप भासों लागे । तेवीं गुणात्मा गुणसंगें । वर्तों लागे गुणकर्मी ॥५५॥ जेवीं कां कसवटी आपण । कसूनि दावी सुवर्णवर्ण । तेवीं पुरुषाची क्रिया जाण । दावी गुणलक्षणविभाग ॥५६॥
एकनाथी भागवत - श्लोक ९ वा
पुरुषं सत्त्वसंयुक्तमनुमीयाच्छमादिभिः । कामादिभी रजोयुक्तं क्रोधाद्यैस्तमसा युतम् ॥९॥
इंद्रियनिग्रहो यथोचित । जो शमदमीं सदा क्रीडत । शांति वसे जयाआंत । तो जाण निश्चित सात्विक ॥५७॥ जो सदा फळकामें कामुक । वांछी संसारभोगसुख । द्रव्यार्थी अतिदांभिक । रजोगुणी लोक तो जाण ॥५८॥ ज्यासी स्वधर्मी नाहीं रती । आवडे अधर्मप्रवृत्ती । क्रोधलोभें गिळिली स्फूर्ती । तो जाण निश्चितीं तामसू ॥५९॥ एवं देखोनि कर्माचरण । लक्षिजे पुरुषलक्षण । या नांव गा अनुमान । विवेकसंपन्न जाणती ॥१६०॥ सामान्यतः तिन्ही गुण । सांगीतलें निरुपण । हें न कळे म्हणेल मन । गुणवृत्ति भिन्न अवधारीं ॥६१॥
एकनाथी भागवत - श्लोक १० वा
यदा भजति मां भक्त्या निरपेक्षः स्वकर्मभिः । तं सत्त्वप्रकृतिं विद्यात्पुरुषं स्त्रियमेव वा ॥१०॥
स्वकर्मी वांछित फळ । तेंचि मायेचें दृढ पडळ । ते फळाशा सांडोनि केवळ । जे भजनशीळ मद्रूपीं ॥६१॥ करुनि फळाशेचें शून्य । स्वधर्में करिती माझें भजन । पुरुष अथवा स्त्रिया जाण । ते सत्वसंपन्न निश्चित ॥६३॥ देहावयवलिंगदर्शन । तेणें स्त्रीपुरुषनामाभिधान । परी आत्मा आत्मीं नाहीं जाण । जीवत्म समान स्त्रीपुरुषीं ॥६४॥ चित्तवृत्तिक्रियाचरण । त्या नांव गा कर्म जाण । तेथ निरपेक्ष तें माझें भजन । स्वधर्म संपूर्ण या नांव ॥६५॥ ऐशिया स्वधर्मवृत्ती । जेथ प्रगटे माझी भक्ती । ते ते सात्विक प्रकृती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६६॥ आशंका ॥ कर्म करितां फळाश वाढे ॥ तो फळभोग भोगणें पडे । स्वकर्में भक्ति केवीं घडे । कर्म तें कुडें अत्यंत ॥६७॥ कर्म करितां फळ बाधक । न करितां प्रत्यवाय नरक । कर्में कर्मबद्ध लोक । केले देख संसारीं ॥६८॥ जीव होता जो स्वतंत्र । तो कर्में केला परतंत्र । एवढें कर्माचें चरित्र । अतिविचित्र बाधक ॥६९॥ स्वकर्में भगवद्भक्ती । म्हणशी घडे कैशा रीतीं । तेचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥१७०॥ सर्प धांवोनि धरिल्या तोंडीं । तो सर्वांगीं घाली आढी । तेणें धाकें जो सोडी । तरी तो विभांडी महाविखें ॥७१॥ ते सर्पबाधेची सांकडी । निवारी मंत्रवादी गारुडी । तेवीं कर्मी कर्मबाधा गाढी । निवारी रोकडी गुरुरावो ॥७२॥ रिघतां सद्गुरुसी शरण । कर्म करवी ब्रह्मार्पण । हेंचि निरपेक्षलक्षण । उद्धवा जाण निश्चित ॥७३॥ ब्रह्म कर्माचें प्रकाशक । कर्म तितुकें ब्रह्मात्मक । हेंचि मर्दपण चोख । माझें भजन देख या रीतीं ॥७४॥ सर्वेंद्रियीं ज्ञानस्फूर्ती । ते ब्रह्मींची ब्रह्मशक्ती । ऐसेनि निश्चयें कर्मस्थिती । स्वकर्मभक्ति या नांव ॥७५॥ ऐसेनि स्वकर्में स्वाभाविक । जे मज भजती भाविक । ते ते शुद्ध सात्विक लोक । जाण निष्टंक उद्धवा ॥७६॥ स्वधर्म सर्वथा निष्फळ । म्हणती ते मूर्ख केवळ । स्वधर्म निरसी चित्तमळ । कर्म समूळ निर्दळी ॥७७॥ एवढी स्वधर्माची जोडी । सांडूनि वांछिती विषयगोडी । तें तें राजसें बापुडीं । केवळ वेडीं विषयार्थी ॥७८॥ विषयफळ वांछितां देख । देह धरणें आवश्यक । देहसंभव दुःखदायक । स्वर्गनरकफळ भोगी ॥७९॥ यापरी जनीं दुःखदाती । राजसतामसप्रकृती । ऐक त्या दोनी गुणवृत्ती । विशद तुजप्रती सांगेन ॥१८०॥
एकनाथी भागवत - श्लोक ११ वा
यदा आशिष आशास्य मां भजेत स्वकर्मभिः । तं रजःप्रकृतिं विद्याद्धिंसामाशास्य तामसम् ॥११॥
जो कां आचरोनि स्वधर्म । वांछी नाना फळकाम । तें तें जाण काम्य कर्म । राजस धर्म या नांव ॥८१॥ जो अभ्यंतरीं अतिसकाम । तो जे जे आचरे कर्मधर्म । ते ते अवघेचि सकाम । फळसंभ्रम निजहेतू ॥८२॥ स्वरुपीं काम्य कर्म नाहीं । कामना काम्य करी पाहीं । सोनें स्वभावें असे ठायीं । लेणें उपायीं स्वयें कीजे ॥८३॥ स्वकर्म स्वभावें पवित्र जाण । स्वधर्में माझें शुद्ध भजन । तेथ कामनाफळ कामून । काम्य आपण स्वयें कीजे ॥८४॥ फळकामें जें माझें यजन । तें केवळ फळाचेंचि भजन । सकामें जें स्वधर्माचरण । ते प्रकृति जाण राजस ॥८५॥ ऐसऐशिये प्रकृतीचा विलास । स्त्री अथवा हो कां पुरुष । तें तें जाण पां राजस । ऐक तामस गुणवृत्ति ॥८६॥ क्रोधयुक्त अंतःकरण । तेणेंसीं ज्याचें स्वधर्माचरण । फळ वांछी शत्रुमरण । ते प्रकृति जाण तामसी ॥८७॥ जेथें द्वेषें बांधलें घर । जे ठायीं क्रोध अनिवार । जो भूतमात्रीं निष्ठुर । ज्याची प्रकृति क्रूर सर्वदा ॥८८॥ ऐशिया स्वभावावरी । नर अथवा हो कां नारी । ते ते तामस संसारीं । निजनिर्धारीं उद्धवा ॥८९॥ जीव स्वरुपें चैतन्य पहा हो । त्यासी ’मां भज’ कां म्हणे देवो । जीवासी कां सेवकभावो । सेव्य देवो कैसेनी ॥१९०॥ येच अर्थीचें निरुपण । कृष्ण सांगताहे आपण । सेव्यसेवकलक्षण । मायागुणसंबंधें ॥९१॥
एकनाथी भागवत - श्लोक १२ वा
सत्त्वं रजस्तम इति गुणा जीवस्य नैव मे । चित्तजा यैस्तु भूतानां सज्जमानो निबध्यते ॥१२॥
