Jump to content

अन्वयार्थ – २/शेतकरी उपाशी, शेतीशास्त्रज्ञ खाई तुपाशी!

विकिस्रोत कडून



शेतकरी उपाशी, शेतीशास्त्रज्ञ खाई तुपाशी!


 जानेवारी २००० रोजी अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे ८८ वे अधिवेशन पुसा इन्स्टिट्यूट, दिल्ली येथे सुरू झाले. अधिवेशनाचे अध्यक्ष डॉ. परोडा हे भारतीय शेती विज्ञान संशोधन केंद्राचे (ICAR) प्रमुख, जगभर त्यांच्या कर्तबगारीचा बोलबाला असलेले. देशात शेतीला काही महत्त्वाचे स्थान असो किंवा नसो, विज्ञान परिषदेच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत मात्र शेती शास्त्रज्ञांना काहीसे झुकते मापच मिळाले आहे. गेल्या महिन्यात डॉ. परोडा यांना भ्रष्टाचारप्रकरणी पदमुक्त करण्यात आले; त्या वेळी मोठा गहजब उठला होता. जवळजवळ दोन हजार शास्त्रज्ञांनी खुद्द पंतप्रधानांकडे या कार्यवाहीबद्दल नाराजी व्यक्त करणारे निवेदन दिले. त्याहीपेक्षा कमाल म्हणजे, शंभरावर खासदारांनी डॉ. परोडा यांना सेवेत रुजू करून घ्यावे अशी मागणी केली. आठदहा खासदार असलेल्या पक्षांचे नेते पंतप्रधानांना दमदाटी करतात आणि जयललिता यांच्यासारखी एखादी व्यक्तीतर सरकार खालीही आणू शकते. या हिशेबाने पाहिले तर, शंभर खासदारांचा पाठिंबा असलेले, रामनिवास मिर्धा यांचे जावई असलेले आणि काँग्रेसचे माजी शेतीमंत्री बलराम जाखड यांच्या जवळच्या नात्यातील डॉ. परोडा संशोधन केंद्रातील आपली जागा परत मिळवण्याचा हव्यास करण्यापेक्षा कृषिमंत्री किंवा पंतप्रधानच बनण्याचा प्रयत्न का करीत नाहीत, अशी हेटाळणीची चर्चाही राजधानीत चालू होती. पंतप्रधानांनी डॉ. परोडांवर कार्यवाही करण्यात मोठी हिंमत दाखवली असे कौतुकाचे स्वरही ऐकू येत होते. तेवढ्यात, डॉ. परोडा यांच्यावरील कार्यवाही मागे घेण्यात आल्याची व त्यांना त्यांच्या पदावर पुन्हा नेमण्यात आल्याची बातमी येऊन थडकली. डॉ. परोडा नियोजित विज्ञान परिषदेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या पदच्युतीमुळे आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय वैज्ञानिकांच्या भारत बदनाम होईल या धास्तीपोटी पंतप्रधानांनी आपला निर्णय फिरवला असावा असा अंदाज वर्तमानपत्रांनी बांधला असावा.
