अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापन चमचेगिरी'चे

विकिस्रोत कडून
रंं सांगायचं तर साहेब, आमच्या संस्थेत चमच्यांचंं राज्य आहे. बॉस लोकांची खुशमस्करी करा, त्यांना आमच्या चहाड्या सांगा आणि प्रमोशन मिळवा असा कारभार चाललाय. मी इतकी वर्षे संस्थेसाठी अक्षरश: घाम गाळतोय, पण कुणी विचारत नाही. कारण आम्ही पडलो स्वाभिमानी! आम्हाला वरिष्ठांसमोर लाळघोटेपण जमत नाही. या उलट तो... बघाना. लेकाच्याला एक काम धड जमत नाही.पण बॉसचा चेला आहे... उपटतोय फायदे! हे असंच चालायचं. करणार तरी काय?"

 एका नामवंत कंपनीतील एक बर्यापैकी उच्च पदावर असणारा व्यवस्थापक माझ्याशी गप्पा मारताना आपली 'व्यथा' सांगत होता. माझा दरवर्षी व्यवस्थापक प्रशिक्षण कार्यशाळांच्या निमित्ताने पन्नास एक नव्या संस्थांशी संबंध येत असतो.

कार्यशाळेला हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांंबरोबर त्यांच्या संस्थेविषयी व कामांविषयी बोलून त्यांना बोलतं करणं हा माझ्या प्रशिक्षण पध्दतीचा एक भाग आहे. एकदा का कर्मचाऱ्यांंची भीड चेपली की ते त्यांच्या तक्रारी मांडतात. चमचेगिरी ही आमच्या संस्थेतील सर्वात मोठी समस्या आहे असं जवळजवळ प्रत्येकाचंं मत असतंं. वर दिलेल्या संवादातही हीच भावना प्रकट झाली आहे.
 माझ्याशी बोलणाऱ्या कर्मचाऱ्याची थोडी माहिती मला होती. चमचेगिरीबाबतची त्याची
तक्रार ऐकून मी त्याला हळूच विचारलं.
 “का हो, तुम्हाला तीन वर्षांपूर्वी प्रमोशन मिळालं असं ऐकतो. ते कसं मिळालं बुवा.?”
 “त्यावेळी चमचेगिरी नव्हती. गेल्या अडीच दोन वर्षातच हा प्रकार वाढलाय.वैताग आलाय नुसता,” तो उत्तरला.
 मी विषय बदलला.
 आपल्या सहकाऱ्यांंच्या चहाड्या आणि त्यांच्याबाबतची माहिती गुप्तपणे वरिष्ठांपर्यंत पोहोचविणंं यालाच सर्वसाधारणत: चमचेगिरी म्हणतात. ही एक प्रकारची हेरगिरीच असते. या प्रकारापासून जगातील कोणतीही संस्था अलिप्त नाही. त्यामुळेच त्याचा व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून गंभीरपणे विचार करणंं भाग पडतं.
 वास्तविक (स्वतःविरुध्दची) ‘चमचेगिरी’ कुणालाच आवडत नाही. ती एक अनैतिक गोष्ट मानली जाते.‘चमचा’आपल्या सहकाऱ्यांंच्या हेटाळणीचा विषय बनतो.ते त्याचा तिरस्कार करतात. त्याच्यावर जळफळतात.अपशब्द वापरतात.पण हे सर्व त्याच्या अपरोक्ष.कारण समोरासमोर चमच्याला जाब विचारला तर बॉस दुखावेल ही भीती असतेच. मग इतकी अप्रिय असणारी ही चमचेगिरी केली का जाते आणि चालूू को दिली जाते या प्रश्नांची उत्तरे संस्थेच्या कार्यपध्दतीत दडलेली असतात.
 चमचेगिरी म्हणजे काय, चमचा कोण असतो, चमचेगिरीचा संस्थेच्या दृष्टीने फायदा असतो का, चमचेगिरी चालूू द्यायची की नाही आणि दिलीच तर कोणत्या थरापर्यंत आणि कोणत्या बाबतीत. या प्रश्नांचा विचार व्यवस्थापनाला करावाच लागतो.एका परीने ‘चमचेगिरी'चं व्यवस्थापन कसंं करावं याचंं धोरण ठरवावं लागतं.
