आपले आभाळ पेलताना/दैवा... दैवशीला....!!

विकिस्रोत कडून

दैवा... दैवशीला....!!


"नाव काय तुझं?" मी

".............."
"नाव तर असेलच की ! होय? काय हो नांव हिचं ? कुठली आहे ? तुम्हाला कुठे भेटली?" पुन्हा मी. प्रश्न तिला येथे घेऊन येणाऱ्याला. उत्तर त्याच्या पाशीही नव्हते. दिसण्यात तरतरीत, तिशी पल्याडचा तो माणूस. त्याचे किंचित घारोळे डोळे, माझ्या मनात उगाचच संशय निर्माण करुन गेले. "ही बाई गेले दोन दिवस कोरटाबाहीर घोटाळतेय. रातच्याला धरमशाळेत एकटीनेच ऱ्हाणाऱ्या बाईकडे लई लोकांचं ध्यान जात असतया. तसंच माझं बी गेलं. मी तिला चा पाजला. जेऊ घातलं. वचावचा जेवत होती. जेवता जेवता हात थांबवून माज्याकडं बगायची. तिची नजर एवढी अश्राप होती की माज्या मनातलं वाकडं पार धून निघालं. आज मी ठरवलं की तिला ठिकाणाला लावायचं. पर ही काईच बोलत नाही. घरी घेऊन जावं, तर बायकोला माझं मन कसं कळणार ? त्यात तिचा तरी काय दोष ? उगा या पोरीलाच ताप व्हायचा. मी कोरटाच्या कारकुनाकडं चवकशी केली. त्यानं तुमचा पता दिला. घेऊन आलो इकडं. ताई कसंबी करा. या पोरीला तुमच्या संवस्थेत ठिऊन घ्या. लई उपकार व्हतील माझ्यावर. पोरगी रस्त्यात सोडून गेलो तर कोन काय म्हननार आहे ? नवऱ्यानंबी सोडलीच की तिला रस्त्यावर! पन तिची अश्राप नजर सारखी आठवली असती. घास कडू झाला असता तोंडातला. काई पैसं भरायचे तर मी भरतो. हायेत ते ठिऊन घ्या" .... बोलता बोलता तो माझ्या पायाशी वाकला. स्वर जड झालेला होता. ऐकता ऐकता मीही जराशी अवघडले होते.

"हे पहा भाऊ, पाया नका पडू. आमच्या संस्थेत तावन्यानवऱ्याने सोडलेल्या स्त्रियांना आसरा मिळतो. त्यांना शिवण शिकवतो. कोर्टात केस दाखल करतो, नाहीतर नवऱ्याला बोलावून त्याची समजूत काढतो, काळजी नवा करु; पण ......" बोलता बोलता माझे लक्ष तिच्याकडे होले. ती डोळे विस्फारून माझ्याकडे पाहात होती. डोळ्यात दिलासा चमकत होता. क्षणात हात घट्ट पकडून ती बोलली.

 "दैवा .. दैवा म्हनतात माला. दैवशाला कदम नाव हाय माझं. मला कोरटात न्याल मावशी? मला जज्जासमूर न्याल ? मी समदं सांगीन त्याला.."

दैवशाला दिलासा घरात राहू लागली. तिचं गाव आमच्या अंबाजोगाईच्या जवळचंच आणि माहेर पुढे चार कोसांवर. शिक्षण शून्य. लहानपणी शाळेत घातले होते. पण मास्तर एक नि शाळा चौथी पसवर. मास्तरांचा डोळा चुकवून घरी पळून जायला मजा वाटायची. झाडावरची जांभळे, पेरु, कैऱ्या, सीताफळे शिवाय रानातल्या कामुन्या यांची हाक कानावर कायमच असायची. मग काय? बापानेकाढून घेतले नाव शाळेतून नि रवानगी केली शेळ्यांच्या मागे राखोळी म्हणून. हे काम मात्र दैवाला खूप आवडायचे. त्या गमतीजमती सांगताना दैवाचे तेजदार डोळे पार हरखून जात. ती सांगे "ताई मास्तर कमळाचा 'क' शिकवायचा. आता कमळ कुठं बगितलया वो आम्ही ? काळं की गोरं ते! मी मास्तरला म्हनलं की .... गुरुजी कणगीचा 'क' शिकचा की, आमाला कणगी म्हाईत हाय. तर केस धरून वढले पहा....." .
"ताई, बदामी बकरीचे डोळे लई सुंदर होते. काळं रेशमी अंग इतकं मऊसूत की इचारू नका. दुदूबी भरपूर द्यायची. तिची चार बाळातपणं मी क्येली. पन लेकरून वो ! जरासं मोठं झालं की माजा बाप अंबाजोगाईच्या मटन खानावळीत टाकायचा. तवा मातर लई रडून यायचं."

