Jump to content

अन्वयार्थ – २/बुझावी क्लिंटन तेंचि लीळा वदावी

विकिस्रोत कडून


बुझावी क्लिंटन तेंचि लीळा वदावी


 क्लिंटन, बिल क्लिंटन, विल्यम जेफर्सन क्लिंटन किंवा साधे सुटसुटीत बिल म्हणजे जगातील सर्वांत प्रबळ महासत्तेचे राष्ट्राध्यक्ष; ज्याच्या एका शब्दामुळे जागतिक अर्थकारणाची दिशा बदलू शकते आणि ज्याने आज्ञा दिली तर सद्दामसारख्या हुकुमशहाला दाती तृण धरावे लागते; थोडक्यात, जगातील सर्वांत सामर्थ्यवान पुरुष.
 १९ मार्चपासून ते २५ मार्चपर्यंत सात दिवस भारतीय उपखंडात क्लिंटन दौऱ्यासाठी आले होते. सात दिवस सर्व दृक्श्राव्य प्रसारमाध्यमांत सर्वांत गाजणारा विषय म्हणजे क्लिंटनयात्रा. १९ तारखेला पालम विमानतळाच्या तांत्रिकी विभागात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे एअर फोर्स नं. १ हे विमान उतरले तेव्हापासून त्यांची प्रत्येक बारीकसारीक हालचाल सर्व माध्यमे टिपीत होती आणि त्यावर टीकाटिप्पणीही करीत होती. २५ मार्च रोजी मुंबईच्या विमानतळावरून, विमानांची लपाछपी खेळत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष छोट्याशा जेट विमानातून, इस्लामाबादला गेले आणि तेथून मायदेशी जाण्यासाठी रवाना झाले. सगळ्या उपखंडात एकदम शांत, स्तब्ध वातावरण पसरले. तसे म्हटले तर, विशेष नवे असे काहीच घडले नाही. पण, उपखंडातील दोन्ही देशांत क्लिंटनयात्रेच्या पूर्वीचा कालखंड आणि नंतरचा कालखंड असे दोन सरळ विभाग पाडावे इतका फरक पडून आला आहे.
 भारतातील जनसामान्यांना क्लिंटन साहेबांचा व्यक्तिगत परिचय फार तोटका आहे. बिल नावाच्या एका शाळकरी मुलाने योगायोगाने प्रेसिडेंट जॅक केनडी यांच्यासमोर आल्यावर आपले चिमुकले हात हस्तांदोलनाकरिता पुढे केले. राष्ट्राध्यक्षांनी काही काळ ते हात हातात घेतले आणि प्रेमळपणे दाबले आणि छोट्या बिलच्या मनात आपणही राष्ट्राध्यक्ष व्हावे ही महत्त्वाकांक्षा तयार झाली. गव्हर्नर असताना त्यांनी हाताळलेल्या काही प्रकरणांबाबत संशय आणि आरोप यांचे वादळ उठले. मनुष्य एकूण काही निष्कलंक चारित्र्याचा पुतळा नाही अशी त्यांची प्रतिमा.
 अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची पत्नी नेहमीच अतिविशिष्ट व्यक्ती असते. क्लिंटन यांची पत्नी हिलरी स्वतः विद्यापीठात आणि कार्यक्षेत्रांत गाजलेली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष आपल्या पत्नीकडे अनेक कामांची स्वतंत्र जबाबदारी सोपवितात. तिला अमेरिकेच्या पहिल्या महिला या पलीकडे कॅबिनेट दर्जाचे स्थान आहे. पुढेमागे सौ. हिलरी स्वतःच अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्षा बनू शकतील काय याबद्दल चर्चा होत असते.
 रुबाबदार व्यक्तिमत्व, चेहऱ्यावर खेळणारे थोडे मिष्किल हसू आणि डोळ्यात जेम्स बॉण्डच्या पद्धतीची घायाळ करणारी नजर. टेलिव्हिजनच्या या युगात क्लिंटन यांची लोकप्रियता केवळ त्यांच्या रूपानेसुद्धा साध्य झाली असती.
