अर्धुक/सुवर्णा

विकिस्रोत कडून
सुवर्णाला एकदम मनावरचं दडपण उठल्यासारखं वाटलं. गेले कित्येक महिने ती ज्याची वाट पहात होती तो घटस्फोटाचा दाखला तिच्या हातात पडला होता. शेवटी आठ वर्षांनंतर तिची त्या नको असलेल्या नात्यातून कायदेशीर सुटका झाली होती.

 तिचं लग्न ती जेमतेम सतरा वर्षांची असताना झालं. ती एसेस्सी पास झालेली होती. घरी अतिशय हलाखीची परिस्थिती होती. ती सगळ्यात धाकटी. वडील ती लहान असतानाच गेले. थोरले दोघे भाऊ होते, त्यांना चांगल्या नोकऱ्या होत्या पण ते काही मदत करीत नव्हते. थोडीशी जमीन होती तिच्यावर आई आणि ती दोघींचं कसंबसं पोट निघत असे. पुष्कळदा दोन वेळा पोटभर जेवण मिळण्याचीही भ्रांत. तेव्हा आलेल्या स्थळाबद्दल फार चौकशी करण्याची शक्यता नव्हती. त्यातून स्थळ म्हटलं तर माहितीतलंच. नवरा मुलगा सुवर्णाच्या थोरल्या वहिनीचा भाऊ होता. खातंपितं घर होतं. त्यांचा मोठा वाडा होता, मालकीचं एक लॉज होतं, कोळशाचा व्यापार होता. तसं वरवर पहाता स्थळात खोड काढायला जागा नव्हतीच.
 लग्न झालं आणि सुवर्णा सासरी गेली ती निव्वळ मोलकरणीचं आयुष्य जगायला. सासरघरचं मोठं खटलं होतं. कुटुंबातली बारा-तेरा माणसं, पुन्हा बाहेरचे गडी अशा सगळ्यांसाठी दोन वेळचा स्वैपाक करायचा. पुन्हा ही फुकटची मोलकरीण मिळाली म्हणून भांडीधुण्यासाठी असलेली बाई काढून टाकली. म्हणजे तेही काम हिच्यावर. दुसरं कोणी तिला मदत करीत नसे. पहाटे पाचपासून रात्री बारापर्यंत नुसतं राबायचं. तेही अर्धपोटी. इतर कुणी नाश्ता केला तरच हिनं करायचा. पण सहसा बाकी कुणी करीत नसे. जेवणसुद्धा सगळ्यांचं झाल्यावर उरलंसुरलं असेल ते. बऱ्याच दिवसांनी तिला कळलं की बाकीची माणसं बाहेरून हॉटेलातून काहीतरी मागवून बाहेरच्या बाहेरच खायची. हिला आत कळतही नसे आणि तिला कुणी काही देत नसे.
 तसं कामाला ती नाही म्हणत नव्हती पण हे असं तिन्ही त्रिकाळ नुसतं राबायचंच? लग्न झाल्यावर तिला पुढे शिकवू असं सासरच्यांनी तिच्या आईला कबूल केलं होतं. पण लग्न झाल्यापासून त्याचा उच्चारही कुणी केला नाही. तरीही तिनं तक्रार केली नाही पण इतक्या सगळ्या कामाच्या बदल्यात फुकाचा एक गोड शब्दही मिळू नये ह्याचं तिला वाईट वाटायचं. इतरांकडून तिला अपेक्षाच नव्हती, पण नवऱ्यानं सुद्धा कधी प्रेमाने जवळ घेऊ नये? दमलीस हो, अस म्हणू नये? तो इतका संपूर्ण कोरडेपणाने, अलिप्तपणे तिच्याशी वागे की जणू ती दोघं केवळ कर्मधर्मसंयोगाने अगदी तात्पुरती छपराखाली रहात होती. लाडकोड पुरवणं तर दूरच राहिलं. एकदा नुकतं लग्न झाल्यावर तिनं त्याच्याकडे मला गजरा आणा म्हणून हट्ट धरला, पण पैशाचे व्यवहार शंभर टक्के बापाच्या हातात, त्याच्याकडे पैसे मागावे लागतील म्हणून त्याने गजरा आणला नाही. पुन्हा सुवर्णाने त्याच्याकडून कधी काही मागितलं नाही.