"तू खात नाहीस मटन ?" कुणीतरी दुसरी विचारी.
"आन आता ? आठ दिस न्हाई जिभेला लागलं तर समदं अळणी वाटतंय. मटन तर हवंच. पण आपल्या बकरीचं नकोना"
तर अशी ही दैवा आठ-पंधरा दिवस धड राहिली. एक दिवस सकाळी फोन खणखणला. "ताई दैवा भयंकर त्रास देतेय. रात्रभर आम्ही जागे आहोत. अंगावर रॉकेल ओतून घेत होती. तुम्ही येता ता इकडे ?' संस्थेतील प्रमुख संवादिनी श्यामा बोलत होती. मी लगेच पायात चपला सरकवल्या.

....... समोर दैवाचा अवतार होता. अंगावर ओरखाडून घेतलेले. डोळे लाल झालेले. विस्कटलेले केस. हातातल्या बांगड्या फुटलेल्या. मनगटावर रक्ताचे ठिपके. आमच्या संस्थेतील सर्वांच्या 'मम्मी' गंगाबाई तिला धरुन बसल्या होत्या. मला पाहाताच तिने सूर काढला. 'काई ऱ्हायचं नाई मला तुमच्या संवस्थेत. दोन येळला खायला दिलं तर काय उपकार केल्ये का? या मम्मीला हाकलून द्या. माजं सामान द्या. कोरटात नेऊन हुबं करा मला..... तिचं असंबद्ध बोलणं आतून जोडलेलं होतं. मी तिचा हात धरून ऑफिसमध्ये नेलं. आणि पाण्याचा पेला तिच्या हातात बळेच दिला नि म्हटलं, "आधी पाणी पी. चूळ भर. चहा घे नि मग तुझं सामान आण. तुला कोर्टासमोर
नेऊन सोडते. मात्र तुला... एका तरण्याताठ्या बाईला, कोर्टासमोर तिच्या हट्टामुळे सोडलय हे पोलिसांत जाऊन सांगणार मी."

 "मला नाही जायचं कोर्टात. तुमी कुठे गेला वता चार दिवस ? इथं का आला न्हाई. मी फोन करते म्हनलं तर मम्मी रामावली मला. मी चा पिऊन हितंच बसणारेय...."

 तिच्या या बोलण्यामुळे हसावं की रागवावं हे कळेनासं झालं. "दैवा, तुझं खरं नाव, खरं गाव सांगितलंस तरच मी तुला इथं ठेवून घेईन. दहा दिवस झाले तुला येऊन, पण तू कुणाशी बोलत नाहीस. काय ?" मीही वैतागून बोलले. मग मात्र दैवाने माहिती दिली.

