अन्वयार्थ – २/ब्रह्मचाऱ्याचा कोपागार अनुनय
कुटुंबकलहाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि वेगवेगळ्या छटा यांच्याबाबत मराठी साहित्यिकांनी उदंड लिखाण केले आहे. किंबहुना, पती-पत्नीमधील भांडण हा मराठी साहित्यातील एक विशेष अलंकार आहे. साहित्यिक मध्यमवर्गीय, त्यामुळे, वर्णनेही मध्यमवर्गातील कलहांची. आपला जोडीदार नाराज आहे हे कळून येईपर्यन्त या कलहनाट्याचा पहिला अंक संपतो. रागाने तापलेला चेहरा, जोरजोराचा श्वासोच्छ्वास, हालचालींतील सहेतुक जडपणा, आपण काही बोलत नाही म्हणजे जगातील सहनशीलतेचे सारे उच्चांक मोडीत आहोत असा आविर्भाव, भांड्यांची आदळआपट, पोरांना बदडणे इ.इ. प्रवेशांती हा अंक संपतो.
पूर्वीच्या राजेरजवाड्यांना मोठा जनानखाना असे. एवढ्या सगळया पत्नीजनांत आज नाराज कोण आहे, हे समजून येणे अशक्य, समजले तरी त्याची फारशी पर्वा करण्याची त्याकाळी पद्धत नव्हती. जिच्या सदनी जाण्याची राजाने इच्छा धरावी तीच रुसलेली असली तरच रुसवा काढण्याचा प्रश्न निर्माण होणार. जाण्याआधी सदनातील रागरंग कसा आहे, हे कळण्याला काहीच मार्ग नाही. त्यासाठी एक सुंदर उपाय योजलेला असे. राजाच्या महालात अनेक सदने आणि आगारे असत. ज्या त्या व्यक्तीला त्याच्या त्याच्या स्थानाप्रमाणे निवासाची व्यवस्था असे. खास प्रियजनांसाठी तर हिवाळ्यातील निवास वेगळा, उन्हाळ्यातील वेगळा, पावसाळ्यातील वेगळा असा थाट असे. या सगळ्या वेगवेगळ्या विभागांत कोपागार म्हणून एक वेगळा स्वतंत्र महाल असे. कोणीही राणी नाराज झाली की तिने उठावे आणि कोपागारात जाऊन बसावे म्हणजे राजेश्वरांना दूताकरवी तातडीने बातमी कळे की, अमूक अमूक राणी रुसली आहे. महत्त्वाचे वाटले तर राजा अशा प्रकरणी लक्ष घाली, अन्यथा कोपागरात राहून राहून विटली म्हणजे ती राणी सुजल्या डोळ्यांनी आपल्या निवासात परते.
एकदा भगवान श्रीकृष्णांना नारदाने पारिजातकाचे फूल दिले. ते भगवंतांनी रुक्मिणीला दिले. त्याच्या सुगंधाने सारी द्वारिका नगरी भरून गेली आणि सर्वत्र चर्चेचा विषय झाला – रुक्मिणीच कृष्णाची लाडकी राणी'. चर्चा सत्यभामेच्या कानी गेली आणि तिने मोठा आक्रोश मांडला. कृष्णाने तिची समजूत काढली. या विषयावर वामनपंडितांनी मोठे बहारदार काव्य लिहिले आहे. 'नारदाने फूल अर्पण केले त्याबरोबर पहिला विचार मनांत आला तो हा की, हा वृक्ष आपल्या राजधानीत पाहिजे आणि तोदेखील आपल्या घरीच असावा. त्यातले त्यात प्रिय राणीच्या सदनात असणे उत्तम. रुक्मिणीला मी फूल दिले, पण अख्खा वृक्षच तुझ्या अंगणात लावण्यासाठी आणावा असे मी ठरविले आहे,' अशी कृष्णाने बतावणी केली. भामा रुसली, रागही खोटा आणि समजूतही खोटी. आपल्याला फूलच दिले आणि भामेला पारिजात वृक्ष दिला, हे समजल्यावर रुक्मिणीने काही थैमान घातले किंवा कसे याची काही नोंद महाभारतात नाही.
युग बदलले. काळ बदलला. राजेशाही गेली. लोकशाही आली. निश्चित बहुमताचा आधार असलेले पक्ष आणि पंतप्रधान गेले. मोर्चा आणि आघाड्या यांची सरकारे येऊ लागली आणि 'कोपागारां'चा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रकट झाला! सत्तावीस पक्षांची आघाडी, अर्धशतकावर मंत्री या सगळ्यांना सांभाळून राज्य करणे म्हणजे सोळा सहस्त्र नारींच्या अनुराधनापेक्षाही कठीण.
