Jump to content

अर्थ तो सांगतो पुन्हा (Artha to Sangato Punha)/सामना : उद्योजक आणि बांडगुळांतला

विकिस्रोत कडून



सामना : उद्योजक आणि बांडगुळांतला


 शिवराज गोर्लेंनी त्यांच्या कादंबरीतून थोडा ओबडधोबड असा 'स्वार्थ' शब्द वापरला आहे. मराठीमध्ये एखादी आईन रॅण्ड जन्मली असती, तर तिनं काय शब्द वापरला असता 'व्हर्च्यू ऑफ सेल्फिशनेस' (Virtue of Selfishness)साठी हे सांगता येत नाही; कारण हाही तितकाच ओबडधोबड शब्द आहे. माझ्यापूर्वी जे बोलले त्या सर्वांनी स्वार्थवाद हा थोडा अतिरेक होतो, त्यालाही कुठंतरी बंधन पाहिजे आणि शेवटी माणसाला नैतिकतेचं, सामाजिकतेचं असं काहीतरी बंधन असावं असा एक तडजोडवादी सूर काढलेला दिसला. शिवराज गोर्लेंना हे मान्य करावं लागेल, की जर का त्यांच्या 'सामना' या 'स्वार्थवादा'चा पुरस्कार करणाऱ्या त्यांच्या कादंबरीवर चर्चा करण्यासाठी त्यांनी बोलाविलेल्या मंचावरील पाच लोकांपैकी तीनजण असा सूर काढत आहेत, याचा अर्थ या एका कादंबरीने काम झालेलं नाही, अशा अनेक कादंबऱ्या लिहाव्या लागतील!
 दोन वर्षे तीन महिन्यांपूर्वी ही कादंबरी प्रसिद्ध झाली. मी काही फारसा चांगला मराठी वाचक नाही. पण, योगायोगानं दोन वर्षांपूर्वी हे पुस्तक माझ्या हाती आलं आणि वाचता वाचता मला आश्चर्य वाटायला लागलं, की आपण खरंच मराठीमध्ये लिहिलेली कादंबरी वाचतोय का एखाद्या इंग्रजी कादंबरीचं रूपांतर किंवा भाषांतर वाचतो आहोत! काही काही वाक्यांवर मी खुणा केल्या आहेत! 'व्यक्तीला खच्ची करून समाज मोठा बनत नाही,' 'जो जो कर्तबगार असतो, जो जो उत्पादक असतो त्याच्याविषयी सर्वसामान्य माणसाला द्वेष वाटतो आणि त्याच्या कर्तबगारीच्या द्वेषातून वेगळीवेगळी तत्त्वज्ञानं काढून ते शोषणाचं एक तत्त्वज्ञान बनवतात,' 'मी स्वतःकरिता जगत नाही आणि माझ्याकरिता दुसऱ्या कुणीतरी स्वतः स्वार्थत्याग करावा आणि मला जगवावं याची मला शरम वाटेल,' 'स्वार्थ, पैसा, नफा ही काही पापं नाहीत...' ही असली वाक्यं आणि असला विचार मराठी भाषेला पेलू शकेल असं मला खरंच कधी वाटलं नव्हतं. मराठी भाषा म्हणजे, आपल्या लहानपणापासून सानेगुरुजींची. 'स्वतःकरिता जगलास तर मेलास, दुसऱ्याकरिता जगलास तर मात्र खरंच जगलास.' मग, त्याच्यातले वेगळेवेगळे नायक निघाले. पत्र्याच्या चाळीत राहणारा मुंबईचा कामगारनेता नायक बनला आणि तत्त्वज्ञान एकूण असं, की 'ग्रामस्यार्थे कुलं त्यजेत् ।' गावाकरिता कुळाचा त्याग करावा आणि राष्ट्राकरिता गावाचाही त्याग करावा; महत्त्व समूहाला आहे, समाजाला आहे, व्यक्तीला नाही आणि समाजानंही काय साधायचं आहे?
 न त्वहम् कामये राज्यं । न स्वर्गम् नापुनर्भवम् ।।
 कामये दुःख तप्तानाम् । प्राणीनाम् आर्तिनाशनम् ।।
 दुसऱ्याचं दुःख दूर करण्यातच जन्माचं सार्थक आहे. हे आम्ही लहानपणापासून ऐकत आलो आणि एक अशी काहीतरी विचित्र मनोवृत्ती मराठी वाचकांची बनलेली! मराठी सिनेमा लोकप्रिय म्हणजे नावात माहेर आणि डोळ्यातून पाण्याचे पूर वाहवणारी नायिका अशी मराठी सिनेमाची मर्यादा. तशी मराठी कादंबरीचीही एक मर्यादा बनलेली आहे. 'जो जास्त देहदंड भोगतो, जो जास्त कष्ट सोसतो, जो स्वतः जास्त त्रास भोगतो तो श्रेष्ठ.' मग त्याच्या देहदंडातून, आत्मक्लेशातून काही भलं घडत असो किंवा नसो! असा एक 'पीडावाद' ही मराठीची संस्कृती बनली.
