आपले आभाळ पेलताना/कहाणी निर्मलाची
निर्मला मातोळेबद्दलच्या बातम्या अधूनमधून कानावर येत असतात. ती पुण्याला अमूक कंपनीत काम करते. पगार बरा मिळतो, चुलत भावाच्या घरी राहाते इत्यादी. एक दिवस अचानक त्या कंपनीत तयार होणाऱ्या पदार्थांचे पॅकबंद पुडे घरी आले. सोबत वार्ताही आली की निर्मला संस्थेच्या दिलासा घरात येऊन गेली. कंपनीत तयार होणाऱ्या गुलाबजामून, जिलबी, इडली, इत्यादी पदार्थाच्या पावडरीचे पुडे तिने आणले होते. स्वत: गुलाबजाम तयार करुन दिलासा घरातील सर्वांना खाऊही घातले. आणि एकेक पुडा भाभीसाठी.. म्हणजे माझ्यासाठी फारफार आग्रहाने पाठवला. मी प्रश्न केला.. "निर्मलेला घरी का आणलं नाही? नाहीतर मी आले असते भेटायला. निदान कळवायचं तरी."
बाई तुमच्यासमोर यायला संकोच वाटतो पोरीला. शिवाय रात्रीच्या बसनी पुण्याला जायचं होतं. ड्यूटीला हजर राहायचं होतं. गंगामावशीनी.. मानवलोकच्या मम्मीने सांगितले. ही मम्मी म्हणजे गंगामावशी पवार. मम्मी आणि निर्मला यांचे नाते सख्ख्या मायलेकींपेक्षा जवळचे होते. एक दिवस मम्मीच्या तोंडूनच कळले की संस्थेच्या बालसदनमध्ये वाढलेला, थोराड बांध्याचा अनाथ मुलगा बाबू आणि निर्मला पुण्याला एकत्र राहातात. हे सांगताना मम्मींची मान खाली गेलेली. आवाज काहीसा कापरा झालेला. "काय करावं बाई ? आपलंच मीठ आळणी. या पोरींसाठी काय कमी उस्तवाऱ्या केल्या ? लातूरला काय कमी खेपा झाल्या ? आणि बब्याला तर लहानाचं मोठं केलं. दहावीपसवर ढकलीत आगलं. आन बघा काय वाढून ठिवलं त्यांनी आपल्या ताटात ? बाबूपरीस ही पोरगी सात आठ वरसांनी वडील असंल. तरी देखील असं वागावं तिनं ? हितंसुद्धा बाबूला जेवण वाढाया लगीबगी उठायची. त्याच्यासाठी चांगलंचुंगलं बाजूला काढून ठेवायची. मला वाटायचं की वडील भैनीप्रमाणे करतेय. पण झालं वेगळंच ... ताई नसिबाचे भोग बरे म्हणायचे, एवढा या शरीराचा भोग.. रोग तरास देतो. त्यानंच असं काहीबाही घडतं." मम्मी सांगत होती.
निर्मला पुण्याला जाऊनही सहासात वर्ष होऊन गेली आहेत. गेल्या दहा अकरा वर्षात सुमारे पावणेदोनशे निराधार , एकाकी, गरजू स्त्रिया दिलासाघरात राहून गेल्या. त्यांच्या कहाण्या, तिथेच आणि त्यांच्यातीलच एक होऊन राहाणाऱ्या मम्मीच्या ओठावर असतात. पण त्यातील काहींची आठवण मात्र तिला नेहमीच येत राहाते,... सतावीत राहाते. निर्मलाची कहाणी अशीच. सतत आठवत राहाणारी. तऱ्हेतऱ्हेचे प्रश्न समोर खडे करणारी. कहाणी आडदहा वर्षांपूर्वीची. पण आजही डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहाते.
... "भाभी, निर्मला मातोळेला आपल्या दिलासा घरात राहायला यायचेय. तिने मांडव्यांच्या बालवाडीताई सोबत निरोप पाठवलाय. ... आठवते ना निर्मल ? ती औशाची केस. महाराष्ट्र भर गाजलेली. मग काय पाठवू निरोप?" पलीकडून दामिनी, आमच्या मनस्विनी महिला प्रकल्पातील कार्यकर्ती, जिला आम्ही संवादिनी असे म्हाणतो, ती विचारीत होती. खरे तर हा प्रश्न विचारण्याची गरज नव्हती. परंतु आपल्या कोणत्याही कामात, 'व्यक्तिमत्त्वाची' बाब अगदी आतून नको तितकी आणि नकळत मिसळलेली असते. आपण हा उपचार पाळतो. मग त्याचीही सवय होऊन जाते. तो न पाळणे गंभीर बाब ठरते.
"अगं, तिला प्रवेश देऊन फोन करायचास. गरजू स्त्रीला अर्ध्या रात्री आधार देऊन दिलासा देणारे घर म्हणतो ना आपण ? मग?" माझी ही वाक्यं सुद्धा आता 'ध्वनिमुद्रित' झाल्यासारखी तोंडातून बाहेर पडतात. मी फोन ठेवला आणि माझ्या मनात निर्मलेचा कोरा चेहरा आकारू लागला.
