Jump to content

अन्वयार्थ – २/ससा आणि कासव - २०००

विकिस्रोत कडून


ससा आणि कासव - २०००


 १९८२ मध्ये दिल्ली येथे आशियाड खेळांच्या स्पर्धा झाल्या. स्पर्धांसाठी येणाऱ्या खेळाडूंचे आणि पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सारी दिल्ली राजधानी नटूनथटून सज्ज झाली होती. नवी क्रीडांगणे, खेळाडूंसाठी वसतिगृहे, प्रेक्षकांसाठी तारांकित हॉटेले, वाहतूक सुरळीत चालावी म्हणून नवे वाहतूक पूल, नव्या बसगाड्या, स्वच्छ रस्ते, सुंदर क्रीडांगणे सारे काही जादूची कांडी फिरल्यासारखे उभे राहिले. खेळांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम मोठा शानदार झाला. आशियाड खेळ दिल्लीत घेऊ नयेत, त्यापेक्षा ही साधनसामग्री आर्थिक विकासाच्या कामाकरिता वापरली गेली तर देशाचे आणि गोरगरिबांचे भले होईल. त्यात आणखी पंजाब पेटला आहे. असे रडगाणे गाणाऱ्यांनासुद्धा आपण भारतीय असल्याचा अभिमान उद्घाटनाचा सोहळा पाहताना वाटला. खेळ संपले, परदेशी मंडळी आपापल्या घरी परतली आणि थोडक्याच काळात दिल्लीने आपले कायमचे बकाली स्वरूप धारण केले.
 गेल्या महिन्यात सिडनी येथे ऑलिम्पिक खेळांच्या स्पर्धा झाल्या. सिडनीसारखी व्यवस्था आणि नियोजन येत्या वीसपंचवीस वर्षांततरी दिल्लीत होईल असे वाटत नाही.
 सिडनी खेळांच्या शेवटी जो उत्सवाचा जल्लोश झाला, आकाश आणि धरती उजळून टाकणारी जी रोषणाई झाली ते दूरदर्शनवर पाहूनच प्रेक्षकांचे डोळे तृप्त झाले. ऑलिम्पिक खेळही संपले. आता सिडनी शहराची काय अवस्था असेल? पुन्हा एकदा कोणत्याही मोठ्या शहराप्रमाणेच सिडनी गबाळ दिसू लागले असेल काय? नक्कीच नाही.
 चार वर्षांपूर्वी दक्षिण कोरियातील सेऊल येथे ऑलिम्पिक खेळ झाले होते. त्या वेळी सेऊल नगरी अशीच नटली होती. आज तेथे कोणी प्रवासी पाहुणा गेला तर वर्षा- दोन वर्षांत सेऊल ऑलिम्पिक खेळांचे यजमानपद स्वीकारण्यास पुन्हा एकदा सज्ज होऊ शकते याची त्याला खात्री पटते. मोठमोठी दुकाने सामानाने खचाखच भरली आहेत, अगदी शाळकरी मुलेसुद्धा सेल्युलर फोनवर एकमेकांशी बोलत आहेत अशा आरामाच्या जागा, सहलीची सारी उपवने माणसांनी तुडुंब भरली आहेत. दक्षिण कोरियासारख्या छोट्या देशाची राजधानी सेऊल वैभवाच्या शिखराला पोहोचली आहे व वैभवाला काही अंत नाही आणि सीमा नाही असे सारे वातावरण आहे.
 तीन वर्षांपूर्वी म्हणजे, १९९७ मध्ये दक्षिण कोरियावर आर्थिक मंदीची लाट आली होती. मोठमोठे कारखाने बंद पडले, बँकांची दिवाळी निघाली. खुल्या व्यवस्थेचा फायदा घेऊन प्रचंड वेगाने आर्थिक प्रगती करणाऱ्या आशियायी वाघांपैकी दक्षिण कोरिया हा एक महत्त्वाचा देश आहे. ढाण्या वाघच जाळ्यात सापडल्यासारखे झाले.
 भारतात खुल्या व्यवस्थेला विरोध करणारे अनेक लोक आहेत. लाल बावट्याखाली सारे जग एकत्र झाले नाही आणि खुली व्यवस्था मात्र जगाला एकत्र करीत आहे याबद्दल संतापलेले जुने डावे आणि त्यांचे साथी यांनी दक्षिण कोरियातील मंदीचा मोठा गहजब केला. आम्ही सांगत होतो, बाजारपेठी व्यवस्थेमुळे कधी कोणाचे भले होणे शक्यच नाही. पटले आता? आशियायी वाघांच्या प्रगतीबद्दल मोठा डंका पिटीत होते! कशी खाशी जिरली! शेपूट तुटलेल्या कोल्ह्याला दुसऱ्याचे शेपूट तुटलेले पाहून संतोष वाटावा असा हा प्रकार आहे. त्यांच्यापेक्षा आम्ही बरे. हळूहळू का होई ना, आमची प्रगती चालू आहे. फार उंच पोहोचलो नाही, पण खड्डयात तर पडलो नाही ना? असेही आंबट समाधान ही मंडळी मानून घेतात.
 १९९७ साल गेले. नंतरही दोन वर्षे पार झाली. दक्षिण कोरिया झपाट्याने प्रगती करीत आहे. मागील वेळी झालेल्या चुका त्यांनी नीट समजावून घेतल्या. नवनवोन्मेषी जातिवंत शिल्पकाराला ग्राहकांची फिकीर नसते. पण, शाडूचे गणपती बनविणाऱ्या मूर्तिकाराला लवकरच स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि मंदीची लाट आऽ वासून समोर उभी राहते. तीन वर्षांपूर्वीपर्यन्त आशियायी वाघ पाश्चिमात्य औद्योगिक देशांना लागणाऱ्या फुटकळ सामानांचा पुरवठा करीत. मंदीच्या अनुभवानंतर गेल्या तीन वर्षांत या सर्व देशांनी नवनवीन तंत्रज्ञान शोधण्यावर आणि वापरण्यावर भर दिला आहे म्हणूनच त्यांची पुन्हा एकदा वैभवाच्या शिखराकडे झपाट्याने वाटचाल सुरू आहे.
भारत मात्र स्पर्धेत कधी धावला नाही, कधी पडलाही नाही आणि, आजही भारताची अर्थव्यवस्था कुचंबल्यासारखी सुस्तावली आहे. अर्थमंत्री श्री. यशवंत सिन्हा मात्र पराकाष्ठेच्या तावातावाने सगळे काही आलबेल असल्याचे निक्षून सांगत आहेत.
 तसे म्हटले तर ही जुनीच 'ससा आणि कासव' यांच्या शर्यतीची कहाणी आहे. फरक एवढाच, की इसवी सन २००० मधील ससा वाटेत झोपी जात नाही आणि कासव मात्र खड्डयात पडून कुचंबून बसते.

दि. ३१/१०/२०००
■ ■