अन्वयार्थ - १/महाराष्ट्रातील शाहीर भाट-विदूषक झाले

विकिस्रोत कडून


महाराष्ट्रातील शाहीर भाट-विदूषक झाले


 महाराष्ट्राच्या साऱ्या इतिहासात तलवारीच्या खणखणाटीबरोबर तुतारीची भेरी आणि शाहिराच्या हाताची डफावरील थाप यांचीही मोठी महत्त्वाची कामगिरी आहे. स्वराज्य संस्थापनेच्या काळात 'शूर मर्दाचा पोवाडा शूर मर्दानी ऐकावा' व छातीचे बंद तटतटा तुटावे, अशा ओजस्वी कवनांचे तुळशीदासाच्या परंपरेतील शाहीर झाले. थोरल्या बाजीरावांच्या अमदानीपासून दर विजयादशमीला उत्तरेकडे कूच करून भीमथडीच्या तट्टांना गंगाथडीचे पाणी पाजून अटकेपार झेंडे नेण्याच्या काळात मऱ्हाटी लष्कराच्या छावणीत आणि पुण्यातील पेठापेठांच्या चौकात शाहिरी पोवाड्यांचे अड्डे जमत.
 ही परंपरा इंग्रजी अमलातही चालू राहिली. ज्योतिबा फुल्यांना छत्रपती शिवाजीवर पोवाडा लिहिण्याची स्फूर्ती झाली आणि इंग्रजांच्या साम्राज्याचा डोलारा कोसळत असताना शिरीषकुमारपासून हेमू कलानीपर्यंत आणि वासुदेव बळवंत फडक्यांपासून भगतसिंगापर्यंत प्रत्येक हुतात्म्याच्या रक्ताच्या थेंबागणिक स्फूर्तिदायी काव्याची कारंजी जनसामान्यांनाही प्रेरणा देत होती.
 शाहिरांचे डफच हत्यारे बनली
 संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा काळ म्हणजे तर मराठी शाहिरांच्या पराक्रमाचा आणि वैभवाचा सुवर्णकाळ. शिपायांनी तलवार गाजवावी आणि शाहिरांनी त्यांचे गुणगान करावे या परंपरेत किंचितसा फरक पडला. लोकतंत्राच्या नव्या जमान्यात शाहिरांचे डफ, एवढेच काय, झिलकऱ्यांचे तुणतुणेसुद्धा हत्यारे बनली. शाहीर हेच योद्धे झाले. असे योद्धे, की ज्यांच्या सामर्थ्यापुढे मुंबईच्या काय, दिल्लीच्याही महासत्तेचे पाय चळाचळा कापावेत आणि घरभेदे सूर्याजी पिसाळ मनातील भेकडपणा शौर्याच्या बातांखाली लपवणाऱ्यांना 'दे माय धरणी ठाय' होऊन जावे.
 शंकरराव देव यांच्याकडे आंदोलनाचे नेतृत्व चालून आले. त्याबरोबरच आपण कोणी दुसरे महात्मा गांधीच बनलो आहोत, असा आव आणून त्यांनी उपोषणबाजी मांडली. लोकांच्या मनात संताप संताप झाला. शाहिरांच्या कवनांनी भोंदूपणाचा पंचा क्षणार्धात फेडून टाकला. काकासाहेब गाडगीळ हा दुसरा नमुना. सत्तेचा मोह तर सुटत नाही आणि महाराष्ट्रात तर शौर्याच्या, मुर्दमकीच्या, त्यागाच्या बाता मारण्याची हौस फिटत नाही. यशवंतराव चव्हाणांपासून मामा देवगिरीकरांपर्यंत यच्चयावत पुढाऱ्यांची एका शाहिरी गोंधळाने भंबेरी उडवून टाकली.
 'संयुक्त महाराष्ट्र सूर्य उगवतोय सरकारा!
 खुशाल कोंबडं झाकून धरा'
 या एका ललकारीने दिल्लीच्या नेहरूंपासून फलटणच्या राजवाड्यात कारस्थाने करणाऱ्या यशवंतराव चव्हाण, मालोजीराव निंबाळकर यांना पळता भुई थोडी करून टाकली. देवीच्या गोंधळाला निमंत्रण घालताना शाहिरांनी नुसते एक एक नाव घ्यावे.
 यश चव्हाणा! गोंधळा ये!!
 काका गाडगीळा! ये गोंधळा ये!!
 एक एक नावाच्या उद्धारानिशी मोठमोठी धेंडे धुळीस मिळावीत आणि लाखालाखांनी फुलून गेलेल्या गावोगावच्या मैदानात विजयाच्या खात्रीची लाट विजेच्या लहरीसारखी सर्वांना भेटून जावी. दिल्लीला महाराष्ट्राचे आंदोलन जाऊन भिडले आणि तेथील राजरस्त्यावर
 'जागा मराठा आम जमाना बदलेगा,
 उठा जो तुठान तो आखिर बंबई लेकर थम लेगा!'
