Jump to content

अन्वयार्थ – २/गुजरात आपत्तीची जबाबदारी कोणावर?

विकिस्रोत कडून


गुजरात आपत्तीची जबाबदारी कोणावर?


 ३० सप्टेंबर १९९३, अनंत चतुर्दशीच्या नंतरचा दिवस होता. मी शेतकरी संघटनेच्या कामाच्या दौऱ्यावर बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे मुक्कामी होतो. पहाटे पहाटे वीज कडकडावी तसा आवाज बराच वेळ येत राहिला. जमीन हादरल्याची काही फारशी जाणीव झाली नाही; पण काहीतरी जगाविपरीत घडले याची जाणीव झाली. आसपास काही अपघात झालेला नाही; तेव्हा, हा दूरवर कोठेतरी झालेल्या भूकंपाचा परिणाम असावा हे जाणवले. बातम्या समजण्यासाठी आकाशवाणीकडे धाव घेतली. संथपणे नेहमीची भक्तिगीते चालू होती. फटफटीत उजाडल्यानंतर पहिल्या बातम्या लागल्या, त्यात लातूर जिल्ह्यातील किल्लारी गावी भूकंपाच्या धक्क्याने तीस हजारांवर माणसे ठार झाली असावीत असा अंदाज वर्तवण्यात आला. दोनतीन तासांनंतर प्रसृत झालेल्या वार्तापत्रात मृतांचा आकडा तीस हजारांच्या वर जाईल अशी भीती व्यक्त करण्यात आली किल्लारी, सास्तूर हा संघटनेच्या आंदोलनाचा महत्त्वाचा टापू. कोणत्याही कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे शक्य नव्हते. लातूर या जिल्ह्याच्या ठिकाणच्या नेत्यांनी संध्याकाळपर्यंत निरोप दिला : सध्या भूकंपग्रस्त भागात ढिगारे उपसून त्यांतून प्रेते बाहेर काढण्याचे काम करण्याचा अनुभव आणि साधनं असलेल्या कार्यकर्त्यांचं प्रयोजन आहे. अन्यथा, हौशानवशांची इतकी भीड उसळली आहे, की पोलिसांना गर्दी आवरणे हेच मोठे काम होऊन बसले आहे. तीन दिवसांनंतर थोरमोठे पुढारी भेट देऊन गेले. तोपर्यंत मृतांचा आकडा एकदम तीस हजारांवरून दहा हजारांवर उतरला होता.
 गेल्या आठवड्यातील गोष्ट. २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन. मी सध्या दिल्लीतील राष्ट्रपती भवनासमोरील राजपथाच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे इंडिया गेटच्या बाजूला राहतो. गेले दोन महिने मानवंदनेच्या कवायतींचा सराव करणाऱ्या
फलटणी आणि त्यांचे बँड यांच्या आवाजाने पहाटे पहाटे जाग येत होती. सगळ्या दिल्लीवर पोलिसांचा, निमलष्करी दलांचा तळ पडला होता. राजपथाच्या दुसऱ्या टोकाकडील कृषिभवनाच्या कार्यालयात जाण्यासाठी निम्म्या दिल्लीला फेरी घालून जावे लागत होते. जानेवारी महिन्यात सरकारी यंत्रणा पूर्णवेळ प्रजासत्ताक दिनाच्या कवायतींच्या कामात मश्गुल असते.
 रात्री आठच्या सुमारास संरक्षण मंत्रालयाकडून विशेष मोटारसायकलस्वार दूत राष्ट्रपतींच्या मानवंदनेची निवेदने घेऊन आला; सोबत, गाडीसाठी पास इ. इ. यंदा काही जुने सहकारी दिल्लीला आले होते; त्यांना मानवंदना पाहण्याची उत्सुकता होती. त्यांची जाण्याची व्यवस्था करून मी घरी राहण्याचे ठरवले. कवायती, क्रिकेट आणि टेनिसचे सामने प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहण्यापेक्षा दूरदर्शनवर अधिक व्यवस्थित पाहता येतात, हा सगळ्यांचा अनुभव आहे. कवायत सुरू होण्याआधी काही मिनिटे दूरदर्शनसमोर जाऊन बसलो. गणतंत्र दिवशी रतिबाने ऐकायची मनोजकुमार देशप्रेम सळसळणाऱ्या गीतांच्या ध्वनिचित्रफिती चालू होत्या. बसल्या बसल्या खालची खुर्ची चांगली सरकल्याचा भास झाला. दोन वर्षांपूर्वीच्या आजारपणापासून काही वेगळे घडले, की पहिला प्रश्न मनात उभा राहतो तो काही नवा झटका येतो आहे काय? तसे काही नाही याची खात्री करून घेतली आणि पुन्हा दुसऱ्यांदा आजूबाजूच्या सगळ्या गोष्टी सेकंदभर हलल्याचा भास झाला. अर्ध्याएक मिनिटाने तिसऱ्यांदा पुन्हा धक्का जाणवला.
