अन्वयार्थ – २/खेळ आणि व्यापार: रोमन विरुद्ध ग्रीक परंपरा

विकिस्रोत कडून


खेळ आणि व्यापार : रोमन विरुद्ध ग्रीक परंपरा


 श्रीनगर येथील 'गुलाम बक्षी स्टेडियम'वर भारतभरच्या राज्याराज्यांतील पोलिसदलांच्या फूटबॉलच्या सामन्यांतील अंतिम टप्प्याचा सामना चालू होता. अलीकडे श्रीनगरमध्ये सामने वगैरेसाठी फारशी गर्दी जमत नाही. घातपाताच्या धोक्याची टांगती तलवार असल्याने तुरळक म्हणण्यापलीकडे गर्दी जमत नाही; पण या स्पर्धांच्या निर्णायक सामन्यालामात्र वीस हजारांवर प्रेक्षक हजर होते. जणू काही, काश्मिरात काही वणवा पेटलेलाच नाही असे फूटबॉलच्या उत्साहाने जमले होते. सामन्यात काश्मीरचा पोलिस संघ आधीच्याच फेरीत बाद झाला होता. म्हणजे आपल्या ओळखीपाळखीच्या खेळाडूंची क्रीडांगणावरील करामत पाहण्यासाठी म्हणून लोकांचा उत्साह उमाळत नव्हता; निर्णायक सामन्यातील प्रतिस्पर्धी संघ होते सरहद्द संरक्षक पोलिसदल (BSF) आणि कर्नाटक पोलिस. काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीत सरहद्द संरक्षक पोलिस (BSF) लोकप्रियतेच्या शिखरावर नसावेत हे उघड आहे. पण, त्यांच्यावरचा राग प्रेक्षकांनी ज्या कल्लोळाने त्यांची हुर्रे उडवून केला तो मोठा अद्भूत होता. सरहद्द संरक्षक पोलिस परकीय आक्रमकांचे सैन्य आहे, अशी सर्वसाधारण भावना काश्मीरमध्ये आहे. सामना सुरू होण्याआधीच प्रेक्षकांनी कर्नाटक संघाच्या बाजूने असा काही जयजयकाराचा धोशा लावला, की सरहद्द संरक्षक पोलिस संघाचे मनोधैर्यच खचले असावे. त्यांची पीछेहाटच होऊ लागली तसे प्रेक्षक अधिकाअधिक चेवाने त्यांची हुर्रेवडी करू लागले. 'लोकांना छळता काय? घ्या आता!' अशा अर्थाच्या घोषणा प्रेक्षक देऊ लागले. यात पाकिस्तानधार्जिणेपणा आणि भारतविरोध छपलेला होता असे म्हणणे कठीण आहे. कारण, प्रेक्षक जयजयकार करत होते तो कर्नाटक संघाचा. कर्नाटक नेमका कुठे आहे याची प्रेक्षकांना कितपत खबर होती कोणास ठाऊक? ते जयजयकार करत होते वीरप्पनच्या नावाने! वीरप्पन आणखी एक गोल कर!, वीरप्पन आणखी एक गोल कर! असा प्रेक्षकांचा घोष चालला होता. कर्नाटक पोलिस, अर्थात् जिंकले. सारे प्रेक्षक खूष झाले व जयजयकार करत पांगले.
 सामन्यामध्ये कर्नाटकऐवजी काश्मीर पोलिस संघ असता आणि त्यांची चुरस सरहद्द संरक्षक पोलिस दलाशी (BSF) असती तर प्रेक्षकांनी काय केले असते हे सांगणे कठीण आहे. त्याच श्रीनगरमध्ये, त्याच बक्षी स्टेडियमवर पाकिस्तानमधील एखादा संघ खेळत असता तर काय झाले असते याची कल्पना करणे कठीण आहे म्हणण्यापेक्षा कठीण नाही म्हणणेच जास्त योग्य.
{gap}}काश्मीर तर सारा पेटलेलाच प्रदेश आहे. खेळाच्या सामन्यालाही असे टोकाचे राजकीय स्वरूप यावे हे समजण्यासारखे आहे; पण काश्मीरबाहेरदेखील सामन्यांचे वातावरण खऱ्याखुऱ्या युद्धासारखेच असते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असला, की जणू काही जीवनमरणाचा प्रश्न आहे अशा तऱ्हेने मैदानावर उपस्थित असलेले प्रेक्षक घोषणांची धुमश्चक्री करून टाकतात. दूरदर्शनवर सामना पाहणारे प्रेक्षकही चेंडूच्या एका एका फेकीबरोबर उडी मारून उभे राहणे, टाळ्या वाजवणे, जयजयकार करणे, आनंददुःख व्यक्त करणे अशा लीळा करीत असतात.
 जगातील इतर अनेक देशांत अनेक खेळांचे सामने होतात; पराकोटीच्या चुरशीने सामने खेळले जातात. फूटबॉलच्या सामन्यांच्या वेळी गुंडागर्दी करण्यात इंग्रजी प्रेक्षकांनी अलीकडे मोठे नाव कमावले आहे! दक्षिण अमेरिकेत राष्ट्रीय संघ फूटबॉलच्या सामन्यात कमी पडला तर राष्ट्रीय दुखवट्याचे वातावरण तयार होते. खेळ ही त्या देशांत गंभीरपणे घेतली जाणारी गोष्ट आहे. त्यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. खेळाडूंच्या सगळ्या आयुष्याची क्षणाक्षणाने उलाढाल होते; पण खेळ पाहताना उभय संघाच्या गुणवत्तेला सारेचजण दाद देतात.
