अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/या संकटावर कशी मात करणार?

विकिस्रोत कडून
धीरच्या घरातलं वातावरण गेले काही दिवस खूपच तणावग्रस्त बनलं होतं.स्वतः तो, त्याचे नुकतेच निवृत्त झालेले वडील, आई व पत्नी सारे जण वेगळ्याच दडपणाखाली होते.तसं पाहता वेळ अजून आली नव्हती, पण काळ निश्चित आला होता.नाही म्हणायला त्याचा नुकताच 'लोअर के.जी'.त जाऊ लागलेला चार वर्षांचा मुलगा हसत-हुंदडत होता, कारण कोणती परिस्थिती ओढवलेली आहे,हे समजण्याइतकं त्याचं वय नव्हतं.

 लहानपणापासून सुधीर अत्यंत हुशार.वर्गात कायम पहिल्या पाचांत नंबर.वडील सरकारी बँकेत क्लार्क. त्यामुळे पगार फार मोठा नसला तरी सुरक्षित नोकरी होती.त्याची आई सामान्य गृहिणी,असं त्यांचं मध्यमवर्गीय पण सुखी कुटुंब होतं.
 कालांतराने सुधीरने कॉम्प्युटर तंत्रज्ञान या विषयात इंजिनिअरिंगची पदवी घेतली.पुढे पोस्ट गॅज्युएशन केलं.शैक्षणिक पात्रता व बुध्दीच्या जोरावर सहा वर्षांपूर्वी त्याला

बेंगलोरला एका बहुराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनीत पन्नास हजार रुपये पगाराची नोकरी मिळाली. त्याच्या कामाचा झपाटा व गुणवत्ता पाहून वर्षभरात पदोन्नती देण्यात येऊन त्याचा पगारही जवळजवळ दुप्पट झाला.
 सर्व काही मनासारखं घडत होतं. त्यामुळे त्याने लहानपणापासून रंगविलेली स्वप्नं साकारण्यास सुरुवात केली. कोणत्याही मध्यमवर्गीयाचं सर्वात आवडतं स्वप्न म्हणजे स्वतःचं घर व कार! सुधीरही त्यास अपवाद नव्हता. त्यामुळे त्याने बँकेकडून कर्ज घेऊन तीन वर्षांपूर्वी महागडी कार व पॉश फ्लॅट घेतला. दर महिन्याला बरीच रक्कम कर्जफेडीच्या हफ्त्यांपोटी भरावी लागत असली, तरी त्याचा पगारही मोठा असल्नेया काही अडचण नव्हती.
 उत्पन्न वाढल्याने आता त्याचे व त्याच्या कुटुंबाचे इतर खर्चही वाढू लागले होते. लहानपणापासून अनुभवलेल्या मध्यमवर्गीय जीवनशैलीचे रूपांतर अवघ्या चार वर्षांमध्ये श्रीमंती थाटात झालं होतं. पण सदासर्वकाळ सुख कुणाच्या वाट्याला येत नसतं. गेली दहा वर्षे दर वर्षी १०० टक्के वाढ होणाऱ्या आय.टी. उद्योगात गेल्या दोन वर्षांपासून मंदीची लाट आली होती. हा उद्योग कमी गुंतवणुकीचा पण प्रचंड फायद्याचा असल्याने गेल्या सात-आठ वर्षांत त्यात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक झाली होती. असंख्य कंपन्या स्थापन झाल्या होत्या. त्यामुळे गळेकापू स्पर्धा निर्माण होऊन फायद्याचे प्रमाण कमी होऊ लागलं. फायद्यातल्या कंपन्याही तोट्यात जाऊ लागल्या. आय.टी.चा फुगा फुटणार असं वातावरण निर्माण झालं. कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळू लागले. गुंतवणूकदारांचा या क्षेत्रातील रस संपला.
 कंपनी तोट्यात जाऊ लागली की, पहिली कुऱ्हाड कर्मचाऱ्यांवर कोसळते. सुधीरच्याही कंपनीची अवस्था अशीच बिकट झाली होती. त्यामुळे कर्मचारी कपात अटळ होती. त्याच्या कार्यालयातील २० टक्के स्टाफ कमी करण्यात आला. लवकर मार्केट सुधारलं नाही तर ५० टक्के कर्मचारी कमी करावे लागतील, कदाचित कंपनीची ही शाखा बंदही करावी लागेल असे संकेत मिळू लागले.
 सुधीरचं करिअर उत्कृष्ट, शिवाय गेल्या सहा वर्षात त्याने आपली सर्व बुध्दिमत्ता व कार्यशक्ती पणाला लावून कंपनीचा फायदा करून दिला होता. कंपनी त्याला जो मोबदला देत होती, त्यामुळे पहिल्या तडाख्यातून तो वाचला होता, पण ही घसरगुंडी त्वरित रोखली गेली नाही तर, तर आपलंही काही खरं नाही, हे तो जाणून होता. लहानपणी शाळेतल्या गुरुजींकडून ऐकलेली 'बिरबल व माकडणीची’ कथा त्याला आठवली.