 दैवाचं माहेर कान्हेरीचं. वडिलांकडे दोन एकर शेती. पण कोरडवाहू. वडील पाटलाच्यात सालदारी करायचे नि घरी खरिपाचे पीक घ्यायचे. माय शेतात रोजगार करायची. दैवाला दोज मोठ्या बहिणी. एक लगीन झाल्यावर सहा महिन्यांनी विहिरीत पडून मेली. दुसरीचा नवरा मुंबईला ड्रायव्हर म्हणून काम करतो. ती भारजाला सासरी राहाते. तो अधूनमधून येतो. दैवा तिसरी. तिच्या पाठीवर एक भाऊ. पुन्हा दोन बहिणी. "आमची माय एकतर गरवार असायची न्हाईतर लेकराला अंगावर पाजत तरी असायची. नि शिवाय मरेस्तो काम. आमी भैणी शेण गोळा करायचो. गवऱ्या थापायचो. पानी आनायचो. सरपन गोळा करायचो." दैवा

 दैवा दिसण्यात उजवी. गुलाबी गोरा रंग. मोठे मोठे डोळे. सरळ नाक. दिलासा घरात आली तेव्हा केस खांद्यापर्यंत कापलेले होते. ते नवऱ्याने कापले होते म्हणे! लग्नाच्या वेळी कमरेपर्यंत वेणी यायची. दैवा वयात आली तेव्हा होती बारा वर्षाची. पण मुलगी वयात येताच आईबापाला लागतो घोर. डोक्यावरचे ओझे फेकून द्यावे तशी नवऱ्याच्या दारात लेक ढकलून मोकळे व्हायचे पाहातात. चौदाची असतानाच दैवाचे लगीन ठरले. नवरा हनुमान नवलवाडीचा सातवीपसवर शिकलेला. मालट्रकवर क्लिनर.... किन्नर होता. वीस रुपये रोज मिळत असत.

 लग्न झाले नि दैवा सासरी आली. लग्न होईस्तोवर शेळ्यामेंढ्यांच्या मागे हिंडणाऱ्या दैवाला रसदार स्वैपाक जमत नसे, भाजी भाकरी करता येई.
पण भाजीला ना खमंग चव ना भाकरीला गोल भिंगरी आकार. सासू शिकची, पण शेवटी ती सासू. तिची टाच उंच आहे याचे तिला सतत भान असतेच. मग ती थोड्याफार शिव्या घालायची. कधी एखादा सटका द्यायची. पण त्याबदल दैवाची तक्रार नाही. कारण सासू कशी असते. त्याचे चित्र तिच्या आईने लग्नाआधीच जोरदार रंगवले होतो. त्या चित्रपेक्षा तर ही बरीच होती म्हणायची! पण बावीस वर्षाच्या नवऱ्याबरोवर चौदा वर्षाच्या पोरीचे सूत काही जुळेना. सकाळी उठल्यावर कंबर ठणकायची. पाय जडावून जायचे. सगळे अंग ठसठसायचे. लग्नातल्या नव्या साडया, पायातल्या चंदेरी साखळ्या, गळ्यातले पिवळे धमक डोरले, ... हे सारे छान वाटायचे. पण लग्नाचा हा नवा अर्थ उमजत नसे. संध्याकाळ झाली की अंगावर शहारे येत. पळून जावेसे वाटे. आणि दोनदा रात्री पळत ... धावत तिने माहेरची शीव गाठलीही होती. पण लगीन झालेल्या लेकीला माहेर परकेच असते. आईने तिचा जीव ओळखला. कदाचित तिचे दिवस आठवले असतील.
"बाई गं सगळ्याच बायांना जात्यातून जावं लागतं

काय सांगू भर्ताराच ? जीव त्याच्यात मुरला
केवड्याचा गंध जुईफुलानं सोशिला....!!"


 "चार दिवस होतोय तरास. तो सोसावाच लागतो. एखादं लेकरु झालं की भरताराची गोडी बायकुलाबी कळाया लागते. तरास सोसाल्याबिगर गोडी कशी मिळणार ?......"

 असे काही सांगून तिने पहिल्या वेळी दैवाला सासरी जाऊन घातले. पण दुसऱ्या वेळी मात्र बापाने कायदा हातात घेतला. दोन दणके घालून रोखठोक बजावले. "आता तुझं घर त्ये. विसाव्याला दोन दिसासाठी म्हायेराला ये. पन नवऱ्याच्या गोडीनं, सासू सासऱ्यानं धाडलं तरच यायचं. आम्ही पन जमंल तशी चोळी बांगडी करू. शिदोरी देऊन वाट लावू. पन जर का या पुढं पळून आलीस तर पाय तोडून नवऱ्याच्या अंगणात नेऊन घालीन. तुझी तिरडी नवऱ्याच्या घरुनच निघंल. त्या गावची शीव वलांडीस तर याद राख ....."