 लग्नानंतर दीडेक वर्षाने सुवर्णा तिच्या आईकडे आली. बरोबर नवराही होता. तिनं आईला सगळं सांगितल्यावर आईला बराच धक्का बसला. ती म्हणाली. "तू आता तिकडे परत जाऊ नको. इथे राहून पुढचं शिक्षण कर." आईनं तिच्या नवऱ्याला कसं समजावलं ते सुवर्णाला कळलं नाही, पण तो तिला ठेवून जायला तयार झाला. पण ते तिला पुढे शिकवणार म्हणून दिलेला शाळेचा दाखला, दहावीचं गुणपत्रक वगैरे तगादे लावूनही त्या लोकांनी पाठवले नाहीत. खूप खटपट करून पुन्हा मिळवावे लागले तेव्हा सुवर्णाला अकरावीला प्रवेश मिळाला. शाळा तिच्या खेड्यापासून दूर होती, शिवाय बसचा खर्चही बराच होणार म्हणून तिथल्याच एका मुलींच्या बोर्डिंगात राहून ती शाळेत जायला लागली. थोडाफार खर्च भागवण्यासाठी ती रात्री प्रौढ साक्षरता कार्यक्रमात वर्ग घ्यायची.
 बारावीची परीक्षा होऊन ती चांगली पास झाली. त्यानंतर तिच्या सासरच्यांनी तिला परत पाठवा असा आग्रह धरला. मधल्या काळात तिचा नवरा एकदोनदा येऊन तिला भेटून गेला होता. त्याचं वागणं आईला बरं वाटलं. तो सुवर्णाला न्यायला आला तेव्हा तिला पूर्वीप्रमाणे न वागवण्याचं कबूलही केलंन. मग आईही म्हणाली, "बघ जाऊन.कदाचित त्यांना आपलं चुकलं असं पटलं असेल. शेवटी काय तू जन्मभर एकटी तर रहाणार नाहीस ना?" सुवर्णाच्या मनात थोडी धाकधूक होतीच, पण ती परत सासरी गेली. जाताना बसमध्ये पुष्कळ तास एकत्र होते तेव्हा नवऱ्याने चांगल्या गप्पा मारल्या, वाटेत तिला काहीतरी खायला घेऊन दिलं. तिला वाटलं, त्याला आपल्याबद्दल काहीतरी वाटत असलं पाहिजे, नाहीतर तो मुद्दाम आपल्याला घेऊन जायला कशाला आला असता?
 पण सासरची माणसं नीट वागतील ही आशा फोल ठरली. तिचं आयुष्य पूर्ववत सुरू झालं. नवराही पूर्वीप्रमाणे अलिप्तपणाने वागायला लागला. कदाचित आपल्या नशिबी हेच आहे म्हणून तिनं परिस्थितीशी जुळवून घेतलंही असतं, पण एक दिवस सासू आणि दोन नणंदा ह्यांनी तिला घरामागच्या विहिरीत ढकलून दिलं. तिला पोहता येत होतं म्हणून ती वाचली आणि वाटेनं जात असलेल्या कुणा माणसाने तिचा आरडाओरडा ऐकून तिला बाहेर काढलं. तिला त्या बायकांनी विहिरीत ढकललं ह्यावर तिच्या नवऱ्याचा विश्वास बसला नाही.
 "काहीतरी मूर्खासारखं बोलू नको. त्या कशाला तुला विहिरीत ढकलतील?"
 "ते मला काय माहीत? त्यांना विचारा."
