अंगारमळा/शंकरराव गेले

विकिस्रोत कडून


शंकरराव गेले


 शंकरराव वाघ गेले. फुप्फुसाचा असाध्य कॅन्सर झाल्याचे तीन महिन्यांपूर्वीच लक्षात आले होते. तीन महिन्यांपासून तसा दिवस मोजण्याचाच कार्यक्रम चालू होता.७ ऑगस्ट १९९५ रोजी दुपारी ३.१५ वाजता शेवट आला. दुपारपर्यंत हिंडते फिरते असलेले शंकरराव एकदम निघून गेले. पावणेचार-चारच्या सुमारास पुण्याला मला बातमी कळली. हातातली सारी कामे सोडून चाकणला शंकररावांच्या घरी जायला निघालो. शवयात्रा घरातून निघून गेली होती. आम्ही पाठोपाठ चक्रेश्वराच्या स्मशानभूमीत पोचलो. गर्दी दूर करून दर्शनाला गेलो. शंकररावांचा चेहरा पाहिला तेव्हा पहिल्यांदा खरी जाणीव झाली, की शंकरराव आता कायमचे गेले.

 चेहऱ्यावर इतक्या प्रदीर्घ आजारानंतरसुद्धा काहीच फरक दिसत नव्हता. त्यांच्या अंगावर मांस असलेले मी कधी पाहिलेलेच नाही. नुसती हाडे आणि कातडी आणि त्यांच्या आधाराने न मावणारी चेतना आणि शक्ती. माझ्या अठरा वर्षांच्या परिचयात त्यांचे वजन दहा ग्रॅमनेसुद्धा कधी वाढलेले पाहिले नव्हते. एका रतीभरानेही वजन कमी होण्याची काही शक्यताच नव्हती. शंकररावांची एक खास बढाई असायची. ते म्हणायचे, 'मी आणि हेलन, दोनच माणसं अशी, की ज्यांचे वजन कधी बदलत नाही.' अलीकडे दूरदर्शनवर हेलन दिसली. चांगल्यापैकी टुणटुणीत दिसली; शंकरराव मात्र शेवटपर्यंत तसेच राहिले.

 समोर शंकरराव पहुडलेले, फुलांच्या आवरणाखाली. तेव्हा खात्री पटली, शंकरराव खरेच गेले. चाकणच्या, नाशिकच्या, निपाणीच्या आणि चंडीगडच्या आंदोलनांत असे कित्येक प्रसंग आले; शंकरराव कुठे बेपत्ता, कुठे गेले कोणालाच माहीत नाही आणि मग एकदम अपेक्षा नसताना ते अवतारायचे. नाशिकच्या तुरुंगात असेच कधी मध्यरात्री प्रकट झाले. बल्लारीच्या तुरुंगात मुंबईच्या वार्ताहरांना घेऊन खोट्या नावाखाली, जेल अधिकाऱ्यांना गुंगारा देऊन आले. चंडीगडच्या तुरुंगात आतंकवाद्यांच्या वेढ्यात, तूप ओसंडून पाघळणारा ट्रॅक्टरभर शिरा घेऊन आले. पुण्याला बातमी ऐकली तेव्हा मनांत कोठेतरी असे भासत होते की, गेलेत म्हणजे काय एकदम कुठंतरी अवतीर्ण होतील. शंकररावांना उचलायला दोन माणसेसुद्धा पुरी झाली असती. सहा जणांनी उचलून त्यांना सरणाकडे नेले तेव्हा खाडकन जाणीव झाली शंकररावांच्या या जाण्याला परत येणे नाही.