 किल्लारी भूकंपाच्या वेळी ३०० कि.मी. अंतरावर प्रदीर्घ कडकडाट जाणवला होता. या वेळी फक्त तीन धक्के जाणवले, आवाज काहीच आला नव्हता. तरीपण काही विपरीत घडले आहे याची मनाला खात्री पटली. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या पाहुण्यांना हाका मारून विचारले, भूकंप जाणवला काय? कोणालाच काही जाणवले नाही. मी उठून कामाला लागलो. मग मित्र घरच्या कार्यालयाच्या खोलीत धावत आले आणि मोठ्या गडबडीने सांगू लागले, 'तुमचे म्हणणे खरे होते; भुजमध्ये भूकंप झाला आहे. शंभरएक माणसे मेल्याची बातमी दूरदर्शनवर सांगत आहेत.'
 आता बातम्या ऐकण्याचे मुख्य साधन आकाशवाणी नाही, दूरदर्शन झाले आहे. दर अर्ध्या तासाने वार्तापत्रे असतात. आकाशवाणीसारखे तासन्तास खोळंबून बसावे लागत नाही. भारताच्या अधिकृत सरकारी दूरदर्शनवर इमाने इतबारे राष्ट्रपतींच्या मानवंदनेचा आणि कवायतींचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषाने दाखवला
जात होता. खासगी वाहिन्यांवर मृतांचा आकडा शंभरहून दोनशेवर पोचला. किल्लारी भागात प्रलय माजला तो मुख्यतः अगदी छोट्या टापूत. गुजरातमधील भूकंप कच्छच्या एका टोकापासून सौराष्ट्र, उत्तर गुजरात, दक्षिण गुजरातपर्यंत थेट महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत हादरवणारा. त्यामळे कोठे कोठे काय झाले हे कळायला काही दिवस गेले. दुसरे दिवशी सकाळपर्यंत अहमदाबाद शहरातील अनेक गगनचुंबी इमारती कोसळल्याच्या बातम्या आल्या. २६ जानेवारीच्या रात्री राजधानीतील नियंत्रण कक्षात मी जाऊन आलो. खात्रीची माहिती कुणालाच नव्हती. माझ्या हाती जो कागद दिला त्यावर मृतांचा आकडा दीडशेच्या आसपास दाखवला होता.
 २८ जानेवारीला पहिल्यांदा आकडा १० हजारांच्या वर जाईल अशी वाक्ये ऐकू येऊ लागली. २९ जानेवारीला मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी मृतांचा आकडा ३० हजारांवर असावा असा अंदाज व्यक्त केला. शोधकार्य जसजसे पुढे जाईल तसतसे मृतांचे प्रत्यक्ष आकडे आणि अंदाज बदलतच राहतील.
 इंटरनेटच्या एका अड्ड्यावर एक वेगळीच चर्चा चालू होती. १९३४ मध्ये बिहारमध्ये भूकंप झाला. तीस हजारांवर माणसे दगावली, सारा देश सुन्न झाला. महात्मा गांधींनी म्हटले, 'हा भूकंप अस्पृश्यतेच्या पापाचे प्रायश्चित्त आहे.' देशापुढे कोणताही राजकीय, आर्थिक, सामाजिक प्रश्न उभा राहिला, की प्रश्न विचारला जातो, 'आज गांधीजी असते तर ते काय म्हणाले असते?' गुजरातमधील भूकंपाचा हाहा:कार महात्माजींचा आत्मा अंतराळातून कोठून पाहत असेल तर 'हे कोण्या पापाचे प्रायश्चित्त आहे', असे म्हणत असेल काय?