 तेव्हापासून माहेरची आशा तुटली. नवऱ्याला परळीत चांगली नोकरी मिळाली. मुंबई-पुण्याला जाणाऱ्या मालट्रकवर ड्रायव्हर म्हणून. आठशे रुपये मिळत. शिवाय वरची कमाई वेगळीच. लग्नाला दीड वर्ष झालं
होतं. दैवाही घरात रुळायला लागली होती. घरातले काम, शेतातले काम. करण्यात हुशार झाली होती. आठ चार दिवसाला नवरा परळीहून मुक्कामाला येई. येताना चिटाचे कापड तरकधी बांगड्या आणी. पावडरचा डबा नि भिवया रंगवायची काळी पेन्सिल गुपचूप हातात देई. त्याला वाटे की, तो आल्यावर हिने पावडर लावावी, थोडे नीटनेटके राहावे. पण पंधरा वर्षाच्या दैवाला नेमके कसे वागावे कळत नसे. पावडरीचा वास सासूच्या नाकापर्यंत जाईल यानेच ती धास्तावत असे.

 हनुमंताने नवीन चाल चालवली. पोटाचे हाल होतात या निमित्ताने परळीत घर करायचे ठरविले. आणि दैवाची रवानगी परळीत झाली. चार दिवस सासू राहिली. संसाराची मांडामांड करुन ती माघारी परतली. नवा गाव .... नवा संसार.... नव्या ओळखी. गाव बरे होते. दर सोमवारी वैजनाथाचे दर्शन घडायचे. पण काही नव्या गोष्टीही तिच्या ध्यानात आल्या. हनुमान दोन दोन दिवस पुण्या-मुंबईच्या 'लायनी'वर असायचा. घरी आला की धुमाकूळ सुरु. बाटली नि तो. एकमेकांच्या सहवासात. मध्येच जाऊन मटन आणून टाकी. दैवाने मालमसाला घालून मटणरस्सा शिजवायचा. भरपूर पिणे झाले की दोन चार मित्रांना घेऊन तो येई. मग हाताची मनगटे दुखेस्तो भाकरी थापाव्या लागत. कष्टाने मिळालेला पैसा दहा वाटांनी पळून जाई. त्याचे दोस्त म्हाणत, "वा! काय चव हाय वैनीच्या हाताला. झ्याक रस्सा झालाय. ममईच्या हाटलात बी अशी चव नाय मिळायची."

 असे म्हणायला काय जातेय.? नवरापण फुगारून जाई. पैसे पुरेनात म्हणून तिने दोन बंगल्यातली धुणीभांडी धरली. साठ रुपये येत. तेवढाच आधार. पूर्वी नवरा लाइनीवर असताना दारू जास्त ढोशीत नसे. पण हळूहळू सवय वाढली. एक दिवस दारुच्या नशेत, गाडी रस्ता सोडून पलटली. बरे तर बरे तो वाचला. पण मालाची राखरांगोळी झाली. मालकाने दोन महिन्यांचा आगाऊ पगार हातात कोंबून कामावरून कमी केले. हातात पैसा येईना. दारू नि मटनाची सवय तुटेना. मग घरात त्रागा. "लगीन होऊन चार वर्षे झाली तरी लेकरुबाळ होत नाही म्हणून माझं लेकरू दुखी झालया. वंशाला दिवा लागला की समद्या कामात हुरुप येतोया. हिच्यामुळच माझं पोरगं दारुच्या नादी लागलं. हिचा पायगून बरा न्हाई. हिला बापाकडं धाडावं नि नवी सून घरात आणावी.... !" असा सासूचा नवा ठेका सुरु झाला.