 मध्यंतरी मोनिका लेवेन्स्कीचे प्रकरण निघाले. स्वतः क्लिंटन यांना एका लहान मुलीशी केलेल्या चाळ्यांचा कबुलीजबाब द्यावा लागला. मी जे केले ते चूक होते असे जगासमोर उभे राहून सांगावे लागले. पण तरीही, त्यांच्याविरुद्धचा बडतर्फीचा ठराव फेटाळला गेला, एवढेच नव्हे तर, या सगळ्या काळात त्यांच्या अश्लील चाळ्यांची तपशीलवार वर्णने छापली जात असताना त्यांच्या लोकप्रियतेचा निर्देशांक वाढत राहिला. हे कसे काय झाले? मोठे कोडे आहे!
 एका बाजूस आपल्या व्यक्तिगत सहाय्यकांशी अभद्र चाळे करणारा राष्ट्रपती इराकच्या सद्दामची खोड मोडण्याकरिता त्या देशावर क्षेपणास्त्रांचा प्रचंड मारा करण्याचा आदेश देतो आणि ओसामा बिन लादेन यांच्या हस्तकांनी काही घातपाती स्फोट घडवून आणल्यावर त्यांच्या अतिरेकी छावण्यांवर आधुनिक क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचाही निर्णय देतो.
 क्लिंटन यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. आयर्लण्डमधील कॅथॉलिक व प्रोटेस्टंट यांच्यामधील रक्तलांछित संघर्ष वर्षानुवर्षे चालला होता. इस्रायल आणि अरब यांच्यातील खाईतर वर्षानुवर्षे पेटत राहिलेली. या प्रकरणांत क्लिंटन यांचे वेगळेच रूप प्रकट झाले. दोन्ही प्रकरणांत उभय पक्षांच्या नेत्यांबरोबर बसून काही एक समझोत्याचा आराखडा त्यांनी तयार केला आणि तो अमलात आणण्याकरिता अमेरिकेची सर्व ताकद कामास लावली. इस्रायल आणि अमेरिका यांचे फार जुने घनिष्ठ संबंध आहेत. अमेरिकेतील ज्यू नागरिकांचा अमेरिकन राजकारणावर मोठा प्रभाव आहे. त्यावरही मात करून क्लिंटन यांनी इस्रायलच्या अध्यक्षांना दुराग्रह सोडून देण्यास भाग पाडले.
 क्लिंटन यांच्याच कारकिर्दीत व्यापाराच्या जागतिकीकरणाचा कालखंड सुरू झाला आणि गणकयंत्राच्या तंत्रज्ञानाचेही युग झपाट्याने पुढे आले.
 हैदराबाद येथे केलेल्या भाषणात क्लिंटन यांनी म्हटले, 'माझ्या लहानपणी चिप म्हणजे बटाट्याचा खाण्याचा पदार्थ होता आणि डिस्क म्हणजे पाठीच्या मणक्याचा एक भाग होता; पण गेल्या काही वर्षांत या सर्व संज्ञांचे अर्थच पालटून गेले.'
 सेल्युलर फोनच्या साहाय्याने जगातील कोणतीही व्यक्ती कोठूनही पाहिजे त्या व्यक्तीशी कोठेही ताबडतोब संपर्क साधू लागली ही गोष्ट काही वर्षांपूर्वी अरबी भाषेतील सुरस कथांतील हकिकतींइतकी चमत्कारिक वाटली असती. आता हे प्रत्यक्ष हरदिन डोळ्यासमोर घडते आहे. समाजवादाच्या पाडावानंतर अमेरिका एकमेव महासत्ता राहिली आणि सारे जग व्यापार आणि आधुनिक संचारतंत्रामुळे पहिल्यांदा अगदी छोटे बनले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून क्लिंटन यांच्यावर इतिहासातील एका अत्यंत महत्त्वाच्या कालखंडात मोठी जबाबदारी येऊन पडली.
 भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांत वर्षानुवर्षे अमेरिका आणि पाकिस्तान यांचे विशेष सलोख्याचे संबंध राहिले आहेत. SEATO चे सदस्य राहिलेले पाकिस्तान आणि ऊठसूट रशियाची भलावण करणारा, अगदी रशियाच्या हंगेरी, अफगाणिस्तान यांवरील आक्रमणाचेही समर्थन करणारा भारत अशा परिस्थितीत अमेरिकेचे पाकिस्तानच्या बाजूने झुकते माप काहीसे समजण्यासारखे आहे.
 आता रशिया एक दुय्यम महासत्ता बनली; भारतातही नेहरू परंपरेतील कवित्वबुद्धीच्या मुत्सद्देगिरीचे युग संपले आणि जसवंतसिंग यांच्यासारख्या परखड परराष्ट्रमंत्र्याच्या हाती निर्णयाची जबाबदारी गेली. तेवढ्यात पोखरणच्या अणुचाचण्या झाल्या; पाकिस्तानने त्याला प्रत्युत्तर दिले. कारगिलवरील हल्ल्यानंतर पाकिस्तानचा खोडसाळपणा जगजाहीर झाला; पण त्याचबरोबर, काश्मीर साऱ्या जगाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक ज्वालाग्राही भांडार बनले. दोनही देश अणुचाचण्यांवर बंदी घालण्यास नाराज आणि दोन्ही देशांत अणुबॉम्बचा प्रत्यक्ष उपयोग करण्याइतकी असमंजस नेतृत्वाची मुबलकता. भरीस भर म्हणून तिसऱ्या जगातील हे दोन मोठे देश जगात बहुराष्ट्रीय खुल्या व्यापाराची पद्धती आणण्यास नाराज. अशा परिस्थितीत क्लिंटन यांची उपखंडाची भेट ठरली. एक दिवस बांगला देश, पाच दिवस भारत आणि पाच तास पाकिस्तान. पाकिस्तानची भेट ठरलीच नसती तर भारतातील नेतेमंडळींना आनंद झाला असता; पाच तासांची भेट ठरल्यानंतर कशी जिरली भारताची अशी काहीशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पुढाऱ्यांची!
 पारिजातकाच्या फुलांवरून सत्यभामा आणि रुख्मिणी यांचे वितुष्ट झाले आणि श्रीकृष्ण दोघींची समजूत काढण्यास अंतःपुराकडे निघाला असा हा प्रसंग. दोघी क्रुद्ध सवतींचे बुझावी हरि तेंचि लीळा वदावी असे वामन पंडिताने सुरस वर्णन केले आहे. श्रीकृष्ण क्लिंटन यांची भारतीय उपखंडाच्या भेटीच्या सात दिवसांतील सर्व कामगिरी या दृष्टिकोनातून समजून घेतली पाहिजे.
 क्लिंटन आल्या आल्या बांगला देशला गेले. एका इस्लामिक राष्ट्रातील यशस्वी लोकशाही पद्धतीची त्यांनी वाखाणणी केली. शिक्षण आणि पर्यावरण यांकरिता भरभक्कम देणगी जाहीर केली. बांगलादेशमधील नागरिकांच्या मनांतील एक अभिमानस्थळ त्यांनी नेमके हेरले - लोकशाही यशस्वी करणारे इस्लामिक राष्ट्र आणि साऱ्यांची वाहवा मिळविली.
 भारतात आले. राष्ट्रपतींनी केलेल्या स्वागतसमारंभात अतिरेक्यांच्या कारवायांबद्दल आणि पाकिस्तानच्या छुप्या आक्रमणाबद्दल भारताशी सहमती स्पष्ट केली, राजघाटावर जाऊन श्रद्धांजली वाहिली. एव्हाना सारे भारतीय मोनिका लेवेन्स्की प्रकरणातील सारी बदनामी पार विसरून गेले होते. संसदेच्या दोन्ही सभागृहांपुढील क्लिंटन यांचे भाषण म्हणजे वर्षानुवर्षे बारकाईने अभ्यास करावा अशी करामत होती. समोर दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष बोलतो आहे, की आपल्याच शासनाची तरफदारी करणारा कोणी वक्ता बोलतो आहे असा संभ्रम पडावा इतके क्लिंटन साहेब अभिनिवेशाने बोलले. पाकिस्तानला थोडे फटकारले. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष हिंदुस्थानात येतो, भारताचा पक्ष धरतो, पाकिस्तानला दटावतो म्हणजे भारतीयांच्या अभिमानस्थानाची तार कुशलतेने छेडणेच होते! क्लिंटन यांनी साऱ्या सांसदांवर भूल टाकली असे साऱ्या वर्तमानपत्रांनी म्हटले.
