अन्वयार्थ - १/लोकसंख्या वाढविषयक परिषदेत नोकरशाहीचा विजय

विकिस्रोत कडून


लोकसंख्या वाढविषयक परिषदेत नोकरशाहीचा विजय


 'इजिप्तची राजधानी कैरो' जगभर फिरणाऱ्या प्रवाशांच्या तांड्यांचे लोकप्रिय आकर्षण नाईल नदीच्या काठच्या अतिप्राचीन संस्कृतीच्या पिरॅमिड्स आणि स्पिन्वसारख्या आजही विस्मय वाटावा अशा प्रचंड अवशेषांचा प्रदेश. त्याशिवाय कैरोची प्रसिद्धी तेथील गालिच्यांच्या बाजाराबद्दल आहे. आपसासच्या प्रदेशात तयार होणारे नाहीत; पण प्रचंड संख्येने प्रवासी तेथे जमत असल्याने गालिच्यांचा बाजार वर्षभर जोरात चालू असतो; पण कैरो बाजारपेठेची प्रसिद्धी गालिच्यांपेक्षा किमतीवर घातल्या जाणाऱ्या हुज्जतीसंबंधी आहे. दुकानदाराने ग्राहकाला आवडलेल्या गालिच्याची किमत सुरुवातीसच दहा हजार डॉलर सांगितली, की ग्राहक तोच गालिचा पाचशे हजार डॉलरना मागतो. मग दोन्ही बाजू हुज्जत घालत घालत अखेरची किमत ठरवतात. गिऱ्हाईक वस्ताद असेल तर दीड-दोन हजारात चांगला गालिचा पदरात पाडून घेतो. गिऱ्हाईक नवखे, संकोची असेल तर त्याच गालिच्याला आठ-नऊ हजार डॉलर देते, वर दुकानदाराचे "साहेब, आपण तर गालिच्याचे मोठे जाणकार निघाले; माझ्याकडचा सगळ्यांत चांगला गालिचा आपण बरोबर टिपला. किमत इतकी कमी ठरविली, की की तर ठार बुडालो." असली वक्तव्ये ऐकून हलक्या खिशामुळे मनावर आलेला बोझ सावरत जातो. गिऱ्हाईक पक्के असले काय आणि कच्चे असले काय, मिळालेल्या गालिच्याची खरीखुरी किमत कदाचित पाचशे डॉलरही नसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गालिच्याच्या गुणवत्तेचे जाणकार फार थोडे आणि जमणारे प्रवासी पैसेवाले. एकतरी गालिचा कैरो भेटीची निशाणी म्हणून परत घेऊन जाण्याच्या निश्चयाने आलेले असे व्यापारी, असे ग्राहक. त्यामुळे कैरोच्या बाजारातील हुज्जत जगभर विनोदाचा विषय झाली आहे.
 लोकसंख्या परिषद
 अशा याच कैरो नगरीत असाच एक गालिच्यांचा बाजार नुकताच भरला होता. संयुक्त राष्ट्रसंघाच्या झेंड्याखाली 'जागतिक लोकसंख्या आणि विकास परिषद' भरली होती. त्यानिमित्ताने लोकसंख्येची वाढ या विषयावर भिन्नभिन्न, अगदी उलट टोकाची मते असलेले व्यापारी आपापल्या वाणांच्या गालिच्यांचे ढीग घेऊन आले होते. दीडशेवर राष्ट्रे वाण पसंद करण्यासाठी आली होती. मोठा बाजार भरला, खूप गाजला, डोक्याला मुंग्या येईपर्यंत हुज्जत घातली; व्यापारी पांगले; ग्राहके पांगली; खरीदलेल्या गालिच्याचा वाण आणि दिलेली किंमत याबद्दल आज सर्वांना समाधान वाटते आहे. घेतलेले वाण खरोखर काय लायकीचे आहे, गालिचा आहे, की गोधडी हे समजायला कित्येक वर्षे लागतील.
 लोकसंख्या वाढते आहे, प्रचंड वेगाने वाढते आहे, दरवर्षी नऊ कोटींनी वाढते आहे हा सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. लोकसंख्यावाढीची गती कमी केली नाही तर गरीब राष्ट्रे सुधारणार नाहीत. धरणीवरील माणसांची संख्या अशीच वाढत राहिली तर पृथ्वी हा भार पेलू शकणार नाही. थोडक्यात पृथ्वी म्हणजे फळ आहे, असे मानले तर माणूस ही त्याला लागलेली कीड आहे. किड्यांनी आपली प्रजोत्पादनाची गती कमी केली, संख्या मर्यादित ठेवली तर या फळावर त्यांची गुजराण अधिक चांगली होईल आणि अधिक काळ चालेल अशी सर्वसाधारण मान्यता आहे; पण हा प्रश्न हाताळावा कसा यावर एकमत नाही.
