अन्वयार्थ – २/नमोऽस्तु ते, जयोऽस्तु ते

विकिस्रोत कडून


नमोऽस्तु ते, जयोऽस्तु ते


 २६ जानेवारी २००१ च्या स्वातंत्र्यदिनी देशभरच्या ध्वजवंदनाची तयारी होत असतानाच सौराष्ट्रातील भूकंपाचा धक्का देशभर जाणवला; त्यानंतर गुजराथमधील मृत्यूचे तांडव, अपरिमित हानी, लक्षावधी बेघरांच्या डोळ्यांत पाणी आणणाऱ्या कर्मकथा यांच्याच बातम्या सारख्या येत होत्या. ते सोडून दुसरे काही ऐकावे, पाहावे म्हटले तर काश्मिरातील अतिरेक्यांच्या घातपातांच्या वार्ता. या दीड महिन्यात देशभर रस्त्यांवरचे अपघातदेखील इतके विचित्र आणि भयानक झाले, की त्यांच्या बातम्या आणि छायाचित्रे पाहून विश्वास ठेवणेदेखील कठीण झाले.
 ११ मार्च रोजी, अचानक महाबळेश्वरच्या एखाद्या पॉइंटवरील दाट धुके क्षणार्धात नाहीसे व्हावे आणि सारे जग सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाल्यासारखे स्वच्छ दिसावे तसा एकदम आनंदीआनंदाचा दिवस उगवला. आपल्या धकाधकीच्या आयुष्यात तसे पाहिले तर खेळकुदीला फारसे महत्त्व नाही, वर्तमानपत्रांत किंवा आता टेलिव्हिजनवर खेळांच्या स्पर्धा पाहणे एवढाच काय तो खेळाविषयीचा उह्लास; काय उत्साह असायचा तो क्रिकेटबद्दल; पण तोही क्रिकेट सामन्यांच्या सट्टाबाजीच्या घपल्यामुळे डागाळून गेला. लहान मुलेसुद्धा अलीकडे रस्त्यावर रंगात आलेला चेंडूफळीचा खेळ सोडून, दूरदर्शनवर टेस्ट मॅच पाहायला यायला तयार होत नाहीत.
 आणि ११ मार्च रोजी हे सगळे एकदम बदलले. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाच्या बल्लेबाजांविरुद्ध हरभजन सिंगने तीन चेडूंत तीन बळी घेऊन साऱ्या हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासात पूर्वी कधीही न घडलेली गोष्ट घडविली. कोणी भारतीय असला काही अचाट पराक्रम करू शकतो यावर कोणाचा विश्वासच राहिला नव्हता. हे अद्भूत एकदम घडून गेले. आपणही कोणी आहोत, काही
करू शकतो याची, पुसट का होईना, सुखदशी जाणीव निदान विजिगीषु भारताला झाली. 'आपले लोक म्हणजे सारे फालतू' अशी सुरुवात करून 'आपल्याकडे चांगले काही होऊच शकत नाही' असा निर्वाळा प्रत्येक विषयावर बोलताना देणारा रडतोंड्या भारत थोडा मागे पडला.
 त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत आणखी एका भारतीयाने अक्षरश: जग पादाक्रांत केले. आंध्र प्रदेशच्या २७ वर्षाच्या गोपीचंदाने इंग्लंडमधील बॅडमिंटनच्या स्पर्धेत विजय मिळविला; तोही साधासुधा नाही, पहिल्या डावात मागे हटल्यानंतर निश्चयाने आणि कसोशीने त्याने बाजू सावरली, तडाखेबंद खेळ खेळणाऱ्या चिनी खेळाडूविरुद्ध मोठा कलाकुसरीचा खेळ करीत त्याने विजय मिळविला.