 कोणा मातबर माणसाने हट्ट धरला तर सरकारने जाहीर केलेला निर्णयसुद्धा फिरवला जातो याची अनेक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जीनी पेट्रोलियमच्या किमती वाढविण्याचा निर्णय फिरवून किमती कमी करून घेतल्या हे त्याचे अलीकडचे उदाहरण. कोणाच्या हट्टापायी निर्णय फिरवल्याने हाती काहीच लागत नाही, त्यामुळे प्रतिष्ठा शासनाची जाते एवढेच काय ते! विज्ञान परिषदेकरिता भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली पदावरून दूर झालेल्या डॉ. परोडा यांना पुनर्स्थापित करण्यात आले, त्यापलीकडे जाऊन, विज्ञान परिषदेमध्ये उद्घाटनाचे भाषण स्वतः पंतप्रधानांनीच केले, तरी, 'बूॅंद से गयी, वो हौद से नहीं आयी.' जगातील सर्वांत ख्यातनाम कृषिशास्त्रज्ञ, हरितक्रांतीचे आंतरराष्ट्रीय जनक डॉ. बोर्लोग परिषदेस उपस्थित राहणार याचा खूप गाजावाजा झाला होता. ऐन वेळी त्यांनी परिषदेस येण्याचे रद्द केले आणि डॉ. परोडा यांच्यावरील कार्यवाहीमुळे आपण दुःखी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. बोर्लोग यांचा निर्णय डॉ. परोडा यांच्याशी सल्लामसलत झाल्याखेरीज घेतला गेला असेल अशी काही फारशी शक्यता नाही. सारांश, डॉ. परोडा यांनी बाजी मारली. त्यांनी आपल्यावरील शिस्तीची कार्यवाही रद्द करून घेतली, पद पुन्हा मिळवले. पंतप्रधानांना उद्घाटनास येण्यास भाग पाडले आणि वर, डॉ. बोर्लोग यांना गैरहजर ठेवून शासनाच्या श्रीमुखात चांगलीच चपराक मारली.
 उद्घाटनाच्या सत्रानंतर पंतप्रधान परिषदेचे स्थान सोडून गेल्यावर हरियाना, उत्तर प्रदेशातील काही शेतकरी मंचावर चढले. शेतीची गुणवत्ता वाढविण्याचे उद्दिष्ट सांगून भरलेल्या या विज्ञान परिषदेमध्ये शेतकरी कोठे आहे?" असा त्यांनी प्रश्न विचारला. आतंकवाद्यांनी काही अत्याचार केला तर त्यामागील सूत्रधार संघटना कोणती, याबद्दल चर्चा होते; बहुतेक वेळा कोणी ना कोणी संघटना अत्याचार आपण घडवून आणल्याची फुशारकी मारते. विज्ञान परिषदेच्या मंचावर घुसलेले हे निदर्शनकारी कार्यकर्ते आपले असल्याची शेखी शेतकऱ्यांच्या संघटनांपैकी कोणीच मिरवली नाही.
 जवळजवळ त्याच सुमारास कर्नाटक राज्यात रयत संघाच्या तीनेक हजार शेतकऱ्यांच्या जमावाने कापसाच्या जैविक बियाण्याच्या सरकारी देखरेखीखालील प्रयोगशेतीवर हल्ला केला, रोपटी उपटून टाकली आणि जाळून टाकली. विज्ञानपरिषदेमध्ये शेतीच्या जागतिकीकरणाला आणि जैविक शास्त्राला पाठिंबा देण्याची भूमिका आजपर्यंत घेतलेली आहे हे पाहता कर्नाटकातील दंगेखोर
आणि विज्ञान परिषदेतील घुसखोर यांच्यातील लागेबांधे समजण्यास अडचण पडू नये.
