Jump to content

अन्वयार्थ - १/आधुनिक पृथ्वीचा तोल सांभाळणारेच संपावर

विकिस्रोत कडून


आधुनिक पृथ्वीचा तोल सांभाळणारेच संपावर


 ट्रक मालकांचे अभिनंदन! शतशः अभिनंदन! महिन्यापूर्वी वाहतूक बंद करून त्यांनी पथकर रद्द करून घेतला याबद्दल हे अभिनंदन नाही. जकातकराचा ठरीव कालावधीत फेरविचार करण्याची कबुली त्यांनी सरकारकडून वदवून घेतली याबद्दलही ही बधाई नाही. पथकर रद्द करण्याचा निर्णय सरकारने जाहीर केला आणि त्याऐवजी वाहनाच्या परवान्याची फी भरमसाट वाढवली, १५०० रुपयांपासून एकदम ५००० रुपयांपर्यंत चढवली, त्याला विरोध करण्यासाठी वाहनमालक पुन्हा एकदा दंड थोपटून उभे राहिले याबद्दल हे अगदी मनापासूनचे कौतुक आहे.
 मी शेतकरी आहे. वाहनांच्या संपामुळे भाजीपाला, फळे इ. नाशवंत माल उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, होणार आहे आणि तरीही मी वाहनचालकांची प्रशंसा करतो आहे.
 बहुतेक आंदोलने मोठ्या तडाख्यात सरू होतात. आदोलकांचा प्रक्षोभ इतका तीव्र असतो, की लढाईच्या पहिल्या फेरीत उत्साह टिकवून धरणे फारसे कठीण नसते. लढा शिस्तीत चालेल, शांततेने चालेल, आदोलनाविरुद्धचा खोटा प्रचार यशस्वी होणार नाही याची खबरदारी घेणे एवढी पथ्ये सांभाळली, की झाले. बिलामत सुरू होते ती वाटाघाटी सुरू झाल्यानंतर. वाटाघाटी थोड्याफार यशस्वी झाल्या. म्हणजे रोषांची कोंडलेली वाफ निघून जाते. आंदोलक रणभूमीवर जिंकतात आणि वाटाघाटीत हरतात.
 वाटाघाटीत तयार झालेल्या करारनाम्यांच्या अटींच्या शब्दांबद्दल, अगदी स्वल्पविरामांबद्दलसुद्धा खळखळ सुरू होते आणि सरकार मोठ्या युक्तीने आंदोलकांच्या तोंडाला पाने पुसते. नर्मदा बचाव आंदोलनाची दिल्लीतील वाटाघाटीनंतर झालेली दुरवस्था याचे चांगले उदाहरण आहे. लढ्याच्या पहिल्या फेरीचा शिणवटा उतरलेला नसतो; आंदोलनाची दुसरी फेरी सुरू करायला कोणीही फारसे उत्सुक नसते. सरकारच्या डावपेचांचा मुंहतोड जवाब द्यायला लागणारे चैतन्य शिल्लक नसते. बहुतेक आंदोलने या पायरीला संपून जातात. काहीशी निराशा येते आणि मग पुन्हा एकदा रोषाची वाफ कोंडून विस्फोटक बनेपर्यंत सारे काही शांत होऊन जाते. वाहनचालकांचे आंदोलनाचे चाक पंक्चरले नाही, महिन्याभरात पुन्हा एकदा तडाखा देण्याची जी ताकद आणि कर्तबगारी आंदोलकांनी दाखवली त्याच्याबद्दल हे अभिनंदन आहे.
 ऐतखाऊंचे संप
 सगळे नोकरमाने संप करतात. ज्यांची खरोखरच हलाखीची परिस्थिती आहे असे असंघटित कामगार गावोगावी विखुरलेले आहेत. त्यांचे काही संप होत नाहीत. त्यांची बिचाऱ्यांची ताकदच नसते. संघटित कामगार वारंवार संप करतात. पायलट महिना ६५००० रु. रोख आणि इतर अनेक फायदे मिळवणारे बँक, विमा, कर्मचारी, भाग्यवान प्रध्यापक, शिक्षक हर मुहूर्ताला सोने खरेदी करणारे. संप करायचा तो पगारदारांनी. मग त्यांची पगारभत्त्यांची किती का लयलूट असेना! संपाच्या हत्याराची मक्तेदारी नोकरदारांची अशी कल्पना समाजवादी अमदानीत रूढ झाली होती. म्हणजे विमानचालक कामगार, प्राध्यापक, कामगार यांनी लाल झेंडा हाती घेऊन शोषणाच्या विरुद्ध आरोळ्या ठोकल्या, सगळे जनजीवन विस्कळीत करून टाकले तर चालेल; पण स्वयंरोजगार, पानाचा ठेलेवाला, वेल्डिंग किंवा मोटार दुरुस्तीचा धंदा चालवणारा, एखादी टेम्पो घेऊन महिना हजार दोन हजार रुपये कसेबसे कमवणारा यांना संप करण्याचा अधिकार नाही. कारण ते नोकर नाहीत, गरीब असले तरी मालक लोक आहेत.
