अर्धुक/सपना
"कुठं गेली होतीस?"
"जादा तास होता."
"खोटं. जादा तास वगैरे काही नव्हता. मी वसुधाच्या घरी फोन करून चौकशी केली."
वडील म्हणाले, "तिची उलटतपासणी काय घेत्येयस? सरळच सांग की. हे बघ सपना, तू राजेंद्र भोसलेंबरोबर हिंडतेस ते आम्हाला समजलं आहे. आता तुझा खोटेपणा, लपाछपवी बंद आणि त्याला भेटणंही बंद. समजलं?"
"पण बाबा-"
"पण बिण काही नाही. मी सांगितलं ते पुरेसं स्पष्ट आहे."
आई मधेच म्हणाली, "इतके दिवस तु अशी खोटेपणानं वागलीस. आम्ही दिलेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेतलास."
"आई, राजेंद्राला भेटते हे तुमच्यापासून लपवलं हे चुकलं माझं. पण मी काहीही गैर केलेलं नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत."
वडील मोठ्याने हसले. "कुठल्या कादंबरीत वाचलंस हे? प्रेम म्हणे. प्रेम कशाशी खातात तुला कळतं का?"
"असं का म्हणता?"
"तुझं वय काय आहे? अनुभव काय आहे? कॉलेजात वर्ष-दोन वर्ष काढल्यावर आपल्या सबंध आयुष्याबद्दल निर्णय घेण्याइतका शहाणपणा आपल्यात आलाय अशी कल्पना आहे तुझी? लग्नासारखी बाब तू आम्हाला न विचारता सवरता परस्पर ठरवून मोकळी होतेस?"
"मी कबूल केलं ना की तुम्हाला विश्वासात घेतलं नाही ते चुकलं माझं म्हणून?"
"विश्वासात घेतलं असतंस तर इतक्या थराला गोष्टी जाऊच दिल्या नसत्या आम्ही. वेळीच हा मूर्खपणा बंद केला असता."
"पण का? आम्ही का लग्न करू नये?"
"ते तुझं तुला समजत नसलं तर समजावून सांगण्याची मला काही गरज वाटत नाही."
नंतर तिच्या आईनं तिच्यापाशी उजळणी केली होती. तो वेगळ्या जातीचा आहे. त्यांच्यातल्या चालीरीती, खाणंपिणं सगळं वेगळं असतं. त्याचे आईवडील फारसे शिकलेले सुद्धा नाहीत. आपल्या घरातल्यासारखं सुशिक्षित, सुसंस्कृत वातावरण तुला तिथे मिळणार नाही, वगैरे. सपनाची काही समजूत पटली नव्हती. पण तिची समजूत पटली की नाही ह्याला काही महत्त्व नव्हतं. दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायला निघाली तेव्हा तिच्या वडलांनी तिला बजावलं, "तुला वाटत असेल की एकदा तू कॉलेजात गेलीस की आम्ही काही तुझ्यावर नजर ठेवू शकणार नाही. पण एवढं ध्यानात ठेव की तू त्याची गाठ घेतलीस किंवा त्याच्याशी बोललीस असं कानावर आलं तर तुझं कॉलेज बंद."
सपनाने घडलेलं सगळं लिहून ते राजेंद्राला दिलं. त्यावर त्याने उत्तर लिहिलं ते सर्वस्वी हताश होतं. त्याच्या आईवडलांनी आधी नाखुषीने का होईना, कॉलेज पुरं होईपर्यंत थांबायच्या अटीवर ह्या लग्नाला संमती दिली होती. पण तिचे आईवडील परवानगी देत नाहीत म्हटल्यावर ते चिडले होते. त्यांना काय वाटलं आपण कोण आहोत म्हणून? आम्ही कुठल्याही बाबतीत त्यांच्यापेक्षा कमी नाही. काही गरज नाही त्या मुलीमागे लागायची. तिच्यापेक्षा सरस अशा छप्पन्न मुली मिळतील आम्हाला. राजेंद्र संपूर्णपणे पराधीन होता. मधेच कॉलेज सोडून नोकरी मिळवणं आणि सपनाशी लग्न करणं त्याला अशक्य कोटीतलं वाटत होतं. त्यानं तिला नुसता सबुरीचा सल्ला दिला. मित्रमैत्रिणींकरवी पत्रांची देवघेव एवढा एकच संपर्काचा मार्ग त्यांच्यापुढे उरला.
