पान:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण (91 ve Marathi Sahitya Sammelan Speech).pdf/17

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ठरतो की, त्यांनी माणसाला दु:ख सहन करण्यासाठी, त्याचं मन कणखर करण्यासाठी मदत करावी. त्याला हे पुन्हा पुन्हा सांगावं, पटवून द्यावं की, त्याच्यात विपरीत परिस्थितीतून मार्ग काढत जगण्याचं अपार धैर्य आहे. त्याच्यात आत्मसन्मान, आशा, स्वाभिमान आणि करुणा - सहवेदनेचं अपार भांडार आहे. हे त्याला पुन्हा आत्मप्रयत्ययास आणून देण्यासाठी लेखकानं आपलं लेखन केलं पाहिजे." (स्वैर अनुवाद)
 या प्रगतिशील लेखक चळवळीच्या विचारधारेनं प्रस्थापित केलेल्या साहित्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या पार्श्वभूमीवर भारतीय साहित्याच्या हजारो वर्षांच्या परंपरेचं अवलोकन केलं, तर दोन साहित्य विचार प्रकर्षाने जाणवतात. एक विचार हा रामायण परंपरेतून विकसित झालेला आहे, तर दुसरा महाभारत परंपरेतून पुढे आलेला आहे. रामायण परंपरा म्हणजे आदर्शवादी जीवनाचे चित्रण करणारी साहित्य परंपरा. 'जे जे उत्तम, उदात्त, सुंदर व महन्मंगल व जे मानवी संस्कृतीचं आदर्श स्वप्न - युटोपिया आहे त्याचं दर्शन घडवणारं साहित्य म्हणजे रामायण परंपरेचं साहित्य, महाभारताची साहित्य परंपरा म्हणजे मानवी विकार, लालसा, सत्ता-संपत्ती-स्त्रीचा लोभ, क्रौर्य, हिंसा आणि पशुत्व वृत्तीच्या माणसांचं चित्रण परखड वास्तववादी पद्धतीनं करणारी परंपरा. पण संस्कृत व एकूणच अभिजात भारतीय साहित्य पाहिलं तर महाभारतीय परंपरेचा स्वीकार अठराव्या शतकापर्यंत फारसा दृढ झालेला दिसत नाही. 'रस' आणि 'सौंदर्य' युक्त रंजन हाच प्राचीन साहित्याचा मुख्य प्रवाह राहिलेला दिसून येतो. इंग्रजी अंमलात जागतिक दर्जाच्या साहित्य दर्शनानं भारतीय साहित्यकारांना नवं भान आलं आणि कादंबरी हा बाङ्मयप्रकार रूढ झाला. कथात्म साहित्याला नवे धुमारे फुटले. ब्रिटन व इतर युरोपिय सत्तांचा साम्राज्यवाद - वसाहतवाद आणि तिस-या जगाची होणारी लूट तसेच शेतक-यासोबत नवविकसित भांडवलशाहीमुळे कामगारांचे होणारं शोषण याचा संवेदनशील कलावंतावर परिणाम झाला नसता तर नवल म्हटलं पाहिजे. त्यातून साहित्याला नवे सामाजिक वळण मिळत गेले.

 पण साहित्याचा एक अभ्यासक म्हणून माझ्या मते, भारतीय प्राचीन साहित्यातील कलानिर्मितीच्या प्रेरणा म्हणून रामायण वे महाभारतीय परंपरा या परस्पर विरोधी नाहीत तर पूरक आहेत. कारण माणूस प्राण्यापासून विकसित झाला असला तरी त्याला बुद्धी, वाणी, शब्द, हास्य आणि करुणेचे वरदान प्राप्त झाले असल्यामुळे साहित्य व इतर कलांचा मानवी इतिहासाच्या वाटचालीत उदय व विकास झाला, त्यातून आपल्यातली पशुवृत्ती आणि आदिम पाशवी प्रेरणा नियंत्रित करीत परस्परांशी प्रेम करीत माणूस बनावं, सामाजिक प्राणी बनावं अशी मानवी संस्कृती विकसित झाली. तिला भुकेबरोबर कला - सौंदर्य जसं लागायचं, तसंच

१४ / ९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन