Jump to content

अन्वयार्थ – २/गाऊ त्यांना आरती

विकिस्रोत कडून


गाऊ त्यांना आरती


 व्यवहाराचा पाश न ठेवता आकाशात उत्तुंग भराऱ्या घेण्याच्या वयात माझे जे ऐतिहासिक आदर्श होते, त्यात श्रीमत् शंकराचार्य यांचे स्थान सर्वोच्च. आयुष्यमान अवघे बत्तीस वर्षांचे. सोळाव्या वर्षी संन्यास. अद्वैत मत म्हणजे नेमके काय याची समज येण्याच्या आधीही, मत काही का असेना, हजारो महापंडितांशी नियम ठरवून वादविवादाला बसायचे आणि वादविवादात ते हरल्याचे त्यांच्याकडून वदवून घ्यायचे हा पराक्रमच मोठा अद्भुत वाटे. 'आपल्या देशात वेगवेगळया विखुरलेल्या प्रदेशात समानता कोणती?' या प्रश्नाचे उत्तर 'श्री शंकराचार्यांचा प्रभाव आणि त्यांची पीठे' हेच होय. वाहतुकीची काहीही साधने नसलेल्या काळात द्वारका, पुरी, बद्रीनाथ, शृंगेरी असे चार दिशांना चार मठ स्थापणाऱ्या श्री शंकराचार्यांबद्दल मनात असीम आदर होता.
 गौतम बुद्धाचा जन्म आपल्या देशातला; त्यांचा धर्म आजही जगात अग्रगण्य मानला जातो; पण, तो सारा चीन, जपान पूर्व आशियायी देशांत. आपल्याकडे आंबेडकरांच्या अनुयायांनी उभा केलेला दलितयान पंथ सोडला तर हीनयान व महायान या बौद्ध धर्मातील दोन महत्त्वाच्या पंथांचा येथे मागमूसही नाही.
 अलीकडे जगन्नाथपुरीला जाऊन आलो. परत येताना अतिविशिष्ट व्यक्तींत फक्त जपानचे भारतातील राजदूत आणि त्यांचा परिवार होता. इंडियन एअर लाईन्सचा नोकरवर्ग अतिअतिविशिष्ट व्यक्तींपलीकडे त्यांचे आदरातिथ्य करीत होते. पुरीच्या बौद्ध स्तूपांभोवती प्रचंड देवळे बांधायचे काम जपानी मदतीने होते आहे. साहजिकच, जपानी राजदूतांना तेथे फार मानले जाते. परदेशात काय मान असेल तो असो, हिंदुस्थानातमात्र बौद्ध धर्म फक्त नावालाच शिल्लक राहिला आहे.
 हे झाले कसे? बौद्धांकडे राजसत्ता होती, धर्मसत्ता होती; जागोजाग हजारोंच्या
संख्येने भिख्खू ध्यानधारणा करीत होते, शहरोशहरी भिक्षापात्र घेऊन फिरत होते. 'बुद्धाला, धर्माला आणि संघाला' शरण गेल्याच्या प्रार्थनांनी सारी आसमंते गजबजून जात होती. त्या साऱ्या रम्य नगऱ्या, ते चक्रवर्ती बौद्ध सम्राट, त्यांची साम्राज्ये, बौद्ध मठ, सगळे अचानक नाहीसे कसे झाले? बौद्धांचा पराभव शस्त्रास्त्रांच्या मदतीने लढाया मारून झाला नाही; कत्तली झाल्या नाहीत, मठांना आगी लावण्यात आल्या नाहीत. तरीही बौद्ध मत संपले; एवढेच नव्हे तर, कोठेही द्वेषभावना शिल्लक न राहता संपले. हा दिग्विजय एका तरुण संन्याशाने केला. हातात दंड, अंगावर संन्याशाची भगवी वस्त्रे, पुढे अद्वैतवादाची प्रतीकात्मक मशाल घेऊन चालणारा शिष्य. आव्हान देणारा कोणी भेटला, की वादविवादाला सुरुवात!
 वादविवादात विषय काय? युक्तिवाद काय? यासंबंधी काही माहिती असण्याचे ते वय नव्हते. मंडन मिश्र या मीमांसक महापंडिताशी झालेल्या वादाच्या वेळी पंच म्हणून मंडन मिश्रांची पत्नीच बसली होती. स्वगृहिणीच पंच असतानाही मंडन मिश्राला पराभव स्वीकारण्याखेरीज गत्यंतर राहिले नाही. हे सारेच मोठे अद्वितीय वाटे. वादविवादांच्या वक्तृत्व स्पर्धा जिंकण्याचा त्या वेळी मौठा कैफ होता. साहजिकच, शंकराचार्य म्हणजे परमोच्च आदर्शबिंदू वाटे. महापंडिता भारतीने एक प्रश्न विचारला. नेमका प्रश्न काय ते आजही कोणी सांगू शकत नाही. स्त्री आणि पुरुष यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीत 'स्वामित्वाने शरणता' एवढा फरक असेल तर सर्वांभूतीचा आत्मा एकच स्वरूपी कसा काय असू शकेल? असे त्या प्रश्नाचे स्वरूप होते, असे कोठेतरी वाचनात नंतर आले. बाईंनी 'शब्दाचे अवडंबर नको, आत्मप्रचीतीने बोला,' असे रोखठोक सांगितले आणि ब्रह्मचारी शंकराचार्यांच्या अनुभूतिसिद्धांतालाच हात घातला. हजारो स्मृतिश्रुतीनी अग्नी थंड आहे, म्हणून सांगितले तरी ते मी मानणार नाही, असे परखडपणे सांगणाऱ्या श्री शंकराचार्यांपुढे धर्मसंकट उभे राहिले. त्यांनी 'परकाया प्रवेश' करून गृहस्थाश्रमाचा अनुभव संपादन केला आणि प्रश्नाचे उत्तर दिले, अशी आख्यायिका आहे. नेमके उत्तर काय दिले हे कोणालाच माहीत नाही. अर्धवट माहितीच्या धुक्याधुक्यातून शंकराचार्य या व्यक्तिमत्त्वाविषयीमात्र प्रचंड आदर आणि काहीशी भक्ती
 'वाक्यार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम् वेदकोटिभिः
 ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परः'
 या गर्जनेची विस्तृत मांडणी करण्यासाठी बत्तीस वर्षांच्या वयात १५३
ग्रंथांचे कर्तृत्व. सारेच काही अद्भूत!
 गेल्या वर्षी नर्मदेच्या आंदोलनाकरीता गुजरातमध्ये होतो. नर्मदा मातेच्या स्तवनाचे काव्य शोधत होतो. एकदम हाती पडले, 'नमामि देवी नर्मदे' कोणाची ही काव्यप्रतिभा? गौडपाद स्वामींच्या परंपरेत अमृतानुभवासाठी श्री शंकराचार्यांचे वास्तव होते. नर्मदा हा त्यांचा मोठा भक्तीचा विषय.
 'दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे
 त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे…'