 मालकांचेही संप
 शेतकऱ्यांनाही आपले दुःख पुढे मांडण्याचा काही रस्ता नाही. कारखानदारांची स्थिती तीच. यंत्रे आणि साधनसामग्री समाजवादी व्यवस्थेत भरमसाट किमत देऊन घेतलेली; जुन्यापान्या तंत्रज्ञानावर आधारलेली; जिकडे तिकडे लायसेंस-परमीट राज्य आणि इन्स्पेक्टरांची मनमानी. कामगारांची कुशलता काम टाळण्यात आणि चुकवण्यातच! धंदा डबघाईला आला, लक्षावधी, कोट्यवधी रुपयांचे नुकसान दरवर्षी होऊ लागले तरी कारखानदार पूर्ण हतबल, यंत्रसामग्री बदलावी म्हणावे तरी सरकारी परवानगी नाही; परकीय चलन नाही. कामगार कमी करावे तर सरकारचा आणि युनियनचा विरोध. कुलूप लावून कारखाना बंद ठेवावा म्हटले तरी ते शक्य नाही. तोट्यातला कारखानासुद्धा चालू ठेवला पाहिजे असा सरकारी कायदा; पण हा सगळा जुलूम सगळी स्वयंरोजगारातली आणि इतरांना रोजगार देणारी उद्योजक मंडळी सहन करत राहिली. नाही म्हणण्याचा अधिकार फक्त उद्योजकांना नाही.
 उद्योजक आंदोलन करू शकतात हे १० वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी दाखवले. गेल्यावर्षी सेल्स टॅक्ससंबंधी आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न व्यापारी मंडळींनीही केला; पण जमले नाही. ट्रकमालक मात्र झुंजारपणे लढाई देतात. उद्योजकांच्या लढ्याचे नेतृत्व हा लहानसा गट करू शकेल अशी आशा वाटू लागली आहे.
 मार्क्स फसला
 ज्यांच्या हाती काही मालमत्ता असते असे 'आहे रे' लढण्याची हिंमत दाखवून त्यासाठी लागणारी मोर्चेबंदी करू शकत नाहीत अशी मार्क्सवाद्यांची समनातन निष्ठा आहे. म्हणूनच मार्क्सने शेतकरी समाजाला बटाट्याच्या पोत्याची उपमा दिली. उद्योजकांना रस्त्यावर यावे लागेल अशी कल्पना चुकूनही मार्क्सच्या मनाला शिवली नसती. सरकार उद्योजकांचे असते, उद्योजक म्हणजे भांडवलदार, ते फायदे मिळवतच असतात हे समाजवादाचे मूलतत्त्व आहे. त्यामुळे लढाऊ उद्योजक ही कल्पना मौनी वक्ता, ब्रह्मचारी पिता, वंध्या माता याप्रमाणे वदतोव्याघाताची धरली जाई.
 पण काळ केवढा बदलला! सरकारची सूत्रे नोकरमान्यांच्या हाती आली. उत्पादन करणारे उद्योजक दुष्ट ठरले. त्यांनी संशोधन करावे, धोका घ्यावा, धडाडी दाखवावी, व्यवस्थापन करावे; पण ही सगळी यातायात फायद्याची अपेक्षा न ठेवता करावी. फुकट्यांनी मिळवलेला पगार पवित्र आहे. उलट कष्टाने आणि हिमतीने मिळवलेला फायदा म्हणजे पापाचे धन असे तत्त्वज्ञान काँग्रेसगवताबरोबर माजले. 'आहे रे' आणि 'नाही रे' असा वाद उभा झाला. हा वाद घालणाऱ्या मांजरांमध्ये मध्यस्थी करायला आले सरकारी माकड आणि फावले पुढाऱ्यांचे व नोकरदारांचे.
 खोटे रॉबिनहूड