सपनाच्या आईवडलांनी स्थळं बघायला सुरुवात केली होती. सपनाने सांगून पाहिलं, "माझं कॉलेजचं आणखी एकच वर्ष उरलंय. तेवढं तरी पुरं करू दे मला." पण रोज तो माणूस डोळ्यांसमोर असेपर्यंत सपना काय करील ह्याची तिच्या आईला शाश्वती वाटत नव्हती. तेव्हा शक्य तितक्या लवकर तिला लग्नबंधनात अडकवून टाकलेलं बरं असा तिचा हिशेब. एक चांगलं स्थळ लवकरच आलं. मुलगा एका चार्टर्ड अकाउंटंट्सच्या फर्ममधे नोकरीला होता. बघताक्षणी छाप पडावी असा उंचनिच, रुबाबदार, देखणा. बघण्याच्या समारंभात तो सपनाकडे बघून अर्थपूर्ण हसला ते सपनाला फार भावलं. जणू तो तिला सांगत होता की बाकीच्यांचं काय चाललंय ते चालू दे, पण खरा मामला तुझ्या-माझ्यात आहे. तिचं कॉलेजचं एक वर्ष राहिलंय हे ऐकून तिची सासू म्हणाली, "त्याची तुम्ही काळजी करू नका. तिची हौस असली तर तिला कितीही शिकवायला आम्ही तयार आहोत नाहीतरी घरकामाचा बोजा काही तिच्यावर पडणार नाही. तेव्हा तिला तरी फावल्या वेळात उद्योग नको का?"
सपना श्रीधरची बायको झाली ती मनातल्या मनात आईवडलांनी आपलं हितच पाहिलं अशी कबुली देत. शेवटी राजेंद्राच्या घरच्यांशी आपल्याला जमवून घेता आलं असतं की नाही कोण जाणे. आईचं बरोबर होतं. काही झालं तरी तिनं चार पावसाळे जास्त पाह्यलेत ना. पण सासरी पोचल्या पोचल्याच तिला संसाराच्या सुखस्वप्नातून खडबडून जाग आली. आपलं लग्न खोटेपणाच्या पायावर उभं आहे हे तिला कळून चुकलं. सासरच्यांनी आर्थिक परिस्थितीची जी कल्पना दिली तीच आधी खोटी होती. सासू-सासरे, दोन दीर, नणंद आणि श्रीधर एका तीन खोल्यांच्या जुन्यापान्या फ्लॅटमधे रहात होते. श्रीधर सगळ्यात थोरला. त्याला पगार चांगला होता पण एवढ्या मोठ्या कुटुंबात तो एकटाच मिळवता. तरी त्याच्या जिवावर, बऱ्यापैकी सधन घरात लाडाकोडाने वाढलेल्या सपनाने आहे ह्या परिस्थितीशी जुळवून घेतलंही असतं. पण काही दिवसांतच त्याला दारूचं व्यसन आहे असं कळल्यावर आपली सर्वच आघाड्यांवर फसवणूक झालीय असं तिच्या ध्यानात आलं. तिला सासरच्यांचा राग आलाच पण त्याहीपेक्षा आईवडलांचा आला. तिचं लग्न करून टाकण्याच्या घाईमुळे
ओळखीच्या मध्यस्थांतर्फे आलेलं स्थळ जुजबी सुद्धा चौकशी न करता त्यांनी स्वीकारलं होतं.