 विज्ञान परिषदेच्या बाजूला शेतीसंबंधी एक विशेष परिसंवाद घडवून आणण्यात आला. बरोबरच एक शेतकी प्रदर्शन ठेवण्यात आले होते. त्यानिमित्ताने शेतीमालाचा व्यापार, निर्यात, प्रक्रिया कारखाने, यंत्रसामग्री यासंबंधी बडीबडी मंडळी कार्यक्रमास हजर होती. परिसंवादाचा विषय होता 'जागतिक श्रेष्ठतेसाठीची धडक मोहीम'. वेगवेगळ्या क्षेत्रांतील मंडळींनी आपापल्या वक्तव्यात अडचणी सांगितल्या आणि स्पर्धेत टिकायचे असेल तर काय तयारी करावी लागेल यासंबंधी सखोल विवेचने केली. सर्वांचा सूरमात्र आत्मविश्वासाचा आणि आशेचा होता. भारतीय शास्त्रज्ञांचा उल्लेख हरवक्ता बिनचूक करत होता. मंचावरील शास्त्रज्ञांच्या लौकिकाविषयी काय बोलावे? भारतातील टेलिव्हिजनच्या दुकानात एकएक संच मांडून ठेवलेला असतो. जपानमध्ये खास दुकानात अशा संचाचे घालून ठेवलेले ढीग पाहिले म्हणजे जसा अचंबा वाटतो तसेच मान्यवर शास्त्रज्ञांच्या कारकिर्दीचा तपशील पाहिला म्हणजे वाटेल. दहावीस आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या सन्मानांखाली कोणीच नव्हते. डॉक्टरेट तर थप्पीने मिळालेल्या - कोणाला पंचवीस तर कोणाला तीस! निवृत्तीवयाच्या आधी पंचवीस ते तीस डॉक्टरेट मिळविण्यासाठी या शास्त्रज्ञांनी नेमके काय केले असावे याबद्दल कुतूहल वाटले. पदव्या देणारी विद्यापीठे काही नागपूरची नव्हती, जगभराच्या वेगवेगळ्या देशांतील नामवंत विद्यापीठांच्या त्या पदव्या होत्या. अन्नधान्याच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेल्या कामगिरीबद्दल जागतिक अन्नधान्य पुरस्कार दिला जातो. आजपर्यंत बारा शास्त्रज्ञांना हा मान मिळाला आहे. त्यात पाच भारतीय आहेत. लागोपाठ पाच भारतीय सुंदऱ्या विश्वविजेत्या ठरल्यावर अभिमान वाटावा तसेच भारतीय शास्त्रज्ञांच्या सन्मानांनीही कोणाही देशप्रेमी भारतीयाचा ऊर भरून यावा हे साहजिक आहे.
 डझनांनी पदव्या मिरविणारे आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित शेतीशास्त्रज्ञ मोठ्या संख्येने असलेल्या या देशातील शेतकरीमात्र आज महाअरिष्टात आहे. त्यासंबंधी लोकसभेच्या गेल्याच महिन्यातील सत्रात मोठा धांगडधिंगा झाला. वर्षानुवर्षाच्या दुर्लक्षामुळे जमिनीची सुपीकता घटते आहे, भूगर्भातील पाणी खचते आहे, नवीन भांडवली गुंतवणूक नाही, उलट, असलेली यंत्रसामग्रीही निकामी होत आहे. इकडे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा इतका असह्य झाला की, 'दारिद्र्यात् मरणं वरम्' असे म्हणून शेकड्यांनी शेतकरी किडींचा
बंदोबस्त करण्यासाठी निरुपयोगी ठरलेली औषधे घशाखाली घालून तडफडत प्राण सोडीत आहेत आणि त्याच वेळी दुसऱ्या देशातील शेतकरी सरकारी सज्जड साहाय्यामुळे आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादनाचे उच्चांक मोडीत आहे. उत्पादनखर्च घटवत आहेत आणि जागतिकीकरणाचा झेंडा फडकावीत गाफील देशांच्या बाजारपेठा काबीज करीत आहेत. अशी सारी शेतीची परिस्थिती.
 अशा वेळी भारतीय विज्ञान परिषदेत शेतीशास्त्रज्ञांच्या कौतुकाचा गजर व्हावा, हे काय गौडबंगाल आहे?