बांधोनि नाणितां आया । जेवीं देहाधीन असे छाया । तेवीं भगवंताधीन माया । नातळोनियां वर्तवी ॥९२॥ माया वर्तविता निवर्तविता । स्वामी भगवंत तत्त्वतां । यालागीं मायाअध्यक्षता । त्यासीचि सर्वथा वेद बोले ॥९३॥ सूर्य अंधारातें नाशी । परी तो संमुख न ये त्यापाशीं । तेवीं मायनियंता हृषीकेशी । परी माया देवासी दृष्ट नव्हे ॥९४॥ माझें जें देखणेपण । तेंचि मायेचें मुख्य लक्षण । मजपाशीं माया जाण । गुणाभिमानेंसीं नाहीं ॥९५॥ मायाबिंबित चैतन्य । त्यासी बोलिजे जीवपण । त्या जीवासी त्रिगुणीं बांधोन । देहाभिमान दृढ केला ॥९६॥ जीवासी लागतां देहाभिमान । तो झाला मायाधीन । मायानियंता श्रीनारायण । तो स्वामी जाण जीवाचा ॥९७॥ जीव गुणाभिमानें बद्धक । यालागीं झाला तो सेवक । आत्मा गुणातीत चोख । बंधमोचक जीवाचा ॥९८॥ यापरी सेव्यसेवकभावो । विभाग दावोनियां पहा हो । त्रिगुणगुणांचा अन्वयो । विशद देवो स्वयें सांगे ॥९९॥ गुण तिन्ही समसमान । त्यांमाजीं क्षोभोनियां जाण । जो जो वाढे अधिक गुण । तें तें लक्षण हरि सांगे ॥२००॥ ब्रह्म निर्मळत्वें प्रसिद्ध । कर्म शोधकत्वें अतिशुद्ध । येथ कर्मी उपजे कर्मबाध । तो चित्तसंबंध गुणक्षोभें ॥१॥ कर्मब्रह्मीं दोष नाहीं । दोष चित्तवृत्तीच्या ठायीं । तोही गुणक्षोभें पाहीं । घाली अपायीं पुरुषातें ॥२॥ येचि अर्थीचें निरुपण । सांगीतलें मिश्रलक्षण । आतां वाढल्या एकेक गुण । गुणलक्षण तें ऐक ॥३॥ जो गुण वाढे अतिउन्नतीं । इतर त्यातळीं वर्तती । ते काळींची पुरुषस्थिती । उद्धवाप्रती हरि सांगे ॥४॥
एकनाथी भागवत - श्लोक १३ वा
यदेतरौ जयेत्सत्त्वं भास्वरं विशदं शिवम् । तदा सुखेन युज्येत धर्मज्ञानादिभिः पुमान् ॥१३॥
समूळ फळाशा त्यागूनी । निर्विकल्प निरभिमानी । जो लागे स्वधर्माचरणीं । तैं रज तम दोनी जिणे सत्व ॥५॥ जैं भाग्याचें भरण उघडे । तैं हरिकथाश्रवण घडे । मुखीं हरिनामकीर्ति आवडे । तेणें सत्व वाढे अतिशुद्ध ॥६॥ कां दैवें जोडिल्या सत्संगती । श्रवणीं श्रवण लांचावती । वाचा लांचावे नामकीर्ती । अतिप्रीतीं अहर्निशीं ॥७॥ ऐसऐशिया अनुवृत्ती । रज तम दोनी क्षीण होती । सत्व वाढे अनुद्वेगवृत्तीं । त्या सत्वाची स्थिति समूळ ऐक ॥८॥ भास्वरत्वें प्रकाश बहुळ । विशदत्वें अतिनिर्मळ । शिव म्हणिजे शांत सरळ । हें सत्वाचें केवळ स्वरुप मुख्य ॥९॥ हे सत्वाची सत्ववृत्ती । आतुडे ज्या साधकाहातीं । ते काळींची पुरुषस्थिती । ऐक तुजप्रती सांगेन ॥२१०॥ तैं विवेकाचें तारुं आतुडे । वैराग्याचें निजगुज जोडे । सर्वेंद्रियीं प्रकाश उघडे । शिगे चढे स्वधर्म ॥११॥ ते काळीं जन अधर्मता । गर्व अभिमान असत्यता । बलात्कारेंही शिकवितां । न करी सर्वथा अधर्म ॥१२॥ निकट असतां दुःखसाधन । सात्विक सदा सुखसंपन्न । बलात्कारें क्षोभवितां मन । सात्विक जाण क्षोभेना ॥१३॥ ऐशिया निजसत्व दृष्टी । सुख सुखा येतां भेटी । त्यासी स्वानंदें कोंदे सृष्तीं । शुद्ध सत्वपुष्टी या नांव ॥१४॥ ऐसें विशद सत्व जयांपाशीं । शमदम सेविती तयांसी । वैराग्य लागे पायांसी । शुद्ध सत्वराशी ते उद्धवा ॥१५॥ तैसेंचि सत्व तम जिणोन । जैं वाढे गा रजोगुण । तैं राजसाचें लक्षण । ऐक संपूर्ण हरि सांगे ॥१६॥
एकनाथी भागवत - श्लोक १४ वा
यदा जयेत्तमः सत्त्वं रजः सङंग भिदा बलम् । तदा दुःखेन युज्येत कर्मणा यशसा श्रिया ॥१४॥
रजोवृद्धीचें कारण । देहीं उपजे ज्ञानाभिमान । पदोपदीं देखे दोषगुण । वांछी सन्मान प्रतिष्ठा ॥१७॥ नवल रजोगुणाची ख्याती । ज्ञातेपणें कामासक्ती । नाना भोग वांछी चित्तीं । तेणें रजाची प्राप्ती अनिवार ॥१८॥ ऐसेनि रजोगुण वाढोनि वाढी । सत्वतमांतें तळीं पाडी । त्या रजाची स्वरुपतामोडी । ऐक निरवडी सांगेन ॥१९॥ श्लोकीं त्रैपदीं प्रबळ । रज संगभिदाबळ । बोलिला रजोगुण केवळ । तेंचि विवळ हरि सांगे ॥२२०॥ संग म्हणिजे देहाभिमान । भेद म्हणिजे मीमाझेपण । बळ म्हणिजे काम गहन। आग्रहो पूर्ण प्रवृत्तीचा ॥२१॥ देहाभिमानें दुःख उठी । भेदें भय लागे पाठी । त्या नश्वर देहाचिया पुष्टी । काम्यकामाठी कर्माची मांडी ॥२२॥ ज्या कर्माचेनि कैवाडें । यश श्री उदंड जोडे । तें तें कर्म वाढवी पुढें । हें रजोगुणें घडे आचरण ॥२३॥ मी एक पवित्र त्रिजगतीं । माझीच उत्तम कर्मस्थिती । प्रवृत्ति मान्यता आसक्ती । जे जाणवी स्थिती राजस ॥२४॥ रजाचें बळ उद्भट । कर्म आदरी अचाट । वाढवी कर्मकचाट । तो जाण श्रेष्ठ राजस ॥२५॥ बाहेर दिसे सात्विकस्थिती । अंतरीं कर्मवासना द्रव्यासक्ती । ज्यासी प्रिय आवडे चित्तीं । तो जाण निश्चितीं राजसू ॥२६॥ जेव्हां सत्व रज दोनी गुण । जिणोनि तम वाढे पूर्ण । ते काळींचें पुरुषलक्षण । स्वयें नारायण सांगत ॥२७॥
एकनाथी भागवत - श्लोक १५ वा
यदा जयेद्रजः सत्त्वं तमो मूढं लयं जडम् । युज्येत शोकमोहाभ्यां निद्रया हिंसयाऽऽशया ॥१५॥