 नेमके हेच त्याचं व त्याच्या कुटुंबीयांच्या चिंतेचं कारण होतं. नोकरी गेली तर पुढे काय, दुसरी नोकरी मिळू शकेल, पण पगार आतासारखा मिळेल का? समजा, खूप कमी पगाराची नोकरी पत्करावी लागली तर आताचं उच्च राहणीमान कसं निभेल? क्लब, पार्ट्या बंद करून तो खर्च वाचविता येईल. (कारण लहानपणी आईवडिलांनी लावलेली काटकसरीची सवय सुटलेली होती, पण विसरलेली नव्हती.) पण घर व कारच्या हप्त्यांचं काय? स्वतःचा व्यवसाय सुरू करावा म्हटलं तर, भांडवलाचा प्रश्न आहे. शिवाय या मंदीच्या काळात नवा व्यवसाय लवकर मूळ धरेल का, हे यक्षप्रश्न तर होतेच. शिवाय नोकरी गमावलेल्या माणसाकडे समाज एकतर कुचेष्टेच्या किंवा दयेच्या नजरेने पाहतो. कोणत्याही स्वाभिमानी माणसाला या दोन्ही नजरा सहन होत नाहीत, तेव्हा या स्थितीला कसं तोंड द्यावं, अशा अनेक विचारांचं काहूर त्याच्या डोक्यात उठतं. आपला धीर सुटतो की काय असं त्याला राहून राहून वाटत असतं.
 असे अनेक धीर सुटलेले सुधीर आज दिसून येतात केवळ आय.टी. नव्हे तर सर्वच उद्योगांमध्ये जगभरात उसळलेल्या मंदीच्या लाटेने अनेक कर्मचाऱ्यांच्यावर नोकरी गमावण्याची पाळी आलेली आहे. अशी वेळ आलीच तर स्वत:ला सावरायचं कसं आणि हे आव्हान स्वीकारायचं कसं, याबाबत प्रथमपासून सर्वंकष नियोजन करणंं आवश्यक आहे.
 थोडक्यात, करिअर ऐन भरात आली असताना अचानक त्यात बदल करण्याची पाळी आली,तर परिस्थिती कशी हाताळायची, म्हणजेच या बदलाचं 'व्यवस्थापन' कसं करावयाचं याचा विचार आपण या लेखात करणार आहोत. मी वर दिलेली कथा ही या लेखाची ‘थीम' आहे.
 करिअरमध्ये अचानक कराव्या लागणाऱ्या बदलांचंं व्यवस्थापन कसं करावंं हे पाहण्यापूर्वी व्यवसाय, नोकरी व करिअर या संकल्पना व त्यांचा विकास यांचा इतिहास नजरेखालून घालणं मनोरंजक ठरेल. कारण सध्याच्या समस्यांचं मूळ या इतिहासात आहे.
 सुमारे १० हजार वर्षांपूर्वी मानवाला शेती व पशुपालन तंत्रज्ञानाचा शोध लागला. तेव्हापासून मानवजातीचा आर्थिक विकास सुरू झाला. त्यामुळे मानवाची विभागणी दर व्यवसायांमध्ये (व्होकेशन) झाली.
 १. मालक - ज्याच्या हातात उत्पादन साधनेे आहेत.
 २. नोकर - जो मालकाला उत्पादन प्रक्रियेत मदत करतो.
 यापैकी मालक हा व्यवसाय साहजिकच अधिक प्रतिष्ठेचा होताा. पण निसर्गाच्या लहरीमुळे होणारं नुकसान सहन करावयाचा त्यामुळे धोका पत्करण्याची तयारी हा मालक बनण्यासाठी आवश्यक गुण होता. अर्थात व्यावसायिक फायद्यामुळे मिळणारी सुुखं व समृध्दीही तो उपभोगू शके.
 जुन्या काळात नोकर पूर्णपणे मालकाच्या दयेवर अवलंबून असे. सुरुवातीच्या काळात मालक त्याला बाजारातून वस्तू आणावी तसा विकत घेत. त्यांना ‘गुलाम’ असे म्हणत. त्यानंतर नोकर ‘भाड्याने’ घेण्याची पध्दत सुरू झाली. म्हणजेच ठराविक कामासाठी त्याची मोबदल्यावर नेमणूक केली जाऊ लागली. त्यानंतर शेती व पशुपालन व्यवसायाला लागणाच्या विविध अवजारांची निर्मिती करणारे व्यवसाय निर्माण झाले. अशा व्यवसायिकांना कारागीर म्हणून ओळखलंं जाऊ लागलं. लोहार, सुतार ,कुंभार, विणकर, कातकर असे विविध व्यावसायिक निर्माण झाले. व्यक्तिगत कौशल्यांवर आधारित असणारे हे मानवजातीच्या इतिहासातील पहिले व्यवसाय होत. ते मुख्यतः वंश परंपरेने चालत असत .एखाद्या व्यावसायिकाकडे असणाच्या व्यवसायाचे त्याच्या मुलाकडे हस्तांतरण होत असे. अशा तऱ्हेने हे पिढ्यान् पिढ्या त्याच घराण्यात सुरू राहत. सुताराचा मुलगा सुतारच व लोहाराचा मुलगा लोहारच होणार हे जणू ठरून गेलं होत.

