Jump to content

अन्वयार्थ – २/जग काही फार सुधारलेले नाही!

विकिस्रोत कडून


जग काही फार सुधारलेले नाही !


 भूतकाळाच्या उदरात गडप झालेल्या साम्यवादी सोव्हिएट रशियाच्या महासंघाने अफगाणिस्तानात सैन्य पाठवून आक्रमण केले, त्या वेळचे रशियाचे प्रमुख ब्रेझनेव्ह यांच्या मनात काय हेतू आणि हिशेब होते याचा कोणाला पत्ता लागला नाही. हिंदी महासागराच्या बाजूला आपला एखादा समुद्रकिनारा असावा व त्यावर चांगले बंदर असावे ही रशियाची महत्त्वाकांक्षा जुन्या झार बादशहांच्या कालखंडापासून चालत राहिली होती; समाजवादी रशियाच्या महत्त्वाकांक्षांत काही फरक पडलेला नसावा. एखाद्या साम्राज्यवादी उद्दाम सत्तेप्रमाणे मोठ्या संख्येने सैन्य पाठवून अफगाणिस्तानवर आक्रमण झाले, तेथे मोठे बंड पेटले. अफगाणिस्तान पादाक्रांत करणे, ब्रेझनेव्हसाहेबांना वाटले तितके काही सोपे झाले नाही. अफगाण पठाण मोठा कडवा, स्वातंत्र्याचा भोक्ता म्हणून इतिहासभर गाजला आहे. गावागावात टेकडीटेकडीवर रशियन फौजांना झुंज द्यावी लागली.
 व्हिएतनाममध्ये सैन्य पाठवून आपलेच नाक कापून घेतलेल्या अमेरिकेला रशियाची ही फजिती पाहून पोटात गुदगुल्या झाल्या असणार; पण सरळ अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी फौजा पाठविणे अमेरिकी जनतेला मान्य झाले नसते. अमेरिकेने शेजारच्या पाकिस्तानला प्रचंड प्रमाणात शस्त्रास्त्रे पुरविली आणि पाकिस्तानी लष्कर अफगाणिस्तानमध्ये खुले आम मैदानात उतरले. त्या लष्कराच्या हातूनही आक्रमणाचा बीमोड होण्याची लक्षणे दिसेनात तेव्हा इराणच्या सरहद्दीकडील काही कडव्या टोळ्यांना अमेरिकेने शस्त्रे पुरविली आणि त्यातून तालिबानचे लष्कर तयार झाले.
 तेवढ्यात रशियन साम्राज्य कोसळले आणि तालिबान टोळीवाल्यांना सारी जमीन मोकळी मिळाली. प्रचंड वेगाने या रानटी टोळ्यांचे रणगाडे गडगडू लागले, विमानविरोधी तोफा दणाणू लागल्या आणि अल्पावधीत अफगाणिस्तानमधील
बहुतेक भूमी टोळीवाल्यांच्या ताब्यात आली. युद्ध जिंकणाऱ्या सर्वच लष्करांना मस्ती चढते तशी या टोळीवाल्यांनाही चढली. जपानी लष्कराने कोरिया, फिलिपाईन्समध्ये दुसऱ्या महायुद्धात जे अनन्वित प्रकार केले, याह्याखानच्या सैन्याने बांगलादेशात जसे अत्याचार केले त्याच्या पलीकडे पराकोटीला जाऊन तालिबानने आपला दरारा बसविण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या टोळीवाल्यांना इस्लाम म्हणजे काय याची कल्पना असली, तर ती अगदी पुसट. त्यांच्या पद्धती, रीतीरिवाज हे सगळे दुर्गम डोंगरांतील रानटी टोळ्यांचे. इस्लामच्या नावाखाली त्यांनी हातात आलेल्या सगळ्या प्रदेशात आपले रीतीरिवाज बळजबरीने लादण्याला सुरुवात केली. सगळा रोष काय तो बायकांवर. 