रज सत्व करुनि गूढ । जैं तमोगुण होय रुढ । तैं तो पुरुषातें सदृढ । करी जडमूढ अतिस्तब्ध ॥२८॥ विश्वासूनि वाडेंकोडें । जैं परद्रव्य बुडवणें पडे । कां परदारागमन घडे । तैं तेणें वाढे तमोगुण ॥२९॥ स्वमुखें परापवाद बोलणें । स्वयें साधुनिंदा करणें । संतसज्जनां द्वेषणें । तैं तमाचें ठाणें अनिवार ॥२३०॥ धुईचेनि आलेपणें । पडे सूर्यासी झांकणें । तेवीं विवेकाचें जिणें। तमोगुणें ग्रासिजे ॥३१॥ सत्वगुण प्रकाशक । रज प्रवृत्तिप्रवर्तक । दोनींतें गिळूनि देख । तमाचें आधिक्य अधर्में वाढे ॥३२॥ करितां पूज्याचें हेळण । साधूचे देखतां दोषगुण । तेणें खवळला तमोगुण । त्याचें स्वरुप पूर्ण तें ऐक ॥३३॥ तमोगुण वाढल्या प्रौढ । स्फूर्तिमात्र होय मूढ । लयो उपजवोनि दृढ । करी जड जीवातें ॥३४॥ कार्याकार्यविवेकज्ञान । ते स्फूर्ति अंध होय पूर्ण । या नांव गा मूढपण । ऐक चिन्ह लयाचें ॥३५॥ जागृतीमाजीं असतां चित्त । अर्थ स्वार्थ परमार्थ । कांहीं स्फुरेना कृत्याकृत्य । लयो निश्चित या नांव ॥३६॥ समस्ताही इंद्रियवृत्ती । अनुद्यमें स्तब्धगती । निःशेष लोपे ज्ञानशक्ती । जडत्वप्राप्ती या नांव ॥३७॥ मूढत्वें पावे शोक दुःख । जडत्वें मिथ्या मोह देख । मोहास्तव होय पातक । अतिअविवेक अधर्मी ॥३८॥ ऐक लयाचें कौतुक । अहोरात्र निद्रा अधिक । निद्रेवेगळें ब्रह्मसुख । नावडे देख तामसा ॥३९॥ पूर्ण वाढल्या तमोगुण । ऐसें होय पुरुषलक्षण । वाढल्या सत्वादि गुण । फळ कोण तें हरि सांगे ॥२४०॥
एकनाथी भागवत - श्लोक १६ वा
यदा चित्तं प्रसीदेत इन्द्रियाणां च निर्वृतिः । देहेऽभयं मनोऽसङंग तत्सत्त्वं विद्धि मत्पदम् ॥१६॥
वाढलिया सत्वगुण । चित्त सदा सुप्रसन्न । कामक्रोधलोभाचें स्फुरण । सर्वथा जाण स्फुरेना ॥४१॥ जें चित्त वणवणी विषयांलागीं । तें उदास होय विषयभोगीं । विषय आदळतांही अंगीं । तैं विषयसंगीं विगुंतेना ॥४२॥ जेवीं जळामाजीं जळस्थ । पद्मिणीपत्र जळीं अलिप्त । तेवीं विषयांमाजीं चित्त । विषयातीत मद्बोधें ॥४३॥ सदा मरणभय देहासी । तें मरण आलिया देहापाशीं । भय नुपजे सात्विकापासी । भावें मत्पदासी विनटले ॥४४॥ जंववरी भासे मीतूंपण । तंववरी अवश्य बाधी मरण । सात्विक मत्पदीं अभिन्न । यालागीं मरणभय त्या नाहीं ॥४५॥ सात्विक मत्पदीं अनन्य शरण । यालागीं बाधीना जन्ममरण । या स्थितीं वर्तवी सत्वगुण । आतां ऐक लक्षण रजाचें ॥४६॥
एकनाथी भागवत - श्लोक १७ वा
विकुर्वन् क्रियया चाधीरनिर्वृत्तिश्च चेतसाम् । गात्रास्वास्थ्यं मनो भ्रान्तं रज एतैर्निशामय ॥१७॥
खवळलिया रजोगुण । विषयचिंता अतिदारुण । कर्मेंद्रियीं क्रियाभरण । नाना परींचें जाण उपपादी ॥४७॥ शरीर असतांही स्वस्थ । मन चिंतातुर अतिभ्रांत । वाढवितां विषयस्वार्थ । दुःखी होत सर्वदा ॥४८॥ असतां पुत्रवित्तसंपत्ती । अधिक स्वार्थ वाढवी चित्तीं । राजसाची चित्तवृत्ती । न मनी निवृत्ती क्षणार्ध ॥४९॥ नसतां विकाराचें कारण । चित्तीं विकार चिंती आपण । हेंचि राजसाचें लक्षण । मुख्यत्वें जाण उद्धवा ॥२५०॥ रात्री नोहे पैं प्रबळ । ना दिवस नव्हे सोज्ज्वळ । जैसी झांबवली सांजवेळ । तैसा केवळ रजोगुण ॥५१॥ सत्वरजांची उणखूण । तुज दाविली ओळखण । आतां ऐक तमोगुण । जड लक्षण तयाचें ॥५२॥
एकनाथी भागवत - श्लोक १८ वा
सीदच्चित्तं प्रलीयेत चेतसो ग्रहणेऽक्षमम् । मनो नष्टं तमो ग्लानिस्तमस्तदुपधारय ॥१८॥
चित्तीं चिंता अतिगहन । ते महामोहीं होय निमग्न । कोणेही अर्थीचें ज्ञान । हृदयीं जाण स्फुरेना ॥५३॥ सुषुप्तीवेगळें अज्ञान । सदा पळे देखोनि ज्ञान । तेथ नवल कैसें झालें जाण । त्या ज्ञानातें अज्ञान गिळूनि ठाके ॥५४॥ जागाचि परी निजेला दिसे । कर्म करी स्फुरण नसे । जेवीं कां आभाळांतिले अंवसे । रात्रीं चाले जैसें आंधळें ॥५५॥ सकळ शरीराचा गोळा । होय आळसाचा मोदळा । हा तमोग्लानीचा सोहळा । पडळ ये डोळां चित्तवृत्ती ॥५६॥ संकल्पविकल्पांची ख्याती । उपजवी सदा मनोवृत्ती । त्या मनाची जड होय स्थिती । संकल्पस्फूर्ती स्फुरेना ॥५७॥ आणिकही नवलस्थिती । चित्तासी नाठवे चित्तस्फूर्ती । एवढी वाढे तमाची ख्याती । मनोवृत्तिविनाशक ॥५८॥ यापरी तमाचें बल होय । तैं मनातें अज्ञान खाय । ते काळीं मन नष्टप्राय । मूर्च्छित राहे मूढत्वें ॥५९॥ मन निःशेष जैं नासतें । तैं महादुःख कोण भोगितें । यालागीं तमाचेनि ऐक्यमतें । मन उरे तेथें जडमूढ ॥२६०॥ यापरी जे वर्तती गती । तेचि अत्यंत दुःखदाती । या नांव गा तमाची स्थिती । जाण निश्चितीं उद्धवा ॥६१॥ वाढवितां गुणवृत्ती । कोणे गुणें कोण वाढती । येचि अर्थीची उपपत्ती । स्वयें श्रीपती सांगत ॥६२॥
एकनाथी भागवत - श्लोक १९ वा
एधमाने गुणे सत्त्वे देवानां बलमेधते । असुराणां च रजसि तमस्युद्धव रक्षसाम् ॥१९॥
दैवी आसुरी राक्षसी स्थिती । हे त्रिगुण गुणांची संपत्ती । जे जे ब्रह्मांडीं इंद्रियवृत्ती । तेचि स्थिती पिंडींही ॥६३॥ ब्रह्मांडीं सकळ देव । महापुरुषाचे अवयव । पिंडींही तेचि स्वयमेव । वर्तती सर्व निजऐक्यें ॥६४॥ उचित स्वधर्मशास्त्रस्थिती । निवृत्तिकर्मी जे प्रवृत्ती । ऐशी जेथ इंद्रियवृत्ती । ते दैवी संपत्ती सत्वस्थ ॥६५॥ कामाभिलाष दृढ चित्तीं । आणि स्वधर्मी तरी वर्तती । ऐशी जे इंद्रियस्थिती । जे आसुरी संपत्ती राजसी ॥६६॥ सलोभमोहें क्रोध चित्तीं । सदा अधर्मी प्रवृत्ती । ऐशी जे इंद्रियस्थिती । ते राक्षसी संपत्ती तामसी ॥६७॥ क्षणें सकाम क्षणें निष्काम । ऐसा जेथ वाढे स्वधर्म । तेथ देवां असुरां परम । होय संग्राम वृत्तीसी ॥६८॥ चित्तीं वाढवूनि मोहभ्रम । अधर्मचि मानी स्वधर्म । तैं राक्षसाचा पराक्रम । देवासुरां परम निर्दाळी ॥६९॥ सकामनिष्काममोहभ्रमेंसी । वृत्ती वर्ते गा जयापाशीं । तेथ देवांअसुरांराक्षसांसीं । कलहो अहर्निशीं अनिवार ॥२७०॥ क्षणैक रति परमार्थी । क्षणैक रति अर्थस्वार्थी । क्षणैक होय अनर्थी । परदारारती परद्रव्यें ॥७१॥ ऐशिये गा चित्तवृत्तीं । कदा नुपजे निजशांती । मा परमार्थाची प्राप्ती । कैशा रीती होईल ॥