अद्भुत दुनिया व्यवस्थापनाची/एक व्यवस्थापकीय चमत्कार

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

इया सहकाऱ्यांंनो, मी हे काय म्हणतो याकडे काळजीपूर्वक लक्ष द्या.आपल्या दामोदर व्हॅली प्रकल्पातून होणारं वीज उत्पादन आपल्याला सहा महिन्यांत दुप्पट करावयाचं आहे. वीजमंत्र्यांची अशी मागणी आहे आणि मीही त्यांना तसं अभिवचन दिलं आहे. त्यामुळे माझा शब्द खरा करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे."

 ओरिसातील दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन या सरकारी जलविद्युत प्रकल्पाच्या अभियंत्यांच्या बैठकीत जनरल भगत बोलत होते. त्यांची या प्रकल्पाच्या अध्यक्षपदी नव्यानेच नियुक्ती करण्यात आली होती. पूर्वी ते लष्करात उच्चपदस्थ अधिकारी होते. प्रामाणिक, परखड पण अत्यंत ‘सैनिकप्रिय' असा त्यांचा नावलौकिक होता. नेमके हेच गुण राजकारण्यांंना आवडत नसतात. म्हणूनच लष्कराचे प्रमुखपद मिळण्याअगोदरच त्यांना निवृत्त करण्यात आलं होतं.
 तथापि, तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्याः मनात त्यांच्याबद्दल आदरही होता.शिवाय त्यांच्यासारख्या मान्यवर अधिकाऱ्याला नाराज ठेवणं योग्य नव्हतंं,म्हणून दामोदर

व्हॅली काॅपोरेशन हा 'आजारी प्रकल्प' यांच्या गळ्यात मारण्यात आला होता.‘गाजराची पुंगी वाजली तर वाजली...’ असा सूज्ञ (की क्षुद्र) राजकीय विचार त्यापाठी होता, अशी त्या काळी चर्चा होती.

 एकेकाळी ‘भारताला मिळालेले वैज्ञानिक वरदान' म्हणून ओळखल्या गेलेल्या दामोदर व्हॅली प्रकल्पाची त्यावेळी (१९७३ मध्ये) अत्यंत वाईट अवस्था होती. वीज उत्पादन दिवसेंदिवस घटून अर्ध्यावर आलं होतं.‘आमदनी अठन्नी खर्चा रुपय्या’ अशी स्थिती होती.उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होता. प्रकल्पाची परिस्थिती सुधारण्यासाठी अनेकदा त्याचे अध्यक्ष बदलण्यात आले होते, पण काही फरक पडत नव्हता. प्रकल्पाची धुरा जनरल भगत यांच्या हाती सोपविताना त्यावेळच्या वीजमंत्र्यांनी या सर्वांची कल्पना दिली होती.तथापि, ‘सहा महिन्यांत उत्पादन दुप्पट करा' अशी आदेशवजा विनंती करण्यासही मंत्रिमहोदय विसरले नव्हते.
 कर्तव्यतत्परतेत आयुष्य घालविलेल्या भगत यांनी क्षणाचाही विचार न करता ही अशक्यप्राय वाटणारी जबाबदारी स्वीकारली आणि प्रकल्प अभियंत्यांच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी उत्पादन वाढविण्याचंं आवाहन केलं.
 'हे अशक्य आहे’ असे मत अभियंत्यांनी एकमुखाने व्यक्त केलं. 'प्रकल्पाची यंत्रसामुग्री आता जुनी झाली आहे. चीनबरोबरच्या युध्दानंतर प्रकल्पाची आर्थिक मदत कमी करण्यात आली आहे. यंत्रसामुग्रीचे सुटे भाग परदेशांतून आयात करावे लागणार आहेत, पण त्यासाठी पैसा नाही. खेरीज आयातीचा परवानाही मिळत नाही. देशात तयार झालेले सुटे भाग वापरले, तर ते चांगले चालत नाहीतच, शिवाय यंत्रातील इतर चांगले भागही त्यांच्यामुळे खराब होतात. अशा परिस्थितीत सहा महिन्यांत उत्पादन दुप्पट होणंं तर सोडाच, उलट ते कमी कमीच होत जाणार आहे',अशा अनेक तक्रारी अभियंत्यांनी सांगितल्या.
 "आपल्याला कोणकोणते सुटे भाग आयात करण्याची आवश्यकता आहे, याची यादी मला द्या, ते मिळविण्याची जबाबदारी मी स्वीकारतो." जनरल भगत म्हणाले.
 यादी व मागणीपत्र घेऊन ते वीजमंत्र्यांना भेटले. पण त्यांनी नुसतेच मागणीपत्र नेले नव्हते, तर एका हातात मागणीपत्र व दुसऱ्या हातात राजीनामापत्र घेऊन ते मंत्र्यांकडे गेले होते.
 यापैकी कोणतेही एक स्वीकारा' अशी विनंती त्यांनी दोन्ही कागद समोर ठेवून त्यांनी मंत्र्यांना केली.
 मंत्रिमहोदय चमकले. आयातीचा परवाना व आर्थिक मदत मागण्यासाठी या प्रकल्पाचे अध्यक्ष आजपर्यंत त्यांच्याकडे आले होते. मात्र, ‘प्रकल्पाच्या मागण्या स्वीकारा, नाही तर मी राजीनामा देतो’, असं सांगणारा अध्यक्ष त्यांना आजच भेटला होता.