 ओळीओळीला नर्मदेच्या प्रवाहाच्या ध्वनिलहरींची आठवण यावी ही काव्यशक्ती कोणाची? तर, ती होती अद्वैतवाद आणि उपनिषदांच्या प्रसाराकरिता सर्वसंगपरित्याग केलेल्या एका बालब्रह्मचाऱ्याची.

'ॐ सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके
शरण्ये त्रयम्बके गौरि नारायणि नमोऽस्तु ते..
सृर्ष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनि
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते…

 धबधब्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहणारी, नंतरच्या काळात फक्त संत रामदास आणि स्वातंत्रयवीर सावरकर यांना साधलेली काव्यशक्ती सहाव्या शतकातल्या एका संन्याशाने दाखवली.

 मागील आठवड्यात केरळ राज्यातील एर्नाकुलमजवळील केलाडी गावी जाण्याचा योग आला. केरळात केवळ वेगळी अशी गावे नाहीतच. सगळी गावे जवळजवळ एकमेकांना लागूनच वसलेली. त्यामुळे केलाडी गाव नेमके सुरू कोठे झाले आणि संपले कोठे, सांगणे कठीण आहे. केलाडी हे शंकराचार्यांचे जन्मगाव. वडील लहानपणी मरून गेलेले. विधवा आईने शंकराचार्यांचा सांभाळ केलेला. विद्याभ्यास झाल्यानंतर ऐन सोळाव्या वयात बाळ शंकर संन्यास घ्यायला निघाला. नवसासायासाने झालेल्या एकुलता मुलग्यास संन्यासाची परवानगी विधवा आईने हृदयावर कोणती शिळा ठेवून द्यावी? गावाला खेटून पूर्णा नदी वाहते. आता तिचे नाव पेरीयार ठेवले गेले आहे. म्हातारी आई दररोज नदीपर्यंत कष्टाने चालत जाते हे शंकरला पाहवले नाही. त्याने तळवा (केल) जमिनीवर ठेवून घोटा (अडी) फिरवला आणि र्साया नदीचा प्रवाह गावाशेजारी आणून ठेवला, म्हणून गावाचे नाव केलाडी. त्याच नदीत मायलेकरे पोहायला गेली. कोणी म्हणतात, बाळ शंकराने आईशी 'लडीवाळ छळ' केले, शंकर एकाएकी ओरडू लागला, 'मगरीने पाय पकडला, मला ओढून नेत आहे, आता
मी जगत नाही. आई, मरण्यापूर्वी मला संन्यास घेण्याची परवानगी दे' संन्यास म्हणजे गृहस्थाश्रमातील मरणच. सोळाव्या वर्षी बाळाला मृत्युयोग असल्याचे भविष्यवेत्त्याने सांगितले होते. संन्यास घेतला तर बाळ कदाचित् वाचेल अशा भावनेने आईने अनुमती दिली. शंकराने पटसंन्यास घेतला आणि मगरीने पाय सोडला. बाळ शंकर संन्यासी म्हणून नदीच्या प्रवाहातून बाहेर आला.
 हा मगरीचा घाट लोक आजही दाखवतात. आता त्यात मगरी नाहीत. केलाडीच्या पूर्णेपासून संन्यासी शंकर निघाला, तो थेट मगरींनी भरलेल्या नर्मदा नदीच्या पात्राशेजारी, गौडपादस्वामींच्या शिष्यांच्या आश्रमात. हा एक योगायोगच.
