पान:स्टींग ऑपरेशन (Sting Operation).pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पेशंटकडे रिपोर्टचा कागद होता. सोनोग्राफीसाठी किती फी घेता, असं विचारलं तेव्हा डॉक्टरांनी पाचशेचा आकडा सांगितला. मग या पेशंटकडून दोन हजार का घेतलेत ? रेकॉर्ड का ठेवलं नाहीत? अशी प्रश्नांची सरबत्ती केल्यावर डॉक्टरांची पुरती भंबेरी उडाली आणि आमच्या पेशंटची सोनोग्राफी केल्याचं त्यांनी कबूल केलं. पण मुलगा की मुलगी, हे मात्र मी सांगितलं नाही, असंच ते अजूनही म्हणत होते. आपल्याकडून चूक झाल्याचं मात्र त्यांनी मान्य केलं. मग डॉक्टरांच्या कार्यशाळेत त्यांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, त्यांचं नेमकं काय चुकलं याचं स्टेटमेन्ट डॉक्टरांकडून लिहून घेतलं. सोनोग्राफीसाठी दोन हजार रुपये घेतले, त्या नोटा हॉस्पिटलमध्ये मिळून आल्या, हे कायद्याचं उल्लंघन आहे, असं पुन्हा करणार नाही, असं स्टेटमेन्ट त्यांनी लिहून दिलं.

 वडूजच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनीच या प्रकरणात प्राधिकृत अधिकारी म्हणून कागदपत्रं ताब्यात घेणं अपेक्षित होतं. पण ते लवकर येईनात. दोन साक्षीदारांचे जबाब आणि इतर कागदपत्रं त्यांच्या ताब्यात देऊन आम्हाला लवकरात लवकर निघायचं होतं. कारण डॉक्टरांनीच दिलेल्या माहितीनुसार, कोरेगावजवळ सातारारोड हद्दीतसुद्धा हा प्रकार सुरू होता. तिथं आणखी एक डॉक्टर असे प्रकार करतात, हे आत्ताच समजलं होतं. अनायसे पेशंट मच्याबरोबरच होती. अंतरही फार नव्हतं. आम्ही पुसेगाव सोडल्यावर काही उलटसुलट होऊ नये म्हणून बबलू या आमच्या एका कार्यकर्त्यासह शैलाताई पुसेगावच्या हॉस्पिटलमध्येच थांबल्या. सोबत सिव्हिल सर्जनचा शिपाई आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचा कर्मचारीही थांबला. पोलिस स्टेशनला ही माहिती देऊन ठेवली आणि आम्ही कोरेगावच्या दिशेनं निघालो.

 मनात विचारांचं चक्र सुरू झालं. अंडर रिपोर्टिंग, म्हणजे सोनोग्राफी कागदोपत्री न दाखवण्याचं प्रमाण किती प्रचंड आहे, याचा अंदाज डॉक्टरांचं रेकॉर्ड पाहून आला होता. अशी कितीतरी सोनोग्राफी सेंटर असतील! कलर डॉपलर सोनोग्राफी मशीन विकत घ्यायला २१ लाख रुपये लागतात. कर्ज काढलं तर साठ हजारांचा मासिक हप्ता द्यावा लागत असणार. रोज किमान २५ पेशंट तपासले, तरच वेळच्या वेळी हप्ते भरणं शक्य आहे. पण कर्ज देताना बँकेकडून किमान प्रश्नही विचारले जाऊ नयेत, याचं नवल वाटलं. बँकांना

४६