 आपण गरिबांच्या, कमकुवत वर्गाच्या हिताकरिता सधनांकडून साधने गोळा करतो असा 'रॉबिनहुडी' आव आणून सगळ्यांनाच नागवणारे सरकार मजबूत झाले. पाच दहा मोठे उद्योजक हाताशी धरले आणि त्यांना लायसेंस, पटमीटचा मलिदा घातला, जनकल्याणाच्या घोषणा दिल्या, गरीबांचे भले करण्याचा आव आणला म्हणजे सगळे काही ठाकठीक चालते अशी पुढाऱ्यांची समजूत झाली. गरिबांचा कैवार आणि उद्योजकांची लूट अशी कामगिरी पुढाऱ्यांनी हाती घेतली.
 आमचा त्राता कोण?
 उद्योजक करणार काय? त्यांनी दुकान बंद केले तर त्यांना देशघातकी, साठेबाज इत्यादी शिव्या मिळणार; गुन्हेगार म्हणून अटक होणार, जाळपोळ करून ते उद्योजकाला आयुष्यातून उठवणार अशा भीतीने उद्योजक कधी दंड थोपटून उभे राहिले नाहीत. आपले जिणे हे असेच असायचे; सरकारी भ्रष्टाचार आपण निमूटपणे स्वीकारला पाहिजे; इन्स्पेक्टरांना लाच दिली पाहिजे; पुढाऱ्यांना बॅगा पोचवल्या पाहिजेत; हा सगळा आपला भोग आहे कारण आपण स्वतंत्र राहू इच्छितो, कुणाच्या नोकरीचे जू आपल्या खांद्यावर घेणे आपल्या स्वभावाला जमत नाही. स्वातंत्र्याची किंमत म्हणन हे सारे सहन केले पाहिजे अशी उद्योजकांची मानसिकता झाली. शतकानुशतकीचे दलित माणूस बनले, नवे उद्योजक नवे दलित बनले. पूर्वी दलितांना पोलिसांचा आणि कायद्याचा जाच असे. काही निमित्त असो नसो भटक्या टोळ्यांच्या मुक्कामी आणि गुन्हेगार मानलेल्या जमातीच्या तळावर पोलिसांची धाड कधीही पडे. त्याचप्रमाणे आता उद्योजकांच्या तळावर टॅक्सवाले, पुढारी, इन्स्पेक्टर पाहिजे तेव्हा धाड घालतात. हात मारून घेतात. ट्रकवाल्यांना तर कोणीही शिपुरड्याने थांबवावे आणि दक्षिणा गोळा करावी. या नव्या दलितांना कोणी त्राता नाही.
 शेषाचा रोष
 अेन रँड या अमेरिकन लेखिकेने उद्योजकांच्या संपाची कल्पना पहिल्यांदा पुढे मांडली. संशाधक, उद्योजक, उत्पादक हे खरे शेषाप्रमाणे पृथ्वी सांभाळून धरतात. याउलट फुकटे, भुरटे, पुढारी, राजकारणी, 'समाजहिता'च्या, 'गरिबांच्या सेवे'च्या घोषणा देत, पृथ्वीचा भार सहन करणाऱ्या या शेषालाच असह्य पराण्या मारत राहतात. लेखिकेच्या एका कादंबरीत एक उद्योजक उद्योजकांचे एक वेगळे भूमिगत राज्य तयार करतो. अमेरिकेतल्या साऱ्या कल्पक आणि कर्तबगार लोकांना तो हळूहळू आपल्या या राज्यात घेऊन जातो. परिणामतः शेषाने अंग काढून घेतल्यावर पृथ्वी डगमगू लागते. अमेरिकी अर्थव्यवस्था कोसळते. समाजहिताचा बकवास बंद पडतो अशी त्या कादंबरीची कथा आहे.
 भारतातही या शेषाला जाग येते आहे. समाजहित, गरिबांचे दुःखहरण, राष्ट्रभक्ती, स्वदेशी असल्या घोषणांखाली आपला भार वाहणाऱ्यांनाच सतावण्याची पद्धत मोडकळीला आली आहे. हा शेष आता पृथ्वीगोल हलवणार आहे, शेषाच्या या क्रोधाची पहिली जाणीव करून दिली, नेटाने करून दिली याबद्दल ट्रकमालकांचे पुन्हा एकदा अभिनंदन. सरकारने आश्वासन पाळले नाही तर पुन्हा एकदा संपावर जाण्याची तयारी ट्रकमालकांनी ठेवली आहे. हेही लक्षात घेण्याजोगे आहे.

(०६ ऑक्टोबर १९९३)
■ ■