Jump to content

'भारता'साठी/काळ्या इंग्रजाची भगवी 'स्वदेशी'

विकिस्रोत कडून


काळ्या इंग्रजाची भगवी 'स्वदेशी'



 'मूर्खाच्या नाकाला तीनदा घाण' अशा अर्थाची वारंवार वापरली जाणारी एक म्हण कोकणात प्रचलित आहे. आपल्याला समजत नसलेल्या विषयात नाक खुपसायला गेलेल्या एका अर्धवट बुद्धीच्या माणसाच्या मोठ्या मनोरंजक कथेवर ही म्हण आधारली आहे. कोकणात फिरताना अनेक वेळा अनेक गावी अनेक जणांनी ही कथा पुरेपूर कोकणी हावभाव आणि अभिनय यांच्यासकट मला ऐकविली आहे.

 या म्हणीची आठवण होण्याचं कारण घडलं ते असं. राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या बैठकीकरिता मी सभागृहापाशी पोहोचलो तेव्हा एक तरुण पत्रकार माझी सभागृहापाशी वाट पाहात होते. त्यांनी आपला परिचय करून दिला. प्रत्यक्ष श्रीकृष्णाच्या महाशंखाचे नाव मिरविणाऱ्या एका साप्ताहिकातर्फे हे पत्रकार माझी भेट घेण्याकरिता आले होते. सभास्थानीच्या वातावरणात सगळीकडे अयोध्या, मंदिर आणि मशीद यांची हवा होती. या विषयावर मी बरीचशी वेगळी भूमिका सातत्याने मांडत आलो आहे आणि या साप्ताहिकाच्या काकरवित्यांचा मंदिरप्रकरणी जगजाहीर हात असल्यामुळे माझी मंदिरप्रश्नी मुलाखत घेण्याची त्यांची इच्छा असावी असे मी गृहित धरले. अयोध्या प्रश्नाविषयीच्या माझ्या लेखाची एक प्रत देऊन मोकळे व्हावे असा माझा विचार चालला होता, तेवढ्यात पत्रकार महाशयांनी स्पष्ट केले की, त्यांना माझी मुलाखत हवी होती; स्वस्थपणे, सविस्तरपणे मुलाखत हवी होती; पण ती अयोध्येच्या प्रश्नावर नव्हे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि इतर संबंधित संघटना यांनी चालू केलेल्या स्वदेशी आंदोलनाबद्दल माझ्याशी बोलावे अशी त्यांची इच्छा होती.

 गांधीजींच्या स्वेदेशीला अपशकून

 अगदी लहानपणची आठवण झाली.बेचाळीसची चळवळ ओसरत आलेली.

मधूनमधून कोणत्यातरी राष्ट्रीय दिनानिमित्त हरताळ पडायचा आणि शाळा बंद व्हायची हे सोडल्यास वरवर तरी स्वातंत्र्य आंदोलन शमल्यासारखेच दिसत होते. उघडपणे काही करून तुरुंगात जाण्याची किंवा 'शिरीशकुमार' होण्याची कुणाची इच्छाही नव्हती आणि छातीही नव्हती.उघडउघडपणे खादी वापरणे म्हणजेसुद्धा गांधींचा माणूस असल्याचा संशय ओढवून घ्यायला पुरेसे होते.आम्ही शाळकरी विद्यार्थी.खादी वापरणारा बहुधा आमच्यात कोणी नव्हताच; पण निदान खादी वापरण्याची बहादुरी तरी आपल्या हातून व्हावी अशी मोठी ऊर्मी वाटत असे. याला अपवाद म्हणजे संघ आणि हिंदू महासभा अशा हिंदुत्वनिष्ठ घरच्यांचे विद्यार्थी. त्यांची गांधींबद्दलची विरोधभक्ती मोठी जाज्ज्वल्य होती. गांधींनी अहिंसा मांडली म्हणजे डॉ. मुंज्यांची मांसाशनातून स्वातंत्र्य अशी प्रतिक्रिया येई.तसे पाहिले तर त्या काळात हिंदुत्वनिष्ठा आणि स्वदेशी यांच्यात वितुष्ट येण्याचे काही कारण नव्हते.स्वदेशीची चळवळ तशी काही गांधीजींनी सुरू केली नाही. विलायती कापडाच्या पहिल्या होळ्या सावरकर, लोकमान्य टिळक यांनी पेटविलेल्याः पण, आता हा गांधी स्वदेशी म्हणतो काय? मग.आम्ही आग्रहाने, विलायतेतून आलेल्या कापडाची टोपी आणि जमल्यास एखादा दुसरा कपडा वापरणार अशी भूमिका हिंदुत्वनिष्ठ घ्यायचे. खादी पेहरली म्हणजे सनातन वर्णाश्रम धर्माला डाग लागतो असे नव्हते किंवा विलायती मलमलीने धर्मनिष्ठेला काही झळाळी चढत होती असे नव्हते;पण, इंग्रजांच्या आमदनीच्या घटिका भरत आलेल्या असतानासुद्धा स्वदेशीला अपशकून करण्याचा कार्यक्रम या अहंमन्यांनी हाती घेतला आणि हसे करून घेतले.