७२॥ साधक सर्वदा पुसती । कोण बाधा असे चित्तवृत्ती । ते बाधकत्वाची स्थिती । विशद तुजप्रती सांगीतली ॥७३॥ एकचि गुण जैं पुरता जोडे । तैं एकविध वृत्ती वाढे । हें तंव सर्वथा न घडे । गुण गुणासी भिडे उपमर्दें ॥७४॥ एकचि न जोडे गुणावस्था । यालागीं नव्हे एकविधता । तेणें अनिवार भवव्यथा । बाधी भूतां गुणक्षोभें ॥७५॥ तम अधर्माकडे वाढे । रजोगुण देहकर्माकडे । सत्वगुणासी वाढी न घडे । मुक्तता जोडे कैसेनी ॥७६॥ रजतमउभयसंधीं । सत्व अडकलें दोहींमधीं । तें वाढों न शके त्रिशुद्धीं । नैराश्यें वृद्धी सत्वगुणा ॥७७॥ त्रिगुण गुणांची त्रिपुटी । आपण कल्पी आपल्या पोटीं । तेंचि भवभय होऊनियां उठी । लागे पाठीं बाधकत्वें ॥७८॥ सत्वें देवांसी प्रबळ बळ । रजोगुणें दैत्य प्रबळ । तमोगुणें केवळ । आतुर्बळ राक्षसां ॥७९॥ हे गुणवृत्तींची व्यवस्था । समूळ सांगीतली कथा । आतां त्रिगुणांच्या तीन अवस्था । ऐक तत्त्वतां सांगेन ॥२८०॥
एकनाथी भागवत - श्लोक २० वा
सत्त्वाज्जागरणं विद्याद्रजसा स्वप्नमादिशेत् । प्रस्वापं तमसा जन्तोस्तुरीयं त्रिषु संततम् ॥२०॥
सत्त्वगुणाचिये स्थिति । नातळे स्वप्न आणि सुषुप्ती । जीवीं सदा नांदे जे जागृती । इंद्रियप्रवृत्ती सावध ॥८१॥ रजोगुणाचेनि आधिक्यें । चित्तवृत्तीतें स्वप्न जिंके । जागृति सुषुप्ति दूरी ठाके । बैसला देखे स्वप्नचि ॥८२॥ तमोगुण वाढल्या वाढी । जागृति स्वप्न दूरी दवडी। मग सुषुप्तीची अतिगाढी । आदळे रोकडी जीवाअंगीं ॥८३॥ त्यासी सभे बैसविल्या पाहे । बोलतां बोलतां डुलकी जाये । जेवितांजेवितांही पाहे । झोंपीं जाये कडकडां ॥८४॥ क्षणां जागृति क्षणां सुषुप्ती । क्षणैक स्वप्नाची प्रतीती । हे त्रिगुणांची मिश्रित वृत्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥८५॥ जागृति स्वप्न सुषुप्ती । तिहीं अवस्थांतें प्रकाशिती । यालागीं ते चौथी । तुरीय म्हणती सज्ञान ॥८६॥ जे जागृतीतें जागवित । जे स्वप्नीं स्वप्नातें नांदवित । जे सुषुप्तीतें निजवित । त्यातें तुरीय म्हणत उद्धवा ॥८७॥ जे तिहीं अवस्थांआंत । असोनि नव्हे अवस्थाभूत । जे निर्गुण निजनित्य । त्यातेंचि म्हणत तुरीय ॥८८॥ जेवीं पुत्राचेनि जाहलेपणें । पुरुषें पिता नांव पावणें । तेवीं तिहीं अवस्थागुणें । तुरीय म्हणणें वस्तूसी ॥८९॥ वस्तूवरी अवस्था भासे । भासली अवस्था सवेंचि नासे । त्या नाशामाजीं वस्तु न नासे । उरे अविनाशें तुरीय ॥२९०॥ तुरीय त्रिकाळीं संतत । यापरी जाणावें एथ । आतां गुणवृद्धिभूमिका प्राप्त । तोही वृत्तांत हरि सांगे ॥९१॥
एकनाथी भागवत - श्लोक २१ वा
उपर्युपरि गच्छन्ति सत्त्वेन ब्राह्मणा जनाः । तमसाऽधोऽध आमुख्याद्रजसाऽन्तरचारिणः ॥२१॥
सत्वगुणाचें आयतन । मुख्यत्वें ब्राह्मण जन । ते न करुनि ब्रह्मार्पण । स्वधर्माचरण जे करिती ॥९२॥ त्यांसी स्वधर्माच्या कर्मशक्तीं । ऊर्ध्वलोकीं होय गती । लोकलोकांतरप्राप्ती । ब्राह्मण पावती ते ऐक ॥९३॥ स्वर्गलोक महर्लोक । क्रमूनि पावती जनलोक । उल्लंघोनियां तपोलोक । पावती सात्विक सत्यलोक पैं ॥९४॥ वाढलिया रजोगुण । शूद्रादि चांडाळपण । पुढती जन्म पुढती मरण । अविश्रम जाण भोगवी ॥९५॥ वाढलिया तमोगुण । पश्चादि योनि पावोन । दंश मशक वृक्ष पाषाण । योनि संपूर्ण भोगवी ॥९६॥ प्राण्यासी अंतकाळीं जाण । देहांतीं जो वाढे गुण । त्या मरणाचें फळ कोण । तेंही श्रीकृष्ण स्वयें सांगे ॥९७॥ अनन्य करितां माझी भक्ती । भक्तांसी अंतीं कोण गती । तेहीविखींची उपपत्ती । श्र्लोकार्थी हरि सांगे ॥९८॥
एकनाथी भागवत - श्लोक २२ वा
सत्त्वे प्रलीनाः स्वर्यान्ति नरलोकं रजोलयाः । तमोलयास्तु निरयं यान्ति मामेव निर्गुणाः ॥२२॥
संसारीं मुख्यत्वें त्रिगुण । तेथ वाढोनियां सत्वगुण । ज्यासी प्राप्त होय मरण । तो स्वर्गभोगीं जाण दिव्य देह पावे ॥९९॥ सत्वें निमाल्या सात्विक । ते पावती स्वर्गलोक । रजोगुणें निमाल्या देख । त्या मनुष्यलोक मानवां ॥३००॥ अंतीं वाढोनियां तमाधिक्य । तमोगुणें निमाल्या देख । ते भोगिती महानरक । दुःखदायक दारुण ॥१॥ सप्रेम करितां माझी भक्ती । माझिया भक्तांसी देहांतीं । हृदयीं प्रकटे माझी मूर्ती । घवघविती निजतेजें ॥२॥ शंखचक्रगदादि संपूर्ण । पीतांबरधारी श्रीकृष्ण । ध्यानीं धरुनि पावे मरण । तो वैकुंठीं जाण मी होयें ॥३॥ सर्वभूतीं मी आत्मा पूर्ण । ऐसें ज्याचें अखंड भजन । ते जितांचि तिन्ही गुण । जिणोनि निर्गुण पावती ॥४॥ त्यांचे देहासी दैवें आल्या मरण । मजवेगळें नाहीं स्थान । ते निजानंदें परिपूर्ण । निजनिर्गुण स्वयें होती ॥५॥ माझें स्वरुप निजनिर्गुण । अथवा वैकुंठींचें सगुण । दोन्ही एकचि निश्चयें जाण । सगुण निर्गुण समसाम्य ॥६॥ स्वर्ग नरक मनुष्यलोक । प्राप्ति पावले निर्गुण चोख । त्यांच्या साधनांचें कौतुक । स्वयें यदुनायक सांगत ॥७॥
एकनाथी भागवत - श्लोक २३ वा
मदर्पणं निष्फलं वा सात्त्विकं निजकर्म तत् । राजसं फलसंकल्पं हिंसाप्रायादि तामसम् ॥२३॥
