अन्वयार्थ - १/डंकेल आणि लेखी शब्दाचा मृत्युलेख

विकिस्रोत कडून


डंकेल आणि लेखी शब्दाचा मृत्यूलेख


 लेखी शब्द मेला आहे; संयुक्त राष्ट्रसंघाचे एके काळचे अवर महासचिव फिलिप द सेन यांचे हे प्रसिद्ध वाक्य आहे. "परमेश्वर कधीकाळी असेल; पण आता तो जिवंत नाही." या उक्तीइतकेच सेन साहेबांचे हे निदान तीन दशकांपूर्वी गाजले.
 चोपडी उदंड जाहली
 लेखी शब्द मरण पावला, म्हणजे काही लिखाण थांबले आहे असे नाही. उलट लेखी आणि छापील शब्दांचा महापूर जगभर थैमान घालतो आहे. छपाईचा जुना काळ संपला. जुळाऱ्याने एक एक खिळा करत मजकूर बांधत मग सगळी चौकट छपाईयंत्रावर चढवावी आणि सगळे काही सुरळीत पार पडले तर, एक एक प्रत हळूहळू छापून निघावी, अशा छपाईचे दिवस संपले. छपाईची अत्याधुनिक साधने लेखकाच्या मनांतील मजकुराच्या लक्षावधी प्रती अगदी क्षणार्धात नाही; पण तास-दोन तासात अगदी सुबक पद्धतीने तयार करू शकतात. दररोज कितीतरी पुस्तके छापून बाहेर पडतात. काही मोजकी थोडाफार काळ गाजतात आणि यथवकाश विस्मृतीच्या उदरात गडप होतात. साहित्य, शास्त्र, कला, एक ना अनेक, हजारो विषयांवरच्या लक्षावधी पुस्तकांचा महाओघ दररोज बाजारात येऊन पडतो आणि तरीही लेखी शब्द मेला हे काही खोटे नाही.
 लोकमान्यांचा प्रभाव
 कदाचित लेखी शब्द मेला तो छपाईच्या सुलभतेने आणि मुबलकतेनेच. लोकमान्य टिळकांच्या 'केसरी'च्या काळात वर्तमानपत्रे फारशी नव्हतीच. लोकमान्य स्वतःच अनेकदा जुळाऱ्यापासून टपाल्यापर्यंत सगळी कामे करीत. छापील शब्द मोठा दुर्मीळ आणि म्हणूनच कौतुकाचा विषय होता. लोकमान्यांनी अग्रलेखात वापरलेल्या प्रत्येक वाक्याला नाही शब्दालादेखील मोल होते. प्रत्येक शब्दाची उलटसुलट चर्चा कोकणातल्या अगदी बारक्याशा खेड्यातसुद्धा होत असे. याउलट आता जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यातालुक्या नव्हे, अगदी गावगल्लीतसुद्धा लेखणीचे हत्यार परजणारे शूरवीर उदंड झाले. पुरवठा इतका अफाट वाढला, की किमत घसरणारच. वर्तमानपत्रातील कोणा अग्रलेखाने किंवा एखाद्या पुस्तकाने समाज वरपासून खालपर्यंत घुसळून टाकला आहे असे आता होत नाही. अगदी शेवटी म्हणजे आचार्य अत्र्यांना ते थोडेफार जमले; त्यानंतर कोणालाच नाही.
 पण लक्षात कोण घेतो?