 'स्वदेशी' राजीवस्त्रांचे पुरस्कर्ते

 दुसरी एक आठवण झाली. १९८६ साली राजीव गांधींचे नवे वस्त्रधोरण जाहीर झाले. अंबानी आणि इतर तत्सम कारखानदारांच्या राजीवस्त्र-उद्योगांना खलेआम प्रोत्साहन देणारे ते धोरण. कापस शेतकऱ्यांची मोठी दैना झाली. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी साहेबराव करपे पाटील याने निराशेपोटी आपल्या बायकोपोरांसह विष पिऊन जीव दिला. आंध्र प्रदेशात तर डझनावारी शेतकरी स्त्री-पुरुषांना जीव देण्यावाचून गत्यंतर उरले नाही. महाराष्ट्रात शेतकरी संघटनेने राजीवस्त्रविरोधी आंदोलन चालू केले. आंदोलनाचा विरोध कृत्रिम धाग्याला नव्हता. शहरातील मृदुकंचनकायिकांना राजीवस्त्रच आवडत असेल तर त्यांना हे सौख्य नाकारायचा शेतकऱ्यांना काय अधिकार? पण ही राजीवस्त्रे तयार करण्याकरिता, यंत्रसामुग्रीपासून कच्च्या मालापर्यंत सगळ्याची आयात होणार