सकळ कर्मक्रियाचरण । संकल्पेंवीण आपण। सहजें होय ब्रह्मार्पण । हें निर्गुण साधन शोधितसत्वें ॥८॥ वर्णाश्रमधर्म सकळ । आचरे परी न वांछी फळ । माझे भक्तीचें प्रेम प्रबळ । हें कर्म केवळ सात्विक ॥९॥ माझें भजन हाचि स्वधर्म । याचि नांव गा निजकर्म । ऐसें ज्यासी कळे वर्म । सात्त्विक कर्म या नांव ॥३१०॥ स्वधर्म आचरोनि सकळ । इंद्रादि देवां यजनशीळ । जो वांछी इहामुत्र फळ । हें कर्म केवळ राजस ॥११॥ जे कर्मीं प्रकट हिंसा घडे । कां आमिचारिक करणें पडे । स्वरुपें जें कर्म कुडें । तें जाण धडपुडें तामस ॥१२॥ जेथ दांभिक कर्माचरु । जेथ साधूंसी अतिमत्सरु । जेथ निंदेचा प्रबळ भरु । तो कर्मादरु तामस ॥१३॥ आतां त्रिगुण आणि निर्गुण । यांचें चतुर्विध लक्षण । या श्लोकीं श्रीकृष्ण । स्वमुखें आपण सांगत ॥१४॥
एकनाथी भागवत - श्लोक २४ वा
कैवल्यं सात्त्विकं ज्ञानं रजो वैकल्पिकं च यत् । प्राकृतं तामसं ज्ञानं मन्निष्ठं निर्गुण स्मृतम् ॥२४॥
देहीं असोनि देहातीत । भूतीं भूतात्मा भगवंत। भूतां सबाह्य सभराभरित । हें ज्ञान निश्चित सात्विक ॥१५॥ भिन्न खाणी भिन्नाकार । भिन्न नांवें भिन्न व्यापार । तेथ वस्तु देखे अभिन्नाकार । हें ज्ञान साचार सात्विक ॥१६॥ करुनि वेदशास्त्रपठन । निर्धारितां निजज्ञान । सवेंचि विकल्पी आपण । विकल्प पूर्ण रजाचे ॥१७॥ करुन वार्तिकान्त व्युत्पत्ती । अद्वैतनिश्चयो नाहीं चित्तीं । आपण विकल्पी आपुल्या युक्ती । तें ज्ञान निश्चितीं राजस ॥१८॥ करुनि वेदशास्त्रश्रवण । होय शिश्नोदरपरायण । इंद्रियार्थी श्रद्धा पूर्ण । तो केवळ जाण राजस ॥१९॥ एक निश्चयो नाहीं चित्तीं । विकल्प उपजती नेणो किती। हे रजोगुणाची ज्ञानवृत्ती । ऐक निश्चितीं तमोगुण ॥३२०॥ महामोहो गिळी ज्ञानस्फूर्ती । मी जड अंध मानी निश्चितीं । नश्वर पदार्थी आसक्ती । तें ज्ञान निश्चितीं तामस ॥२१॥ आहार निद्रा भय मैथुन । केवळ पशुप्राय जें ज्ञान । तें निश्चयें तामस जाण । ऐक निर्गुणविभाग ॥२२॥ कार्य कर्ता आणि कारण । त्रिपुटी त्रिगुणेंसी करुनि शून्य । केवळ जैं चैतन्यघन । तें निर्गुण ज्ञान उद्धवा ॥२३॥ सत्वाचेनि निजउल्हासें । सर्वेंद्रियीं ज्ञान प्रकाशे । तें ज्ञानचि मानी वायवसें । मी ज्ञानरुपें असें अनादि ॥२४॥ सिंधुजळें सरिता वाहती । त्या आलिया सिंधूप्रती । तेणें उल्हासेना अपांपती । तेवीं ज्ञानस्फूर्ती श्लाघेना ॥२५॥ रजोगुणें आलिया सकाम । त्यासी क्षोभूं न शके काम । म्हणे माझेनि चाले काम्य कर्म । शेखीं मी निष्काम निजांगें ॥२६॥ होतां काम्य कर्माचा सोहळा । जेवीं सूर्या न बाधी उन्हाळा । तेवीं काम्य कर्मी मी जिव्हाळा । माझेनि सोज्ज्वळा काम सवेग ॥२७॥ तमोगुणाच्या झडाडा । पडिला महामोहाचा वेढा । न करितां मोहाचा निझाडा । मोहनिर्णय गाढा आपण पैं जाणे ॥२८॥ सूर्यो न दिसे जिकडे । अंधारु व्यापी तिकडे । तेवीं स्वरुपनिष्ठेपुढें । न बाधी सांकडें मोहाचें ॥२९॥ अंगीं आदळतां तिन्ही गुण । जो गजबजीना आपण । ते निजनिष्ठा निजनिर्गुण । उद्धवा जाण निश्चित ॥३३०॥ अज्ञानाच्या अवसरीं । ज्ञानाची चाड न धरी । प्रवर्ततां कामाचारीं । निष्कामाचा न करी पांगडा ॥३१॥ आदळतां मोहाचीं झटें । ज्याचा बोध कदा न पालटे । त्रिगुणीं निर्गुणत्वें राहाटे । माझिया निष्ठें मद्भक्त ॥३२॥ त्रिगुणांचा त्रिविध वास । निर्गुण निजरहिवास । येचि अर्थी हृषीकेश । विशद विलास सांगत ॥३३॥
एकनाथी भागवत - श्लोक २५ वा
वनं तु सात्त्विको वासो ग्रामो राजस उच्यते । तामसं द्यूतसदनं मन्निकेतं तु निर्गुणम् ॥२५॥
पवित्र आणि तीर्थभूत । विजन वन एकान्त । ऐशिये वस्तीं सुखावे चित्त । ते वास निश्चित सात्विक ॥३४॥ वस्ती व्यवहारीं व्यापारीं । कां सदा सन्मानें राजद्वारीं । विवाहमंडपामाझारीं । ज्यासी प्रीति भारी वस्तीसी ॥३५॥ ज्यासी आवडे धनसंपदा । निकटवासें वसती प्रमदा । जो नगरीं ग्रामीं वसे सदा । हे वस्ती संपदा राजस ॥३६॥ जेथ सन्मान वांछी चित्त । सदा क्षोभे विषयासक्त । ऐसऐसी वस्ती जेथ । ते जाण निश्चित राजस ॥३७॥ जेथ साधुनिंदा जोडे । जेथ गुणदोषीं दृष्टि वाढे । ऐशिया ठायीं वस्ती आवडे । तें तामसाचें गाढें निवासस्थान ॥३८॥ जेथ कलहाचें कारण । जेथ अविवेकी होय मन । वेश्या द्यूत मद्यसदन । हें निवासस्थान तामस ॥३९॥ देवालयीं घवघविती । देखोनि माझी निजमूर्ती । साचार सुखावे चित्तवृत्ती । ते निर्गुण वस्ती उद्धवा ॥३४०॥ अभेदभक्तांचें निजमंदिर । तें मज निर्गुणाचें निजघर । तेथ सुखत्वें ज्याची वृत्ति स्थिर । ते वस्ती साचार निर्गुण ॥४१॥ विषयातीत निजस्थिती। सुखें सुखरुप राहे वृत्ती । ते निर्गुणाची निजवस्ती । जाण निश्चितीं उद्धवा ॥४३॥ सांडूनि आकाराचें ज्ञान । निराकारीं सुखसंपन्न । वृत्ति स्थिरावे परिपूर्ण। ते वस्ती निर्गुण जनीं विजनीं ॥४४॥ त्रिगुणसंगें त्रिविध कर्ता । निर्गुणलक्षणीं लक्षिजे चौथा । चतुर्विध कर्त्यांची व्यवस्था । ऐक आतां सांगेन ॥४५॥
एकनाथी भागवत - श्लोक २६ वा
सात्त्विकः कारकोऽसङगी रागान्धो राजसः स्मृतः । तामसः स्मृतिविभ्रष्टो निर्गुणो मदपाश्रयः ॥२६॥
कांटेनि कांटा फेडितां । जेवीं निवारे निजव्यथा । तेवीं संगें संगातें छेदितां । सात्विक कर्ता असंगी ॥४६॥ सदुचरणसत्संगें । सकळ संग छेदी विरागें। सात्विक कर्ता निजांगें । विषयसंगें असंगी ॥४७॥ फळाभिलाषेच्या चित्तीं गांठी । तेणें अंध झाली विवेकदृष्टी । राजस कर्ता फळाशेसाठीं । अतिदुःखकोटी स्वयें सोशी ॥४८॥ निःशेष हारपे विवेकज्ञान । स्मृति सैरा वळघे रान । नाठवे कार्य कारण । ऐसा कर्ता जाण तामस ॥४९॥ अनन्य भावें हरीसी शरण । कर्मचाळक श्रीनारायण । कदा न धरी कर्माभिमान । हा कर्ता निर्गुण निश्चयें ॥३५०॥ त्रिगुणांची श्रद्धा त्रिविध । निर्गुणाची श्रद्धा शुद्ध । येच अर्थीचें विशद । स्वयें गोविंद सांगत ॥५१॥