...डोक्यावरचे केस पूर्णपणे कापून गोटा केलेला. त्यावर फोड आलेले. खोबणीत जाऊन बसलेल्या डोळ्यातली विलक्षण जिवंत पण बिथरलेली नजर. निर्मलेला पाहाण्यासाठी गावांतल्या अर्ध्याहून अधिक महिला वैद्यकीय महाविद्यालयाच्या दवाखान्यात गर्दी करून गेल्या होत्या. महाराष्ट्रातील प्रत्येक वर्तमानपत्रात, तिच्यावर लादलेल्या मृत्यूसमान तुरुंगाची,... सहा महिन्यांच्या अंधारकोठडीची भीषण कहाणी नोंदवली गेली होती. त्या वर्षीच्या गणेशोत्सवात तिची कहाणी सांगणारे करुण देखावे मांडले गेले होते. अशी निर्मला, वडिलांच्या घरून संस्थेत येऊ इच्छित होती. का? ते तर तिचे माहेर होते. तिथेही ती उपरी होती का? दुसऱ्याच दिवशी मोठ्या बहिणीला बरोबर घेऊन ती संस्थेत दाखल झाली. दवाखान्यात होती तेव्हा डोक्याचा पार गोटा होता. गेल्या चार महिन्यात डोईवर थोडे काळे केस आले होते. डोक्यावर पदर घेतला तरच तिच्याकडे बघवत असे. एरवी काळजात घालमेल व्हावी असा अवतार. सतत रडून रडून डोळ्याभोवती काळेपणा आलेला. सूज आलेली. एका डोळ्यात फूल पडले होते. हाताची कोपरे आणि पायाचे गुढगे सततं त्यांवर लोखंडी बता मारल्याने हिरवेनिळे पडलेले होते. मुळात चांगली उंची नि दुहेरी हाडाचा बांधा. पण आता एवढी काटकुळी झाली होती की फुंकर मारल्यावर उडून जावी! तिचा हात मम्मीने हातात घेतला, पाठीवरून हात गिरवला. आणि दोघीचे डोळे भरभरून वाहून लागले. आमच्या नेहमीच्या रीतीनुसार दोनतीन दिवस तिला फारसे प्रश्न विचारायचे नाहीत आणि दिलासा घरातील वातावरणात मिसळून जाण्यास मदत करायची असे ठरले. आणि दोनच दिवसात मनाच्या सगळ्या कड्या उकलल्या. मोकळ्या झाल्या. तिच्या चेहऱ्यावर तरतरी आली. दिलासा घरात आलेली महिला आमच्यात मिसळून जाण्यासाठी सर्वात महत्वाची मदत होते मम्मीची. मम्मीचे नाव गंगाबाई. वयाच्या नवव्या वर्षी लग्न झाले आणि सालभरात नवरा खर्चला. वैधव्य आले. तेव्हापासून दिराच्या नाहीतर भावाच्या दारात कष्ट करुन, दिल्या अन्नात आनंदी राहायचे ही हजारो वर्षापासून चालत आलेली रीतं गंगाबाईनेही मनोमन पाळली. दुसरे काय होते हातात ? १९७५ चा सुमार. डॉ.लोहिया 'आणीबाणी वासी' होते. १९ महिने गजाच्या आड. आणि नेमक्या त्याच काळात संस्थेला बालसदन चालवण्याची परवानगी मिळाली. माझ्या नजरेने या मम्मीला केव्हाच हेरून ठेवले होते. आणि दिवाळीत गंगाबाई ९ बालकांच्या मम्मी झाल्या. गेल्या वीस वर्षापासून त्या मानवलोक परिवाराच्या मम्मी... मायमाऊली झाल्या आहेत. हजारोंच्या पोटात मम्मीचे प्रेमळ हात पोचले आहेत. आमची अडाणी मम्मी अनुभवातून खूप काही शिकली. अनुभवातून सुदृढ आणि सुजाण झालेला तिचा मायेचा आधार दिलासातील मुलींना अधिक मोकळं करतो. अधिक बोलकं करतो.
निर्मलाही दोन दिवसात हसू लागली. धिटाईने बोलू लागली. स्वत:ची कहाणी सलगपणे सांगण्याची, त्यातील संगती शोधण्याची समज तिच्यात आली.
निर्मलेचं घर खाऊन पिऊन टंच. वडिलांच्या दारात बैलबारदाना बांधलेला. पडवीत एक गाय नि दोन म्हशी. वडील ग्रामपंचायतीत निवडून येणारे. बाहेरची बैठक आणि आत अंगण, त्या पलीकडेच स्वैपाकघर, न्हाणी, कणग्यांच्या खोल्या. बैठक नि अंगण यामध्ये जाड चवाळ्यांच्या पोत्याचा पडदा टांगलेला. बायामाणसांनी परगावी.... माहेरी वा सासरी जाताना पायातल्या चपला हातांत धरून डोकीवरचा पदर अंगभर लपेटून किंचित वाकून, बैठकीतून बाहेर पडायचे हा रिवाज. वडिलांनी मुलींना शाळेत बरीक घातले. पण ती 'शहाणी' होईस्तो. म्हणजे मासिक पाळी सुरु होईपर्यंत. थोरली श्यामी सातवीपर्यंत शिकली. पण निमूला सहावीतच नहाणं आलं नि ऐन परीक्षेच्या तोंडावर घरी बसावं लागलं. लगेच धावाधाव सुरू झाली. औशाच्या पोलिस हवालदाराचा मुलगा. त्याचीही पोलिसखात्यात निवड होणार होती. पांढरीत स्वतःचे घर आणि काळीत आठ एकराचं शिवार. सारं छान होतं. भरपूर पैसा लावून पोरगी उजवून सावळे पाटील मोकळे झाले.
तेरा चवदा वर्षाच्या मुलीला विवाहानंतरचे जीवन नवेच असणार. काही माहीतच नव्हते असे नाही. श्यामी ताईने सांगितले होते, "गाईवर जसा बैल चढतो ना तसेच सारे, त्रास मात्र खूप होतो. पण मग होते सवय हळूहळू" खेड्यातील मुलींच्या भवताली कुत्री, मांजरं, गाढवं, म्हशी, गायी, कोंबडे यांचा कमी का गोतावळा असतो ? त्यातून खूप काही सहजपणे कळत असते. निमुला त्या गोतावळ्यात आपणही असतो हे कळू लागले. पण नवरा पोलिस व्हायच्या आधीच ऐट करी. घरी पिऊन येई. राडीतांड्यावरून पहिल्यां धारेची रोज घरी येत असे. लाडका लेकही बापाबराबर साथीला असे. रोज कोल्हापुरी मसाल्याचं मटण लागे. कधी कधी या साऱ्याची एवढी किळस येई की डोंगरात जाऊन बकाबका ओकावसं वाटे. निमू माहेरी आलेली तिला वाटायचे एक आठवड्याचा एक दिवस व्हावा नि अशा दिवसांचा एक महिना माहेरी राहावे. सासरी गेलेली मुलगी माहेरवाशीण म्हणून घरी आली की तिला खूप मोकळेपणा असे. गावात कुठेही हिंडता येणार ... मैत्रिणीकडे जाता येणार ... शेतात फेरी मारायला आडकाठी नाही.... सारे कसे मोकळे नि छान. पाहाता पाहाता वर्ष निघून गेले.