असेल तर शेतकऱ्याला त्याचं पांढरं सोनं निदान निर्यात करून पोट भरता येईल एवढीतरी मुभा ठेवावी, एवढीच मागणी. राहुरीला परिषद भरली. प्रमुख पाहुणे चौधरी चरणसिंग. मंचावर उपस्थित, त्यावेळचे विरोधी पक्षाचे अग्रणी शरद पवार, प्रमोद महाजन इत्यादी इत्यादी. कोसळत्या पावसाला दाद न देता लोकांनी भाषणे ऐकली. सभेच्या शढवटी राजीवस्त्रांची होळी झाली. त्या ज्वालेच्या साक्षीने राजीवस्त्र न वापरण्याची जाहीर शपथ घेण्यात आली. सभेनंतर दोनच दिवसांनी सभेत तडाखेबाज भाषण केलेले प्रमोद महाजन नाशिकला बोलते झाले, 'आमचा स्वदेशी राजीवस्त्राला विरोध नाही, विदेशी राजीवस्त्राला आहे.' राजकारणी माणसं भूमिका बदलतात, इकडून उडून तिकडे जाऊन बसतात अशी माझी अपेक्षाच असते. राहुरीच्या याच सभेत भाषण करताना शरद पवारदेखील म्हणाले होते, 'आमच्या पंतप्रधानांना (राजीव गांधींना) तर घरापासून सगळीकडे विलायती गोष्टीच लागतात. समोरच्या बहुसंख्य अशिक्षित निरक्षर स्त्री-पुरुष शेतकरी समाजातसुद्धा या, सदभिरुचीशी फारकत घेणाऱ्या वाक्याबद्दल नापसंतीची आठी कपाळावर उठली होती. शरद पवार बोलले आणि वर्षाभरात मनोमिलन करून खाविंदचरणारविंदी मिलिंदायमान होण्यासाठी निघून गेले; पण, प्रमोद महाजनांची कोलांटी उडी काही अजबच. राहुरीला प्रतिज्ञा घेण्याची कुणी त्यांच्यावर बळजबरी केली नव्हती! त्यांनी स्वतःहून हात वर उठवून, मूठ आवळून प्रतिज्ञा घेतली. त्याची ध्वनिचित्रफीत उपलब्ध आहे. अठेचाळीस तासांत कोणा बोलवित्या धन्याने त्यांचा कान धरला की त्यांना एकदम स्वदेशीच्या प्रेमाचे भरते यावे? ते प्रमोदरावांना माहीत आहे, मलाही माहीत आहे आणि महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यालाही ठाऊक आहे.
 स्वातंत्र्यलढ्यातील ऐन मोक्याच्या वेळी विलायतीची ऐट मिरविणारे आता एकदम 'स्वदेशी प्रेमी झाले. मूर्खाच्या नाकाला दुसऱ्यांदा घाण लागली.
 बदलाच्या चाहुलीने व्याकुळलेले
 मूर्खाच्या नाकाला तिसऱ्यांदा घाण लागली ती या वर्षा-दोन वर्षांत. इतिहासाने संपवलेले नेहरू-अर्थशास्त्र बाजूला सारून बाजारपेठेला मानणारे नवीन अर्थशास्त्र पुढे येऊ लागले आहे. परकीय चलन वाचविण्याच्या मिषाने नेहरू-व्यवस्थेत उभ्या झालेल्या लायसेन्स-परमिट व्यवस्थेत बदल होतील अशी चिन्हे दिसू लागली. या बदलांमुळे अनेक जीव व्याकूळ झाले.
 अ) नोकरदार
 खुल्या बाजारपेठेच्या हवेने सरकारी आणि निम-सरकारी नोकऱ्यांत भरगच्च

