Jump to content

अन्वयार्थ - १/इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारितेमुळे मोकळे जाहले श्वास

विकिस्रोत कडून


इलेक्ट्रॉनिक्स पत्रकारितेमुळे मोकळे जाहले श्वास


 दूरदर्शन, स्टार टीव्ही, सी.एन.एन., जैन आणि डझनभर इतर शहरवासीयांच्या दिवाणखान्यात आधुनिक तंत्रज्ञानाने दोन डझनावर चॅनेल आणून सोडले आहेत. हातातील दूरनियंत्रकाच्या एका खटक्याने क्षणार्धात जगाच्या पाठीवर कोठेही चाललेले खेळ, संगीत, बातम्या यांचे कार्यक्रम नजरेसमोर आणता येतात. प्रसारसाधनांवरील सरकारी नियंत्रणे आधुनिक तंत्रज्ञानाने उधळून लावली आहेत. कोणी हुकूमशहा हृवचारांच्या देवाणघेवाणीत आता अडथळे आणू शकणार नाही. माहितीवरची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.
 आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रचंड झेपेने आता बातम्या लपवता येणार नाही, खोटा प्रचार करणे कठीण होईल. वाचा खोटे बोलेल, लेखणी खोटे लिहील; पण कॅमेरा खोटे बोलू शकत नाही आणि यापुढे प्रसार डोळ्यांच्या दृष्टीने आणि कानाच्या श्रवणाने होणार आहे. लेखी शब्दाने नाही. माणसा माणसातील विचारांच्या आणि अनुभूतीच्या देवाणघेवाणीकरिता शब्दांची सद्दी संपली. दृक्श्राव्य माध्यमांचे राज्य आले. कॅमेरा टिपेल आणि सांगेल; कोणी खोटेपणा करू धजला तर स्पर्धेच्या आणि चढाओढीच्या या जगात त्याचे खोटे उघडे पडल्याखेरीज राहणार नाही. रवीन्द्रनाथ टागोरांच्या स्वप्नातील भिंतीविरहितचे जग तयार होईल अशी आशा वाटत होती.
 प्रत्यक्षात काही वेगळेच घडते आहे. आगीने म्हटले तर स्वयंपाक करता येतो, म्हटले तर आग लावता येते. बंदूक माणसे मारत नाही, माणसे माणसांना मारतात. बंदूक हे फक्त साधन असते. आधुनिक तंत्रज्ञानाने विचार, माहिती यांच्या अनिर्बंध प्रसाराची साधने उपलब्ध करून दिली; पण म्हणजे प्रसारमाध्यमे स्वच्छ झाली, खोटेपणा संपला असे नाही.
 लोकमान्य केसरी ते...
 प्रत्येक तंत्रज्ञानाच्या युगात एका वेगळ्या पत्रकारितेचा जन्म होतो. हातछपाई यंत्राने टिळकांच्या पत्रकारितेला जन्म दिला. मुद्रण सुलभ झाले. दैनिके, नियतकालिके हजारोंनी निघू लागली. वर्तमानाचे वास्तव दाखवण्याऐवजी आपापल्या पक्षाच्या किंवा मालकाच्या हितसंबंधांच्या चष्म्यातून समाचार, संपादणे ही पत्रकारांची सर्वसाधारण भूमिका झाली. छापलेले ते ते खरे नसते हे उमजायला लोकांना थोडासा वेळ लागला; पण हा नवा खेळही त्यांनी आत्मसात केला आणि अनुभवाने नवे आडाखे बांधले. गोविंद तळवळकर अग्रलेखात असे लिहितात; मग सत्यस्थिती अशी असली पाहिजे, माधव गडकरींच्या लिखाणात हे एक झुकते माप असायचेच ते सुधरून घेतले पाहिजे, मधुकर भावे असे म्हणतात काय? तोंडात थोडी मिठाची गुळणी धरूनच त्यातले तथ्य तेवढे घेतले पाहिजे. इ. इ.
 नवी पत्रकारिता
 इलेक्ट्रानिक प्रसारमाध्यमांच्या युगात एका नव्या पत्रकाराचा जन्म होतो आहे. 'चक्षुर्वौ सत्यम्' सांगणारा कॅमेरा खोटे बोलत नाही; पण कॅमेऱ्याने टिपलेल्या गोष्टींचे संपादन करून मांडणी करणारा आजही खोटी बतावणी करू शकतो. प्रसार माध्यमांच्या नव्या युगात हे कसब दाखवणाऱ्या नव्या पत्रकाराचा आणि पत्रकारितेचा उदय झाला आहे.