 त्यानंतर लगेचच आणखी एक अद्भूत बातमी कानावर पडली. पाकिस्तानी अडेलतट्टूपणा, तालिबानचा बुद्धमूर्तीचा विद्ध्वंस यांच्याच बातम्या महिनाभर येत होत्या. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अफगाणिस्थानात गेले. तालिबान नेत्यांना मूर्तिभंजनाचा विध्वंसक कार्यक्रम थांबविण्याची त्यांनी विनंती केली. अफगाणी नेत्यांनी ती साफ धुडकावून लावली. अतिरेकी धर्मवाद्यांच्या संकटाची कधी नव्हे इतकी स्पष्ट जाणीव अन्नान यांना झाली असावी. तेथून पाकिस्तानात आल्यावर पाकिस्तानच्या लष्करी नेत्यांतही याच धर्माधतेचे बीज असल्याचे त्यांना जाणवले असावे. काश्मिरातील सार्वमतासंबंधीचा नेहरूंच्या काळात झालेला ठराव उभय पक्षांच्या संमती आणि सहकार्याखेरीज अमलात आणण्याची संयुक्त राष्ट्रसंघात तरतूद नसल्याची घोषणा त्यांनी करून टाकली.
 हरभजन सिंग कोलकत्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दांड्या एकापाठोपाठ एक उडवीत होता त्याच वेळी लोकसभेत एक खासदार हातातील चोपडे उंचावीत सभापतींचे लक्ष वेधून घेत होते. अरुण शौरींचे नाव एक तेजस्वी पत्रकार म्हणून, अभ्यासू लेखक म्हणून आणि आता सरकारी कंपन्यांच्या विसर्जनाचे पुरोहितमंत्री म्हणून सर्वश्रुत आहे. अरुणजींचे पिताजी ग्राहक चळवळीला वाहिलेली 'तुमचे आपले काम (Common Cause)' नावाची संस्था अनेक वर्षे चालवीत आहेत. या क्षेत्रात त्यांनी अनेक लढाया दिल्या आणि जिंकल्या. ग्राहकांना अपेक्षित सेवा न मिळाल्याबद्दल तक्रार गुदरून त्यांनी Air Indiaच्या विमानचालकांनाही दंड करविला होता. दुकानदारांनी धड माल न देणे, फसविणे, कारखानदारांनी भद्दा माल विकणे, बँकेतील कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांना अडविणे ही मोठी मनस्ताप देणारी प्रकरणे आहेत. ती लढविणाऱ्या ज्येष्ठ शौरीजींनी आता एक नवीन आघाडी उघडली आहे. हजारो नागरिक
त्यांच्या संस्थेकडे पत्रे पाठवितात. आमचे आमदार, खासदार आणि राजकीय नेते यांच्याविषयी आपली घृणेची भावना सगळेच बोलून दाखवितात, काही लिहूनही सांगतात. अशा पत्रांचे एक संकलन त्यांनी प्रकाशित केल्यामुळे मोठा धमाका उडाला आहे. याच संकलनाचे चोपडे ते खासदारमहाशय सभापतींच्या पुढे नाचवीत होते.
 एवढ्या शुभदिनी घडलेल्या एवढ्या धमाक्यांतून, कोणी सांगावे, कदाचित् काही परिवर्तनही दिसू लागेल.
 माझ्या मते हरभजन सिंग, गोपीचंद, अन्नान आणि शौरी यांच्या या बातम्यांपेक्षासुद्धा आणखी एक वेगळीच बातमी आपल्या देशाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे.
 जर्मनीतील हरित पक्षाकडे शेतीमंत्रालय गेले. आजपर्यंतच्या जगभरच्या पर्यावरणवाद्यांप्रमाणे त्यांचे जर्मनीतील भाईबंदही 'थोडा शहाणपणा; पण त्यापेक्षा आचरटपणा अधिक' असले कार्यक्रम मांडीत. 'पर्यावरण टिकविण्याचे कार्यक्रम राबविण्याची जवाबदारी सरकारने घेतली पाहिजे' असा त्यांचाही आग्रह होता. पार्यवरणवादी सारे सरकारवादी असतातच, प्रत्यक्ष सत्तेत आले ते फक्त जर्मनीत. सत्ताधारी आघाडीत काही वर्षे 'हरित पक्ष' आहे; पण त्यांच्याकडे कोणी अजून पर्यावरणी कार्यक्रमाशी संबंधित खाती देत नव्हते. आता शेती खाते त्यांच्याकडे आले आहे आणि काही करून दाखविण्याची संधी त्यांना मिळाली आहे.