 या संस्कृतीतून शिवराज गोर्लेनी आम्हाला पहिल्यांदा बाहेर काढलं आहे, काढण्याचा प्रयत्न केला आहे. अजून त्यांना फार प्रयत्न करावे लागणार आहेत.
 त्यांचं पुस्तक वाचल्याबरोबर मी त्यांना पटकन पत्र लिहिलं आणि त्यांचं कौतुक केलं. त्यानंतर ते जेव्हा मला भेटले त्या वेळी मी त्यांना सूचना केली होती, की एकदा लेखक, प्रकाशक आणि इतर सर्वांनी या प्रश्नावर थोडी चर्चा केली पाहिजे.
 प्रकाशकांनी ही कादंबरी 'लक्षवेधी' आहे असे म्हटले आहे, ही कादंबरी 'क्रांतिकारक' आहे असं म्हटलेलं नाही, स्वतंत्रतावादाचा, उद्योजकतावादाचा, साहसवादाचा हा काहीतरी एक आद्यग्रंथ आहे असंही म्हटलेलं नाही. ही एक 'लक्षवेधी' कादंबरी आहे, तेव्हा लोकांचं लक्ष वेधून घेण्याकरिता यावर चर्चा घडून आणावी अशी मी सूचना केली. उशिरा का होईना, दोन वर्षांनी चर्चा घडते आहे त्याबद्दल प्रकाशक व लेखक दोघांचंही अभिनंदन.
 कादंबरीचं नाव 'सामना' आहे. सामना कुणाचा आहे ? गोष्ट साधारणपणे अशी - एक स्वकर्तृत्वावर उभा राहिलेला कारखानदार अनंतराव आणि दुसरा, आपण जन्माला आलो आहोत तेव्हा आपण समाजाचं काही देणं लागतो असं ऋण मानणारा एक कार्यकर्ता अप्पासाहेब. या दोघांमधला हा सामना आहे.
 मी शाळेमध्ये असताना लिहायचो. ललित लेखन करायचो, कविताही करायचो आणि मला असं आठवतं, की 'सामना'च्या धर्तीचे कथाबीज असलेली एक कथा मी पार्ले टिळक विद्यालयामध्ये असताना विद्यालयाच्या हस्तलिखितात लिहिली होती. शाळेमधील दोन विद्यार्थी. एकाचे वडील हे रिझर्व्ह बँकेत अधिकारी. म्हणजे तो विद्यार्थी घरचा सुस्थितीतील. तसंच अभ्यासातही चांगला, खेळातही चांगला आणि दुसरा जो विद्यार्थी होता तो घरची गरिबी असलेला आणि गरिबी असल्यामुळेच आपण गुणवंत आहोत अशी कल्पना करून बसलेला. सानेगुरुजींनी आम्हाला सांगितलं होतंच, की धट्टीकट्टी गरिबी आणि लुळीपांगळी श्रीमंती! साहजिकच, 'सामना'त जशी एक विद्या आहे, तशीच माझ्या कथेतही एक मुलगी होती आणि त्या लहानशा गोष्टीचा शेवट असा होता, की त्यातला जो श्रीमंत, कर्तबगार असा मुलगा हा बॉक्सिंगचा चँपियन असतो आणि स्पर्धेमध्ये केवळ त्याला आव्हान द्यायचं म्हणून हा दुसरा मुलगा, त्याची बॉक्सिंगमध्ये टिकण्याची काही शक्यता नसताना, बॉक्सिंगला उभा राहतो. चँपियनला वाईट वाटतं, की आपण याच्यावर कसा काय हल्ला करावा; पण तो सहजच मूठ हलवतो आणि समोरचा खाली पडतो आणि गोष्टीचा शेवट त्या मुलीच्या किंकाळीने होतो. इथे शिवराज गोर्लेचं कथासूत्र आणि माझं त्या काळचं कथासूत्र यात मोठा फरक आहे.
 शिवराजांच्या कथेमध्ये कर्तबगाराचे विजयच विजय होत जातात. पहिल्यांदा नायिका विद्या मिळते त्याला. नंतर महाराष्ट्रभूषण पदवीही मिळून जाते. त्यानंतर निवडणुकीतही विजय मिळतो. मला निवडणुकीच्या प्रचाराचा काही अनुभव आहे. शिवराज गोर्ल्यांनी ज्या तऱ्हेचा प्रचार दाखविला त्या तऱ्हेचा प्रचार केला तर अनंतरावांचं डिपॉझिट राहिलं नसतं; पण या कादंबरीत तसा प्रचार करूनसुद्धा लोकांमध्ये अशी काही परिवर्तनाची लाट उसळली, की अनंतराव निवडणूक जिंकून गेले आणि त्याहीपेक्षा मोठा गहरी घाव बसल्यासारखा हल्ला कोणता असेल तर तो म्हणजे अप्पासाहेबांचा मुलगा अजितेम हा स्वतःच मुळी अनंतरावांच्या बाजूने होता.