 जुन्या काळातील काही पत्रकार आपल्या पत्रकारितेला भलेभले घाबरतात या गुर्मीत चालत. पुरातनकाळातील राजदरबारातील एका कवीने राजाला बजावले, "राजा कवींना नाखुष करू नकोस, लंकाधीश बदनाम झाला आणि दशरथाचा पोर दिगंत कीर्ती पावला, हा सारा आदिकवीचा प्रभाव हे विसरू नकोस." आपण कोणाही नेत्यास मोठे करू शकतो किंवा संपवू शकतो असे मानणाऱ्या पूर्वाश्रमीच्या पत्रकाराचा नवा इलेक्ट्रॉनिक अवतार पुढे येत आहे. कॅमेऱ्याची मग्रुरी लेखणीच्या शतपट मोठी आहे.
 एक उदाहरण पाहा. गेल्या वर्षी सहा महिन्यांत डंकेल विषय सगळीकडे गाजतो आहे. वर्तमानपत्रांत तसाच टेलिव्हिजनवरही. या विषयावरील अनेक कार्यक्रम जवळजवळ दररोज कोणत्या ना कोणत्या टीव्हीच्या केंद्रावर दाखवले जातात.
 संपादणी आणि बतावणी
 कार्यक्रमाच्या सुरुवातीला कोणी एक वार्ताहर सादरकर्ता म्हणून प्रास्ताविकादाखल काही बोलतो, या सूत्रधाराचे भाषण देवतांच्या नाटकातल्याप्रमाणेच असते. मुलाखती घेणाऱ्या पत्रकारांपैकी एकानेही डंकेल प्रस्ताव मुळात डोळ्याने पाहिलेलाही असल्याचे लक्षण दिसत नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आजच्या समस्या काय? त्यात आजच्या शेतीमालाच्या व्यापाराची परिस्थिती काय? कोणत्या देशात शेतकऱ्यांना किती सबसिडी दिली जाते? इत्यादी प्रश्नांचा एकालाही गंधमात्र बोध नाही.
 कॅमेऱ्याचा दबदबा
 थातुर मातुर वर्तमानपत्रातील बातम्या फक्त वाचून हे 'पत्रपंडित' टेलिव्हिजन कॅमेऱ्याचा संच घेऊन 'कोपनीयः कवयः क्षीतिद्रै:' अशा गुर्मीत फिरताना त्यांचा थाट काय वर्णावा? एवढ्या कॅमेऱ्याच्या आधाराने कोणीही नेता, विचारवंत, कार्यकर्ता कलाकारला यांच्यासमोर ठाकावे, वही-पेन्सिल घेऊन बसलेल्या कसेबसे बसतात. जमेल ती उत्तरे देतात. प्रत्येकाचा निदान अर्ध्या तासाचा मुलाखतीचा कार्यक्रम नोंदला जातो. चहापाणी, फराळ होतो. कॅमेऱ्याचा सगळा पसारा गुंडाळून पत्रकार दुसऱ्या शिकारीकडे निघतात.
 सत्य; पण पुरे नाही, सगळे नाही
 दोनचार दिवसांत कार्यक्रम टीव्ही संचावर दिसतो, प्रास्ताविक झडते. डंकेलमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला धक्का बसेल काय? असा एक प्रश्न सूत्रधार पुढे टाकतो आणि मग लागोपाठ पाचदहा माणसांची उत्तरे दृश्यांबरोबरच दाखवली जातात. तास दीडतासाच्या एकूण मुलाखतीपैकी मिनिट दीडमिनिटाचे तुकडे दाखवले म्हणजे कळस झाला. दाखविलेले तुकडे संदर्भापासून ओरबाडून काढलेले, निरर्थक. हिंदुस्थानातील पत्रकार बहुतेक स्वत:ला डावे मानणारे आहेत. त्यामुळे डंकेलचे एक अक्षरही न वाचता त्याविषयी त्यांच्या मनात अढी आहे. डंकेलविरोधी मते तपशीलवार दाखवली, ऐकवली जातात. विरोधी मतांच्या पुरस्कर्त्यांनी नाही म्हणून हलवलेली मान पुरी दाखवली तरी नशीब! समर्थकांचा मुखडा सुबक दिसेल असे चित्रण वापरायचे. विरोधकांनी तोंड उघडले तर त्यांचे वेडेवाकडे दात लोकांच्या नजरेत विशेष भरावे इतकी चलाखी या कार्यक्रमात सरसहा केली जाते. राजीव गांधी दाखवायचे तर एखाद्या सिनेमा नटाप्रमाणे व्यवस्थित मेकअप केलेले पी. व्ही., सिंगांचे चित्रण करायचे तर जांभई देताना, तोंड वेडेवाकडे उघडले गेले असताना, अशी ही इलेक्ट्रॉनिक युगातील युक्ती आहे. दाखवलेले असत्य आहे असेही नाही. सत्य आहे; पण संपूर्ण सत्य नाही. सत्याशिवाय खूपच काही आहे.
 अनभ्यस्त, अप्रस्तुत, संदर्भरहित