 वृतपत्रातील लिखाण काही असले तरी ताजे असते, पुस्तकाचा विषय ते छापून होईपर्यंत शिळा होतोच. त्यामुळे एखाद्या पुस्तकाच्या प्रकाशनाने समाजाला उभे हलवले आणि बदलले असे फारसे होत नाही. बुके उदंड जाहली; पण 'लक्षात कोण घेतो' आता होत नाही. इंग्रजी कादंबरीकार चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्या क्रमशः प्रसिद्ध होत असताना, नवीन अंक घेऊन येणारे जहाज अमेरिकेत पोचण्याच्या वेळी बंदरावर हजारो उत्सुक वाचकांचा जमाव एकत्र येई आणि बोट लागता लागताच डेकवरील प्रवाशांना कादंबरीच्या नायकनायकांची ताजी खबर विचारीत. असे आता कुठे झाल्याचे ऐकिवात नाही. विक्रम सेठ यांची नवी कादंबरी सध्या खूप गाजत आहे. लेखकाची टॉलस्टायशी तुलना होत आहे; पण त्या पुस्तकाचे कौतुक मूठभरांना. सर्वसाधारण समाज त्याबद्दल उदासीन आहे.
  'सर्वदूर सिद्धांत' संपले
 अर्थशास्त्राच्या जगात समाजव्यवस्थाच नव्हे अगदी राज्यव्यवस्थासुद्धा उलथवून टाकणारे ग्रंथ एकेकाळी झाले. सगळ्या आर्थिक चलनवलनाचा संदर्भच बदलून टाकणारे ग्रंथराज १९३० सालापर्यंत प्रकाशित होत. ॲडम स्मिथचा ग्रंथ या नमुन्याचा पहिला आणि लॉर्ड केन्सचा 'सर्वदूर सिद्धांत' हे बहुधा शेवटचे उदाहरण. त्यानंतर कितीएक महान अर्थशास्त्री झाले; महाकष्टाने जमा केलेली प्रचंड आकडेवारी आणि माहिती गणकयंत्राच्या साहाय्याने विश्लेषण करून पुढे मांडणारी कित्येक पुस्तके झाली; अर्थशास्त्रज्ञांना दरवर्षी 'नोबेल प्राईस'चा रतीब चालू झाला; पण लोकांची डोकी साफ धुऊन काढून त्यांना एक नवी स्वच्छ समज देणारा 'सर्वदूर सिद्धांत' पुन्हा झाला नाही.
 आता न्यूटन होत नाहीत. डार्विन होत नाहीत, लुई पाश्चर होत नाहीत. मादाम क्यूरी होत नाहीत. याचा अर्थ संशोधन होत नाही असा नाही; त्यापेक्षा प्रचंड संशाधन होत आहेत; पण 'क्वांटम थिअरी'चा जनक कोण? आणि गुणसूत्राच्या क्षेत्रातील कोलंबस कोण? याचे उत्तर फार थोड्यांना माहीत असेल.
 खळबळ माजवणारे एक पुस्तक
 त्यामुळे फार दिवसांनी डंकेल साहेबांच्या अहवालावर एवढी खळबळ माजली: लोक त्याविषयी बोलू लागले; भांडूतंटू लागले. हे मोठे अजब कौतुकच म्हटले पाहिजे. डंकेल साहेबांचे प्रस्ताव म्हणजे काही कादंबरी नाही. लघुकथांचा संग्रह नाही. कोणा एक शास्त्रज्ञाला पडलेल्या दीर्घकालीन गूढ प्रमेयांचे हळुवार हाताने अलगद आणि सुरेख समाधान करणारा असा हा ग्रंथ नाही. सात वर्षे १०८ देशांचे प्रतिनिधी एकमेकांशी भांडले तंडले; भांडणाचा विषय काय तर आंतरराष्ट्रीय व्यापार. कोण्या देशाने जकातकर किंवा सबसिडी किती कमी करायची, व्यापारी देवघेवीच्या अटी काय? हा असला नीरस आणि रूक्ष विषय. त्यावर सगळे देश झुंजले. त्यांच्या म्हणण्याचा महत्तम साधारण विभाजक काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका कचेरीने एक दुर्बोध मसुदा तयार केला. त्या कचेरीतला डंकेल हा मोठा साहेब! म्हणून त्याचे नाव जोडले गेले. त्याच्या या असल्या पुस्तकाने सगळ्या जगभर मोठा धुमाकूळ माजला. कोणा ग्रंथकारास मिळाली नाही इतकी प्रसिद्धि अहवालाच्या 'नाममात्र' जनकास मिळाली. डंकेल विरोधी आणि डंकेल समर्थक यांच्यात कचाकच लढाया झाल्या. लिखित शब्द मेल्यानंतरही एवढी खळबळ एका पुस्तकाने उडवावी हे मोठे अद्भुत!
