अनुक्रमणिका पर्व

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

मंगलाचरण[संपादन]

लोमहर्षण नावाचा एक महाविख्यात पुराणिक काही हजारो वर्षांपूर्वी या जगात होऊन गेला. त्याला इतिहास कथनाचे कौशल्य लाभले होते. श्रोते त्याचे इतिहास कथन ऐकताना तल्लीन होऊन जात असत. या लोमहर्षणाला उग्रश्रवा नावाचा एक पुत्र होता. याला सौंती असे देखील म्हणत आपल्या पित्याप्रमाणेच सौंती देखील इतिहास कथन करण्यात निपुण होता. इतिहासाचा तो गाढा अभ्यास क होता. उपनिषद्‌ आदींचे ज्ञान त्याने मुखोद्गत केलेले होते.

एके दिवशी नैमिषारण्यामधे शौनक नावाच्या कुलपतिंनी बारा वर्षांचे धार्मिक सत्र सुरू केले होते. जप, यज्ञ-याग करण्याकरिता तेथे मोठे मोठे तपस्वी, महर्षी, ऋषी आलेले होते. अशा महान लोकांची ब्रह्मज्ञानावर चर्चा सुरू असताना, सौंती त्या स्थळी गेला. आपल्या इतिहास कथानाने जमलेल्या या महान तपस्वींचे मनोरंजन करावे या इच्छेने तो तेथे गेला होता. सौंतीच्या इतिहास कथानाची किर्ती सर्वदूर पसरलेलीच होती. त्याचे मुखातून इतिहास ऐकणे किती रोमहर्षक असते, हे येथील तपस्वी ॠषींनादेखील ठाऊक होते. त्यामुळे सर्वच ऋषीगणांनी त्याचे यथोचित स्वागत करून, कुठून आला्त इ. विचारपूस करून त्याला इतिहास कथनासाठी आवाहन केले. त्यावेळेस सौंतीने ऋषीमुनिंना संबोधून पुढील प्रमाणे निवेदन केले.

"हे श्रेष्ठ, ऋषी, मुनीजनहो मी परिक्षित राजाचा पुत्र जनमेजय याच्या सर्पसत्रास उपस्थित राहाण्यासाठी मी गेलो होतो. या सत्रामधे ऋषी वैशंपायन यांनी राजा जनमेजय यास महर्षी व्यासांनी रचलेल्या महाभारत या ग्रंथातील अनेक सुंदर व सुरस कथा सांगितल्या. त्या मी देखील व्यवस्थित ऐकल्या. त्यानंतर मी या कथा जेथे प्रत्यक्ष घडल्या, त्या समंतपंचक देशी जाऊन आलो. जेथे कौरव-पांडवांचे महाभारत युद्ध झाले, ते स्थळ प्रत्यक्ष पाहून आलो. आता तेथूनच मी येथे आपल्या आशिर्वादासाठी आलो आहे.

आपण तपस्वींनी कठोर व खडतर तपश्चर्या करून जे ज्ञान व पुण्य मिळविले आहे, त्यामुळे आपले तेज एखाद्या अग्नि व सूर्याप्रमाणे मला भासत आहे. या धरेवर प्रत्यक्ष परब्रह्मच पाहिल्याचा मला साक्षात्कार होत आहे. आता या क्षणी आपण आपली नित्यकर्मे व जपजाप्य आणि होमहवन करून निवांत बसला आहांत. तर कृपया मला सांगा की पौराणिक कथा, बोधपर कथा, थोर महत्म्यांचे चरित्र किंवा सम्राटांचे चरित्र यांपैकी कोणत्या प्रकारची कथाआपल्याला ऐकावयास आवडेल?"