 मतामतांचा गलबला
 कैरोला जमलेल्या गालिच्यांच्या व्यापाऱ्यांच्या गलबल्यात अनेक सूर होते. गरीब देशांचे प्रतिनिधी नेहमीप्रमाणे निधीच्या शोधात होते. "लोकसंख्येचा कार्यक्रम विकास कार्यक्रमाचे एक अंग आहे. श्रीमंत देशांनी विकासासाठीही अधिक मदत करावी आणि लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी त्यांनीच मदत करावी." अशी विनवणी करीत राजदूती भिक्षापात्रे घेऊन ते उभे आहेत.
 "लोकसंख्या वाढली तर त्यात वाईट काहीच नाही. प्रत्येक तोंडाबरोबर दोन हात जन्माला येतात. संख्या वाढली, की स्पर्धा वाढते. त्यामुळे माणसांची गुणवत्ता वाढेल. पोषणाचे-प्रगतीचे नवनवे आयाम माणूस शोधून काढेल." असा आग्रह धरणारेही होते.
 "लोकसंख्या, कुटुंबव्यवस्था हे विषय खासगी आहेत. सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये, कोणतेही मत किंवा पद्धती लादण्याचा प्रयत्न करू नये, लोक ते आपोआपच करतील," असे मत मांडणारेही होते.
 बिजिंगची रंगीत तालीम
 स्त्रीस्वातंत्र्यवाद्यांचा तर मोठा जमाव कैरोत जमला होता. पुढच्या वर्षी सप्टेंबर १९९५ मध्ये बिजिंग येथे महिला प्रश्नावर परिषद होणार आहे. कैरो येथे जणू त्याची रंगीत तालीम चालली आहे, अशा तयारीने स्त्रीमुक्तिवादी स्त्रीपुरुष जमले होते. वयात येऊ लागतातच मुला-मुलींना लैंगिक शिक्षण मिळावे, कुटुंब नियोजनाची साधने मुबलक आणि सहजपणे उपलब्ध व्हावीत, गर्भपात 'ब्युटीपार्लर'मध्ये गेल्याप्रकरणासारखा सहज शक्य व्हावा, अशा तोंडवळ्याचा त्यांचा कार्यक्रम.
 त्याच्या विरोधात रोमन कॅथालिक राष्ट्र. लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन मुलांमधील अंतर वाढवणे अशा मार्गांना त्यांचा पाठिंबा आहे; पण गर्भनिरोध, गर्भपात, मुला-मुलींना लैंगिक शिक्षण असल्या कार्यक्रमांना त्यांचा कडवा विरोध. रोमन कॅथालिक गटास अनपेक्षितरीत्या मदत मिळाली ती मुस्लिम कठमुल्ला राष्ट्रांची. इस्लामी समाजातील स्त्रियांचे पारंपरिक स्थान आणि भूमिका बदलू पाहणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमाला त्यांचा विरोध (काही मुस्लिम राष्ट्रांचा विरोध) इतका कडवा, की त्यांनी परिषदेवरच बहिष्कार घातला. बेनजीर भुत्तो यांना परिषदेवर राहणेही दुष्कर झाले होते; पण त्या हजर राहिल्या. 'एक मुलगी, एक पत्नी आणि एक माता' म्हणून आपण बोलत असल्याचे त्यांनी पहिल्या वाक्यात सांगितले; पण नंतरची मांडणी सारी कठमुल्लांची आणि कहर म्हणजे त्यांनी काश्मीर प्रश्नही उठविण्याचा प्रयत्न केला. परिषदेस हजर राहिल्याबद्दल देशात होणारा क्षोभ शमविण्याची त्यांची धडपड घडत होती.
 गर्भपात हा चर्चेचा मोठा विषय झाला. व्हॅटिकन आणि मुस्लिम राष्ट्रे दोघांनीही गर्भपाताला कडवा विरोध केला; पण गेल्या दोन वर्षांत क्लिंटन सरकारचे गर्भपातविषयक धोरण बदलले आहे. गर्भपाताच्या साधनाचा उपयोग क्वचितच व्हावा; पण करण्याची वेळ आली तर तो सुरक्षित आणि कायदेशीर असला पाहिजे अशी क्लिंटन सरकारची भूमिका आहे.
 विकासातून कुटुंबकल्याण?
 साऱ्या जगाचा इतिहास दाखवितो, की गरीब समाजात जन्माचे प्रमाण अधिक असते. संपन्नता आली, चांगले जगण्याची चव कळली, बायका 'चूल आणि मूल' या चक्रातून बाहेर पडू लागल्या, की लोकसंख्या-वाढ मंदावते; पण हा निष्कर्ष सर्वांना मान्य असला तरी कैरोत जमलेल्या कोणालाही परवडण्यासारखा नव्हता. लोकसंख्येचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिक विकास पाहिजे, सरकारी कुटुंब नियोजन कार्यक्रमाने आणि नसबंदीची उद्दिष्टे ठरवून काही हाती येत नाही. हे समजले तरी उमजावे कसे? अधिक विकास कसा साधावा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व संस्थांच्या, सर्व परिषदांत, सर्व धोरणांत आता याबद्दल एकमत तयार होत आहे. सरकारी हस्तक्षेप कमी केला, की आर्थिक विकास सुलभ होतो. तात्पर्य-सरकारशाही थांबविली, की विकास होतो आणि त्याबरोबर लोकसंख्येचा विस्फोटही आटोक्यात येतो. सरकार ही संस्था अर्थकारणाच्या बाहेर राहिली म्हणजे सगळे काही व्यवस्थित होते. हे पटले तरी सरकारी मलिद्यावर पोसल्या जाणाऱ्यांनी ते मानावे कसे?