 सारी खळबळ न वाचताच
 त्याहून अद्भुत गोष्ट ही, की डंकेलवरील खळबळ डंकेलच्या वाचनाने झाली नाही; त्याचा अहवाल न वाचताच झाली! दोन वर्षांपूर्वी हा अहवाल दिल्ली दरबारात रुजू झाला. त्यातील काही प्रस्ताव अत्यंत त्रोटक रूपाने कोणा सत्तावीस तज्ज्ञांकडे पाठवण्यात आले. हे सगळे प्रस्ताव अत्यंत गुपित असल्याचा निर्वाणीचा इशारा सगळ्यांना देण्यात आला होता. त्यानंतर काही नशीबवान सोडल्यास हा अहवाल वाचायला मिळालेले तर सोडाच, हातात धरायला किंवा डोळ्यांनी पाहायला मिळालेलेसुद्धा मोठे दुर्मीळ. जवळजवळ ५०० पानांच्या टंकलिखित अहवालाच्या फोटोकॉपी निघून निघून निघणार किती? आता एका चतुर प्रकाशकाने तो पुस्तकरूपाने प्रकाशितसुद्धा केला. माझ्या औरंगाबादच्या एक मित्राने हौस म्हणून एक फोटोकॉपी घरी ठेवली, या गोष्टीची वार्ता हां हां म्हणता औरंगाबादेत पसरली आणि ग्रंथराजाच्या दर्शनाकरिता लोक झुंडीने जाऊ लागले.
 अगा, जे मुळीच नाही
 गावोगाव डंकेलविरोधी प्रचारक शेतकऱ्यांना काय वाटेल ते सांगत फिरत होते. डंकेल हा एक अमेरिकन व्यापारी आहे, त्याने हिंदुस्थानवर कब्जा बसवायचे ठरवले आहे; डंकेल हा स्वीस सावकार आहे, तो हिंदुस्थान विकत घेऊ इच्छितो; डंकेलचे म्हणणे मानले गेले तर शेतकऱ्यांना शेतीच करता येणार नाही. त्यांची पिके, जनावरे बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हस्तक घेऊन जातील... एक ना अनेक, काय वाटेल त्या अफवा गावात पसरत होत्या. साहजिकच 'ये डंकेल बला क्या है?' असे पंजाबच्या अगदी कोपऱ्यातील शेतकरीसुद्धा विचारू लागला. शासन दुप्पट भावाने गव्हाची आयात करून पंजाबी शेतकऱ्याला बुडवीत होते; पण शेतकऱ्यांना खरी दहशत वाटत होती ती डंकेल साहेबांची.
 वाचणे आमचा धर्म नोहे
 शहरात डंकेलविषयी आपल्याला माहिती नाही असे दाखवणे बुद्धिवादी विशेषतः प्राध्यापक मंडळी अप्रतिष्ठेचे समजू लागली. परवा परळी वैजनाथ येथे एक कार्यक्रम संपल्यानंतर बाजूला हिरवळीत मी कार्यकर्त्यांशी गप्पागोष्टी करत बसलो होतो. एक सज्जन तिथे येऊन बसले, चेहऱ्यावरून वकील असावेत. आपला परिचय देण्याची बात नाही. मध्ये घुसल्याबद्दल दिलगिरी नाही! 'हे डंकेल काय आहे ते मला सांगा,' एवढीच त्यांची फर्माईश. मागणीपेक्षा मागणीच्या पद्धतीने मला मोठे विचित्र वाटले.
 मी म्हटले, "आपण डंकेलचा अहवाल वाचून या; मगच त्याविषयी आपण चर्चा करू."