 “हे पाहा, सहा महिन्यांत उत्पादन दुप्पट करा, हे मी आपल्याला म्हटलं होतं खरं, पण इतकी गडबड करण्याचं कारण नाही.आपण जरा दमानं घेऊ या. राजीनाम्याची भाषा कशाला?’ मंत्र्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये टोलवाटोलवी सुरू केली.

 “साहेब प्रकल्पाला अध्यक्षाची नव्हे, परदेशी सुटया भागांची आवश्यकता आहे. शिवाय आपल्याला गडबड नसली, तरी मला आहे कारण मी शब्दांचा पक्का आहे."

 काही सांगितलं तरी जनरल साहेब बधत नाहीत,याची जाणीव मंत्र्यांना झाली. मागण्या मान्य करण्यावाचून त्यांच्यासमोर दुसरा पर्याय राहिला नाही.कारण भगत यांनी खरोखरच राजीनामा दिला असता, तर ते मोठं प्रकरण झालं असतं. त्याला वृत्तपत्रीय प्रसिध्दी मिळाली असती आणि सरकारची प्रतिष्ठा धोक्यात आली असती.

 अखेरीस हो ना करता करता वीजमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांशी संपर्क साधून काही दिवसांत भगत यांच्या मागण्या मान्य केल्या. एकंदर साडेचार कोटी रुपयांचे सुटे भाग आयात करण्याचं फर्मान सुटलं.

 सरकारी यंत्रणा धडाधड कामाला लागली. परदेशी कंपन्यांना आवश्यक त्या सुट्या भागांचा पुरवठा करण्याची ‘ऑर्डर’ देण्यात आली आणि एक चमत्कार घडला. इतके दिवस आजारी असणारा दामोदर व्हॅली प्रकल्प एकदम खडखडीत बरा झाला.चांगला धावू लागला आणि खरोखरंच सहा महिन्यांत वीज उत्पादन दुप्पट झालं.

 आता आपण विचाराल, यात चमत्कार कोणता? तर चमत्कार असा झाला होता की,परदेशांत सुट्या भागांची ऑर्डर देण्यात आली होती, तरी प्रत्यक्षात एकही सुटा भाग भारतात आला नव्हता. परदेशी सुट्या भागांशिवायच, केवळ देशी सुटे भाग वापरून उत्पादन दुप्पट झालं होतं.