 मगरीच्या घाटाशेजारी आई आर्याम्बा यांचे लहानसे वृंदावन आहे. संन्यास घेतल्यावर श्री शंकराने, 'तुझ्या शेवटच्या घटिकांत मी तुझ्याजवळ असेन', असे आश्वासन दिले. आईचा मृत्यूजवळ आला हे त्यांना कसे कळले असेल शिवशंकरच जाणे! मृत्युसमयी आर्याम्बाच्या शेजारी श्री शंकराचार्य हजर होते, हे खरे! आई गेल्यावर अंत्यविधी तर करायला पाहिजे. गावातील नम्बुद्री ब्राह्मण तर महासनातनी, कर्मठ. त्यांचे म्हणणे, 'संन्याशाने कोणताच गृहस्थ विधी करता कामा नये; अगदी जननीच्या अंत्यविधीचाही नाही.' श्री शंकराचार्यांनी आपल्या बाहूंत आईचे कलेवर घेतले. फक्त दोन ब्राह्मण मदतीला आले. एकाने मस्तक सावरले, दुसऱ्याने पाय. अशी अंत्ययात्रा झाली. दहनाच्या जागी छोटेसे वृंदावन आहे. केलाडी गावात ब्राह्मणांची दोनच कुटुंबे टिकून राहिली, बाकीची सारी वंशनाश होऊन संपली, असे गावच्या सरपंचानेच सांगितले.
 गावात आज रामकृष्ण परमहंसांचा मठ आहे. अद्वैत मत, उपनिषदे आणि योगाभ्यास यांसाठी पाठशाळा आहे. साम्यवाद्यांना शंकराचार्यांचा अतोनात तिरस्कार. त्यांचे राज्य चालू झाल्यापासून मठवासीयांना अनेक त्रास सोसावे लागले. ख्रिस्त धर्मीयांचाही गावात जागोजागी क्रूसाची प्रतिष्ठापना करण्याचा हव्यास चालू आहे.
 शेजारीच कोचिन एर्नाकुलमचा नवा विमानतळ झाला आहे. त्याला शंकराचार्यांचे नाव द्यावे अशी सूचना करण्यात आली. पण, राष्ट्रपती के. आर. नारायणन्, तेही केरळचे सुपुत्र, त्यांनी ती नाकारली. शंकराचार्य आणि विमाने यांचा काय संबंध? असा त्यांनी प्रश्न विचारला, असे सांगतात. मगरघाटाच्या आसपासचा प्रदेश साफ करावा, शंकराचार्यांच्या आयुष्यातील एवढ्या महत्त्वाच्या प्रसंगाचे काही स्मरण होईल, असे एखादे शिल्प उभारले जावे अशी शंकरभक्तांची इच्छा आहे. अयोध्येतील राममंदिराकरिता देश उलटापालटा करू पाहणाऱ्या राज्यकर्त्यांना
अद्वैत मताच्या पताका दिगन्त गाजवणाऱ्या शंकराचार्यांच्या स्मारकाची काही पर्वाच वाटत नसावी.
 यवतमाळच्या रावेरी गावी वनवासी सीता आली. लवकुशांना सीतामाईंनी तिथेच जन्म दिला. प्रसूतिश्रमाने कांत झालेल्या सीतामाईने गावकऱ्यांकडे पसाभर गव्हाची भीक मागितली, नकाराने व्याकूळ झालेल्या सीतामाईने गावकऱ्यांना शाप दिला. ही केरळातील केलाडीच्या कहाणीप्रमाणेच हृदय हेलावून टाकणारी महाराष्ट्रातील घटना.
 श्रीमत् शंकराचार्य संन्यासी, स्वधर्माची पताका दिगंत नेणारे. त्यांच्याही नावे कोठे, ना चिरा, ना पणती आणि अयोद्धेची सम्राज्ञी, ज्याच्या मागोमाग चौदा वर्षे रानोमाळ फिरली त्या पतीने काढून लावल्यावर निराश्रित झालेली भूमिकन्या सीता, तिच्याही आरतीची काही व्यवस्था नाही. विश्वास बसणार नाही इतकी धीरोदात्त भव्य कथानके जेथे घडली, ती स्थाने आजही ओसाडवाणी पडली आहेत आणि भलत्याच कोणा एका देवळाचा अट्टहास चालू आहे. देशातील तरुणांपुढे आदर्श म्हणून नाहीत अशी तक्रार करण्याचा कोणाला काय अधिकार आहे?

दि. २४/१/२००१
■ ■