 प्रसिद्ध फ्रेंच मुत्सद्दी कॅसानोव्हा याची, त्याच्या अनेक स्त्रियांशी असलेल्या प्रकरणांबद्दल मोठी ख्याती होती आणि आहे. अगदी सामान्य रूपाच्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या कॅसानोव्हावर इतक्या रूपगर्विता भाळल्या कशा याचे रहस्य स्वतः कॅसानोव्हानेच सांगितले आहे. प्रत्येक स्त्रीचा - अगदी सामान्यातील सामान्य स्त्रीचासुद्धा - एक अहंकारबिंदू असतो. कोणाला आपल्या नाकाचा, कोणाला डोळ्यांचा, कोणाला केसांचा, कोणाला अंगयष्टीचा, कोणाला चालण्याचा, कोणाला हसण्याचा तर कोणाला बोलण्याचा… जितक्या स्त्रिया तितकी अहंकारस्थळे. ज्याला नेमके अहंकारस्थळ हेरता येते आणि त्याबद्दल अंत:करणपूर्वक प्रशंसा करता येते तो पुरुषोत्तम कोणाही स्त्रीचे मन जिंकू शकतो. क्लिंटन यांची या क्षेत्रातील कर्तबगारी जगप्रसिद्धच आहे. राजस रूप, ओघवती भाषा, प्रभावी वक्तृत्व आणि कॅसानोव्हा तंत्र यांच्या मिलाफामुळे लेवेन्स्की प्रकरणाच्या ऐन चिखलफेकीतूनही ते सुखरूप सुटले. बांगला देश आणि भारतातील सर्व लोकांवर अशीच मोहिनी त्यांनी घातली. राजकारणात मोहिनीतंत्राचा वापर करणारा हा कोणी नुसताच Philanderer आहे की काय अशी संभावना डोकावते न डोकावते तोच क्लिंटन यांची पाकिस्तानयात्रा सुरू झाली. एअर फोर्स नं. १ ने जाण्याऐवजी साध्या विमानातून जाणे, त्यात पाकिस्तान फारशी सुरक्षित भूमी नसल्याचे सूचित करणे आणि नंतर, पाकिस्तानातील लष्करी हुकूमशाही, काश्मिरातील हस्तक्षेप आणि अणुबॉम्बच्या चाचण्या यांच्याबद्दल अगदी परखड शब्दांमध्ये दटावणे हे अगदीच वेगळे रूप एकदम समोर आले.
 श्रीकृष्णानेही सत्यभामा आणि रुख्मिणी. दोघींनाही समजावले. खरी बाजू कोणाची, खोटी कोणाची याचा निवाडा करण्याचा त्याने प्रयत्न केला नाही. क्लिंटन यांची करामत त्यापलीकडची. भारतात प्रवास करताना त्यांनी मोहिनीतंत्राचा वापर केला आणि सायबराबादच्या भाषणात भारत जणू काही अमेरिकेच्या तोडीचा गणकतंत्रज्ञानी देश आहे अशी भलावण केली. जिकडे जावे तिकडे त्यांची स्तुती करावी या न्यायाने न वागता पाकिस्तानमध्ये खडीखडी सुनावली. या सर्व लीळा पाहता बिल विल्यम जेफर्सन क्लिंटन हा अनेक गुण आणि कौशल्याने विनटलेला महापुरुष आहे हे स्पष्ट होते. अमेरिकेतील निवडणुका जवळ आल्या आहेत. क्लिंटन यांचे वारसदार निदान क्लिंटन यांच्या इतक्या बहुविध गुणांनी संपन्न असतील, तरच सध्याच्या युगातील एकधुरी तंत्रज्ञानावर झेपावत असलेल्या जगाला काही आशा बाळगता येईल.

दि. ३०/४/२०००
■ ■