एकनाथी भागवत - श्लोक २७ वा
सात्त्विक्याध्यात्मिकी श्रद्धा कर्मश्रद्धा तु राजसी । तामस्यधर्मे या श्रद्धा मत्सेवायां तु निर्गुणा ॥२७॥
देह इंद्रिय चेतना प्राण । येणेंसीं स्फुरे जें मीपण । तेथ विवेक करुनियां पूर्ण । आपुलें मीपण आपण पाहे ॥५२॥ देह नव्हें मी जडमूढत्वें । इंद्रियें नव्हें मी एकदेशित्वें । प्राण नव्हें मी चपळत्वें । मन चंचळत्वें कदा मी नव्हें ॥५३॥ चित्त नव्हें मी चिंतकत्वें । बुद्धि नव्हें मी बोधकत्वें । ’अहं’ नव्हें मी बाधकत्वें । मी तों येथें अनादिसिद्ध ॥५४॥ एवं मीपणाचें निजसार । विवंचूं जाणे बुद्धिचतुर । ते अध्यात्मश्रद्धा उदार । सात्विक नर सदा वाहती ॥५५॥ जें जें मी नव्हें म्हणत जाये । तें मी देखिल्या मीचि आहें । माझ्या मीपणाचे वंदिल्या पाये । मीचि मी ठायें कोंदोनी ॥५६॥ हे आध्यात्मिकी शुद्ध श्रद्धा । सात्विकापाशीं वसे सदा । आतां राजसाची श्रद्धा । ऐक प्रबुद्धा सांगेन ॥५७॥ मी एक येथें वर्णाश्रमी । मी एक येथें आश्रमधर्मी । मी एक येथें कर्ता कर्मी । हें मनोधर्मी दृढ मानी ॥५८॥ येणें भावार्थें कर्मतत्परु । कुशमृत्तिकेचा अत्यादरु । अतिशयें वाढवी शौचाचारु । विधिनिषेधां थोरु आवर्त भोंवे ॥५९॥ दोषदृष्टीच्या रंगणीं । मिरवती गुणदोषांच्या श्रेणी । पवित्रपणाच्या अभिमानीं । ब्रह्मयासी न मनी शुचित्वें ॥३६०॥ देहाभिमान घेऊनि खांदा । सत्य मानणें कर्मबाधा । ते हे राजसाची कर्मश्रद्धा । जाण प्रबुद्धा उद्धवा ॥६१॥ अधिक अविवेक वाढे । जेणें अकर्म अंगीं घडे । अधर्माची जोडी जोडे । हे श्रद्धा आवडे तामसी ॥६२॥ जेथ अपेयाचें पान । स्वेच्छा अभक्ष्यभक्षण । अगम्यादि घडे गमन । हे श्रद्धा संपूर्ण तामसी ॥६३॥ अधर्म तोचि मानी धर्म । हें तामसी श्रद्धेचें वर्म । आतां निर्गुणश्रद्धा परम । उत्तमोत्तम ते ऐक ॥६४॥ सर्व भूतीं भगवंत । ऐशिये श्रद्धे श्रद्धावंत । अनन्य भावें भूतां भजत । तो भजनभावार्थ निर्गुण ॥६५॥ स्त्री पुत्र वित्त जीवित । मजलागीं कुरवंडी करित । अनन्य भावें जे मज भजत । ते श्रद्धा निश्चित निर्गुण ॥६६॥ चारी पुरुषार्थ त्यागिती । उपेक्षूनि चारी मुक्ती । ऐक्यभावें मज भजती । ते श्रद्धासंपत्ती निर्गुण ॥६७॥ निष्काम नामस्मरण । निर्लोभ हरिकीर्तन । भावार्थें जें जें भजन । ते श्रद्धा निर्गुण उद्धवा ॥६८॥ त्रिगुणांचा त्रिविध आहारु । स्वयें सांगे शार्ङगधरु । निर्गुण आहाराचा प्रकारु । सखोल विचारु हरि सांगे ॥६९॥
एकनाथी भागवत - श्लोक २८ वा
पथ्यं पूतमनायस्तमाहार्यं सात्त्विकं स्मृतम् । राजसं चेन्द्रियप्रेष्ठं तामसं चार्तिदाशुचि ॥२८॥
पवित्र आणि हळुवार । सत्यवृद्धीसी हितकर । अप्रयासीं प्राप्ति साचार । सात्विक आहार या नांव ॥३७०॥ अल्पाहार या नांव पथ्य । पवित्र म्हणिजे धर्मार्जित । तेंही अप्रयासानें प्राप्त । तो जाण निश्चित सात्विकाहार ॥७१॥ गोड खरपूस आंबट । तळींव घोळींव तिखट । चिरींव चोळींव तुरट । वळींव वळिवट आळिलें ॥७२॥ रसीं रसांतरमिळणी । पन्हीं कालवणीं शिखरिणी । कुडकुडीं निर्पूस सणाणी । आहारभरणी राजस ॥७३॥ नाना परींच्या आवडी । सडिवा सोलिवा परवडी । रसनासुखाची अतिगोडी । तो आहार निरवडी राजस ॥७४॥ नाना परींचे आयास । करुनि अतिप्रयास । आहार सेविती राजस । ऐक तामस भोजन ॥७५॥ सेवितां दुर्गंधि उन्मादक । परिपाकें करी मूर्ख । अशुचि आणि दुःखदायक । हा आहार देख तामस ॥७६॥ भगवंताचा भुक्तप्रमाद । साधुसज्जनांचें शेष शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७७॥ ग्रासोग्रासीं गोविंद । येणें स्मरणें अन्न शुद्ध । हा निर्गुण आहार प्रसिद्ध । ’च’ कारें गोविंद बोलिला ॥७८॥ ’अन्नं ब्रह्म अहं च ब्रह्म’ । पंक्तीकर तोही ब्रह्म । ऐसा ज्याचा भोजनानुक्रम । तो आहार परम निर्गुणत्वें ॥७९॥ त्रिगुणांचें त्रिविध सुख । निर्गुण सुख अलोलिक । त्याही सुखाचा परिपाक । यदुनायक स्वयें सांगे ॥३८०॥
एकनाथी भागवत - श्लोक २९ वा
सात्त्विकं सुखमात्मोत्थं विषयोत्थं तु राजसम् । तामसं मोहदैन्योत्थं निर्गुणं मदपाश्रयम् ॥२९॥
सांडूनि विषयसुखाची स्फूर्तीं । आत्मसुखें सुखावे चित्तवृत्ती । ऐशिया निजसुखाची प्राप्ती । तें सुख निश्चितीं सात्विक ॥८१॥ गंगापूर भरे उन्नतीं । तेणें अमर्याद वोत भरती । तेवीं आत्मसुखाचिये प्राप्ती । इंद्रियां तृप्ती स्वानंदें ॥८२॥ नाना विषयांचें कोड । इंद्रियांचा अतिधुमाड । विषयसुख लागे गोड । तें सुख सुदृढ राजस ॥८३॥ अतिनिंद्य आणि उन्मादी । तेंचि सुख आवडे बुद्धी । तामस सुखाची हे सिद्धी । जाण त्रिशुद्धी उद्धवा ॥८४॥ हृदयीं प्रकटल्या माझी मूर्ती । विसरे संसाराची स्फूर्ती । त्यावरी जे होय सुखप्राप्ती । तें सुख निश्चितीं निर्गुण ॥८५॥ सर्व भूतीं वसे भगवंत । तोचि मी हा तात्त्विकार्थ । ऐसेनि मदैक्यें सुखप्राप्त । तो निजसुखार्थ निर्गुण ॥८६॥ देखिल्या निजात्मसुखस्वरुप । स्वयें होइजे सुखरुप । हे निर्गुणसुखाचे निजदीप । झडल्या पुण्यपाप पाविजे ॥८७॥ आपण सुखस्वरुप सर्वांगीं । सुखस्वरुप स्वयें भोगी । हे निर्गुण सुखाची मागी । भक्तीं अतंरंगीं भोगिजे ॥८८॥ कल्पांताचें पूर्ण भरितें । उरों नेदी नदीनदांतें । तेवीं निर्गुण सुख येथें । देहेंद्रियांतें उरों नेदी ॥८९॥ जेवीं मृगजळीं जळ नाहीं । तेवीं परब्रह्माच्या ठायीं । प्रपंच स्पर्शिलाचि नाहीं । तें सुख निर्वाहीं निर्गुण ॥३९०॥ ज्या सुखाची मर्यादा । करितां न करवे कदा । सुखें सुखस्वरुप होइजे सदा । हे सुखसंपदा निर्गुण ॥९१॥ त्रिगुण आणि निर्गुण । यांचें दाविलें भेदलक्षण । आतां त्याचें उपसंहरण । ग्रंथांतीं जाण हरि करी ॥९२॥
