अर्धुक/रुक्मिणी

विकिस्रोत कडून
नाव चांगलं रुक्मिणी ठेवलं होतं पण लहानपणापासून सगळे म्हणायचे रुकी नाहीतर बेबी. ही थोरली. तिच्या पाठची, मुलगा व्हायला हवा त्याऐवजी जन्मली म्हणून ठकी. शेवटचा मात्र मुलगा झाला, बापू. रुकी चणीनं लहानखुरी, दिसायला बाहुलीसारखी दिसायची. छोटंसं पण सरळ नाक, अपुरी जिवणी, गोल डोळे, लांबटगोल चेहरा. पण रूपातला नाजुकपणा तिच्या आवाजात नव्हता. उंच किरट्या आवाजात किंचाळून बोलायला लागली की लोकं म्हणायची, "ये, गप बस की. तुला पाखरं हाकलायला बशीवली का काय?" तिचं बोलणंही फटकळ आणि स्वभाव तिखट. आसपासच्या वस्तीत भांडकुदळ म्हणून तिची कीर्ती होती.

 हिच्या आईबापांचा धंदा फळं विकण्याचा. सीझनमधे असतील ती फळं लिलावात घेऊन विकायची. पेरूचा सीझन सुरू झाला की पहाटेपासून कुठल्या तरी बागेत पेरू तोडायचा नि गावात आणून फुटपायरीला विकायचा. लहान असल्यापासून रुकी आईबापांबरोबर पेरू काढू लागायची. जरा मोठी झाल्यावर चाळीस चाळीस किलोच्या पाट्या बागेतून वाहून आणायची. ठकी स्वैपाक करायची म्हणून पेरू काढायला फारशी मदत करीत नसे. बापू मुलगा म्हणून त्याला शाळेत घातला होता पण त्याला अभ्यास करण्यात काही गंमत वाटत नसे. शाळेला दांड्या मारून उनाडक्या करणं हा त्याचा उद्योग आईबाप घरी नसल्यामुळे त्यांना कळत नसे. जेव्हा कळला तेव्हा त्याला शाळेतून काढून आई आपल्याबरोबर पेरू काढायला आणायची. गावभर उनाडक्या करण्यापेक्षा आपल्या डोळ्यांसमोर असलेला बरा. आई म्हणायची, "आमचा बापू पेरू लई भारी काढतो. एक बी दाढा निघायचा नाही त्याच्या हातनं." ती त्याला झाडावर चढायला सांगून शेंड्यातले पेरू काढायला लावायची. एकदोन झाडं काढून झाली की तो कंटाळून नुसत्या टिवल्याबावल्या करत बसायचा. रुक्मिणी सकाळभर नेटाने पेरू काढायची. पण ती पेरू लई भारी काढते असं काही तिची आई म्हणायची नाही.
 त्यांना पैसे बरे मिळायचे पण बाप जुगारी होता. त्याला आकड्यावर पैसे लावायचा नाद. पैसे जसे हातात यायचे तसे जायचे. सर्व जुगाऱ्यांप्रमाणे कधी ना कधी आपला आकडा लागणार ह्याची त्याला खात्री होती.
 फारशी हुंड्याची अपेक्षा नसलेलं स्थळ आलं तेव्हा जास्त खोलात न शिरता रुक्मिणीच्या बापानं तिचं लग्न लावून दिलं. त्यावेळी ती तेरा-चवदा वर्षांची होती. खरं म्हणजे तिचा नवरा त्यांच्या झोपडपट्टीच्या जवळच रहायचा, पण तिच्या बापाने त्या कुटुंबाची फारशी चौकशी केली नाही. तिचा नवरा सदा तिच्यापेक्षा पाच-सहा वर्षांनी मोठा, चकणा, कायम नोकरी, कामधंदा नसलेला असा माणूस होता. त्याला दर काही दिवसांनी नवं काम बघावं लागायचं. प्रत्येक कामावरून त्याला चुकार म्हणून किंवा बारीकसारीक चोरी केल्याबद्दल हाकलून दिलं जायचं. मग काही दिवस तो घरी बसायचा, मग पुन्हा दुसऱ्या नोकरीचा शोध चालू. त्याचे दोन भाऊ पण तसलेच होते. लोक म्हणायचे ते बेणंच वाईट.
