पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शैलाताईंच्या हातात दिला. त्याचा अर्थ दोघींनाही कळेना. “खाली जाऊन डॉक्टरांना हा कागद दाखवा," असं फर्मान सोडून डॉक्टरीणबाईंनी पुढचा पेशंट आत बोलावला. कागद घेऊन शैलाताई आणि आयेशा तळमजल्यावर डॉक्टरांकडे आल्या.

 कैलास आणि बबलू या दोघींची वाटच बघत होते. चौघं डॉक्टरांना भेटायला गेले. कागद पाहून डॉक्टर म्हणाले, "व्वा, तुमच्या मनासारखा आहे रिपोर्ट. पेढे ठेव वैजनाथाला." याचा अर्थ मात्र दोघींनाही कळाला. पण 'सोळा' आकड्याचं गुपित काही केल्या कळेना. त्या दोघी जायला वळल्या, तेवढ्यात पुढची बाई डॉक्टरांकडे कागद देऊन उभी राहिली. डॉक्टर त्या बाईला म्हणाले, “मनासारखा नाहीये रिपोर्ट. दोन हजार रुपये भरा आणि वर अॅडमिट व्हा!" त्या बाईच्या कागदावर इंग्रजी ‘एकोणीस' आकडा काढलेला. मग कार्यकर्त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. 'सोळा'मधला 'सहा' इंग्रजी 'बी' अक्षराचं प्रतिनिधित्व करत होता, तर ‘एकोणीस'मधला 'नऊ' इंग्रजी 'जी' अक्षराचं प्रतिनिधित्व करत होता. कार्यकत्यांनी एकमेकांकडे पाहिलं. सगळ्यांनीच ओळखलं होतं. बी म्हणजे बॉय आणि जी म्हणजे गर्ल. एक आकडा सिंगल प्रेग्नन्सीचा निदर्शक. कार्यकर्ते बाहेर पडणार एवढ्यात...

“अॅडमिट होते; पण आम्ही घेऊन जाणार नाही..." आयेशाच्या नंतर नंबर असलेल्या बाईच्या तोंडून हे उद्गार ऐकून कार्यकर्ते दबकलेच! प्रश्नार्थक चेहऱ्यांनी सगळ्यांनी एकमेकांकडं पाहिलं. म्हणजे..? गर्भपातानंतर भ्रूण पेशंटलाच घेऊन जायला सांगितलं जात होतं की काय...! एव्हाना बबलू, आयेशा आणि प्रदीप दरवाज्याजवळ पोहोचले होते. कैलास आणि शैलाताई जरा मागे होते. त्या बाईला समोरचा बोर्ड दाखवून डॉक्टर म्हणाले, "ते बघा काय लिहिलंय, कायदा जसा तुम्हाला आहे, तसाच आम्हालाही आहेच की! ... आणि... डॉक्टरांनी बोलता-बोलता त्यांच्या आसनाजवळ असलेली खिडकी उघडली. शैलाताई आणि कैलासला आतलं स्पष्ट दिसत होतं. आतलं दृश्य बघून कैलास आणि शैलाताई गोठले...

 जर्मनचं एक भांडं आणि त्यातल्या ऐवजावर तुटून पडलेली चार गलेलठ्ठ कुत्री... बापरे! दोघं प्रचंड हादरलेले; पण चेहऱ्यावर तसं दाखवता मात्र येईना. पटकन सगळेजण बाहेर पडले आणि थोडं अंतर चालून गेल्यावर मग तोंडावर हात

५४