 शेतकऱ्यांना बी महाग मिळेल काय? औषधे महाग होतील काय? असले अप्रस्तुत प्रश्न एकामागोमाग एक घेतले जातात आणि प्रत्येक प्रश्नावरील चर्चेच्या वेळी मुलाखती घेतलेल्या सर्वांची धावती परेड दाखवली जाते. कोणालाही पुरे बोलू दिले जात नाही. तास दीड तास मुलाखत दिलेल्यांच्या लक्षात येते, की मुलाखतीतील फार तर १५-२० सेकंदांचाच तुकडा वापरला गेलेला आहे आणि तुकडाही असा, की ज्याचा मुलाखतीच्या आत्म्याशी दुरान्वयेही संबंध नाही.
 'इंडिया टुडे' या पाक्षिकाचे एक टीव्ही मासिक 'न्यूज ट्रॅक' म्हणून निघत असे. हिंदुस्थानात इतर कोणत्याही टीव्ही मासिकापेक्षा त्याचा खप जास्त होता. एकूण चार वेळा माझ्या पूर्ण मुलाखती न्यूज ट्रॅकच्या पत्रकारांनी घेतल्या आणि काही ना काही कारणांनी त्या कपाटातच ठेवल्या. मला कारण कळवण्याचा शिष्टाचार संपादकांनी पाळला नव्हता. मीही माझ्या काळ्या यादीत 'न्यूज ट्रॅक'चे नाव घेतले आणि स्वस्थ राहिलो. १५ एप्रिल, 'मॅराकेरा' येथे गॅट करारावर सही करण्याचा ठरलेला मुहूर्त. तेव्हा सगळीकडे डंकेल विषयावर कार्यक्रम करण्याविषयी धावपळ चालू झाली. 'न्यूज ट्रॅक'ची मंडळी पुन्हा एकदा दूरदर्शनच्या झेंड्याखाली आंबेठाणला आली. त्यांना मुलाखत न देण्याचा माझा निर्णय सांगितल्यावर त्यांनी दिल्लीहून फोन करून, मुख्य संपादकाशी बोलणे करून दिले, मुख्य संपादकांनी माफी मागितली. 'न्यूज ट्रॅक'चे नाव काळ्या यादीतून तात्पुरते का होईना मी दूर केले.
 माझेही काही हक्क आणि अधिकार
 आता प्रश्न आला मुलाखतीच्या स्वरूपाचा. मुलाखतीला बसण्याआधी मी आग्रह धरला तुमच्या कार्यक्रमाचा आराखडा काय? नेमके कोणते मुद्दे तुम्ही चर्चेला घेणार आहात, त्यांतील प्रस्तुत किती, अप्रस्तुत किती? महत्त्वाचे मुद्दे कोणते? यासंबंधी आराखड्यात बदल सुचवण्याचा माझा अधिकार आहे. कोणत्याही वावदूक प्रश्नांना उत्तरे देत बसण्यात मला स्वारस्य नाही.
 एवढेच नाही, माझ्या मुलाखतीपैकी कोणता भाग वापरला जाणार आहे? हे मला स्पष्ट झाले पाहिजे. सगळीच सगळी मुलाखत वापरता येणार नाही हे मी समजू शकतो; पण कोणते तुकडे कसे वापरले जात आहेत आणि ते तुकडे माझ्या विचाराचे प्रातिनिधिक आहेत किंवा नाहीत हे तपासण्याचा अधिकार मला असला पाहिजे. 'न्यूज ट्रॅक' व्यवसाय आहे, लोकांकडून विनामोबदला तास दोन तासाचे चित्रण घ्यायचे आणि त्याची मनमानी वासलात लावायची हे कोणी कसे कबूल करेल?
 याला एक पर्याय आहे, माझी मुलाखत तुम्हाला घ्यायची असेल तर तासाला माझा अमुक अमुक दर आहे, तितके पैसे टाका आणि मग तुम्हाला पाहिजे तो भाग वापरा किंवा सगळी मुलाखत कचऱ्याच्या पेटीत टाकून द्या. माझी फी आणि एक प्रत मिळाल्यानंतर टीव्हीवर प्रत्यक्षात तुम्ही काय दाखवता यात लुडबूड करण्याचे मला काही कारण नाही. माझी बौद्धिक संपदा ठरावीक फी देऊन मी तुम्हाला देतो, त्यानंतर तुम्ही पाहिजे त्या मर्कटचेष्टा करू शकता!
 डंकेल प्रस्तावावर कार्यक्रम करणाऱ्या या पत्रकारांना बौद्धिक संपदेचा हक्क ही कल्पना मुळात मान्य नाही. कॅमेऱ्याच्या नावीन्याच्या ताकदीवर मोठ्यामोठ्यांशी बैठकी जमवाव्यात आणि कोणताही अभ्यास न करता वेगवेगळ्या मुलाखतींच्या गोधड्या शिवाव्यात अशी इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता उदयाला येत आहे.
 इलेक्ट्रॉनिक्सने प्रसाराच्या रस्त्यातील भिंती दूर केल्या, वास्तवाच्या व्यभिचाऱ्यांना रोखण्याची ताकद 'इलेक्ट्रॉनिक्स'मध्ये नाही, ती लोकांमधूनच यावी लागेल.

(२९ एप्रिल १९९४)
■ ■