लग्नात ११००० रु. रोख, तीन तोळे सोने, वधू वराचे कपडे, मानपान, दोहोकडंचा खर्च, एवढे सारे करूनही निर्मलाच्या सासरच्यांची भूक भागलेली नव्हती. वर्षसणाच्या निमित्ताने मोटारसायकल माग असा लकडा त्यांनी मुलामागे लावला. आणि मग निर्मलाला मारहाण करणे सुरू झाले. सासू-सासरे, नणंद यांचे कुजकट बोलणे तर नेहमीच सहन करावे लागे. निर्मला पैसे आणण्यासाठी माहेरी जाण्याचे नांव काढीत नाही असे पाहून ९ ऑक्टोबर १९७८ रोजी तिच्या वडिलांना 'निर्मला मरण पावली' अशी तार केली. तात्काळ आई-वडील रडतभेकत औशाला आले तर तिथे निर्मला समोर दिसली. कारण विचारताच मुलीची नांदणूक व्हायची असेल तर मोटारसायकल द्या अशी मागणी केली. निर्मलाच्या वडिलांनी नाइलाजाने ४ एकर जमीन विकली आणि जावयाला ४००० रु. दिले. उरलेले पांच हजार रुपये लवकर देतो असा हवाला दिला. परंतु ते वेळेवर देणे जमले नाही. मारहाण, शिवीगाळ यांच्या वर्षावात निर्मला मुकाट्याने आला दिवस पार करीत होती. दोन वर्ष निघून गेली. निर्मलाच्या नवऱ्याने जवळच्याच खेड्यातील मुलीशी दुसरा विवाह केला. नवी नवरी निर्मलाच्या सासूची लांबची भाची म्हणून घरात आली.
निर्मलाला ताकीद दिली गेली की, सवतीची ओळख मावसनणंद म्हणून करुन द्यायची. जर तिने खरी गोष्ट सर्वांसमोर आणली तर तिचे तुकडे करून टाकले जातील असा सज्जड धाकही घातला. दरम्यान निर्मलाचे सासरे पोलीस नोकरीतून सेवानिवृत्त झाले व त्यांनी आपल्या मुलास सुधाकरास पोलिस खात्यात नोकरी द्यावी यासाठी खटपट केली. त्यास यश आले आणि सुधाकरची पोलिस प्रशिक्षणासाठी निवड झाली.
निर्मलाव्यतिरिक्त सारे घर सुखात होते. मुलाची पोलीस भरतीत निवड झाली. त्याला दुसरी बायकोही मिळाली. आता निर्मलेची अडचण मात्र सर्वांना जाचू लागली. तिचा खंगलेला चेहरा, खाली पाहून निमूटपणे काम करत राहाण्याची वृत्ती, सतत रडणारे डोळे पाहून सासऱ्याला वाटले की हिला पहाटे मारहाण करून हाकलून दिले तर ती एखादी विहीर गाठील नि प्रश्न सुटेल. पण झाले वेगळेच. सासरा, नवरा ... सासू यांनी तिला मारहाण करून पहाटेच्या अंधारात बाहेर काढले. जीव देणे अवघडच असते. जीवाची आशा कोणाला नसते ? निर्मला पाय ओढीत वडिलांच्या मित्राच्या जावयाकडे बहिणीच्या मैत्रिणीकडे गेली. तो औशातच राही. तिची दशा पाहून मित्राची मुलगी व जावई द्रवले. तो दिवस तिने त्यांच्या घरीच काढला. जावयाने तात्काळ सासऱ्यांना व निर्मलाच्या वडिलांना बोलावून घेतले. त्याच काळात जिल्ह्याला अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस प्रमुख लाभले होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट निर्मलाच्या वडिलांनी घातली. त्यांनी प्रकरणाची शहानिशा करून सुधाकरची प्रशिक्षणासाठी झालेली निवड रद्द केली. सुधाकरला तात्काळ घरी पाठवले.
निर्मलेला घेऊन वडील मांडव्याला परतले. मांडवा डोंगरातलं लहानसं खेड. मातोळे पाटलांच्या घरातला हा बखेडा कुणालाच माहीत नव्हता. माहेरवाशीण चार दिवसांसाठी आली तर लाडाकोडांची. पण महिनोन्-महीने राहिली तर त्याची चर्चा होते. घरच्यांना टोमणे बसतात. तसेच होऊ लागले. त्यात सुधाकरच्या बापाचा ... सासऱ्यांचा दोनदा सांगावा आला. निमूच्या सवतीला ... मावसनणंदेला त्यांनी परत पाठवले होते. निर्मलाने परत यावे असा आग्रह त्यांनी धरला. घरी आई नि मोठी बहीणं म्हणत की बाईचा हट्ट किती चालणार? शेवटी मारतो तो आपलाच नवरा. बाहेरचा तर कोणी मारत नाही ना ? नवराच बायकोवर हक्क दाखवणार. निमूलाही सुधाकराची आठवण येई. कित्येक दिवसात .. महिन्यात ... दोन वर्षात त्याची संगत मिळाली नव्हती. सासऱ्यांचा सांगावा तिने झेलला. आईकरवी वडलांना निरोप दिला की औशाला नेऊन घाला, पोचती करा. नाहीतरी म्हणतातच की बाईचा जलम, चुलीतल्या ढलपीचा, मुक्याने जळतांना, राख व्हावे. निमूची औशाला पाठवणी झाली. सासरचे वातावरण होते तसेच होते. ती दुसरी बया बरीक नव्हती. सासरा गोडीने सांगे की झालं गेलं विसरुन जा. जर तू औरंगाबादच्या मोठ्या सायबांना सांगितलं तर सुधाकरला परत ट्रेनिंगला घेतील. ट्रेनिंग संपलं की बदलीच्या जागी नवं घर करून देऊ. सासूचा त्रास सुटेल. नवा संसार सुरू होईल. सुधाकर ही हेच सांगे. कधीकधी कांगावा करी.