 पिढ्यान् पिढ्यांच्या प्रयत्नांमुळे व संशोधनामुळे हे व्यवसाय प्रगत झाले .समाजाचं त्यांच्यावाचून चालेनासं झालं. त्यामुळे ते प्रभावशाली बनले.

 एकीकडे हस्तकौशल्यांवर आधारित व्यवसाय उत्क्रांत होत असतानाच दुसरीकडे धर्म व राजकारण या संकल्पनांचा उदय व विकास होत होता. व्यवसायामुळे आर्थिक समृध्दी मिळविलेल्या समाजाला नीतिमत्ता व आत्मिक विकासमूल्यांची आवश्यकता भासू लागली होती. त्यातूनच धर्म’ या संकल्पनेची निर्मिती झाली. तर लोकांना सामाजिक शिस्त लागावी व कोणावर बळजबरी व अन्याय होऊ नये यासाठी अनुक्रमे राजकारण, राष्ट्र किंवा राज्य व कायदा या संकल्पना अस्तित्त्वात आल्या.

 राज्य चालवायचे असेल तर प्रशासन किंवा सरकारची गरज असते. प्रशासन चालविण्यासाठी खास पध्दतीचं प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाच्यांची आवश्यकता असते आवश्यकतेपोटी ‘करिअर' या नव्या संकल्पनेची सुरुवात झाली. समाजातील , हुशार ,होतकरू व राजसत्तेशी प्रामाणिक असे तरुण हेरून त्यांना राज्यकारभार चालविण्याचं प्रशिक्षण देण्यात येऊ लागलंं व त्यांची त्यांच्या कुवतीप्रमाणे विविध पदांवर नियुक्ती करण्यात येऊ लागली. ही व्यवस्था सहा-साडेसहा हजार वर्षे सुरू राहिली.

 ‘करिअर' हाही एक व्यवसायच आहे .मात्र वर नमूद केलेल्या व्यवसायांसारखा वंशपरंपरागत नाही. तो प्रत्येकाच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, न्यायाधीशांच्या मुलाला स्वतंत्रपणे योग्यता सिध्द केल्याखेरीज न्यायाधीश होता येणार नाही. त्या पदावर तो परंपरेने अधिकार सांगू शकत नाही.

 दोनशे वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. विज्ञान’ हा अल्लाउद्दीचा दिवा शास्त्रांनी घासला आणि त्यातून ‘यंत्र' नावाचा राक्षस बाहेर पडला.त्याने अल्पावधीतच सारं जग व्यापून टाकलं. यंत्रयुगात करिअर ही संकल्पना चांगली बळकट झाली.हस्तकौशल्याची जागा यंत्राने घेतली.उत्पादन प्रचंड वाढू लागलं.यातून तेजी व मंदीया दोन नव्या प्रकारांचा परिचय लोकांना झाला.मागणी जास्त व उत्पादन कमी म्हणजे तेजी व मागणी कमी व उत्पादन जास्त म्हणजे मंदी असं सोप्या भाषेत म्हणता येइल.
 सध्याचा काळ हा महामंदीचा काळ आहे.विविध उत्पादनांनी बाजारपेठा गजबजलेल्या असल्या तरी मालाला खप नाही.त्यामुळे उत्पादन करणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करून उत्पादन व उत्पादन खर्च कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत.त्यामुळे चांगलं करिअर असणारे सुधीर सारखे तंत्रज्ञ अडचणीत आले आहेत.यासंकटांवर कशी मात करता येईल ते पुढच्या लेखात पाहू.