 नाही! स्त्री-मुक्तीतून?
 शेवटी परिषदेने एक वाण पसंद केले. कुटुंब नियोजनाची साधने, त्यांचा प्रसार, लोकसंख्यावाढ थांबविण्याकरिता नेमकी आकडेबद्ध उद्दिष्टे हा आतापर्यंत चालवलेला मार्ग सोडून द्यायचे ठरले. केवळ विकासाने लोकसंख्यावाढीची समस्या सुटू शकते हीही कल्पना त्याज्य ठरवण्यात आली. कुटुंब-नियोजनासाठी स्त्रियांचे स्थान उंचावले पाहिजे, त्यांना समान दर्जा मिळाला पाहिजे, थोडक्यात स्त्री ही निःसह्यपणे गर्भ स्वीकारणारी पात्र राहिली नाही, की जन्माची संख्या कमी होईल असे एकमत झाले. यात मोठा विजय स्त्रीमुक्तिद्यांचा आहे; पण खरी बाजी मारली ती नोकरशहांनी. लोकसंख्या वाढीच्या क्षेत्रात का होईना सरकारी ढवळाढवळीला एक सुरक्षित स्थान त्यांनी राखून ठेवले.
 विकासाविना स्त्रीमुक्ती कैची?
 कैरो परिषदेतील गालिच्याच्या वाणाची फारशी तपासणी करणे निरर्थक आहे. स्त्रियांना बरोबरीचा दर्जा आणि स्त्रियांचे शिक्षण हे दरिद्री, प्राथमिक समाजात अशक्य आहे. आर्थिक विकासाखेरीज स्त्रियांचा विकास होत नाही. किंबहना, आर्थिक विकास होण्याऐवजी अधिक पीछेहाट होते. विकास झाला म्हणजे स्त्री मुक्त होतेच असे नाही; पण विकासाशिवाय ती मुक्त झाल्याचे एकही उदाहरण नाही. 'विकास हे कुटुंब नियोजनाचे सर्वोत्तम साधन आहे हे सर्वथा खरे नाही. 'संतुलित विकास' अशी त्यात दुरुस्ती हवी; पण कैरो परिषदेने विकास, स्त्रीमुक्ती-कुटुंब कल्याण असे व्यापक सूत्र स्वीकारण्याऐवजी स्त्रीमुक्ती-कुटुंब कल्याण असे अर्धवट सूत्र स्वीकारून नोकरशहांना खुश केले आहे.
 गर्भपाताऐवजी वृद्धपात का नाही?
 साऱ्या कैरो परिषदेत एका प्रश्नाची चर्चा झालीच नाही. जन्माचे प्रमाण हे एकेकाळी लोकसंख्यावाढीचे अधिक महत्त्वाचे कारण बनले आहे. त्यामुळे जनसंख्येचा आकडा वाढतो आहे. एवढेच नव्हेतर समाजाची गुणवत्ता कमी होत आहे. नवीन दमाच्या तरुण रक्ताच्या पिढीचे प्रमाण घटते आहे. पेन्शन खाऊन जगणाऱ्या म्हाताऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. या म्हाताऱ्यांना जगविण्याकरिता अब्जावधी रुपयांचा खर्च वैद्यक क्षेत्रात होत आहे. एका बाजूला जन्माची संख्या घटावी म्हणून खर्च होत आहे, तर दुसऱ्या बाजूला 'अंगम गलितम् पलितम् मुंडम्' झालेल्यांना पराकाष्ठेने जिवंत ठेवण्यासाठी तंत्र आणि साधने यांचा वारेमाप उपयोग होत आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी गर्भाचा प्राण बिनदिक्कत घेण्याचा पुरस्कार हिरीरीने करणारी मंडळी म्हाताऱ्यांची संख्या कमी करण्याचे काही उपाय सुचवत नाहीत. निदान म्हाताऱ्यांना जिवंत ठेवण्यासाठी समाजाने खटाटोपी खर्च करण्याची गरज नाही, इतकेही बोलत नाहीत. 'अर्भकांना मारा, म्हाताऱ्यांना जगवा' अशा स्वरूपाच्या कुटुंबनियोजनाने समाज म्हातारे होत चालले आहेत.
 कैरोत जमलेले नोकरशहा होते. त्यांनी नोकरशाहीचे हित जोपासले. त्यातील बहुतेक पन्नाशीच्या वर असल्याने त्यांनी म्हाताऱ्यांचे हित सांभाळले. कैरो परिषदेच्या गालिचा बाजाराची एकढीच निष्पत्ती आहे.

(७ ऑक्टोबर १९९४)
■ ■