Jump to content

उपननी उपननी आतां घ्या रे

विकिस्रोत कडून

उपननी उपननी
आतां घ्या रे पाट्या हातीं
राहा आतां उपन्याले
उभे तिव्हारीवरती

चाल ये रे ये रे वार्‍या,
ये रे मारोतीच्या बापा
नको देऊं रे गुंगारा
पुर्‍या झाल्या तुझ्या थापा

नही अझून चाहूल
नको पाडूं रे घोरांत
आज निंघाली कोनाची
वार्‍यावरती वरात ?

ये रे वार्‍या घोंघावत
ये रे खयाकडे आधीं
आज कुठें रे शिरला
वासराच्या कानामधी !

भिनभिन आला वारा
कोन कोनाशीं बोलली ?
मन माझं हारखलं
पानं झाडाची हाललीं !

वारा आलारे झन्नाट्या
झाडं झुडपं डोललीं
धरा मदनाच्या पाट्या
खाले पोखरी चालली

देवा, माझी उपननी
तुझ्या पायी इनवनी
दैवा, तुझी सोपवनी
माझ्या जीवाची कारोनी


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.