एकनाथी भागवत - श्लोक ३० वा
द्रव्यं देशः फलं कालो ज्ञानं कर्म च कारकः । श्रद्धाऽवस्थाऽऽकृतिर्निष्ठा त्रैगुण्यः सर्व एव हि ॥३०॥
द्रव्यशब्दें आहार त्रिविध । देशशब्दें वनग्रामभेद । फळशब्दें सुखउद्बोध । सत्वसंबंधविभागें ॥९३॥ काळशब्दें भगवद्भजन । कैवल्यनिष्ठा या नांव ज्ञान । कर्म म्हणिजे मदर्पण । कर्ता तो जाण असंगी ॥९४॥ श्रद्धाशब्दें आध्यात्मिकी । अवस्थाशब्दें जागरणादिकी । आकृतिशब्दें उपरिलोकीं । देवतादिकीं क्रीडन ॥९५॥ जो गुण वाढे देहांतीं । जेणें गुणें होय अंतःस्थिती । त्या नांव निष्ठा म्हणती । जाण निश्चितीं उद्धवा ॥९६॥ भिन्न भिन्न भाग अनेक । किती सांगूं एकेक । अवघें जगचि त्रिगुणात्मक । जाण निष्टंक निजभक्ता ॥९७॥ संसार समस्त त्रिगुण । यांमाजीं मी अवघा निर्गुण । ते तुज कळावया निजखूण । गुणनिरुपण म्यां केलें ॥९८॥
एकनाथी भागवत - श्लोक ३१ वा
सर्वे गुणमया भावाः पुरुषाव्यक्तधिष्ठिताः । दृष्टं श्रुतमनुध्यातं बुद्धया वा पुरुषर्षभ ॥३१॥
देखिजे अथवा ऐकिजे । कां मनें जें जें चिंतिजे । तें तें अवघेंचि जाणिजे । मायागुणकाजें त्रिगुणात्मक ॥९९॥ करावया त्रिगुणांचें मर्दन । प्रकृतिनियंता पुरुष भिन्न । तो सर्वदा सर्वांगें निर्गुण । वर्तवी गुण निजसत्ता ॥४००॥ पुरुषावेगळें समस्त । प्रकृतिकार्य मिथ्याभूत । त्यातें बोलिजे गुणवंत । जाण निश्चित उद्धवा ॥१॥ नरदेह पावोनियां येथ । जे न साधिती गुणातीत । ते नाडले हातोहात । निजस्वार्थ बुडाला ॥२॥ तैसी नव्हे तुझी मती । विनटलासी भगवद्भक्ती । तेव्हांचि तूं गुणातीतीं । जाण निश्चितीं जडलासी ॥३॥ हरिभक्तांमध्यें वरिष्ठ । यालागीं निजमुखें वैकुंठ । उद्धवासी म्हणे पुरुषश्रेष्ठ । भाग्यें उत्कृष्ट तूं एक ॥४॥ त्रिगुणगुणीं सविस्तारु । दृढ वाढला संसारतरु । त्याचे छेदाचा कवण प्रकारु । तो शार्ङगधरु सांगत ॥५॥
एकनाथी भागवत - श्लोक ३२ वा
एताः संसृतयः पुंसो गुणकर्मनिबन्धनाः । येनेमे निर्जिताः सौम्य गुणा जीवेन चित्तजाः ॥३२॥
भक्तियोगेन मन्निष्ठो मद्भावाय प्रपद्यते । सत्वादि तिन्ही गुण एथ । केवळ आणि मिश्रित । पुरुषातें संसारी करीत । गुणकर्मी निश्चित बांधोनी ॥६॥ त्रिगुणकर्मांस्तव जाण । जीवासी झालें दृढ बंधन । जेवीं घटामाजील जीवन । दावी आडकलेपण रविबिंबा ॥७॥ घटीं भरल्या समळ जळ । त्यामाजीं रवि दिसे समळ । घटींचें डोलतांचि जळ । कांपे चळचळ रविबिंब ॥८॥ तेवीं त्रिगुणांचें कर्माचरण । शुद्धासी आणी जीवपण । तें छेदावया जीवबंधन । भगवद्भजन साधावें ॥९॥ जितावया गुणबंधन । रिघावें सद्गुरुसी शरण । तेथ मद्भावें करितां भजन । वाढे सत्वगुण अतिशुद्ध ॥४१०॥ पायीं जडली लोहाची बेडी । ते लोहेंचि लोहार तोडी । तेवीं सत्वगुणाचिया वाढी । त्रिगुणांतें तोडी गुरुरावो ॥११॥ तेथ प्रवेशावया गुणातीतीं । अवश्य करावी गुरुभक्ती । जे गुरुभजनीं विश्वासती । त्यांसी चारी मुक्ती आंदण्या ॥१२॥ ज्यासी गुरुचरणीं भगवद्भावो । त्याचे सेवेसी ये ब्रह्मसद्भावो । तेथ ब्रह्मसद्भावेंसी पहा हो । मी देवाधिदेवो सबाह्य तिष्ठें ॥१३॥ जो गुरुचरणीं अनन्य शरण । तो सहजें होय ब्रह्मसंपन्न । गुरुरुपें करितां माझें भजन । ब्रह्मसमाधान मद्भक्ता ॥१४॥ उद्धवा ऐसें माझें भजन । समूळ जाणशी तूं संपूर्ण । यालागीं ’सौम्य’ हें विशेषण । स्वमुखें श्रीकृष्ण संबोधी ।१५॥ भाग्यें नरदेह पावल्या जाण । अवश्य करावें माझें भजन । येचि अर्थीचें निरुपण । स्वमुखें श्रीकृष्ण प्रतिपादी ॥१६॥
एकनाथी भागवत - श्लोक ३३ वा
तस्माद्देहमिमं लब्ध्वा ज्ञानविज्ञानसम्भवम् ॥३३॥
गुणसङगं विनिर्धूय मां भजन्तु विचक्षणाः । ज्या नरदेहाकारणें । अमर उत्कंठित मनें । त्या देहाचे जाहलेपणें । ज्ञान पावणें निष्टंक ॥१७॥ नरदेह पावल्या जाण । आपणचि नव्हे ब्रह्मज्ञान । तेथें करावें माझें भजन । देहाभिमान सांडूनी ॥१८॥ करितां माझें अनन्य भजन । सहजें वाढे सत्त्वगुण । सत्वगुणास्तव जाण । उपजे ज्ञान सविवेक ॥१९॥ विवेकज्ञानाचिये वृत्ती । रज तम दोनी झडती । शोधितसत्वाचिये स्थिती । अभेद भक्ती उल्हासे ॥४२०॥ करितां माझें अभेद भजन । होय स्वानंदाचें स्वादन । त्या नांव बोलिजे विज्ञान । तेथ तिनी गुण मिथ्यात्वें ॥२१॥ नरदेह जोडलिया हातीं । प्राण्यासी एवढी प्राप्ती । यालागीं मनुष्यदेहीं भक्ती । अवश्य समस्तीं करावी ॥२२॥ हें भागवतींचें अतिगुह्य ज्ञान । मुख्यत्वेंसी भक्तिप्राधान्य । भावें करितां माझें भजन । स्त्रिया शूद्रजन उद्धरती ॥२३॥ नरदेह जोडल्या जाण । माझी भक्ति करिती विचक्षण । भजनें जिणोनि गुणागुण । ब्रह्म परिपूर्ण स्वयें होती ॥२४॥ पूर्ण ब्रह्माचिया प्राप्ती । निरपेक्ष माझी भक्ती । तोचि भजनभाव श्रीपती । पुनः पुनः श्लोकार्थीं दृढ दावी ॥२५॥
