अंगारमळा/विद्या नामे अविद्येचा शिक्षक

विकिस्रोत कडून

विद्या नामे अविद्येचा शिक्षक


 सन १९५७ सालची गोष्ट. मी नुकतीच पदव्युत्तर परीक्षा पहिल्या क्रमांकाने पास झालो होतो. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसायचे ठरले होते आणि त्या दिवसात परीक्षेला बसल्यानंतर उत्तीर्ण होणार नाही, हा विचारही मनाला शिवत नसे. निकाल लागेपर्यत, वर्षभर तरी जाई, त्या काळात काही तरी करावे असे वाटत होते. थोडी फार, स्वत:पुरती का होईना कमाई करण्याची आवश्यकता होती.

 त्या काळी मुंबई विद्यापीठात व्यापार विभागाच्या पदव्या अर्थशास्त्राच्या व्याख्यात्याच्या जागेकरिता अपुऱ्या समजल्या जात. मी बँकिंगचे सुवर्णपदक मिळवलेले. अर्थशास्त्रीय संख्याशास्त्र आणि गुणवत्ता नियोजन तसेच आंतरराष्ट्रीय नाणेव्यस्था असे असाधारण विषय एकत्र केलेले होते. नदीखोरे योजनांवरील माझ्या प्रबंधास मुंबई विद्यापीठाचे पारितोषिक नुकतेच मिळाले होते, तेव्हा अर्थशास्त्राच्या व्याख्यात्याच्या जागेकरिता मी मुद्दाम अर्ज केला होता. त्याबरोबर संख्याशास्त्र आणि व्यापार या विभागातील जागांसाठीही केला होता.

 महाविद्यालय सुरू व्हायच्या आधी आठच दिवस भणग्यांचा निरोप आला. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात व्यापार महाविद्यालये तीन. त्यातली दोन मुबईत, एक पुण्यात. आम्ही सिडनेहॅमचे विद्यार्थी बाकीच्या दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना तुच्छ मानायचो. भणगे कोल्हापुरला व्यापार महाविद्यालय निघत होते तेथे प्राचार्य झाले होते. तसे कोल्हापूरचे राजाराम कॉलेज जुने आणि गाजलेले. तेथील विधी महाविद्यालय फार जुने. आणखी एक कॉलेज होते, तरीही कोल्हापूरला व्यापार महाविद्यालय ही कल्पनासुद्धा मला हास्यास्पद वाटत होती. भणग्यांना तिथे यायला व्याख्याते मिळत नव्हते. मी आलो असतो तर नवीन कॉलेजची ख्याती बरी झाली असती.

 माझा जीव खरे म्हणजे अर्थशास्त्राच्या व्याख्यात्याच्या जागेवर केवळ जिद्दीपोटी अडकला होता. भणगे म्हणाले, "तू कायम शिक्षणक्षेत्राततर राहणार नाहीस. मग तुला एवढी जिद्द करण्याचे काहीच कारण नाही." त्यांनी मला तीन वर्षांची पगारवाढ आधी देऊ केली. का कोणास ठाऊक मी त्यांचे म्हणणे मानले. भणग्यांच्या मैत्रीखातर? जादा पगारासाठी? कुणास ठाऊक.

 या निर्णयाचा मला पुढे पश्चाताप झाला. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर तीन दिवसांनी

मुंबई विद्यापीठातील तीनही व्याख्यात्यांच्या शासकीय सेवेतील जागांकरिता निवड झाल्याच्या तारा आल्या. शासकीय जागेकरिताची निवड माझ्यावर सोपविण्यात आली होती. पुन्हा एकदा भणग्यांना सोडून जाण्याचा मोह झाला. भणगे अगदी काकुळतीला आले. अधिकार स्नेहाचा होता. मग थोडा नैतिकतेचाही प्रश्न त्यांनी उठवला आणि मी कोल्हापूरलाच रहावयाचे ठरवले. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला बसताना याचा मला प्रचंड त्रास झाला.नवे काम, नवी संस्था; सिडनेहॅममध्ये दोन-तीन तास घेऊन अभ्यासाला मोकळा झालो असतो; इथे क्षणाचीही फुरसद मिळेना. परीक्षा चालू झाली तरी मला रजा घेणे अशक्य, कोल्हापूरहून संध्याकाळच्या एस.टी.ने निघून पुण्यास यायचे. रात्रीची पॅसेंजर पकडून कुर्ल्याला उतरायचे. सकाळी ६ पर्यंत अंधेरीला मोठ्या भावाच्या घरी जायचे, आंघोळ वगैरे उरकून परीक्षाकेंद्रावर जायचे आणि परीक्षा झाल्याबरोबर बोरीबंदरला धावत जाऊन 'जनता' पकडायची आणि कोल्हापूरला पहाटे पोहचून पहिल्या व्याख्यानाला हजर रहायचे असे पाचही पेपरांसाठी करावे लागले. पेपर अगदी भिकार गेले. उत्तीर्ण होणे अशक्य असे मी मनातल्या मनात समजून चाललो होतो.स्नेहापोटी एक वर्ष गेले. वार्षिक परीक्षा संपल्या की पुण्याला यायचे. सहा महिने पुन्हा झटून अभ्यासाला लागायचे आणि पुढच्या परीक्षेला पुन्हा बसायचे असे मी निश्चित केले. पण नापास होणे ही गोष्ट फार कठीण आहे.