 कर्तबगार अनंतरावांचे हे चार विजय कादंबरीत दाखविले आहेत, कार्यकर्ता अप्पासाहेबांचा एकही विजय त्यात नाही आणि इथं कथेमध्ये मोठा विरोधाभास तयार होतो. जर का अनंतरावांना महाराष्ट्रभूषण पदवी देण्याइतका समाज जिवंत असेल, केवळ एका भाषणावर जर का समाज अनंतरावांना भरघोस मतं देत असेल आणि जर का खुद्द अप्पासाहेबांचा मुलगा हासद्धा शेवटी वडिलांचा राग करून, अनंतरावांकडे जात असेल, तर मग तुम्ही कोणत्या समाजाविषयी तक्रार करीत आहात? मग प्रश्न पडतो, की अशा तऱ्हेने वागणाऱ्या समाजाने समाजवादाला मान्यता दिलीच कशी? मला वाटतं, कथावस्तूचा गाभा थोडा ठिसूळच आहे.
 असं म्हटलं म्हणजे साहित्य समीक्षक लगेच म्हणतील, की लेखकांना कथावस्तूमध्ये बदल करायला सांगणं हे आपलं काम नाही. मी फक्त एवढंच सांगायचा प्रयत्न करतो आहे, की कथानक जर वास्तवाच्या जवळ आणायचं झालं तर काय करावं लागेल.
 एक कल्पना करूया. हा जो काही सामना झाला, एका बाजूला कारखानदार आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्ता यांच्यातील, हा जरा एकाकी, एकाच संघर्षाला महत्त्व देणारा झाला. त्यातून चुकीची समजूत होण्याची शक्यता आहे, की कारखानदार तेवढे सगळे भले आणि कार्यकर्ते तेवढे सगळे वाईट, आता माझी परिस्थिती अशी विचित्र आहे, की मी उद्योजकतेचा पुरस्कार करणारा आंदोलक आहे. म्हणजे थोडासा अप्पासाहेब आणि थोडासा अनंतराव! किंबहुना, अनंतरावांचा विचार मांडण्याकरिता अप्पासाहेबांची साधनं वापरणारा मी. खली व्यवस्था करण्याकरिता कारखाना काढणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ज्यांच्याकडे पैशाचंसुद्धा भांडवल नाही अशा शेतकऱ्यांचं संघटन करणं हीही गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. उद्योजक म्हणजे कारखानदार नाही; किंबहुना हिंदुस्थानात एखादा उद्योजक कारखानदार असला, तर मला माहीत नाही; खरा उद्योजक जर कोणी असेल, व्यावसायिक असेल तर तो ग्रामीण भागातला शेतकरी आहे. त्याच्याबद्दल काही या कादंबरीत उल्लेख नाही; पण ते लेखकाचं स्वातंत्र्य आहे. पण, मला असं वाटतं, की अप्पासाहेबांबरोबर, जे एसेम जोशींशी साधर्म्य असलेले दाखविले आहे. अप्पासाहेब पेंडशांसारखं एखादं पात्र हवं होतं, जे अर्थवाद मांडत नाही; पण समूहवाद मांडतात.
 मी समाजवाद हा शब्द न वापरता समूहवाद हा शब्द जाणूनबुजून वापरीत आहे. अर्थकारणाकरिता समाजाचं प्राधान्य मानणारे ते समाजवादी. व्यक्तिगत निर्णय हा योग्य नसतो, समाजाकरिता जे निर्णय घ्यावे लागतात, ते शेवटी सामाजिक पातळीवर होऊ शकतात, असं मानतात ते समाजवादी आणि त्याबरोबर सर्वसाधारण मनुष्य हा षड्रिपूंनी ग्रासलेला असतो, त्याचं 'अंततोगत्वा' हित काय आहे हे त्याला समजत नाही, ते सांगणारे आम्ही आहोत असं म्हणणारे आध्यात्मिक, धार्मिक, राष्ट्रवादाची कल्पना मांडताना धर्माचा आधार घेणारे म्हणजे समूहवादाच्या दुसऱ्या भागातले. असं एखादं पात्र या कादंबरीत आलं असतं, तर जास्त चांगलं झालं असतं. आणखी एक. केवळ तुम्ही सुलाख्यांवर तुटून पडू नका आणि केवळ काका टापऱ्यांवर तुटून पडू नका. सुलाख्यांकडून लायसेन्स-परमिट घेऊन, आपली कारखानदारी उभी केलेले, ज्यांच्याकडे उद्योजकतेचा लवलेश नाही आणि केवळ लायसेन्स-परमिटच्या आधाराने कारखानदार झाले असंही एखादं पात्र असतं, तर 'सामना'तलं चित्र जरा जास्त संपूर्ण झालं असतं.