निमू सासरी परतल्यानंतरची दोन वर्षे माहेरशी संबंध नव्हता. ना माहेरी जाणे वा माहेरच्यांनी लेकीला पहायला येणे. त्यात अधिकाचा महिना आला, जावयाने ठरवले की अचानक निर्मलाच्या वडिलांच्या ... सासऱ्यांच्या दारात जायचे, अधिकाचे धोंडे खाऊन मोटारसायकलच्या पैशांची वसुलीही करून घ्यायची. सुधाकर एक दिवस अचानक सासऱ्याच्या दारात मोटारसायकल घेऊन उभा राहिला. निमूला बालाजीला पाठवल्याचे सांगितले. सारे काही झकास चालले आहे, याचा निर्वाळा दिला आणि मोटारसायकलचे हप्ते भरले नाहीत तर गाडीवर जप्ती रोईल, असेही सांगितले. सासऱ्याने इकडून तिकडून हातमिळवणी करून दोन हजार रुपये जावयाच्या हातात ठेवणे. पुरणाच्या धोंड्याचे वाण जावयाला दिले नि बोळवण केली.
.... निमूला यात्रेला नेण्याचा देखावा सासूने केला. पण तिची बालाजीची यात्रा झाली वरच्या मजल्यावरच्या अडगळीच्या खोलीत. त्या खोलीत निमूला कोंडून ठेवले. सर्व खिडक्या बंद, दाराला कुलूप, विधी करण्यासाठी एक घमेले ठेवले. एका भिंतीच्या वरच्या व्हेंटिलेटर मधून जाळीमधून हवा नि उजेड येई त्याचीच काय ती सोबत. रात्री बारा वाजून गेल्यावर सासू येई. दरवाजातून एक चतकोर भाकरी, वाटीभर पाणी देई. दिवसभरातील घाण नाकाला पदर लावून इकडे तिकडे बघत बाहेर टाकी. पुन्हा दरवाजा बंद. असे महिन्यांमागून महिने जात होते. चार महिने झाले तरी निमूला मारून टाकून तिची विल्हेवाट कशी लावायची याचा मार्ग सापडत नव्हता. सुधाकर नि त्याचा बाप दोघेही पोलिस विभागातले. त्यामुळे कायद्याची भीतीही वाटत असणार. निमूला मारुन तिचे तुकडे करुन ते बाहेर नेण्याचाही घाट घातला. सुधाकर तसा बिनडोक्याचा. त्याने कडबा कटर आणला आणि रात्री एकदीड वाजता तिच्या हाताच्या बोटाचे पेर कडबाकटर मधून कापले. जीवाच्या आकांताने ती किंचाळली नि मग सारे घरच घाबरले. तिचा आवाज आजूबाजूच्या लोकांनी ऐकला तर धोकाच होता. मग कडबाकटरचा बेत रद्द झाला. निमू उपासमार, घाण यांनी ... 'नैसर्गिकरीत्या' मरावी म्हणून इतरही उपाय केले जात. तिला मुंग्या लगाव्यात म्हागून भोवती साखर पेरली. तिचे मन खचावे म्हणून समोर कॉट ठेवून त्यावर जाते, दगड बांधलेला बिछाना वगैरे सामान ठेवले. सहा महिने उलटले डोक्याला तेल नाही. अंगाला पाणी नाही. पोटात रोज वाटीभर पाणी नि चतकोर भातरीचा खुराक जात होता. त्यामुळे अंगावरचे नसलेले मांसही झडून गेले. डोळे खोल गेले.
निर्मलाला मारुन टाकून विल्हेवाट लावण्यापूर्वी खुनाच्या आरोपात अडकू नये याचीही खबरदारी घेतली होती. स्थानिक वर्तमानपत्रात निवेदन दिले की, आमची तरुण सून बालाजी यात्रेला गेली असताना तिथे हरवली. ती सापडली नाही. कोणाला सापडली तर त्याने कळवावे. इनाम मिळेल वगैरे... माणसाच्या शरीरातील आणि मनातील जीवेच्छा इतक्या बळकट असतात की प्रतिकूल वातावरणातही माणूस जीव जगवत राहातो. जपत राहातो. निमूही जगत होती. मरावेसे वाटले तरी जगत होती.
एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि न्याय मिळवून देणारा अधिकारी त्या जिल्ह्यात काम करीत होते. त्यातूनही एका तरुण अधिकाऱ्याच्या कारकीर्दीची सुरुवात असल्याने एक विलक्षण धडाडी त्याच्या कार्यपद्धतीत होती. जिल्ह्याच्या बाहेरही त्यांच्या नावाचा बोलबाला होता.
या बाबीचा फायदा निमूला नकळत मिळाला. आता या प्रकरणाबाबत अभ्यास करीत असताना आमच्या लक्षात आले की निमूच्या सुटकेच्या मुद्यावर काही 'रंजककथा' रचल्या गेल्या. अर्थात या कथांमुळे मूळ प्रकरणाला बाधा येत नाही. एक कथा अशी.
एक दिवस वरच्या व्हेंटिलेटर मधून ... खिडकीतून एक चेंडू खोलीत टपकला. दुपारची वेळ असल्याने सासू झोपली होती. एरवी मुलांनी माडीवर येऊन वरच्या खिडकीतून डोकावण्याचे धाडस केले नसते. एक पोरगं गुपचूपं वर आलं. बंद खिडकीचा आधार घेऊन व्हेंटिलेटरमधून चेंडू पाहण्यासाठी आत डोकावलं. आतील भेसूर निमूवहिनीचा अवतार पाहून. निमूवहिनीचे जिवंत भूत वरच्या खोलीत राहाते. ते चालते. त्या भुताने त्यास बोलावले. असे मुलाने सांगितले. तो मुलगा घाबरून आजारीही पडला. त्याच्या आईवडिलांनी पोलिसात कळवले आणि मग निमूची सुटका झाली.
