पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फक्त कर्जाच्या परतफेडीत आणि व्याजातच रस. पण सोनोग्राफीचं यंत्र घेतल्यावर केला जाणारा व्यवसाय कायदेशीर असणार का? सोनोग्राफी करण्याचा परवाना कायदेशीर आहे का? कर्ज काढून घेतलेल्या मशीनच्या साह्यानं गुन्हे तर होणार नाहीत ना? वैद्यकीय पेशातली मूलभूत तत्त्वं पाळली जाणार का? या प्रश्नांशी बँकांना काहीच सोयरसुतक नाही. डॉक्टरची डिग्री बघून लगेच कर्ज मंजूर! घर बांधण्यासाठी कर्ज काढायचं म्हटलं तर याच बँका किती चौकशा करतात. जागा निर्वेध आहे की नाही? जागेवर पूर्वीचं कर्ज आहे का? मालकीचा पन्नास वर्षांचा इतिहास... असं सगळं तपासतात. पण डॉक्टरांना कर्ज देताना सवालजवाब नाहीत आणि शंकाकुशंकाही नाहीत. ज्या भागात डॉक्टर सोनोग्राफी सेंटर उभारणार, त्या भागात कायदेशीर व्यवसाय करायचा म्हटलं, तर कर्जाची परतफेड करण्याइतका व्यवसाय होईल का, असाही प्रश्न बँकांच्या अधिकाऱ्यांना पडत नाही. पुसेगावच्या डॉक्टरांच्या एकाच प्रकरणात, एकाच दिवशी... नव्हे काही तासांत सोनोग्राफी केल्याचे बारा कागद आम्हाला हातात मिळाले. रेकॉर्डवर फक्त दोन सोनोग्राफी झाल्याचं दिसतंय. म्हणजेच, उरलेल्या दहा केसेसमध्ये गर्भलिंग चाचणी झाली असण्याची शक्यता आहेच. हे सगळं आम्ही पुराव्यासह रेकॉर्डवर आणलं होतं. आता दिवसातलं आमचं दुसरं टार्गेट होतं सातारारोड...!

 आजचा दिवस जणू धक्यांवर धक्के देण्यासाठीच उगवला होता. सातारारोडला पोहोचलो तेव्हा समजलं, डॉक्टरांचा दवाखाना तिथल्या पोलिस औटपोस्टपासून शंभर पावलांपेक्षाही कमी अंतरावर... आणि मिळालेल्या माहितीनुसार, तिथं गर्भलिंग चाचणीचा व्यवसाय मात्र प्रचंड प्रमाणात सुरू होता. डॉक्टर राहायला होते साताऱ्यात. पुसेगावच्या डॉक्टरांनी पेशंट पाठवलाय, असा निरोप मिळाल्याबरोबर साताऱ्याहून धावतपळत ते दवाखान्यात हजर झाले. नेहमीप्रमाणं आम्ही थोडं लांबच थांबलो होतो. पेशंटसोबत दवाखान्यात जाण्यासाठी द्रुपदा मावशी आणि माया या दोघींना बोलावून घेतलं होतं. पेशंटची दिवसातली दुसरी सोनोग्राफी झाली. शंभर टक्के मुलगीच आहे, असं डॉक्टरांनी ठासून सांगितलं. १५ ते २० मिनिटांत आम्ही दवाखान्यात पोहोचलो. तक्रार दाखल करण्यासाठी कोरेगावच्या सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावलं. एव्हाना सिव्हिल सर्जन साताऱ्याला गेले होते. प्राधिकृत अधिकारी म्हणून कोरेगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून घेतलं.

४७