 या कादबंरीतला एक मुद्दा फार चांगला वाटला. सुलाख्यांकडे लायसेन्स-परमिट मिळवायला जायला लागतं; पण जेव्हा अनंतराव स्वतःच्या कारखान्यामध्ये एक लहानसं यंत्र तयार करू पाहतात, तेव्हा इंग्रजांच्या अमदनीतला इंग्रजी साहेब हा 'नवाथेनगर'ला येऊन, अनंतरावांचं कौतुक करतो. मला वाटतं, की ही घटना महत्त्वाची आहे. इंग्रजांच्या राज्यामध्ये जे काही चाललं होतं, तो सर्व अन्यायच होता, जुलूमच होता असं अप्पासाहेब ज्या ज्या प्रकरणात नायक आहेत त्या त्या प्रकरणात वाटतं. जालियनवाला बाग, रौलेट, सायमन वगैरे वगैरे घटना पाहिल्या म्हणजे वाटणारंच, की इंग्रजांचं राज्य म्हणजे जुलूमच होता. पण, अनंतरावांचं प्रकरण उघडलं, की त्याच्यामधला इंग्रज हा वेगळ्याच तोंडवळ्याचा दिसतो. खरी परिस्थिती काय होती?
 मला वाटतं, इथे जोतीबा फुल्यांचा संदर्भ घेणे सयुक्तिक ठरेल. इंग्रज हा परकीय आहे. तो आमच्या भल्याकरिता आलेला नाही. तो इथून एक दिवस जाणार आहे हे नक्की. पण, तो जाण्याच्या आधी निदान इथल्या सर्वसामान्य माणसांना विद्या मिळवून शहाणं व्हायची संधी मिळाली आहे. ती संधी घेतल्याखेरीज जर का इंग्रजांना आपण काढून लावलं, राजकीय लढ्यालाच महत्त्व दिलं, तर काय होईल? याचं जोतीबा फुल्यांनी समोर ठेवलेलं चित्र या कादंबरीत आपल्याला अवतरलेलं दिसतं.
 अनंतरावांचा वाद हा उद्योजकतावाद नाही, या वादाच्या मागे आणखी काही जास्त व्यापक भूमिका आहे असं मला वाटतं.
 आपल्याकडे शब्दाचं मोठं दारिद्र्य आहे. कुणीतरी काही वेगळं करायला लागला, की त्यावर आपल्याजवळील तुटपुंज्या शब्दसंपत्तीतील एखादा शिक्का मारायचा आणि त्याला एखाद्या कप्प्यात बंद करून टाकायचं म्हणजे मग आपल्या डोक्याला ताप नाही असा आपल्या सर्व 'विचारवंतांचा' खाक्या.
 हल्ली माझीसुद्धा ओळख करून देताना लोक मला 'खुल्या व्यवस्थेचा समर्थक' म्हणतात. मी खरंच 'खुल्या व्यवस्थेचा समर्थक' आहे का? मला वाटतं मी असलोच तर 'बंदिस्त व्यवस्थेचा विरोधक' आहे. आज कोणत्याही सामाजिक दुःखाकरिता, कोणत्याही सामाजिक अन्यायाकरिता मग ते दुःख, अन्याय किती का भयानक असेना, ते दूर करण्याकरिता शासन नावाच्या राक्षसीच्या हाती मी कणमात्रसुद्धा सत्ता द्यायला तयार होणार नाही. शासन कोणतीही समस्या सोडवत नाही कारण शासन हीच समस्या आहे. ही माझी आजची भूमिका; ही माझी भूमिका उद्या असेलच असं सांगता येत नाही.
 समाजवाद संपला यात काही वाद नाही, पण भांडवलशाही जिंकली ही कल्पनाही तितकीच खोटी. भांडवलशाही समाजवादाच्या आधी संपलेली आहे. पण फक्त भांडवलशहांनी ग्रंथबद्धता, ग्रंथप्रामाण्य न मानल्यामुळे त्यांचा पाडाव कधी झाला हे पुराव्यानं दाखवता येत नाही. समाजवाद्यांनी ग्रंथप्रामाण्य मानल्यामुळे त्यांचा पाडाव झालेला इतका ढळढळीत दिसतो, की तो त्यांचा त्यांनासुद्धा नाकारता येणं अशक्य आहे. पण, याचा अर्थ व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय झाला असं मी मानीत नाही.
