अन्वयार्थ - १/सामान्य जनता आणि विविध ठगांची टोळी

विकिस्रोत कडून



सामान्य जनता आणि विविध ठगांची टोळी


 लॉर्ड बेंटिकने हिंदुस्थानातील ठगीचा बंदोबस्त केला असे आमच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले होते.
 शाळेतील पुस्तकात अशी अनेक वाक्ये असतात, की ज्यांचा, खरे म्हटले तर, अर्थ मुलाना समजत नाही. अर्थ न समजताच अशी वाक्ये पाठ केली जातात, अशा वाक्यांपैकीच हे एक वाक्य.
 बंदोबस्त करण्यापूर्वीची ठगी म्हणजे काय होती यासंबंधी काही माहिती इतिहासाच्या पुस्तकात मिळत नाही, तिचा बंदोबस्त लॉर्ड बेंटिकने केला एवढेच म्हटलेले असते.
 कठीण जागी हल्ला
 त्या काळात शेरशहा, मलिकंबर आदी लोकांनी रस्ते बांधून बाजूला सावलीसाठी झाडे लावली व प्रवाशांच्या पिण्याच्या पाण्याची सोय केली असे लिहिलेले असते. किंबहुना, कोणत्याही चांगल्या राजाने किंवा बादशहाने जनकल्याणाची कोणती कामे केली, असा प्रश्न परीक्षेत विचारला तर रस्ते बांधण्याच्या कामगिरीचा उल्लेख बिनधोकपणे सगळे चलाख विद्यार्थी करतात. हे असे राजमार्ग सोडल्यास सडका जवळजवळ नाहीत. जे रस्ते असत त्यावर नदीनाले ओलांडण्यासाठी फार तर सांडवे असत. पूल इंग्रजांनी इथे आणले. दऱ्याखोरी, डोंगरजंगले इत्यादीनींच प्रवासाचा सगळा मार्ग व्यापलेला. शहरे, बाजारपेठा यांच्यामधला सगळा प्रदेश त्यांनीच व्यापलेला. या सगळ्या निर्मनुष्य प्रदेशात राज्य ठगांचेच असे. ठग म्हणजे लूटमार करणारे, जे कोणी यात्रेकरू व्यापारी प्रवासाला निघतील त्यांना कोणत्याही मार्गाने लुबाडणे, त्यांचे धन, आवश्यक तर प्राण, दोन्ही हरण करणे हा ठगांचा धंदा. काही वेळा ते प्रवाशांच्या जथ्थ्यांत, सहप्रवासी म्हणून सामील होत आणि वाटचाल करताना अडचणीचा प्रदेश आला म्हणजे मौल्यवान चीजवस्तू तेवढ्या नेमक्या लुटून नेत. या ठगांचे देशभर जाळे होते. प्रवासी एका टोळीच्या हद्दीतून पलीकडे गेला, की त्याला लुटण्याचा अधिकारही एका टोळीकडून दुसऱ्या टोळीकडे जाई. या सगळ्या ठगांच्या तावडीतून सुटून सुखरूप यात्रा पुरी होणे मोठी दुरापास्त गोष्ट होती.
 काशीयात्रा सुखरूप झाली
 काशी यात्रेला निघायचे म्हणजे सगळी काही निरवानिरव करायची आणि 'या जाण्याशी परतणे न लगे,' अशी भावना ठेवूनच घरातून निघायचे. वाटेत अपघातांची, जंगली जनावरांची इत्यादी भीती तर खरीच; पण खरी भीती ठगांचीच. कोणत्या ना कोणत्या ठगांच्या टोळीच्या हल्ल्यात चीजवस्तू लुटून जाणार आणि त्याबरोबर जीवही जाणार याची जवळजवळ निश्चिती असे.
 बेंटिकने ठगीचा बंदोबस्त केला आणि काठीला सोन्याचे गाठोडे बांधावे आणि बिनधास्त काशीयात्रेला निघावे अशी परिस्थिती इंग्रजांनी तयार केली.
 ठगास भेटला महाठग
 इंग्रजांनी हिंदुस्थानातील सत्ता हातात घेतली, ती कोणाकडून? दिल्लीच्या बादशहाकडून, रणजितसिंह आदी शिखांकडून, पेशावाईकडून की निजामाकडून की राजपुतांकडून? हा इतिहासातील चर्चेत मोठा वादाचा विषय असतो. खरी परिस्थिती अशी आहे, की इंग्रज येण्याआधी बहुतांश देशावर सत्ता होती ती ठगांची आणि त्यांचा बंदोबस्त केल्यानंतरच इंग्रजांच्या हाती खरीखुरी सत्ता आली.
 शिवाजी महाराजांना मोगलांपेक्षा पुंड-पाळेगार, देशमुख इत्यादींशीच लढाया जास्त कराव्या लागल्या, तसेच इंग्रजांनाही राजेरजवाडे, सुलतान, बादशहा यांच्यापेक्षा ठगांना आटोक्यात आणण्यासाठी अधिक परिश्रम घ्यावे लागले.