 भारतात हरितक्रांती आली. हरितक्रांतीच्या वाणासंबंधीच्या संशोधनाचे श्रेय प्रामुख्याने डॉ. बोर्लोग यांच्याकडे जाते, डॉ. स्वामिनाथन् यांच्यासारख्या भारतीय शास्त्रज्ञांनाही श्रेयाचा मोठा वाटा दिला जातो. उल्लेखनीय गोष्ट अशी, की मुळातले आंतरराष्ट्रीय संशोधन गहू, तांदूळ अशा धान्यांच्या बियाण्यांवर झाले. त्यांतील काही बियाण्यांवर आणखी पुढे संशोधन भारतीय शास्त्रज्ञांनीही केले; पण त्याचे स्वरूप भूमितीतील प्रमेये (थिअरम) मांडल्यानंतर त्यांचा उपयोग करून उपप्रमेयात्मक उदाहरणे (रायडर्स ) सोडविण्यासारखे आहे. परदेशांत डाळींसंबंधी संशोधन झाले नाही, कारण मांसाहारी प्रजेला प्रथिनांची गरज भागविण्याकरिता डाळींचे तितकेसे महत्त्व राहत नाही. भारतातील हरितक्रांती धान्यांपाशीच थांबली, डाळी किंवा तेलबिया यांच्या क्षेत्रात प्रवेश करू शकली नाही, यातील इंगित हेच आहे. भारतीय शास्त्रज्ञांचे संशोधन परदेशांत संबंधित क्षेत्रात काम झाल्यानंतर मगच उभे राहू लागते.
 समाजवादाच्या काळात, अगदी पहिल्या योजनेपासून शेतीतील संशोधनाचे महत्त्व नियोजनकर्त्यांनी अचूक ओळखले होते. संशोधन व्हावे कसे, करावे कोणी या प्रश्नांची उत्तरे 'इंडिया'तील सवर्ण नोकरशाहीला सोयीस्कर अशी देण्यात आली. पंडितजींना भव्य शिल्पे बांधण्याची दांडगी हौस. मुसलमान आमदानीतील शेवटचे बादशाह आणि अशोकासारखे काही सम्राट यांच्याशीच याबाबतीत पंडित नेहरूंची तुलना होऊ शकते!
 प्रत्येक क्षेत्रात संशोधन करण्यासाठी राष्ट्रीय प्रयोगशाळा खोलण्यात आल्या. परदेशांतून संशोधनाची साधने, उपकरणे गठ्याने आणण्यात आली. शास्त्र विभागात एखाददुसरी पदवी मिळालेले स्नातक फटाफट शास्त्रज्ञ Grade I किंवा Grade II वर लागू लागले. सरकारी खाक्या आणि ठरावीक पगार या धबगड्यात प्रतिभावंत शास्त्रज्ञसुद्धा निष्प्रभ झाले असते, येथेतर, किरकोळ अपवाद वगळता, केवळ पोटभरूंचा भरणा झालेला. काहीतरी किडूकमिडूक काम करून नवनवीन पदव्या
पदरी पाडून घेत, देशीपरदेशी संशोधन संस्थांशी संपर्क साधून परिसंवाद, परिषदा आणि दौरे यांसंबंधी उभयतांत समझोता करून ते 'परस्परम् भावयन्ता' परम श्रेय प्राप्तकर्ते झाले!
 आपल्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन आपल्या पदरी लाटून घ्यावे, दोस्त शास्त्रज्ञांचे कंपू बनवावे आणि प्रकल्प, दौरे, पारितोषके, पदव्या आपल्या कंपूत अधिकाधिक मिळवावेत हे प्रयोगशाळांतील मुख्य काम झाले. काही वर्षांपूर्वी म्हैसूर येथील शेतीमाल प्रक्रियेसंबंधीच्या मोठ्या विख्यात प्रयोगशाळेस भेट देण्याचा योग आला. 'इतर संशोधनशाळांचे जे काही असेल ते असो, ही संशोधन संस्थामात्र सर्वोत्कृष्ट काम करीत आहे', असा निर्वाळा मला अनेकांनी दिला होता. भेटीच्या शेवटी तेथील शास्त्रज्ञांना मी एक प्रश्न विचारला, आतापर्यन्त या संशोधनशाळेतून निष्पन्न झालेला सर्वांत मोठा शोध कोणता? एकमेकांशी विचारविनिमय करून उत्तर देण्यात आले ते असे : जगभर लहान बालकांकरिता खाद्य (Baby Food) बनविताना गायीच्या दुधाचा वापर केला जातो, म्हशीच्या नाही. आपल्या देशात म्हशींची संख्या मोठी आहे; पण त्यांचे दूध बालकांकरिता वापरता येत नसे. आम्ही संशोधनाने त्यातील चरबी (Fat) कमी करून म्हशीच्या दुधातून बालान्न तयार करणे शक्य केले.