 सवतीच्या नुसत्या कल्पनेने दैवाचा जीव चोळामोळा होऊन जात असे. एका दिवसाची हकीगत. संध्याकाळची वेळ. दैवा घरात एकटीच. घर कसले? लहानशी झोपडीच. झोपडपट्टीतील. थंडीचे दिवस. सूर्य लवकर बुडतीला लागे. हनुमंताला ... तिच्या नवऱ्याला परळी -गंगाखेड टेम्पोवर नोकरी लागली होती. पण घरी यायला चांगलीच रात्र होई. बाहेर खाऊन पिऊन आडवतायला घरी येत असे. तर त्या संध्याकाळी बंगल्यातल्या सायबिणीनं दिलेला शिळा भाकरतुकडा खाऊन दैवा आडवतली. कधी डोळा लागला कळलं नाही. अचानक जाग आली तर कोणीतरी झोपडीचं कवाड लावून घेतय. नवऱ्याचा मित्र दारु ढोसून घरात आला होता. दैवा किंचाळली. चपल्या मारयतारुन त्याला बाहेर काढले. नेमका त्याचवेळी नवरा का येऊ नये तिथे? तोही दारुत बुडून आलेला. त्याने बायकोचा हात खेचला. फरपटत टेम्पोत कोंबलं आणि टेम्पो सुरु केला. दैवा ओरडतेय. हनुमंत गाडी चालवतोय नि एका हातानी तिला मारतोय. टेम्पो चढावाला लागला. गाडीचा दरवाजा खटकन उघडला नि दैवा खाली ढकलली गेली. समोरुन गाडीचे दिवे लखकन चमकले आणि हनुमंत खाडकन ठिकाणावर आला. कर्रकन ब्रेक दाबून गाडी खडी केली...... उभी केली. अस्ताव्यस्त दैवाला हात लावून पाहिला. जीव जागेवर होता. पण डोक्यातून रक्ताची धार लागली होती. गाडीत घालून थेट अंबाजोगाईचा दवाखाना गाठला. माळवदावरून बायको पडली असे सांगून तिच्यावर उपचार केले. दैवा आठ दिवसात बरी झाली. पण तेव्हापासून तिची नजर बदलली. कोरडी विहीर असावी तशी नजर.. खोल, भेदणारी..... पण निर्विकार. बापाने चार दिवस घरी नेले. पाण तिचे बोलणे, हसणे पार संपले होते. सासरी आली तरी कुणाशी बोलत नसे. मनात आले तर कामाला हात लावाणार. एरवी झोपून राहाणार. नवरा मनातून घाबरला होता. त्याला भय वाटे की हिने जिल्ह्याच्या पोलिस ठाण्यात तक्रार केली तर काही खरे नाही. त्या परिस आहे तशी सांभाळावी. पण दैवाने नवऱ्याशी बोलाणे साफ तोडले. असे एक वर्ष गेले. एक दिवस हनुमान सुरेखशी साडी, बांगड्या घेऊन आला. येताना मिठाई आणली. बायकोला साडी दिली. दैवाच्या ओठावर फिकी रेषा चमकून गेली. रात्री हात धरुन खोलीत गेले. जवळ घेऊन सांगितले, "देवा, आपलं नशीब उघडलं. मला बँकेतलं कर्ज मिळतेय. लोन म्हनतात त्याला. बायांच्या नावानं लोन मिळतय. तुज्या नि माज्या दोघांच्या नावावर कर्ज उचललायचंय. आपण नवी गाडी घेऊया. आता दारु फिरु समदी सोडणाराय मी. तुला डागदराकडे नेईन. औषधापाणी करीन. म्होरल्यासाली पाळणा हललाच पाहिजे बघ घरी......."
दैवाला वाटले जणू आजच लग्न झालेय. गोड गोड बोलणे ....... गोड गोड लाड. दुसऱ्या दिवशी चुलत सासरा, सीताराम काका, हनुमान, त्याचे दोन मित्र नि दैवा तालुक्याला आले. कोणत्याशा हापिसात गेले. तिथला थाट, सुटाबुटातली माणसे पाहून दैवाची जीभ पार चिक्कून बसली. कोट घातलेल्या सायबानं विचारलं "बाई तुला या कागदावर लिहिलेलं वाचून दाखवलं का?. "देवाची मान खालीच. "व्हय म्याच दाखवलं. मी मानलेला भाऊ हाय बाईचा" हनुमंताचा मित्र बोलला.
"बाई तुमची तक्रार नाही का?" साहेब.
"............" दैवा.
"हं. करा इथं सही." साहेब.