'मुलींनी गोषा घेतल्याखेरीज फिरू नये', 'शाळेत जाऊ नये', 'असेच कपडे घालावे', 'असे कपडे घालू नये' इत्यादी फर्माने तासातासाने सुटू लागली. साऱ्या जगात स्त्रीस्वातंत्र्याच्या चळवळी चालू आहेत. सुसंस्कृत समजल्या जाणाऱ्या देशांतील सरकारे महिलासन्मानाचे जाहीरनामे उच्चरवाने सांगत असतात. संयुक्त राष्ट्रसंघातही महिला हक्काच्या गप्पा यथेच्छ मारल्या जातात. पण, अफगाणिस्तानातील महिलांची तालिबान लष्कर करीत असलेली मुस्कटदाबी मोडून काढण्याचा विचार कोणी तोंडातून काढलासुद्धा नाही. इराकच्या सद्दाम हुसेनने थोडीशी आगळीक केल्याचा भास झाला तरी साऱ्या इराकला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या माऱ्याने भाजून काढण्याचा चंग बांधणारी अमेरिकाही चिडीचूप राहिली, आपलेच दात आणि आपलेच ओठ! 'तालिबानचे भूत आपणच उभे केलेले; ते हाताबाहेर गेले हे सांगता कोणाला?' अशी अमेरिकेची अवघड परिस्थिती झाली.
 आपल्याला कोणी ललकारणारे नाही हे पाहिल्यावर तालिबान लष्कर अधिकच बेफाम बनले. अमेरिकेविरुद्ध घातपाताची कृत्ये खुले आम घडवून आणणारा ओस्मा बिन लादेन याने अफगाणिस्तानमध्ये आपले केंद्र उघडले आणि तेथून, अमेरिकेला जेरीस आणण्याची भाषा खुले आम बोलू लागला, तरीसुद्धा अमेरिका काही करू शकली नाही. मग तर तालिबान लष्कर अगदीच उतामातास आले आणि त्यांनी एक नवाच उपद्व्याप आरंभला.
 सध्याचे अफगाणिस्तान हे एके काळी बौद्ध संस्कृतीचे एक मोठे केंद्र होते. निन्रधार येथील विद्यापीठात त्या काळचा सर्वांत मोठा ग्रंथसंग्रह होता. गजनीच्या महंमदाने ते सारे वाचनालय उभे जाळून टाकले. तेव्हा त्याच्या समर्थनार्थ तेथील खलिफ ओमार याचा युक्तिवाद साधा आणि सोपा! ही असली रगड पुस्तके घेऊन करायचे काय? या पुस्तकांत आहे तरी काय? कुराणात जे काही
लिहिले आहे त्यापेक्षा वेगळे काही त्यात लिहिले असेल तर ते नष्ट करायलाच पाहिजे. कुराणात जे काही सांगितले आहे तेच त्यांत सांगितले असेल तर अशी द्विरुक्ती करणाऱ्या पुस्तकांचा काय उपयोग?
 इतिहासात हे वर्णन वाचले म्हणजे असे कोणी हिरवट धर्मांध असतील यावर विश्वाससुद्धा बसत नाही; पण ही धर्मलंडांची जात संपली नाही आजही ती जगात शिल्लक आहे एवढेच नाही तर आजही त्यांना जवाब मागून त्यांचा बीमोड करणारा कोणी शिल्लक नाही. अफगाणी देशात अनेक लढाया झाल्या, स्वाऱ्या झाल्या; मंदिर, महाल उद्ध्वस्त झाले, देवळे फोडली गेली; तरीही एके काळच्या बौद्ध संस्कृतीचे काही अवशेष आजतागायत टिकून होते. गौतम बुद्धाच्या महाकाय प्रचंड मूर्ती सगळ्या संकटांशी टक्कर देत अजूनही शिल्लक होत्या. 'निवीरम् उर्वितलम्' झालेल्या तालिबानला साऱ्या जगाला धुत्काराने आव्हान देण्याची एक चांगली संधी मिळाली. गौतम बुद्धाच्या या मूर्ती मानवजातीच्या सांस्कृतिक ठेव्यांपैकी मौल्यवान वारसा म्हणून युनेस्कोनेही घोषित केलेल्या आहेत. तालिबान लष्कराने त्या मूर्ती फोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला. साऱ्या जगाला सांगितले आणि या आठवड्याच्या सुरुवातीला जगाची पर्वा न करता, या मूर्ती फोडण्याचा आपला कार्यक्रम सुरू केला. शिल्पे इतकी महाप्रचंड की ती काही हातोड्याछिन्यांनी फुटण्याजोगी नाहीत. तेव्हा त्यांच्यावर रणगाडे घालण्यात आले, विमानविरोधी तोफा चालविण्यात आल्या आणि हा सारा प्रकार सारे जग निमूटपणे पाहत राहिले. चडफडले अनेक; पण तालिबानला निर्बंध घातला जावा असे काही करण्याचे धाडस कोणालाच झाले नाही.