 हिंदुस्थानातील दूधपित्या बालकांच्या आया या प्रश्नाचे उत्तर केव्हाच काढून बसलेल्या आहेत आणि आजही गायीचे दूध मिळाले नाही तर म्हशीच्या दुधात पाणी मिसळून त्यात थोडी संगजिऱ्याची पूड घालून त्या आपल्या मुलांची गरज भागवितात. अशा संशोधनासाठी कोट्यवधी रुपये खर्चुन पंचतारांकित संशोधनसंस्था उभ्या करण्याची आणि चालविण्याची काही आवश्यकता होती काय?
 डॉ. श्रीपाद दाभोळकरांनी प्रयोग परिवाराचा कार्यक्रम केला आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांत द्राक्ष क्रांती करून दाखविली.
 शेतकरी महिला आघाडीच्या 'सीता शेती' योजनेत ग्रामीण भागातील स्त्रियांकडून त्यांच्याच शेतांवर काही संशोधनाचे काम करून घेण्याची कल्पना होती.
 या दोनही योजनांत निघालेले निष्कर्ष शेतकऱ्यांकडे पोहोचविण्यात काहीच अडचण आली नाही. भारतातील समाजवादी परंपरेच्या संशोधन शाळांपुढे शेतकऱ्यांपर्यन्त संशोधन पोहोचविण्याची समस्या बिकट होऊन बसली आहे.
 संशोधनाचा विषय शेती. शेतीवरील संशोधन करण्यासाठी वेगळी कुंपणे घालून बंदिस्त प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या. कुंपणाआड चाललेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे कसे यासाठी एक वेगळी यंत्रणा सर्वदूर उभारण्यात
आली, पण ती निष्फळ ठरली.
 भारतात शास्त्रविषयक अभ्यास केलेल्यांची संख्या जगातील इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे असे अभिमानाने सांगितले जाते. आकडेवारीने शास्त्रपदवीधरांची संख्या मोठी आहे असे दाखविता येईल; पण या पदवीधरांत शास्त्रज्ञ बनण्यासाठी आवश्यक असलेली जिज्ञासू वृत्ती आणि तर्कनिष्ठा कितपत बाणली गेली आहे हे पाहिले तर स्नातकांच्या आकडेवारीला काही महत्त्व नाही हे स्पष्ट होते.
 देशात सर्व राज्यांत साधू, बाबामहाराज, प्रवचनकार आदी भक्तिपंथियांची मोठी चलती चालू आहे. एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर अशा भोंदू महाराजांच्या समोर बसणाऱ्या मंडळीत शास्त्रज्ञ किंवा सहाय्यक शास्त्रज्ञ म्हणून काम करणारांचा भरणा खूप मोठा आहे. आयुष्यात अनिश्चितता आणि पात्रतेपलीकडे यश ही अंधश्रद्धेची कारणे मानली जातात. अंधश्रद्धाळूच्या गर्दीत शास्त्रज्ञांची रेलचेल असावी हे समजण्यासारखे आहे; पण बरोबरीने विज्ञान परिषदांच्या मंचावरही ही शास्त्रज्ञ मंडळी एवढ्या दिमाखाने मिरवतात हे पाहिले म्हणजे शेतकरी मोठ्या संख्येने जीव का देऊ इच्छितात हे समजू लागते!

दि. १०/१/२००१
■ ■