अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/युग बदल्या संबंधांचं

विकिस्रोत कडून
णी म्हणतं सध्याचं युग 'संगणक युग' आहे तर कुणाच्या दृष्टीनं हे 'अणू युग' असतं. 'विज्ञानयुग' तर ते आहेच. 'सध्या'चं काहीच पसंत नसणारी मंडळी याला 'कलियुग' मानतात, पण माझ्या दृष्टीनं हे 'बदलत्या संबंधांचं युग' आहे. संगणक, अणुतंत्रज्ञान यापासूनच आजही जगातला बहुसंख्य समाज दूरच गेलेला आहे. विज्ञानाचे फायदेही न मिळणारा जनसमुदाय मोठा आहे, पण पारंपरिक पध्दतीनं चालत आलेल्या संबंधांमध्ये विसाव्या शतकात जे आमूलाग्र बदल झाले आहेत, त्याचा परिणाम सर्वांवरच होतोय. त्यामुळं 'बदलणाऱ्या संबंधाचं'युग हेच याचं यथार्थ वर्णन ठरेल. व्यवस्थापन शास्त्र हे मुख्यतः ‘परस्पर संबंधांचं’ शास्त्र असल्याने प्रत्येक व्यवस्थापकाला हे बदलते संबंध लक्षात घ्यावे लागतात.

 गेली हजारो वर्षे मानवी संस्कृतीचा डोलारा तीन प्रकारच्या मूलभूत संबंधांनी सांभाळला आहे. एक जन्मदाते - अपत्य संबंध (यातूनच घर ही संस्था अस्तित्वात आली.) दोन पती-पत्नी संबंध (यातून सर्व रक्ताची नाती निर्माण होतात.) आणि तीन मालक - सेवक संबंध (यातून सर्व आर्थिक नाती निर्माण होतात.) मानवी संस्कृती सुस्थापित झाल्यापासून सुमारे दहा हजार वर्षे हे संबंध एका विवक्षित पध्दतीनंच विकसित होत असत. यालाच परंपरा म्हणतात.
 तर अशा या पारंपरिक संबंधांमध्ये विसाव्या शतकात फार मोठं आणि क्रांतिकारक (चांगल्या व वाईट दोन्ही अर्थानं) परिवर्तन झालं आहे. ही प्रक्रिया २१ व्या शतकातही चालू राहणार आहे. संपूर्ण समाज जणू या बदलामुळं ढवळून निघाला आहे. संस्कृती, नीती, चारित्र्य, चांगुलपणा आणि वाईटपणा यांच्या व्याख्या बदलण्याचं साम्यर्थ या बदलांमध्ये आहे. त्यांच्याबरोबरच या संबंधांशी संलग्न असणाऱ्या सर्व व्यवहारांमध्येही व्यापक उलथापालथ होत आहे.
 पिता-पुत्र संबंधांचंच पाहा. मुलानं बापाचं ऐकायचं आणि त्यानं केलं तेच आपण पुढे चालवायचं, हा या संबंधाचा परंपरेने चालत आलेला पाया. बाप हा बुध्दी आणि शहाणपण यात मुलापेक्षा श्रेष्ठ असतो ही संकल्पना यामागे आहे. जुन्या काळी ज्ञानप्राप्ती अत्यंत सावकाश होत असे. त्यामुळं पिता व पुत्र यांच्या ज्ञानात बरंच मोठं अंतर असे. उदाहरणार्थ, बापानं वीस वर्षात कमावलेलं कौशल्य मिळवण्यासाठी मुलालाही जवळपास तेवढीच वर्षे राबावं लागत असे. साहजिकच या काळात बाप सांगेल तसं वागणं त्याला भाग असे. मुलानं दुसरा मार्ग चोखाळलेला समाजालाही मान्य होत नसे.
 गेल्या पन्नास वर्षांत परिस्थिती झपाट्यानं बदलली. मुलं बापाचं 'ऐकण्या'पेक्षा त्याला 'विचारू' लागली. आज्ञाधारकपणाऐवजी चौकसपणा हा गुण मानला जाऊ लागला. पूर्वी मुलगा आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या 'पायावर' उभा राहू लागल्यापासूनच हे करावं लागलं. यामुळं मधल्या एका पिढीची अवस्था अशी झाली की, तिला लहानपणी बापाचं आणि मोठेपणं मुलांचं ऐकावं लागलं. एका प्रसिध्द लेखकानं आपल्या गोष्टीत म्हटलं आहे, 'लहानपणी आम्ही आई-वडिलांच्या गाद्या घातल्या. आता मुलांच्या घालत आहोत.' वडिलधाच्या व्यक्तीच्या गाद्या घालण्याचं काम पूर्वी मुलांना करावं लागत असे. आता हे ‘संबंध’ बदलले.
पती-पत्नी संबंध :
 पतीने बाहेर काम करून पैसा मिळवायचा आणि पत्नीने घर सांभाळायचं ही पूर्वीची रीत त्यामुळं निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पतीकडे आणि ते पाळण्याची जबाबदारी पत्नीकडे अशी कामाची विभागणी होती. हे संबंध आता केवळ बदललेच नाहीत तर नाहीसे होण्याच्या मार्गावर आहेत. केवळ चूल आणि मूल यात कुलूपबंद असणाऱ्या महिला आता पुरुषांच्या बरोबरीने सर्व क्षेत्रांत उतरल्या आहेत.