 हा अभूतपूर्व प्रकार घडला तरी कसा? तर त्याचं असं झालं होतं की,जनरल भगत मंत्र्यांपर्यंत पोचले, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राजीनामा देण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आणि सरकारला वाकवलं, ही बातमी प्रकल्पाच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोचली होती. प्रकल्प व त्याचे कर्मचारी यांच्या हितासाठी वेळप्रसंगी सर्वोच्च पदाचा त्याग करण्याची तयारी असणारा अध्यक्ष त्यांना प्रथमच मिळाला होता. भगत यांंच्या निग्रही व त्यागी मनोवृत्तीचा योग्य तो परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला. आपल्या व प्रकल्पाच्या भल्याचा इतक्या आपुलकीने विचार करणाऱ्या अध्यक्षाचा शब्द खोटा ठरता कामा नये,या भावनेने त्यांना झपाटून टाकलं. भगत यांनी आपल्या कृतीतून कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला होता.या विश्वासातून आपणही प्रकल्पासाठी काहीतरी करून दाखविण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांमध्ये उत्पन्न झाला.या निर्धारातून प्रयत्नास सुरुवात झाली.परदेशांतून सुटे भाग येण्याची वाट न पाहता,देशी भागांमध्येच योग्य ते बदल करून कर्मचाऱ्यांनी प्रकल्पाची जनित्रं सुरू केली.जे देशी सुटे भाग उपयोगी पडणार नाहीत असं पूर्वी वाटत होतं, त्यांचा खुबीने उपयोग केल्यास ते वापरता येऊ शकतात हे त्यांच्या लक्षात आलं.

 या प्रयत्नांमधून थोड्याच कालावधीत अपेक्षित यश मिळू लागलं. सहा महिन्यात कोणत्याही परदेशी तंत्रज्ञानाशिवाय वीज उत्पादन दुप्पट झालं.‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’ ही संत तुकारामांची उक्ती या कर्मचाऱ्यांनी अक्षरश: खरी करून दाखविली.
 काही जण या कथेला ‘दंतकथा' ही समजतात. काहीही असलं तरी ती इतक्या सविस्तरपणे सांगण्याचे कारण असं की, यात व्यवस्थापनशास्त्राचं एक मूलभूत तत्त्व दडलं आहे. ते कोणतं? तर, जेव्हा व्यवस्थापकावर एखादं काम सोपविण्यात येतं,तेव्हा त्याच्या मनात दोन प्रश्न उपस्थित होतात.
 १. हे कशासाठी करायचं? (व्हाय डू इट)
 २. हे का करून दाखवू नये? (व्हाय नॉट डू इट)
 यापैकी पहिला प्रश्न जर व्यवस्थापकाच्या मनात मूळ धरून बसला तर त्याला हे काम करणं अशक्य होतं, याची अनेक कारणं सापडतील. मात्र त्याने दुसऱ्याच प्रश्नाला महत्त्व दिलं तर ते काम करण्याच्या अनेक मार्गांचा त्याला शोध लागेल.
 जनरल भगत यांनी दामोदर प्रकल्पाचं अध्यक्षस्थान स्वीकारण्यापूर्वी तेथील कर्मचाऱ्यांच्या मनात पहिला प्रश्न घर करून होता. त्यामुळे प्रकल्पाची दुर्दशा झाली होती. मात्र, भगत यांनी आपल्या वर्तणुकीद्वारा पहिल्या प्रश्नाचं रूपांतर दुसऱ्या प्रश्नात केलं आणि प्रकल्प यशस्वी करण्याचा मार्ग कर्मचाऱ्यांना सापडला.
 व्यवस्थापकाने त्याच्या कर्तव्यनिष्ठ, कणखर, निग्रही पण सहृदय वृत्तीतून कर्मचाऱ्यांच्या मनात विश्वास निर्माण केला की, विश्वासातून निर्धार, निर्धारातून प्रयत्न व प्रयत्नांतून यश अशी साखळी सुरू होते. हेच व्यवस्थापनातील मूलभूत तत्त्व होय.अशी साखळी प्रक्रिया सुरू करणं ही केवळ उद्योग क्षेत्रातीलच नव्हे, तर सर्वच क्षेत्रांतील व्यवस्थापकांची जबाबदारी आहे.