 काही दिवसांपूर्वी तिची सासू कुणाशी तरी बोलताना तिनं ऐकलं होतं. सासू म्हणत होती, "हिच्यापेक्षा जास्त शिकलेली सून हुंडा देऊन मला मिळाली असती. पण मुलीच्या सासरकडचं स्थळ म्हणून हिला पत्करली." सुवर्णा नवऱ्याला हे काहीच बोलली नाही. तिला वाद घालायचा नव्हता, आपलं खरं आहे असं पटवायचं नव्हतं. तिला ह्यापुढे विषाची परीक्षा पहायचीच नव्हती. तिनं माहेरी जाण्याचा हट्ट धरला आणि तिची पाठवणी करण्यात आली.
 तिनं कॉलेजात नाव घातलं आणि आईवर सगळा भार नको म्हणून मिळतील तशी किरकोळ कामं करून शक्य तितका स्वत:च्या पायावर उभं रहाण्याचा प्रयत्न केला. क्रमाक्रमानंती एम.ए.झाली. टायपिंगची परीक्षा पास झाली. एका लहान खाजगी संशोधन संस्थेत तिला नोकरी मिळाली. पगार बेताचाच होता, पण संस्थेतल्या लोकांनी तिला चांगली वागणूक दिली. विशेषत: संस्थेच्या चालकांनी तिची आस्थेनं विचारपूस केली. त्यांचा तिला थोडाफार आधार वाटला.
 आता ती शहरातच रहात होती. तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्यांच्या भेटीगाठी व्हायला लागल्या, प्रेम जमलं. आतापर्यंत तिला पहिल्या नवऱ्यापासून घटस्फोट घेण्याची निकड वाटली नव्हती, पण आता पुन्हा लग्न करून संसारसुख अनुभवण्याची आशा तिच्या मनात पालवली होती. तिच्या संस्थाचालकांनी एका वकिलाचा सल्ला घेऊन तिच्या नवऱ्याला भेटायला बोलावलं, आणि त्याच्यासमोर परस्परसंमतीने घटस्फोट घेण्याचा प्रस्ताव मांडला. तिचा सासराही आला होता. तो म्हणायला लागला, "आम्ही काय तिला वाईट वागवलं होतं का हाकलून दिलं होतं? ती आपल्या पायांनी घर सोडून आली. आमची तिच्याबद्दल काही तक्रार नाही. ती परत आली तर आम्ही तिला नांदवायला तयार आहोत. मग ती घटस्फोटाची भाषा कशासाठी करतेय?"
 "हे पहा, इथे कोणी कुणाला दोष देण्याचा प्रश्न नाही. ती आपणहून निघून आली की तुम्ही तिला हाकलून दिली हाही मुद्दा गैरलागू आहे. सत्य एवढंच आहे की गेली ७-८ वर्ष सुवर्णाचा आणि तिच्या नवऱ्याचा संबंधही आलेला नाही. ती त्याच्यापासून संपूर्ण दुरावलेली आहे. त्याच्याबरोबर पुन्हा संसार मांडणं तिच्याच्याने होणार नाही. तिच्या दृष्टीनं तिचं लग्न मोडलेलंच आहे. फक्त त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब करून तिला हवं आहे. तो कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करू शकेल. परंतु कुटुंब न्यायालयात परस्परसंमतीने घटस्फोट हा सगळ्यात सरळ आणि सोपा मार्ग आहे. ती कोणत्याही स्वरूपात पोटगी वगैरे मागत नाहीये. तेव्हा एवढं तिच्यासाठी तुम्ही करावं असं मला वाटतं."
 सुदैवाने थोड्याफार चर्चेनंतर सासरा तयार झाला. खरं म्हणजे नवऱ्याला बोलावण्याची गरजच नव्हती. तो सदैव बापाच्या ओंजळीने पाणी पीत असल्यामुळे स्वत:च्या आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय तो बापावरच सोपवीत होता. सुवर्णाने एकदा नवऱ्याकडे पाहून घेतलं. तो नेहमीप्रमाणे निर्विकार होता. लग्न झाल्यापासून एकदाही त्याने तिच्याबद्दल काही आस्था, माया दाखवली नव्हती. तिला आठवलं एकदा तो रात्रभर तिच्या शेजारी झोपूनही तिला १०२ डिग्री ताप आहे हे त्याला समजलं नव्हतं. त्याच्यापासून आपण कायदेशीर फारकत घेत आहोत ह्याचा तिला यत्किंचितही पश्चात्ताप होत नव्हता. नवरा-बायकोचं काय, कसलंच नातं त्यांच्यात कधी निर्माण झालं नव्हतं.
 सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण होऊन तिला घटस्फोट मिळाला तेव्हा तिनं आणि प्रसादनं रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊन आपला आनंद साजरा केला. ती म्हणाली, "आता आपण लग्न कधी करायचं?" "घाई काय आहे? मला नोकरी तर लागू दे." तो नोकरी शोधण्याचा फारसा गंभीरपणे प्रयत्न करीत नव्हता. एकदा ती त्याला म्हणाली, "मला नोकरी आहे की. आपल्या दोघांच्यापुरतं मी मिळवते. आपण लग्न तर करू. मग तुला नोकरी मिळेल तेव्हा मिळेल." त्यावर तो नक्की असं काही बोलला नाही. विचार करताना तिला पटत होतं की काही कामधंदा न करणाऱ्या माणसाशी लग्न करणं म्हणजे आपल्या पायावर धोंडा पाडून घेणं आहे. पण तिला त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता. तो तिच्या नवऱ्यासारखा कोरडा नव्हता. त्याचं प्रेम शब्दांतून, स्पर्शातून व्यक्त होत होतं आणि त्याचा अनुभव तिच्या कोमेजून गेलेल्या मनाला, शरीराला उल्हसित करीत होता.
 तिनं उडत उडत ऐकलं की त्याच्यासाठी मुली बघताहेत. तिनं त्याला सरळच विचारलं तेव्हा तो हो म्हणाला.
 "घरच्यांच्या समाधानासाठी काही गोष्टी कराव्या लागतात."
 "तू त्यांना आपल्याबद्दल काही सांगितलंच नाहीस का?"
 "तुला माहीताय माझे आईवडील आपल्या लग्नाला कधीच संमती देणार नाहीत."
 "त्यात नवीन काय आहे? इतक्या खालच्या जातीच्या मुलीला ते सून म्हणून पत्करणार नाहीत हे तुला पहिल्यापासूनच माहिती होतं. कधीतरी त्यांना हे सांगून त्यांचा राग ओढवून घ्यावाच लागणार आहे. मग आत्ता सांगून का नाही टाकत?"
 "जरा दम धर. असल्या गोष्टी एकदम घाईने करता येत नाहीत."
 "ह्यात घाई काय आहे, आपली ओळख झाल्याला दोन अडीच वर्ष झाली. आता आणखी कशासाठी थांबायचं ते मला कळत नाहीये. तू मुली पहायला संमती देणं ही त्या मुलींची आणि तुझ्या आईवडलांची फसवणूक नाही का?"
 प्रसादनं तिला काही दादच दिली नाही अणि शब्दांच्या हुलकावण्या देणं सुरू ठेवलं तेव्हा तो आपल्याशी लग्न करणार नाही हे कडू सत्य तिनं स्वीकारलं. तिनं आपल्या मनाची समजूत घातली की आपण प्रेम करावं इतकी प्रसादची लायकीच नाही. कुटुंबियांच्या मागे दडून अशी बेइमानी करणारा माणूस आपल्या आयुष्यातून निघून गेला हेच आपलं सुदैव असं तिनं स्वत:ला पटवण्याचा प्रयत्न केला. इतके दिवस त्याच्या असण्यामुळे मधुर झालेलं जीवन एकटेपणामुळे पुन्हा रखरखीत होणार होतं. पण त्याला काही पर्यायच नव्हता. त्याने तिला भेटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला पण तिनं निश्चयानं त्याला दूर ठेवलं. त्यानं लिहिलेली पत्रं न वाचता फाडून टाकली. शेवटी त्याने तिचा नाद सोडून दिला. निदान तिला असं वाटलं.