 "मी डंकेल अहवाल वाचला आहे," सद्गृहस्थ दाटून म्हणाले.
 "पण अशा बतावणीने बनण्याइतके दूधखुळे कोणीच राहीले नाही. तुम्ही डंकेल अहवाल वाचलेला नाही." मी निक्षून म्हटले.
 "मी वाचला आहे." त्यांची ग्वाही.
 मी तितक्याच जबरीने, "तुम्ही डंकेल वाचलेला नाही," असे म्हटल्यावर मग त्याने कबूल केले, की त्याने कोण्या वर्तमानपत्रात डंकेलविषयी वाचले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याची नाही, आंतरराष्ट्रीय व्यापाराची नाही, शेतीची नाही, कोणत्याच संबंधित क्षेत्रातील काडीमात्र जाणकारी नसतानासुद्धा काही सुटत नाही.
 निरक्षर प्रध्यापक आणि मंत्रीही
 तसे यात नवीन काही नाही. भारतीय बुद्धिवंतांची ही परंपरा आहे. मार्क्सचे एखादे पुस्तक मुळात वाचलेला मार्क्सवादी ही हिंदुस्थानात, डाव्यांच्या सुवर्णकाळातही उंबराच्या फुलाइतकीच दुर्मीळ गोष्ट होती. हिंदुधर्माचा व्यापक गोषवारा देणारे एखादे पुस्तक तरी वाचलेला संघाचा स्वयंसेवक तितकाच दुर्मीळ नवजीवन साहित्याची पुस्तके गांधीवादी बाळगतात पुष्कळ, वाचतात फार कमी. आमच्या या परंपरेस धरून डंकेल विषयाचे वादंग उफाळले.
 प्रा. मधु दंडवते म्हणाले, "३० लाख टन गव्हाची आयात डंकेलमुळेच करावी लागली."
 "शेतकऱ्यांना आपली पिके राखता येणार नाहीत." दुसरे शहाणे म्हणाले. असल्या भाकडकंथावर रणधुमाळी माजली. खरे काहीच नाही; पण तपासून पाहणार कोण?
 प्राध्यापकांची ही स्थिती! मग बलराम जाखडांसारख्यांचे काय विचारावे? "शासन शेतकऱ्यांचे नुकसान कदापि होऊ देणार नाही," अशी गर्जना करून ते मोकळे झाले. अहवालातील कोणत्या वाक्याने संकट येणार आहे ते सांगण्याची जबाबदारी कोणाचीच नाही.
 डंकेल प्रस्तावाने उठलेल्या खळबळीचे खरे कारण काहीही असो, त्याचा डंकेलच्या वाचनाशी काही संबंध नाही. म्हणजे या वादंगामुळे लेखी शब्दाचा अजून काही प्रभाव असू शकतो, त्यांच्या जीवात अजून धुगधुगी आहे असा अर्थ निघत नाही. उलट लेखी शब्द साफ मेला आहे असे दाखवतो.
  'हेचि फल काय..?'
 माझ्या नात्यागोत्यातील कुटुबांत माझ्या कामासंबंधी कौतुक तर सोडाच, पण जिज्ञासाही नाही. माझ्या उपसिथतीत शेती शेतकरी आणि तत्ससंबंधी विषय कटाक्षाने टाळण्याचा शिष्टाचार सगळेजण पाळतात. कुटुंबातील एक दुःखद घटना म्हणून माझ्याकडे सगळे पाहतात; पण परवा एकदम बदल झाला, महाविद्यालयात जाणारी माझी एक भाची थोडे दिवसांपूर्वी मला पाहिल्याबरोबर तिच्या शाळेत जाणाऱ्या भावाला म्हणाली, "परवा परखमध्ये पाहिले ना ते हे अंकल, त्यांचा ऑटोग्राफ घे!" लिखित शब्दाचा यापेक्षा अधिक निश्चयात्मक मृत्युलेख काय असू शकेल?

(१७ जून १९९३)
■ ■