अन्वयार्थ – २/मास्तर ते रिंगमास्टर

विकिस्रोत कडून


मास्तर ते रिंगमास्टर


 वळ जवळ ६० वार्षांपूर्वीची गोष्ट. बेळगाव येथील ठळकवाडीतल्या एका मराठी माध्यमाच्या शाळेत मी दुसरीत होतो. घरी केसरी यायचा. त्यात महायुद्धाच्या इतस्ततः पसरलेल्या ज्वाळा असा ठळक मथळा असलेला एक स्तंभ असे. त्यातल्या इतस्ततःचा नेमका अर्थ काय तो समजत नसे. त्या वेळी महायुद्ध चालू होते एवढे या आठवणीवरून नक्की!
 एका दिवशी सकाळी माझ्या वर्गाचे शिक्षक आमच्या घरी आले. कानडी पद्धतीचे दुटांगी धोतर, नवा असताना गर्द निळ्या रंगाचा असावा असा कोट, सडसडीत बांधा, उंच शरीरयष्टी. आम्ही कोठेतरी उनाडक्या करीत फिरत होतो; आईने हाक मारून घरात येण्याचे फर्मावले. शिक्षक पाहून नवल वाटले; भीती वाटल्याचे काही आठवत नाही. आमच्या शाळेत फक्त हेडमास्तरांचाच काय तो दरारा असे; बाकीचे शिक्षक सारे स्वभावाने गरीब आणि परिस्थितीने गांजलेले. विद्यादानाचे महापुण्य साऱ्या अडचणी सोसून, खऱ्याखुऱ्या निष्ठेने ते चालवीत.
 उद्यापासून सकाळी उंडगायला जायचे नाही, पाटकर मास्तर शिकवणीसाठी येणार आहेत, जरा अभ्यासाकडे थोडे लक्ष द्या. तुम्हाला काही वडिलार्जित जमीन मिळायची नाही: अभ्यासात वर आलात तर ठीक, नाही तर भीक मागायची पाळी येईल. आईचा प्रेमळ फतवा!
 मी पाचसहा वार्षांचा असेन; पण त्या वेळीही आपल्याला शिकवणी ठेवत आहेत यात काही भयंकर अपमान आहे असे स्पष्ट जाणवल्याचे आठवते आहे. मला शिकवणी कशाला? मी विचारले. हेतू, सुटता आले तर या बेडीतून सुटण्याचा असावा. त्याच वर्षी मी शाळेत जाऊ लागलो होतो. घरी मोठा भाऊ बाळ एक वर्ष वरती; त्याच्या बरोबरीने राहिल्याने त्याचेही धडे पाठ झालेले. त्यामुळे, थोडी परीक्षा घेऊन रजपूत मास्तरांनी मला एकदम दुसरीतच बसवले; तिसरीतही बसवायला ते तयार होते, पण आमच्या मोठ्या बंधूंनी एकदम निकराचा सूर काढला, शरदला माझ्या वर्गात बसवले तर मी शाळा सोडून देईन. सर्वांचा नाइलाज झाला आणि मी दुसरीत जाऊ लागलो.
 दर शनिवारी सप्ताहिक परीक्षा असायची. मास्तर बेरजा-वजाबाक्यांचे आकडे फळ्यावर लिहून द्यायचे आणि आम्ही उत्तरे पाटीवर लिहायची. बेरजेकरिता मास्तरांचे पाचसहा आकडे फळ्यावर लिहून होईपर्यंत मी उत्तर लिहून टाकायचो. शिकवणी ही मठ्ठ मुलांकरिता असते अशी त्यावेळची पक्की समजूत होती. मग, मीही निकराचा सूर काढला. आईने म्हटले, शिकवणी बाळकरिता आहे; तुझ्याकरिता नाही. पण, मास्तर एवढे येणार आहेत, शिकवणार आहेत; जरा बसलास शेजारी तर काय बिघडणार आहे? थोडेसे पुढचे शिकलास तर पुढच्या वर्षी तुला एकदम चौथीत बसवू. या लालचीने मी तयार झालो. मास्तरांनी अंगठा तुटलेल्या वहाणा पायांत घातल्या आणि दरवाज्याच्या चौकटीतून लांब लांब पावले टाकीत ते निघून गेले.
