अन्वयार्थ - १/श्वानासाठी साडेपाच हजार : माणसासाठी किती?

विकिस्रोत कडून


श्वानासाठी साडेपाच हजार : माणसासाठी किती?


 वेठबिगारांच्या संघटनेचे नेते स्वामी अग्निवेश मोठे प्रभावी वक्ते आहेत. समाजातील विषमता श्रोत्यांच्या मनावर ठसविण्याकरिता आपल्या भाषणातून ते नेहमी एक उदाहरण देतात. आगगाडीच्या डब्यातून एक साहेबीण तिच्या कुत्र्यासह आरामाने प्रवास करीत असते. तिचे कुत्र्याचे लाड करणे, मुके घेणे चालू असते. नाश्त्याची वेळ झाल्यावर, थर्मासचा मोठा डबा उघडून उकडलेली अंडी, मटन, दूध वगैरे कुत्र्यासमोर ठेवले जाते आणि शेवटी कॅल्शियम व व्हिटॅमिनच्या गोळ्याही कुत्र्याला देण्यात येतात. कुत्र्याच्या या ऐश्वर्याचे रसभरित वर्णन करून स्वामीजी म्हणतात, "देवा, या देशात माणसाच्या जन्माला घालण्यापेक्षा कुत्र्याच्या जन्माला घातले असते तर किती चांगले झाले असते?"
 खुद्द कुत्र्यांनाच इतर कुत्र्यांचा राग असतो. स्वजातीय एकमेकांवर दात काढू लागले, की त्याचे वर्णन 'श्वानवत् गुर्गुरायते' असे करतात.
 साहेबिणींच्या कुत्र्यांबद्दलचा मत्सर स्वामीजींच्या नाही, तर अनेकांच्या मनात डचमळत असतो. लार्सन आणि टुब्रो या कंपनीच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एका कारखान्यात सुरक्षेसाठी अकरा 'डॉबरमन' जातीचे कुत्रे सेवेत ठेवले आहेत. प्रत्येक कुत्र्याला दरमहा पंचावन्नशे रुपये पगार, शिवाय दररोज दोन अंडी, दोन लिटर दूध, चार किलो मटन असा खुराक आहे. या कुत्र्यांना दिवसातून तीन वेळा आंघोळ आणि दर रविवारी वैद्यकीय तपासणी अशा भरभक्कम 'पर्क्स' ही आहेत.
 कुत्रे, मुले आणि पैलवान
 हे वर्णन वाचून भल्याभल्यांच्या पोटात दुखू लागले आहे. देशात माणासासारखी माणसे उपशी आहेत. अमरावती जिल्ह्यात कुपोषणाने शेकडो मुलांचे बळी गेले आणि तेथून थोड्याच अंतरावर कुत्र्यांची अशी भरपेट चंगळ चालते याबद्दल अनेकांना मोठे दुःख वाटले.
 कुत्र्यांवर खर्च करण्याऐवजी भरभक्कम दांडगे पहिलवान नोकरीवर ठेवले असते तर त्यांच्या खुराकाची चांगली सोय झाली असती. एकट्या महाराष्ट्रातच कितीतरी होतकरू पहिलवान खेळाड़ योग्य खुराक नसल्यामुळे कसरत सोडून देतात. लार्सन टुब्रो कंपनीच्या कुत्र्यांच्या जागी या खेळाडूंची सोय झाली असती तर भारताचे नाव क्रीडाक्षेत्रात रोशन व्हायला मदत झाली असती, अशी अनेकांना हळहळ वाटते.
 देशात बेकारी किती माजली आहे! लक्षावधी नाही, कोट्यवधी तरुण बेकार आहेत. त्यात सुशिक्षितांचा, पदवीधरांचा भरणा हा मोठा आहे. बेकारी अशी माजलेली असताना माणसांनी करण्याजोग्या कामांसाठी कुत्र्यांची नेमणूक व्हावी याबद्दल भल्याभल्यांनी सात्त्विक संताप जाहीर केला आहे. 'कुत्र्याचे जिणे' माणसांना मिळावे म्हणून जोरदार मागणी केली आहे.
 कुत्र्यांमुळे रोजगारी घटेल?