निर्मलाने सांगितले ते असे. तिला खोलीत भयानक मारहाण केली जाई. सासूसासरे तिने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडात बोळे कोंबीत व मारीत असत. तिचा सासरा हा सर्व प्रकार पाहात उभा असे. आमच्या मुलाची नोकरी तू घालवलीस. हिची बोटे तोडा, मान तोडा अशी धमकी देत असे. एकदा सासूने तिला पेटवून देण्याचा प्रयत्न केला व तिला पेटविले देखील. पण ती आरडा-ओरडा करील व आपले बिंग बाहेर फुटेल या भीतीने तिच्या सासऱ्याने तिचे कपडे विझवले. नणंद, सासू, सासरे यांच्या जाचाने तिचे मानसिक बळ कमकुवत झाले होते. सासरा बुटाच्या लाथा मारीत असे. सासू तिला तुडवीत असे. अंधाऱ्या खोलीत एकाच जागी तिला बसून राहावे लागत असे. आडवे होऊन झोपायचे नाही, झोपली तर सासू तिचे गुडघे, हाताचे कोपरे, लोखंडी बत्याने सडकून काढीत असे. दररोज तिला रात्रीच्या सुमारास खोली उघडून अर्धी भाकरी नि एक वाटी पाणी तेवढे मिळत असे. त्यावरच ६ महिने ती गुजराण करीत होती. विवाह प्रसंगी निर्मला फार छान दिसत होती. गुडघ्यावर तोंड टेकवून बसल्यामुळे तिच्या गालाला जखमा झाल्या होत्या. एकाच जागी बसून मांड्यांना जखमा झाल्या होत्या. बसलेल्या जागेभोवती साखरेचे रिंगण केल्यामुळे मुंग्या होऊन तिला चावीत असत. एवढा जाच सहन करुनही जर का ती झोपली तर तिला लाथा खाव्या लागत. खोलीच्या बाहेर पडण्यास बंदी असल्यामूळे नैसर्गिक विधी तिला खोलीतच उरकावे लागत. सहा महिन्यात निर्मलाला तोंड धुवायला मिळाले नाही की आंघोळीला पाणी सुद्धा मिळाले नाही. सहा महिने ती एकवस्त्रा होती. कित्येकदा सासूने डोळ्यात तिखट टाकून मारले. ती कोठडीत असताना तिचा भाऊ व वडील तिच्या भेटीसाठी आले होते. परंतु ती घरात नाही परगावी गेली वगैरे खोटी कारणे सांगून त्यांना पिटाळून लावले होते. तू जर ओरडलीस तर तुझ्या भावाला आम्ही मारुन टाकू अशी धमकी तिला राहिली होती. मांडवा गाव एक खेडे. तिथे पेपर कुठला येणार ? त्यामुळे बालाजीला गेलेली निर्मल हरवली असल्याचे सासऱ्यांनी दिले होते, ते त्यांच्या वाचण्यात आले नाही. त्यांना वाटे की निर्मला मजेत आहे.
एके दिवशी तिच्या नणंदेची मैत्रीण घरी आली. तिला घेऊन नणंद गच्चीवर गेली असताना मैत्रिणीने सहज खिडकी उघडली तर आत निर्मला. मैत्रिणीने पाहिले आता ती बाहेर सांगेल म्हणून तिच्या नणंदेने तिला १०० रु.देऊ केले. मैत्रिणीने धाकास्तव पैसे घेतले व कोणाला सांगणार नाही असे म्हटले. परंतु घरी जाऊन तिने सर्व हकीकत आई-वडिलांना सांगितली. मैत्रिणीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांना सर्व हकीगत पत्राने कळविली.
एक दिवस सकाळी ६ वाजता पोलिसांची जीप दारात येउन उभी राहिली. त्यामध्ये एक महिला पोलिसही होती. तिने निर्मलाची चौकशी केल्यावर, सासूने सांगितले की निर्मला घरातून पळून गेली आहे व ते पेपरमध्ये सुद्धा दिले आहे. तो पेपर तिने आणून दाखविला, ती पेपर आणावयास गेली यावेळी तिच्या मागोमाग स्त्री पोलिसही आत गेली. निर्मलेला शोधले. निर्मला सापडली नाही. गच्चीवर अडगळीची खोली आहे असे सांगून त्या खोलीत नेण्याचे सासूने टाळले. परंतु गच्चीवरच्या खोलीत अखेर ती त्यांना दिसली. निर्मलाला खोली बाहेर काढले. त्यानंतर अंबाजोगाईला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार करून तिला माहेरी, सुरक्षित ठिकाणी पाठवले. सुरुवातीस अनेक लोक येऊन भेटत. सहानुभूती व्यक्त करीत. जसजसे दिवस जाऊ लांगले तसतसे एकाकीपण वाढू लागले. दरवेळी .... प्रत्येकाला तीच ती गोष्ट खुलवून सांगण्याचा कंटाळा येऊ यागला नि मग मनात येई, पुढचे आयुष्य कसे जाणार? तिची, एक मोठी चुलत बहीण शकू गावातच दिलेली होती. एका मुलीला जन्म दिला. पंचमीच्या निमित्ताने माहेरी आली ती परत गेलीच नाही. नवऱ्याला बाहेरचा नाद होता. दारूसाठी शेत विकीत राहाणे एवढाच त्याचा उद्योग. तिच्याशी निर्मला मन मोकळं करीत असे. भावाच्या दारात धुणीभांडी घाशीत नि शेतात मरेस्तो कष्ट करीत बसण्यापेक्षा, स्वत:च्या पायावर उभे राहाणे सर्वात सोयीचे असे शकू नेहमी सांगे. निमूने येत्या २/३ वर्षाता पायावर उभे राहावे असे ती म्हणे. एकदा का या भट्टीत आपण शिरलो की पुन्हा सुटका नसते. तिनेच मनस्विनी महिला प्रकल्पाची माहिती निमूना दिली. आपली दु:खी लेक संस्थेत जाणार म्हटल्यावर मातोळे पाटील रागावले. परंतु निर्मलेच्या हट्टापुढे त्यांना हार खावी लागली. आणि निर्मला मनस्विनीत दाखल झाली.