 सही बरीक करता येई. तेवढीच काय ती अक्षर ओळख. सामोर कागद. नोटेच्या कागदासारखा करतरीत. वर निळ्या रंगाच्या गिचमिट रेघोट्याच की! कारण काय अक्षर लिहिली आहेत, हे कुणाला कळत होतं? रांगोळी काढावी तशी सही करता यायची तेवढेच ! पण आज सहीची रांगोळीपण आठवेना . शेवटी साहेब म्हणाले अंगठा लावा बाइंचा. दैवाने अंगठा उठवला. सगळे बाहेर आले चुलत सासरे म्हणाले, "हनुमंता, चार दिवस माहेरी नेऊन घालतो पोरीला. पैशे आले की गाडी घेऊ नि मग पोरीला आणू." सासऱ्यांनी माहेरात नेऊन घातले. चापाणी झाले. निघताता दैवाच्या वडिलांचा हात धरुन विनवले, " इवाइंबुवा तुमची लेक तुमच्या दारात आणून घातली. तिचं काय करायचं ते तुमीच बगा. आताच तालुक्याच्या गावाला काडीमोड घेऊन आलो. तुमची पोर गेलं सालभर येड्यासारखी वागती. बायको असून नसल्यासारखी. माझा पुतन्या तरुण हाय. धट्टाकट्टा हाय. त्याला बी संवसार करायची हौस हाय. पन तुमची पोर दगड घेऊन हिंडती... कामाला हात लावीत नाही. हसती तर हसतीच नि रडती तर सडतीचं. तवा मान मोकळी करून घेतली आमी. सायबासमूर सही घेतलीया......."

 चुलत सासरा तरातरा निघून गेला. वडील डोक्यावर आभाळातून दगड कोसळावा तसे बघत ऱ्हायले. शुद्ध गेल्यासारखे. आई दाराआडून ऐकत होती. ती भिंतीवर डोकं फोडून घ्यायला लागली. रडायला लागली. थोड्या वेळात गाव जमा झालं. बायाबापड्या, माणसं, लेकरं. दैवा मात्र दगडासारखी निमूट बसून होती. डोळ्यातले पाणी मात्र आटून गेलेले. आता कसे व्हाणार ते ? बाया आईला म्हणत, पोरीला बाधा झाली. कुणालातरी
दाखवा. पण त्यालाही पैसा लागतो. वडील आणि आईचे बोलणे चाले. ही लेक अशी माघारी आली. त्यातून वेड्यागत वागते म्हणून सासऱ्याने आणून घातली. धाकट्यांची लग्न कशी जमायची? हाच घोर त्यांना जाची. दैवाला सारे कळे. पण बंद ओठ एवढे कुलूपबंद झाले होते की मनात आले तरी ते उघडत नसत. मनातल्या मनातच काय ते बोलायचे. शेवटी एका रात्री मनात वेगळाच विचार आला. पहाटे डबडे घेऊन पांदीकडे गेली ती माघारी परतलीच नाही. साखर कारखान्याजवळ येईस्तो उन्हं चांगली भाजायला लागली होती. पाय जडावून गेलेले. पोटात भूक. एका झाडाखाली बसली. थकलेल्या जिवाला कधी झोप लागली ते कळलेच नाही. कुणीतरी हलवून उठवीत होते. डोळे उघडले तर एक बाई हाताला धरुन हलवीत होती. आणि विचारीत होती, "ए पोरी.. कुणाची हाईस ? कुठ निगालीस ? पळून चाललीस जनू ? जिकडे तिकडे लायटी चमकायला लागलेल्या अंधार चोहोबाजूंनी भरून आलेला. उरात भीतीचा पूर भरून आला. त्या बाईच्या हाताचा आधार खूप हवासा वाटला.