 अशा थोड्या व्यस्त अवस्थेतच मी कोल्हापूरच्या पहिल्या काळात तरी होतो. मुंबईच्या सिडनेहॅम महाविद्यालयात आम्ही मराठी विद्यार्थी म्हणजे निव्वळ कचरा समजले जायचो. कान्ति पोद्दार, ढोलकिया ही आज उद्योगपती झालेली मंडळी त्यावेळी उद्योगपती-पुत्र होते. सन १९५१ मध्ये महाविद्यालयाच्या वार्षिक दिनी चिंतामणराव देशमुख आले होते. त्यांनी म्हटले, "देशात गोळा होणाऱ्या आयकरापैकी २५ % आयकर सिडनेहॅम विद्यार्थ्यांच्या पालकांकडून जमा होतो." आठवड्यातील सहा दिवस नव्या गाड्या आणणारे, कँटीनमध्ये पोरींबरोबर आडवे-तिडवे पैसे उधळताना पाहून, अगदी बाळबोध मनालासुद्धा हेवा वाटणारे मला मिळणारे महिन्याचे पाच रूपये ४ दिवससुद्धा टिकत नसत. आताचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ जगदीश भगवती त्यावेळी आमचा आदर्श होता. एस.एस.सी.ला बोर्डात पहिला आलेला. सकाळी मोटारगाडी त्याला कॉलेजमध्ये सोडायला यायची. हातात पुस्तकांचा गठ्ठा घेऊन तो मान थोडी कलती ठेवून वाचनालयात यायचा, व्याख्यानांचा काळ सोडल्यास मुक्काम संध्याकाळपर्यंत तेथेच. अभ्यासाची पुस्तके वाचायचा कंटाळा आला म्हणजे संस्कृतचे पुस्तक काढून

वाचायला लागायचा.

 प्राध्यापकांबद्दलही असाच दबदबा. साहित्यिक म्हणून गाजलेले गंगाधर गाडगीळ अर्थशास्त्र शिकवायला तर कवि पु.शि. रेगे वाहतुकीचे अर्थशास्त्र शिकवायला. मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बोरकर, डॉ. कान्ता रणदिवे, हरिभाऊ परांजपे ही मंडळी एकावेळी अध्यापक वर्गात होती. रणदिवेबाईंचे आम्हाला खूप कौतुक असे. जॉन रॉबिन्सन आणि चेंबरलेन यांच्या मूल्य विवेचनाचा गणिती भाग बाई तोंडातून शब्दांचा स्त्रोत चालू ठेवत डाव्या हातांनी फळ्यावर उतरवत असत.

 पण खरे दैवत म्हणजे डॉ. एस.के. मुरंजन, सिडनेहॅमचे प्राचार्य. आंतरराष्ट्रीय नाणेतज्ञ म्हणून मान्यता मिळालेली, नुकतेच अमेरिकेहून परतलेले, मराठीत त्यांच्या नाणेव्यवस्थेवरील गाजलेली दोन पुस्तके नुकतीच प्रसिद्ध झाली होती. ही पुस्तके मराठीत लिहिल्याबद्दल तक्रार झाली. त्यांनी उत्तर दिले की, "ज्यांना या विषयाचा इतका उच्च अभ्यास करायचा आहे. त्यांनी मराठी शिकायला काय हरकत आहे." बस्स. या एकाच उत्तरावर आम्ही लट्टू होतो. त्या एका वाक्याने पदोपदी मराठी माणसाचे दैन्य धुतले गेल्यासारखे वाटत होते. मुरंजनांनी आम्हाला बँकिंग काही शिकवल्याचे मला आठवत नाही. पण कांटशी ओळख त्यांनी करून दिली. "I think, therefore, I am." या उक्तीतला सगळा उल्हास आणि आवेग मुरंजनांच्या चेहऱ्यावर अनुभवला. कोणी विद्यार्थी बेशिस्त वागला म्हणजे काही न बघता एका सहामाहीची फी दंड करण्याचा त्यांचा प्रघात असे. जिन्यावरून मुरंजन येत आहेत, हे कळले तरी आमची धावाधाव व्हायची. त्यांची एक 'चलती का नाम गाडी' होती. उद्योगपती पुत्र तिची खूप कुचेष्टा करायचे पण मुरंजनांनी गाडी असल्याशिवाय आयुष्य कसे व्यर्थ आहे, यावरच एक व्याख्यान दिले आणि त्याचा आम्हाला कुणालाच खेद झाला नाही.