शिक्षण पुरं करण्याबद्दल तिनं नवऱ्याकडे गोष्ट काढली. तो म्हणाला वर्षाच्या मधेच तुला कुणी अँडमिशन देणार नाही, नवं वर्ष सुरू होईपर्यंत थांबावं लागेल. पण त्याच्या आतच तिला दिवस गेले. त्याबद्दल आनंद वाटून घेण्यासारखी परिस्थिती नव्हती. तिनं गर्भपाताबद्दल ऐकलं होतं, पण ह्या प्रचंड शहरात काही ओळखीपाळखी नसताना घरच्यांच्या नकळत गर्भपात करून घेणं शक्य नव्हतं. आपण गर्भार आहोत हे तिनं कुणाला सांगितलं नाही. आपोआप कळलं तेव्हा तिचं फारसं कुणी कौतुक वगैरे केलं नाही. ती स्वत: तर घरातल्या एवढ्या गर्दीत आणखी एक जिवाची भर पडणार ह्या कल्पनेने धास्तावून गेलेली. सासूनं बाळंतपणासाठी माहेरी जाण्याची गोष्ट काढली ती सपनानं मनावर घेतली नाही. ह्या सुमाराला तिचा भाऊ मुंबईला आला होता तेव्हा तिच्या घरी आला. त्याने आईला बातमी दिली तेव्हा तिनं सपनाला बाळंतपणाला बोलावलं. तिनं कळवलं इथे सगळ्यात उत्तम वैद्यकीय सोयी असताना मुद्दाम लहान गावात कशाला बाळंतपण करून घ्यायचं असं सगळ्यांचं म्हणणं पडतंय.
पुढेसुद्धा ती काही ना काही सबब सांगत माहेरी गेलीच नाही तेव्हा तिला नवऱ्याला सोडून येववत नाही म्हणून आईनं कौतुक केलं.
सुरुवातीला दारूच्या नशेत नसे तेव्हा तरी नवरा तिच्याशी बरा वागायचा. जसजसा व्यसनात जास्त जास्त गुरफटत चालला तसा जास्त चिडचिड करायचा. एकदा तिने व्यसनमुक्ती केंद्रात जाण्याबद्दल बोलणं काढलं तर त्याने एकदम बिथरून तिला शिवीगाळी, मारहाण करण्यापर्यंत मजल गाठली. तेव्हापासून ती त्याच्यापासून चार हात दूरच रहायला शिकली. तो जवळजवळ रोजच कामावरून येताना पिऊन घरी यायचा. ती कामाच्या निमित्ताने स्वैपाकघरातच घोटाळत रहायची आणि तो झोपल्याची खात्री झाली की खोलीत जायची.
नवरा हळूहळू पूर्णपणे दारूच्या आहारी जात चालला होता. त्याचा परिणाम व्हायचा तोच होऊन त्याची नोकरी गेली. दुसरी नोकरी लागण्याची शक्यताच नव्हती. त्याला काही ग्रॅच्युइटी मिळाली होती त्याच्यावर त्यांचा प्रपंच थोडे दिवस चालला. मग सासऱ्याच्या पेन्शनवर कसं भागणार म्हणन तिनं नोकरी शोधायला सुरुवात केली. तिला कसलाच अनुभव नव्हता, शिक्षण अर्धवट सोडलेलं. काम तरी कसलं मिळणार? सुदैवाने त्यांच्याकडे अधूनमधून येणाऱ्या लांबच्या नात्यातल्या एक बाई होत्या त्यांनी तिला काम देऊ केलं. त्यांची संस्था रस्त्यावरच्या अनाथ मुलांसाठी केंद्र चालवीत होती. प्रत्येक केंद्रात अशा मुलांना आणायचं, जेवण द्यायचं, थोडंफार शिकवायचं. एकदोन केंद्रात जरा मोठ्या मुलांना कोणतं तरी काम शिकवलं जात असे.
पगार बेताचा होता, पण एकतर आपण मिळवू शकतो, स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतो ही जाणीव सुखद होती. शिवाय घरातल्या कटकटी, सगळ्यांच्या दुःस्वासाला तोंड देणं ह्यापासून रोज काही काळ तिची सुटका होत होती. अर्थात घरी गेल्यावर त्याचा वचपा काढला जायचा. नोकरी करून ती कुटुंबाचं पोषण करते ह्याबद्दल तिचं कौतुक करणं तर राहिलंच, उलट सगळ्यांना तिचं वैषम्यच वाटायचं. ती नोकरी करते म्हणून चढेलपणा दाखवते, बाहेर काम करते ह्या सबबीखाली घरकाम अंगाबाहेर टाकते, हिनं लोकांच्या पोरांची काळजी करायची नि आम्ही हिच्या मुलाला संभाळायचं, अशा तक्रारी चालू रहायच्या. खरं म्हणजे तिचा मुलगा आता काही लहान नव्हता. तो दिवसभर शाळेत असायचा. त्याला काही संभाळायला लागायचं नाही. शिवाय तो हिचा मुलगा होता तर त्यांचा नातू, भाचा,पुतण्या नव्हता का?