 गुजरात हा प्राचीन काळापासून भाविकांचा आणि भक्तीचा प्रदेश आहे. अलीकडच्या काळात तर गुजरात, सौराष्ट्रभर बाबामहाराजांचे पेव फुटले आहे. आठवलेशास्त्रींच्या स्वाध्यायापासून ते दूरदर्शनच्या चॅनेलवर तासन्तास डोळ्यात मोठी आध्यात्मिकता आणून 'नारायणो हरि'चा जप करणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे साधुसंत गुजरातमध्ये माजले आहेत. स्वामी नारायण पंथाने तर साऱ्या राज्यभर आपले वैभवशाली संस्थान पसरवले आहे. शाळा, वसतिगृहे, दवाखाने, इस्पितळे आणि भजन-कीर्तन-प्रवचनांचे कार्यक्रम यांची मोठी गर्दी उसळली आहे. गुजराती राज्यकर्ते नेतेही स्वामींना नमन केल्याखेरीज पुढे चालू शकत नाहीत. या साऱ्या गजबजाटात भक्तिरसाचे काहीच स्थान नाही. रोमन कॅथॉलिक चर्चच्या अधिपती पोपमहाराजांचे एक संस्थान आहे. 'प्रचंड उलाढालींचे व्यवहार तेथे चालतात देवाधर्माचा तेथे काहीच संबंध नाही', असे बिगर कॅथॉलिक ख्रिश्चन म्हणतात.
तशीच स्थिती या धनदांडग्या धर्मसंस्थानांची आहे.
 गांधीजींचा गर्वी गुजरात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सगळ्यांत मोठा पुरस्कर्ता बनला, सरकारी नोकरांना संघात सहभाग घेण्याची अनुमती पाहिजे असा आग्रह धरू लागला, यात या साऱ्या धर्मसत्ताक संस्थानांची मोठी कामगिरी आहे. या साऱ्या प्रकारातील दांभिकता आणि ढोंग उघड आहे, खासगीत गुजराती हे सारे मान्य करतात आणि हजारांच्या संख्येने प्रवचनांना जाऊन बसतात व लाखोंच्या रकमा महाराजांच्या तिजोऱ्यांत नेऊन ओततात. स्वामी नारायण महाराजांना स्त्रीदर्शनाचे वावडे असते. नर्मदा आंदोलनाच्या वेळी एक दुय्यम स्वामी भेटले, प्रमुख नाही. गुजरातमधील संघटनेच्या कार्यकर्त्या इलाबेन माझ्याबरोबर होत्या. त्यांच्या स्त्रीत्वाचा दाह महाराजांना जाणवला असावा. त्यांच्या एका तिय्यम शिष्याने माझ्याजवळ येऊन खांद्याला धरून महाराज आणि इलाबेन यांच्यामध्ये माझा पडदा उभा केला. इतके सारे महाराजांचे कडकडीत वैराग्य आणि ब्रह्मचर्य; पण त्यांचे प्रवचनाचे मंडप भरतात त्यांत निम्म्याहून अधिक उपस्थिती स्त्रीवर्गाचीच असते.
 नर्मदेच्या जनआंदोलनाच्या वेळी, हजारो लोकांच्या राहण्याजेवणाची व्यवस्था करण्याचा प्रश्न उभा राहिला होता. स्वामी नारायण संस्थानने आपणहून मोठी जबाबदारी उचलायचे कबूल केले. नंतर, गुजरात सरकार आंदोलनाविरूद्ध उलटले तसे हे सकाळसंध्याकाळ परमेश्वराशी गप्पाटप्पा मारणारे धर्ममार्तंड आंदोलनापासून दूर झाले. नर्मदा धरणाच्या जनआंदोलनाच्या वेळी गांधींजी धरणाच्या बाजूला उभे राहिले असते की मेधा पाटकरना आपली वारसदार ठरवून विरोधात उभे राहिले असते, याबाबत गांधीवाद्यांचही नक्की मत ठरलेच नाही.
 आजच्या या भूकंपाच्या आपत्तीबाबत अंतराळातील महात्माजींचा आत्मा १९३४च्याच पोटतिडकीने, 'हे सारे गुजरातेत पसरलेल्या धार्मिक दांभिकतेचे प्रायश्चित्त आहे,' असे म्हणत असेल काय? मला तसे वाटत नाही. गांधीजी मोठे व्यावहारिक होते. सेनानीच्या कुशलतेने परिस्थितीनुसार ते आपली भूमिका आणि दिशा बदलीत. १९३४ मध्ये बिहारच्या भूकंपानंतर, गांधीजींच्या अतिरेकी उद्गारांनंतर गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी शांतपणे एका वाक्याचे निवेदन केले, की कोणत्याही भौतिक आपत्तीचे खरेखुरे कारण आसपासच्या भौतिक परिस्थितीतच असते. गांधीजी काय म्हणाले असते हा मुद्दा अलाहिदा; पण गांधीजींचे मान्यवर शिष्य आज गुजरातभर पसरले आहेत. त्यांच्यापैकी कुणीही 'गुजरातेतील भूकंप
कोण्या पापाचे प्रायश्चित्त असल्याचा' सूर काढलेला नाही. विपत्तीच्या भौतिक परिस्थितीची मीमांसा मोठ्या जाणकाराचा आव आणून सारे करत आहेत. गांधी संस्थानाचा तात्त्विक दिवाळखोरपणा भूकंपाच्या धक्क्याने अगदी उघड्यावर पडला आहे.

दि. ३१/१/२००१
■ ■