 शेतकरी संघटनेतील नवीन कार्यकर्त्यांना शंकरराव वाघ क्वचित पाहून, थोडेफार त्यांच्याविषयीच्या आख्यायिका ऐकून माहीत आहेत. दहा वर्षांपूर्वी शंकरराव साऱ्या हिंदुस्थानभरच्या शेतकरी आंदोलनाच्या केंद्रस्थानी होते. एवढीशी फाटकी मूर्ती, पांढरा शुभ्र परीट घडीचा पायजमा, तसाच झब्बा आणि कधी न चुकणारी गांधी टोपी; निम्मा, अधिक वेळ तोंडात विडी, डोक्यात एक विशेष जागेपण. शंकरराव झोपेने पेंगुळल्याचे मी कधी पाहिलेले नाही. सगळ्या धावपळीत आम्ही सारे थकून झोपलो तरी शंकरराव त्यांच्या धावपळीतच असणार. मी उठलो आहे आणि कामाला लागायला शंकरावांची तयारी नाही म्हणून खोटी झाली असे कधीच झाले नाही. सर्व जग झोपलेले असताना जागे राहणारे शंकरराव सगळे जग जागे असताना कधी झोपलेले मी पाहिले नाही. बोलायचे नाही म्हटले तर दिवसेंदिवस बोलायचे नाहीत. त्यांना न आवडणाऱ्या गोष्टी कोणी बोलत असेलच तर संयमाने ऐकून घेणार आणि मग एका अर्ध्या वाक्यात त्याला पार धोबीपछाड घालणार.

 त्यांच्या फाटक्या मूर्तीला महाराष्ट्रात शंकरराव म्हणत, पंजाबी शंकरसिंग म्हणत, गुजराथी खेडुतांचे ते शंकरभाई होते, दक्षिणेत शकरअप्पा, चंडीगडच्या साऱ्या आंदोलनात ते 'सँकर टायगर' म्हणून मशहूर होते.

 अठ्याहत्तर एकोणऐंशीचा काळ, आंबेठाणच्या शेतीत वर्षादोनवर्षांच्या अनुभवाने धुके एकदम दूर व्हावे आणि विश्वरूप दर्शनाची सुरवात व्हावी तसा. शेतीमालाच्या रास्त भावाचे अर्थशास्त्र उलगडू लागले होते. आपल्या डोळ्यांना इतकी स्पष्ट दिसणारी गोष्ट बाकीच्यांना कशी समजत नाही? आपलेच तर काही चुकत नाही ना? अशीही शंका मनाला डाचून जाई. जिथे जिथे जमेल त्या त्या गावी जाऊन जास्तीत जास्त शेतकरी जनांपुढे आपल्याला आकळलेले ब्रह्मज्ञान मांडावे आणि त्यांच्या चेहऱ्यावर काही प्रतिक्रियातरी दिसते आहे का हे पहावे ही आमची धडपड. भामनहर खोऱ्यातील चोवीस गावांत त्यांना जोडणारी सडक पक्की करण्याचा विषय घेऊन जायचो आणि भाताच्या रास्त भावाचे आणि कांद्याच्या समस्येचे सूतोवाच करायचो. मी परदेशातून आलेला. स्वित्झर्लंडच्या राहणीमानाने आलेले तेज अजून न उतरलेला.शेतकरी मला पाहून गोंधळून जात. एका निवडणुकीच्या निमित्ताने शंकरराव वाघ आणि बाबूलाल परदेशी यांची ओळख झाली. लहान पोरांनी दिवाळीत लहान लहान किल्ले बांधावेत आणि लुटूपुटूच्या लढाया खेळाव्यात तसा खरा प्रकार. पाच पिढ्यांत शेतीशी संबंध नसलेला, शेतकऱ्यांच्या वैरी जातीत जन्मलेला, तपभरतरी मराठीचा स्पर्श नसलेला मी; कसाबसा पदवीधर, शिक्षकीचा