एकनाथी भागवत - श्लोक ३४ व ३५ वा
निःसङगो मां भजेद्विद्वानप्रमत्तो जितेन्द्रिय ॥३४॥
रजस्तमश्चाभिजयेत्सत्त्वसंसेवया मुनिः । सत्त्वं चाभिजयेद्युक्तो नैरपेक्ष्येण शान्तधीः ॥३५॥
करुनि विषयांची विरक्ती । हृदयीं नापेक्षावी मुक्ती । ऐशी निरपेक्ष माझी भक्ती । वाढत्या प्रीतीं करावी ॥२६॥ तेणें अनिवार सत्वशुद्धी । सर्व भूतीं भगवद्बुद्धी । दृढ वाढे गा त्रिशुद्धी । हे भजनसिद्धी साधकां ॥२७॥ ऐसें करितां माझें भजन । विस्मरणासी ये मरण । सर्वेंद्रियीं सावधपण । सहजें जाण ठसावे ॥२८॥ तेव्हां रज तम दोनी गुण । निःशेष जाती हारपोन । शुद्धसत्वाचें स्फुरण । तेणें स्वानंद पूर्ण साधकां ॥२९॥ केवळ उरल्या सत्वगुण । साधका ऐसें स्फुरे स्फुरण । जगामाजीं एक पावन । धन्य धन्य मी होयें ॥४३०॥ मी पावलों शुद्ध बोध । मज प्रकटला परमानंद । ऐसा सुखाचा जो स्फुंद । तो सत्वबोध साधकां ॥३१॥ ऐसा उरला जो सत्वगुण । तो निवारावया साधन कोण । मी स्वयें सुखस्वरुप आपण । मज सुखाचें स्फुरण ते माया ॥३२॥ गूळ गुळा गोडपणें पांगे । कीं दुधा दूढ गोड लागे । तैसा सुखरुप मी सर्वांगें । वृथा सुखभोगें कां फुंजें ॥३३॥ ऐशी साधकीं स्फूर्ति स्फुरे । तंव सत्वगुण स्वरुपीं विरे । तेव्हां सुखाचाही फुंद सरे । निजसुख उरे निजशांती ॥३४॥ ऐसे निवारल्या तिनी गुण । केवळ उरे निर्गुण । तेचि अर्थींचें निरुपण । विशद श्रीकृष्ण सांगत ॥३५॥
एकनाथी भागवत - श्लोक ३६ वा
मयैंव ब्रह्मणा पूर्णो न बहिर्नान्तरश्चरेत् ॥३६॥
संपद्यते गुणैर्मुक्तो जीवो जीवं विहाय माम् । जीवो जीवविनिर्मुक्तो गुणैश्चाशयसम्भवैः ॥ वाढल्या सत्वगुणाचा हरिख । त्यातें निर्दळी शुद्ध सत्वविवेक । पाठी विवेकेंसीं सत्व देख । हारपे निःशेख निजात्मरुपीं ॥३६॥ ऐसे निमाल्या तिनी गुण । निमे कार्य कर्म कारण । लिंगदेह नाशे संपूर्ण । जीवासी जीवपण मिथ्या होय ॥३७॥ तेव्हां कार्य कर्म कर्ता । भोग्य भोग आणि भोक्ता । ज्ञान ज्ञेय मी एक ज्ञाता । याची वार्ता असेना ॥३८॥ ऐसें हारपल्या जीवपण । स्वयें सहजें निजनिर्गुण । होऊनि ठाके ब्रह्म पूर्ण । अहंसोहंपण सांडूनी ॥३९॥ यापरी मद्भक्त जाण । ब्रह्म होती परिपूर्ण । तेंचि जाहलेपणाचें लक्षण । श्लोकार्धें श्रीकृष्ण सांगत ॥४४०॥ प्रपंच एक पूर्वीं होता । हे समूळ मिथ्या वार्ता । पुढें होईल मागुता । हेंही सर्वथा असेना ॥४१॥ जैसे आंत बाहेरी भाग । नेणे साखरेचें अंग । तैसें सबाह्याभ्यंतर चांग । ब्रह्म निर्व्यंग निजानंदें ॥४२॥ ऐसें पावल्या ब्रह्म परिपूर्ण । साधकासी न ये मरण । प्रारब्धें देहीं उरल्या जाण । देहाभिमान बाधीना ॥४३॥ बाह्य न देखे दृश्यदर्शन । अंतरीं नाहीं विषयस्फुरण । देहींचें न देखे देहपण । जीवन्मुक्तलक्षण या नांव ॥४४॥ बाह्य देखे दृश्यप्रतीती । अंतरीं विषयांची आसक्ती । या नांव अज्ञानाची स्थिती । अविद्याशक्ती बाधक ॥४५॥ तें निरसावया अविद्याबंधन । अवश्य करावें माझें भजन । हें जाणोनी साधुसज्जन । भक्तीसी प्राण विकिला ॥४६॥ माझिये भक्तीपरती । आणिक नाहीं उत्तम गती । तेंही भजन अभेदयुक्तीं । तैं चारी मुक्ती कामार्या४ ॥४७॥ हृदयीं विषयाची विरक्ती । वरी अभेदभावें माझी भक्ती । तें भजन अनन्य प्रीतीं । त्याचा मी श्रीपती आज्ञाधार ॥४८॥ भक्तिनामाचा इत्यर्थ । माझे स्वरुपीं निजभावार्थ । येणेंचि लाभे परमार्थ । सुफळ शास्त्रार्थ या नांव ॥४९॥ माझिये भक्तीचेनि नांवें । पशु पक्षी उद्धरावे । मा मानवी भजनभावें । म्यां अवश्य न्यावे निजधामा ॥४५०॥ यालागीं सांडोनि व्युत्पत्ती । जाणतीं नेणतीं गा समस्तीं । भावें करावी भगवद्भक्ती । तैं निजात्मप्राप्ती अनायासें ॥५१॥ भावें करितां माझें भजन । स्वयें निर्दळती तिन्ही गुण । सहजें प्रकटे निजनिर्गुण । हें सत्य श्रीकृष्ण बोलिला ॥५२॥ जेथ उगवली गुणगुंती । तेथ प्रकटे निजशांती । हेंचि ये अध्यायीं श्रीपती । उद्धवाप्रती बोलिला ॥५३॥ यालागीं जेथ भगवद्भक्ती । तेथ गुणजयो लाभे वृत्ती । सहजें प्रकटे निजशांती । निजात्मप्राप्ती स्वतःसिद्ध ॥५४॥ ते निजभक्ति माझी जननी । ज्या पैठा केलों जनार्दनीं । एका जनार्दनचरणीं । मिळोनि मिळणीं भजतचि ॥५५॥ पुढिले अध्यायीं कथा गहन । ऐलउर्वशीउपाख्यान । ज्या अध्यायाचें करितां पठण । अगम्यागमनदोष हरती ॥५६॥ ज्या पुरुरव्याची विरक्ती । स्वमुखें वर्णील श्रीपती । वैराग्यें निजात्मप्राप्ती । सभाग्य पावती वैराग्य ॥५७॥ त्या वैराग्याचें निरुपण । अतिगोड निरुपी श्रीकृष्ण । श्रोतां कृपा करावी पूर्ण । द्यावें अवधान कथेसी ॥५८॥ जे कथेचेनि अवधानें । दुरितदोष होती दहनें । ब्रह्मीं ब्रह्मत्व पावणें । होऊनि ठाकणें चिन्मात्र ॥५९॥ एवढया निरुपणाची गोडी । पुढिले अध्यायीं आहे फुडी । एका जनार्दनकृपा गाढी । परापरथडीप्रापक ॥४६०॥ भावें धरितां जनार्दनचरण । बाधूं न शके बाधकपण । एका जनार्दना शरण । रसाळ निरुपण पुढें आहे ॥४६१॥
इति श्रीभागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसंवादे गुणनिर्गुणनिरुपणं नाम पंचविंशोऽध्यायः ॥२५॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
कृपया या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
[[]]