 आपल्या घरी स्वत:च्या पायांनी चालून आलेली मुलगी नुसती राबवण्यासाठी नव्हे तर मारहाण करण्यासाठीही असते अशी सदा, त्याची आई आणि बाप ह्यांची समजूत होती. रुक्मिणी घरी तक्रार घेऊन गेली की आई म्हणायची, "तूच नीट वागत नसशील. तुझं तोंड बी लई वाईट हाय. ज्याच्यात्याच्याशी भांडणं करतेस. असलं सासरी कसं ऐकून घेतील?" मग तिनं माहेरी जायचं सोडून दिलं.
 सगळ्यात भर म्हणून सदाची एक बाई आहे असं तिला कळलं. ती अचंबा करी, हा राती उशीरपरेंत घरी येत नाही नि आला की माझ्यापाशी येत नाही असं का? मग तिला हे कळलं. लग्नानंतर दोन वर्ष झाली तरी हिला मूल नाही म्हणून सासू टोचून खोचून बोलायची. एकदा ही उसळून म्हणाली, "तुमचा मुलगा माझ्यापाशी झोपत नाही मग कशी व्हायची मला मुलं? तिला होतील की." तेव्हा तिच्या सासूनं तिला खूप बदडलं होतं.
 सगळ्या छळाला कंटाळून तिनं नवऱ्याच्या मागे भुणभुण लावली आपण वेगळं राहू म्हणून. तसा त्याचा एक भाऊ वेगळा रहात असे, पण तरी प्रथम सदानं दिला धुडकावून लावलं. तरी हळूहळू तिनं त्याला पटवलं की वेगळं रहाणं त्यांच्या फायद्याचं आहे. वेगळा रहाणारा भाऊ आईबापांना काही मदत करीत नव्हता. दुसरा भाऊ बाहेर काही काम करायचा नाही. घरची थोडी जमीन होती ती कसायचा. त्यात ज्वारी, थोडी कपाशी करून थोडीफार मिळकत व्हायची. तरी पण सदाच्या पगाराचा त्यांना मोठा आधार होता. त्यातनं रुक्मिणीला बाहेर काम करायची परवानगी नव्हती. घरच्या जमिनीवर भरपूर राबायचं. ज्वारी तयार झाली की काढणी करताना हात रक्ताळले तरी चालेल. पण त्यांच्या कुटुंबात बायकांनी दुसऱ्याच्या दारी कामाला जायची पद्धत नव्हती. रुक्मिणीनं नवऱ्याला सांगितलं, "तुमचा भाऊ काई बी करीत नाही. त्याची बायकु बी तसलीच. आपन राबून त्यांना का म्हून पोसायचं? वायलं राह्यलो की मी बी काम करीन. दोघं मिळवून सुखात खाऊ." शेवटी त्याला पटलं.
 त्यांनी एक खोली भाड्यानं घेतली. रुक्मिणीनं रानात कामाला जायला सुरुवात केली. थोडं थोडं सामान घेत संसाराची जुळवाजुळव केली. हे वेगळे राहिले म्हणून आईबाप, भाऊ सगळे रागावले होते. त्यांनी काही मदत केली नाही.