थोडा अनुभव, कीर्तनकार म्हणून थोडे नाव आणि सदा समाजवादी चळवळीच्या जवळ असलेला बाबूलाल परदेशी, त्याने काही वेगळ्याच हेतूने 'वारकरी' नावाचे साप्ताहिक सुरू करण्यासाठी नोंदणी करून ठवेली होती. त्याच नावाशी आंदोलनाचा अकटोविकट बादरायणी संबंध जोडून 'वारकरी' साप्ताहिक सुरू झाले, ९ऑगस्ट १९७९ रोजी. शंकरराव चाकणचे जुने रहिवासी. घर धार्मिकतेकरिता प्रसिद्ध. अगदीच काही अनामिक नाही. काही काळ चाकणचे सरपंच राहिलेले, राष्ट्र सेवा दल आणि डाव्यांच्या चळवळीच्या बांधावर राहून मदत केलेले. शेतीपोटी भरड जमीन. म्हणून दुकानदारी, व्यापार, ट्रक वाहतूक, मुंबई-पुण्याची अडत, इतर काही व्यवसाय अशा खटाटोपी केलेला. काय दैवाच्या गाठी होत्या कुणास ठाऊक ? मी जायचे, तिथे त्यांनी दोघांनीही यायचे असा सुरवातीच्या काळातला नियम.

 बाबूलाल पट्टीचा वक्ता, मोठा बहुश्रुत. माझ्याबरोबर येण्याच्या कष्टांची बाबूलालच्या बाबतीत काही तरी भरपाई होती. शंकररावांच्या बाबतीत तीही नाही. चुकून कधी व्यासपीठावर शंकरराव पाऊल टाकायचे नाहीत. पुष्कळ वर्षांनी कार्यकर्त्यांच्या एका बैठकीत त्यांनी बोलायचा प्रयत्न केला; पण माईकचं आणि शंकररावाचं कधी जमलं नाही. खासगी बैठकीत म्हणजे सगळेजण बसलेले असताना जिभेवर अफाट अनुभवाची, परखड मतांची सरस्वती नाचवणारे शंकरराव सभेत अगदी 'मौनीबाबा'.

 माझ्या प्रेमापोटी शंकररव संघटनेत आले.या कामातली माझी तळमळ आणि उत्साह निरर्थक आहे अशी त्यांची मनोमन खात्री असावी; पण 'बाबा काहीतरी धडपतोय ना, मग त्याला साथ द्यावी.' त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर "तुम्ही फक्त 'की' म्हणा आम्ही 'जय' म्हणायला आहोतच." शेतकरी भोळा असतो, गरीब नाडला जात आहे, त्याच्या गुलामीतून सुटण्याकरिता तो नांगर टाकून तलवार हाती घेईल ही माझी सारी खुळचट स्वप्ने आहेत ही शंकरावांची धारणा. अगदी चाकणच्या आंदोलनापासून ते मला बजावीत, "तुम्ही कांद्याच्या भावाविषयी बोलता म्हणून हे लुच्चे येतात; तुरुंगात जायची वेळ आली, की हे कोणी तहान लागली म्हणून, कोणी लघवीसाठी, कोणी कशासाठी असे काढते पाय घेतील." अशी त्यांची खात्री.

 आणि तरीही कोणताही कार्यक्रम निघाला, की सांगितल्या वेळी सांगितल्या जागी शंकरराव हजर. त्यांच्या घरची परिस्थिती बिकट. शंकरराव कर्ता कारभारी माणूस. मुले लहान लहान. त्यांच्या गैरहजेरीत कुटुंबातील लोकांची चांगलीच दैना होत असणार; पण या सगळ्यांचा शंकररावांनी कधी अवाक्षरानेही उल्लेख केला नाही.

 त्यांच्या कोणत्यातरी व्यवसायाच्या निमित्ताने साखर कारखानदारांशी त्यांची घसट झालेली. नाशिकच्या आंदोलनात सर्व काळ शंकरराव माझ्याबरोबर होते. माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील कराड सारे कसलेले जाणकार; पण शंकरराव शाब्दिक चकमकीत कधी कमी पडले नाही. 'ऊसवाले आणि कारखानदार म्हणजे सारे कुऱ्हाडीचे दांडे, गोतास काळ' हे त्यांनी सरळ मांडले. 'साखर कारखानदार म्हणजे एकाहून एक माजलेले पोळ, एकास एक बिलंदर. महाराष्ट्राचे राजकारण खेळणारी इरसाल माणसं', ही शंकररावांची टिप्पणी. आग्रा रोडवरील रास्ता रोकोत सरकारी अधिकारी ट्रक ड्रायव्हरांशी संगनमत करून माझ्या जिवावर उठण्याचा खेळ खेळताहेत हे हेरण्याचा चाक्षाणपणा शंकररावांचाच. मी तुरुंगात उपोषण करत असताना माझ्या बायकोबरोबर रात्री मध्यरात्री गावोगाव फिरून शेतकऱ्यांना 'तुमचा बाप उपास करतो आहे, तुम्ही काय भाकऱ्या मोडत बसलात?' असे बजावणारेही शंकररावच.