 या अमर शेखांच्या पहाडी ललकारीने साऱ्या दिल्लीकरांची संयुक्त महाराष्ट्राच्या विजयाची खात्री पटवली होती.
 सारे शाहीर गेले कोठे?
 द्वैभाषिकाची घोषणा नेहरूंनी केली आणि मुंबई स्वतंत्र ठेवली. त्यावेळचे संकट काहीच नाही अशा दुर्धर अवस्थेत सारा महाराष्ट्र आज सापडला आहे. महाराष्ट्राच्या नेत्यांचे जाहिरातीच्या दराने वर्तमानपत्रांनी गुणगान होत आहे. "असा नेता झाला नाही. आमच्या नेत्याविरुद्ध कोणी शब्द काढाल तर खबरदार!" अशा डरकाळ्या ऐकू येत आहेत. गुंडांच्या एका सम्राटाने महाराष्ट्राचे नाक मुंबई आपल्या टाचेखाली आणले आणि दिवसाढवळ्या भल्याभल्यांची बंदुकांच्या गोळ्यांनी चाळण होऊ लागली, तरी मारेकऱ्यांच्या शोधाचा पत्ता म्हणून नाही.
 विमानातील हवाई सुंदरीशी चाळे करणारे उपमुख्यमंत्री बनले, गावगन्ना पुढारी सत्ता आणि संपत्ती यांच्या ढिगावर बसले. त्यांची पोरे आणि तरणीबांड नातवंडे बापजाद्यांच्या हरामाच्या कमाईवर शेकड्यांनी आसपासच्या मायबहिणींची अब्रू लुटू लागले. मोगलाईच्या काळापेक्षाही महाराष्ट्राची अवस्था कठीण झाली; पण कोठेही आशेला अंकुर फोडणारी डफावरची थाप ऐकू येत नाही. एक अमर शेख असता, एक अण्णाभाऊ साठे असते तर सत्ताधीशांच्या साऱ्या ढोंगाचा बुरखा त्यांनी टराटरा फाडून टाकला असता. शाहिरांच्या आवाजाची धार अशी, की "तुम्ही म्हणता त्याला पुरावा काय ते सांगा.' अशी कोल्हेकुई करण्याची हिंमत नेत्यांच्या चमच्यांना होऊच शकली नसती. एकएका नेत्यांच्या वाढत्या इस्टेटींचे हिशेब शाहिरांनी मांडले असते. पप्पू आणि ठाकुर यांच्याशी सलगी करून, ती नाकारण्याच्या विश्वामित्री पवित्र्याची त्यांनी हुर्रेवाडी केली असती. मनोमीलन आणि संस्कृतीच्या नावाखाली दिल्ली दरबारात कुर्निसात घालणाऱ्यांची भंबेरी उडवली असती.
 हे 'मऱ्हाटे' शाहीर गेले कुठे? महाराष्ट्रावर संकट आलेले आणि सगळे शाहीर झोपलेले कसे? माय मराठीची कुस इतकी वांझ निघाली, की या पिढीत कोणी काही शाहीर जन्मलाच नाही काय? तसे म्हणावे तर प्रत्येक मराठी सिनेमात दर अर्ध्या तासाने उत्तान लावण्यांच्या चौकटीत आकडेबाज मिशा आणि भरदार छातीचे उंचेपुरे शाहीर उभे ठाकलेले दिसतात. सर्व शाहिरांची मिळून एक मोठी अखिल महाराष्ट्र संस्था आहे असे कधीतरी वर्तमानपत्रात वाचले आणि दूरदर्शनवर पाहिले. रंगांच्या पंचम्या खेळणारे नवे पेशवे त्या संस्थेत जाऊन कोणा शाहिराला 'महाराष्ट्र भूषण', कोणाला शाहीर-शिरोमणी असे शिरपेच चढवताना पाहिले. म्हणजे शाहिरांची जात काही संपली असे नाही, महाराष्ट्रभूमी अजूनही शाहिरांना जन्म देते आहे!
 कवनांचे कारखाने
 पण हे सगळे शाहीर महाराष्ट्राच्या संकटासंबंधी कवने रचण्यास मोकळे नाहीत. सगळे कामात गर्क आहेत. कवनांच्या मागण्यांचेच त्यांच्यापुढे ढीग पडले आहेत. सिनेमासाठी पोवाडे पुरवायचे आहेत, दूरदर्शनसाठी दलितोद्धाराचा अख्खा कार्यक्रम द्यायचा आहे, साक्षरता प्रसाराचे महत्त्व सांगणारी कवने मागणीनुसार पाडण्यात ते गर्क आहेत, कुटुंब नियोजनाच्या कवनात थोडा पांचटपणा दाखवला, की गावोगावचे आंबटशौकी लट्टू होऊन जात आहेत. संकरित वाणांचे बियाणे, सहकाराचे महत्त्व आणि युरिया-फॉस्फेटच्या वापराचे फायदे, सामाजिक वनीकरणाने समाजाचे फायदे, यासंबंधीच्या काव्याची मागणी तर इतकी भरमसाट, की त्याकडे लक्ष द्यायला स्वतः शाहिरांना फुरसतही नाही. ती पाडण्याचे काम असिस्टंट सब ज्युनिअर शाहिरांकडे सोडून द्यावे लागत आहे. पैशाच्या हिशेबात बोलायचे तर महाराष्ट्रात शाहिरांची आज जितकी चंगळ आहे तितकी साऱ्या इतिहासात कधी नव्हती.
 सगळे शाहीर सरकारी तबेल्यात
 एक तरुण शाहीर भेटले, चांगले शास्त्र विषयाचे पदवीधर झालेले. वाचन बऱ्यापैकी असलेले. शब्दांची लय, ताल, ठेका त्यांच्या गद्य बोलण्यातही जाणवावा इतका स्पष्ट. त्यांच्यापुढे आजच्या महाराष्ट्र शाहिरांच्या वांझपणाबद्दलची व्यथा मी मांडली. ते म्हणाले, "शाहिरी संपली आहे असे मानू नका. आमच्या काव्याला अजूनही धार आहे. माझ्या हातातली कामे संपली, की स्वतःच महाराष्ट्रातील भ्रष्टाचार या विषयावर एक पुरा कार्यक्रम बसवणार आहे. अडचण अशी, की आम्ही पहिला डफ वाजवला, थोडे नाव झाले आणि एकदम नेत्यांचेच मोठे पत्र आले. प्रतिभेची, काव्यशक्तीची भरपूर स्तुती, ही शक्ती देशाच्या विकासाच्या कामाला लागो अशी अपेक्षा व्यक्त केलेली. रेडिओ, दूरदर्शन आणि सरकारी माध्यमे यांच्याकडून प्रकाशाच्या झोतात उभे राहण्याची संधी आणि वर संध्याकाळच्या भाकरी-चटणीची भ्रांत असताना मोठ्या नोटांचा करकरीत आवाज. धन्य धन्य वाटले. सार्थक झाले असे वाटले. नेत्यांच्या चालचलणुकीची सारी कीर्ती कानात होती, सगळी प्रतिभा त्यांना उलथवण्याकरिता कामी लावली पाहिजे अशी ऊर्मीही होती; पण आम्ही तुकाराम थोडेच आहोत, की शिवाजी महाराजांनी पाठवलेला नजराणा नाकारून परत पाठवावा! आम्ही तर पातशहांच्या नजराण्यांच्या मोहातून न सुटणारे. मनाशी समजूत घातली... लोक एवढ्या मतांनी यांना निवडून देतात, जयजयकार करतात. देशाचे आशास्थान म्हणतात. मणामणाचे हारतुरे चढवतात. सारे खुळेच काय? मग त्यांची सेवा करायला काय हरकत आहे! अशी टोचणाऱ्या मनाची शांतता सहज करता आली, भाकरीची सोय झाली आणि खोटं कशाला बोलू? कोंबडीची आणि बाटलीचीही सवय पडली. आता नेत्यांविरुद्ध आणि त्यांच्या चेल्यांविरुद्ध हात वळत नाही आणि जीभही उठत नाही बघा! उलट ज्या मिळेल त्या निमित्ताने त्यांची तोंड ठाटेपर्यंत अफाट स्तुती करतो बघा. भाट बनलो हो भाट! भाट तरी बरे! पुरे खुषमस्करे विदूषक बनलो बघा!" शाहीर कळवळून म्हणाले.
 न शापात् न शरात्
 महाराष्ट्रात जो कोणी लेखक म्हणून, कवी म्हणून कलाकार म्हणून, अगदी शास्त्रज्ञ म्हणूनसुद्धा पुढे येईल त्याला सरकारी तबेल्यात आणून बांधण्याची आणि चंदीवर खुश ठेवण्याची मोठी हुशार योजना आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या काळात डफाच्या थापेची धास्ती घेतलेल्या सुलतानांनी साऱ्या शाहिरांना भाट बनवून टाकले. आता भीमथडीची तट्टे नाहीत, मराठी तलवारीचे पाणी नाही आणि नुसत्या ठाणठाण आवाजाने रक्त सळसळणारी डफावरची थापही नाही. सुलतानांना आता कशाची चिंता म्हणून राहिलेली नाही.

(२९ सप्टेंबर १९९४)
■ ■