 ते रहात होते त्याच्या जवळच एक छोटासा प्लॉट विकाऊ होता. तो विकत घेऊन त्याच्यावर एक लहानसं घर बांधायचं स्वप्न रुक्मिणी पहात होती. दोघांच्या पगारातून चांगली शिल्लक पडत होती. पण काही दिवसांनी सदाची नोकरी गेली. दुसरं काम बघतो बघतो म्हणत तो काही करीना. रुक्मिणीच्या एकटीच्या पगारावर संसार चालला होता. अवचित एक दिवस तिला कळलं की सदाला दुसरीकडे काम मिळालं होतं पण तो घरी पैसे न देता त्याच्या ठेवलेल्या बाईची भर करीत होता. तिनं अकांडतांडव केलं तेव्हा त्यानं तिला बदडलं. तिला भारी राग आला. ती म्हणाली, "मला पैसे देत नाही मग माझ्यापाशी कशाला ऱ्हाता? तिच्याकडेच जाऊन ऱ्हावा की." तो म्हणाला, "जातोच. मग पुन्हा यायचा नाही इकडे. बोलवू नको मला मग तुला गरज लागली म्हणजे."
 तो निघून गेला. तो एकदम तिला सोडूनच गेला म्हणून ती हबकली. केवळ ती रागानं जा म्हणाली म्हणून तो गेला असं तिला वाटलं नाही. त्याच्या मनात जायचंच होतं, आपण जा म्हटलं हे नुसतं निमित्त झालं.ती मनातल्या मनात म्हणाली, "जाऊ दे गेले तर. मी येकली ऱ्हाईन. माझं मी कमवून खाईन. मला नाही कुनाची जरवर." सदा गेल्यावर सुद्धा तिचा प्लॉट घेऊन घर बांधायचा बेत कायम होता. फक्त आता तिनं ठरवलं तीन खोल्या बांधायच्या, दोन भाड्यानं द्यायच्या नि एकीत रहायचं. सोबत होईल, नि महिन्याचं महिन्याला उत्पन्न पण मिळेल. हे सगळं करायला किती पैसे लागतील नि एकटीच्या पगारातनं तेवढे शिलकीत पडेपर्यंत किती वर्ष लागतील हा हिशेब ती करीत बसली नाही.
 तिचा एक चुलता होता. लहानपणापासून त्याला तिचा लळा होता. त्याचं घर हेच तिचं खरं माहेर होतं. सणासाठी तो तिला आवर्जून बोलवायचा नि ती जायची. कधी रिकाम्या हाताने जायची नाही. कधी फळं, पोरांसाठी खाऊ, सणासाठी नारळ असं घेऊन जायची. त्या चुलत्याने हजारभर रुपये देऊन तिच्या प्लॉटचं तिच्या नावानं साठेखत करून घेतलं. उरलेले सात हजार दोन वर्षांत भरायचे होते. रुक्मिणीनं आणखी एका ठिकाणी काम धरलं. संध्याकाळी सुट्टी झाल्यावर तास-दीड तास एका ऑफिसमधे झाडलोट, धूळ झटकणं, फरशा पुसणं असं काम. दोन्ही पगारातले जरूरीपुरतेच पैसे खर्चुन बाकी सगळे शिलकीत टाकायची.
 मधे तिच्या बहिणीचं लग्न झालं पण ती थोडेच दिवस नांदल्यावर घरी पळून आली. आईनं समजावलं, रागवून पाहिलं पण ती बधेना. नक्की कारण सांगेना. ते बरोबर वागवत नाहीत, मी पुन्हा तिकडे जाणार नाही एवढं मात्र ठाम सांगितलं. कुणीतरी रुक्मिणीला विचारलं तू बी का नाही जात माहेरी रहायला, तशी ती म्हणाली, "आपलं त्यांच्याशी पटत नाही." तिनं ऐकलं की तिच्या बापाचा आकडा लागला नि त्याला बरेच पैसे मिळाले, दहाएक हजार. त्यानं तिला काही दिलं नाही एवढंच काय, स्वत:हून सांगितलंही नाही.