 शंकररावांना आदर किंवा धाक वाटेल इतका मोठा माणूस जन्माला आलाच नाही. त्यांनी मोठेपणाचा कधी हव्यास धरला नाही. माझी एका अर्थाने सावली होण्यात समाधान मानले; पण सर्वकाळ डोळे उघडे, मेंदूतील चाके अविरतपणे चालणारी, विरोधातील कोण कसा आंदोलनात आलेला, कोण हौशा, कोण नवशा, कोण गवशा यावर शंकररावांची टिप्पणी मोठी ऐकण्यासारखी असे. माणसांचा त्यांचा अंदाज मोठा अचूक. सभा चालू असताना दौऱ्याच्या काळात त्यांचे काही विचित्रच उद्योग चालत. सभेच्या मागच्या बाजूला उभे राहून एखादे सोईस्कर सावज हेरून त्यांना 'काय येडे झाले का तुम्ही? या बामणाचे ऐकता?' किंवा 'याला काय शेतीतलं समजतं' अशा तऱ्हेने भडकावून देऊन लोकांची प्रतिक्रिया अजमावून पाहण्याचा त्यांचा धंदा. शंकर धोंडगेसुद्धा शंकरराव वाघांच्या या चाळ्यांना बळी पडले आणि माझ्याकडे तक्रार करू लागले, 'तुमच्या अगदी जवळच्या माणसांतदेखील संघटनेविरुद्ध उघड बोलणारी माणसं आहेत.'

 निपाणी आंदोलनाच्या शेवटच्या काळात, भाई धारियांना पोलिसांनी लाठीचा खूप प्रसाद दिला, 'शरद जोशींना यांनीच निपाणीला आणले.' हा त्यांचा राग व्यक्त करीत. भाईंनी ही गोष्ट नंतर सांगितली. मी म्हटले, 'तुम्हाला मी आंदोलनात आणले अशी माझी कल्पना. तुम्ही मला आणले हे माहीत नव्हते.' भाई रहस्यपूर्ण हसले. शंकरराव म्हणाले, 'आम्हाला कोणी आणले नाही आणि आम्हीही कोणाला आणत नाही. आम्ही फक्त नदीच्या काठी टोपली ठेवून बसतो, गळसुद्धा टाकत नाही. मासे आपण होऊनच टोपलीत येऊन पडतात आणि आम्हीच कोळ्याला धरले अशी फुशारकी मारतात !'

 एका राजकीय पक्षाच्या पुढाऱ्याला संघटनेत राहवतही नव्हते आणि ती सोडवतही नव्हते. त्यावर शंकररावांचे लाडके भाष्य 'माकडा हाती फुटाणे!' फुटाणे सोडवत नाहीत आणि मूठ सोडल्याशिवाय हात मडक्यातून निघत नाही!