 कदाचित, ऐंशीनव्वद वर्षांनी अशी यंत्रं तयार झाली की ज्यायोगे दिल्लीत बसूनही आंबेठाणसारख्या कोपऱ्यातील गावातली पिके कशी आहेत हे पाहता आले तर नियोजनाचा आजवर झाला असा बट्ट्याबोळ होणार नाही. कदाचित दुसऱ्या ग्रहावरील आक्रमणं सुरू झाली किंवा एका बाजूला पृथ्वीवरील लोक आणि दुसऱ्या बाजूला इतर ग्रहांवरील लोक असं विज्ञानकूटकथांसारखं चित्र जर उभं राहिलं तर सगळ्या पृथ्वीवरील देशांचं नियमन करणारं एक नियोजन करणारं एखादं शासन उभं राहू शकतं अशी कल्पना करता येईल. पण आजच्या परिस्थितीमध्ये नियोजन व्यवस्थेचा पाडाव झाला आहे यात शंका नाही.
 लोकसभेमध्ये विश्वासाच्या ठरावावर बोलताना आमचे पंतप्रधान म्हणाले, की 'रशियाचा पाडाव का झाला? माझे काही रशियातले उच्चपदस्थ मित्र म्हणतात की आमच्याकडे पक्ष होता, शासन नव्हते म्हणून रशियाचा पाडाव झाला.' मी एक लेख लिहून म्हटलं, No Prime Minister, तुमची चूक आहे. रशियाच्या पाडावाचा खरा निष्कर्ष असा की आजपर्यंत मनुष्यजातीने व्यक्तीच्या स्वतःच्या प्रेरणांपलीकडे अधिक विश्वसनीय अशी काही फूटपट्टी शोधून काढलेली नाही. उद्या निघणार नाही असं मी म्हणत नाही. काही कायमचं लिहू नये. कायमचं लिहिण्याची हौस मार्क्सला होती आणि जे लोक दोनशे आणि तीनशे वर्षांचं भविष्य सांगण्याचा आग्रह धरतात, ते वीस वर्षसुद्धा टिकत नाहीत.
 मनुष्यजातीमध्ये एक एक परिवर्तन घडतं आहे. मनुष्य व्यक्ती म्हणून जन्मलेला नाही. जीवशास्त्रीयदृष्ट्या तो व्यक्ती म्हणून जन्मतो; पण तो एखाद्या समाजाचा भाग, टोळीचा भाग, गावाचा भाग, जातीचा भाग, धर्माचा भाग म्हणून जगतो. पहिल्या संस्कृती झाल्या, त्या नदीच्या काठी गाळपेराच्या जमिनीमध्ये, शेतीवर आधारलेल्या संस्कृती होत्या. त्याच्यामध्ये काम करणारे श्रमिक तयार झाल्यानंतर श्रमिकांवर आधारलेल्या संस्कृती तयार झाल्या. श्रमिकांच्या हाती साधनं मिळाल्यावर उत्पादकता वाढते, हे लक्षात आल्यानंतर भांडवलवादी व्यवस्था तयार झाल्या. त्या भांडवलवादी व्यवस्थेचे दोन भाग म्हणजे एक अमेरिकन भांडवलवाद आणि दुसरा रशियन समाजवाद - दोघंही भांडवलावर आधारित आहेत.
 नवी संस्कृती अवतरते आहे, तिला काय नाव द्यावं? मी तात्पुरतं नाव दिलं आहे उद्योजकतावाद. उद्योजकतावाद तयार होतो आहे. जमीन (Land) महत्त्वाची नाही, श्रम (Labour) महत्त्वाचे नाहीत, भांडवल (Capital) महत्त्वाचं नाही तर योजकता (Enterprise) म्हणजे उत्पादनाचा सर्वांत महत्त्वाचा घटक आहे हे मानणारी व्यवस्था तयार होते आहे आणि या संदर्भामध्ये आपल्याला 'सामना'मधल्या सामन्याकडे पाहिलं पाहिजे.
 'स्वार्थ' हा शब्द बदनाम झाला आहे आणि शिवराज गोर्ल्यांनी आयन रॅण्डचं नाव वापरलं; म्हणून मी त्यांना प्रेमळ सल्ला देतो, की मांडणी करताना समाजवाद म्हटलं, की लगेच प्रतिक्रिया म्हणून स्वार्थवाद म्हटलंच पाहिजे असं नाही. किंबहुना, तुम्हाला जे काही म्हणायचं आहे, ते स्वार्थवादानं होत नाही. आयन रॅण्डनीसुद्धा या विचाराला Virtue of Selfishness म्हणून थोडं नुकसानच केलं आहे. मला मुद्दा टाळायचा नाही, त्याची मांडणी कशी करावी याबद्दल बोलतो आहे.