 सकाळी अंधेरीहून लोकलने मरिन लाईन्सपर्यंत यायचे आणि तेथून चालत बोरीबंदरला जायचे. आपण आपला आभ्यास. क्रिकेट नाशिकलाच सोडलेले. देशाविषयी, अर्थव्यवस्थेविषयी, समाजातील सर्व संस्थांविषयी आमच्या कल्पना सगळ्या पुस्तकी. धनवानांच जगाचे ज्ञान कितीतरी जास्त व्यापक होते. एकदा विद्यार्थ्यांच्या गटात काही चर्चा चालली होती, समाजातील भ्रष्टाचाराबद्दल. कोणीतरी मराठी मुलानेच मुद्दा मांडला. "पण न्यायव्यवस्था तरी अजून स्वच्छ आहे. अशी माणसे आहेत तोपर्यंत काही आशा करायला जागा आहे." मला वाटते कान्ती पोद्दारनेच मुद्दा फटकारून टाकला, "कोणाला काय पुरवायला लागते, मे मला विचारून घे." एका वाक्यात एक नवे विश्वरूपदर्शन झाले.

 पण कोल्हापुरात आल्यावर आता मी धनवानांत जमा झालो होतो. त्याकाळी रु. २१० एकूण पगार म्हणजे वैभव होत. कोल्हापूरच्या सर्वोत्तम लॉजमध्ये शाकाहारी जेवणाला महिन्याला रु. ३० लागत होते. मांसाहारी जेवणाला रु. ३५. मी पद्मा गेस्ट हाऊसमध्ये उतरलो होतो. अजून रहावयाची जागा शोधत होतो. शेवटी वसतिगृहावर व्यवस्थापक म्हणून रहायला गेलो.

 एका संध्याकाळी गेस्ट हाऊसवर जेवत असताना, वाढणाऱ्या मुलाने चाचरत मला विचारले, "सर, ओळखलं का मला?" मी वर पाहिले. मला खरोखरच ओळख पटली नाही. तेव्हा तोच म्हणाला, "सर, मी तुमच्या वर्गात विद्यार्थी आहे, खांडेकर माझे नांव."
 महाविद्यालयातील विद्यार्थी, इथे गेस्ट हाऊसमध्ये वाढण्याचे काम करतो आहे. एकूण सर्व परिस्थितीची कल्पना येणं कठीण नव्हते. याच कोल्हापुरात माझे वडील अनाथ विद्यार्थी होते. जेवणाची इकडे तिकडे सोय लावून शिकले होते. मी माझी परीक्षा, माझे भविष्य, माझी स्वप्ने यांच्या पलीकडे असलेल्या एका जगाचा पडदा खांडेकरने उघडून दाखवला होता.

 सन १९५७ साली फार आड खेड्यापाड्यांतली शेतकऱ्यांची मुलं महाविद्यालयांत यायला लागली नव्हती. त्यांची फीची जबाबदारी शासनाने घेतल्यानंतर त्यांची संख्या वाढली. तरी दोनतीन मुलांच्या पुस्तकांची फीची व्यवस्था करणे पडले तेवढ्यावरच सामाजिक कर्तव्याची बाजू भागली.