पगार, गडगंज भत्ते, जबाबदारी शून्य, काम म्हणजे टेबलाखाली हात अशा छोट्यामोठ्या नोकरदार-नोकरशहांच्या तोंडचे पाणीच पळाले. देश बुडाला तरी चालेल, आमच्या नोकऱ्यांना धक्का लागता कामा नये, जुन्या महाराजांची संस्थाने गेली, पण आमची संस्थाने जाता कामा नयेत, अशा घोषणांचा गदारोळ त्यांनी चालू केला.
 ब) देशी कारखानदार
 जकात करांच्या तटबंदीमागे गचाळ माल महागड्या किंमतीत बनवून सर्वसामान्य ग्रहकांच्या जिवावर मजा लुटणारे कारखानदारही चिंतीत झाले. बाहेरून माल सहजपणे येऊ लागला, स्वस्त किंमतीत सुबक माल लोकांच्या हाती पडू लागला म्हणजे मग आपले काय? हे समजण्याइतके चातुर्य या वर्गाकडे हमखास होते. त्यांनी बोलणारी तोंडे मिळवायचा प्रयत्न चालू केला.
 आर्थिक बदलाला अपशकून
 काही अजागळ बावळे त्यांच्या हाती लागले. स्वदेशीच्या नावाखाली महात्माजींचा आणखी एकदा वध होतो आहे याची जाणीव नसणारेही भेटले पण, नेहरूवादाच्या या पिलावळीला खरा आधार भेटला तो हिंदुत्ववाद्यांचा. त्यांचे प्रवर्तित चक्र उलट्या टोकाला आले. ऐन स्वातंत्र्याच्या आंदोलनात विलायती मिरविणारे आता एका रात्रीत स्वदेशीभक्त बनले, भाषणे देऊ लागले, स्वदेशीच्या घोषणांनी भिंती रंगवू लागले. म्हणून मला सुरुवातीस सांगितलेल्या कोकणी म्हणीची आठवण झाली.
 'स्वदेशी'चे औचित्य
 काही काही शब्दांभोवती स्वत:चे असे वलय असते. त्याच्या, शब्दकोशातल्या मूळ अर्थाच्या पलीकडे अशा शब्दांची व्याप्ती असते. शब्द उच्चारल्यावर काही अलौकिक, अद्वितीय करून दाखविण्याची चेतना तरुणांच्या मनात आणि शरीरात सळसळावी अशी त्यांची शक्ती असते. 'स्वदेशी' हा अशा भारलेल्या आणि भारावणाऱ्या शब्दांपैकी एक.
 इंग्रज देशात आला त्याआधी सतत चालणाऱ्या लढायांनी आणि आक्रमणांनी गावगाडा मोडकळीस आला होता; पण, गावाची व्यवस्था अजून काही प्रमाणात तगून होती. जुन्या आक्रमकांप्रमाणे इंग्रज तलवारींनी आणि बंदुकांनी गावावर तुटून पडला नाही. बळजोरी केली नाही, जुलूम जबरस्ती केली नाही. तो साम्राज्य स्थापायला आलेला, पण चंगीजखानाच्या परंपरेतला नव्हे. त्याचे डावपेच व्यापारी. इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती स्थिरावलेली होती. हिंदुस्थानातून कच्चा माल