 माझा विचार साधा आहे, की एका व्यक्तीसारखी दुसरी कोणती व्यक्ती असू शकत नाही. प्रत्येक माणसाचं व्यक्तिमत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे जर असेल, तर या विश्वाचा जो काही व्याप आहे याचा अनुभव घेण्याची आणि सिद्धांत समजून घेण्याची माझं शरीर ही एक अनन्यसाधारण व्यवस्था आहे. मी जो अनुभव घेऊ शकतो तो दुसरा कोणी घेऊ शकत नाही. मी माझ्या बारीकशा छिद्रातून जगाकडे पाहतो आहे; पण माझं हे स्वतःचं छिद्र पवित्र आहे, दुसऱ्याचं छिद्र घातक आहे आणि म्हणून जी मंडळी दुसऱ्याच्या छिद्रातून जगाकडे पाहण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण छिद्रविरहित पाहू शकतो अशी कल्पना करतात त्यांची परिस्थिती हत्ती पाहायला गेलेल्या चार आंधळ्यांसारखी होते. सगळे डोळस म्हणतात, आंधळ्यांना अपुरं ज्ञान झालं, आम्हाला मात्र सगळा हत्ती कळला; पण आपण हे कधी लक्षात घेत नाही, की डोळसांना कदाचित् अशी अनेक इंद्रियं नसतील, की त्यामुळे हत्तीचं अधिक सम्यक् दर्शन घेता आलं असतं.
 स्वार्थी लोकांनी काय मोठे उत्पात घडवले हो ? परमार्थाचं नाव घेणाऱ्या आणि समाजाच्या कल्याणाचं व गरिबांच्या भल्याचं नाव सांगणाऱ्या लोकांनी लक्षावधी नाही, कोट्यवधींची डोकी फोडली, शिरच्छेद केले, घरं जाळली, स्त्रियांवर बलात्कार केले. स्वार्थाचं तत्त्वज्ञान नागडेपणानं मांडणारांनीसुद्धा कुणी इतकी भयानक पापं केली नाहीत, जी धार्मिकांनी आणि समाजवाद्यांनी केली. स्वार्थाला नावं ठेवतात म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही; पण त्याचं तत्त्वज्ञान मांडताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी.
 आपण व्यक्तीच्या अनन्यसाधारणत्वाचं पावित्र्य जपतो आहोत. मी समतावादी आहे का? मी विषयमतानिर्मूलनवादी नाही. मी समतेचा अर्थ कसा समजतो? तुमच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे ? समान का आहोत आम्ही? आम्ही समान याकरिता आहोत, की तुम्ही जितके अनन्यसाधारण आहात, तितकाच मीदेखील अनन्यसाधारण आहे; आमच्या समतेचा पाया आमचे अनन्यसाधारणपण आहे.
 'सामना'मधील अनंतराव आणि अप्पासाहेब यांच्यामधला जो वाद आहे, तो माझ्या मते, उद्योजक आणि कार्यकर्ता यांमधला नाही. मी माझ्या एका लेखात म्हटलं आहे, की देश जितका भिकार तितकी महात्म्यांची संख्या जास्त. संपन्न देशाला महात्म्यांची गरज नाही पडत. हा विचार थोडा समजावून घेऊया.
 मी १९६८-६९ मध्ये माझे वडील वारले, तेव्हा स्वित्झर्लंडमधून परत आलो होतो. दहाव्या-बाराव्याच्या दिवशी नेहमीप्रमाणे अन्न जास्त झालं. तेव्हा माझ्या आईनं माझ्या बायकोला विचारलं, 'इतकं उरलं, आता काय करावं? स्वित्झर्लंडमध्ये असं उरलं, तर तुम्ही काय करता?' माझ्या बायकोनं म्हटलं, 'एखादा दिवस खाऊन बघतो, नाहीतर बाकीचं टाकून देतो.' माझी आई म्हणाली, 'म्हणजे असं उरलंसुरलं घेणारी मोलकरीण वगैरे तिकडे नसतात?' म्हणजे एखाद्या देशामध्ये आपल्या उष्ट्यावर जगण्याची अपेक्षा ठेवणारी माणसं असतच नाहीत, ही कल्पनादेखील तिला सहन होत नव्हती.
 त्याचप्रमाणे, ज्या ठिकाणी मागासपणा आहे, त्या ठिकाणी महात्मे तयार होतात. दुर्दैवाने आम्ही आज इतके मागासलेले आहोत, की आमच्याकडे एक गांधी तयारी व्हावे लागतात, एक अप्पासाहेब तयार व्हावे लागतात, अशी रांगच्या रांग तयार व्हावी लागते.
 एक दिवस असा उजाडेल अशी आपण आशा करूया, की ज्या दिवशी देशाला महात्म्यांपासून स्वातंत्र्य मिळेल आणि सामान्य माणसांना समान अनुभव.
