अन्वयार्थ – २/धार्मिक प्रार्थना
साऱ्या हिंदुस्थानात कोणत्याही गावी मुक्काम झाला तर सकाळी जाग येते ती कातून कानावर आदळणाऱ्या नमाजाच्या बांगेने किंवा कर्णकर्कश आरत्यांच्या कल्लोळाने. गणेशोत्सवाच्या दहा दिवसात तर आरत्या, भजने, कीर्तने यांच्या कल्लोळाने परीक्षार्थी विद्यार्थी शहर सोडून इतरत्र राहायला जातात आणि अनेक नागरिक गणपती, दुर्गादेवी, दांडिया यांच्या काळात शहरात न राहिलेलेच बरे असे म्हणतात. मध्यंतरी देवळांतील आरत्या हा महाराष्ट्रातील राजकारणात एक महत्त्वाचा वादविषय ठरला होता. गेली वीस वर्षे तरी विविध धर्मांच्या प्रार्थना आणि आरत्या हा वादाचा विषय ठरला आहे. कोणीही खासगी जागेत, बाहेरच्या जगाला तोशीस पोहोचणार नाही अशा तऱ्हेने पूजा, प्रार्थना, धार्मिक विधी केले तर त्याबद्दल काही वाद निर्माण होत नाही; पण आधुनिक उच्चध्वनिक्षेपकांच्या साहाय्याने ईश्वरापर्यंत आपली प्रार्थना पोहोचविणे आणि त्याबद्दल चढाओढीच्या भावनेने अधिकाधिक कल्लोळ माजविणे सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांना बाधा आणते काय? सर्वसाधारण नागरिकांना या प्रार्थनाकल्लोळापासून काही संरक्षण कायद्याने मिळू शकते का? हा भारतात चर्चेचा विषय झाला आहे.
गेल्या आठवड्यात मी अमेरिकेत गेलो होतो. तेथे याच प्रश्नाचे एक वेगळे स्वरूप पहायला मिळाले.
अमेरिकेत फूटबॉल हा मोठा लोकप्रिय खेळ आहे. अगदी विद्यापीठ पातळीच्या सामन्यांनादेखील प्रचंड गर्दी जमते. दोनही संघांचे समर्थक शेकडो तहांनी आपापल्या संघांना प्रोत्साहन देतात आणि प्रतिस्पर्धी संघाला नाउमेद करण्याचा प्रयत्न करतात. रंगीबेरंगी आकर्षक कपडे परिधान केलेल्या चिअर लीडर्स (Cheer Leaders) मुलींचे ताफेच्या ताफेही आपापल्या संघाला प्रोत्साहन देत असतात.
एके दिवशी अचानक एक नवीनच गोष्ट घडली. सामन्यातील दोन्ही संघांची बरोबरीची चुरस चालली होती. सामन्याचा वेळ संपत आला होता. उरलेल्या वेळात कोणता संघ आघाडी घेतो याबद्दल मोठे तणावाचे वातावरण तयार झाले होते. प्रोत्साहनाच्या आरोळ्या, त्याबरोबर बॅण्ड, वाद्ये इत्यादींच्या आवाजाने सगळा कोलाहल माजला होता. तेवढ्यात एका संघाचे समर्थक उभे राहिले आणि त्यांनी अत्यंत शिस्तबद्ध रीतीने प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली. प्रार्थना दोनच मिनिटे चालली असेल; पण त्यामुळे वातावरणात पराकोटीचा बदल घडून आला. प्रोत्साहनासाठी आजपर्यंत वर्षानुवर्षे वापरण्यात आलेले सारे प्रकार मर्कटचेष्टा वाटू लागल्या. ज्यांच्या बाजूने प्रार्थना म्हटली गेली त्या संघाने उरलेल्या वेळात दोन गोल केले आणि सामना जिंकला.
साराच प्रकार मोठा विलक्षण! अमेरिकेत शासन हे निखळ निधार्मिक आहे. न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे, सरकारी अनुदान मिळणाऱ्या साऱ्या शाळांत आणि महाविद्यालयांत कोणत्याही धर्माची प्रार्थना म्हणता येत नाही. फूटबॉलच्या सामन्यातील प्रार्थनेचा लोकविलक्षण प्रकार घडला आणि एक नवीनच प्रश्न उभा राहिला - सरकारी अनुदान मिळणाऱ्या शाळांच्या सामन्यांत किंवा सरकारने भरविलेल्या क्रीडास्पर्धांत प्रोत्साहनाचे एक साधन म्हणून प्रेक्षकांनी धार्मिक प्रार्थना वापरणे कितपत योग्य आहे?