मालक - सेवक संबंध :
 मालक अन्नदाता असल्यानं त्याचं श्रेष्ठत्व निर्विवाद होतं. औद्योगिक क्रांतीनंतर मालकांनी आपली जबाबदारी बव्हंशी व्यवस्थापकांवर टाकली. मिळालेल्या संधीचा फायदा घेऊन व्यवस्थापक नोकरांवर ‘मालकगिरी’ गाजवू लागले. हा बदल कित्येक कामगारांना भावला नाही. परिणामी त्यांनी संघटना सुरू करून व्यवस्थापक व मालक यांच्याशी लढा पुकारला. मार्क्सवादाने या लढ्याला तात्विक अधिष्ठान मिळवून दिलं. कामगारांना चांगला पगार व अधिकार यामुळे मिळाले, पण मालक व व्यवस्थापनाबरोबर त्यांचे संबंध संघर्षाचेच राहिले.
 परंपरेनं विकसित झालेल्या या तीनही संबंधांमध्ये एक समान दुवा होता. तो म्हणजे, यातील एक पक्ष आज्ञा करणाऱ्याचा तर दुसरा आज्ञा पाळणाऱ्याचा. शिवाय आज्ञा व कुणी ती पाळावयाची हे बौध्दिक पात्रतेवर न ठरता, परस्पर संबंधांवर ठरत असे. म्हणजेच मुलगा, पत्नी आणि सेवक अनुक्रमे पिता, पती आणि मालक यांच्यापेक्षा बुध्दिमान असले तरी त्यांना हुकूम पाळावा लागत असे. साहजिकच समाजाच्या एका बाजूवर सतत अन्याय होत गेला. पर्याय मित्रत्वाच्या संबंधांचा :
 एकविसाव्या शतकात या संबंधांना 'मित्रत्व' हा सर्वोत्तम, समर्थ आणि अधिक चांगला पर्याय ठरू शकतो. नातं तेच पण संबंध मित्रत्वाचे असतील तर अनेक बाबतीतला अनावश्यक संघर्ष व अन्याय टाळता येतो. मित्रत्वात टोकाची भूमिका संभवत नाही. दोन्ही बाजूंनी एकमेकांचे अधिकार, महत्त्व, उपयुक्तता, मर्यादा आणि क्षमता यांचा मान ठेवण्याचे भान केवळ मित्रत्वातच असू शकते. असे संबंध प्रस्थापित करणं हे एकविसाव्या शतकातलं मोठे आव्हान आहे. पिता-पुत्र, पती-पली आणि मालक - सेवक यांना ते पेलावं लागणार आहे.
 मित्रत्वाचं नातं मुख्यत: विश्वासावर अवलंबून असतं. सर्वसाधारणपणे आपल्याला दोन तऱ्हेचं भय वाटत असतं. एक आपण कुणाकडून दुखावले तर जाणार नाही? मित्रत्वाच्या संबंधांमधून या दोन्ही प्रकारच्या भीती नाहीशा होऊ शकतात. कारण, त्यात मोकळेपणा असतो.
 मला जेव्हा पहिला बोनस मिळाला तेव्हा मी घरात घोषणा केली, 'आता मी स्वतःला सफारी सूट घेणार', ते ऐकून पत्नी म्हणाली, ‘घ्याच तुम्ही सफारी सूट. खरं म्हणजे माझ्यासाठी साडी आणता का असं मी विचारणार होते, पण माझ्याकडं एकच का असेना पण चांगली साडी आहे. तुम्हाला मात्र चांगला सूट नाही.' ते ऐकून मला माझीच लाज वाटली. वास्तविक तिच्याजवळ लग्नकार्यात नेण्यासारखी एकच चांगली साडी आहे. त्यामुळं बोनसवर खरा अधिकार तिचा आहे हे मला माहीत होतं. अखेरीस सूट रद्द करून मी साडी खरेदी केली. अगदी मनापासून.
 माझे पत्नीशी मित्रत्वाचे संबंध असल्यानेच हे शक्य झालं. मी जन्या वळणाचा नवरा असतो तर तिला न विचारता मी सूट खरेदी करूनच घरात आलो असतो. पत्नी काही बोलली नसती, पण मनात दुखी झाली असती. केवळ संबंधातील मोकळेपणामुळं तिनं युक्तीनं मला न दुखावता तिची गरज माझ्या कानावर घातली आणि मीही माझा विचार बदलला.
 एकविसाव्या शतकातील कोणत्याही क्षेत्रातल्या व्यवस्थापकांनी संबंधातील हे बदल जाणणं आणि त्याप्रमाणं धोरण आखणं आवश्यक आहे. संस्थेचे मालक, कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार तसेच समाजाचे इतर घटक यांच्याशी व्यवस्थापकाचा संबंध हरघडी येतो. त्याला काही वेळा हुकूम करणाऱ्याची तर काही वेळा हुकूम मानणाऱ्याची भूमिका निभवावी लागते. ती उत्तम पार पाडावयाची असेल तर आपल्याला आज्ञा देणाऱ्याशी व आपण ज्याला आज्ञा देतो त्याच्याशी मित्रभावनेनं वागण्याचा त्याचा प्रयत्न असल्यास त्याचं काम सुकर होतं.