 व्यक्तीनं जी काही प्रगती केली असेल, ती त्यानं केलेली असते. आर्थिक महात्मे असोत का धार्मिक, आध्यात्मिक महात्मे असोत यांनी सर्व समाजाला चुकीच्या दिशेने हाकारले आणि व्यक्ती आपापल्या छिद्रातून पाहता पाहता, चुका करत, पडत, सावरल्या, पुन्हा पुढे गेल्या. त्यांच्यामुळे मनुष्यजातीची जी प्रगती झाली ती लक्षावधी, कोट्यवधी सामान्य लोकांनी पडतपडत, पडल्यानंतर पुन्हा उठून पुढे चालून, जी स्वतःची प्रगती केली त्यातून झाली आणि ज्यांना ज्यांना आम्ही महात्मे मानले, विचारवंत मानले, ते ते सर्व मनुष्यजातीच्या प्रगतीतले अडथळे ठरले.
 'सामना'मधील सामना आहे तो कोणामधला? सामना आहे तो एका बाजूला समूहवाद, ज्यात व्यक्ती महत्त्वाची नाही, व्यक्तीच्या महत्त्वाकांक्षांना स्थान नाही, समाजाला महत्त्व आहे आणि दुसऱ्या बाजूला व्यक्तिवाद – समूहवादाचा पुरस्कार करणारे पुस्तकातील अप्पासाहेब काय किंवा प्रत्यक्षातले अप्पासाहेब पेंडसे काय, दोघांचीही जातकुळी एकच. मी क्रिकेट खेळलो, चांगलं क्रिकेट खेळलो, तर त्यामध्ये कदाचित काहीतरी राष्ट्रद्रोह होतो अशी अपराधी भावना हे समूहवादी आमच्या मनात तयार करतात.
 मी चांगली चित्र काढण्यामध्ये रममाण झालो, तर मी काहीतरी चूक केली असं यांनी आम्हाला वाटायला लावलं. एक पाऊल पुढे टाकून, मी आग्रहानं मांडतो, की व्यक्ती म्हणून मला जर का केवळ आळस करण्यातच स्वारस्य वाटत असेल, गंभीरपणे तर तो आनंद घेण्याचं स्वातंत्र्यदेखील मला असलं पाहिजे. आनंदाचा शोध घेताना मला एक प्राणी फक्त आनंदी सापडतो. चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये डुंबणाऱ्या म्हशीच्या तोंडावर जी तृप्तता दिसते, ती मला दुसऱ्या कोणत्याही प्राण्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. अडचण कुठे तयार होते? आळशी माणसानं उद्योजकतेचं फळ आपल्याला मिळावं अशी आशा धरली, म्हणजे खरी अडचण होते. 'मी आळसवादाचा इतका पुरस्कर्ता आहे, की त्याचा आळशीपणाच्या फळांसकट स्वीकार करायला मी तयार आहे,' असा जर वाद मांडला तर त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा खरा अर्थ लागेल.
 या कादंबरीत कामगारांच्या लढ्याबद्दल फार बोललं गेलं आहे. मीही वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या कामगार नेत्यांबरोबर काम केलेलं आहे. कामगारांच्या चळवळीबद्दल बोलताना एक गोष्ट विसरून चालणार नाही. एकदा दत्ता सामंतांना मी सहज प्रश्न विचारला, 'कांद्याचं आंदोलन करताना आम्ही कांद्याचा उत्पादनखर्च काढतो आणि मग मागणी करतो. तुम्ही जेव्हा संपाच्या वेळी पगार वाढवून मिळावेत म्हणून मागणी करता तेव्हा हिशेब कसा काय काढता?' दत्ता सामंतांनी उत्तर दिलं, '!!!! यांचे सगळे ताळेबंद आणि बॅलन्सशीट आम्हाला माहिती असतात. दाखवलेल्या फायद्याच्या किमान पाचपट फायदे काढतात. या चोरांना ठोकून जितकं काढता येईल तितकं काढून घेण्याचा आमचा प्रयत्न असतो.' तेव्हा, कामगार चळवळीला नावं ठेवताना लक्षात ठेवलं पाहिजे, की लायसेन्स-परमिट व्यवस्थेच्या आधारे जर का कारखानदार म्हणून मक्तेदारी मिळवली आणि तुमची पात्रता नसताना फायदे मिळवू लागलात, तर कामगारवर्ग हा एक चोरांचा गट दुसऱ्या चोरांकडून लूट काढून घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तेव्हा, सगळे उद्योजक फार श्रेष्ठ आणि सगळे कामगार नेते, सगळे काका टापरे हे मात्र चुकीचे हे खरं नाही. हा धोक्याचा खेळ आहे.
