अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/व्यवस्थापकीय सल्लागार

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

व्यवस्थापकीय सल्लागार

 
अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf
स्थांमध्ये व्यवस्थापनाचं महत्त्व वाढू लागलं, तसं व्यवस्थापन - सल्लागार व्यवसायाला बाळसं येत गेलं. संस्थेचं भवितव्य केवळ तिची उत्पादनं किंवा सेवा यावर नव्हे, तर तिचं व्यवस्थापन कसं केलं जातं यावर अवलंबून आहे, याची जाणीव संस्था चालकांना झाल्याने व्यवस्थापन - सल्लागार व्यवसायाला ऊर्जितावस्था प्राप्त झाली आहे.

 विशेषत: आर्थिक उदारता व जागतिकीकरणाच्या धोरणामुळे विविध व्यवसायांमधील स्पर्धा वाढू लागली आहे. सरकारी उद्योगांनाही आता सरकारचं संरक्षण मिळत नाही. 'सुरक्षित बाजारपेठ' ही संकल्पना इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असून तिची जागा 'ग्राहकांची बाजारपेठ’ या भांडवलशाही संकल्पनेकडून घेतली जात आहे. अशा स्थितीत आपल्या संस्थेला अधिकाधिक सक्षम बनविण्यासाठी संस्थाचालक केवळ संस्थेत काम करणाऱ्या व्यवस्थापकांवर अवलंबून न राहता, खासगी सल्लागारांचं साहाय्यही नित्यनेमाने घेऊ लागले आहेत.
काही मार्गदर्शक मुद्दे :
 साहजिकच मागणी तसा पुरवठा या न्यायाने खाजगी व्यवस्थापकीय सल्लागारांची संख्याही वाढू लागली आहे. नवे, जुने, अनुभवी, अननुभवी असे बरेच जण या व्यवसायात उडी घेऊ लागले आहेत. त्यामुळे येथेही गळेकापू स्पर्धा सुरू झाली आहे. तेव्हा या व्यवसायाचं भवितव्य काय आहे आणि तो करीत असताना कोणती पथ्यं पाळावी लागतात, याबद्दल इच्छुकांशी हितगुज करणं हा या लेखाचा उद्देश आहे. मी स्वतः एक मुरलेला व्यवस्थापकीय सल्लागार असल्यानं माझे मुद्दे मार्गदर्शक ठरतील अशी आशा आहे. हा व्यवसाय दोन प्रकारे करता येतो. एक व्यक्तिगत पध्दतीनं आणि दोन, संस्थात्मक पध्दतीनं. व्यक्तिगत पध्दतीनं म्हणजे, व्यवस्थापकीय सल्लागाराचं काम करणाऱ्या संस्थांमध्ये नोकरी करून किंवा अन्य कोणत्या मार्गानं त्या संस्थेचा एक भाग बनून हा व्यवसाय करता येतो.  सुमारे वीस वर्षांपूर्वी व्यक्तिगत पातळीवर करण्यात येणारा व्यवसाय तेजीत होता. एखाद्या व्यक्तीची क्षमता आजमावून संस्था तिची सल्लागार म्हणून नियुक्ती करीत असत. संस्थेला कोणत्याही बाबतीत अडचण अगर समस्या आली की, तिचा सल्ला घेतला जात असे. आताही ही पध्दत सुरू आहे. पण स्वतंत्र सल्लागार संस्थांची जबरदस्त स्पर्धा जाणवू लागली आहे.

 काही वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ इंडिया प्राध्यापक ईश्वर दयाळ यांचा सल्ला घेत असे. आता तिनं मॅक कॅन्सी या सल्लागार कंपनीकडं हे काम सोपवलं आहे. तसंच राज्याच्या आर्थिक व प्रशासकीय व्यवस्थापनाबाबत आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री एन.टी. रामाराव, मिनू रुस्तुमजी या नावाजलेल्या व्यवस्थापन तज्ज्ञांचा सल्ला घेत असत. चंद्राबाबू नायडूंनी ही जबाबदारी मॅक कॅन्सी कंपनीवरच सोपविली आहे.

स्पेशलायझेशन :

 एका व्यक्तीपेक्षा संस्थेकडे सल्ल्याचं काम देण्याकडं कल वाढण्याची काही सबळ कारणं आहेत. एका व्यक्तीपेक्षा संस्थेचा आवाका मोठा असतो. तिथं अनेक व्यक्ती काम करीत असल्याने कामाची विभागणी सुयोग्य पद्धतीनं केलेली असते. व्यवस्थापनशास्त्रातही आता वैद्यकीय व्यवसायाप्रमाणं 'स्पेशलायझेशन' आलेलं आहे. त्यामुळं एकाच व्यक्तीला व्यवस्थापनाचे सर्व पैलू माहीत असण्याची शक्यता कमी असते. संस्थेत अनेक तज्ज्ञ काम करीत असल्याने संस्थेच्या गरजेप्रमाणं सल्लागार संस्था त्या - त्या तज्ज्ञांची नियुक्ती करून समस्या सोडवू शकते.