 कोणत्याही पुतळ्याची थोडीफार विटंबना झाली तर दंगली माजविणारे नवबौद्ध त्यांच्या आदर्शाच्या मूर्तीची विटंबना स्वस्थचित्ताने पहात राहिले. भारताच्या पंतप्रधानांनी शाब्दिक निषेध व्यक्त करून आपली हतबलता जाहीर करून टाकली. काही कडवे हिंदुत्वनिष्ठ आपापल्या घरांत सुरक्षितपणे बसून 'तालिबान लष्कराला धडा शिकविण्यासाठी यंव करायला पाहिजे, त्यंव करायला पाहिजे' अश्या वल्गना करू लागले, केले कोणी काहीच नाही. बाबराच्या काळच्या मंदिरध्वंसाच्या प्रतिशोधाचा राजकीय कार्यक्रम बनविणारे मूग गिळून गप्प बसले. इस्रायलसारखी अशा प्रकारच्या प्रसंगांना तोंड देण्याचा अनुभव असलेली राष्ट्रे, जपान-कोरियासारखी बौद्ध धर्माचा प्रसार असलेली राष्ट्रे यांना एकत्र करून तालिबान लष्कराला शतकानुशतके याद राहील अशी कार्यवाही करणे काही अशक्य नव्हते; पण तेवढी मुत्सद्देगिरीची कुवत मवाळ भारतीय शासनाकडे
नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
 साऱ्या जगाची ही हताश निष्क्रियता समजण्यासारखी आहे. कोणा माथेफिरूने वासरू मारले म्हणजे शहाण्याने गाय मारावी अशा कार्यक्रमात काही अर्थ नाही. त्यातून जगभर तेढ माजेल आणि आपोआपच तालिबानचा हेतू साध्य होईल असा पोक्त किंवा डरपोक मुत्सद्दीपणाचाही यात विचार असावा. या सर्वांच्या निष्क्रियतेचे आश्चर्य वाटले तरी खेद वाटण्यासारखा नाही. खेद वाटण्यासारखा आहे तो भारतातील स्वत:ला प्रागतिक म्हणविणाऱ्या मुसलमान समाजाच्या नेत्यांच्या उदासीनतेबद्दल. मंदिर-मस्जिद वादात तारस्वराने ओरडा करणारे हे नेते या वेळी काही बोलत नाहीत ही भारतीय मुसलमान समाजाच्या दृष्टीने मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. बनातवाला, शबाना आझमी आदींसारख्या नेत्यांनी निदान घराबाहेर पडून तालिबानच्या मूर्ति-विद्ध्वंसाच्या कार्यक्रमाबद्दल, निषेधाचा नाही तरी, निदान नाराजीचा सूर काढला असता तर कोणत्याही कारणाने कोणत्याही मुसलमानाच्या सभ्यतेबद्दल, राष्ट्रप्रेमाबद्दल आणि सचोटीबद्दल शंका घेण्याचा आपल्याला ईश्वरदत्त अधिकार आहे असा कांगावा करणारे धर्ममार्तंड 'मुसलमान प्रागतिक नेत्यांच्या या चुप्पी साधण्यामुळे तालिबानच्या कृत्याबद्दल या नेत्यांना मनात आनंद होत असल्याचा' आरोप करू लागले तर उत्तर देणे कठीण होईल. शिवाय, भारतातील धर्मांध मुसलमान नेत्यांनी हिंदूमुसलमानांतील तेढ वाढविणारी कुरापतखोर भूमिका घेतली तर त्यांची आणखीनच पंचाईत होईल.
 २००१ मध्येसुद्धा जग काही फार सुधारलेले आहे असे नाही. महंमद गजनीपासून आडदांड माथेफिरू आहेत तसेच राहिले आहेत आणि त्यांच्या पुढे बुळेपणाने शरण जाणारी जनताही तितकीच षंढ राहिली आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

दि.७/३/२००१
■ ■