मायदेशी नेणे आणि तयार वस्तूंसाठी भारतासारखी प्रचंड हुकमी बाजारपेठ मिळविणे ही त्याची रणनीती होती. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्याच्या रणनीतीचा परिणाम स्पष्ट झाला. गोखले, रानड्यांनी त्याबद्दल लिहिले. जोतिबा फुल्यांनी शेतकऱ्यांच्या जिभेने सांगितले. गावातली हुन्नर, बलुतेदारी मोडकळीस आली आणि लक्ष्मीचा ओघ मँचेस्टरकडे जाऊ लागला. परसत्ता बनियाची तर त्यावर तोडगाही बनियाचाच पाहिजे! नव्या काळात घोड्यावर मांड ठोकून दांडपट्टा फिरवून नाना कसरती करून इंग्रजाला पळवू पाहाणारे कालबाह्य झाले. आणि 'स्वदेशी'चा उगम झाला. इंग्रज जुलूमजबरदस्ती तर करत नाही? त्याचा माल आपल्याला घ्यायला भाग तर पाडत नाही? मग दीनातल्या दीन प्रजेला निदान त्याचा विकत न घेण्याचे व्रत तर पाळता येईल? स्वदेशी चळवळीची थोडक्यात भूमिका अशी होती.
 स्वदेशी-विदेशी स्पष्ट भेद
 स्वदेशी आंदोलनाच्या अंमलबजावणीतही काही फारशा व्यावहारिक अडचणी आल्या नाहीत. स्वदेशी माल कोणता आणि विदेशी कोणता असा फरक करणे स्वदेशी चळवळीच्या काळात तरी फारसे कठीण नव्हते. जसजसा काळ गेला तसतसे ते अधिकाधिक कठीण होत गेले. आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वदेशीविदेशीतील सरहद्द रेषा खूपच अस्पष्ट, धूसर होत गेली.
 पण स्वदेशी आंदोलनाच्या ऐन भरात ही अडचण फारशी जाणवत नव्हती. उभ्या देशात कारखाने तुरळक. जमसामान्यांच्या दैनंदिन जीवनातल्या बहुतेक गरजा कारखान्याच्या मालाला स्पर्श केल्याखेरीज पुर्ण होऊ शकत असत. गिरणी मुंबईला पण गिरणीतली यंत्रं परदेशात तयार झालेली. कापूस इथल्या काळ्या आईनं दिलेला पण वस्त्राची वीण विलायती. मग गिरणीचे कापड स्वदेशी का विदेशी असा सरहद्दीचा प्रश्न फारसा काही जाचक ठरला नाही. देशात साखरेचे कारखाने सुरू झाले तरी स्वदेशीवाले निष्ठेने गुळावरच भक्ती ठेवून राहिले. त्यानेही 'स्वेदशी'ला फारशी काही बाधा पोहोचली नाही.
 आता स्वदेशी काय उरले?
 १९९० दशकाच्या परिस्थितीत स्वदेशी विदेशी असा पंक्तिप्रपंच करणे अत्यंत जिकिरीचे होईल. किंबहुना, असा फरक करण्याचा प्रयत्न कोणी फारसा करीतही नाही. परदेशातून परत येताना बरोबर आणलेला किंवा येन केन प्रकारेण हस्तगत केलेला 'इम्पोर्टेड' माल एका बाजूला आणि बाकी सगळा 'देशी'. स्वदेशीविदेशी हा संदर्भ संपला आणि 'इंम्पोर्टेड'-देशी असा नवा संदर्भ सुरू झाला. 'देशी' शब्दात स्वदेशीचे वलय नाही, अभिमान नाही. उलट, देशी म्हणजे गचाळ, कमी प्रतीचा, बेभरवशाचा माल अशी जुगुत्सा.
 बलुतेदारी आणि गावातली कारागिरी आता संपुष्टात आली आहे. जे काय बनते ते छोट्या कारखान्यात नाहीतर मोठ्या कारखान्यात. सर्व कारखान्यांतील यंत्रांची रचना विलायती प्रतिभेतून निघालेली. तंत्रज्ञान विलायती, मग यंत्रांची बांधणी भली देशी भूपृष्ठावर झालेली असो. नित्यनियमाच्या वापरातील अनेक वस्तू तयार करण्याकरिता लागणारा कच्चा मालही विलायती, तयार करणारी माणसे विलायती वेश-भाषा-संस्कृतीच्या जवळात जवळ जाण्याची धडपड करणारी. शक्य असते तर एखादे मलम लावून त्यांनी स्वतःला शुभ्रकायदेखील बनवून घेतले असते! काळ्या इंग्रजाची कारखानदारी म्हणजे आता स्वदेशी ठरली.
 इंग्लंडची 'स्वदेशी'