 ‘चमचा’ या शब्दाचा उगमही मजेशीर आहे. रोजच्या व्यवहारात चमचानामक वस्तूचा उपयोग पदार्थ तोंडात भरविण्यासाठी होतो. त्याचप्रमाणे वरिष्ठांना माहिती ‘भरविणारा’ तो चमचा अशा अर्थाने हा शब्द रूढ झाला आहे.
 चमचेगिरीचे दोन पैलू असतात.एक माहिती पुरविणे व दोन,खुशमस्करी करणं, आणि दोन्ही पैलूंंच्या सकारात्मक व नकारात्मक अशा दोन बाजू असतात.वानगीदाखल एक उदाहरण बघू.
 सुशिक्षित गृहिणींना पुस्तकावरून खाण्याचे पदार्थ बनविण्याचा छंद असतो.पण कित्येक पुस्तकांत दिलेल्या माहितीबरहुकूम पदार्थ बनवला तरी तो अपेक्षेइतका चांगला होत नाही.कारण पुस्तकातील माहिती अचूक असली तरी ढोबळ असते. दोन चमचे तिखट घाला अशी सूचना असली तरी तिखटातही कमी तिखट व जास्त तिखट असे प्रकार असतात. सपक मिरचीचे तिखट असेल तर तीन चमचे घालावे लागेल,प्रसिद्ध ब्याडगी मिरचीचे असेल तर दीड चमचा पुरेल आणि जगात सर्वात तिखट समजल्या जाणाऱ्या आसामी मिरचीचे असेल तर अर्धा चमचाही जास्त होईल.पण इतकी सविस्तर माहिती पुस्तकात नसते, त्यामुळे अनेेकदा अंंदाज चुकतो.
 घरातील डबल ग्रॅॅज्युुएट सुनेने स्वयंंपाकाची आधुनिक सूत्रे वापरून पुस्तकाबरहुकूम केलेली पुरणपोळी ‘फिकी' पडते. मात्र तिच्या निरक्षर सासूने चुलीवर केलेली पुरणपोळा अशी फक्कड होते की, पंगत रंगतदार झालीच पाहिजे.
 असं का होतं, तर कोणताही पदार्थ करताना, केवळ थिअरी’ माहीत असून उपयोग होत नाही. तर कित्येक बाबीची ‘ऑफ द रेकॉर्ड’ माहिती आणि ‘प्रॅॅक्टिकल नॉलेज’ असावं लागतं. ते पुस्तकातून मिळत नाही. ही ऑफ द रेकॉर्ड माहिती जितका जास्त व अचूक तितका स्वयंंपाक चांगला असं सूत्र असतं. ती मिळविण्याचे दोनच मार्ग असतात. एक अनुभवांतून शहाणे होणंं व दोन, अनुभवी व्यक्तींकडून माहिती मिळविणं,यापैकी पहिला मार्ग वेळखाऊ व कष्टसाध्य आहे.मात्र माहिती देणारी व्यक्ती विश्वासार्ह असेल तर दुसरा मार्ग सोपा व जलद आहे.
 वरील उदाहरण ‘चमचेगिरी’ या कल्पनेलाही बऱ्याच प्रमाणात लागू पडते. (‘चमचा ' हा स्वयंपाक आणि संस्था यांच्यातील ‘कॉमन फॅक्टर' आहे.)
 संस्था चांगली चालविणं हे पाकसिध्दी चांगली करण्यासारखीच आहे.या‘स्वयंपाकाची साधनं कोणती, तर मुख्यत: संस्थेचे कर्मचारी व इतर संबंधित. संस्थेच्या यशासाठ या ‘साधनां’चे केवळ रेकॉर्ड माहीत असून चालणार नाही. तर काही प्रमाणात व काही बाबतीत त्यांची ऑफ द रेकॉर्ड माहिती असणेही व्यवस्थापनाच्या दृष्टीने आवश्यक,कित्येकदा अनिवार्य ठरते आणि इथेच चमचा व चमचेगिरी यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते.