 शंकरराव त्यांच्या आवडीची एक आठवण अनेकदा सांगत. यशवंतराव चव्हाण गृहमंत्री असतानाची गोष्ट. पुण्याच्या सर्किट हाऊसवर त्यांचे जेवण झाले आणि मग लोकांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. जेवणातील कोंबडीचा एक धागा यशवंतरावांच्या दातात अडकून त्यांना मोठा बेचैन करत होता. वारंवार त्यांची जीभ तिकडे वळत होती. शंकररावांनी परिस्थिती अचूक हेरली आणि खिशातून दातकोरणे काढून यशवंतरावांना सादर केले. त्यांचा चेहरा एकदम उजळून गेला. शंकररावांचा खिसा ही एक जादूगाराची पोतडीच होती. विडी, माचीस या त्यांच्या गरजा. त्याखेरीज कुणाला लागली तर लवंग, सुपारी, कुणाचे डोके दुखु लागले तर ॲस्प्रिन, कुणाच्या घरात लहान मूल असेल तर त्याच्यासाठी निदान लिमलेटची गोळी, टोपीत कोठे तरी टाचणी, सुईदोरा, मला बऱ्याच दिवसांनी भेटत असले तर खाऱ्या शेंगदाण्याची एखादी पुरचुंडी. असं सारं म्युझियम त्यांच्या इवल्याशा खिशात कायम हजर.

 सगळ्या जगाकडे अनादराने आणि धुत्काराने पाहण्याची शंकररावांची ताकद मोठी अजब. त्या काळी मी समाजवाद्यांविरुद्ध उघड बोलत नसे; पण 'समाजवादी' हा शंकररावांचा खास चेष्टेचा विषय. 'प्राथमिक शिक्षिका असलेल्या बायकोकडून दहा रुपयांची खर्ची मिळवून, सामाजिक परिवर्तनासाठी बाहेर पडलेले' ही त्यांची टिप्पणी.

 पत्रकार आंदोलन समजून घेत नाहीत, शेतीमालाच्या भावाचे अर्थशास्त्र त्यांना कळलेले नाही याचा आम्हाला मोठा उद्वेग वाटायचा. गोविंद तळवलकर आपल्याविरुद्ध लिहितात यात चिंता करण्यासारखे काही नाही. 'ज्या दिवशी महाराष्ट्र टाईम्स् आपल्या बाजूने लिहील त्या दिवशी आपले काहीतरी चुकते आहे की काय ते तपासून बघा' अशी माझी मल्लिनाथी. शंकरराव असली मखलाशी करत नसत. त्यांचा आपला एक लोहाराचा टोला, 'पत्रकारांना तुम्ही एवढे मानता का? ते काय चित्रगुप्त आहेत का स्वर्गातून उतरले आहेत? एस.टी. मध्ये कंडक्टरची नोकरी मिळाली नाही, ते पेपरात चिकटले. त्यांना काय एवढे महत्त्व द्यायचे?'

 संघटनेच्या कामांत अनेक माणसे आली; कोणी वकील, कोणी डॉक्टर. आमचा कामाचा खाक्या मोठा विचित्र. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर वर्तमानपत्राचा कागद अंथरून आम्ही झोपणार. अंबाल्याच्या बस स्टेशनवर पथारी टाकणार. बसच्या टपावर बसून

यात्रा करणार. जेवायची सोय म्हणजे मुरमुरे आणि शेंगदाणे. या मोठ्या लोकांना फार जड वाटायचे. त्यांची हयगय दिसली, की शंकररावांना तोंडाचा फटका द्यायची चांगली संधीच. त्यांनी कुचेष्टा चालू केली, की 'भीक नको, कुत्रा आवर' म्हणून भलेभले चूप व्हायचे.

 संघटनेच्या आधी अनेक आंदोलनांशी शंकररावांचा संबंध आला. पण, तुरुंगात जाणे हे त्यांना न आवडणारे काम. त्यांना दोन खास सवलती होत्या. 'बहिर्जी नाईकी' करण्याकरिता पाहिजे तेव्हा बिल्ला न लावण्याची मुभा आणि तुरुंगाच्या बाहेर राहण्याची कामगिरी. आंदोलकांना तुरुंगात राहणे ही सगळ्यात आरामाची सुखावह गोष्ट. तुरुंगाच्या बाहेर राहणाऱ्यांना श्वास घ्यायची उसंत मिळत नाही. सतत धावपळ. पत्रकारांना भेट, वकिलांशी संपर्क साध, कार्यकर्त्यांना सूचना दे, तुरुंगातील लोकांना लागणाऱ्या तंबाखू, विड्या पोचवा, त्यांच्या कुटुंबियांना निरोप द्या. हा सगळा कामाचा बोजा शंकररावांनी प्रामुख्याने उचलला.

