Jump to content

अन्वयार्थ - १/दैवयत्तं कुले जन्मं

विकिस्रोत कडून


दैवायत्तं कुले जन्मं


 रंगीबेरंगी गिधाडे
 १९८८च्या शेवटास सांगली येथील शेतकऱ्यांच्या एका भव्य शेतकरी मेळाव्यात विश्वनाथ प्रताप सिंगांच्या उपस्थितीत मी धोक्याची सूचना दिली होती. नेहरू अर्थव्यवस्था कोसळते आहे. शेतकऱ्यांचा सूर्योदय होत आहे; पण सावध राहा! जातीयवादी गिधाडे उगवत्या सूर्याचा ग्रास करायला येणार आहेत. भली प्रचंड गिधाडे ! हिरवी, भगवी, पिवळी, निळी, वेगवेगळ्या रंगाची, जातीवादी गिधाडे घिरट्या घालू लागली आहेत.
 काही नाराज, काही खुष
 या माझ्या वाक्याने अनेकांचा संताप संताप झाला. काही दिवसांपूर्वी म्हणजे माझ्या भाषणानंतर जवळजवळ तीन वर्षांनी, सांगलीला बोलताना बाळ ठाकऱ्यांनी, "आम्हाला गिधाडे म्हटले," म्हणून मोठा आरडाओरडा केला.
 याउलट दुसरी काही मंडळी माझ्यावर भलतीच खुष झाली. रिपब्लिकन पक्षाचे एक नेते मला भेटायला लगोलग आंबेठाणला आले आणि मला पाहताच मोठ्या प्रसन्नपणे हसून म्हणाले, "तुमचे अभिनंदन करायला मी मुद्दाम इथपर्यंत आलो. जातीयवाद्यांना तम्ही 'गिधाडे' म्हटलेत अगदी योग्य केले!"
 "अभिनंदनाबद्दल धन्यवाद," मी म्हणालो; "पण माझ्या बोलण्याबद्दल तुम्हाला आनंद व्हायचे काय कारण? जातीयवादी गिधाडांचे वेगवेगळे रंग सांगताना भगवा, हिरवा, पिवळा यांच्याबरोब निळ्या रंगाचाही मी उल्लेख केला आहे हे विसरू नका."
 दलित नेते अगदी गोंधळून गेले. आपल्याला कुणी जातीयवादी म्हणेल ही कल्पनाही कधी त्यांच्या मनाला शिवली नव्हती. 'जातीयवादी' म्हणजे त्यांनी इतरांना द्यायची खास त्यांच्या हक्काची शिवी. तो त्यांच्याकडेच उलटून आल्यावर ते हतबुद्ध झाले, एवढेच नव्हे तर रागावले.
 ब्राह्मणी जातीवाद
 दुसरा एक अशाच प्रकारचा प्रसंग. माझ्या एका सभेच्या जागी काही सुशिक्षित सज्जन मंडळी मला भेटायला आली. त्यांनी माझ्यापुढे काही पत्रके ठेवली आणि हात जोडून विनम्रतेने म्हणाले, "अखिल महाराष्ट्र देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाचे अधिवेशन आहे, आपण अवश्य यावे अशी विनंती आहे. ज्ञातीला आपल्याबद्दल व आपल्या कार्याबद्दल मोठा आदर आणि अभिमान आहे."
 मी उत्तर दिले, "मी स्वत:ला ब्राह्मण मानत नाही आणि कोणत्याही जातीयवादी संस्थांबरोर संपर्क ठेवणेसुद्धा मी टाळतो."
 माझे उत्तर त्यांना अपेक्षित असावे. "ब्राह्मणांना वाईट दिवस आले आहेत. त्यांच्या ज्ञातीच्या कामाला मात्र जातीयवादी म्हटले जाते." अशी तक्रारवजा पुटपुट करून मंडळी निघून गेली.
 पिवळे पुरोहित
 आणखी एक प्रसंग. जालना जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम होता. पुतळा उभारण्याच्या कामात माझ्या सहकाऱ्यांचा पुष्कळ सहभाग असल्यामुळे सर्वांनी मिळून माझ्या हस्ते अनावरण व्हावे, असा आग्रह धरला. 