 राणीचे राज्य आले, देशात सगळीकडे शांतता नांदू लागली. रस्ते झाले, राजमार्ग झाले. लोखंडी रुळावरून आगगाड्या धाव लागल्या. व्यापारउदीम वाढला. म्हणजे, इंग्रजांनी भारतीय ठगी संपवली आणि इंग्रजी छापाची व्यापारी लुटमारीची पद्धत चालू केली; पण अगदी रानटी पद्धतीची ठगी सोडून थोडी सुसंस्कृत लुटीची पद्धत इंग्रजांनी सुरू केली, 'हेही नसे थोडके.'
 ठगांची नवी आश्रयस्थाने
 पण ठगीचा बंदोबस्त झाला तो लष्करांच्या, पोलिसांच्या किंवा हत्याराच्या मदतीने झाला हे काही खरे नाही. १८५७ च्या बंडापर्यंत ठगांना कह्यात आणण्याचे काम इंग्रज सरकारने मोठ्या जोमाने केले. ५७ च्या बंडाचा तडाखा इतका जबरदस्त होता, की त्यानंतर इंग्रजांनी देशातील परंपरागत धर्मजातिव्यवस्था, सत्तास्थाने यात ढवळाढवळ करण्याचे बंद करून टाकले. साहजिकच ठगांचा पाठलागही बंद पडला. ठगीचा बंदोबस्त झाला. ठगांचा नाश झाला नाही.
 हे ठग लोक गेले कुठे? ज्यांना लुटायचे त्यांच्यातच मिसळून जायचे कसब त्यांनी पिढीजात अनुभवाने मिळविले होते. इंग्रजांची सगळी नवी व्यवस्था त्यांनी पाहिली आणि आपला धंदा आता शहरे, बाजारपेठा यांच्यामधील निर्मनुष्य प्रदेशात चालू शकणार नाही; पण तो धंदा शहरात, बाजारपेठात चांगला चालेल अशी त्यांनी खूणगाठ बांधली आणि हळूहळू व्यापारउदिमाच्या मिषाने सारी ठग मंडळी शहरात जाऊन वसली. इंग्रज रयतेची लूट करतच होते. इंग्रजांच्या हातात हात मिळवून लुटीचे कसब या शहरातील ठगांनी पक्के आत्मसात केले आणि अगदी थोड्या काळात त्यांनी आपले बस्तान चांगले बसवले. डोंगराळ रानात, दऱ्याखोऱ्यात भ्रमंती करण्याचा त्रास नाही आणि कमाई मात्र भरगच्च अशी ही आधुनिक ठगी मोठी यशस्वी झाली. याला महात्मा गांधींचेच प्रमाणपत्र आहे. "देशातील जनतेला लुटण्याचे काम इंग्रज आणि शहरातील मंडळी इतक्या निर्दयपणे करीत आहेत, की त्यांना आपल्या या पापाचा झाडा परपेश्वराच्या दरबारी कधीतरी द्यावा लागेल," असे तो महात्मा तळतळून बोलला होता.
 ठगीचे पुनरुत्थान
 ठगांचे नवीन व्यवस्थेतील स्थान इतके मोठे होते, की इंग्रज गेल्यावर सगळी सत्ता, सगळे सामर्थ्य पुन्हा त्यांच्याच हाती आले. इंग्रज गेल्यावर सनातन ठगीची पुन्हा सुरुवात झाली आणि थोड्याच काळात देशभर ठगांचे साम्राज्य पुन्हा पसरले. लॉर्ड बेंटिकने ठगीचा बंदोबस्त केला. भारतरत्न जवाहरलाल नेहरूंच्या अमलात ठगीचे पुनरुत्थान झाले.
 हे ठग आता दऱ्याखोऱ्यातून फिरत नाहीत. त्यांना प्रवाशांचा पाठलाग करावा लागत नाही. लढाया तर सोडाच; पण किरकोळ हिंसाचारसुद्धा करावा लागत नाही. कोणत्याही कामाला निघालेली माणसे आपणहून ठगांच्या मुक्कामी येतात, आपणहून ठगांच्या तिजोऱ्या भरतात.
 अवघे ठग माजले
 प्रवासाकरिता निघाले तर त्यांना ठग तिकिटाच्या खिडकीपासूनच भेटतो. ठगाला खुश केले तर तिकीट मिळणार. तिकीट काढल्यानंतर वाटेमध्ये तपासणीस ठग भेटले तर त्यांनासुद्धा खुश करावे लागणार, तेव्हा प्रवास पार पडणार.
 घरी बसून राहिले तरी ठगांची गाठ टाळता येत नाही. साधा ७-१२ चा उतारा पाहिजे असेल तर तिथे एक ठग असतोच. आपल्याच शेतातील एखादे झाड तोडायचे झाले तर संबंधित ठगाचे समाधान करावे लागते. व्यापाऱ्याच्या दुकानात सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठग येतात. व्यापारी काही न बोलता जी काही चीजवस्तू असेल ती त्यांना देऊन टाकतात. कारखानदारीची हीच स्थिती.