 "चल माय माज्या संग, जेऊन घे." बाईचा मऊ आवाज. दैवाला धीर आला. तिच्या बरोबर ती शेजारच्या झोपडीत शिरली. आतला थाट वेगळाच होता. मोठा पलंग. जवळ रंगीत टी.व्ही. स्वैपाक घरातली भांडी चकचकीत. दोन तरुण पोरी वेणीफणी करीत होत्या. दैवा सगळीकडे नजर टाकीत पोटभर जेवली. रात्री जाग आली तेव्हा ती बाई कुणाला तरी दबल्या आवाजात सांगत होती. "पोरगी जानजवान हाय. गोरी बी हाय. महिना पंधरा दीस खुराक दिला की दहाजणीत उठून दिसंल. मा बगा एकांदा टरकवाला. भोवनी झाली की तिकडंच टाक म्हणावं लाइनीला. मला तामुर दोन हजार नेक पायजेत ........"

 दैवाचं मन ऐकता ऐकता थिजून गेलं. पहाट उठून डबा हातात घेऊन संडासला म्हणून गेली. ती झाडाझुडपातून लपत छपत सकाळला डांबरी रस्त्याला लागली. हा रस्ता ओळखीचा होता. तालुक्याला जाणारा. उन्हं डोक्यावर आली तेव्हा ती कोर्टाच्या दारात उभी होती.

 तिने ऐकले होते की कोरटात गेले की बायांना मदत करतात. पण इथे तर नुसती गर्दी. काळे कोट घातलेल्या माणसांची, बायाबापड्यांची नि पुरुषांची. दुपार टळून गेली. संध्याकाळ झाली. कोर्ट बंद झाले. दैवा
समोरच्या धरमशाळेच्या पुढ्यात पदर तोतोंडावर घेऊन पडून राहिली. दुसऱ्या दिवशी नळावर तोंड धुतले. गटा गटा पाणी प्याली. आणि परत कोर्टाच्या आवारापुढे थांबली. काल ज्यांनी तिला पाहिले होते त्यांना वेगळीच शंका आली असावी. ते नाव विचारायचे. गुपचुप नोट दिसेल अशी दाखवायचे. पण एक माणूस बरा भेटला आणि ती आमच्या संस्थेत दिलासा घरात आली.

..... दैवानं चहा पिऊन टाकला. मान खाली घालून म्हणाली, "ताई माझं चुकलं. एवढ्यावर माफी द्या. उद्यापासून मी शिवणक्लासला जाईन, समदं करीन."

 पण दैवाचं मन संस्थेच्या शिस्तीत रमलं नाही. तिला पाटी पेन्सील नकोशी वाटे. सकाळची प्रार्थना तर मुळीच आवडत नसे. "कशाला हवं परार्थना ! काय देतो देव ? आन आसतो तरी का ? असेल माजा हरी नि देईल खाटल्यावरी असं खेड्यातली मानसं म्हनतात. त्यांचा जीव 'हरी हरी' जपण्यात चाललाय. पण हरी देतो का सुख ? देतो आयती भाकर? कळतं तवापासून मी देवाला दंडवत घालते. काय दिलं त्याने मला ? घर की भाकर ?" ती विचारी.

 आमच्या दिलासा घरात आल्यापासून जीभ मात्र चांगली लवलवायला लागली होती. ओव्या छान म्हणत असे. माहेर संमेलनात धावण्यात पहिला नंबर पटकावला होता. पण दर दोनचार दिवसांनी झटका येई. मग आरडाओरडा कर, तर कुणाशी वचावचा भांडे. लहान लेकरांना - तेही दुसऱ्या बायांच्याच, भरपूर बदडून काढी. अद्वातद्वा शिव्या देई. असले चाळे चालत. शिवाणासाठी तर जात नसेच. एका सकाळी दिलासातून ती नाहीशी झाली. आम्ही पोलिसात कळवले. शोधाशोध केली पण तपास लागला नाही.