 आईला मी केलेल्या निषेधाबद्दल थोडी काळजी वाटत असावी. मला बाजूला घेऊन ती म्हणाली, तुला शिकवणीची गरज नाही हे मला कळते, पण मास्तरांना गरज आहे. तुझ्या वडिलांना ४० रुपये पगार आहे तरी आपली किती ओढाताण होते? शाळेमध्ये मास्तरांना महिन्याला ८ रुपये पगार आहे, त्यांनी जगावं कसं? माझी शाळा खासगी. महिन्याला १ रुपया फी द्यावी लागे. बाकीच्या म्युनिसिपालिटीच्या शाळा फुकट असत. अलीकडे इस्त्रीचा स्वच्छ गणवेश घालून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जसा आपला एक थाट वाटतो तसे काहीसे आम्हालाही वाटत असावे.
 परिस्थिती ओढगस्तीची असली तरी त्या काळच्या ब्राह्मण कुटुंबात सर्रास असणारा अभ्यासाचा आग्रह आमच्याकडे थोडा अधिकच असायचा. घरी कायम एकतरी वारकरी मुलगा जेवायला असायचा. अभ्यासात थोडी हयगय झाली तरी आईचे बोलणे ठरलेले, 'तो पाहा, कोणी नाही तरी विद्या संपादन करण्यासाठी किती कष्ट करतो आहे? नाही तर तुम्ही! चारी ठाव खायला मिळते आहे म्हणून मस्ती चढते!' पाठ्यपुस्तकात 'गरीब बिचारा माधुकरी' ही कविता आली त्या वेळी अनवाणी पायाने, डोक्याचा गोटा केलेले आणि सोवळ्यात ताट ठेवून माधुकरी मागणारे विद्यार्थी इतके असत, की ती कविता वाचताना पोटात गोळा उठे; एवढेच नाही, तर डोळ्याला पाणीसुद्धा येई. गरजू विद्यार्थ्याला वार देणे या प्रमाणेच गरजू मास्तरांना मदत व्हावी म्हणून आम्हाला शिकवणी ठेवण्याचा आईचा मनोदय होता.
 'गरीब बिचारे, फक्त १ रुपयामध्ये दररोज एक तास घरी येऊन शिकवणी करणार आहेत आणि बाळबरोबर तूही बसलास तर आपल्याला ती शिकवणी काही फार महाग नाही.'
 शिक्षक आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शिक्षक म्हणजे माझ्या लहानपणी सर्वांच्याच आदराचा आणि करुणेचा विषय असायचा. त्यानंतर १० वर्षांनी मुंबईला असताना प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांकरिता प्राचार्य दोन्दे यांनी दीर्घ काळ उपवास केला होता. तोपर्यंत तरी, महाराष्ट्रात प्राथमिक शिक्षक ही सालस सज्जनांची जात होती. कारकुनाची नोकरी मिळाली तर शिक्षक मोठ्या आनंदाने नोकरी सोडून जायला तयार असत; पण अशी संधी काही थोड्या भाग्यवंतांनाच लाभायची.सेवा आणि ज्ञानदान या पलीकडे कोणताही अधिकार नसलेली अशी ही मंडळी.
 बेळगावच्या आठवणीतील माझा मोठा भाऊ आता बाळासाहेब झाला आहे. दिल्लीजवळ त्याच्या मुलानेही एक कारखाना काढला आहे. कारखाना काढणे आणि चालविणे ही सगळ्या देशात मोठी कठीण कामगिरी झाली आहे. उत्तरेत तर आपल्यापेक्षा अधिक, कारखाना चालविणाऱ्यांना आसपासच्या गुंडांचा त्रास, युनियनच्या पुढाऱ्यांचा त्रास. कोणत्याही गोष्टीसाठी काहीही परवाना मिळवायचा झाला तर संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन किंवा एखाद्या नेत्याकडे जाऊन काही नाकदुऱ्या काढाव्या लागतात; त्यासाठी त्यांना संतुष्ट करावे लागते. एकूणच मोठा मनस्तापाचा मामला. नको ती कारखानदारी आणि नको या उर्मट सत्ताधाऱ्यांपुढे वाकणे असे सगळ्यांना होऊन जाते.