आंतरराष्ट्रीय बाजारातील पेट्रोलच्या किंमती भडकल्या. सरकारी तिजोरीत आधीच खडखडाट. महागात तेल विकत घेऊन ग्राहकांना स्वस्तात देण्याचा 'अव्यापारेषु व्यापार' किती दिवस चालावा? पर्याय नाही म्हणून अखेरीस पेट्रोलियम पदार्थांचे भाव वाढविण्याचा निर्णय घ्यावा लागला. पेट्रोलचे भाव वाढवण्याचा निषेध म्हणून तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि रेल्वे मंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी फटकन् राजीनामा देऊन टाकला. राजकीय तणाव एकदम वाढला. ताईंनी मोठे आकांडतांडव मांडले. गरीबांना जिणे असह्य करणारी ही भाववाढ आघाडीतील पक्षांशी औपचारिक विचारविनिमयसुद्धा न करता केली. आम्ही आता कोणत्या तोंडाने लोकांसमोर जावे? महागाई भडकावणाऱ्या सरकारमध्ये मंत्री म्हणून राहणे म्हणजे राजकीय आत्महत्याच आहे. नको ही राष्ट्रीय आघाडी, नको ते मंत्रीपद. असा मोठा त्रागा त्यांनी केला.
त्यांच्या राजीनाम्याने किंवा तृणमूल काँग्रेसचा पाठिंबा नाकारल्याने तसा काही धोका नव्हता, पण तरीही घरातल्या घरात रुसवेफुगवे काही बरे नाहीत. मागच्या वेळी जयललिताजी कोपागारात गेल्या; त्यांच्याकडे पंतप्रधानानी लक्ष दिले नाही आणि सारे सरकारच कोसळले. त्यामुळे, या वेळी लक्ष देणे भाग पडले. अलीकडे रुसवेफुगवे इतके की पंतप्रधानांना जातीने अनुनय करणे शक्य नाही. मग, असा अनुनय दूतांकरवी केला जातो. पंतप्रधानांनी दूताहाती संदेश धाडला, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. लोकांना भाववाढीचा फार त्रास होणार आहे. पण भाव वाढविण्यापलीकडे काही दुसरा मार्गच नाही. तरीपण आम्ही एकूण भाववाढीच्या तिसरा हिस्साच ग्राहकांवर लोटत आहोत, दोन-तृतीयांश बोजा सरकारी तिजोरीवरच पडणार आहे. ममताताई खूश! बंगालमध्ये डाव्या आघाडीवरील मात इतकी हातातोंडाशी आली असताना राज्यकर्त्या आघाडीची कास सोडण्याइतक्या त्या अव्यवहारी नाहीत. भाववाढीला विरोध करण्यासाठी राजीनामा टाकला की, गरीबांचे कैवारी असल्याचा मोठा बोलबाला होतो, त्यासाठी ही सारी धावपळ. पंतप्रधान अविवाहित आहेत, कुटुंबकलह सोडवण्यात त्यांचा अनुभव शून्य. पण तरीही, श्रीकृष्णालाही लाजवील अशा कौशल्याने त्यांचा कोपागार अनुनयाचा कार्यक्रम चालू आहे.
मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यापासून दररोज कोणी ना कोणी कोपागारात जाऊन बसते. कधी सुषमा स्वराज, कधी जॉर्ज फर्नांडीस, कधी राम जेठमलानी तर कधी आणखी कुणी! पंतप्रधानांची चतुरता अशी की, कोपागरात जाऊन दबाव आणण्याचा प्रयत्न त्यांच्या लगेच लक्षात येतो. आणि मग, अनुनय दूरच राहिला, महालातून हकालपट्टी होऊ शकते. राम जेठमलांनीच्या बाबतीत असेच झाले, सत्यनारायण सिंहही असेच फसले.
ज्यांचा अनुनय इष्ट अशी मंडळी कोपागरात जाऊन बसली की अशांत सदनात अटलबिहारींचा हरी येतो आणि युक्तिप्रयुक्तिने रुसवा काढतो. असे हे कोपागाराचे राजकारण आहे.
महाउष्णश्वासे करुनि वदते शुष्क अधरा.
धरापृष्ठी जोडा न शठ दुसरा या गिरिधरा..
धराया माझा हा कर कपटि कैंचा जलमला.
मला जो निंदूनी कुसुम तिस देऊनि रमला..
सख्या हो मेल्याही शवहि न शिवो हे यदुपति.
पती नानास्त्रींचा पतितजनही ज्यास जपती..
नका येऊ देऊ सदनिं सवतीच्या प्रियकरा.
कराते लावीना मज कपटि ऐसें तुम्ही करा..
वामनपंडितांनी भामाविलासात सत्यभामेच्या केलेल्या अशा त्राग्याचे हे वर्णन ममताप्रकरणासही लागू पडेल.
दि. १०/१०/२०००
■ ■