 शिक्षणाचे माध्यम त्यावेळी इंग्रजी होते. भगण्यांचे इंग्रजी आणि मराठीवर सारखेच प्रभुत्व. ते वर्गात दोघांचे मिश्रण करीत. मला हे पटत नसे. मुंबईतही इंग्रजी वक्तृत्वाबद्दल माझी प्रसिद्धी होती. कोल्हापुरात त्याकाळी असे इंग्रजी दुर्मिळच होते. इतर कॉलेजांतले विद्यार्थीही केवळ इंग्रजी ऐकायला येऊन बसत असत. मोराने आपलाच पिसारा खुलवून नाचावे आणि त्यातच समाधान मानावे तसा हा प्रकार. अगदी जाहिरातशास्त्राच्या व्याख्यानातसुद्धा. साहित्य काव्यात्मक इंग्रजी व्याख्यान मी द्यायचो. पाच दहा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दाद मिळे. बाकीचे सगळे, 'अजि म्यां ब्रह्म पाहिले' अशा आविर्भावात बसून रहात. याबद्दल कधी वाईट वाटले तर मी स्वत:ची तुलना माझ्या प्राध्यापकांशी करे. डॉ. मुरंजन, डॉ. रणदिवे कुठे आम्हाला समजले आहे किंवा नाही याचा विचार करीत होते? ते त्यांच्या वेगाने जात. आम्ही त्यांच्यामागे जीव मुठीत धरून धावायचो, दमछाक व्हायची पण हळू हळू दम वाढत गेला. स्वत:च झेप घेण्याची ताकद आली. मग या विद्यार्थ्यांनाचते का जमणार नाही? आवश्य जमेल, आपण आपल्या

गतीनेच गेले पाहिजे. प्राध्यापक म्हणजे शाळकरी शिक्षक नव्हे.

 त्यावेळी माझ्या लक्षात आले नव्हते की, माझ्याबरोबरचे विद्यार्थी आणि माझे विद्यार्थी यात महदंतर होते. आर्थिक चणचण असली तरी सिडनेहॅममधला विद्यार्थी जात्याच आणि संस्काराने सर्वांगपरिपूर्ण होता. त्याच्या अवयवांत दोष नव्हता. व्यायाम दिल्यास आणि खुराक मिळाल्यास तो बलभीम बनू शकत होता.

 कोल्हापूरला माझ्यासमोर भक्तिभावाने ऐकणारे विद्यार्थी अपंग होते. एका अर्थान मतिमंद होते. प्राध्यापकाला उड्डाण करताना पाहता पाहता पंख उभारून उडण्याचा प्रयत्न करण्याचेही सामर्थ्य त्यांच्यात नव्हते. पिढ्यानपिढ्यांची गरिबी आणि निरक्षरता यांनी त्यांना सर्वार्थाने खच्ची केले होते. तसे ते शिक्षणासाठीही आलेले नव्हते. महाविद्यालयाचा परिस अंगाला लागला तर शेतीच्या खातेऱ्यातून सुटू या आशेने ते आलेले होते. महाविद्यालय, शिक्षण, प्राध्यापक ही त्यांच्या दृष्टीने प्रगतीची साधने नव्हती, अपरिहार्यपणे उल्लंघण्याचे अडथळे होते. आणि हे अडथळे ओलांडत खेड्याच्या जीवनातून जिवंत कसे सुटता येईल हे ते घाबऱ्या डोळ्यांनी निरखत होते.

 आज नाही म्हटले तरी माझ्या भाषणांचा एक लौकिक आहे. अतिरिक्त मूल्य आणि भांडवल निर्मिती, आर्थिक विकासाच्या नैसर्गिक प्रक्रिया हे असले पदव्युत्तर विद्यार्थ्यांनाही जड वाटणारे विषय, बहुतांश अडाणी, निरक्षर शेतकऱ्यांच्या हजारोंच्या सभेत समजावून सांगतो; एकही इंग्रजी शब्द न वापरता, एकही बोजड शब्द न वापरता. शेतकऱ्यांच्या शब्दांत त्यांच्या उदाहरणाने, त्यांच्या रूपकांत. शेतकऱ्यांना ते समजते. त्याकरिता ते जीव ओवाळून टाकायला तयार होतात. हा एक चमत्कारच आहे. पण तसा समजायला कठीण नाही.

 पुस्तकातली विद्या इकडे खरीदून तिकडे विकायच्या दलालीत प्रतिभा येणार कोठून? सगळा पदव्यांचा भार सोडून आंबेठाणच्या माझ्या कोरडवाहू शेतीत मी उभा राहिलो आणि आर्थिक विकासाच्या प्रश्नाचे उत्तर मलाच मनोमन मिळाले. म्हणून वाचा सरस्वती फूलली. विद्यानामे अविद्येचे ओझे टाकले तेव्हा मी खरा विद्यार्थी बनलो आणि शिक्षकही.

 (शेतकरी संघटक, १० ऑक्टोबर १९८५ प्रचलित अर्थव्यवस्थेवर नवा प्रकाश भाग २- प्रथमावृत्ती, डिसेंबर १९८५, या पुस्तकातून)

■ ■