 बाळासाहेबांची सून जवळच्याच एका प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. फरिदाबादला त्यांच्या घरी मुक्कामाला गेलो म्हणजे आमच्या सूनबाईंची शाळेत निघतानाची तयारी अन् जामानिमा पाहून मी चेष्टाही करत असतो, शाळा आहे का शिक्षिकांची सौंदर्यस्पर्धा आहे? अलीकडे मी तेथे उतरलो तेव्हा एक चिंतेचा विषय निघाला होता. कारखान्यांच्या आसपासची काही मंडळी खोडसाळपणे कारखान्यांत घुसून काही उपद्व्याप करीत होती. आमच्या कुटुंबीय मंडळीत मी असलो, की माझ्याकडे सगळेचजण एका वेगळ्याच दृष्टीने पहातात. सर्व संसारतापांतून मुक्त झालेला भाग्यवान अशी काहीशी त्यांची दृष्टी असते. गुंडांच्या उपद्रवाचा आणि बँकेच्या दिरंगाईचा प्रश्न आमचे बंधुराज कसा काय हाताळणार याबद्दल मला कुतुहल वाटतच होते. माझ्या पुतण्यानेच उत्तर पुरविले, आता आम्हाला असल्या गोष्टींचा काही फारसा त्रास होत नाही. मानसी (शिक्षिका सून) ला सांगितले, की ती सगळे प्रश्न पटकन सोडावते. काम कलेक्टर कचेरीत असो, पोलिस खात्यात असो की आणखी कुठे; शिक्षकांचा निरोप गेला, की एरव्ही दांडगेगिरीकरिता प्रसिद्धी असलेले अधिकारीही अगदी नमून वागतात आणि कामे करून टाकतात. अगदी बालवर्गात प्रवेश मिळवायचा झाला तरी शाळेतल्या शिक्षकांशी ओळख असणे उपयोगी असते. आणि, एरव्हीही मुलांच्या अभ्यासावर देखरेख ठेवणे इत्यादी कामे करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांविषयी आदर आहे, एवढेच नव्हे तर भीती आहे.
 कोणीही कितीही मोठा असो, त्याची मुले नाही तर नातवंडे शाळेत असतातच. शिक्षकांनी शब्द टाकला तर पटकन काम होऊन जाते. मला १९४१ सालच्या, तुटक्या अंगठ्याच्या वहाणा पायात सरकविणाऱ्या पाटकर मास्तरांची आठवण झाली; त्यांच्या चरितार्थाला मदत व्हावी म्हणून महिन्याभराची १ रुपयाची शिकवणी ठेवणारी माझी आईही आठवली.
 मी सध्या राहतो त्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची बदललेली परिस्थिती मला चांगली माहीत आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेतही प्राथमिक शिक्षक होणे पैशाच्या दृष्टीने मोठे भाग्याचे मानले जाते. शिक्षण क्षेत्रातील पदव्या किंवा पदविका मिळवून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक झाले, की स्वर्गाला हात पोहोचले अशी सर्वसाधारण भावना आहे. त्यात एखाद्या शिक्षिकेशी विवाह झाला म्हणजे विचारायलाच नको. मग दोघांनाही जन्मभर, शक्य तो एका जागी राहता येईल अशा बदल्या मिळविणे आणि त्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांची मर्जी राखणे एवढाच काय तो आयुष्यभरचा कार्यक्रम राहतो. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाविषयी विचारायलाच नको! इंग्रजी आणि गणिताचा बट्ट्याबोळ. अलीकडे गावातील एक-दोन मुले एस्.एस्.सी. झाली असे ऐकतो.
 स्वातंत्र्यानंतर शेती कनिष्ठ, व्यापार मध्यम आणि नोकरी श्रेष्ठ झाली. त्यामुळे, बेळगावचे पाटकर मास्तर ते आंबेठाणचे मांडेकर गुरुजी एवढे मोठे परिवर्तन झाले. पण, त्यापलीकडे आमच्या फरिदाबादच्या सूनबाई. शाळा सुसज्ज, शिक्षणाचा दर्जाही उत्कृष्ठ आणि त्यांची सामाजिक प्रतिष्ठाही फार मोठी. एवढा मोठा बदल स्वातंत्र्यानंतरच्या ५० वर्षांत दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात काही जाणवला नाही.

दि.५/४/२०००
■ ■