सरकारच्या .. शासनाच्या वतीने तिचे प्रकरण न्यायालयात दाखल झाले होते. अत्यंत धाडसी आणि कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधिकाऱ्याच्या पुढाकाराने प्रकरण न्यायालयात गेले असल्याने, तिच्या मनात आपल्याला नक्की न्याय मिळेल याबद्दल खात्री होती. आम्हीही या प्रकरणी सतत शासकीय वकिलांशी- पी.पी.शी संपर्क साधीत होतो. पण प्रकरण न्यायाधीशांसमोर येत नव्हते. दरम्यान पोलिस अधिकाऱ्याची बदली झाली. आम्ही एकूण अंदाज घेत असताना असे लक्षात आले की बरेच साक्षीदार बदलले होते. वकिलांच्या शब्दातही 'जरतारी' भाषा येऊ लागली होती. अर्धवट शिकलेल्या, त्रासाने खचल्या आहेत, अशा स्त्रिया न्यायालयाच्या पिंजऱ्यात उभ्या राहिल्या की खूप एकाकी होतात. त्यांच्यातील सारे धैर्य अक्षरशः गळून जाते. आमची कार्यकर्ती दरवेळी निर्मलाबरोबर लातूरच्या जिल्हा न्यायालयात जात असे. परंतु त्याचा फारसा उपयोग होत नाही असे लक्षात आले. विरुद्ध पक्षाचा वकील तारीखवारांवर विशेष भर देऊन गोंधळात टाकतो, त्यामुळे घराबाहेरच्या जगाशी अजिबात ओळख नसलेली, अक्षर ओळख नावालाच असलेली बाई फारच भांबावते. वकिलांनी घोटवलेली वाक्ये विसरुन जातात. घडलेल्या गोष्टी आठवेनाशा होतात. शब्दचं उमटत नाहीत. निर्मलाचेही असेच झाले.
..... एक दिवस रात्री दारासमोर रिक्षाचा आवाज आला. पाहुणे अगदीच नवे दिसत होते. पायाने लंगडणारे. डोक्याला चष्मा. "येऊ का आत" असे अत्यंत अदबशीरपणे विचारुन घरात आले. ते होते आरोपीचे .... निर्मलाच्या सासरच्या मंडळींचे वकील. त्यांना आमच्याशी अत्यंत महत्वाचे, .. खाजगीत बोलायचे होते. म्हणून ते लातूरहन रिक्षा घेऊन आले होते. मी तात्काळ आमच्या वकिलांना संस्थेत येण्यासाठी निरोप दिला आणि त्या वकिलांना घेऊन संस्थेत गेले. त्या वकिलांचे नांवं आपण काहीही धरुया. अगदी अबकं किंवा क्षयज्ञ. त्या क्षयज्ञ नं बोलण्यास सुरुवात केली.
"भाभी, मी तुम्हाला नि डॉक्टरना ओळखतो. तुमच्या संस्थेबद्दल ऐकून आहे. मला तुमच्या कामामागची भूमिका कळते. निर्मलावर अन्याय झाला आहे. हे मी पण जाणतो. पण मी वकील आहे. कायद्यातले छक्वेपंजे मला कळतात. तुम्हाला वाटत असेल की राज्य कायद्याचे आहे. पण राज्य माणसाचे आहे आणि माणसे मॅनेज करता येतात. त्यांना विविध प्रकारे फितवता येते. न्याय खेचून कसा आणायचा आणि दोषी माणसांना न्यायालयातून निर्दोष कसे शाबीत करायचे याच्या खुब्या माझ्या इतक्या कोणीच जाणीत नाहीत. माझी ओळख लातूरच्या जाणकार वकिलाला विचारून घ्या.
... पण तरीही तुमच्याबदलचा आदर आणि निर्मलाची निष्पाप मूर्ती मला इथवर घेऊन आली. आम्ही समझोता करण्यास तयार आहोत. पंधरा हजार रुपये रोख, तिच्या माहेरुन आलेली भांडीकुंडी आणि गळ्यातील मंगळसूत्राचे मणी. जे अर्धातोळा भरतील आणि घरातील एक खोली किंवा त्याचे पैसे पंधरा हजार रुपये रोख देण्यास तयार आहोत. विचार करा आणि दोन दिवसात कळवा.
... तुम्ही नकार दिलात तर एवढीच रक्कम खर्चुन न्याय आमच्याकडे खेचून आणू. मानले नाही तर 'हे गेले नि ते गेले' असे म्हणत हात हलवीत बसावे लागेल. शंभरदा विचार करा. असे सांगून क्षयज्ञ निघून गेले. जाताना मला विशेष करून बजावले ते असे.
"ताई, प्रकरण कढईत असते तेव्हा खमंग वास, दहादिशांना पसरला असतो. मग मोठे मोठे मोर्चे निघतात. निषेधाची पत्रके पावसागत कोसळतात. पण आता सारी राळ जमिनीवर स्थिर होऊन बसली आहे. निर्मला मातोळे कोण हेही लोक विसरले आहेत. अशी प्रकरणे फार तर वर्षभर तेजीत असतात. हेही ध्यानात ठेवा."
आम्ही निर्मलाशी चर्चा केली. निर्मला या प्रकरणाला एवढी वैतागलेली होती की, तीस चाळीस हजार रुपये घ्यावे नि प्रकरण कायमचे मिटवून टाकावे असे तिला वाटत होते. आम्हीही तिची बाजू... तिचे मन समजू शकत होतो. वडिलांचा विचार घ्यावा अशी तिची इच्छा असल्याने मातोळे पाटलांना निरोप धाडला. ते आले. त्यांचे म्हणणे असे की लेकीचे एवढे नुकसान केले नि तीस हजारावर बोळवण करतात ? किमान दीड लाख रुपये पोरीला मिळायला हवेत.