 खेळांच्या प्रेक्षकांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार ग्रीक परंपरेतला. यात खेळणे, खेळात भाग घेणे महत्त्वाचे मानले जाते; जिंकण्याला फारसे महत्त्व नाही. प्रत्येक खेळाडू अधिक दूर, अधिक उंच, अधिक वेगवान या ध्येयाने उत्तमोत्तम कामगिरी करून दाखवितो. खेळांच्या पूर्वीही आनंदोत्सवाचा जल्लोष होतो; खेळ संपतानाही मोठी भावुक विदाई केली जाते.
 खेळांची दुसरी परंपरा इटली देशातील रोमन संस्कृतीची. रोममध्ये प्रचंड क्रीडागारे असत. तेथे हजारोंनी प्रेक्षक जमत. खेळ माणूस विरूद्ध वाघ सिंहासारखे हिंस्र पशू यांच्यात व्हायचा किंवा दोन शस्त्रसज्ज कुस्तीगिरांची झुंज असायची. सामन्याच्या शेवटी एकच पक्ष सहीसलामत बाहेर पडणार आणि दुसरा मैदानातच देह टाकणार याची जवळजवळ खात्रीच असायची. एक कुस्तीगीर हरू लागला म्हणजे प्रेक्षक हलकल्लोळ करून जिंकणाऱ्या कुस्तीगिरास प्रतिस्पर्ध्यास संपवून टाकण्याकरिता, आरडाओरड करून आग्रह करीत. रोमन खेळात सौहार्दपूर्ण शेवटाची शक्यताच नव्हती.
 ग्रीक पद्धतीच्या खेळामध्ये महत्त्व कामगिरीला होते, जिंकण्याहरण्याला नव्हते.
 भारत खंडातील प्रेक्षकांची मानसिकता रोमन परंपरेशी अधिक जुळणारी आहे. समोरासमोर ईर्ष्येने संघर्ष करणे त्यांना समजते; जिंको किंवा हरो. अधिकाधिक कोशीश करून उच्चांकांवर उच्चांक गाठणे त्यांच्या प्रकृतीस फारसे जमत नाही.
 ग्रीक परंपरेतील अलीकडच्या काळातील सत्ताविसावे ऑलिम्पिक खेळ सिडनी येथे चालू झाले आहेत. साऱ्या जगभरातील यौवनश्रींचा हा महोत्सव. मानवी शरीर जे जे काही करू शकेल त्याची अद्भूत प्रात्यक्षिके जगापुढे मांडण्यासाठी हजारो युवकयुवती जमा होतात. एक खर्व जनसंख्येच्या आपल्या खंडप्राय देशाला एखादे सुवर्णपदकदेखील मिळण्याची शक्यता दिसत नाही; एखादे मिळालेच तर धन्य धन्य वाटते. आरामखुर्चीपंडितांची सहजस्फूर्त टिप्पणी - जातात कशाला कुणाला ठाऊक? विदेश पर्यटनाची संधी साधतात खेळाच्या नावाने, खेळाडू आणि पुढारी. याच्या दुसऱ्या टोकाची प्रतिक्रिया - लहानपणापासून होतकरू मुलांना वेगळे काढून, कसोशीने सराव देऊन त्यांना खेळासाठी तयार केले पाहिजे. ऑलिम्पिक खेळांच्या निमित्ताने आपला देश, आपला वंश यांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न ज्या ज्या हिटलरांनी केला त्यांची त्यांची फजिती झाली. ज्या देशात सर्वच प्रकारच्या संधी जनसामान्यांनादेखील मुबलकतेने उपलब्ध असतात तेथील खेळाडू अधिकाधिक उंच, अधिकाधिक दूर, अधिकाधिक जलद ध्येय साधतात. रशिया, पूर्व जर्मनी आजपर्यंतच्या खेळात अग्रणी असत. या वेळी त्यांची परिस्थिती मोठी केविलवाणी झालेली दिसते.
 ऑलिम्पिक खेळांच्या बाबतीत जे खरे, तेच जागतिक व्यापाराबद्दलही लागू आहे. जागतिक व्यापार म्हणजे अधिकाधिक चांगला माल अधिकाधिक स्वस्त उत्पन्न करून बाजारपेठा जिंकण्याची स्पर्धा आहे. आम्ही फार कच्चे; आम्ही काय परदेशातल्या मालाशी स्पर्धा करणार? नकोच आम्हाला ती जागतिक स्पर्धा; आमची समुद्रपर्यटनास विरोध करणारी परंपरागत संस्कृतीच भली अशी भूमिका घेऊन जागतिक व्यापार संस्था भरवीत असलेल्या व्यापार ऑलिम्पिकमध्ये भागच घ्यायचा नाही असे म्हटले तर नुकसान जगाचे नाही, ऑलिम्पिकचेही नाही. अशा भूमिकेमुळे गुणवत्तेच्या परिपोषासाठी कसोशीने तपस्या करण्याची संस्कृती मागे पडेल आणि क्रीडाक्षेत्राप्रमाणेच व्यापारक्षेत्रातही आम्ही सदाचे नेबळे बनून जाऊ.

दि. २९/९/२०००
■ ■