 ऑपरेशन ब्ल्यू स्टारनंतर पंजाबमधली परिस्थिती मोठी रौद्र आणि विचित्र झाली होती. मार्च ८४ च्या पंजाबच्या राजभवनाच्या घेराओच्या कार्यक्रमात खांद्याला खांदा लावून लढलेले पंजाबी शेतकरी आता शिखांवर काय भयानक अत्याचार चालू आहेत याची काहीशी अतिरंजित, रक्त तापवणारी वर्णन करत होते. शेतकरी आंदोलन वाचवायचे असेल तर स्वस्थ बसून चालणार नाही. काहीतरी आंदोलनाचा कार्यक्रम घेतला पाहिजे असे ठरले. सत्याग्रह चालू करून भारतीय किसान युनियनच्या हजारो शेतकऱ्यांना तुरुंगात घेऊन जाणे आणि त्यांच्या सत्याग्रहाला साऱ्या देशभरातील शेतकऱ्यांनी सक्रिय पाठिंबा देणे असा कार्यक्रम ठरला. त्यामुळे पंजाबातील शेतकऱ्यांना आपण एकाकी नाही, देशातील वेगवेगळ्या राज्यांतील वेगवेगळ्या धर्मांचे, वेगवेगळ्या जातींचे शेतकरी आपल्याबरोबर आहेत असा विश्वास वाटेल अशी कल्पना. जुलै ८४ मध्ये सत्याग्रह सुरू झाला. आम्ही सगळ्यांनी तुरुंगात जायचे, शंकररावांनी मात्र छातीला बिल्लासुद्धा न लावता बाहेर राहायचे. पंजाबमधील सत्याग्रहाला पुरेसा प्रतिसाद मिळतो आहे असे दिसले, की महाराष्ट्रात आंदोलन घडवून आणण्यासाठी निरोप द्यायचा असे ठरले. हजारएक सरदार शेतकऱ्यांबरोबर आम्ही महाराष्ट्रातील दहा जण चंडीगड जेलमध्ये गेलो आणि चार दिवसांत महाराष्ट्रात शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू झाल्याची बातमी वर्तमानपत्रांत वाचायला मिळाली. हे एवढे चटकन घडले कसे? त्या वेळी चंडीगडहून बाहेर निरोप पाठवणेसुद्धा जवळजवळ अशक्य होते. शंकररावांनी चंडीगडमधील एका फळविक्रेत्याकडून पुणे

मंडईतील एका अडत्याला तार पाठवली होती: 'सफरचंदे पाठवू नयेत.' पुण्यातील अडत्यांनी रामचंद्र बापू आणि भास्करभाऊंना तो सांकेतिक निरोप कळवला. त्यांना अर्थ समजला आणि लगेच आंदोलनाची घोषणा झाली.सांकेतिक संदेशाची ही व्यवस्था मी घालून दिलेली नव्हती, ही सारी शंकररावांची दूरदृष्टी, कल्पनाशक्ती.

 कॉलेजचे तोंड न पाहिलेले शंकरराव राम जेठमलानींना आमची केस कशी समजावून सांगत कोण जाणे? चंडीगडच्या उच्च न्यायालयात भालसिंग मलिक म्हणजे मोठे मशहूर वकील. संघटनेवर त्यांचे मोठे प्रेम. आपल्या युक्तिवादाने आणि भाषणाने भल्याभल्या न्यायाधीशांना आणि प्रतिपक्षाच्या वकिलांना चकित करणारे भालसिंग शंकररावांसमोर हात जोडून "शंकररावजी, तुम्ही फक्त हुकूम द्या, अंमल करण्याचे काम आमचे," असे म्हणताना मी ऐकले आहे. चंडीगडच्या इस्पितळात तीन आठवडे माझ्याबरोबर शंकरराव होते. हिंदुस्थानातील श्रेष्ठ श्रेष्ठ तज्ज्ञ डॉक्टरांचा तेथे गठ्ठा होता. पण त्या सगळ्यांना शंकरराव मोठ्या थाटात हुकूम सोडत असत.