यावर ते थोर ज्ञानी ऋषी व मुनीजन त्याला म्हणाले, "हे सौंते, यात विचारायचं काय? महाभारतासारखं पौराणिक, गूढ तरीही सुरस, चमत्कारिक, अनेक सम्राटांच्या चरित्रांचा कथांनी व बोधपूर्ण कथांनी युक्त असं महाकाव्य महान ॠषी कृष्णद्वैपायन व्यासांनी रचलं. यातील प्रत्येक कथेमधे गहन अर्थ दडलेला आहे व प्रत्येक कथा मनुष्याचे आचरण कसे असावे, याचे मार्गदर्शन करणारी आहे. या महाकाव्याची जितकी चर्चा केली जाते, तितकीच त्यास अपूर्व शोभा प्राप्त होते. असा तो अनुपम इतिहास जनमेजय राजाच्या सर्पसत्रात महर्षी व्यासांच्या आदेशावरून ऋषी वैशंपायन यांनी मोठ्या आनंदाने सांगितला, ज्याचे श्रवण केले असता आत्मशुद्धीचा अनुभव होतो, ज्या ग्रंथातील विचारपद्धतीचा अवलंब आपल्या दैनंदिन जीवनात आदर्श जीवनपद्धती म्हणून केला जाऊ शकतो, ज्या इतिहासाच्या श्रवणाने आपला अहंकार व पापवासना नष्ट होते, असा तो भरतवंशाचा श्रेष्ठ इतिहास सांगणारं महाभारत हेच श्रेष्ठ काव्य आम्हाला कथारूपात आपल्याकडून ऐकावयास मिळावं, अशी आमची इच्छाआहे."

सौंतिकृत मंगलाचरण[संपादन]

मुनीजनांच्या या निवेदनावर सौंती म्हणाला, "या चराचर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय ज्याच्यावर अवलंबून आहे, आपल्यासारखे अनेक ज्ञानी मुनीगण समस्त जगताचे योगक्षेम सुरळीत चालावे म्हणुन जपतप व यज्ञयाग करून ज्याची आराधना करता, जो अनादी, अनंत आहे, समस्त सृष्टी नश्वर आहे हे दाखवून देण्यास जो मदत करतो, इतकंच नव्हे तर जो भक्ताच्या कल्याणाकरिता निरनिराळी रूपे धारण करतो, युगे युगे अवतार घेतो, ज्याच्या ठायी दोष हे नाहीतच व जो सर्वांसाठी मंगलदायक असा आहे, जो मनुष्याच्या इंद्रियादिकांचा नियंता आहे व या सृष्टीचा जो अधिपति अशा त्या जगद्‌व्यापक परमेश्वरास मी वंदन करतो आणि अद्वितीय कार्ये सहज साध्य करणार्‍या व समस्त जनांमधे वंदनीय ठरलेल्या महर्षी व्यासांनी कथन केलेला जो दिव्य महाग्रंथ महाभारत, तोच आपल्याला कथारूपात कथितो.

महाभारताचे महत्त्व[संपादन]

ऋषीजनहो, या ऐतिहासिक महाकाव्याचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. अनेक कथाकथनकारांनी, कविंनी हा इतिहास पूर्वी कथिला आहे, आजही ते सांगत आहे व पुढेही या इतिहासाचे कथन होतच राहील. कोणत्याही प्रकारची जीवनशैली अंगिकारणार्‍या व्यक्तीस हा ग्रंथ आदर्श आहे. या ग्रंथातील गूढ व गहन अर्थ योग्य प्रकारे लक्षात यावा म्हणून अनेक लोक या ग्रंथाचे पारायण करितात. अलंकारीक शब्दरचना, मोहक वृत्ते व जनमानसात उपयोगी पडावी अशी आचारपद्धती या सर्वांनी युक्त असलेल्या या ग्रंथाचे मनन व श्रवण करून मोठेमोठे रसिक व विद्वान पुरूषही माना डोलवतात.

जगताची उत्पत्ती[संपादन]

हे महान तपस्वीहो, या सृष्टीचे सर्व व्यापार मायेनुसार चालतात, हे तर आपणांस ठाऊकच आहे. या मायेला हे जे लोकोत्तर सामर्थ्य प्राप्त झाले, ज्या योगे सृष्टीतील सर्व घडामोडी चालतात, त्या घडामोडींचा विचार केला म्हणजे या मायेबद्दल आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. पण त्याहूनही आश्चर्य तेव्हा वाटते, जेव्हा हे कळते की ही मायादेखील सर्वस्वी परतंत्र आहे. मायेचा वाटणारा हा अलौकीक पराक्रम हा सर्वस्वी परमेश्वराचा आहे. माया ही केवळ त्याच्या हातातील काष्ठपुतळीच होय. परमेश्वराने दिलेल्या शक्तीमुळेच मायेला हे जग उत्पन्न करता येते. या दृश्यमान जगताचा उदय होण्यापूर्वी प्रलयकाली ही माया परब्रह्म रूपांत लीन होऊन बसली होती. त्यावेळेस द्रष्टा, दृश्य, ज्ञानी व ज्ञान इत्यादी विकारे मायेच्या अभावामुळे नष्ट झाले होते. सर्वत्र अशी स्थिती असताना परमेश्चराचे मनात जग उत्पत्तीचा विचार आला आणि सर्व त्रैलोक्यास धारण करू शकेल, असे एक मोठे अंडे उत्पन्न झाले. सृष्टीचे अविनाशी बीजच म्हणावे असे ते अंडे, जगताच्या स्थावर जंगम अशा सर्व वस्तूंस उत्पन्न करू शकत होते. या अंड्यात अद्भुत, अव्यक्त, सूक्ष्म, सत्य व ज्ञानमय अशा परमात्म्याने प्रवेश केला असे श्रुती सांगतात.