'लक्ष्मीमुक्ती'च्या दोन कार्यक्रमांमध्ये अनावरणाला यायचे मी कबूल केले. कार्यक्रमाच्या जागी मला मोठा विचित्र अनुभव आला. सर्वसाधारणपणे कोणत्याही धार्मिक विधीत मी भाग घेत नाही. नारळ फोडायचे कामसुद्धा युक्तीयुक्तीने शेजारच्या सहकाऱ्याला मान देऊन त्याच्याकडे सोपवतो. इथेतर धार्मिक पूजांची आणि मंत्रघोषांची जय्यत तयारी. फरक एवढाच, की पुरोहित मळक्या धोतरातले नसून चमकदार पिवळ्या वस्त्रात होते. माझ्या भाषणात या सगळ्या प्रकाराबद्दल मी नापसंती व्यक्त केली. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यामागे बाबासाहेबांचा हेतू जातीव्यवस्था तोडण्याचा होता. एका पुरोहित समाजाच्याऐवजी दुसऱ्या पुरोहित समाजाचा बडेजाव वाढवण्याचा नव्हता.
 संध्याकाळी माझ्या भाषणानंतर जपानहून आलेल्या कोणा महान बुद्ध विभूतीचे त्याच जागी प्रवचन होते.
 दुसऱ्या दिवशी मला अहवाल मिळाला, की त्यांनी गावच्या सर्व बुद्ध मंडळींची कडक निर्भर्त्सना केली. "तुम्ही बुद्ध नाही, निर्बुद्ध आहात! कोणी शरद जोशी येतो, तुमच्या धर्मविधींची कुचेष्टा करतो आणि तुम्ही ऐकून घेता. तुम्ही खरेच निर्बुद्ध आहात."
 'माफुआ' जातीवाद
 धुळ्याला कॉम्रेड शरद पाटील नावाचे मार्क्स, फुले, आंबेडकरप्रणीत, सत्यशोधक मार्क्सवादी एक मित्र आहेत. जाती वर्ग स्त्री दास्यांतक, अशा जडजंबाल नावाच्या चळवळीचे ते पुरस्कर्ते आहेत. त्यांचे लिखाण तसेच बाळशास्त्री हरदासानंतर इतके पंडिती लिहिणारा दुसरा कोणी झाला नाही. मराठा तर सोडाच, ब्राह्मणातसुद्धा नाही. शरद पाटलांचे बोलणे सुबोध आहे. लिहिणे त्यांचे त्यांनाच समजते की नाही, याबद्दल माझ्या मनात जबरदस्त शंका आहे. शेतकरी संघटनेचे, शेतकरी आंदोलनाचे, संघटनेच्या सामाजिक भूमिकेचे, महिला आघाडीचे कॉम्रेड शरद पाटील यांनी पुष्कळ कौतुक केले आहे; पण मी राखून राखून बोलतो, खुलेआम जाती वर्ग स्त्री दास्यांतक 'माफुआ' विश्लेषण पद्धतीच्या आधारे मार्गक्रमण करणाऱ्या जनआंदोलनांपासून अंतर राखून राहतो, अशी त्यांची तक्रार आहे आणि माझ्या या भूमिकेचे 'माफुआ' विश्लेषण ते वारंवार स्पष्ट करतात. ब्राह्मण कुळात मी जन्मल्यामुळे माझ्या विचारातला हा दोष अपरिहार्य आहे, असे त्यांचे स्पष्ट निदान आहे.
 स्वजाती विरोधक आणि समर्थक
 मी शहरी सुशिक्षितांत जन्मलो; पण त्यांना न आवडणारे शेतकरी आंदोलन उभे केले. हिंदू ब्राह्मण कुटुंबात जन्मलो आणि हिंदुत्वाचा गर्व बाळगणारे माझ्यावर दात ओठ खातात. मी पुरुष जन्मलो; पण जगातील सर्वांत मोठ्या महिला संघटनेचा मी कार्यकर्ता आहे. जन्माच्या अपघाताने मला जे जे काही लाभले त्यापासून मी जाणीवपूर्वक अंतर ठेवलेले आहे आणि स्वजातीच्या जुनाट अभिमानाला मार्क्सवादाची बेगड आणि संस्कृत प्रचूर पांडित्याची झूल घालणारे कॉम्रेड शरद पाटील ब्राह्मण घरात जन्मले असते, तर पेशवाईतल्या ब्राह्मणाचा नवा अवतार वर्तमानकाळात पाहायला मिळाला असता. माणसाच्या जन्माने त्याची सगळी मते वगैरे ठरतात, असे गंभीरपणे मानणाऱ्यांत कॉम्रेडसाहेब आघाडीवर आहेत.
 प्रश्नावली
 जातीयवादी म्हणजे कोण? शालान्त परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात तसा प्रश्न विचारला. हो किंवा नाही म्हणा. खालील संस्था, पक्ष यांपैकी जातीयवादी कोण?

१) देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ हो  नाही
२) बौद्ध भिक्षु महासंघ हो  नाही
३) जमाते इस्लाम  हो  नाही
४) शिवसेना  हो  नाही
५) दलित पँथर  हो  नाही
६) भा. रि. प.  हो  नाही
७) भा. ज. प.  हो  नाही
८) मा. क. प.  हो  नाही

 जातीयवादी कोण हे ठरवायचे कसे? जातीयवाद ओळखावा कसा? काही फूटपट्या स्पष्ट असल्या पाहिजेत.
 मदायत्तम हि पौरुषम्
 मनुष्याची पात्रता, श्रेष्ठत्व हे त्याच्या जन्माने ठरते, असे वर्षानुवर्षे वर्णाश्रमधर्म मांडीत आला आहे. जीवशास्त्रात याला फार थोडा आधार आहे. जन्मतः माणसामाणसांत फरक असतोच. दोन जुळे भाऊसुद्धा संपूर्ण सारखे नसतात; पण मनुष्य ही उत्क्रांतीतील सर्वोच्च अवस्था आहे. जन्मजात गुणांपेक्षा अभ्यासाने, प्रयासाने आणि तपस्येने मिळवलेल्या गोष्टीच महत्त्वाच्या असतात. हे जो मानत नाही तो जातीयवादी. थोडक्यात, जन्मजाताच्या अपघाताने माणसांना मोजू पाहतो, म्हणून तो जातीयवादी.
 रोगाचे निदान वेगळे, औषध वेगळे
 आपल्या देशातील आजपर्यंतचा बहुतेक इतिहास हा जातीजातीतील संघर्षाचा आणि शोषणाचा आहे, असे मी मानतो. यात वाद असण्याचे कारण नाही; पण कदाचित वेगळे मत असू शकेल. जातीव्यवस्थेचे कालमान परिस्थितीप्रमाणे ऐतिहासिक समर्थन काही विद्वान करतात. परवा परवापर्यंत सगळे मार्क्सवादी जाती विश्लेषण मान्य करीतच नव्हते. सगळा इतिहास वर्गसंघर्षाचाच आहे म्हणत होते. इतिहासाचे 'पोस्टमॉर्टेम' काहीही दाखवो, जुन्या रोगांचे निदान काहीही असो, औषध जुनेच असले पाहिजे असे नाही. जातीव्यवस्थेचे दोष दूर करण्याकरिता जातीधर्मानुसार जनांची निष्ठा ठरवणे आणि त्यानुसार मोर्चेबांधणी करणे हा जातीयवादाच. जात्यंताच्या घोषणा देणारा जातीयवाद एवढेच!
 "श्रीनगरला पाकिस्तानचा झेंडा फडकला, यच्चयावत मुसलमान जन्माला आलेल्यांची कत्तल करा म्हणणारे ते जातीयवादी." "एका शिखाने इंदिराबाईंची हत्या केली मग सगळ्याच शिखांना शिक्षा झाली पाहिजे," असे म्हणतात ते जातीयवादी. आमच्या धर्माचा बोलबाला झाला पाहिजे, आमच्या धर्माचा आम्हाला गर्व आहे, असे म्हणतात ते जातीयवादी. कारण यातील सगळ्यांचा धर्म यांना जन्माच्या अपघातामुळे मिळाला आहे.
 उलटी विषमता, नवा जातीवाद
 हजारो वर्षांच्या विषम व्यवस्थेनंतर अनेक समाजांची अवस्था मोठी भयानक झाली आहे. त्यांच्याकरिता काहीतरी विशेष तातडीने करणे आवश्यक आहे हे सर्वमान्य आहे. काही प्रमाणात उलट्या दिशेची विषमता समर्थनीय आहे. अशा तऱ्हेच्या योजनांना जे विरोध करतात ते जातीयवादी हे खरे; पण त्याबरोबरच अत्यंत संपन्न अवस्था असताही केवळ मागास समाजात जन्माला आलो या आधाराने विशेष हक्क बळकावू पाहतात तेही जातीयवादीच.
 सगळेच जातीवादी
 वर दिलेल्या वस्तूनिष्ठ प्रश्नांची उत्तरे तुम्ही काय दिली असतील कुणास ठाऊक? बरोबर उत्तर हे, की यादीत दिलेले सर्वच्या सर्व पक्ष आणि संस्था जातीयवादी आहेत. फक्त ही यादी अपुरी आहे.
 दैवदुर्विलास असा, की सांगलीच्या शेतकरी मेळाव्याच्या मंचावर एक व्यक्ती हजर होती, अयोध्याछाप जातीयवादाला रोखण्यासाठी ती पंतप्रधानपद सोडून देणार होती आणि मंडलछाप जातीयवादाच्या जन्माच्या वेळी सुईण होणार होती.

(११ नोव्हेंबर १९९२)
■ ■