 एक दिवस एकदम सदा आला. म्हणाला, "मला परत इथे राहू दे. तुझंच बरोबर होतं. त्यांचा सगळ्यांचा नुसता माझ्या पगारावर डोळा आहे. जमिनीतला माझा हिस्सा माझ्या नावावर करून देत नाहीत. आता मी परत तिकडे जाणार नाही." तेव्हा तिला कळलं की तो बापाकडे राहिला होता, त्या बाईकडे नाही. ती त्याच्या बोलण्याला भुलली. शिवाय नाही म्हटलं तरी तिला एकटं रहायचा कंटाळा आला होता. तिनं त्याला परत घेतलं. काही दिवस तो नीट वागला, थोडाथोडा पगार घरखर्चाला दिला आणि एक दिवस ती कामावर गेलेली असताना घरातलं बरंच सामान, भांडीकुंडी घेऊन, अगदी तिनं भरलेलं पीठमीठ सुद्धा घेऊन तो पसार झाला. ती घरी आली तर घर धुवून नेलेलं. भाकरी करून खावी तर करायला पीठ नव्हतं की भाजायला तवा नव्हता. ती संतापून सासऱ्याकडे गेली.
 "तुमी माझ्याबरबर चला. त्यान्ला बजावून सांगा माजं सामान मला परत पायजे."
 "अगं जा मोठी आली सामानवाली. नवऱ्याला हाकलून दिलंस. अशी कुठं रीत असते का?"
 "त्याला तसंच कारन हुतं."
 "कारण बिरण मी जाणत नाही. तो काही इथं आलेला नाही. अन् तुला बी मी घरात घेणार नाही. जा चालती हो."
 नवऱ्याशी भांडायला ती गेली नाही कारण तो उलट्या काळजाचा आहे अशी तिची खात्री पटली होती. तिनं पुन्हा पै पै साठवून भांडीकुंडी घेतली. ती अशातशानं हार मानणारी नव्हती.
 सदाला तिचं बरं चाललेलं बघवत नव्हतं. ती भांडायला किंवा रडत भीक मागायला आपल्याकडे आली नाही हे त्याला खुपलं. तो तिच्या पाठीमागे तिच्या घरमालकिणीकडे गेला नि तिला म्हणाला, "ती वाईट चालीची बाई आहे. तिचे चाळे बिनबोभाट चालावे म्हणून तिला मी इथे रहायला नकोय. तुम्ही तिला खोलीत ठेवू नका. ती तुमचं नाव खराब करील."
 घरमालकिणीनं रुक्मिणीला सांगितलं, "बघ बाई,हे असं झालंय. मला माहीत आहे तू कशी आहेस. इतके दिवस तू इथे रहातेस, तुझ्याबद्दल वावगा शब्द कुणी काढलेला मी ऐकला नाही. पण तझा नवरा धमकी घालतोय मी पोलिसात जाईन म्हणून."
 "पोलिस काय करणारेत? तुमची खोली हाये. तुमी कुनाला बी भाड्यानं द्याल. त्यात पोलिसांचा काय संमंद?"
 "ते खरं ग, पण तुमच्या भांडणात मला काही पडायचं नाही. तू आपली दुसरीकडे रहायला जा."
 रुक्मिणी जिथे काम करायची त्या बाईंकडे गेली, म्हणाली, "मी कुटं जाऊ? आन जिथं जाईन तिथं पुना तो असं कशावरून करनार नाही?" तिला रडू कोसळलं.
 "तू रडू नको. चल मी तुझ्याबरोबर येते तुझ्या घरमालकिणीला भेटायला."
 रुक्मिणीच्या पाठीशी उभं रहाणारं कुणीतरी आहे हे पाहून ती बाई मवाळली. रुक्मिणीला तिथं राहू द्यायला तयार झाली.
 बरेच दिवस रुक्मिणीचं आयुष्य सरळरेषेत एकसुरी चाललं होतं. एक दिवस कामावरून घरी जाताना सदानं तिला अडवलं.
 "माजी वाट सोडा."
 "माझं ऐकून तरी घे."
 "मला काई बी आयकायचं नाई तुमचं. आजवरदी आयकून फसले त्येवडं पुरे."
 तो तिच्याबरोबर चालत राहिला. ती खालमानेनं झपाझपा पाय टाकीत होती. घर जवळ आलं तशी ती थांबली. त्यानं खोलीत शिरायला बघितलं असतं तर ती त्याला थांबवू शकली नसती. तो तिच्यापेक्षा थोराड होता, त्याला जास्त ताकद होती.
 "काय बोलायचं ते बोला."
 "मी पुन्हा इकडे रहायला येतो."
 "का? तिनं तुमाला हाकलून दिलंय व्हय? आपल्या बापाच्या घरी जा की मग. माज्याकडे कशाला? पुना माजं घर लुटायला?"
 "मी पुन्हा तसं करणार नाही. एवढा एकदा माझ्यावर विश्वास ठेव."
 क्षणभर रुक्मिणीची चलबिचल झाली. आपल्याला ना माहेर, ना सासर, ना मूलबाळ. सगळं आयुष्य असं एकटीनंच काढायचं? तिचं वय एव्हाना अवघं वीस-बावीस वर्षांचं होतं, पण ती दिसे चौदा-पंधरा वर्षांच्या कोवळ्या मुलीसारखी. तिच्या वाट्याला संसारसुख कधी आलंच नव्हतं.
 पण मग तो पहिल्यापासून कसकसा वागला हे तिला आठवलं. तो निव्वळ स्वार्थी आहे हे तिला पुन्हा पुन्हा दिसलं होतं. परत आपल्याकडे येण्यात त्याचा काहीतरी मतलब असला पाहिजे असं तिला मनातून वाटत होतं.
 ती म्हणाली, "मला तुमचा इस्वास वाटत नाई. तुमाला माज्याबरबर नीट ऱ्हायचं असंल तर वडलांना घिऊन या. चार लोकांसमक्ष त्यांनी मला लिहून द्यावं तुमी येडंवाकडं काई केलं तर ते जबाबदारी घेतील म्हणून. मंग मी तुमाला परत बोलवीन."
 सदा चिडला, "तू कोण मोठी जमीनदारीण लागून गेलीस? मी नवरा आहे तुझा. कशी घेत नाहीस घरात बघतो. कोर्टात दावा लावतो. कोर्टाची आरडर आली की चट घेशील."
 तो धमक्या द्यायला लागल्यावर आपण केलं ते बरोबरच केलं असं तिला पटलं. त्याला आपली माया असती तर असं वागलाच नसता. तिलाही राग आला. ती म्हणाली, "जावा, मला कोडताची धमकी घालता, जावा कुटं जायचं ते कोडतात नाईतर पोलिसात. मला कुनाची भीती हाय?"
 तिला मनातनं खूप धाकधूक वाटत होती. खरंच कोर्टानं हुकूम दिला तर आपण काय करणार? दांडगाईनं त्यानं इथं यायला बघितलं तर त्याला थांबवणारं कोण आहे? माझे आईबाप काही माझ्या मदतीला येणार नाहीत. सासूसासरे तर नाहीच नाही. चुलता म्हटला तर लांब रहातो. आयत्या वेळी कोण आपल्या पाठीशी उभं रहाणार?
 मग काय करायचं? त्याला मुकाट घरात घ्यायचं? पण घेऊन तरी काय भलं होणार आहे माझं? आतापर्यंत तो कधी सरळ वागला नाही. आता तरी कशावरून वागेल? ते काही नाही, जाऊ दे त्याला, करू दे काय करतो ते. तो नुसता बडबडतो. काही सुद्धा करायचा नाही.
 ती बधत नाही अशी खात्री झाल्यावर सदानं तिला त्रास द्यायचं सोडून दिलं.
 आज तिला आपल्या भविष्यकाळाबद्दल काळजी वाटते. एकटीनं सगळं आयुष्य कसं निभावून न्यायचं? गरज पडली तर कोण आधार देईल मला? असे प्रश्न कधी कधी तिला सतावतात. पण तिला विचारलं की तू पुन्हा लग्न का करीत नाहीस म्हणून, तर ती फक्त म्हणते, "आमच्यात करीत न्हाईत."