याच दिव्य अंड्यातून पुढे हिरण्यगर्भसंज्ञव प्रजापति उत्पन्न झाले, जे या सर्व त्रिभूवनाचे मूळ अधिपति व पितामह आहेत. ब्रह्मदेव, विष्णु व महेश ह्या त्या हिरण्यगर्भाच्या राजस, सात्विक व तामस अशा विभूती आहेत. ब्रह्मदेवासून मनु, क, प्रमेष्ठी, प्राचेतस, दक्ष, क्रोध, तम, दम विक्रित, अंगिरा, कर्दम व अश्व हे सात दक्षपुत्र आणि मरिच्यादीक सप्तर्षी व चतुर्दश मनु असे एकवीस प्रजापति हे सर्व उत्पन्न झाले. भगवान विष्णूंचे ठायी मत्स्य, कूर्म, वराह इत्यादी अवतारांसाठी कारण ठरणार्‍या पुरूष नामक विभूतीचा मूळ उद्गम आहे. विश्वदेव, आदित्य, वसु व अश्विनीकुमार हे भगवान विष्णूंचेच अंश आहेत, तर यक्ष, साध्य, पिशाच, गुहक व पितर हे सर्व भगवान महेश्वरांपासून उप्तन्न झाले. तसेच महान ज्ञानी व ब्रह्मवेत्त्या विभूती, धैर्य व शौर्याची परिसीमा दाखविणारे महान राजे, पंचमहाभूते (पृथ्वी, आप, तेज, वायू व आकाश), चंद्र, सूर्य, संवत्सर, महिने, पंधरवडे व अहोरात्र हे सर्व त्या भगवान महेश्वरांपासून म्हणजे शंकरांपासूनच निर्माण झाले. याव्यतिरिक्त या जगतात जे काही दिसतं, ऐकू येतं व आपल्याला माहित आहे, ते सर्व त्या मोठ्या अंड्याच्या तीन विभूतींपैकी कोणत्या तरी एका विभूतीपासून निर्माण झाले आहे, असे समजावे.

जगताचा उपसंहार[संपादन]

निर्धारित वेळेचा कालखंड (कल्पकाल) सुरू होताना अशा प्रकारे परमात्म्यापासून जगताची उत्पत्ती होते व हा कालखंड संपला की जगताचा उपसंहार देखील परमात्यामधेच होतो. ज्या प्रमाणे निरनिराळ्या ऋतूंमधे त्या, त्या ऋतूशी संबंधित चिन्हे, जसे फळे फुले आपल्याला दिसून येतात, त्याचप्राणे प्रत्येक कालखंडाची उत्पत्ती झाली की त्या कालखंडाशी संबंधित निरनिराळ्या गोष्टी प्रकट होऊ लागतात व तो कालखंड संपला की या गोष्टी अदृश्यही होतात. त्यांचा संपूर्ण नाश कधीच होत नाही. हे महान तपस्वी मुनीजनहो, या कालखंडाच्या उत्पत्ती व प्रलयाला कारण म्हणजे मायेची अद्वितीय अशी शक्ति. मात्र परमेश्वराचे ध्यान केले, त्याला संपूर्ण समजून घेतले की माया ही परमेश्वराधीन आहे, याची कल्पना येते. हे जग नश्वर असल्याचा साक्षात्कार होतो. मग मात्र आपला जीव संपूर्ण पणे परमेश्वरात विलीन होऊन निरंतर सुखाचा उपभोग घेऊ शकतो. मात्र जोपर्यंत मायेला समजून घेण्याचे ज्ञान मनुष्यास प्राप्त होत नाही, तोपर्यंत दुष्ट विरूद्ध सुष्ट असे निरंतर युद्ध सुरू राहील ठेवणारे कालचक्र या ब्रह्मांडात सतत फिरतच राहील.