ही केस शासनामार्फत होती. आम्ही आमचा वकील देऊ शकत नव्हतो. त्यासाठी करावी लागणारी कार्यवाही अत्यंत किचकट आणि वेळखाऊ होती. तिला नैतिक धाडस देण्यापलीकडे आमच्या हाती काहीच नव्हते. मात्र अंबाजोगाईच्या कोर्टातून पोटगीचा दावा चालू केला होता. निर्मला त्या सहा महिन्यांच्या बंदिवासात इतकी जायबंदी झाली होती की, थंडीत गुडघे नि कोपरं दुखत. डोळे अधू झाले होते.. त्यामुळेच तिला मनोमन वाटे की तो पैसा बँकेत ठेवावा. येणारे व्याज आणि थोडे काम करुन येणारे पैसे यांत गुजराण होईल. वडील मात्र शेवटचा आकडा लाखाचा बोलून तिथेच हटून बसले. व्हायचे तेच झाले. पुराव्याअभावी सुधाकर, त्याचे वडील निर्दोष सुटले. प्रत्येक प्रमुख वर्तमानपत्रांतून ती बातमी ठळक अक्षरांत छापून आली. अत्याचार करणाऱ्यांच्या कठोर हातातली अन्याय करण्याची ताकद आणखीन वाढली. स्त्रियांना न्याय मिळावा यासाठी सतत झगडणाऱ्या कार्यकर्त्या... संघटना व्यथित झाल्या. निर्मला - मात्र वडिलांपासून तुटली. तिने वडिलांना लाखाचा हट्ट सोडण्याची विनंती केली होती. आम्हाला तडजोडीत स्वारस्य नव्हतेच. भूमिका म्हणून तसे करणे कितपत होईल याचा आम्हालाही अंदाज येत नव्हता. कारण "दिलासा घर" सुरू होऊन जेमतेम तीन वर्षे होत होती. आम्हीही शिकतच होतो. पण निर्णय निर्मलाने घ्यावा, तोही आमचा विचार न करता, हे आम्ही तिला पटवले होते. तिला हवे असलेले शांत व सुरक्षित जीवन तडजोडीतून मिळणार असेल तर, ती करावी अशी भूमिका आम्ही घेतली होती. वडिलांच्या हट्टापायी हातचे सारेच गेले. "घी गया और गडवा भी गया"
नंतर मात्र निर्मला अधिक सैरभैर झाली. तिचे मन अंबाजोगाईत गुंतेना. औरंगाबादला दाई ट्रेनिंगसाठी खाजगी व्यवसाय उत्तम रीतीने कराणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे ठेवले. पण त्यातही तिचे मन रमले नाही. कोणत्याही परिस्थितीत वडिलांच्या गावी स्थिर व्हायचे नाही ... राहायचे नाही हे मनात पक्के ठरवले. चुलतभाऊ हडपसरला राहात होता. बाबूही वर्षभरापूर्वी हडपसरला गेला होता. त्याच्याकडून भावाचा पत्ता शोधून काढला. मसाले आणि खाद्यपदार्थ तयार करणाऱ्या कंपनीत पॅकिंग विभागात रोजगारही मिळणार होता. हे सारे संस्थेतील महिलांना सांगण्याचे धाडस निर्मलात निर्माण झाले नाही. खरे तर तिला बाहेरच्या जगाची ओळख व्हावी म्हणून आम्ही शिबिरांना पाठवले होते.. संस्थेच्या हितसंबंधी ताईंबरोबर त्यांच्या मुलीच्या लग्नानिमित मुंबईतही पंधरा दिवस राहून आली होती त्यामुळे एकूण परिस्थितीच्या संदर्भात स्वत:च्या भविष्याचा विचार करण्याची ताकद तिच्यात आली होती. परंतु तरीही स्त्रीच्या मनाभोवती काही कुंपणे असतातच. ती ओलांडणे शक्य नाही.
परित्यक्ता स्त्रियांनी काही काळ स्त्री-पुरुष समागमाचा अनुभव घेतलेला असतो. त्यातील सुख.वा समाधान यांची शरीराला सवय झालेली असते. अशावेळी त्यांच्या भावना समजून घेणे, त्यांच्याशी सतत संवाद साधणे महत्वाचे असते. निर्मलाने बाबूशी विवाह करणे यात गैर काहीच नव्हते. किंबहुना तो अधिक सुखाचा आणि सुरक्षित मार्ग आहे. पती पत्नीच्या वयाचा प्रश्न, त्यांच्या व्यवस्थित संवाद असेल तर, उद्भवत नाही. मम्मी उर्फ गंगामावशीही तिच्या निर्णयाकडे आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागल्या आहेत. पुढच्यावेळी निर्मला इकडे आली की दिलासात चार दिवस माहेरपणाला येईल. मीही तिच्याशी मोकळेपणाने बोलेन. काही दिवसांपूर्वी मम्मी तिच्या बहिणीकडे मुद्दाम जाउन आल्या आणि निमूचा पत्ताही घेऊन आल्या आहेत. मीही आता निर्मला माहेराला येण्याची वाट पाहात आहे.