 आजच्या परिस्थितीत विदेशी-स्वदेशी असा फरक करणे शक्यही नाही आणि म्हटले तर, आवश्यकताही नाही. इंग्रजाला काटशह म्हणून स्वदेशी आंदोलन उभे राहिले. हे हिंदुस्थानातच घडले असे नाही तर जगभर अनेक देशांत हेच घडले आहे. इंग्लंड देश औद्योगिक क्रांतीच्या आधी 'स्वदेशी'चा मोठा पुरस्कर्ता होता. जर्मनीसारख्या पुढारलेल्या देशांनी इंग्लंडच्या बाजारपेठा व्यापून टाकल्या तर इंग्रज व्यापारी आणि कामगार यांच्यावर कठीण अवस्था गुदरेल म्हणून परदेशी माल येऊ देऊच नये अशी मागणी इंग्लंडमधील, मुख्यतः व्यापाऱ्यांनी केली. इंग्लंडमधील स्वदेशी चळवळीचे नावच मुळी 'व्यापारीवाद' (Mercantilism) असे होते. हळूहळू परिस्थिती बदलली. जेम्स वॅटने वाफेचे इंजिन काढले आणि इंग्लंड झपाट्याने जर्मनी, फ्रान्स इत्यादी देशांना मागे टाकून दळणवळण आणि उद्योगक्षेत्रात पुढे सरसावला. आता परिस्थिती बदलली. परदेशी माल इंग्लंडच्या बाजारपेठेत उतरेल आणि देशी मालाला हटवेल ही शक्यता आणि भीती उरलीच नाही. उलट, इंग्लिश कारखान्यांत तयार होणारा माल इतर देशांत कसा पाठविता येईल याची चिंता व्यापाऱ्यांना पडली. जो तो देश व्यापारवादी बनला होता; आपल्याला देशाचे दरवाजे बंद करून परदेशी माल रोखून ठेवू पाहत होता. अनेक तटबंद्यांनी तुकडे तुकडे झालेल्या या जगात औद्योगिक क्रांतीतून निर्माण झालेल्या मालाचे ओघ अनिर्बंधपणे वाहायचे कसे? व्यापारवाद फेकून देऊन खुल्या बाजारपेठेचे तत्त्वज्ञान या काळात इंग्लंडमध्ये अॅडम स्मिथने मांडले आणि एका नव्या युगाला सुरुवात झाली.  आर्थिक हितसंबंधांनी तत्त्वज्ञान ठरते
 'स्वदेशी' का वैश्विकता? यांच्यातील निवड ही काही तात्त्विक, नैतिक आधारांनी होत नाही. प्रत्येक समाजाच्या कालपरिस्थितीनुरूप हितसंबंधांच्या जोपासनेकरता ही निवड होते. व्यापारवादाचा पुरस्कार करणाऱ्या इंग्लंडने खल्या बाजारपेठेचे तत्त्वज्ञान स्वीकारले कारण इंग्लंडचा स्वार्थ बदलला. गांधीयुगात स्वदेशी हा भारतीयांच्या हितसंबंधाचा कार्यक्रम. कारण, इंग्रजी कारखानदारी मालापुढे टिकाव धरेल अशी काही उत्पादक यंत्रणाच आमच्याकडे उरली नव्हती. थोडक्यात, बाजारपेठेत स्पर्धा करण्याची ज्यांची ताकद ते हिरीरीने खुल्या बाजारपेठेचा उद्घोष करतात आणि ज्यांचा माल महागडा आणि गचाळ ते कृत्रिम संरक्षणाच्या भिंतीआड दडू पाहतात.
 कालामागून फरफटणारे शिलेदार
 स्वदेशीची चळवळ होऊन गेली. काही जणांच्या बुद्धीत प्रकाश पडायला वेळ लागतो. अशांची बुद्धी कायम गतकालातच वावरत असते. शिवाजी महाराज गेले. गडकिल्ल्यांचे राजकारण संपले. रणदल्लाखान इतिहासजमा झाले. तरीही इतिहासात रममाण होणारी माणसे अबलख घोड्यावर स्वार होऊन, जिरेटोपचिलखत घालून, तलवारीच्या धारेवर पंचप्राण लावून दिग्विजय करण्याची स्वप्ने पाहत राहातात. अशा शिलेदारांचे मानसपितर जेव्हा लढायांच्या धुमश्चक्रया चालू होत्या तेव्हा घरोघर कुणगीआड लपले होते अथवा सुलतानांपुढे कुर्निसात घालत होते. स्वदेशीच्या कालखंडात विलायतीचा टेंभा मिरविणाऱ्यांचे ध्वज आता एकदम स्वदेशीकरिता फडफडू लागले ही काय गंमत आहे?
 शेतकऱ्याचा गळा घोटणारी 'स्वदेशी'
 आजच्या स्वदेशी चळवळीत शेतकऱ्यांना काहीही स्वारस्य नाही. स्वदेशीची घोषणा म्हणजे परदेशी माल आपल्या देशात येण्यापासून रोखणे एवढेच नाही. इतर देशांतील लोकांचे हात काही केळी खायला जाणार नाहीत. तुम्ही त्यांचा माल येऊ देत नाही तर ते तुमचा माल येऊ देणार नाहीत. अशा छिन्नभिन्न झालेल्या अर्थव्यवस्थेत आज शेतकऱ्यांना काहीही स्वारस्य नाही. पिढ्यान्पिढ्या जमीन वाटत गेली. शेतीवर भांडवली साधने फारशी उभी राहिलीच नाहीत. तरी देखील भारतीय शेतकरी आज परदेशी बाजारपेठेत उतरून स्वतःच्या ताकदीवर उभा राहू शकतो. आंतराष्ट्रीय खुल्या बाजारपेठेत आडवा घातलेला कोणताही अडसर शेतकरीहिताविरोधी आहे. नवीन स्वदेशी आंदोलनाचा उद्गाता शेतकरी नाही हे नक्की.

