अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/एकविसावं शतक कोणाचं?

विकिस्रोत कडून

द्योग व कारखानदारीचा विचार करता एकोणिसावंं शतक युरोपियनांचं होतं.या शतकात ब्रिटन,जर्मनी, फ्रान्स, हॉलंड इतकंच काय,तर बेल्जियम आणि इटली यांनी आर्थिक आणि लष्करी सत्तेच्या जोरावर आशिया आणि आफ्रिकेवर अधिराज्य गाजवलं. यामुळे या सर्व देशांची भरभराट झाली.

 विसाव्या शतकात त्यांची जागा अमेरिकेनंं घेतली.अमेरिकेची अर्थव्यवस्था युरोपियन देशांपेक्षा प्रबळ आणि गुणात्मकदृष्ट्या श्रेष्ठ होती. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास तिथं अधिक झपाट्यानंं झाला. त्याचा उपयोग करून अमेरिका महासत्ता बनली.विसाव्या शतकाच्या अखेरीला तर‘जगातील एकमेव महासत्ता’ म्हणून ती ओळखली जाऊ लागली.आता नुकतंंच सुरू झालेलं एकविसावंं शतक कुणाचं असणार असं कुतूहलानं विचारलं जातंय. माझ्या मते ते आशिया आणि खास करून भारताचं होऊ शकतं. मागास समजल्या जाणाऱ्या आशियातील एक देश काय करू शकतो हे विसाव्या शतकाच्या अखेरच्या पंचवीस वर्षांंत जपाननं दाखवून दिलं आहे. दक्षिण कोरिया, सिंगापूर, मलेशिया व काही प्रमाणात इंडोनेशियानंही त्याचंच अनुकरण केलं आहे.
 साप्रंंतच्या काळात जगाची नजर वळली आहे, ती भारत व चीनकङ. एकविसाव्या शतकातील महासत्ता म्हणून या दोन्ही देशांकडे पाहिलं जातंय.त्यांची शक्तिस्थानं,मर्यादा, संधी आणि धोका या चार मुद्यांवर जगात विचार केला जातोय. अमेरिकेसारखी महासत्ताही राजकीय मतभेद विसरून त्यांच्याशी सलोख्याचे आर्थिक संबंध ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करताना दिसत आहे.
शक्तिस्थानं :
 दोन्ही देशांचं समान शक्तिस्थान म्हणजे त्यांची लोकसंख्या.अतिलोकसंख्या हा शाप आहे असं समजलं जातं.तथापि, ही लोकसंख्या जर शिस्तबध्द असेल तर ती ताकदही बनू शकते. सध्या जगात लोकशाहीची लाट आली आहे.जनसंख्या हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे.याचा फायदा हे देश घेऊ शकतात.

 टिकून राहण्याची क्षमता हे दोन्ही देशांचे आणखी एक समान शक्तिस्थान आहे.
'युनान-मिस्त्र-रुमा सब मिट गये जहाँ से
अब तक मगर है बाकी, नामोनिशाँ हमारा’