 ज्ञानवैविध्याबरोबराच सल्लागार संस्थेकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान मिळविण्यासाठीची क्षमता स्वतंत्र व्यक्तीच्या तुलनेत अधिक असते. कारण संस्थेकडे पैसा व मानवबळ अधिक असतं. एक व्यक्ती व्यवस्थापनाच्या एकाच पैलूपुरतं सर्वंकष ज्ञान किंवा तंत्रज्ञान मिळवू शकेल ती सर्वज्ञानी असू शकत नाही.

 व्यक्तीचं वय वाढतं तशी तिची नवीन ज्ञान स्वीकारण्याची क्षमता कमी होत जाते. पण संस्थेत नित्य नव्या व तरुण कर्मचाऱ्यांची भरती होत असल्यानं ती चिरतरुण राहु शकते. परिणामी एकेकाळी अनुभव वयावर आणि ज्ञान अनुभवांवर अवलंबून असतं असं मानलं जात होतं. पण आता तंत्रज्ञानात झपाट्यानं सुधारणा व बदल होतं असल्यानं ताज्या ज्ञानाला मागणी अधिक आहे. सल्लागार संस्थेचं वय कितीही अधिक असलं, तरी तेथे काम करणारे व्यवस्थापक तरुण असू शकतात. असं एका स्वतंत्र व्यक्तीबाबत घडू शकत नाही.

 या सर्व कारणांमुळं एका व्यक्तीचा सल्ला घेण्यापेक्षा संस्थेकडे काम सोपवणं पसंत केलं जातं. त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर सल्लागाराचं काम करणाऱ्यांची परिस्थिती अवघड झाली आहे.  याखेरीज स्वतंत्र सल्लागारांना आणखी एका समस्येला आता तोंड द्यावं लागत आहे, ती म्हणजे त्यांची वाढती संख्या. सध्या कर्मचारी - कपातीची लाट आल्यानं औद्योगिक किंवा इतर संस्थांमध्ये काम करणाऱ्या पन्नाशीच्या घरातील अनेक व्यवस्थापकांवर सक्तीच्या निवृत्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. अशांसमोर सल्लागाराचा व्यवसाय पत्करण्यावाचून गत्यंतर राहिलेलं नाही. साहजिकच कामाचा ओघ कमी आणि व्यावसायिकांची संख्या मात्र जास्त असं चित्र व्यक्तिगत व्यवसाय करणाऱ्यांबाबत दिसत आहे.
व्यावसायिक अस्तित्वासाठी :
 स्वतंत्र सल्लागाराचा व्यवसाय करणाऱ्या ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि क्षमता आहे, त्यांच्याकडं प्रसिध्दी असेलच असं नाही. नाव कमावल्याशिवाय काम मिळत नाही आणि काम मिळाल्याशिवाय नाव कमावता येत नाही अशा कात्रीत कित्येक स्वतंत्र व्यावसायिक सापडलेले दिसतात. ‘क्लायंट्स' मिळविण्यासाठी केवळ ज्ञान असून उपयोग नसतो. ते आहे, हे लोकांना माहीत असणं महत्वाचं असतं. संस्थेच्या बाबतीत ही अडचण कमी जाणवते.
 अर्थातच, व्यवसायात टिकून राहण्यासाठी स्वतंत्र सल्लागार व्यावसायिकाला प्रतिस्पर्धी आणि या व्यवसायात उतरलेल्या संस्था अशा दुहेरी स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. व्यावसायिक अस्तित्वासाठी ही लढाई त्याला सतत सुरू ठेवावी लागते.
 यात यशस्वी व्हायचं असेल तर अशा व्यक्तींनी पुढील काही नियम पाळणं आवश्यक वाटतं.