 युरोप खंडात मोठे वादळ चालू आहे. इंग्लंडमधील गायींच्या खाद्यात मांसाहार मिसळल्याने मज्जाव्यवस्थेवर परिणाम करणारा रोग त्या गायींत पसरला. त्यांचे मांस खाणाऱ्या मनुष्यप्राण्यांतही त्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला. सध्या सगळीकडे लाळ्या आणि खुरकुत्या रोग पसरला आहे. त्यामुळे, बहुतांशी मांसाहारी असलेल्या नागरिकांत एक भीतीची लाट उसळली आहे. माणसाला निर्भेळ अन्न खाण्याचा अधिकार असल्याची जाणीव होऊ लागली आहे आणि त्यांचा रोष एकूणच मांसाहार व कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या अन्नाच्या सर्वच उत्पादनांवर वळला आहे.
 हरित पक्षाच्या शेतीमंत्रालयाने जर्मनी अधिकृतरीत्या 'नैसर्गिक शेती' स्वीकारणार असल्याचे जाहीर करून टाकले. 'नैसर्गिक शेती' ही संकल्पना मुळात हिंदुस्थानातीलच आहे. आजही नैसर्गिक शेतीचा प्रयोग करणारे हजारो लोक आपल्या देशात आहेत. त्यांच्यांतील काहींच्या भोंदूगिरीमुळे सारी नैसर्गिक शेतीची चळवळ हिंदुस्थानात मागे पडली. कोणी शंभर टक्के शुद्ध सोवळ्या
नैसर्गिक खतांचा आणि औषधांचा आग्रह धरतो, कोणी हे निमित्त साधून म्हशीपेक्षा गायीचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करू पाहतो; कोणी आता शेतीची गरजच राहिली नाही, गच्चीवरही मुबलक अन्न पिकू शकते अशा आरोळ्या देतो, तर कोणी त्यापलीकडे उडी मारून चलन आणि बाजारपेठच बंद करण्याची स्वप्ने पाहतो.
 खरे पाहता नैसर्गिक शेती भारताच्या दृष्टीने मोठी लाभदायक ठरू शकते; विशेषतः जागतिकीकरणाच्या संदर्भात. आमची शेती मागास आहे म्हणजे काय? जमिनीचे तुकडे तुकडे झाले आहेत, तिची सुपीकता कमी झाली आहे, इतर देशांच्या तुलनेने आम्ही रासायनिक खते-औषधे कमी वापरतो. देशात अजून हजारो एकर शेतजमीन अशी आहे, की तिला रासायनिक खते किंवा औषधे यांचा स्पर्शही झालेला नाही.
 जगभरच्या बाजारपेठेत आज अशा जमिनीत तयार झालेल्या नैसर्गिक खाद्यान्नांना मोठी मागणी आहे. डांगसारख्या मागास भागात नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली वरी, नागली खरेदी करण्याकरिता परदेशी कंपन्या ठाण मांडायला येत आहेत. यासंबंधी मी पूर्वी लिहिले आहे. या जमिनी आणि त्यांत तयार होणारा शेतीमाल विशुद्ध नैसर्गिक आहे यासंबंधी जगाला मान्य होईल अशी प्रमाणपत्रे देण्याची व्यवस्था झाली तर भारतीय शेतकरी गोपीचंदाचा पराक्रम करू शकतो. एवढे नाही झाले तरी आपल्या जमिनीच्या लहानशा तुकड्यावर स्वावलंबनाने स्वतःच्या पोटापुरते पिकविण्याची शक्यता शेतकऱ्यांच्या हाती आली तर जागतिक बाजारपेठेच्या जिवघेण्या स्पर्धेपासून त्याला काही आडोसा आणि निवारा मिळू शकेल. वेदशास्त्रपुराणोक्त नैसर्गिक शेतीची चळवळ जर्मन पुढाकाराने अद्ययावत् नैसर्गिक शेतीकडे वळली तर जयजयकाराच्या या दिवशीच्या साऱ्या घटनांत जर्मन शेतीमंत्र्यांची घोषणाच सर्वांत अधिक फलदायी आणि ऐतिहासिक ठरू शकते.

दि. १४/३/२००१
■ ■