 संस्थेच्या कर्मचाच्यांचं वय,शैक्षणिक पात्रता, राहण्याचंं ठिकाण,त्यांचा वक्तशीरपणा, कार्यपध्दती यांची माहिती रेकॉर्डवरून मिळू शकते.तर त्याचा स्वभाव,संस्थेत येण्याचा उद्देश, प्रामाणिकपणा, निष्ठा, संस्थेच्या धोरणांबाबतचं मत. वरिष्ठांबाबतचंं मत यांची माहिती रेकॉर्डवरून मिळू शकत नाही,पण ती मिळवणंं आवश्यक असते. कारण त्याशिवाय त्याचा उपयोग कसा, कुठे व केव्हा करून घ्यायचा याचा आडाखा बांधता येत नाही. ही माहिती उघडपणे विचारावी तर सत्य समजण्याची शक्यता असतेे.म्हणूून कित्येकदा व्यवस्थापकाकडूनच गुप्तपणे माहिती मिळविण्यासाठी चमचेगिरीला उत्तेजन दिलं जातं.
 आणखी एक उदाहरण पाहा. एका घरात दोन सुना आहेत. एक नवीनच आलेली,तर एक काहीशी अनुभवी. नव्या सुनेने एक पदार्थ करायला घेतला व त्याच्या कृतीबाबत ऑफ द रेकॉर्ड माहिती दुसऱ्या सुनेला विचारली. हिला आपण सगळंं सांगितलं आणि तिनं पदार्थ चांगला बनवला तर ती सासूबाईंंची लाडकी बनेल आणि आपलं महत्त्व कमी होईल, असा स्वार्थी विचार करून दुसच्या सुनेने चुकीची किंवा हातचे राखून माहिती दिली, तर काय होईल? पदर्थ चांगला होणार नाही. यात केवळ नव्या सुनेनंंच नुकसान नाही, तर त्या संपूर्ण ‘घर’ या संस्थेचंही नुकसान आहे. कारण एका पदार्थाबाबत दाखविलेला ‘स्वार्थ’ अन्य ठिकाणीही प्रगट होईल व घराच्या एकतेला तडे जातील.
 वरील उदाहरणांचं तात्पर्य असं की, चमचेगिरी म्हणजेच अधिकार नसताना व संबंधित व्यक्तीची अनुमती नसताना त्याच्याबद्दलची खासगी माहिती वरिष्ठांना देणंं हे तत्त्वत: अनैतिकच आहे. मात्र, अशा पध्दतीने माहिती देणं वा घेणं हे केवळ संस्थेच्या हितासाठी असलं तर त्याचा फायदा संस्थेला होऊ शकतो. मात्र हीच कृती व्यक्तिगत स्वार्थासाठी केली तर संस्था कोलमडू शकते. अशी नकारात्मक ‘चमचेगिरी’ हे बलाढ्य मोगल साम्राज्याच्या पतनाचं एक महत्त्वाचंं कारण आहे.
 थोडक्यात, चमचा’ आपल्या तोंडात विषही भरवू शकतो किंवा बलवर्धक खीरही भरवू शकतो. काय भरवून घ्यावयाचंं आणि किती प्रमाणात याचंं तारतम्य व्यवस्थापनाने दाखवायचं असते. लौकिक अर्थाने चमचेगिरी समर्थनीय नाही. पण व्यवस्थापनाच्या दृष्टीने ती एक व्यवहारी व न टाळता येण्यासारखी अपरिहार्यता आहे, आणि एकदा ती पूर्णपणे टाळता येत नाही, असं दिसून आल्यावर तिचंं सुयोग्य व्यवस्थापन करून तिच्यातील दोष कमीत कमी राखण्याचंं कौशल्यपूर्ण काम व्यवस्थापनाला करावं लागतं. पुढील लेखात चमचेगिरीच्या अन्य गमतीशीर बाबींवर विचार करू.