Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठेवून, डोळे मोठे करून कैलास आणि शैलजा एकमेकांकडे पाहू लागले. आत जे पाहिलं ते बिचकत-बिचकत दोघांनी इतर तिघांना सांगितलं. हे सगळं मी फोनवर ऐकत होते...शैलजाचा फोन सुरू होता... आणि रेकॉर्डिंगसुद्धा!

 गावातलं एकंदर वातावरण आणि पाहिलेला प्रकार... सगळेच जण जाम घाबरलेले. फोनवर तो प्रकार ऐकल्यामुळं माझीही छाती दडपलेली. कार्यकर्त्यांची काय अवस्था झाली असेल! पुढं नेमकं काय घडेल, याची धाकधूक तर त्यांना होतीच. कुणी ओळखलं तर...? मी फोनवरून त्या चौघांना सांगितलं, “परळीत आता क्षणभरही थांबू नका. तुम्ही सगळे थेट नांदेडलाच या. इथं आल्यावर बघू पुढं काय करायचं ते." मुख्यमंत्र्यांचं शहर असल्यामुळं इथं कार्यकर्ते सुरक्षित राहतील, असं वाटलं. कार्यकर्ते दडपलेल्या, भांबावलेल्या अवस्थेतच गाडीपर्यंत पोहोचले आणि मग कैलासनं अॅक्सिलरेटरवर जोर दिला. खूप वेगात त्यानं सगळ्यांना घेऊन सुखरूप नांदेड गाठलं.

 इकडे, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातलं माझं लेक्चर संपवल्यानंतर मी चक्रं फिरवायला सुरुवात केली. बीडच्या सिव्हिल सर्जनना फोन केला. "आमच्या कार्यकत्यांची स्टेटमेंट्स घ्यायला नांदेडलाच या," असं मी त्यांना सांगू पाहत होते; पण पलीकडून 'हॅलो, हॅलो' असा आवाज येऊन फोन कट व्हायचा. असंच तीन- चार वेळा झालं. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी... सगळ्यांचे फोन अचानक बंद! म्हणजे, आम्ही जे केलं, त्याची माहिती तिकडे अधिकारी वर्तुळात पसरली होती तर! आता काय करणार? सगळाच पेच! पुढं कारवाई करायची तरी कशी?

 अखेर मुख्यमंत्र्यांच्या पीएला कळवलं. मग वरूनच चक्रं फिरली. अंबाजोगाईच्या प्रांताधिकाऱ्यांवर कारवाईची जबाबदारी सोपवलीय आणि ते तब्बल शंभर पोलिसांचा फौजफाटा घेऊन परळीच्या हॉस्पिटलकडे गेलेत, असं कळलं. दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये परळीतल्या त्या हॉस्पिटलच्या परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आल्याचा मथळा...

 आम्ही सगळे सातारला परत यायला निघालो. साताऱ्यात येऊनच कार्यकत्यांचे जाबजबाब नोंदवून घेतले जाणार होते. प्रवासात सतत फोन सुरू होते. अंबाजोगाईचे प्रांताधिकारी तपास करीत असताना पुरावे कुठे आणि कसे

५५