Jump to content

पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शोधला. “दिवस आयेशाला गेलेत आणि उलट्या प्रदीपला होतायत," असं चिडवून आम्ही खो-खो हसू लागलो. तेरा किलोमीटर अंतर कसं पार झालं आणि परळीच्या एसटी स्टँडसमोरच्या त्या बहुचर्चित क्लिनिकच्या दारात आम्ही कधी पोचलो, समजलंच नाही. क्लिनिकसमोर पार्किंगला बंदी. वैजनाथ मंदिराच्या पार्किंगमध्ये गाड्या लावायच्या आणि मग क्लिनिकमध्ये यायचं, हा तिथला शिरस्ता. पण क्लिनिकसमोरच्या टपरीवर थोडं खाऊन घेतलं. दिवसभर पुन्हा काही मिळेल न मिळेल!

 वैजनाथ मंदिरासमोरच्या पार्किंगमध्ये गाडी लावली, तेव्हा कळलं की, तिथून त्या क्लिनिकपर्यंत शेअर रिक्षा सुटतात. पोटुशी बाई दिसली की रिक्षावाले त्या हॉस्पिटलचं नाव घेऊन ओरडत होते. हॉस्पिटलजवळच्या स्टॉपचं नावही हॉस्पिटलच्याच नावावरून पडलेलं. इथून पुढं कार्यकर्त्यांची आणि माझी ताटातूट होणार होती. सगळ्यांचे चेहरे एकदा पाहून घेतले. निग्रही दिसले. कुणीच घाबरलेलं नव्हतं. कार्यकर्ते रिक्षा स्टॉपकडे वळले आणि मी नांदेडच्या दिशेनं प्रवास सुरू केला. इथून पुढची हकीकत मला नंतर कार्यकर्त्यांकडूनच समजली.

 क्लिनिकमध्ये तब्बल नव्वद पेशंट बसलेले. बीडमधल्या स्टिंग ऑपरेशनची बातमी छापून आलेली असल्यामुळं सगळ्यांना चेकिंग करूनच आत सोडत होते. पेशंटला वरच्या मजल्यावर नेलं जात होतं. सोबत एकाच माणसाला जाण्याची परवानगी. आयेशा आणि शैलाताई वरच्या मजल्यावर गेल्या तर बाकीचे तळमजल्यावर थांबले. सगळ्यांनी आपण बिनधास्त असल्याचं नजरेनंच एकमेकांना सांगितलं. वरच्या मजल्यावर एकेका खोलीत पाच-पाच पेशंट. त्यांच्यावर नजर ठेवायला एक धिप्पाड माणूस. “केवढी गर्दी! कधी यायचा नंबर..." असं शैलाताई पुटपुटल्या अन् तो धिप्पाड गृहस्थ म्हणाला, “दुपारी दोननंतर इथं कुणीच नसेल. तीस वर्षांचा अनुभव आहे. सगळ्या पेशंटचा नंबर दोनच्या आत येणारच."

 एखाद्या यंत्राप्रमाणं हॉस्पिटलचं कामकाज सुरू होतं. प्रत्येकजण आपापलं काम करत होता. पेशंट वगळता कुणी कुणाशी बोलत नव्हतं. नंबर आल्यावर आयेशाला घेऊन शैलजा आत गेली. तिथं सोनोग्राफीसाठी जेल लावायला एक बाई आणि डॉक्टरांच्या पत्नी अशा दोघीच होत्या. तपासणी झाली आणि एका चतकोर कागदावर इंग्रजीत 'सोळा' आकडा लिहून तो कागद डॉक्टरीण बाईंनी

५३