 कांद्याचे आंदोलन मागे पडू लागले, तसे मी त्यांना शेवटी म्हटले, 'आता बाहेर काहीच काम नाही, चला तुरुंगात आराम करू,' तेव्हा फक्त एकदाच शंकरराव आमच्याबरोबर औरंगाबादच्या हर्मूल तुरुंगात दहा दिवस आले. नाहीतर त्यांची कामगिरी 'डुबाव', कोणाच्या नजरेस न येणारी; गाजावाजा न होणारी, पण अत्यंत मोलाची.

 चाकण म्हणजे 'मावळांचे प्रवेशद्वार.' तीनशे वर्षांपूर्वी जगाच्या दृष्टीने नगण्य असलेल्या मावळ्यांनी तेथे इतिहास घडवला. स्वराज्याची लढाई झाली नसती तर कितीक तानाजी, बाजीप्रभू, येसाजी आणि सावळ्या तांडेल जगाला अज्ञात राहिले असते. शेतकरी आंदोलन झाले नसते तर शंकरावांची विलक्षण बुद्धी, परखड मते, कोणाचा मुलाहिजा न ठेवता तोंडावर बोलण्याचा निर्भीडपणा, घरच्या साऱ्या अडचणी दूर ठेवून कोंडाण्याच्या लग्नाला पुढे जाण्याची तत्परता, निष्ठा सगळे समुद्राच्या तळातल्या रत्नाप्रमाणे अज्ञात राहिले असते.

 पुढे, शंकररावांच्या घरच्या अडचणी वाढल्या. आंदोलनाचे स्वरूप बदलले, आवाका वाढला, शंकरराव स्थानिक संघटनेच्या कामापुरते राहिले; पण कुठे मोठी सभा असली, अधिवेशन असले, कार्यकारिणी असली, की अनंत अडणी दूर करून शंकरराव येणार, आपल्या धन्याच्या समाधीपुढे मूकपणे येऊन बसणाऱ्या 'खंड्या'सारखे बसणार. संघटनेच्या कार्यक्रमाविषयी एक अक्षर बोलणार नाहीत. पसंती दाखवणार नाहीत, नापसंती नाही. संघटनेने 'की' म्हटले की 'जय' म्हणण्याचे आपले काम. मी पुन्हा कधी

हाक मरली आणि आपण हजर नव्हतो असे होता कामा नये ही त्यांची तहान.

 माझ्या आजारपणात इस्पितळात असताना शंकररावांना असाध्य कॅन्सर झाल्याची बातमी कळली. काही दिवसांचाच प्रश्न आहे हेही स्पष्ट झाले. इस्पितळातून बाहेर पडल्यावर मी त्यांना भेटायला गेलो आणि ऐंशी सालच्या गप्पाटप्पांच्या थाटांत म्हणालो, 'शंकरराव मला सोडून पुढे चालले काय?' जणू काही झालेलेच नाही अशा अविर्भावात शंकरराव म्हणाले, "छ्यॅ, छ्यॅ, आपण कुठे जात नाही.' पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी असे बोलल्यानंतर विडी काढून शिलगावली असती, आता ते शक्य नव्हते. विडीही ओढायची नाही आणि सध्या संघटनेचे काही निकडीचे काम लवकर निघायची शक्यता नाही हे हेरून शंकराव गेलेले दिसतात. त्यांची ओळख झाली ते पूर्वजन्मीचा ऋणानुबंध असल्यासारखी. पुढच्या कोणत्या तयारीसाठी शंकरराव निघून गेले, कळायला आज काहीच साधन नाही.

 

(शेतकरी संघटक, २१ ऑगस्ट १९९५)

■ ■