देवसृष्टी[संपादन]

ज्या अंड्यामधे ज्ञानी परमात्म्याने प्रवेश केला होता, त्याच अंड्यातील चैतन्यापासून पुढे चेतनसृष्टिचा उदय झाला. या सृष्टीमधे देवादिकांचा समावेश होता.

आठ वसु, अकरा रूद्र, बारा आदिय, एक इंद्र व एक प्रजापति असे मुख्य देव तेहेतीस आहेत. देवांच्या या मुख्य वर्गांपासूनच पुढे तेहेतीसशे आणि त्यानंतर तेहेतीस हजार देव झाले. देवसृष्टीचे हे एक संक्षिप्त लक्षणच म्हटले पाहिजे. या देवांच्या विभूति अगणिक आहेत. बारा आदित्य - दिव:पुत्र, बृहद्भानु, चक्षु, आत्मा, विभावसु, सविता, ऋचिक, अर्क, भानु, आशावह, रवि आणि सह्य हे भगवत्तेजापासूनच निर्माण झाले. या बारा आदित्यांमधे सह्य आदित्य सर्वश्रेष्ठ मानला जातो. या सह्य आदित्यास जो पुत्र झाला त्याचे नाव देवभ्राट असे होते. त्याच्यापासून पुढे सुभ्राटांचे जन्म झाले. सुभ्राटांच्या पुत्रांची नावे दशज्योती, शतज्योती व सहस्त्रज्योती अशी होती. दशज्योती हा अग्निस्वरूप होता. धूम्रा, अर्चि, उष्मा, ज्वलिनी, ज्वालिनी, विस्फुलिंगीनी, सुश्री, सुरूपा, कपिला व हव्यकव्यवहा या दशज्योतीच्या दहा ज्योती होत्या. या ज्योतींना कला असेदेखील म्हणतात. शतज्योती म्हणजे साक्षात्‌ चंद्रस्वरूप. या देवतेचे निवासस्थान हृदय आहे. हृदयाच्या शंभर नाडीका उदा. मूर्धन्या, सौरी इ. ह्याच शतज्योतीच्या शंभर ज्योती किंवा कला होत. सहस्त्रज्योती म्हणजे सहस्त्र किरणांनी प्रकाशमान होणारा भगवान सूर्यच होय. दशज्योतीला दहा सहस्त्र पुत्र झाले, शतज्योतीला एक लक्ष पुत्र झाले तर सहस्त्रज्योतीपासून दहा लक्षपुत्र जन्मले. अशा प्रकारे या महाज्ञानी ज्योतींना विपुल संतति झाली.

हे ऋषीजनहो, या सूर्य, अग्नि व चंद्र देवतांपासूनच ब्राह्मणवंश, कुरू, यदु, भरत, ययाति व इक्ष्वाकु यांचे वंश, इतर सर्व राजवंश, हे सर्व निर्माण झाले आहेत. धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ, या पुरूषार्थांचे महत्व सांगणारी शास्त्रे, गांधर्ववेद, आयुर्वेद, धनुर्वेद, ज्ञानमार्ग, कर्ममार्ग व उपासनामार्ग, तसेच ब्राह्मणांची वसतिस्थाने, तीर्थक्षेत्रे, राजवाडे, अन्यवर्गीयांच्या कर्मभूमी, व्यवसायभूमी अशी ब्रह्मांडात ओतप्रोत भरून राहिलेली भूतसृष्टीदेखील या देवसृष्टीपासूनच निर्माण झाली.

भारताचा विषय व अभ्यास[संपादन]

या अपूर्व ग्रंथामधे देवसृष्टी, भूतसृष्टी, चार पुरूषार्थ, त्यांचे प्रतिपादन करणार्‍या श्रुतिस्मृति, शास्त्रे इत्यादी अनेक विषयांचे सविस्तर स्पष्टीकरण केलेले आहे. भगवान बादरायण यांना योगबलाच्या साहाय्याने हा उपक्रम व उपसंहार ज्ञात झाला. सर्व इतिहास व सर्व श्रुति त्यांना कठोर समाधीमुळे ज्ञात झाल्या. या सर्वांचा संग्रह या ग्रंथामधे तात्पर्यरूपात केला गेला आहे. हे महाकाव्य महर्षी व्यासांनी संक्षिप्त व विस्तृत अशा दोन्ही स्वरूपात व्यवस्थित समजावून सांगितले आहे. कोणतेही साहित्य थोडक्यात व विस्तृत अशा दोन्ही स्वरूपांत सांगितले म्हणजे ते साहित्य अनेक लोकांपर्यंत पोहोचते व चिरकाल टिकते. यामुळे विद्वानांना या दोन्ही प्रकारे साहित्य जतन करावयास आवडते.

