पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिनं नकार दिला. खरं तर संस्थेची ऐपत नसतानासुद्धा तिच्या बाळंतपणाचा खर्च आम्ही केला होता. तरीसुद्धा सगळ्या मेहनतीवर पाणी पडण्याची वेळ आली होती. बायडा मावशीची साक्षही तकलादूच झाली. डॉक्टरांनी आपला कबुलीजबाब दबावाखाली घेतला गेला, असं कोर्टात सांगितलं. परंतु तशी तक्रार केली का, असा प्रश्न विचारल्यावर डॉक्टर निरुत्तर झाले. हातात साक्षीपुरावे कमी होते, तरीसुद्धा आम्ही शेवटपर्यंत लढाई करायचं ठरवलं होतं. मीही साक्षीदार होते. परंतु इतरांच्या साक्षी सुरु असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी कोर्टात माझ्या उपस्थितीला हरकत घेतली. कोणत्या नियमानुसार, या न्यायाधीशांच्या प्रश्नाला बचाव पक्षाच्या वकिलांकडे उत्तर नव्हतं. पण, थोडक्यासाठी वाद नकोत म्हणून मीच स्वतःहून बाहेर आले. शैलाताईसह दोन साक्षीदारांची साक्ष माझ्या अनुपस्थितीतच झाली.

 निकालाबाबत अनिश्चितता होती. पण अखेर डॉक्टरांना कोर्टानं वेगवेगळ्या १३ कलमांखाली दोषी ठरवलं. मुख्य साक्षीदार फितूर झाला असला, तरी इतर दोन साक्षीदारांच्या साक्षींवर अविश्वास व्यक्त करण्याचं काहीच कारण नाही, असं निरीक्षण नोंदवलं आणि डॉक्टरांना तीन वर्षांची सजा सुनावली. शिवाय तब्बल १ लाख ३० हजार रुपयांचा दंड! वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी डॉक्टरांनी जामीन मागितला; परंतु दंडाची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच जामीन दिला जाईल, असं कोर्टानं सुनावलं. अडथळ्यांची शर्यत संपली होती. आम्ही जिंकलो होतो.

 या दरम्यान एकदा कामानिमित्त डिस्कळला जाण्याचा योग आला. स्टिंग ऑपरेशनसाठी आम्ही सोबत नेलेल्या महिलेच्या घरासमोर विटा, वाळू, सिमेंट असं बांधकाम साहित्य येऊन पडलं होतं. नव्या घराचं बांधकाम सुरू झालं होतं. ती आता मोठ्या घरात आनंदानं राहणार होती.

४९