इंग्रजी अमलाच्या काळात भारतात क्रिकेटचे पंचरंगी सामने खेळले जात. हिंदु, मुसलमान, शीख, पारशी, युरोपियन इत्यादी धर्मपंथांचे स्वतंत्र संघ असत आणि त्यांच्यात मोठे अटीतटीचे सामने होत. या सामन्यांच्या वेळी हर हर महादेव, अल्ला हो अकबर अशा धर्तीच्या धार्मिक घोषणा होत. पण, सामन्यांवरून कोठे जातीय दंगल उद्भवली नाही. फाळणीच्या आधी जातीय दंगली उफाळन येऊ लागल्या तसे पंचरंगी सामने बंद झाले.
अमेरिकेत असाच प्रश्न उभा केला गेला. आज एका धर्माच्या अनुयायांनी प्रार्थना म्हटली, उद्या दुसऱ्या कोणत्या धर्मीयांनी त्यांची प्रार्थना म्हटली तर थोड्याच दिवसांत फूटबॉलचे मैदान प्रार्थनायुद्धाचे रणक्षेत्र होण्यास वेळ लागणार नाही, जातीय तेढ वाढीस लागेल या भीतीपोटी हे प्रकरण न्यायालयात गेले. सार्वजनीक जागी प्रार्थनेचा उपयोग करणे योग्य आहे का? त्याला शासनाने बंदी घालणे योग्य होईल काय? अशी बंदी घातली तर त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांना बाधा येते काय? असे सारे प्रश्न न्यायालयासमोर उभे केले गेले. मी ज्या दिवशी अमेरिकेत पोहोचलो त्याच दिवशी याविषयी न्यायालयाचा निर्णय जाहीर झाला. सार्वजनिक जागी प्रार्थनांचा उपयोग कोणत्याही एका संघाचे मनोधैर्य वाढविण्याकरिता करणे अनुचित आहे असा स्पष्ट निर्णय न्यायालयाने दिला.
भारतात सध्यातरी खेळांच्या मैदानांवर हा प्रश्न उभा राहिलेला नाही. भारत आणि पाकिस्तान यांचा एकदिवसीय क्रिकेटचा सामना असला म्हणजे वातावरण मोठे तंग असते. अगदी जिंकू किंवा मरू अशा कसोशीने सामना खेळला जातो. लांबवरून प्रवास करून, महागडी खर्चीक तिकिटे काढून प्रेक्षक जमतात. आपल्या बाजूची सरशी झाली म्हणजे आनंदप्रदर्शनाचा धिंगाणा घालतात आणि दुसऱ्या पक्षाचा पाणउतारा हरेक प्रकारे करतात. पण, सचिन किंवा सौरभने षटकार मारला म्हणजे 'हर हर महादेव किंवा जय बजरंग बली' अशा घोषणा होत नाहीत किंवा जावेद अख्तरने कोणाची दांडी उडविली म्हणजे 'अल्लाऽ हो अकबर' किंवा 'इल् इलाहिया रसूऽलल्ला' अशा गर्जना होत नाहीत. तशा त्या होऊ लागल्या तर त्यांवर बंदी घालण्यात येईल, हे उघड आहे; पण साऱ्या देशाच्या क्रीडाक्षेत्रात कोणताही सामना चालू नसताना विविध धर्मांच्या प्रार्थनांची, केवळ आवाज चढवून लोकांचे लक्ष वेधून आपले अस्तित्व जाहीर करण्याची सकाळसंध्याकाळ जी स्पर्धा चालू आहे त्याबाबत प्रकरण न्यायालयात जाईल किंवा त्याबाबत काही निर्णय होईल अशी शक्यता काही दिसत नाही. उलट, शाळांमध्ये प्रार्थना म्हटल्या जाव्यात, पाठ्यपुस्तकांत धर्मशिक्षणाचा अधिकाधिक प्रभाव असावा या दृष्टीने फर्माने सुटत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांच्या भेटीच्या काळात भारत आणि अमेरिका दोघेही लोकतंत्रवादी देश, दोघेही अतिरेकी चळवळींच्या विरोधात, दोघेही आधुनिक युगातील गणकयंत्राच्या तंत्रज्ञानात आघाडीवर अशी मोठी भलावण झाली. दोन्ही देशांत समानता विपुल आहे, त्याचबरोबर दोघांत फरकही आहेत. भविष्यकाळात समान गुण महत्त्वाचे ठरतात का दोघांतील फरकाचे विषय? कोणी सांगावे?
■ ■