हे तपस्वीजनहो, या महाभारत ग्रंथाचा आरंभ नेमका कुठून होतो, याबद्दल बरेच प्रवाद आहेत, मतमतांतरे आहेत. कित्येक जण असे म्हणतात की "ॐ नमो भगवते वासुदेवाय" या महामंत्रापासूनच महाभारताचा आरंभ समजावा. तर काहींचे म्हणणे असे पडते की आस्तिकाच्या जीवन चारित्र्यापासूनच महाभारताची सुरूवात होते. तर काही म्हणतात की उपरिचर वसुंच्या आख्यानापासूनच महाभारताला सुरूवात झाली असे म्हणावे. हे महाकाव्य इतके अलौकीक व श्रेष्ठ आहे की याची सुरूवात कोठूनही केली तरी याचे वाचन व मनन अंत:करणापासूनच होते. प्रत्येकजण यातील काव्याचे निरनिराळे अर्थ काढतो. काहीजण हा ग्रंथ जसा आहे तसा कथन करतात तर काहीजण वर्षांनुवर्षे या ग्रंथाचे अध्ययन करीत आहेत.

व्यासांना ब्रह्मदेवाचे दर्शन[संपादन]

कठोत तपसाधना व कडकडीत ब्रह्मचर्य यांच्या साहाय्याने महर्षी व्यासांनी समाधीयोग सिद्ध केला व त्यानंतर सनातन वेदाचे चार भाग केले. या चार भागांतील वेदांमधे असलेल्या तत्वांचे अर्थ लावण्याकरता त्यांनी या सुरस अशा महाकाव्याची रचना केली. पण केवळ महाकाव्याची रचना करून भागणार नव्हते तर या काव्याचे, त्यामधील संदेशांचे पठण, श्रवण व मनन जर प्रत्येक व्यक्तीकडून होणार असेल, तर त्या काव्यरचनेला साफल्य येईल हे त्यांना माहित होते. त्यामुळे अनेक परिश्रमांनी घडलेले हे महाकाव्य सर्व मनुष्यजातीपर्यंत कसे पोहोचवता येईल, याची चिंता ते इतर ज्ञानी तपस्वींसोबत करत असतानाच सर्व जगाचे पिता साक्षात्‌ ब्रह्मदेव तेथे प्रकट झाले.

भारताचे स्वरूप व व्यासांची चिंता[संपादन]

जगत्‌पिता ब्रह्मदेवांना पाहून तेथे उपस्थित असलेल्या इतर अनेक ऋषीगणांची त्यांच्या स्वागतासाठी एकच लगबग उडाली. महर्षी व्यास व इतर तपस्वींनी ब्रह्मदेवांचे यथोचित स्वागत करून झाल्यावर महर्षी व्यासांनी आपला मनोदय ब्रह्मदेवांना सांगण्यास सुरूवात केली. "हे भगवन्‌, मनुष्यजातीला पावला पावला वर उपयोगी पडेल अशा प्रकारचे महाभारत नावाचे महाकाव्य मी रचले आहे. या ग्रंथामधे देव देवतांचे महत्व, मनुष्याचे नित्याचरण कसे असावे, धर्माचरण कसे असावे इ. विषयांना अनुसरून प्रसंग लिहिले आहेत. मात्र या ग्रंथामधील प्रत्येक श्लोकाचे मनुष्यास आकलन व्हावे म्हणून त्याचा योग्य व स्पष्ट अर्थदेखील समजून सांगता यावयास हवा. हे काम मला एकट्याने करणे अश्यक्य आहे. या कार्यासाठी मला चतुर असा कोण लेखक म्हणून लाभू शकेल, याचीच चिंता मी करत आहे."