 बँकेत कर्ज पाहिजे, ठग आहेच बसलेला. आपलेच पैसे आपणच बँकेत ठेवलेले, ते नुसते काढून घ्यायचे म्हटले तरी पुन्हा ठगांना खुश करायला लागते. दुकान काढायचे तर संबंधित ठगांच्या टोळीला खुश केल्याशिवाय ते शक्य नाही. विजेचे कनेक्शन पाहिजे? वीजठग उभा ठाकलेला. टेलिफोन ठगांच्या तर वेगवेगळ्या टोळ्या आहेत. त्या प्रत्येकाचे समाधान वेगवेगळे केले तर टेलिफोन मिळणार. टेलिफोन मिळाल्यानंतर तो व्यवस्थित चालू राहावा अशी इच्छा असेल तर आणखी एक ठगाच्या टोळीला खुश ठेवले पाहिजे.
 गॅस सिलिंडर हवे असेल तर त्यासाठी ठगांची एक वेगळी टोळी, पासपोर्ट, तिकीट, कोणतीही गोष्ट करायचे म्हटले तर कोणातरी ठगाच्या दारात जाऊन त्याला खुश करण्यापलीकडे सामान्य माणसाला गत्यंतरच नाही. इंग्रज यायच्या आधी देशावर ठगांचे राज्य होते, आता तो पुन्हा एकदा 'ठगीस्तान' बनला आहे.
 रडण्यापरीस हसणे बरे
 या ठगीचा बंदोबस्त करणारा नवा लॉर्ड बेंटिक केव्हा अवतरेल ते सांगणे कठीण आहे; पण कोलकत्त्यातील एका पत्रकाराने एक नवाच मार्ग दाखवून दिला आहे. ठगांशी वादविवाद करायचा नाही. झटापट करायची नाही; तरीही त्यांना गोत्यात आणायचे असा मोठा सुंदर डावपेच आखला, एवढेच नाहीतर अमलात आणून दाखवला.
 हे पत्रकार महाशय एका हॉस्पिटलमध्ये गेले आणि त्यांनी मूत्यूचा दाखला मागितला. कोणाच्या मृत्यूचा? तर स्वतःच्याच! पहिल्या ठिकाणी मृत्यू दाखला ठगांनी ५०० रुपयात जिवंत अर्जदाराच्या मृत्यूचा दाखला देण्याचे कबूल केले; पण ५०० रुपये म्हणजे फार झाले अशी सबब सांगून पत्रकार तिथून निघाले आणि दुसऱ्या एका इस्पितळात गेले आणि तेथून स्वतःच्या मृत्यूचा दाखला फक्त २०० रुपयांत पदरात पाडून घेतला. बंगालमध्ये या प्रकरणाची आता मोठी चर्चा चालू आहे.
 ठगांना सगळा सरकारी पाठिंबा आहे. ठगीचे जाळे आता इतके व्यापक झाले आहे, की त्याच्याशी लढणे आता कोणालाच शक्य नाही. ठगीशी असा गनिमी कावा खेळायला काय हरकत आहे? सरकारी नोकरदारांच्या ठगीचा असा फजितवाडा करणाऱ्या बहाद्दरांना मोठे जबरदस्त पारितोषिक दिले पाहिजे. यात स्वतंत्र प्रतिभेला कितीतरी वाव आहे. न घडलेल्या घटनांच्या बातम्या आणि माहितीपट टेलिव्हिजनवरून दाखवण्याची व्यवस्था करणे, मुळात अस्तित्वातच नसलेल्या गावांना साक्षर, दारूमुक्त गाव म्हणून सन्मानपत्रके मिळवणे, न जन्मलेल्या माणसांच्या, पाळण्यातील पोराटोरांचा किंवा जख्खड म्हाताऱ्यांचे कुटुंब कल्याण ऑपरेशन केल्याचा दाखला घेणे, एक ना अनेक, प्रतिभेच्या आविष्काराला भरपूर वाव आहे. ठगीला आळा घालता आला नाही तर निदान एखाद्या ठगाला हास्यास्पद करण्याचे मानसिक समाधान तर मिळेल?
 आमची ऐतिहासिक परंपरा ठगीची आहे. या ठगीस्तानात ठगांच्या कारवायांचा खरोखर बंदोबस्त होईल असे काही लक्षण नाही. या कामात लॉर्ड बेंटिकही चुकला. ठगाकडूनच लुटून घेणे हे आमच्या कपाळावरच लिहिलं आहे; पण लुटून घेता घेता थोडा विनोद करणे यापलीकडे सर्वसामान्य माणसाला वेगळे काही समाधान मिळण्याची आजतरी शक्यता नाही.

(४ मार्च १९९३)
■ ■