 एक दिवस अवचित तो तिच्याकडे आला. अंधाराची वेळ पाहून आला हे तिच्या लक्षात आलं. तिनं खोलीचं दार उघडलं आणि दारातच त्याला काय पाहिजे म्हणून विचारलं. तिला वाटलं कदाचित लग्नाचं निमंत्रण द्यायला आला असेल. ते आपल्याला देण्याची हिंमत त्याला झाली ह्याचं तिला आश्चर्य वाटलं. पण त्याखेरीज त्यानं भेटायला यायचं दुसरं काही कारण तिला दिसेना.
 तो म्हणाला, "मला आत तरी येऊ दे."
 "कशाला? तू काय गप्पा मारायला आलायस? पटकन काम काय आहे ते सांगून टाक आणि जा. त्यासाठी आत यायची काय गरज आहे?"
 "सुवर्णा, तू मला इतकं परक्यासारखं वागवू शकतेस? काही दिवसांपूर्वी तु माझ्यावर प्रेम करीत होतीस. निदान तू तसं म्हणत होतीस. का ते सगळं खोटंच होतं?"
 "त्यावेळी ते खरं होतं."
 "आता लगेच तू ते सगळं विसरलीस?"
 "तू विसरायला लावलंस, प्रसाद."
 "मी नाही तुला विसरू शकत. मी खूप प्रयत्न केला पण आपलं नातं मी तोडू शकत नाही." तो त्वेषाने बोलत होता आणि क्षणभर श्वास रोखून धरीत ती ऐकत राहिली. "घरच्यांच्या खातर मला लग्न करावं लागतं आहे पण माझ्या हृदयातलं तुझं स्थान अढळ राहील. मी तुला पूर्वीप्रमाणे भेटत राहीन. मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही."
 "तू माझी चेष्टा करतोयस की गंभीरपणे बोलतोयस हे मला कळत नाही. चेष्टा असली तर ती फार दुष्ट आहे. गंभीरपणे म्हणत असलास तर मी तुला कधी कळलेच नाही असं म्हणायला पाहिजे."
 "तुझा अपमान करायची माझी इच्छा नाहीये. सुवर्णा. माझं तुझ्यावर अजूनही फार प्रेम आहे."
 "प्रेमाच्या गोष्टी बोलायच्या भानगडीत पडू नको. झालं एवढं बास झालं. आता जा आणि पुन्हा कधी मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस."
 "सुवर्णा प्लीज, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मला आत तरी येऊ दे. माझं नीट ऐकून घे."
 "मला काहीही ऐकायचं नाही. ऐकलं तेवढंच फार झालं."
 त्यानं तिला बाजूला सारून खोलीत शिरण्याचा प्रयत्न केला पण तिने संतापून त्याला अक्षरश: ढकलून बाहेर काढलं आणि दार लावून घेतलं. मग मात्र रागामुळे लाभलेलं अवसान गळालं आणि ती खूप रडली. पण शेवटी म्हणाली, "जे माझं नव्हतंच त्याच्यासाठी मी का रडतेय?" ती डोळे पुसत कामाला लागली.
 बरेच दिवस लोटले. सुवर्णा आता कामातही जास्त गुंतली होती. एक दिवस प्रसाद तिला पुन्हा भेटायला आला. तिनं जरा बेफिकिरीनंच त्याला विचारलं, "काय रे?" तो म्हणाला, "परवापासून दोनदा तुला गावात पाहिलं तेव्हा तुझ्याबरोबर कोण होता?" आमच्या संस्थेत नवीन एकजण लागलाय तो असेल."
 "अस्सं, त्याच्या आणि तुझ्यात काही आहे वाटतं?"
 नवीन माणसाचं लग्न झालेलं होतं पण सध्या तो एकटाच आला होता आणि ती त्याला रहायची जागा शोधायला मदत करीत होती. पण तिनं प्रसादला हे सगळं सांगितलं नाही. ती फक्त मोठ्याने हसली.