व्यासचिंता परिहार[संपादन]

महर्षी व्यासांच्या या निवेदनावर ब्रह्मदेवांनी उत्तर दिले, "हे व्यासमुनी, अध्यात्मशास्त्रांतील तुमची पारंगतता वादातीत आहे. या पृथ्वीवर अनेक तपस्वी व महर्षी आहेत परंतु आपल्याइतके सखोल ज्ञान अद्यापि कुणासही नाही. याकरतांच ब्रह्मवेत्त्या महर्षींमधे आपला अग्रक्रम लागतो. आपल्या वाणीतून बाहेर पडणारे बोल हे सत्य व वेद यांना धरूनच म्हटलेले असतात. त्यामुळे आपण रचलेल्या या महाकाव्यातील श्लोकांचे योग्य विवेचन करणारा चतुर असा लेखक म्हणून ज्याचे नाव महादेवाच्याही आधी घेतले जाते असे ते भगवान गणेशच केवळ योग्य आहेत. तरी तुम्ही भगवान गणेशांना या कार्यासाठी आवाहन करा." एवढे बोलून ब्रह्मदेव अंतर्धान पावले.

व्यास-गणपति संवाद[संपादन]

यानंतर महर्षी व्यासांनी भगवान गणेशांना प्रसन्न करण्याकरीता प्रार्थना केली. त्यांच्या प्रार्थनेला उत्तर म्हणून भगवान गणेश तेथे प्रकट झाले. त्यांचे यथाशक्ति स्वागत करून महर्षी व्यासांनी त्यांना आपल्या महाकाव्यासाठी लेखक बनण्याची विनंती केली. यावर भगवान गणेशांनी उत्तर दिले, "हे महर्षी व्यास, आपले म्हणणे मी मान्य करतो परंतु माझी एक अट आहे. मी लेखन करत असताना माझी लेखणी एक क्षणभरही थांबणार नाही. हे जर आपल्याला मान्य असेल तर आपल्या महाकाव्यासाठी लेखक होण्यात मला काहीच हरकत नाही." व्यासांनी भगवान गणेशाला उत्तर दिले, "हे हेरंब, आपली अट मला मान्य आहे. मात्र मी जो श्लोक आपणांस लिहावयास देईन, तो लिहिताना त्याचा अर्थ मनात आणून लिहित जा म्हणजे मला काहीच हरकत नाही." गणराजांनी यास मान्यता दिल्यानंतर त्यांनी लेखणी हातात घेतली व महाभारत लेखनाचे कार्य सुरू केले.

कूटश्लोक[संपादन]

हे ऋषीहो, अशा प्रकारे महाभारत लेखनाचे काम सुरू झाले. या ग्रंथामधे अनेक ठिकाणी व्यासांनी अनेक गूढ श्लोक लिहून ठेवले आहे. अद्यापही त्यांचा अर्थ उलकणे कठीण झाले आहे. स्वत: व्यासांनी असे प्रतिपादन केले आहे की या ग्रंथामधील अठ्ठ्यायशींशे श्लोक एकतर त्यांना किंवा शुकमुनींना व्यवस्थित कळले आहेत. संजय हा महाज्ञानी होता पण त्यालादेखील संपूर्ण श्लोक व्यवस्थित कळल्याबद्दल शंका आहे. महाभारतील सर्व श्लोक हे त्यात वापरलेल्या शब्दांमुळे व कठीण शब्दांमधील अर्थांमुळे कूट असल्यासारखे वाटतात. त्यामुळे सर्वज्ञानी गणेश देखील या कूटश्लोकांचा अर्थ व्यवस्थित समजून घेण्याकरता काही काळ मनन करीत व नंतर लेखन करत. श्रीगणेश मनन करत असतानाच महर्षी व्यास दुसरे अनेक श्लोक रचून तयार ठेवीत. त्यामुळे कथन व लेखन या दोन्हीचा ओघ व्यवस्थित एकसारखा राहिला व श्रीगणेशांनी घातलेली अटही पूर्ण झाली.

भारतकथेचा आरंभ[संपादन]

भारताची संख्या व व्याख्याने. कौरवपांडवांचे वंश व त्यांवर वृक्षांचे रूपक[संपादन]

पांडवांचे जन्मचरित्र[संपादन]

पांडवांचे पराक्रम[संपादन]

धृतराष्ट्र संजय संवाद[संपादन]

धृतराष्ट्राचे सांत्वन[संपादन]

महाभारत ग्रंथाची अपूर्वता[संपादन]

अनुक्रमणिका पर्वाची फलश्रुती[संपादन]