 क्रांती कोण करतं? लेनिन आणि मार्क्स यांच्या क्रांतीच्या सिद्धांताची मोठी चर्चा आहे. मी नेहमी म्हणतो, की क्रांती ही शोषित करीत नाहीत, क्रांती ही सर्वांत अधिक शोषित असतात ते करतात, सर्वांत अधिक शोषित क्रांतीचे अग्रदूत असतात असं आम्हाला मार्क्सनं सांगितलं. सर्वच क्रांत्यांचा इतिहास जर आपण पाहिला तर भाकरी मिळत नाही म्हणून भुकेलेल्या लोकांनी क्रांती केलेली क्वचितच दिसते. बंगालच्या दुष्काळामध्ये भुकेपोटी कोलकत्त्यात आलेले लोक भाताच्या गोदामासमोर उपाशी मेले; पण त्यांनी धान्याची गोदामं फोडली नाहीत. क्रांती करायला माणसाला काही ताकद लागते, काही साधनं लागतात. संध्याकाळची व्हिस्की चुकली म्हणून क्रांती करणारांची संख्या अधिक आहे. क्रांती होते ती शोषक नंबर दोन जास्त वेळा करताना दिसतो. शोषक नंबर एक हा वरचा पापुद्रा काढून, खालचा पापुद्रा क्रांती करताना दिसतो. तेव्हा कामगार चळवळीला नावं ठेवताना लायसेन्स-परमिट व्यवस्थेतल्या कारखानदारीतून ही कामगार चळवळ फोफावली, ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.
 'सामना'मध्ये निदान तीन वेळा अनंतरावांच्या तोंडी एक उल्लेख घातला आहे, 'शेवटी एक टापरे आणि शिरोळे एकत्र व्हायला लागले, तर आम्हा उद्योजकांनासुद्धा एकदा एकत्र व्हायला लागेल.' आयन रॅण्डनी म्हणे पृथ्वीचं ओझं पेलणारा शेषनाग जर कधी आपला फणा हलवू लागला, तर काय होईल याची कल्पना मांडली आहे. एक सावधगिरीची सूचना- चोरांच्या टोळ्या बनतात, लुटारूंच्या टोळ्या बनतात, उद्योजकांच्या टोळ्या बनणं फार कठीण आहे. जे व्यक्तिवादी आहेत, उद्योजक आहेत त्यांनी एकत्र कसं काय जमावं? हिंदुस्थानमध्ये समाजवादाचा डोलारा कोसळून पडला, नेहरूनियोजनाचा फज्जा उडाला आणि तरीदेखील आता नियोजन करणारं माझं मायबाप सरकार कुणी नाही, मी माझ्या पायांवर ताठ मानेनं उभा राहीन आणि स्वत:ची स्वतः प्रगती करीन, असं म्हणण्याऐवजी लोकांच्या झुंडींनी दोन रुपये किलो तांदूळ आणि रुपयाला झुणकाभाकर देणारांना मतं दिली, हे विसरू नका. 'सामना'मध्ये अनंतरावांचं जे यश दाखविलं आहे, ते फार दिशाभूल करणारं आहे. गेल्या निवडणुकीमध्ये समूहवादी नियोजनाचा विरोध करणारा एकमेव पक्ष म्हणून आम्ही निवडणुका लढविल्या आणि आमचा इतका फज्जा उडाला! तेव्हा उद्योजकवाद्यांनी हे लक्षात ठेवावं, की झुंडशाहीची साधनं वापरून व्यक्तिवादाचा विजय होईल अशी कल्पना करू नये. पण, 'सामना'मध्ये असं दिसतं, की सर्वसामान्य माणसं उद्योजकता, साहस आणि व्यक्तिवाद यांचं स्वागत करू शकतात. प्रत्यक्षात आजमितीला असं दिसतं, की हे असं फक्त काही विशेष संकटाच्या काळीच होऊ शकेल.
 पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला, तरीसुद्धा पोपट स्वतंत्र होऊ पाहत नाही. आईच्या उदरातून गर्भसुद्धा बाहेर पडू इच्छित नाही, शक्यतो आईच्या कुशीतच राहावं असा प्रयत्न करतो, स्वातंत्र्य हे त्याच्या हिताचं आहे, हे माहीत असूनसुद्धा. दरवाजा उघडून दिला, तर पोपट थोडा उडून जातो आणि पुन्हा वाटीमध्ये डाळ पडायची वेळ येते, तेव्हा डाळ येते का नाही ते पाहायला येतो. सगळा इतिहास स्वातंत्र्याच्या दिशेने जातो, एवढीच तुमची जमेची बाजू आहे. पण, माणसं स्वातंत्र्याकडे जातात ती मागून लाथ बसल्यावरच जातात असं इतिहास सांगतो. ही वस्तुस्थिती दाखवणारी कादंबरी तयार होण्याची वाट पाहूया?

(२१ जून १९९७)

◆◆