 दिवस जात होते. पण कधी कधी दैवाची आठवण येई नि मन खारे होई. आपण या पोरीच्या मनाला दिलासा देऊ शकलो नाही. तिची समजूत घालू शकलो नाही याची खंत मनाला बोचत राही. नवऱ्याने तर दुसरे लग्न केले होतो. बापाने गाव सोडून मुंबईचा रस्ता धरला होता.

 एक दिवस संस्थेतला ड्रायव्हर सांगत आला. "ताई परवा दैवा दिसली होती. पंजाबी डरेस होता अंगावर. मांजरसुंभ्याजवळच्या हॉटेलात
चहा प्यायला थांबलो तर, आत ही. आम्हाला पाहून जी आत गेली ती बाहेरच आली नाही. ती कारखान्यावरची बाई, मागं पोलिसांनी हाकलली नव्हती का ? तिनंच मांजरसुंब्यान ढाबा खोलला आहे. दैवाबी तिथच रहाते जनु ..... जाऊ द्या. ज्याचं नशीब त्याच्या बरुबर." असं म्हणत ड्रायव्हरने उसासा टाकला नि तो कामाला लागला.


 दैवाला मानसोपचार तज्ज्ञाला दाखविण्याचे आम्ही ठरवले होते. एका प्रकरणाच्या बाबतीत आम्ही त्या मुलीच्या पालकांना नांदेडच्या मानसोपचार तज्ञांकडे पाठवले होते आणि त्यांच्या उपचारांचा योग्य परिणामही झाला. ती मुलगी परत नवऱ्याकडे नांदण्यास गेली नाही. तशी अपेक्षा नव्हती. पण तिने स्वत:च्या चिमुकल्या मुलीवर राग काढू नये, तिला सतत मारू नये आणि स्वत: काही उद्योग करावा ही पालकांची इच्छा होती. दोन वर्षाची असताना संस्थेत दाखल झालेली ती छबकडी आता पाचवीत शिकते आहे. तिची आई छोटेसे दुकान चालवते. भावाच्या व आईच्या मदतीने स्वतंत्रपणे प्रपंच चालवते. दैवाने आम्हाला संधीच दिली नाही. जर तिलाही अशा तऱ्हेचे उपचार मिलाले असते तर कदाचित ती अशा तऱ्हेच्या व्यवसायात अडकली नसती. पण असेही मनात येतं, स्त्रियांनाही शारीरिक स्तरावरील इच्छा आकांक्षा असतात. तरुण वयात त्या बळावतात. त्यातून समागम सुखाचा अनुभव घेतलेल्या तरुण परित्यक्तांना शारीरिक भावनांतून होणारी गुदमर अधिक त्रासदायक होते. मनस्विनीसारख्या संस्था आर्थिक पुनर्वसन सहजतेने करु शकतात. पण अशा स्त्रियांचे भावनिक पुनर्वसन कसे करायचे? हा प्रश्न नेहमीच अस्वस्थ करतो. आणि या प्रश्नाविषयी खुलेपणानी बोलणे संस्थेच्या दृष्टीने धोक्याचे आणि गैरसोयीचे वाटते. ग्रामीण परिसरात परित्यक्ता स्त्रियांसाठी काम करणे ही जणू एक परीक्षाच. दाटलेली संध्याकाळ. भणाणणारे वारे. दिवली पदराआड झाकून पल्याड न्यायची आहे. दिवली विझता कामा नाही नि पदरही जळता कामा नाही.

 ही एक दैवा आम्हाला माहीत झाली म्हणून ! अशा हजारो, 'दैवा' घर ... आपलं घर शोधताहेत ! त्यांना मिळेल का घर ? की रस्त्या .. रस्त्यावरचे ढाबे ..., चहाची दुकाने ..., हॉटेलंच त्यांनी सजवायची ? त्यांचे दैव कुणाच्या हाती?