 यंत्रे वापरून बेकारी वाढवू नका हा खूप जुना आर्थिक विचार आहे. यांत्रिकीकरण झाले, की माणसे बेकार होतात, संगणक वापरले, की माणसे बेकार होतात असा धोशा वेगवेगळ्या विचाराच्या नेत्यांनी आणि कामगार पुढाऱ्यांनी अखंडितपणे लावला आहे. महात्माजींचा यंत्राला विरोध नैतिक कारणांसाठी होता हे खरे; पण त्याबरोबर माणसांच्या हातांना काम मिळाले पाहिजे हीही भावना त्यामागे होती. सगळ्या विरोधाला तोंड देऊन यंत्रे येत राहिली, संगणक जागोजाग दिसू लागले; पण त्यामुळे नोकरदारांना रजा देऊन काढण्यात आले असे कुठे फारसे ऐकिवात नाही. नोकरदार मंडळी एकदा नेमली गेली, की जळवांप्रमाणे चिकटून राहतात. काम असो नसो, ते आपल्या पदांवर पक्के.
 यांत्रिकीकरण थांबवा, बेकारी हटवा ही घोषणा निरर्थक ठरली. आता कुत्र्यांना हटवा आणि माणसांना त्यांच्या जागी नेमा अशी मागणी सुरू झाली आहे; पण समजा, विद्वानांचा सल्ला ऐकून खरोखरच असे केले, कुत्र्यांच्या जागी माणसांना नेमले तर काय होईल?
 कुत्र्यांच्या जागी माणसे
 सुरक्षेसाठी नेमलेले पहिलवान कुत्र्यांइतकाच खुराक तर खातील; पण त्यानंतर कुत्र्यांप्रमाणे चोवीस तास जागृत राहून, कोठून हल्ला झाला तर प्राणपणाने कर्तव्य बजावण्यासाठी तुटून पडणार नाहीत. कारखान्यात कोणत्या तरी कोपऱ्यात, झाडीत, गर्द सावलीत निवांतपणे तणावून दिलेले सापडतील. कोणी चोरचिलटे घुसले तर त्याचा थांगपत्तासुद्धा पहिलवान पहारेकऱ्यांना लागणार नाही. सशस्त्र टोळीने उघडउघड हल्ला केला तर त्यांचा प्रतिकार करण्यासाठी सामोरे जाण्याऐवजी मानवी पहारेकरी पळता पाय काढतील आणि स्वतःचा जीव वाचवतील. एवढ्यावरच भागले तरी पुरे; हल्लेखोर मानवी सुरक्षा अधिकाऱ्यांना फितवून त्यांच्या संगनमतानेच कारखान्यावर हल्ला करण्याची शक्यता नगण्य नाही,
 माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी संरक्षणासाठी 'काळी मांजरे' ठेवण्याऐवजी डॉबरमन कुत्रे ठेवले असते तर त्यांच्यापैकी कुणी 'बेअंतसिंग' झाला नसता आणि इंदिराजी आजही आपल्या असत्या. राजीव गांधींवर हल्ला झाला तेव्हा सुरक्षा पोलिसांची एकच धावपळ झाली. राजीवजींच्या सुरक्षेसाठी नाही, मारेकऱ्यांच्या साथीदारांना पकडण्यासाठीही नाही तर स्वतःचा जीव वाचविण्यासाठी. सुरक्षा पोलिसांऐवजी कुत्रे असते तर असे कदापिही घडले नसते.
 महाराष्ट्रात पोलिसांच्या आणि कस्टम अधिकाऱ्यांच्या जागी कुत्रे नेमले गेले असते, तर अरब देशातील स्फोटके बिनबोभाट उतरली नसती. कोणाही कुत्र्याने बेकायदेशीर स्फोटकांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्याला आपल्या देखरेखीखाली 'एस्कॉर्ट' देऊन आणले नसते, हे तर नक्कीच. असला नीचपणा कुत्र्याच्या जातीत संभवत नाही.
 सरकारी नोकरांचे शुनीकरण
 लार्सन टुब्रो कंपनीचे अभिनंदन करायला पाहिजे. त्यांनी देशाला एक नवीन दिशा दिली आहे. कंपनीचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून केवळ सुरक्षा खात्यातच नव्हे तर सगळ्याच खात्यात नोकरांचे 'शुनीकरण' करणे देशाच्या मोठे हिताचे होणार आहे. कुत्री बिचारी त्यांना काय नाश्ता. जेवण असेल ते घेतील:पण त्यानंतर आणखी वरकमाई व्हावी यासाठी पंजा पुढे करणार नाहीत. म्हणजे, भ्रष्टाचाराला आपोआपच विराम मिळेल. एखादाच खोटा कुत्रा समोर टाकलेले किलो दोन किलो मटन स्वीकारण्याच्या मोहात पडेल; पण सुटकेस भरून कितीही नोटा आणल्या तर त्यात कोणाही कुत्र्याला स्वारस्य वाटणार नाही.