निर्मलेने भोगलेला कौटुंबिक, सामाजिक आर्थिक, मानसिक ताण आणि त्रास आज एक कहाणी बनला आहे. आज निर्मला स्वतंत्रपणे, स्वावलंबी होऊन स्वत:चे जीवन जगत आहे. हे जगणे अडचणी नसलेले आणि पूर्ण सुखी आहे असे मुळीच नाही. पण अडचणींवर मात करण्याची. जिद्द वा धाडस आणि त्यातून मार्ग शोधण्याचा डोळसपणा तिच्यात आला आहे. निर्मला दिलासा घरात राहात असताना सुरुवातीला तिला होणारा त्रास सासू आणि नणंदेच्या फुशीमुळेच कसा दिला जाई हे ती रंगवून सांगत असे. नवऱ्याला दोष देत नसे. जणू तो एक निर्जीव काठी आणि मारणाऱ्या त्या. पण संस्थेत आल्या पासून, हळूहळू तिच्यात बदल घडत गेला. दर बुधवारी दिलासातल्या महिला कायदा सल्ला घेण्यासाठी व वेगवेगळी कौशल्ये शिकण्यासाठी येणाऱ्या महिला एकत्र बसत. गप्पा, गाणी, खेळ यांच्या बरोबर एखादा नव्याने आलेल्या प्रकरणाची वा वर्तमानपत्रातल्या स्त्री अत्याचाराच्या बातमीची चर्चा करीत. सती प्रकरणाची चर्चा तर दोन तीन बुधवारी सतत रंगली. दररोज सकाळ संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी बातम्या वाचून दाखवल्या जात. त्यावरही गप्पा होत. या साऱ्यातून निर्मला, कांता, हंसा...सगळ्याच स्वत: विचार करायला नि ते बोलायला शिकल्या. धीटही झाल्या. एकदिवस मला नगराध्यक्षांचा फोन आला.
"भाभी, तुमच्या दिलासा घरातील बाया भेटायला आल्या होत्या. त्यांना बालवाडीत सेविका म्हणून नोकरी पाहिजे आहे. मी त्यांना म्हटलं की संस्थेत तुम्हाला जेवणखाण, कपडालता मिळतो, राहायची सोय आहे. शिवाय त्या सांगत होत्या की बँकेत शंभर रुपयेही भरतात. मी म्हणालो की सेविकेला मिळतात अवघे दोनशे रुपये. तुमचे त्यात कसे भागणार? तर एक म्हणाली की आम्हाला तिथे राहायचे नाही. तुमच्या कानावर घालावे म्हणून फोन केला. काय अडचण आहे त्यांना तिथे राहाण्यात ? तुम्ही म्हणालं तरं करतो विचार....." नगराध्यक्ष सांगत होते.
या तिघी परस्पर जाऊन भेटल्या म्हणून मम्मी भयंकर चिडली. मोफत कायदा मदत, मोफत शिवण प्रशिक्षण, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर पायावर उभे राहण्यासाठी उसनवार आर्थिक मदत आदी सोयी असताना, प्रशिक्षण पूर्ण करायचे सोडून यांना दोनशे रुपयांची नोकरी करण्याची हौस का आली हे आम्हालाही समजेना. मग त्यांच्याशी मोकळेपणी गप्पा मारल्या. त्यातून बरेच धागे उकलले. आम्हीही नवे शिकलो. दिलासा घरातील शिस्त त्यांना कधी कधी नकोशी वाटे. 'घरा'चा ऐसपैस मोकळेपणा त्यांना मिळत नसे.
"मम्मी लईच कड़कड करती नि धाक घालती. एकादिवशी जरा उशीर झाला उठायला तर काय होतं? रविवारी बी फाटेच उठायचं का? " एकीची तक्रार.
"भाभी आपल्या दिलासा घरात फक्त सहा जणींना आधार द्यायची सोय आहे. आता आमी आठ जणी आहोत. मग अडचणीत असलेल्या बायांची कशी सोय व्हावी ? म्हणून मीच नेलं सगळ्यांना मुनशीपालटीत. विवेकसिंधूत जाहिरात वाचली होती. म्हटलं तिघीजणींना नोकरी मिळाली तर, एकत्र राहून. घरून थोडीफार मदत घेऊ. पण स्वतंत्रपणे राहू. एकत्र राहिलं तर कुणाची टाप आहे तरास देण्याची ?" निर्मला शांतपणे सांगत होती.
हितं राहिलं की मम्मी सारखी बडबडते की आयतं मिळतं खायला पण तुम्हाला चव नाही. हितं रहाणं म्हणजे दिल्या अन्नावर जगणं. मला आता सही करता येते. थोडं वाचताबी येतं. शिवणबी शिकलेय मी. बघू तर खरी सोवतंत्र राहून. म्हाईतर येऊच की हितं " हंसा बोलली.
हे बोलणे मलाही खूप काही शिकवून गेले. विचार करायला लावून मेले. मम्मी जुन्या काळातल्या. त्या सर्वावर अपार माया करतात. पण बोलण्यात थोडाफार शिव्यांचा शिडकावा असतो. त्यांनाही समजावून सांगावे लागले की दिलासा घरातील महिलांना संस्थेकरवी दिले जाणारे सहाय्य म्हणजे उपकार वा दान नव्हे. सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, संस्थेत कार्यकर्त्या म्हणून आलेल्या महिला आणि दिलासा घरातील महिला सगळ्याच एकत्र राहातात. सर्वांसाठी सारख्याच सोयी असतात. पण इतकी मंडळी एकत्र राहायची म्हणजे नियम, त्यांचे पालन आदींवर भर द्यावाच लागतो. वसतिगृहातील मुली आणि कार्यकत्यांना या शिस्तीची गरज माहीत असते. पण घरगुती ... तेही जाचक अशा वातावरणातून आलेल्या दिलासा घरातील महिलांना या शिस्तीची कधी कधी अडचण वाटे. भुलाबाईतले एक गाणे आहे. त्यात मुली म्हणतात.
सासरीच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरीच्या वाटे गुलाल बुक्का दाटे ...
दिलासातील लेकींना दिलासा घरातही "कुचूकुचू काटे " टोचायला नकोत याची काळजी घेण्याची सजगता निमूच्या निमित्ताने आम्ही शिकलो. आणि म्हणूनच तिच्यापेक्षा वयाने सात आठ वर्षांनी लहान पण मनाचे सूर ज्याने ओळखले आहेत अशा बाबूबरोबर सुखाने संसार करणाऱ्या निमूचे गुलाल बुक्क्यानी दाटलेले माहेरपण करायला 'दिलासा घर' उत्सूक आहे.