 (ग्रीक ,इजिप्शियन आणि रोमन संस्कृती केव्हाच काळाच्या पडद्याआड गेल्या.आम्ही मात्र काळाचं आव्हान पचवून टिकून आहोत.)असं इक्बालनं म्हटलं आहे.
 भारत व चीन यांना पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. त्यांची मुळंं पक्की आहेत.काळाच्या खऱ्या कसोटीवर उतरलेली नीतिमूल्ये आणि सामाजिक संकल्पना त्यांच्यापाशी आहेत.याचा अप्रत्यक्ष उपयोग त्यांना नव्या जगात मानाचं स्थान पटकावताना होत आहे.
 तिसरं समान शक्तिस्थान म्हणजे नवं तंत्रज्ञान आपलंसं करण्याची क्षमता. विज्ञान व तंत्रज्ञान युगात दोन्ही देशांनी बराच उशिरा प्रवेश केला.पण ते त्वरित आत्मसात करणंं त्यांना अवघड गेलं नाही. अमेरिकेसारख्या देशात या दोन्ही देशांचे विशेषतः भारतीय तंत्रज्ञ नाव कमावून आहेत.तंत्रज्ञानाचे मेरुमणी समजले जाणारे अणुतंत्रज्ञान,अंतराळ तंत्रज्ञान आणि संगणक यात युरोप अमेरिकेच्या तोडीची कामगिरी भारत-चीनच्या तंत्रज्ञांनी बजावली आहे.
मर्यादा : लोकसंख्या हे जसंं शक्तिस्थान आहे, तशी ती कमजोरीही आहे.मोठ्या लोकसंख्येच्या अपेक्षा जेव्हा अर्थव्यवस्था पूर्ण करू शकत नाहीत,तेव्हा सामाजिक ताणताणाव निर्माण होतात. याचा अतिरेक झाला म्हणजे अराजक माजण्यासही वेळ लागत नाही.भारताच्या बाबतीत हि कमजोरी अधिक प्रकर्षाने जाणवते.कारण,आधीच लोकसंख्या जास्त, त्यातही ती शिस्तबध्द व समान विचारांची नाही. जात, समाज,भाषा,प्रांत इत्यादीवरून चालणारे वाद व त्यांचं पर्यवसान समाज दुभांगण्यात होणंं हे भारतात नेहमीचंंच आहे.यामुळंं समाज व व्यक्ती यांची नवनिर्मिती क्षमता, सृजनशीलता आणि रचनात्मकता नको त्या ठिकाणी खर्च होते.याचा तोटा अखेरीस सर्वांनाच भोगावा लागतो.
 आर्थिक प्रगतीला सामाजिक एकसंधता अत्यंत आवश्यक आहे.ती निर्माण केल्याशिवाय केवळ वैयक्तिक बुद्धीच्या जोरावर सर्वकष प्रगती साधणंं अशक्य झालं असतं.चीन यासंबंधी भारतापेक्षा अधिक सुदैवी आहे . आपल्यैतके भेदाभेद तिथं नाहीत.क्रिकेटच्या संघात केवळ अधिक संख्येनंं जागतिक दर्जाचे खेळाडू असून उपयोग नसतो,तर त्यांच्यात सांघिक भावना असणंं महत्वाचंं असतंं.ते वैयक्तिक विक्रामांचा विचार न करता, देशाच्या व संघाच्या हितासाठी खेळणारे असावे लागतात.तरच, संघ अधिक वेळा विजयी होतो. आर्थिक प्रगतीबाबतही हेच सत्य आहे.
 दोन्ही देशांची आणखी एक समान कमजोरी आहे. दोघांनीही तंत्रज्ञान आत्मसात केलं आहे,पण नवं तंत्रज्ञान निर्माण करणंं त्यांना जमलं नाही. भारतीय तंत्रज्ञानी परदेशांत जाऊन नव्या तंत्रज्ञानाची निर्मिती केली.पण स्वदेशात राहून ते करण्याची त्यांची तयार नाही. पैशाची हाव हे एकमेव कारण नाही.उच्च ज्ञान विकसित
करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत सुविधा निर्माण करण्याकडं आपल्या अर्थव्ययस्थेने अक्षम्य दुर्लक्ष केलं आहे.
 नवं तंत्रज्ञान विकसित न करता आल्यानं काळाच्या पुढं राहण्याची शक्यता नाहीशी होते आणि सदैव आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागतं.
 ब्रेन ड्रेन रोखण्यासाठी आणि परदेशस्थ तंत्रज्ञांना भारतात यावंस वाटावं याकरिता काही राज्यांमध्ये'तांत्रिक उद्यानं' स्थापन करण्यात आली आहेत.त्यांची संख्या व त्यातील सुविधा वाढाविणं आवश्यक आहे.त्यासाठी परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांकडून तांत्रिक व आर्थिक गुंतवणूक व्हावी असं धोरण आखणं आवश्यक आहे. सध्या त्या दिशेने पावले पडत आहेत.
भारताला असणाऱ्या संधी: उच्च तंत्रज्ञान अवगत असणं आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान ही बहुसंख्य सुशिक्षित भारतीयांची बलस्थानं आहेत.अमेरिका व युरोपमध्ये तंत्रज्ञांना जितका पगार द्यावा लागतो, त्यापेक्षा कमी पगारात्त्यांच्याइतकेच प्रवीण तंत्रज्ञ भारतात उपलब्ध होऊ शकतात.त्यामुळं उत्पादन खर्च कमी करण्यासाठीअनेक परदेशी कंपन्या भारतातून कामं करवून घेणं पसंत करतात. तंत्रज्ञान काम आणि नव्या तंत्रज्ञांची परिचय असा दुहेरी फायदा यामुळे होत आहे.विशेषतः या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात या'आउटसोर्सिंग'चा लाभ मोठ्या प्रमाणात मिळत आहे.आता आफ्रिका व इतर मागास देशांची अर्थव्यवस्थाही स्थिरस्थावर होत असूनते भारताच्या संधी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणार हे उघड आहे.त्या स्पर्धेला तोंड देण्याची तयारी आतापासूनच करावयास हवी.आपली उत्पादकता,किफायतशिरपणा, उत्पादने व सेवा यांची गुणवत्ता याकडे विशेष लक्ष देऊन भारत या स्पर्धेच्या यशस्वी मुकाबला करू शकतो.
भारताला असणारा धोका: भारताला सर्वात मोठा धोका चिनचा आहे.लष्करी नव्हे तर आर्थिक.चीनमध्ये एकापरीने हुकूमशाही राजवट असल्यानं वैचारिक मातभेदांना जागा नाही.त्यामुळे नवे बदल तो भारतापेक्षा अधिक झपाट्याने आत्मसात करू शकतो.पण हुकूमशाही राजवटीत अंतर्गत तणावांचं प्रमाण अधिक असतं. आणि त्याचा अतिरेक झाला तर देशांचे तुकडे होऊ शकतात. रशिया व युगोस्लाव्हिया यांची उदाहरणे ताजी आहेत.भारतात लोकशाही असल्यानं बदल स्वीकारण्याची गती धीमी आहे.सामाजिक ताणतणावांवर शांततेच्या मार्गाने मत करण्याची संधीही आहे.
तात्पर्य: आपण आपली शक्तीस्थानं अधिक बळकट करणं, कमजोरी नियंत्रणाखाली ठेवणं, संधीचा त्वरित लाभ उठवणं आणि धोक्याचा शिस्तबद्ध आक्रमकपणानं सामना करणं या चार मार्गांनी एकविसावं शतक भारताचं होऊ शकतं आणि ते तसं होण्याची क्षमता पल्याकडे निश्चितच आहे.