 शिक्षण संस्थात कितीतरी बेशिस्त माजली आहे. शिक्षक, प्राध्यापक, पर्यवेक्षक यांच्या जागी कुत्र्यांची नेमणूक केली – या जागी 'डॉबरमन'पेक्षा 'पामेरियन' कुत्र्यांची नेमणूक करावी लागेल - तर आठवड्याभरात रॅगिंग थांबेल, मुलींची छेडछाड थांबेल, कॉपी करण्याचे प्रकार थांबतील आणि एवढे करून शिक्षणाचा दर्जा काही फार खालावेल असे नाही.
 बेकारी नाही, कामपालट
 कुत्र्याची नेमणूक केल्यामुळे माणसे बेकार होतील ही भीतीही फारशी खरी नाही. कुत्र्यांना पंचावन्नशे रुपये पगार मिळतो हे खरे; पण त्याबरोबर कुत्र्याच्या तैनातीकरिता ठेवलेल्या माणसांना तेराशे रुपये तरी मिळतातच. शिवाय, वरकमाई आहेच. कुत्र्यांना मिळणाऱ्या पगारातून अंडी, मटन खरीदण्याचे आणि कुत्र्यांना खाऊ घालण्याचे काम शेवटी दोन पायांचे नोकरदारच करणार. पैसे खर्चुन घेतलेला शिधा सगळाच्या सगळा कुत्र्यांपुढे जाईल तर ते मनुष्यस्वभावाला धरून होणार नाही. कुत्र्यांना माणसापेक्षा जास्त पगार आहे हे खरे; पण त्यांची गुणवत्ता, सचोटी आणि कार्यक्षमता पाहता, ते अयोग्य आहे असे कोण म्हणेल?
 संगणक आले, नोकऱ्यांवरून कोणीच दूर झाले नाही. उलट, संगणक तयार करणे, दुरुस्त करणे, चालवणे या कामात अनेकांना रोजगार आणि व्यवसाय मिळाला. नोकरीवर कुत्र्यांना ठेवल्यामुळे नोकरीवरून कोणालाच काढावे लागणार नाही. उलट, चांगल्या कुत्र्यांच्या जातींची पैदास करणे, त्यांना प्रशिक्षण देणे या कामांत कोट्यवधी लोकांना रोजगार मिळून जाईल. पाश्चिमात्य देशांत गावोगावी कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याच्या शाळा आहेत. कुत्र्यांच्या शाळा या एकाच व्यवसायात अनेकांना रोजगार आणि व्यवसाय मिळेल, थोडक्यात, सार्वजनिक सेवांचे राष्ट्रीयीकरण ही कल्पना मागे पडली असली तरी त्यातील नोकरदारांच्या शुनीकरणाचा विचार गांभीर्याने व्हायला पाहिजे. ज्या सरकारी महामंडळाचे खासगीकरण होईल त्यातील नोकरवर्गाच्या जागी नवीन खासगी व्यवस्थापने कुत्र्यांची नेमणूक व्यापक प्रमाणावर करतील. त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात स्पर्धेमध्ये टिकून राहायचे असेल तर त्यांना तसे करणे आवश्यक आहे.
 आपल्याकडे सरदारजींच्या निर्बुद्धपणावर अनेक विनोदी किस्से सांगितले जातात. स्वित्झर्लंड देशात राजधानीच्या बर्न प्रदेशातील लोकांच्या जडबुद्धीबद्दल असेच अने विनोद आहेत. त्यातील एक विनोद असा - स्वित्झर्लंडचे पहिले अवकाशयान चंद्रावर जाण्यासाठी निघाले. यानात प्रवासी दोन. एक माकड आणि एक बर्नचा माणूस, 'बर्नवा.' अवकाश यानात दोन पाकिटे ठेवलेली होती, एका पाकिटात माकडासाठी सूचना, दुसऱ्या पाकिटात बर्नवासाठी सूचना. अवकाशयानाने उड्डाण केले.
 माकडाने पटकन पाकीट उघडले. सूचना वाचल्या. निळी, काळी, तांबडी, तांबडी, पिवळी वेगवेगळी बटने दाबून माकडाने अवकाशयान योग्य मार्गावर आणले, तोपर्यंत बर्नवाचे पाकीट उघडूनसुद्धा झाले नव्हते. संथपणे पाकीट उघडून झाले, त्यातील कागद काढला गेला. कागदाची घडी उलगडून कागद सरळ झाला. बर्नवासाठी एकच वाक्याची सूचना होती – "माकडास वेळोवेळी खाऊ घालणे." देशातील सार्वजनिक सेवांचे अवकाशयान नीट चालायचे असेल तर कुत्रे, माकडे यांचा मोठा उपयोग होईल. त्यांना खाऊ घालण्याचे काम माणसांना राहीलच, ते त्यांनी नीट पार पाडावे म्हणजे मिळविली!

(१४ ऑक्टोबर १९९३)
■ ■