  1. स्वत:ला कायम प्रसिध्दीच्या झोतात ठेवा. आपलं ज्ञान सिध्द करण्यासाठी वृत्तपत्रं व नियतकालिकांतून लेख लिहिणं, जाहीर परिसंवाद, चर्चासत्र यात भाग घेणं, भाषण करणं इत्यादी मार्गांनी लोकांच्या नजरेसमोर राहा. मात्र, धार्मिक किंवा राजकीय व्यासपीठावरून स्वतःची प्रसिध्दी करण्याचा मोह टाळा.
  2. स्वतःचं ज्ञान, क्षमता, स्पेशलायझेशन इत्यादींबाबत प्रसिध्दिपत्रकं (ब्राऊशर्स), सीडी आकर्षकपणे तयार करून ती नित्यनेमानं विविध औद्योगिक संस्थांना पाठवत राहा. केवळ व्यक्तिगत ओळखींवर काम मिळेल अशा भ्रमात राहू नका. ओळखीमुळं सुरुवातीच्या काळात काही कामं मिळतात, पण ती टिकून राहतील याची खात्री नसते. शिवाय आपण क्षमतेवर नव्हे, तर ओळखीवर कामं मिळवता, अशा अफवा आपल्या प्रतिस्पर्ध्यांकडून उठवल्या जाण्याची शक्यता असते. त्याचा परिणाम व्यवसायावर होऊ शकतो.
  3. आपल्याकडे दीर्घकाळ टिकून राहिलेले क्लायंट्सच आपल्याला नाव मिळवून देतात. 'फी'च्या मोहापायी कामाचा भार वाढवून घेण्यापेक्षा, नेहमी सल्ल्याला येणारे काही निवडक क्लायंटस् कायमचे आपल्याकडं राहतील याची दक्षता घ्या. कधी तरी काम घेऊन येणाऱ्या पुष्कळ क्लायंट्सपेक्षा हे निवडक पण नेहमी येणारे आपली अधिक प्रसिध्दी करतात हे सूत्र लक्षात ठेवा.

४) आपला व्यवसाय वाढल्यानंतर क्लायंटसाठी खर्च करावा लागणारा वेळ व त्याच्याकडून होणारी आर्थिक प्राप्ती यांचा ताळमेळ व्यवस्थित बसवा. कमी फी देणारे पण जास्त वेळ घेणारे क्लायंटस् सरळ नाकारा. अशा लोकांमुळे आपण स्वस्त’ आहोत अशी भावना समाजात निर्माण होऊन आपल्या गुणवत्तेबद्दल शंका निर्माण होते. त्याऐवजी चांगली फी देणाऱ्यांवर पूर्ण लक्ष केंद्रित करा.
शेरेबाजी जाहीररीत्या नको :
५) आपला व्यवसाय वाढल्यानंतर आजारी किंवा मोडकळीस आलेल्या संस्थांची कामं विचार करून घ्या. कारण अशा संस्था अन्य कारणामुळं बंद पडल्या तरी त्या तुमच्या सल्ल्यामुळंच बंद पडल्या अशी प्रसिध्दी होते.
६) नेहमी येणाऱ्या क्लायंट्सची संख्या वाढती राहील याची दक्षता घ्या. कारण जुने क्लायंटस् कालांतरानं तुम्हाला कामं देणं बंद करू शकतात किंवा ते आपला उद्योगव्यवसाय बंद करू शकतात. आपल्याकडं काम देणाऱ्या संस्थेचा प्रमुख बदलला तर तो आपलं वेगळंं वैशिष्ट्य दाखविण्यासाठी पूर्वीच्या प्रमुखानं घेतलेले निर्णय बदलतो आणि त्याची सुरुवात सल्लागार बदलण्यापासून होते. त्यामुळं आपल्याकडे वाढते क्लायंट्स असू द्या.
७) आपलं स्पेशलायझेशन सोडून इतर क्षेत्रांत लक्ष घालू नका. अपुऱ्या ज्ञानापोटी आपण चुकीचा सल्ला दिला, तर क्लायंटचं नुकसान होऊ शकतं. त्याचा परिणाम असा होतो की, ज्या क्षेत्रात आपलं स्पेशलायझेशन आहे, त्या क्षेत्रातील काम मिळणंही मग मुश्किल होतं.
८) आपल्या प्रतिस्पर्धांबाबत योग्य अथवा अयोग्य अशी शेरेबाजी खाजगी किंवा जाहीररीत्या करू नका. आपल्याबद्दलही प्रतिस्पर्धी असंच बोलू शकतो याचं भान ठेवा. तसंच अशा शेरेबाजीमुळं आपल्याबद्दल मत वाईट होतं हे लक्षात असू द्या. हे मुद्दे केवळ व्यवस्थापकीय सल्लागारांनाच नव्हे तर इतर कोणत्याही क्षेत्रातील सल्लागारांना लागू आहेत. या सर्वांचा विचार करून स्वतःची दिशा ठरविल्यास फायदा होईल.

अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची (Adbhut Duniya Vyavasthapanachi).pdf