कधीकधी आपण हे सगळं सहन का करतो असा तिला प्रश्न पडायचा. पण दुसरा काही मार्ग दिसत नव्हता. माहेरी थोड्या दिवसांसाठी सुद्धा जायची तिची तयारी नव्हती. आईवडलांबद्दलचा राग तिच्या मनात अजून धुमसत होता. शिवाय तिथे खोटा मुखवटा लावून वागणं तिला असह्य झालं असतं. कायम जायचं तर त्यांनी तिचं मनापासून स्वागत केलं असतं अशी तिची खात्री नव्हती. पदरात मूल घेऊन माहेरी आलेल्या मुलीला ये म्हणणारे किती आईबाप असतात? शिवाय मग ते परत नवऱ्याकडे जाण्यासाठी तिचं मन वळवणार, काही तडजोड शक्य आहे का त्याची वारंवार चाचपणी करणार. ते तिला नको होतं. मुलाला घेऊन एकटीनं रहाणं सध्या तरी शक्य नव्हतं. शिवाय सासरची माणसं मुलाला तिच्याबरोबर जाऊ देतील की नाही ह्याची शंका होती. तेव्हा भविष्यकाळात वेगळं काही आपल्या वाट्याला येईल असं स्वप्न न रंगवता ती आला दिवस रेटत राहिली. मुलगा उत्तम तऱ्हेनं एस.एस.सी. पास झाल्यावर तिने मुद्दाम बापाच्या अमंगळ छायेतून काढून त्याला कॉलेजसाठी लांब पाठवलं आणि त्याच वर्षी तिच्यासमोर एकदम एक दार उघडलं गेलं. तिच्या संस्थेच्या कामाचा खर्च अंशत: एका अमेरिकन ट्रस्टतर्फे मिळणाऱ्या देणगीतून मागत होता. त्या ट्रस्टने हिंदुस्थानातल्या शहरांतल्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांची पाहणी करण्यासाठी एक अभ्यासगट पाठवला होता. मुंबईच्या पहाणीत मदत करायला सपनाच्या संस्थेनं तिला नेमलं. तिनं केलेल्या कामावर अभ्यासगटाचे प्रमुख खूष झाले. त्यांनी तिला विचारलं, "आमच्या संस्थेत तुला नोकरी देऊ केली तर तू घेशील का?" ती विचार करून सांगते म्हणाली. पण खरं म्हणजे विचार कसला करायचा होता? असह्य परिस्थितीतून सुटकेचा मार्ग तिला योगायोगाने मिळाला होता. प्रश्न फक्त मुलाचा होता पण त्याने आडकाठी केली नाही. मग तिने तातडीने निर्णय घेऊन टाकला.
सगळी तयारी झाल्यावर, अमेरिकेहून तिकिट हातात पडल्यावरच तिनं घरात त्याची वाच्यता केली. अर्थातच मोठं वादळ उठलं आणि सगळ्यांनी तिचा पाय मागे ओढण्याची शिकस्त केली. पण त्यांनी काहीही म्हटलं तरी तिच्यात अपराधीपणाची जाणीव निर्माण झाली नाही. ह्या आपमतलबी, ढोंगी लोकांसाठी केलं हेच फार झालं असं तिला वाटत होतं. तिनं ठरवून टाकलं होतं की नोकरीची मुदत वाढवून मिळाली तर घ्यायचीच, पण शक्य तर मुलाला तिकडे नेण्याची सोय करून तिथंच रहायचं.ज्यासाठी आवर्जून परत यावं असं तिचं ह्या देशात काहीच नव्हतं.