 या स्वदेशी'चे बोलविते धनी
 या आंदोलनाचा बोलविता धनी कोण आहे हेही उघड आहे. स्वातंत्र्यापासूनच्या अर्धशतकात लायसन्स-परमिटचे डावपेच खेळून मक्तेदारी मिळविलेले कारखानदार हे या आंदोलनाचे सूत्रधार आहेत. यांनी तंत्रज्ञान आयात केले ते त्यावेळीही कालबाह्य झालेले. यंत्रसामुग्री आणली आडगिहाईकी. मालाचे नकाशे परदेशी, जुनाट. कारखान्यात काम करणारे अधिकारी काळ्या इंग्रजाच्या पिंडाचे, परभृत बुद्धीचे. त्यांचे कामगार इतके गदळ की त्यांच्या माफक रोजगारीतही महाग पडावेत. यांचा माल घेणार कोण? एतद्देशीय गिहाईकांना बिचाऱ्यांना काही पर्यायच नाही म्हणून त्यांचा माल खरीदावा लागतो. या काळ्या इंग्रजाला स्वदेशीच्या संरक्षणाची पहिल्यापासूनच गरज होती. नेहरू कालखंडात लायसन्सपरमिट पद्धतीमुळे त्यांना संरक्षण मिळाले. ती व्यवस्था कोसळल्यानंतर आता त्यांना काही नव्या सोंगाची गरज आहे. म्हणून शास्त्रविज्ञानाचा उद्घोष करणारे हे कारखानदार आता स्वदेशीची चाल खेळू लागले आहेत.
 हा सगळा प्रकार भयानक नसता तर चेष्टेचा विषय झाला असता. स्वदेशीचा कालखंड संपला. इम्पोर्टेड आणि देशीच्या जमान्यात स्वदेशी चळवळीत अर्थ असता तरी व्यवहार्यता नाही. आणि प्रत्यक्षात देशातील बहुसंख्य कष्टकरीशेतकऱ्यांच्या व्यापारावरील सर्व निर्बंध उठविण्यात पहाट आहे आणि तरीही नाकाला तिसऱ्यांदा घाण लावून घेण्याकरिता हिंदुत्ववादी सरसावले आहेत.
 त्यांच्या आंदोलनात अर्थ नाही, स्वार्थ नाही आणि स्वाभिमान किंवा निष्ठाही नाही. आर्थिक, औद्योगिक, व्यापारी, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व क्षेत्रांतील शतकाशतकांची परभृतता एकदाची संपवून टाकून स्वयंभू समाज उभा राहावा अशी यांची दृष्टी नाही. परकियांच्या विज्ञानावर, प्रतिभेवर देशी बाजारपेठेत अंमल बसविण्याची यांची क्षुद्र महत्त्वाकांक्षा आहे. यांना परदेशी माल नको, पण परदेशी तंत्रज्ञान आणि विज्ञान मात्र आयते. वाढन समोर येणे आपला हक्क आहे असे ते मानतात. बौद्धिक मालमत्तेच्या हक्कासंबंधी या 'स्वदेशी' मंडळींची जी भूमिका आहे ती पाहिली म्हणजे त्यांचे ढोंग स्पष्ट होते.
 (अपूर्ण)

(६ ऑगस्ट १९९२)

♦♦